कॉ. गोविंद पानसरे यांच्या प्रेरणेतून प्रगतिशील लेखक संघाचे ११वे अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन ३ व ४ डिसेंबर २०२२ दरम्यान औरंगाबादमध्ये पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक व अनुवादक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी भूषवले. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
१.
अण्णा भाऊंची जी श्रद्धास्थाने होती- मार्क्स, फुले व आंबेडकर यांना नमन करून मी माझ्या अध्यक्षीय भाषणाकडे वळतो.
मित्रहो, कोणत्याही महामानवाचे, कलावंताचे, साहित्यिकाचे स्मरण पुनः पुन्हा यासाठी करण्यात येते की, या महामानवाने, कलावंताने, साहित्यिकाने या महाराष्ट्रातील आणि देशातील सामान्य माणसाबद्दल जी स्वप्ने पाहिली होती, त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी जी विचारसरणी दिलेली होती, त्यानुसार आपला प्रवास कोठपर्यंत झालाय, याचा आढावा यानिमित्ताने घेत राहणे व आपण कोठे कमी पडलो, याबद्दल आत्मपरीक्षण करणे, विशेषतः आज या देशातील सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्गीय ज्या अवस्थेतून जात आहे, त्या वेळी तर अशा आत्मचिंतनाची खूपच गरज आहे.
म्हणजे अण्णा भाऊ आपल्या कथा-कादंबऱ्यांतून, पोवाड्यातून मनुजविरोधी व्यवस्थेबद्दल जी आग ओकत होते, या मनुजविरोधी व्यवस्थेवर घाव घालत होते आणि असे घाव घाल, असे त्यांना मार्क्स आणि आंबेडकरांनी सांगून ठेवले होते. त्यातून या व्यवस्थेत काही बदल झाला का, हा पहिला प्रश्न.
जर झाला नसेल किंवा अण्णा भाऊंच्या वेळची परिस्थिती आणखी जास्तच मनुजविरोधी झाली असेल, तर त्याला कारण कोण आहेत? यावर जर विचार करू लागलो, तर आपण अस्वस्थ होऊन जाऊ. कारण यासाठी आम्ही सर्वच जण जबाबदार आहोत. अण्णा भाऊंची घाव घालण्याची परंपरा आपण पुढे नेऊ शकलो नाही, एवढे आपण करंटे निघालो. अण्णाभाऊंनी ज्या-ज्या विषयांबद्दल लिहून ठेवले आहे किंवा ज्या समाजघटकाबद्दल जी स्वप्ने पाहिली आहेत, त्याचा आढावा घेत घेत आजचे वास्तव हे त्यांच्या विचारांना न्याय देणारे आहे की नाही, हे तपासता येईल.
अण्णाभाऊंच्या काळातील दलित समाज शिक्षणापासून बराच दूर होता. त्याच्या आर्थिक स्थितीत मूलभूत बदल झालेला नव्हता. तो परंपरेतील वर्ण व जात या दुष्टचक्रात अडकलेला होता. सुदैवाने आज २०२२पर्यंत त्याच्या शैक्षणिक स्थितीत खूप मोठा गुणात्मक असा फरक पडलेला आहे. त्याने आता वर्णातून वर्गात प्रवेश केलेला आहे. अण्णा भाऊंच्या काळी मध्यमवर्गीय दलित फारसे दिसत नव्हते. त्या काळातले सर्वश्रेष्ठ साहित्यिक असूनदेखील अण्णा भाऊ मध्यमवर्गीय होऊ शकले नाहीत. शेवटपर्यंत ते निम्न मध्यमवर्गीय किंवा गरीबच राहिले. आज या अवस्थेत खूप मोठा फरक झाल्याचे जाणवते. पण हे वरवरचे दृश्य आहे. अजूनही खेड्यापाड्यांतून विशेषत: हिंदी पट्ट्यात दलितांना जगणे अशक्य करून टाकण्यात आलेले आहे. अजूनही महाराष्ट्राच्या काही खेड्यांतून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न होतोय.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
गुजरातमधील ‘नवजीवन ट्रस्ट’ने अमेरिकेतील एका संस्थेच्या मदतीने गुजरातमधील जो अहवाल प्रकाशित केलाय, त्याचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे-
- गुजरातमधील ९८.४ टक्के खेड्यांत दलितांना दलितेतर वस्तीत भाडेतत्त्वावर घर घेण्याची परवानगी नाही.
- ९७.६ टक्के खेड्यांत दलितांनी दलितेतरांच्या भांड्यांना केलेला स्पर्श हा बाट समजला जातो.
- ९७.२ टक्के खेड्यांमध्ये दलितेतरांच्या धार्मिक विधीसाठी दलित पुरोहितांना, भगतांना बोलावले जात नाही.
- ९८ टक्के खेड्यांमध्ये दलितांना चहा देण्यासाठी वेगळा कप ठेवला जातो. तसेच ९६ टक्के दलित कामगारांना वेगळ्या ठिकाणी जेवायला बसवले जाते.
- कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती देशातील सर्व राज्यांतून आढळून येईल. महानगरात हे दिसणार नाही. त्यामुळे महानगरात स्थायिक झालेल्या दलितांना याची जाणीवही नाही. (‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद’ - उद्धव कांबळे, पान २७)
भारताच्या २०११च्या जनगणनेनुसार दलितांची लोकसंख्या देशात २०.१४ कोटी आहे. दलितांमधील साक्षरतेचे प्रमाण ६६.१ टक्के आहे. अण्णा भाऊंच्या वेळी हे प्रमाण १० ते १५ टक्के होते. शाळेत जाण्यास पात्र असलेल्या एकूण दलित मुलांपैकी केवळ २०.५१ टक्के शाळेत नाव नोंदवतात. त्यापैकी ५० टक्के प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणानंतर शाळा सोडून देतात. दलितांच्या एकूण लोकसंख्येपैकी ३७ टक्के दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात. आजही भारतात दर आठ मिनिटाला दलितांवर अन्याय-अत्याचार होतात. तर अशा गुन्हेगाराला शिक्षा होण्याचे प्रमाण ५.३ टक्के, तर शाहू-फुलेंचे उठता बसता नाव घेणाऱ्या महाराष्ट्रात हे प्रमाण २ टक्केही नाही. (कित्ता, पान २८)
अनुसूचित जाती-जमातीच्या कल्याणासाठी म्हणून सरकार आपल्या वार्षिक अंदाजपत्रकात किती रक्कम जाहीर करते, पण प्रत्यक्षात देते किती हे पाहिल्यावर या व्यवस्थेवर घाव घालणे किती गरजेचे आहे, हे कळते.
