हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसानं उघड्या मनानं वाचावं, म्हणजे हा पुरोगामी महाराष्ट्र अधिक उदार, सहिष्णू व सेक्युलर होऊ शकेल!
ग्रंथनामा - आगामी
लक्ष्मीकांत देशमुख
  • ‘अमीर खुसरो-दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 02 December 2022
  • ग्रंथनामा आगामी अमीर खुसरो-दारा शुकोह Amir Khusrow-Dara Shikoh सरफराज अहमद Sarfraz Ahmed

इतिहास-संशोधक सरफराज अहमद यांचं ‘अमीर खुसरो-दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा’ हे अकरा इतिहास-संशोधनपर लेखांचं लवकरच हरिती प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला कथा-कादंबरीकार आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

सरफराज अहमद यांचा मला परिचय झाला, तो ‘डेक्कन क्वेट मराठी’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून. अकादमिक संशोधनाला वाहिलेले आणि विशेषत्वाने दख्खनी साहित्य, संस्कृती, ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धनासाठी वाहिलेले हे अत्यंत दर्जेदार वेबपोर्टल आहे. खऱ्या अर्थाने दैनंदिन प्रसिद्ध होणारे मासिक आहे. मी मूळचा मराठवाड्याचा व माझे वडील हैदराबादला वाढलेले. त्यामुळे दखनी भाषा, दखनी संस्कृती व उर्दू भाषा-साहित्य हा माझ्या आस्थेचा विषय. त्यामुळे समान आवडीमुळे सरफराज अहमद हे माझे केव्हा व कसे घनिष्ट मित्र बनले हे समजलेच नाही.

‘डेक्कन क्वेट मराठी’वरील आणि ‘मुक्त शब्द’सारख्या मासिकातील काही स्फुट लेखांमुळे माझ्या लक्षात आले होते की, सरफराज अहमद हे हाडाचे इतिहास संशोधक आहेत. आणि मराठी जगताला ते दखनी इतिहासाचे अज्ञात पैलू उलगडून दाखवत आहेत. आणि त्याद्वारे मुस्लीम इतिहास म्हणजेच मुस्लीम राज्यकर्त्याच्या इतिहासाचे वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यात संशोधकीय शिस्त पाळत उपलब्ध, फारसी, उर्दू व इंग्रजी दस्तावेजाच्या आधारे पुर्नलेखन करत आहेत आणि मुस्लिमांचे भारत वर्षाला दिलेले योगदान व त्यातल्या अभिमान बाळगाव्या, अशा सकारात्मक बाबी तटस्थ, प्रामाणिकपणे पुराव्यासह आणि तर्कशुद्ध प्रतिपादनाद्वारे करत आहेत, हे लक्षात येत होतं.

आणि आता त्यांचे ‘अमीर खुसरो-दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा’ हे अकरा इतिहास-संशोधनपर लेखांचे पुस्तक मराठी रसिकांपुढे येत आहे, ही समाधानाची बाब आहे, मी सदर पुस्तकाचे मन:पूर्वक स्वागत करतो.

आपल्या मनोगतात सरफराज अहमद यांनी ‘जमातवादी इतिहासाला प्रत्युत्तर देण्यासाठी वा त्याला समांतर प्रतिहासाची मांडणी’ करण्यासाठी हे स्फुट इतिहासलेखन केले आहे, असे जे कथन केले आहे, त्या कसोटीला यातील प्रत्येक लेख बऱ्याच समाधानकारक रीतीने उतरला आहे, हे सर्वप्रथम मी अधोरेखित करू इच्छितो. त्यामुळे मराठी साहित्यात एक मोलाची भर या पुस्तकामुळे पडली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी सरफराज अहमद यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठवाड्याच्या मातीत वाढताना मला दखनी मुस्लीम संस्कृती, ही उत्तर भारतातील मुस्लीम संस्कृतीच्या तुलनेत वेगळी आहे, हे जाणवत असे; पण हे वेगळेपण कशात आहे, याचा उलगडा मात्र या पुस्तकाच्या वाचनातून समाधानकारक रीतीने झाला. दखनी संस्कृतीला दखनी राष्ट्रीयत्वाची किनार आहे व इब्राहिम आदिलशहा आणि मलिक अंबरसारखे नायक, हे या भूमीतले आहेत, हे वाचून एक नवे भान जसे मला आले, तसेच मराठी वाचकांनाही नक्कीच येईल.

आज देशात इतिहासाचे भारतीय दृष्टीकोनातून पुनर्लेखनाच्या नावाखाली भारतातला जवळपास हजार वर्षांचा मुस्लीम इतिहास हा केवळ अन्याय व अत्याचाराचाच आहे, अशी भूमिका घेतली जात आहे. आणि त्याद्वारे मुस्लिमांचे ऐतिहासिक योगदान नाकारण्याचा अश्लाध्य प्रयत्न होत आहे. सर्वच मुस्लीम राज्यकर्ते हे सद्गुणांचे पुतळे होते, असा कोणी दावा करणार नाही, पण अकबर, शेरशहा सुरी, रजिया सुलतान, दक्षिणेतली चांदबीबी यांच्या राजवटी, तसेच मुस्लिमांचे स्थापत्यकलेमधले भरीव योगदान (उदा. - ताजमहल, कुतूबमिनार, लाल किल्ला, गोलघुमट), कला-संस्कृतीमध्ये टाकलेली भर (अमीर खुसरो ते मिर्झा गालिब) आणि मध्ययुगीन भक्ती सांप्रदायाचा समकक्ष आध्यात्मिक समता व बंधुतेचा आणि प्रेम - शांती - मानवधर्माचा पुरस्कार करणारा सूफी संतांचा संप्रदाय व त्यांचं काव्य, यांस आपण नाकारू शकत नाही.

हिंदू-मुस्लीम समाजाच्या प्रेम व शांततामय अस्तित्वाच्या अभिसरणातून भारताची ‘गंगा-जमनी’ ही वैशिष्ट्यपूर्ण व तुम्हा-आम्हा सर्वांना अभिमान वाटावा, अशी तहजीब-संस्कृती निर्माण झाली आहे. तिला नाकारण्याचा आजच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या कालखंडात मुस्लीम राज्यकर्त्यांच्या राजवटीच्या चांगल्या बाजू सप्रमाण प्रकाशात आणणाऱ्या, या पुस्तकाचं महत्त्व मला म्हणूनच फार अधिक वाटतं.

इतिहास संशोधन व नव्या प्रकाशात येणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे पुनर्लेखन करणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एका अर्थाने इतिहास लेखन हा अविरतपणे चाललेला सत्याचा शोध असतो आणि सत्य हे कधीच सर्वंकष व एकेरी नसतं. मात्र ते जितकं वस्तुनिष्ठ व पुराव्यांच्या आधारे असतं, तेवढं ते अधिक प्रामाणिक बनतं. अर्थात उपलब्ध पुरावे, कागदपत्रे यांचं इतिहासकार कोणत्या भूमिकेतून पाहतो, यावर बरंच काही अवलंबून आहे.

ब्रिटिशांनी तसेच डाव्या विचारवंतांनी भारताच्या लिहिलेला इतिहासावर पूर्वीही प्रश्न उपस्थित केले जात होते व आजही केले जातात. त्यात काही गैर नाही. त्यामुळे नव्याने इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची आवश्यकता असतेच. पण ते करताना आधी भूमिका ठरवून, विशिष्ट नजर वा विचारसरणी घेऊन आणि त्याला अनुकूल तेवढेच पुरावे व संदर्भ उदधृत करून इतिहासलेखन करणारे इतिहासकार एकांगी चित्र वाचकांपुढे उभे करतात. हे अर्थातच योग्य नाही. पण त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरी बाजू दाखवताना तशीच चूक करणारे इतिहासकार पण कमी नाहीत. त्यामुळे वैज्ञानिक वृत्तीने प्रश्न उपस्थित करत पुरावा तपासणे व त्यातून प्रसंगी परस्पर विरोधी बाजू एकाच राज्यकर्त्यांच्या येत असल्या तरी त्या तशा मांडणे व जिथे तर्कसंगती लागत नाही, तिथे वैज्ञानिकांप्रमाणे तसे नमूद करत त्याचा शोध पुढील काळावर सोपवून तसे प्रामाणिकपणे नोंदवणे, हे अस्सल इतिहास संशोधकाचे काम आहे.

