अजूनकाही
२९ नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे संस्थापक दाम्पत्य प्रणव व राधिका रॉय यांनी राजीनामा दिला आणि तो देशभर (आणि देशाबाहेरही) बातमीचा आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला. त्या धक्क्यातून एनडीटीव्हीचे आणि सच्च्या पत्रकारितेचे चाहते, पाठीराखे बाहेर येतात न येतात, तोच काल ३० नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनीही राजीनामा दिला. काल दिवसभर त्याविषयी सोशल मीडियावर आणि हजारो पोर्टल्सवर लिहिलं, बोललं गेलं.
रवीश कुमार यांनी काल कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आज सकाळी सकाळी त्यांनी ‘Ravish Kumar Official’ या त्यांच्या यु-ट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. २४ मिनिटे आणि १२ सेकंदांच्या या त्यांच्या मनोगतात त्यांनी एनडीटीव्हीमध्ये सलग २७ वर्षं केलेल्या कामाचा, तिथं शिकलेल्या पत्रकारितेच्या नीतीमूल्यांचा आणि मिळालेल्या स्वातंत्र्ययुक्त जबाबदारीचा जसा उल्लेख केला आहे, तसाच आपल्या सहकाऱ्यांचा, विशेषत: महिला सहकाऱ्यांचा, त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या देशभर (आणि जगभरच्याही)च्या पत्रकारांचा आणि इतरांचाही उल्लेख केला आहे. त्यात मराठीचाही समावेश आहे.
रवीश कुमार अस्वस्थ जरूर आहेत, पण आक्रस्ताळे झालेले नाहीत. त्यांच्या बोलण्यात खंत, नाराजी आहे, पण द्वेष, तिरस्कार नाही. अतिशय संयत स्वरात, काहीशा भावूक अवस्थेत ते नेहमीच्या आपल्या हटके व काव्यमय शैलीत, अतिशय सहजसुंदर, ओघवत्या हिंदीत बोलले आहेत. राष्ट्रीय पत्रकारितेत अशी काव्यमय शैली असलेले ते बहुधा एकमेव टीव्ही पत्रकार आहेत. आता खरं तर, ‘होते’ असं म्हणावं लागेल.
रवीश कुमार यांचं हे जवळपास अर्ध्या तासाचं मनोगत आहे. त्याचा सर्वाधिक भाग त्यांनी खर्च केलाय तो त्यांच्या प्रेक्षक-चाहत्यांसाठी... त्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. त्यांनी म्हटलंय – “मैंने इस्तीफ़ा दे दिया हैं। यह इस्तीफ़ा आपके सम्मान में हैं। आप दर्शकों का इक़बाल हमेशा बुलंद रहे। आपने मुझे बनाया। आप ने मुझे सहारा दिया। करोड़ों दर्शकों का स्वाभिमान किसी की नौकरी और मजबूरी से काफ़ी बड़ा होता है। मैं आप के प्यार के आगे नतमस्तक हूँ।”
आपल्या वाट्याला आलेली खेळी\सामना समरसून खेळलेल्या एका साहसी पत्रकाराचं हे मनोगत, एका श्रेष्ठ पत्रकाराचं ‘निरोपाचं स्वगत’ कसं असावं, याचा नमुना म्हणूनही आदर्श ठरावं.
ऐका, तर… रवीश कुमार ‘रवीश कुमार’च्याच आवाजात…
.................................................................................................................................................................
रवीश कुमार यांचे यु-ट्युब चॅनेल - ‘Ravish Kumar Official’
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment