जसं नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांचं ‘पुनर्वसन’ केलं जातं, तसंच दोष नसताना नोकरीतून काढून टाकलेल्यांचंही ‘पुनर्वसन’ होणं, ही सामाजिक गरज आहे
पडघम - तंत्रनामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 01 December 2022
  • पडघम तंत्रनामा कामगार-कपात Laid Off ले ऑफ Layoff रोजगार Employment बेराजगारी UnEmployment करोना Corona

२००८मध्ये ‘लेहमन ब्रदर्स’ ही अमेरिकन कंपनी दिवाळखोरीत निघाली, त्या वेळेस मी एका कंपनीच्या ‘मानव संसाधन’ (Human Resources) विभागामध्ये काम करत होते. या कंपनीची भरतीप्रक्रिया मुंबईतून होत असे. त्यात ९० टक्के लोक लेहमन ब्रदर्समधून काढून टाकलेले होते. २००८-२००९ या काळात मी आधीच्या ठिकाणी कामावरून काढून टाकलेल्या अनेकांची भरती केली. त्या वेळेस नोकरीतून काढून टाकणं, अपमानकारक मानलं जात असल्यानं अनेक जण कचरत कचरत सांगायचे. सध्या या उलट स्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत ‘LinkedIn’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘नोकरी हवी’ अशा पोस्ट दिसायला लागल्या आहेत, आणि हे चांगलं लक्षण आहे.

कोणतीही कंपनी जेव्हा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकते, तेव्हा तिच्या समस्या आणि ती हाताळण्याची पद्धत वेगवेगळी असते. २७ ऑक्टोबर २०२२ रोजी ट्विटरची मालकी एलन मस्ककडे जाताच त्यांनी ७० टक्के कर्मचाऱ्यांना ताबडतोब काढून टाकले. त्यात सीईओ पराग अग्रवाल, व्यवस्थापन टीम आणि भारतातील ट्विटरचे कर्मचारी यांचा समावेश होता. एलन मस्कने ट्विटर विकत घेताच पाशवी पद्धतीनं लोकांना काढून टाकलं. काही कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवारी ऑफिसमध्ये बंद करून त्यांच्याकडून हवं तसं काम करण्यासाठी जबरदस्ती केली. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचं बंद केलेलं ट्विटर खातं पुन्हा सुरू केलं. हा सर्व प्रकार खळबळजनक होता.

ट्विटरचे संस्थापक व सीईओ जॅक डॉर्सी यांनी या प्रकाराबद्दल आपल्या कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे.

हा ट्विटर-अध्याय सुरू असतानाच मार्क झुकरबर्गच्या ‘मेटा’ने कंपनी तोट्यात जात असल्यानं कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचं जाहीर केलं. झुकरबर्गचा ‘मेटा’चा प्रयोग अपयशी ठरल्यामुळे सहा महिन्यांचा आगाऊ पगार, कर्मचारी व कुटुंबियांना सहा महिन्याचा विमा, नवीन नोकरी शोधून देण्यासाठी मदत, असं पॅकेज जाहीर करत ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं.

करोनाच्या काळात इंटरनेट कंपन्या व संबंधित व्यवसायांना उधाण आलं होतं. एज्युकेशनल टॅक्नॉलॉजीतल्या Byjusसारख्या कंपन्यांनी आणि सेवा पुरवणाऱ्या अ‍ॅमेझॉन व झोमॅटो यांसारख्या कंपन्यांनी वाढलेला व्यवसाय चालवण्यासाठी जास्तीच्या लोकांना मोठा पगार देऊन कामावर घेतलं, मात्र करोना संपल्यावर शाळा, कॉलेज, बाजार, दुकानं, भाजीपाला असं सर्व पूर्ववत झाल्यानं त्यांच्यावर कर्मचारी कपातीची वेळ आली. याचबरोबर रशिया-युक्रेन युद्ध, करोनामुळे सर्व व्यवसायांचं बदललेलं स्वरूप आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एकाधिकाराकडे झुकत चाललेलं जागतिक राजकारण, यामुळे कर्मचार्‍यांना व कामगारांना पोषक वातावरण राहिलेलं नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी दीड दशकांपेक्षा जास्त काळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम केलं आहे. तिथं मी हे अनुभवलं की, कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती नसल्यानं ते सतत दुसऱ्या नोकरीच्या शोधात असतात. तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सतत वेगवेगळ्या मुलाखती देणं वा ऑफर्स हातात असू देणं, आता नवीन राहिलेलं नाही. पुण्यात नुकतीच एक ब्लेड/रेजर संबंधित उत्पादन करणारी कंपनी बंद झाली. त्यामुळे जवळपास दीड हजार कर्मचारी बेरोजगार झाले.

एका व्यक्तीचा रोजगार जातो, त्या वेळी त्याच्यावर अवलंबून असणारं संपूर्ण कुटुंब अडचणीत येतं. कामगार संघटना, मनुष्यबळ विभागात काम करणारे मंच, अशांना किती मदत करणार? अशा वेळी त्या कुटुंबाचं मानसिक व शारीरिक आरोग्यही धोक्यात येतं. उत्पन्नाचं साधन बंद झालं की, व्यक्ती व तिच्या कुटुंबियांचं अस्तित्व कसं तग धरणार?

आज मेटाने काढलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कित्येक भारतीयांवर शैक्षणिक-कर्ज आहे, व्हिसाचं आव्हान आहे, अनेकांवर कुटुंबाची जबाबदारी आहे. अशा वेळेस नोकरी जाणं, हा मोठा मानसिक आघात ठरतो. पुरुष कर्मचाऱ्यांसाठी तर ही शरमेची बाब असते. परिणामी त्यांच्यात अपमानजनक भावना वाढीस लागते, त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागते आणि त्यांचा आत्मविश्वास खचतो. नव्या कंपनीत नोकरी मागताना हे मानसिक ओझं सोबत असल्यानं तिथंही त्यांना अनेक प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळे चांगल्या करिअरला खीळ बसते.

अति काम केल्यानं जसं मानसिक आरोग्य खालावतं, तसंच अचानक रोजगार गेल्यानं, बेरोजगार झाल्यानंही होतं. भविष्याची चिंता, नोकरी/व्यवसायात प्रयत्न करूनही न मिळालेलं यश, त्यातून वाढणारी निराशा, ही केवळ एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम करते. जसं भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांचं पुनर्वसन केलं जातं, तसंच दोष नसताना नोकरीतून काढून टाकलेल्या लोकांचं पुनर्वसन होणं, ही सामाजिक गरज असते\आहे. इतर नैसर्गिक आपत्तींप्रमाणे बेरोजगारी ही मानवनिर्मित‍ आपत्ती असून त्यावर दीर्घकालीन उपाययोजना होणं गरजेचं आहे.

करोनाकाळ सर्वच नोकरदार व व्यावसायिकांसाठी कसोटी पाहणारा होता. त्यात अनेकांचे जीवसुद्धा गेले. कारण अशा परिस्थितीत कसं जगायचं, याचं प्रशिक्षण कोणाकडेच नव्हतं. अजूनही कित्येकांची आर्थिक परिस्थिती पूर्ववत झालेली नाही. कितीतरी लहान-मोठे उद्योगधंदे बंद झाले आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नोकरी गेलेल्यांना, बेकार झालेल्यांना वेळेवर जगण्यापुरती आर्थिक मदत आणि मानसिक आधार मिळाला असता, तर अनेक जीव वाचले असते… त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची होणारी फरफट थांबली असती. इतर प्रगत देशांप्रमाणे भारतात ‘सामाजिक सुरक्षाकवच’ नाही. त्यामुळे नोकरी गेली की, सगळं ठप्प होतं. एका संशोधनानुसार बेरोजगारीचा अनुभव घेतलेल्यांनी पुढच्या काळात नवीन नोकरी वा व्यवसाय सुरू केला तरी, पुढची पाच वर्षं बेरोजगारीच्या मानसिक आघाताचे परिणाम मनावर राहतात.