२०१४-१५ या एकाच वर्षाचे उदाहरण पाहू या. या वर्षीच्या देशाच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जातीच्या कल्याणकारी योजनांवर तरतूद करण्यात आली ९४,४५० कोटींची. किती आकर्षक रक्कम आहे ही! पण वर्ष काळात खर्च करण्यात आले १०,६९० कोटी. म्हणजे फक्त १० टक्के. जवळपास प्रत्येक राज्यातून हीच स्थिती दिसून येईल. जेथे केंद्रच अप्रामाणिकपणा करत असेल तर राज्याबद्दल काय बोलावे? या अशा प्रवृत्तीच्या विरोधात सत्ताधारी पक्षातले अनुसूचित जमातीचे खासदार, आमदार मौन बाळगून असतात. अमर शेख, अण्णा भाऊ व गव्हाणकर आज असते, तर या अशा प्रवृत्तीविरुद्ध पोवाडे, गीते, लोकनाट्य सादर करून त्यांनी लोकांना पेटवून दिले असते. अण्णा भाऊंबद्दल भरभरून बोलणारे याबाबतीत कसे काय शांत आहेत, हा यानिमित्ताने स्वतःला विचारण्याजोगा प्रश्न आहे.
२.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरदेखील सरकारी नोकरीतील आरक्षण कोणत्याही राज्यात पूर्णपणे भरले गेलेले नाही. हीदेखील एक वास्तविकता आहे. संसदेत व प्रत्येक राज्याच्या विधानसभेत २२.५ टक्के आरक्षणातून निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. त्यापैकी एकही जण या संदर्भात सरकारला धारेवर धरत नाही. आणि अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना पुनःपुन्हा निवडून देण्यात आपण धन्यता मानतो.
हे सर्व यासाठी मांडायचे आहे. कारण अण्णा भाऊ व डॉ. बाबासाहेब ज्या समाजवादी राज्यव्यवस्थेचे स्वप्न पाहत होते, त्या स्वप्नाचा चुराडा कसा होत गेलेला आहे, हे कळवावे. आणि त्यांचे अनुयायी म्हणवणारे आपण प्रतिगामी शक्तींना केवळ पाठीशी घालत नाहीत, तर त्यांना बळही देत आहोत. त्याला कारण एवढेच की, अण्णा भाऊ व डॉ. बाबासाहेबांसारखे महानायक आज आपल्यात नाहीत. ते नाहीत म्हणून आपण सर्व काही सहन करायचे काय? समाजवादी भारत उभा करण्याची ताकद तर मतदारांत आहे. पण हा मतदारच या दोन महापुरुषांच्या विचारांना गाडून टाकून केवळ त्यांच्या पुतळ्यासमोर उभे राहून त्यांना नमन करण्यातच धन्यता मानीत असेल, तर कोणाकडून अपेक्षा करायची?
अण्णा भाऊंच्या काळातील दलित समाजात व आताच्या दलित समाजात फरक इतकाच झालेला आहे की आज दलितांत दोन वर्ग निर्माण झालेले आहेत. एक कोट्यधीशांचा, लक्षाधीशांचा, मध्यवर्गीयांचा व दुसरा अशिक्षित, दरिद्री, दोन वेळच्या जेवणासाठी देखील महाग असा. अण्णा भाऊ तर वर्गीय भूमिका घेऊनच लिहीत होते. जो सधन-संपन्न वर्ग आहे, तो दलितासंबंधीचे सर्व फायदे आपल्याकडेच ओढून घेत आहे. दलितांच्या ज्या वर्गाकडे अण्णाभाऊंनी लक्ष वेधले तिकडे तो ढुंकूनही पाहू इच्छित नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अण्णाभाऊंची ‘दलित’ शब्दाची व्याख्या फार व्यापक होती. जे जे शोषित, पीडित, श्रमिक, कामगार आहेत ते सर्व दलित अशी त्यांची व्याख्या आहे. त्यामुळे जातीने जे दलित आहेत, त्याबद्दल अण्णा भाऊंनी अधिक लिहिलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. पण आदिवासी, भटके विमुक्त, झोपडपट्टीत राहणारे याविषयी मात्र ते भरपूर लिहीत होते.
ज्या व्यापक भूमिकेतून अण्णांनी दलित साहित्याची व्याख्या केलेली आहे, तिला प्रमाण मानून जर आजच्या दलित साहित्याच्या विकासाकडे पाहिल्यानंतर लक्षात येते की, नंतरच्या पिढीने या दलित साहित्याचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला आहे. अण्णा भाऊंचे बहुतेक लेखन हे महानगरातील जगण्यापर्यंत मर्यादित होते. पण नंतरच्या लेखकांनी अण्णा भाऊंच्या या अनुभूतीस खूप व्यापक असा अवकाश मिळवून दिलेला आहे. शेतकरी, दऱ्याखोऱ्यात राहणारे भटके, तांड्यातून जीवन जगणारे ज्यांना आपले स्वतःचे गाव नाही, ज्यांना आपली ओळखही नाही, असे अनेक स्त्री-पुरुष आणि त्यांचे जगणे घेऊन ही पिढी लिहिती झाली. यासंदर्भात अनेक लेखकांची नावे घेता येतील. पण एक प्रातिनिधिक नाव श्री. उत्तम कांबळे यांचे मी घेतो. पालावरील जीवनाचे सूक्ष्म व करुण चित्रण त्यांच्या कथांतून आढळते. लघुकथा, लोकनाट्य, कविता या रूपबंधातून श्रमिकांच्या, दलितांच्या, शोषितांच्या, पीडितांच्या, स्त्रियांच्या दुःखाला या पिढीने वाचा फोडली आहे. हे साहित्य अण्णा भाऊंच्या मार्गावरून बरेच पुढे गेलेले आहे. पण कादंबऱ्या मात्र त्या मानाने अण्णा भाऊंचा सूर गाठू शकल्या नाहीत. अण्णा भाऊंनी अन्यायाविरुद्ध लढणारे जे नायक उभे केलेले आहेत, तसे नायक आज दिसून येत नाहीत.