असे इतिहासकार कमीच असतात. पण अशा दुर्मीळ इतिहास संशोधकात सरफराज अहमद येतात, असे माझे हे पुस्तक वाचताना मत झाले आहे. पण तरीही ज्यांच्यावर जमातवादी इतिहासलेखनाने अन्याय झाला आहे, त्यांच्या उजळ बाजूवर व उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकणे, ही भूमिका घेऊन हे लेखन झाल्यामुळे काही वेळा सरफराज अहमदच्या लेखनात खंडन-मंडणाचा अभिनिवेश डोकावतो, हे पण खरे आहे.

तरीही बऱ्याच अंशी सत्याचा वस्तुनिष्ठ शोध घेण्याचा खऱ्या इतिहास संशोधकाच्या भूमिकेशी ते ठाम राहिले आहेत, म्हणून या पुस्तकातून मुस्लीम राज्यकर्त्यांच्या इतिहासाची पुनर्व्याख्या करत जो इतिहास सरफराज अहमद यांनी कथन केला आहे, तो महत्त्वाचा आणि भारताच्या ‘गंगा-जमनी तहजीब’च्या संकल्पनेला सत्याचा आणि संशोधकीय आधार देणारा झाला आहे. आज अशा संशोधनाने विभिन्न संस्कृतीबाबत ‘मेल्टिंग पॉट’ झालेल्या भारताचा हा सर्वधर्मसमभाव आणि आदराचा इतिहास प्रभावीपणे सांगण्याची गरज होती, ती या पुस्तकानं बऱ्याच अंशी सफल झाली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पहिला लेख ‘अमीर खुसरो ते इब्राहिम आदिलशहा - गंगा-जमनी संस्कृतीचे दोन नायक’, ‘दारा शुकोहचा सुफी वारसा’ आणि टिपू सुलतान आणि बाबरच्या अपरिचित पैलूंवर प्रकाश टाकणारे लेख मुस्लीम राज्यकर्त्याचे भारतीय इतिहास, संस्कृतीबाबतचे योगदान आणि त्यांनी आचरलेल्या शांततामय सहअस्तित्वावर प्रकाश टाकणारे आहेत.

अमीर खुसरोबाबत ते भारतीय संस्कृतीचे आत्मभान घेऊन सामान्य माणसांच्या बाजूने उभे राहणारे आणि समाजाला मूल्यविवेक शिकवणारे महाकवी आहेत, हे लेखकाचं प्रतिपादन पटणारं आहे. त्यांनी एच. एन. सोल्कनॉज या मध्ययुगीन इतिहासाच्या संशोधकाचं अमीर खुसरोबाबत नोंदवलेलं निरीक्षण महत्त्वाचं आहे- ‘‘मध्ययुगीन काळात भारतीय संस्कृतीची पालखी अमीर खुसरोंनी आपल्या खांद्यावर घेतली. समतेचे तत्त्व भारतीय समाजात रुजवण्यासाठी शब्दांचे माध्यम वापरले. इस्लामच्या उदारमतवादी परंपरेचे प्रतिनिधित्व करणारा खुसरो हा अद्वितीय कवी आहे.’’

या लेखात लेखकाने खुसरोची ‘धर्म जपत धर्मापलीकडे जाण्याची सद्भावना’ आणि ‘भारतप्रेम व राष्ट्रीयत्वाच्या कविता’  उदधृत करून ‘तो प्रेमाचा काफीर आहे व त्याला मुसलमानीची आवश्यकता नाही’, हे त्याचं बंडखोर व्यक्तिमत्त्व समर्पकपणे चितारलं आहे. त्याच्या एका कवितेच्या ‘किश्वरे हिंद बहिश्ते बर जमिन’ या ओळी दिल्या आहेत, ज्याचा अर्थ ‘भारत पृथ्वीवरील स्वर्ग आहे’, असा होतो. त्यातून तो या भूमीशी व इथल्या संस्कृतीशी किती एकरूप झाला होता, हे लेखकाने योग्य रीतीने दाखवून दिले आहे.

लेखकाने इब्राहिम आदिलशहा आणि कुली कुतुबशहा हे अनुक्रमे विजापूर व गोवळकोंडाचा बादशहा हे केवळ राज्यकर्ते नव्हते, तर मध्ययुगीन काळातील गंगा-जमनी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे महत्त्वाचे कवी होते, हे नोंदवलेलं निरीक्षण सार्थ आहे.