अचानक नोकरी जाणं वा व्यवसाय बंद पडणं, यामुळे मानसिक आरोग्यावर का परिणाम होतो?

- स्वतः वर/कुटुंबावर कलंक/लांच्छन लागतं. त्यामुळे लज्जा, भीती या भावना निर्माण होतात. अत्यावश्यक दैनंदिन खर्चात कपात करावी लागल्यानं राहणीमानाचा दर्जा खालावतो. आरोग्याच्या समस्या असतील आणि विम्याचं कवच नसेल तर पैशाअभावावी जीवसुद्धा जाऊ शकतो. जर कंपनीच्या मालकानं, सरकारी विभागानं वा व्यावसायिक भागीदारानं छळ-कपट केलं असेल, तर आत्मविश्वासाचं खच्चीकरण होतं. सामाजिक संपर्क कमी होतो, त्यामुळे मिळणारा पाठिंबाही कमी होतो.

- अलीकडच्या काळात कामगार संघटनांचा प्रभाव कमी झाल्यानं नोकरी गेलेल्या व्यक्तीला वाळीत टाकलं गेल्याची भावना येते. कारण नोकरी सुटली की, अगदी जुने सहकारीही विचारत नाहीत. ज्याची नोकरी गेली आहे, त्यालाच आजूबाजूचे लोक दोषी ठरवून त्याच्याशी बोलणं बंद करतात, दुर्लक्ष करतात, टाळतात.

- बेरोजगार व्यक्ती गुन्हेगारी किंवा अनैतिक, बेकायदेशीर मार्गाला लागू शकते.

- ताणामुळे वेगवेगळ्या शारीरिक व्याधी उदभवतात. त्यातून हृदयविकार, मधुमेह यांसारखे आजार जडतात.

- विविध प्रकारची व्यसनं लागतात.

- औदासीन्य, चिंता यांमुळे आत्महत्येची शक्यता वाढते.

- चांगलं मनुष्यबळ वाया जातं.

हे सर्व लक्षात घेता यावरील उपाय दीर्घकालीन व संवेदनशील असावा, कारण कुठलाही कामगार वा कर्मचारी केवळ त्याच्या व्यावसायिक भूमिकेपुरता मर्यादित नसतो, तर तो नागरिक व एका कुटुंबाचा आधार असतो. त्यामुळे उद्योग, सरकार, कामगार संघटना यांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. हा उपाय मानसिक आजारांवरील गोळ्या वा इंजेक्शन्सपुरता मर्यादित न राहता, बेरोजगारांचं पुनर्वसन - यात समुपदेशन, क्षमता विकास, आर्थिक मदत, सामाजिक पाठिंबा – केलं जायला हवं. बेरोजगाराला बहुतेक वेळा त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. एका बाजूला सीईओ व संबंधित अधिकार्‍यांचे पगार व इतर सुविधा आणि दुसऱ्या बाजूला सामान्य कर्मचाऱ्याला नोकरी गेल्यावर जगायचीही भ्रांत पडावी, एवढी टोकाची विषमता का निर्माण झाली असावी, यावर विचार व्हायला हवा.