कोल्हापूर येथे झालेल्या पहिल्या अण्णा भाऊ साहित्य संमेलनात केलेल्या भाषणात श्री. उत्तम कांबळे यांनी अण्णाभाऊंच्या जिवंत भाषेविषयी खूप मूलभूत असे विवेचन केलेले आहे. प्रसिद्ध हिंदी नाटककार मोहन राकेशनी एके ठिकाणी लिहिले आहे की, भाषा दोन प्रकारची असते. एक जगण्याची भाषा (‘जीने की भाषा’), दुसरी जाणण्याची भाषा (‘जानने की भाषा’). अण्णा भाऊंनी जगण्याच्या भाषेचाच प्रयोग केला. त्यांच्या नंतरच्या पिढीने या जगण्याच्या भाषेचे एवढे नमुने सादर केले की, ते वाचताना मराठीच्या अनेक बोलीभाषांचे सामर्थ्य लक्षात येते. वेगवेगळ्या भाषिक स्तरांतून येणाऱ्यांनी अण्णा भाऊंचा कित्ता गिरवत मराठीला अधिक समृद्ध केलेले आहे.
३.
अण्णा भाऊंच्या साहित्यावर अलीकडे इतके लेखन झालेले आहे की, त्यावर मी लिहिणे टाळतो. पण एवढे निश्चित की, अण्णा भाऊंनी मध्यमवर्गीय जीवनात गुरफटलेल्या साहित्यास झोपडीकडे नेले, दारिद्र्याने पिचलेल्या पण विलक्षण स्वाभिमानी व प्रामाणिक माणसाला खेचून साहित्यात आणले. शील जपणाऱ्या स्त्रिया आणल्या आणि नंतरची पिढी हीच परंपरा तेवढ्याच प्रामाणिकपणे पुढे नेत आहे, हे आश्वासक चित्र आहे. पण दलित समाजाबद्दल मात्र असे काही सांगता येत नाही. अण्णा भाऊंच्या काळी दारिद्र्यात जगताना देखील हा शोषित, पीडित, श्रमिक काही नीतीमूल्ये घेऊन जगत होता.
डॉ.एम.एस. भोसले यांनी अण्णा भाऊंच्या प्रातिनिधिक कथांच्या प्रस्तावनेत हे नमूद केले आहे की, अण्णा भाऊंच्या दृष्टीने मूल्ये अगदी स्पष्ट आहेत- देशाचे स्वातंत्र्य, स्त्रीचे शील, पुरुषाचा स्वाभिमान आणि मानवाची प्रतिष्ठा हीच मूल्ये घेऊन अण्णा भाऊ जगले व त्यांची पात्रेदेखील जगली. पण आज काय अवस्था आहे- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. २०१४ नंतर स्वाभिमान आणि मानवाची प्रतिष्ठा धोक्यात आल्याचे आपणा सर्वांना जाणवते आहे.
पहिल्या अण्णा भाऊ साहित्य संमेलनात श्री. रावसाहेब कसबे यांनी उदारीकरणानंतर स्त्रीच्या शील व मूल्याची वाताहात कशी होत आहे, हे विस्ताराने दाखवून दिलेले आहे. देशात प्रत्येक वर्षी स्त्रीवर होणाऱ्या बलात्काराची संख्या वाढत आहे. विशेषत: हिंदी पट्ट्यात दलित स्त्रीवर जे अत्याचार होत आहेत, ते भयानक आहेत. त्याविरुद्ध कसलीच ओरड संघटितपणे होत नाही, याचे दु:ख आहे. अलीकडे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणेही अवघड झालेले आहे. आज जर अण्णा भाऊ, अमर शेख, गवाणकर असते आणि आपल्या बुलंद आवाजात व्यवस्थेविरुद्ध प्रबोधन करत हिंडले असते, तर शहरी नक्षली म्हणून त्यांना जेलमध्ये सडवण्यात आले असते. इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना या देशातील बुद्धिवादी, पत्रकार, दलित संघटना शांत-शांत आहेत. अण्णा भाऊंच्या प्रबोधन कार्यास पुढे घेऊन जाण्यापेक्षा आपण मौन पत्करून त्यांच्या प्रति आपली कृतघ्नताच व्यक्त करत आहोत.
अण्णा भाऊ सतत म्हणायचे की, ‘समाजवाद निर्माण करण्यासाठी मला लढायचे आहे आणि त्यासाठीच मला जगायचे आहे.’ आणि आपण समाजवाद पायदळी तुडवून प्रतिगामी शक्तींशी दोन हात करण्याऐवजी त्यांच्याच दरबारात हात जोडून उभे आहोत. अण्णा भाऊंच्या विचारांची यापेक्षा आणखी किती अवहेलना आपण करणार आहोत.
जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ या तिघांचे एकच स्वप्न होते, देशाला समाजवादाच्या दिशेने घेऊन जायचे. म. गांधीजींची सर्वोदयाची संकल्पनादेखील समाजवादाकडेच घेऊन जाणारी होती. यासाठी गरज होती व आहे ती प्रबोधनाची. राजकीय प्रबोधनाची. आज राजकीय प्रबोधनाच्या नावावर जे काही चाललेले आहे, ते इतके विकृत व हिडीस स्वरूपाचे आहे की, त्यावर न बोललेलेच बरे!
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अण्णा भाऊ रामराज्य नाकारतात. कारण रामराज्य हे पुरुषसत्ताक व ब्राह्मणशाहीचे प्रतीक होते. रामराज्यऐवजी अण्णा भाऊ ‘जनराज्य’ शब्दाचा प्रयोग करतात. जनतेच्या मतांनी निर्माण होणारे हे राज्य ‘जनराज्य’ कधीच न होता, काही मूठभरांचे झालेले आहे. आणि आता तर ते पूर्णपणे भांडवलदारांच्या हाती गेलेले आहे. आणि याविरुद्ध कसलाच राग अण्णा भाऊ व डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांना होत नाही, ही संताप आणणारी बाब आहे.
त्याला कारण एकच, या उपेक्षित समाजात ‘वर्ग’ निर्माण झालेले आहेत. यातील जो संपन्न व विचारी वर्ग आहे, तो केवळ आपले व आपल्या कुटुंबाचे हितसंबंध जपण्यात मग्न आहे. एकेकाळी जो ‘नाही रे’ वर्ग होता, तो आज ‘आहे रे’ वर्ग झालेला आहे आणि त्याने स्वतः आपली नाळ ‘नाही रे’ वर्गाशी तोडून टाकलेली आहे. विलक्षण बुद्धिमान असलेले, आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले डॉ. बाबासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत आपली नाळ ‘नाही रे’ वर्गाशी जोडून ठेवू शकले. हीच स्थिती अण्णा भाऊंची होती. पण आज तशी अवस्था नाही. अर्थात, यात अपवाद आहेतच.