आदिलशाहीत इब्राहिमनं फारसी भाषेसोबत स्थानिक भाषांना म्हणजे दख्खनी हिंदी, कानडी व मराठी भाषेला प्रशासकिय कामकाजात स्थान दिल्याचं लेखक जेव्हा पुराव्याच्या आधारे सांगतो, तेव्हा हा बादशहा काळाच्या किती पुढे होता आणि स्थानिक भाषांमध्ये कारभार करून लोकांची मनं जिंकून घेणारा होता, याची लख्ख जाणीव होते. त्याने तर मराठीला राज्यभाषेचा दर्जा दिला होता, ही माहिती थक्क करणारी आहे. तो सल्तनतीचा कारभार करताना साहित्य व संगीताचाही व्यासंग करायचा आणि नवरसापासून प्रेरणा घेऊन विजापूरजवळ त्यानं ‘नवरसपूर’ ही कलानगरी उभारली. त्याची एकेश्वरवादी इस्लामी धर्मनिष्ठा भारतीय संस्कृतीमधली विद्येची देवता मानली जाणाऱ्या सरस्वतीचं स्तुतीगीत रचताना कधीच आड आली नाही. त्याच्या दख्खनी हिंदी खडी बोलीत केलेल्या एका कवितेचा तर्जुमा असा आहे – ‘‘इब्राहिमला सरस्वतीमातेचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे त्याने रचलेला नवरसनामा हा ग्रंथ अजरामर ठरणार आहे.’’

मोहमद कुली कुतुबशहा तर दख्खनी साहित्याचा महाकवी होता, हे लेखकाने सप्रमाण दाखवून त्याचा एक वेगळा पैलू कथन केला आहे. फारसीचा दुराग्रह न करता त्याने स्थानिक लोकभाषेत काव्यलेखन केलं. हे संदर्भ आणि हा सांस्कृतिक इतिहास आजच्या धार्मिक विद्वेषाच्या कालखंडात उच्चरवाने सांगणे आणि लोकांपर्यंत ही माहिती नेणे शांततामय सहअसित्वासाठी महत्त्वाचे आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

दारा शुकोह या मुघल सम्राट न होऊ शकलेल्या सम्राटाचा परिचय करून देणारा लेख खूपच माहितीपूर्ण आहे. त्याद्वारे लेखकाने दारा हा भारतीय संस्कृतीच्या इतिहासातला एक नायक होता आणि तो सूफी तत्त्वाची फकिरी करणारा  होता. त्याचा सूफी संप्रदायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक होता. सूफींच्या तत्त्वज्ञानाचं सार दारानं पहा कसं व्यक्त केलं आहे-

‘‘सूफींना धर्माच्याच आधारे बोध झाला आहे. पण तुम्ही सूफींना कोणत्याच एका धर्मापुरते मर्यादित ठेवू शकत नाही. सूफी एखाद्या धर्माचा प्रतिनिधी नसतो. तू चुकला आहेस धर्मवेड्या!’’

खरं तर प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक लेख मुस्लीम इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा आहे. सरफराज अहमद यांनी टिपू सुलतानाच्या पत्रव्यवहारातून आणि बाबरच्या आत्मचरित्र ‘बाबरनामा’ व अन्य कृतींमधून हे दोन राज्यकर्ते प्रचलित गैरसमजुतीच्या पलीकडे कसे प्रजाहितदक्ष व उदार सुलतान होते, हे संक्षेपाने पण प्रमाणानिशी दाखवून दिले आहे. खरे तर टिपू सुलतानाचं नायकत्व गिरीश कार्नाडांच्या ‘द ड्रिम्स ऑफ टिपू’ या नाटकाद्वारे भारतीयांपुढे आले होते, पण त्याच्या पत्रातून तो कसा इंग्रजांच्या वसाहतवादाला विरोध करणारा एतद्देशीय बादशहा होता, हे या लेखातून मला वाटते, मराठीत प्रथमच प्रभावीपणे आले आहे.

बाबराची आजची प्रतिमा ही बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादानं हिंदूंसाठी नकारात्मक झाली आहे, मात्र त्याची राजवट ही मंदिरं तोडण्याच्या एक-दोन घटना वगळता अत्यंत सहिष्णू होती, हा लेखकाने काढलेला निष्कर्ष पुरेशा पुराव्याविना पटणारा नाही. लेखकाने उरवाच्या डोंगरावरील मूर्त्या नग्न होत्या म्हणून तोडल्या, हा लेखकाने दिलेला संदर्भ माझ्या मते पुरेसा नाही. ‘‘बाबरच्या अधिकाऱ्यांनी बाबरला न कळवता स्वत:हून घेतलेल्या (म्हणजे मंदिर विध्वंसाच्या) निर्णयासाठी बाबराला जबाबदार धरता येणार नाही’’, हा लेखकाने काढलेला निष्कर्ष पुराव्याला धरून नाही, तर त्याचं मोठेपण वाचकांच्या मनावर ठसवण्यासाठी केलेलं विधान आहे, असं मला वाटतं.

इथं एक संशोधक इतिहासकाराच्या भूमिकेपासून सरफराज अहमद काही प्रमाणात ढळले गेले, असा निष्कर्ष एक वाचक म्हणून काढला तर चुकीचा ठरणार नाही. पण बाबराचं मोठेपण एका साम्राज्याचा निर्माता म्हणून निर्विवाद आहे. रयतेचं मन जिंकल्याखेरीज आणि स्थानिकाचा धर्म व संस्कृतीला आपलंसं केल्याखेरीज मोगल साम्राज्य एवढं प्रदीर्घ काळ टिकलं नसतं. त्यात अकबर, जहांगीर व शहाजहानचा - खास करून अकबराच्या उदार राज्यकारभाराचा वाटा मोठा आहे.

तसेच हैदराबादच्या शेवटचा निजाम मीर उस्मानअली खाँवर ‘शत्रूभावी समीक्षेच्या पलीकडचा’ नावाने जो लेख प्रस्तुत ग्रंथात आहे, तोही त्याला वाजवीपेक्षा अधिक उजळ करणारा व इतिहासाशी काहीसा विसंगत ठरणारा आहे. लेखकाने अनंत भालेराव या ‘मराठवाडा’ दैनिकाच्या संपादक व मराठवाड्याचं वैचारिक नेतृत्व करणाऱ्या सव्यसाची लेखकानं मीर उस्मान अलीला ‘शोषक बादशहा’ ठरवलं, ते या ग्रंथलेखकास व्यथित करणारं म्हणून अमान्य आहे.

या लेखात लेखकानं एक राज्यकर्ता म्हणून निजामांच्या लोकहितकारी निर्णयांची माहिती दिली आहे. ती अर्थातच खरी आहे, पण तरीही त्याच्या काळातच त्यांच्या पाठिंब्याविना रझाकार ही हिंदूवर अत्याचार करणारी संघटना उभी राहिली नसती. याबाबत ग्रंथलेखकाचं मौन त्याच्या संशोधकिय इतिहासकाराच्या लेखनप्रेरणेशी विसंगत आहे. एवढी बाब सोडली तर निजामाच्या राज्यातलं एतद्देशीय उस्मानिया विद्यापीठ, सुरू केलेल्या शिक्षण संस्था आणि रेल्वेचे जाळे या बाबी निजामाच्या राजवटीच्या सकारात्मक बाजू दाखवणाऱ्या आहेत. पण त्यामुळे निजामाची दुसरी बाजू कुणी दाखवून देणं, हे त्याच्यावर अन्याय करणारं आहे, असं समजण्याचं कारण नाही. लिहिण्याच्या ओघात व दख्खनी संस्कृतीच्या प्रेमात असणाऱ्या लेखकाकडून हा किंचित प्रमाद घडला आहे. पण तरीही लेखकानं उस्मान अली खाँचं शत्रूभावी समीक्षेच्या पलीकडे जात केलेलं मूल्यमापन महत्त्वाचं व स्वागतार्ह आहे, असं मी मानतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मला स्वत:ला प्रस्तुत ग्रंथातील ‘मराठवाड्याच्या मध्ययुगीन इतिहासाचे पुनर्लेखन’ व ‘हैदराबादची साहित्य संस्कृती’ हे दोन लेख मूळचा मराठवाडी म्हणून विशेष महत्त्वाचे वाटतात. त्याद्वारा माझ्या उज्ज्वल मराठवाडी सांस्कृतिक व साहित्यिक परंपरेची जाणीव, हे लेख वाचताना मला झाली. दख्खनी भाषेचा उदय आणि प्रगती, साहित्य निर्मिती तसेच उर्दू भाषेला निजामाने दरबारी भाषा केल्यामुळे त्या भाषेच्या विकासाला चालना मिळाली, याचे सम्यक ज्ञान या लेखांनी वाचकांना समाधानकारक रीतीने होते.