करोनाकाळात केवळ नोकरी जाईल, या भीतीनं अनेकांनी संसर्ग होऊनही ऑफिसमध्ये त्याविषयी सांगितलं नाही. त्यामुळे इतर सहकाऱ्यांना संसर्ग झाला, काहींना तर जीव गमावावा लागला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

नोकरी जाणं/व्यवसाय बंद पडणं, हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं, परंतु आपल्या देशात जिथं अगदी लहान मुलांच्या चुका माफ केल्या जात नाहीत, तिथं मोठ्यांचं काय होत असणार, याची कल्पनाच केलेली बरी! ‘पंगु यश’ (म्हणजे लोकांची ‘जी हुजुरी’ करत आपली खुर्ची टिकवून ठेवायची) आपल्या समाजाला चालतं, पण ‘धडधाकट अपयश’ (जिथं पूर्ण प्रयत्न करूनही काही कारणामुळे यश मिळत नाही), हा चेष्टेचा, उपहासाचा विषय होत असल्याने बेरोजगारीचा कलंक माथी मिरवताना कमालीच्या यातना होतात.

विद्यमान आर्थिक दुरवस्थेमुळे आपल्यापैकी अनेकांच्या वाट्याला कमी-अधिक फरकानं हे अनुभव आले असतील वा आपल्या नातेवाईकांच्या-मित्रपरिवाराच्या तरी. ९ ते ५मध्ये धन्यता मानणारा आपला समाज ही गोष्ट जितक्या लवकर समजून घेईल, तितक्या लवकर मानवी आयुष्यं वाचवण्यात आपल्याला यश येईल.

ज्यांची नोकरी गेली आहे, त्यांनी काय करावं?

- नोकरी/व्यवसाय सर्वस्व नाही, हे नेहमी लक्षात असू द्या.

- नोकरीव्यतिरिक्त तुम्हाला शक्य त्या प्रकारे सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहा. उदा. कामगार संघटना, आपल्या विषयाशी संबंधित संघटना, छंद, खेळ यातून निर्माण होणारे गट, सामाजिक बांधीलकी असणाऱ्या संघटना (NGO).

- एक खांबी तंबू नको, उत्पन्नाचा दुसरा मार्ग हवा, म्हणजे किमान दैनंदिन गरजा भागवल्या जातात.

- कामाच्या ठिकाणी नातेसंबंध निर्माण करा. त्यामुळे वेळेत आवश्यक ती माहिती मिळते. परिणामी कंपनीत कामगार-कपात होणार असेल, तर त्याची खबरबात समजू शकते.

- नोकरी जाणं किंवा व्यवसाय बंद पडणं, ही कधीही सर्वस्वी एका व्यक्तीची चूक नसते. त्यात अनेक घटक असतात. आणि जेव्हा खरंच चूक असते, तेव्हा ती दुरुस्त करून परत एकदा संधी मिळायला हवी.

- पुरुषांनी बोलून मन मोकळं करायला हवं, कारण त्यांच्यावर अजूनही बहुतांश वेळा त्यांचं कुटुंब अवलंबून असतं. मात्र लज्जेमुळे पुरुष बोलून दाखवत नाहीत, मदत मागत नाहीत, बायकोला व्यवहार नीट सांगत नाहीत. त्यातून दुर्दैवी घटना घडतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

- मदत मागायला लाजू नका. झोप येत नसेल, चुकीचे विचार येत असतील, तर लगेच जवळच्या व्यक्तीशी बोलून मन मोकळं करा, गरज पडल्यास समुपदेशकाचा सल्ला घ्या.

- उत्पन्नाचं साधन जाणं हा मानसिक आघात आहे. त्यामुळे मानसिक त्रास होणं साहजिक आहे. मात्र परिस्थिती समजून घेऊन तिचा स्वीकार करा. माझ्याबाबतच असं का झालं, अशा नकारात्मक दृष्टीकोनानं काहीच चांगलं दिसत नाही, सूचत नाही आणि खुणावतही नाही.

- नोकरी नसेल तर बँकसुद्धा काही दिवस कर्जवसुलीसाठी थांबते. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन काम करा.

- प्रत्येक संकट काहीतरी नवीन शिकवून जातं. त्यामुळे ‘स्व’-संवाद चांगला ठेवा. नकारात्मक्तेपासून दूर रहा.

- बदलासाठी तयार रहा… जो बदलतो तो टिकतो.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......