ज्या धर्मग्रंथाने स्त्रीच्या हातात पाळण्याची दोरी दिली, तिच्या हातात अण्णा भाऊंनी बंदूक दिली, ही एक क्रांतिकारी घटना होती. (‘अण्णा भाऊ साठे : एक सत्यशोधक’ - मच्छिंद्र सकटे, पान १५०) अपमानाचा बदला घेणाऱ्या, शीलाला जपणाऱ्या जिद्दी, धाडसी, निर्भयी, स्वाभिमानी, करारी आणि देशभक्त स्त्रिया अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समोर आणल्या (कित्ता, १५२), पण आज हीच स्त्री उच्चविद्याविभूषित झालेली आहे. पण तिच्यात उपरोक्त किती गुण टिकून आहेत, याचा शोध घ्यावा लागेल.
अण्णा भाऊ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही समाजवादी अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. अण्णा भाऊ, अमर शेख व गव्हाणकर या समाजवादी व्यवस्थेचे गुण गात गात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. समाजवादी व्यवस्थेसाठी प्रबोधन करत राहिले, बाबासाहेब तर सत्तास्थानी होते. त्यांचे व नेहरूजींचे एकच स्वप्न होते ते म्हणजे या देशात समाजवादी अर्थव्यवस्था प्रत्यक्षात आणावी आणि म्हणून त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थांचा आग्रह धरला. रशियाच्या धर्तीवर पंचवार्षिक योजना आखल्या. देश मंद गतीने का होईना, त्या दिशेने प्रवास करत होता. अण्णा भाऊंच्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न होते- सामाजिक समता व आर्थिक समता.
कम्युनिस्टांना वाटत होते की, आर्थिक समता आली की, आपोआप सामाजिक समता येईल. पण डॉ. बाबासाहेबांना तसे वाटत नव्हते. कारण येथली जातिव्यवस्था एवढी चिवट आहे की, केवळ आर्थिक समतेतून सामाजिक समता येणार नाही तर या दोन्हींसाठी सरकारी पातळीवर व प्रबोधनाच्या पातळीवर कायम प्रयत्न करत राहावे लागेल. ७५ वर्षांनंतर जर आपण या दोन समतेच्या संदर्भात तपास करू लागलो तर हाती काय लागते? जातिअंताचा उद्देश बाळगणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठेंच्या या देशात मागील १५-२० वर्षांपासून जातीच्या संघटना प्रबळ होत आहेत. उलट महाराष्ट्र शासन तर जातवाद हॉस्टेल्स उभे करत आहे. निवडणुकीत उभे राहिलेल्यांनी जात-व्यवस्थेची पुनर्स्थापनाच केलेली आहे.
४.
अलीकडे सर्व माध्यमांवर मोठ्या अभिमानाने सांगितले जात आहे की, जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांत भारताचा समावेश झालेला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत भारताने ब्रिटनला मागे टाकलेले आहे. अर्थात, ही अभिमानाचीच बाब आहे. पण या देशाने आर्थिक समतेच्या दिशेने काही सकारात्मक पावले टाकली आहेत काय, याचा शोध घेतल्यास काय दिसून येईल? देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, हे पाहण्यासाठी जगभर दोन निकषांचा वापर केला जातो.
एक- त्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न किती आहे? दोन- त्या देशाचे दरडोई उत्पन्न किती आहे? एकूण उत्पन्न किती आणि त्या देशात राहणाऱ्या सामान्य माणसाचे रोजचे किंवा वर्षांचे उत्पन्न किती? दरडोई उत्पन्न वाढत असेल तरच आर्थिक समतेची शक्यता असते. या दुसऱ्या निकषावर भारत जगात १४३व्या स्थानी आहे, हे मात्र माध्यमांवर कधीच सांगितले जात नाही. २०१४पूर्वी भारत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत ११६व्या स्थानावर होता. आता तो १४३व्या स्थानावर फेकला गेला आहे. लाजीरवाणी बाब ही की, बांगलादेशच्या नागरिकापेक्षाही भारताच्या सामान्य माणसाचे उत्पन्न कमी आहे. जर दरडोई उत्पन्न इतके कमी असेल तर मग सकल राष्ट्रीय उत्पन्न इतके जास्त कसे? तर त्याचे उत्तर असे की, सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी ९० टक्के पैसा हा १० टक्के जनतेकडे आहे व ९० टक्के लोकांजवळ १० टक्के पैसा आहे. इतकी प्रचंड अशी आर्थिक विषमता या देशात आहे.
२०१६मध्ये जगभरातील भ्रष्टाचारी देशाच्या क्रमवारीत भारत ७९व्या स्थानावरून ८५व्या स्थानी पोहोचला आहे. रोज ‘भ्रष्टाचार मुक्त भारत करेंगे’ म्हणणाऱ्यांच्या सत्तेची ही अवस्था आहे.
नोटाबंदीमुळे चलनातून बनावट नोटा पूर्णपणे नष्ट होतील, असे सांगितले गेले. पण २०२१-२२मध्ये चलनातील बनावट नोटांमध्ये १०.७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
२०१२मध्ये देशात बेरोजगारीचा दर २ टक्के होता, तो ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आणि सर्वांत विस्फोटक सत्य स्वीत्झर्लंडच्या बँकेत भारतीय पैशांनी उच्चांक गाठला असून ही रक्कम ३० हजार ५०० कोटी एवढी झालेली आहे. (दै. ‘लोकसत्ता’, ९ नोव्हेंबर २०२२)
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आणि आर्थिक विषमता कायम ठेवून किंवा वरचेवर ती वाढवत जाऊन आपण सामाजिक समता कशी काय आणू शकतो? या आर्थिक विषमतेचा एक पैलू असा असतो की, आर्थिक विषमता ही सतत सामाजिक समतेस छेद देत जाते. कुटुंबे आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम झाली की, आत्मकेंद्रित होऊ लागतात. गरीबांकडे कुचेष्टेने पाहू लागतात. आपले आर्थिक वैभव टिकवण्यासाठी म्हणून धर्म व जातीचा जास्तीत जास्त वापर करू लागतात. अलीकडे हेच तर सुरू झालेले आहे.
त्यामुळे ज्या पद्धतीने या देशाची अर्थव्यवस्था पुढे जात आहे, ती गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊंनी या देशातील श्रमिक, दलित, पीडित, आदिवासी व बहुजनांच्या भविष्यासंबंधी जी स्वप्ने पाहिली होती, ती उद्ध्वस्त होत आहेत आणि या तिन्ही महामानवांचा जयजयकार करणाऱ्यांना याविषयी ना कसली खंत आहे, ना दु:ख. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, हे तो विसरूनच गेलेला आहे.
अण्णा भाऊ साठे यांनी विज्ञानाचा अभ्यास जरी केलेला नव्हता, तरी त्यांच्या कथांतून प्रखर विज्ञानवादी दृष्टी पाहावयास मिळते. त्यांची बहुतेक पात्रे - त्यात स्त्रियादेखील आहेत, पारंपरिक कर्मकांडे नाकारतात, जात पंचायतीचे मूर्खपणाचे निर्णय अमान्य करतात, धर्माच्या, जातीच्या पलीकडे जाऊन ते निखळ माणुसकीचा व्यवहार करतात. अण्णा भाऊंनी तर धर्म आणि ईश्वर यांना नाकारलेलेच आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, आज ७५ वर्षांनंतर येथील माणूस विज्ञाननिष्ठ झालेला आहे काय? इतरांचे जाऊ द्या, किमान मातंग समाजात तरी मूर्खपणाचे कर्मकांड बंद झालेले आहेत काय? उपजाती नाकारण्यात आलेल्या आहेत काय? महाराष्ट्र जर सोडला तर भारताच्या इतर प्रांतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात नाही. केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा का करत नाही, असा प्रश्न अण्णा भाऊ आमचे म्हणणाऱ्या खासदारांनी कधी संसदेत उपस्थित केला आहे काय?
५.
अण्णा भाऊंचे श्रद्धास्थान असलेल्या रशियन लेखक मॅक्झिम गॉर्कीने साहित्याची जी व्याख्या केलेली आहे, त्याला अण्णा भाऊ प्रमाण मानत राहिले. गॉर्की म्हणतो- ‘माणसाला सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करून, तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा धनी आहेस. तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस, असा साक्षात्कार त्याला करून देणे हे साहित्याचे खरे वैशिष्ट्य आहे.’
या अर्थाने वाड्मय क्रांतिकारक असते. असले क्रांतिकारक वाङ्मय अण्णा भाऊंनंतर किती प्रमाणात लिहिले गेले, याचा शोध घेणे गरजेचे आहे. वाङ्मयाचे आणखीन एक कार्य असते- ते म्हणजे वाचकांच्या मनात प्रचलित व्यवस्थेबद्दल, मनुजविरोधी व्यवस्थेबद्दल असंतोष निर्माण करणे. आजची मराठी कविता, लघुकथा, कादंबऱ्या, नाटके हेच काम करत आहेत. एकदा का व्यवस्थेबद्दल असंतोष निर्माण झाला की मग व्यवस्थेबद्दलची चीड त्याच्या मनात वाढत जाईल आणि मग कधी तरी संघटित होऊन ती व्यवस्था बदलण्यासाठी पुढे येईल, ही अशी आशा ठेवूनच लेखकास लिहिते व्हावे लागते.
आजची वस्तुस्थिती अशी आहे की, समाज परिवर्तनासाठी ज्या अनेक घटकांची गरज असते, त्यापैकी एकेकाळचा परिवर्तनाच्या चळवळीत आघाडीवर असणारा मध्यमवर्ग आता पूर्णपणे आत्मकेंद्रित झालेला आहे. अपवाद असतील आणि आहेत. पण १९७१ पूर्वी हा मध्यमवर्ग परिवर्तनाच्या चळवळीत जितका सक्रिय होता, तितका आता नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता जो काही बदल होईल तो ‘नाही रे’ वर्गाकडूनच. या ‘नाही रे’ वर्गाला संघटित करणारा नायक सध्या तरी कोठे दिसत नाही. हिंदीतील एक प्रगतिशील विचारांचे कवी स्मृतिशेष नागार्जुन आपल्या एका कवितेत म्हणतात-
‘जनता पूछ रही हैं, क्या बतलाऊँ मैं?
जनकवि हूँ, मैं साफ कहूँगा, क्यों हकलाऊँ?
श्याम सलोना यह अछूत बालक हम सबका उद्धार करेगा,
आज वही संपूर्ण क्रांति का बेडा सचमुच पार करेगा,
दिल ने कहा, दलित माँओं के सब बच्चे बागी होंगे
अग्निपुत्र होंगे वे, अंतिम विप्लव में सहभागी
खेत हमारे, भूमि हमारी, सारा देश हमारा हैं।
जिसका जांगर उसकी धरती, यही बस एक नारा हैं।’
कोणताही राजकीय, सामाजिक, धार्मिक विचार हा कधीही जशास तसा कोणताही समाज, देश, व्यक्ती स्वीकारत नसतो, तो आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्याकडील परंपरेप्रमाणे त्या विचाराला बदलून स्वीकारत असतो. याचे सर्वांत उत्तम उदाहरण म्हणजे बौद्ध धर्म. हा पूर्वेतल्या अनेक देशांत गेला, पण प्रत्येकाने त्याला आपल्या देशाच्या संस्कृतीत बसवूनच स्वीकार केलेला आहे. हीच स्थिती मार्क्सवादी विचारांची आहे. बंगालमध्ये कित्येक वर्षे मार्क्सवादी पक्ष सत्तेवर होता. मार्क्सवाद हा नास्तिक जरी असला तरी त्या काळच्या मार्क्सवादी सत्ताधाऱ्यांनी दुर्गा पूजेवर बंदी नव्हती. उलट तेथील कम्युनिस्ट नेते दुर्गापूजेत सामील व्हायचे. त्यामुळे स्थानिक संस्कृती नाकारून कोणताही विचार पसरत नसतो याचे भान पोथीनिस्ट कम्युनिस्टांना त्याकाळी नव्हते. नंतरच्या काळात हे भान त्यांना आलेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरदेखील बुद्ध विचारांशी मार्क्सच्या विचारांची सांगड घालून त्यास स्वीकारत होते. त्यामुळे पहिल्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात दिलेल्या भाषणात श्री. उत्तम कांबळे यांनी एक प्रश्न उभा केला होता की, ‘या देशातील अस्पृश्यांच्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांची दलित चळवळ आणि परिवर्तनवादी पुरोगामी चळवळ जिच्यामध्ये कम्युनिस्ट हा एक महत्त्वाचा भाग आहे ती चळवळ - या दोन्ही चळवळी हातात हात घालून चालणार आहेत की नाही?’ (‘अण्णा भाऊ सांगून गेले’, पान ५३)
महाराष्ट्रात आज अनेक परिवर्तनवादी चळवळी सक्रिय आहेत. पण त्यांच्यात संवाद फार कमी आहेत. अण्णा भाऊ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बांधीलकी सांगणारी जेवढी मंडळी आहेत, त्यांनी संघटित होऊन समाजवादी राज्यपद्धतीचा आग्रह धरण्याची आज गरज आहे. वस्तुस्थिती मात्र याच्या उलट आहे. ज्या प्रतिगामी विचारसरणीविरुद्ध आयुष्यभर या दोघांनी रान उठवले. आज त्यांचे अनुयायी त्याच प्रतिगामी शक्तीसमोर सत्तेचा तुकडा मिळावा म्हणून स्वाभिमानशून्य होऊन लाजीरवाण्या अवस्थेत उभे आहेत. अण्णा भाऊ व बाबासाहेबांच्या विचारांचा यापेक्षा मोठा अपमान कोणता होऊ शकतो?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
बाबासाहेब म्हणाले होते की, परिवर्तनासाठी सत्तेत जा. पण सत्तेचे गुलाम व्हा, असे त्यांनी कधीच म्हटलेले नव्हते. तर सत्तेत राहुन दीनदुबळ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करीत रहा, असे म्हणाले होते. आज दीनदुबळ्यांची स्थिती भारतात कशी आहे, याचे आकडेच दाखवतात की हा देश मूठभरांच्या ताब्यात गेलाय. आताचे राजकारण मनुष्यकेंद्री नसून धर्मकेंद्रित, जातिकेंद्रित झालेले आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देश १४५व्या स्थानी फेकला गेला आहे. दरवर्षी कुपोषणाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. थंडीमुळे उन्हामुळे दरवर्षी हजारो माणसे मरत आहेत. आणि दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे, असे सरकारी अहवालच सांगत आहेत.
अशा वेळी संवेदनशील, विवेकी माणूस कोणासोबत जाणार आहे? धर्माचे राजकारण करणाऱ्यांसोबत की सामाजिक-आर्थिक समतेचे राजकारण करणाऱ्यांसोबत? अण्णा भाऊंचे साहित्य अप्रत्यक्षपणे हाच प्रश्न उभा करतोय की, तुम्ही झुंजार अशा फकीरासोबत उभे राहणार की, फकिराला जगणे अवघड करणाऱ्या व्यवस्थेसोबत? आरंभी म्हटल्याप्रमाणे अण्णा भाऊंचे साहित्य हे आत्मपरीक्षणासाठी प्रवृत्त करते. अर्थात, वाचक हा संवेदनशील व विवेकसंपन्न असेल तर. नसता केवळ श्रद्धेने त्यांचे साहित्य वाचणार असाल तर ते अण्णा भाऊंना देखील आवडले नसते. कारण साहित्य हे श्रद्धेने नव्हे तर विवेकबुद्धीने वाचावयास पाहिजे.
ही आर्थिक विषमता केवळ भारतातच नाही तर जगातल्या बहुतेक सर्व देशांत आहे. युरोपातील भांडवली राष्ट्रांनी कम्युनिझमचा धसका घेऊन अनेक सामाजिक कल्याणाचे कार्यक्रम राबवले आहेत. ती भांडवली राष्ट्रे जरी असली तरी सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी त्यांची व्यवस्था ही समाजवादाकडे झुकलेली आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर जगातल्या केवळ एक टक्का लोकसंख्येकडे ४६ टक्के संपत्ती व मालमत्ता आहे. याउलट जगातल्या ५० टक्के लोकांकडे काहीच संपत्ती व मालमत्ता नाही. (‘डॉ. आंबेडकर, दलित व मार्क्सवाद’, पान २४७)
भारतात तर यापेक्षा दारुण अशी परिस्थिती आहे. येथे दहा टक्के समाज असा आहे की, ज्यांचे रोजचे उत्पन्न पन्नास हजार ते एक लाखाचे आहे. ते रोज स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर दहा हजार रुपये खर्च करू शकतात. तर याच्या उलट ५० टक्के लोक असे आहेत की, ज्यांची रोजची मिळकत २० ते ३० रुपये आहे. दोन वेळचे भरपेट जेवण देखील ते घेऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे आणि दिवसेंदिवस श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेले आहेत व गरीब आणखीन गरीब. आणि हे सर्व सरकारी अहवालच सांगत आहेत. अशा वेळी या देशातील शिक्षित, संवेदनशील, विवेकी माणसाची बांधीलकी कुणासोबत राहणार आहे- मंदिर उभे करणाऱ्यांसोबत, धर्म-जातीच्या विळख्यात आपल्या सर्वांना बांधणाऱ्यांसोबत, की निखळ माणुसकीच केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणाऱ्यांसोबत?
या देशातील सत्ताधिशांवर जनतेचा वचकच राहिलेला नाही. उलट सत्ताधाऱ्यांचाच वचक जनतेवर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. ज्या निर्भयतेने अण्णा भाऊ प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात सडकेवर येऊन, डफ घेऊन गात होते, तसे आज दरिद्री लोकांचे गाऱ्हाणे घेऊन रस्त्यावर येण्याची हिंमत कोणी दाखवणार आहे काय? त्या वेळचे नेतृत्व व त्या वेळचे राजकारण मनुष्यकेंद्री होते, म्हणून त्यांना ते शक्य झाले. इतके निर्भय वातावरण आज दिसत नाही. कारण भीतीने जनता रस्त्यावर येऊ इच्छित नाही. आणि कोणी त्यांना आणू इच्छित असेल तर ते त्याला प्रतिसाद देत नाही. कारण सत्तेसमोर जनता हतबल आहे.
६.
देशात आता अल्पसंख्याक व बहुसंख्याकांचा वाद सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी उकरून काढण्यात आलेला आहे. मुळात हा वाद नाहीच. पण कोणाला तरी ‘परके’ किंवा ‘ते’ ठरवल्याशिवाय, त्यांना शत्रू म्हटल्याशिवाय सत्तेवर येता येत नाही, हे सूत्र ओळखून या दोन धर्मियांत तणाव निर्माण करण्यात आलेला आहे. आणि त्याला आपण सर्व जण बळी पडलेलो आहोत. देशातील सर्व हिंदू नागरिकांना हा संदेश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिला जात आहे की, ‘आम्ही मुस्लीम नागरिकांना अस्पृश्यासारखे छळणार. या देशात गौण नागरिक म्हणून जगणे मान्य असेल तर त्यांनी भारतात राहावे अन्यथा देश सोडून जावे.’