पण येथे लेखकाने कुतुबशाही-आदिलशाहीची स्थानिक मराठी, कानडी व तेलुगू भाषेला महत्त्व देण्याच्या उदार परंपरेला छेद देत निजामशाहीत उर्दू ही राज्यकारभाराची व शिक्षणाची भाषा करून ती स्थानिक लोकांवर का थोपवली गेली? त्यामागे निजामाच्या कोणत्या प्रेरणा होत्या? यावर भाष्य करणं आवश्यक होतं. निदान पुढील पुस्तकात तरी करावं व तटस्थपणे त्याचं ऐतिहासिक मूल्यमापन प्रस्तुत करावं असं मला जरूर सुचवावंसं वाटतं. सरफराज अहमद हे संशोधकीय शिस्तीनं इतिहासाकडे तटस्थपणे पाहणारे अभ्यासक आहेत, ज्याची प्रस्तुतचा ग्रंथ साक्ष आहे, म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा करणं अवाजवी होणार नाही.

या पुस्तकातील इतर लेख म्हणजे ‘मुघलांचे जनानखाने’, ‘अलबरुनी’ आणि ‘फखरे मुदब्बीर’ हे लेख मुस्लीम जीवन व मुस्लीम विचारवंतांचे वैचारिक योगदान कथन करणारे आहे. मलिक अंबर याच्यावर स्वतंत्र लेख खरे तर त्याचे दखनी राजवटीच्या संदर्भातले योगदान पाहता आणि औरंगाबाद शहराचा निर्माता म्हणून त्याचं महत्त्व लेखकानं स्वतंत्रपणे लिहिणं आवश्यक होतं. इतर लेखात त्याच्या कर्तृत्वावर संक्षिप्तपणे प्रकाशझोत टाकला गेला आहे, पण तो दखनी संस्कृतीचा एक नायक होता, त्याच्यावर वेगळा लेख हवा होता, असं राहून राहून वाटतं. असो. मागेपुढे ते नक्कीच मलिक अंबर लेख लिहितील, अशी अपेक्षा आहे.

एकूणच प्रस्तुत पुस्तक नावाप्रमाणे दखनी संस्कृतीचं ऐतिहासिक महत्त्व व त्याला लाभलेली दखनी राष्ट्रीयत्वाची किनार आणि इब्राहिम आदिलशहा व मलिक अंबर या दोन मराठी राष्ट्रीयत्वाची उभारणी करणाऱ्या नायकांचं योगदान समर्थपणे दाखवून देणारा झाला आहे. भारतातील गंगा-जमनी संस्कृतीचं साधार व सम्यक दर्शन आजच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात सप्रमाण व पुराव्यानिशी घडवल्याबद्दल या लेखकाचं मी अभिनंदन करतो. आणि हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसानं उघड्या मनानं वाचावं, म्हणजे हा पुरोगामी महाराष्ट्र अधिक उदार, सहिष्णू व सेक्युलर होऊ शकेल!

‘अमीर खुसरो-दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा’ - सरफराज अहमद

हरिती प्रकाशन, पुणे

पाने – २४०, मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 05 December 2022

लक्ष्मीकांत देशमुख,

अवरंगजेबाने स्वत:चा सख्खा भाऊ दारा शुकोह याचा अमानुष खून केला. दारा काही त्याचा राजकीय प्रतिस्पर्धी नव्हता. मग अवरंग्याने त्यास ठार मरायचं कारण काय मुळातून? ते कारण असं की दारा काफिरांच्या म्हणजे हिंदूंच्या ग्रंथांचा सन्मान करीत असे. दाराने रामायण व महाभारत फारसीत भाषांतरित केले. म्हणून अवरंग्याचा त्याच्यावर खुन्नस होता.

तर मग हा दाराच्या प्रेताचीही विटंबना करणारा अवरंगजेब नेमका कोणत्या गंगायमुना तहजिबीत बसवायचा ? सरफराज अहमद महाराष्ट्रास अधिकाधिक उदार, सहिष्णू व सेक्युलर करायला निघालेत. तसंच त्यांनी थोडं टिपू सुलतान व अवरंग्याच्या अनुयायांना उदार व सेक्युलर बनवावं. इतकीच माझी माफक अपेक्षा आहे.

हा घ्या अवरंग्यावरील लेख : https://www.misalpav.com/node/1563
बघा त्याचा हिडीसपणा आणि बसवा त्याला तुमच्या गंगाजमुनेच्या तहजिबीत.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......