गंमत म्हणजे या विकृत मनोभूमिकेला राष्ट्रवाद, राष्ट्रावरचे जाज्वल्य प्रेम, भारतमातेची महापूजा, असे मानण्यात येत आहे. शेकडो वर्षे भारतात वास्तव करून राहिलेल्या मुस्लीम, ख्रिश्चन या अल्पसंख्याकांना बहुसंख्याकवादाचा फटका बसतोच. ‘१६ टक्के समाजाला असे वागवले तर देशात कधीच शांतता व स्थैर्य राहणार नाही, हे मात्र नक्की.’ (‘सत्याग्रही विचारधारा’, दिवाळी अंक २०२२, संपादकीय, पान ११)
मुळात या देशातील मुसलमान परका नाहीच. केवळ दोन टक्के मुसलमान बाहेरून आलेले. आता त्यालाही ५००-६०० वर्षे झालेली आहेत. बाकीचे ९८ टक्के मुसलमान हे येथील अस्पृश्य व बहुजनांपैकी आहेत. सवर्णांच्या छळाला कंटाळून त्यांनी इस्लाम स्वीकारला. हे मी म्हणत नाही तर फार पूर्वी विवेकानंदानीच हे लिहून ठेवलेले आहे. सत्तेच्या किंवा तलवारीच्या बळावर येथे धर्मांतर झालेले नाही, तर येथील वर्णवादी मानसिकतेमुळे धर्मातर झालेले आहे. जो मराठवाडा निजामी सत्तेच्या अधिन २५० वर्षे होता, त्या मराठवाड्यातील किंवा एकूण हैदराबाद संस्थानातील हिंदूंची संख्या कधीही ८५ टक्क्यांच्या खाली आलेली नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
स्वातंत्र्यापूर्वीपासून डॉ. बाबासाहेब, महात्मा गांधी आणि अण्णा भाऊ हे स्वतःला केवळ आणि केवळ भारतीय समजत होते. येथील प्रत्येक नागरिक घराच्या चौकटीच्या आत विशिष्ट धर्माचा, जातीचा, पंथाचा, राज्याचा असतो. एकदा तो घराबाहेर पडला की तो फक्त भारतीय असतो, असायला हवा असे संस्कार या तीन महामानवांनी आपल्यावर केले. हे तिघेही डी-कास्ट झालेले होते. डॉ. बाबासाहेब, गांधी व अण्णा भाऊ यांच्या मैत्रीची नुसती यादी जरी डोळ्यांखाली घातली तरी हे स्पष्ट होते की, मंडळी जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जगत होती.
पण १९९२ नंतर मात्र या देशातील नागरिकांना त्यांच्या हिंदू असण्याची, मुसलमान असण्याची, ख्रिश्चन असण्याची जाणीव प्रत्येक धर्मातील प्रतिगामी शक्ती व काही राजकीय पक्ष करून देऊ लागल्या. त्यामुळे हिंदूंना अधिक हिंदू, मुसलमानांना अधिक कट्टर मुसलमान करण्याचा व्यवस्थित असा प्रयत्न सुरू झालेला आहे. प्रत्येकाला त्याच्या जातीची जाणीव करून देण्यात येत आहे. ज्या विज्ञान संस्थांना नेहरूजी आधुनिक मंदिरे म्हणून संबोधित असत, तेथे मध्यकालीन मंदिरांना अधिक सुशोभित करून माणसाच्या वैयक्तिक श्रद्धांना सार्वजनिक रूप दिले जात आहे. ‘अभिमान से कहो की, हम भारतीय हैं’ऐवजी ‘गर्व से कहो कि हम हिंदू हैं’ ही घोषणा दिली जाऊ लागली आहे.
७.
पंजाबीतील विद्रोही कवी पाश आपल्या एका कवितेत म्हणतो- ‘सबसे खतरनाक होता हैं सपनों का मर जाना।’ आणि आपण इतके करंटे की, गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊंच्या स्वप्नांना दफन करण्यासाठीच जणू प्रयत्न करत आहोत. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याच्या निमित्ताने मुसलमान समाजाबद्दल आपले जे पूर्वग्रह आहेत, ते झाडून-पुसून टाकायची प्रतिज्ञा आपण करू आणि एकमेकांच्या अधिक जवळ येऊन एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करू. हिंदू व इतर धर्मियांत तर आपण भेदभाव केलेलाच आहे, तो करावा असा व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे व होतही आहे. संतांनी जरी भेदाभेद अमंगळ म्हटले, तरी केवळ अन्यधर्मीयच नव्हे, तर स्त्रियांसोबत तरी समतेचा व्यवहार आहे काय?
आर्थिक क्षेत्रात दरडोई उत्पन्नात जगात सगळ्या खालच्या क्रमांकावर १४६व्या स्थानी आपला देश आहे. तर स्त्री-पुरुष हा भेदभाव करण्यात या देशाचा क्रमांक १४६ देशांत १३५व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी तो शेवटून १६वा होता. या वर्षी आणखीन खाली घसरून शेवटून १०वा आलेला आहे. (‘मौज’, दिवाळी अंक, २०२२, पान ४७) हे जे भयावह वास्तव आहे, ते जनतेपर्यंत येऊ न देण्याची तसदी सरकार घेत असते. आपल्याकडची माध्यमे हे भयाण सत्य कधीच सांगत नाहीत तर युरोपातील माध्यमातून ही माहिती मिळत असते.
म्हणजे येथे भयानक अशी आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता तेवढ्याच प्रमाणात आहे (गुजरातचा सर्व्हे) आणि स्त्री-पुरुष विषमतादेखील वाढत चाललेली आहे. कुटुंबातल्या आणि जवळपासच्या स्त्रियांशी आपला व्यवहार समतेचा असतो. पण परक्या, अनोळखी स्त्रीशी मात्र कधीच समतेचा व्यवहार आपण करत नाही. हे वास्तव असताना सर्व माध्यमे पुनःपुन्हा हे बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत की, देशात वेगाने विकास होत आहे. देश जागतिक महासत्ता होणार आहे. आज देशाचे सकल उत्पादन हे जगात पाचव्या स्थानावर आहे. हे सर्व किती खोटे, आभासी आहे हे या देशातील अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ सांगत आहेत. रिझर्व्ह बँकेची अधोगती तर या सरकारने एवढी केलेली आहे की, एका अर्थतज्ज्ञाने जाहीर केलेले आहे, अगदी अशीच धोरणे पुढे चालवली गेली तर देश दिवाळखोरीत निघेल.
अण्णा भाऊ एके ठिकाणी लिहितात की, शब्दाला नुसता आकार देणे सोपे असते, पण आकाराला आत्मा देणे अवघड असते. (‘साधना’, साप्ताहिक, ८ ऑगस्ट २०२०, पान २९) शब्दाच्या आकाराला आत्मा देणे म्हणजे काय? प्रत्येक शब्दांची स्वत:ची एक ताकद असते, त्याचा आत्मा असतो. तेथपर्यंत पोहोचून त्या शब्दाचा उच्चार करणे किंवा लिहिणे हे खूप अवघड असते. पण शब्द आपल्या आत्म्यासहित ज्या वेळी बाहेर पडतात, त्या वेळी ते ऐकणाऱ्याच्या मनात खोलवर शिरतात व त्यास सक्रिय करतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
गांधीजींनी १९४२ साली चारच शब्द उच्चारले- ‘क्विट इंडिया’. ‘भारत छोडो व करो या मरो’ या चार शब्दांमुळे संपूर्ण देश पेटून उठला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एवढेच म्हणाले ना- ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’. परिणाम काय झाला? एक संपूर्ण समाज हा शिक्षणासाठी, संघटनेसाठी व संघर्षासाठी सिद्ध झाला. सुभाषबाबू म्हणाले, ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा।’ लाखो भारतीय त्यांच्यासोबत निघाले. आजही रोज ‘भारत स्वच्छ करो’ची घोषणा केली जाते, पण त्याचा परिणाम काय, तर जागोजागी कचऱ्याचे ढीग वाढताहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अण्णा भाऊ, अमर शेख व गवाणकर जेथे जेथे आपली लोकनाट्ये सादर करत, पोवाडे म्हणत तेथे तेथे काँग्रेसचा पराभव झालेला आहे व समितीचा सदस्य निवडून आलेला आहे, ही असते शब्दांची ताकद. आता तर आत्मा नसलेल्या शब्दांचाच मारा आपल्यावर होत आहे. शब्द श्रोत्यांच्या आतपर्यंत जाऊन भिडले पाहिजेत, त्याला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले पाहिजेत. तेव्हाच परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते.
आणि कलावंताच्या बाबतीत तर त्याच्या शब्दातील आत्मा हा अमर असतो. कारण तो पिढ्यान् पिढ्या लोकांना मार्गदर्शन करत असतो, त्यांचे प्रबोधन करत असतो. त्यामुळे अण्णा भाऊंचे साहित्य कायमपणे प्रेरणास्पद असणार. त्यांचा ‘फकिरा’ वाचून अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची इच्छा वाचकाच्या मनात निर्माण होते. ही या शब्दांतील आत्म्याची ताकद.
८.
आज आपण इतिहासाच्या अशा वळणावर उभे आहोत, जेथून हे स्पष्ट दिसत आहे की, प्रतिक्रांतीची प्रक्रिया वेग घेत आहे. डॉ. बाबासाहेबांनी या प्रतिक्रांतीचा इशारा दिलेला होता. व्यक्तिपूजा ही कोणत्याही लोकशाही व्यवस्थेस घातक असते. त्यांचा रोख जरी गांधींच्या अनुयायांकडे असला तरी आज व्यक्तिपूजेचे लोण सर्वच महामानवाच्या संदर्भात खरे ठरू लागलेले आहे. केवळ महामानवाच्या बाबतीत नव्हे तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या पुढाऱ्यांचे- ज्यांचे कोणत्याही क्षेत्रात कसलेच ठोस काम नसतानाही त्यांची पूजा करणाऱ्यांची संख्या वाढतच जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांचे अनुयायीदेखील याला अपवाद नाहीत. या दोघांचे स्वप्न होते समाजवादी भारत उभा करावा. नेहरूजींच्या नेतृत्वाखाली त्या दिशेने प्रयत्नही सुरू झाले होते. पण १९९२नंतर या स्वप्नांचा चुराडा करण्यात आला. आज आपल्याला हे ठरवावे लागेल की, यापुढे या देशाला आपण कशा प्रकारचा आकार देणार आहोत.
लोकशाहीने आपल्याला सर्वांत मोठे शस्त्र दिलेले आहे- सत्तापरिवर्तनाचे. त्या शस्त्राचा उपयोग आपण या दोघांच्या स्वप्नपूर्तीसाठी करणार आहोत की, धर्मांध शक्तीच्या मागे आंधळेपणाने जाणार आहोत? स्थानिक राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र आणि देशाच्या भवितव्याचा विचार करणार आहोत की, स्वतःच्या स्वार्थाचा? अण्णा भाऊ जेथे जेथे प्रचाराला गेले तेथे समाजवादी, कम्युनिस्ट निवडून येत. एवढी ताकद त्यांच्या शब्दांत होती. आपणाकडे तशी ताकद नाही, हे कबूल. पण आपल्याकडे व आपल्या म्हणणाऱ्या जेवढ्या व्यक्तींकडे हे शस्त्र आहे, त्यांचे प्रबोधन तर आपण करू शकू. बाबासाहेब व अण्णा भाऊंचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना साकडे तर घालू शकू. जेव्हा हा बदल आपण घडवून आणू तेव्हाच आपण स्वत:ला बाबासाहेबांचे व अण्णा भाऊंचे सच्चे पाईक म्हणवून घेण्यास लायक ठरू. अन्यथा, इतिहासात अशी नोंद केली जाईल की, दृष्टे महामानव या समाजाला मिळाले, पण त्यांचे अनुयायी इतके करंटे निघाले. त्यांनी त्या दृष्ट्या महामानवाच्या स्वप्नांचा चुराडा करून टाकला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सत्तेवर जे कोणी असतात ते कायमच आपल्याला व्यक्तिपूजेकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपल्यापैकी कोणी तरी म्हणतो, येथे डॉ. बाबासाहेबांचा पुतळा बसवा किंवा अण्णा भाऊंचा बसवा. यापैकी एकही जण म्हणत नाही की, आम्हाला पुतळे नकोत, तर ग्रंथालये हवीत. आणि या ग्रंथालयात बाबासाहेब व अण्णा भाऊंचे संपूर्ण साहित्य ठेवले पाहिजे. येणाऱ्या पिढीला त्यांच्या समाजवादी व्यवस्थेचे स्वप्न तर समजून घेऊ द्या, पण अशी विवेकशील मागणी कोणीही करत नाही. या अशा प्रकारातून आपण या दोन्ही महामानवांचा अपमान करत असतो किंवा त्यांच्या विचारांचा पराभव करत असतो.
इतिहासाने एक फार मोठी जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. समाजवादी व्यवस्थेकडे निघालेल्या भारताची दिशाच पूर्णपणे बदलून टाकण्यात आलेली आहे. त्याला कारण आपणच. त्यामुळे जी चूक आपण केलेली आहे, ती सुधारून घेण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. त्या संधीचे सोने करावे, अशी विनंती करण्यासाठी मी आलोय.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment