संपादकीय
शिरोजीने २०२२च्या मार्च महिन्यापासून मोठी रजा घेतली होती, असे आम्हाला दिसून आले आहे.
‘अक्षरनामा’च्या सर्व्हरवरून मधली काही प्रकरणे उडाली की काय, असे वाटून आम्ही संशोधन केले, पण तसे काही दिसून आले नाही. शिरोजीने आपल्या बखरीचे दहावे प्रकरण २९ मार्च २२ रोजी लिहिले. त्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये अकरावे प्रकरण येत आहे. मध्यंतरीच्या काळात मोठ्या घटना घडल्या नाहीत असे नाही. विशेषतः कर्नाटकातील हिजाब प्रकरणाने मोठा गोंधळ उडवून दिला. उत्तर प्रदेशातही योगी आदित्यनाथ नामक मुख्यमंत्र्याने मुसलमानांच्या घरादारांवर बुलडोझर चालवून गोंधळ उडवून दिला. पुढे सर्वोच्च न्यायालयाने मुसक्या आवळल्यावर हा प्रकार बंद झाला. या घटनांवर खरं तर शिरोजीने लिहायला हवे होते, पण त्याने काही लिहिलेले दिसत नाही.
शिरोजीच्या बखरी ‘अक्षरनामा’मध्ये सादर करणारे श्रीनिवास जोशी या मधल्या काळात काव्य वगैरे प्रकारांवर खूप लिहीत होते, असे आम्हाला आढळून आले. यावरून शिरोजी आणि श्रीनिवास जोशी हे एकच असावेत, असा तर्क संपादक मंडळातील काही सदस्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. परंतु, व्यक्तिशः आम्हाला तसे वाटत नाही. कविता आणि राजकारणावर लिहिणाऱ्या सामान्य लेखकाला इतिहास लिहिण्याचे शिवधनुष्य पेलता येईल, असे आम्हाला वाटत नाही. काव्य आणि राजकीय लिखाण ही जर मिसळ आहे, असे मानले तर इतिहास ही ‘सुपरफाईन तर्री’ आहे, हे सगळेच वाचक मान्य करतील.
इतिहास हे सगळ्या विषयांचे ‘सुपरफाईन डिस्टिलेशन’ असते. तर्रीमध्ये मिसळीत टाकलेल्या सर्व पदार्थांची चव उतरलेली असते; त्याप्रमाणे, काव्य, समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा सगळ्या महत्त्वाच्या विषयांचा अर्क इतिहासलेखनात उतरलेला असतो. त्याचमुळे इतिहासाचे लेखक इतिहासाशिवाय इतर काहीही लिहिताना दिसत नाहीत. आणि इतिहासकाराने बाकी काही लिहावे तरी का?
शिरोजी हा मोठा इतिहासकार लेखनकार्यासाठी श्रीनिवास जोशी या लेखनिकावर अवलंबून होता, एवढाच निष्कर्ष शिरोजीची सुट्टी आणि नेमक्या त्याच काळातील श्रीनिवास जोशी या लेखकाने साधलेले लेखन-बाहुल्य यावरून काढता येईल. या गोष्टीवरून शिरोजीच्या बखरीच्या संपादकीय मंडळातील मतभेद पराकोटीला गेले आहेत. वेळ पडली तर संपादकीय मंडळ फुटले तरी चालेल, पण शिरोजी आणि श्रीनिवास जोशी एक होते, हे आम्ही कदापी मान्य करणार नाही, अशा निकारावर आम्ही उतरलेलो आहोत.
मंडळातील ज्या सदस्यांना श्रीनिवास जोशी या छोट्या लेखकाबद्दल फार वाटते आहे, त्यांनी या जोश्यांच्या इतर लेखनावर संशोधन करावे आणि त्या लिखाणाला आज बाविसाव्या शतकात काय प्रतिसाद मिळतो आहे, ते पाहावे! शिरोजीच्या तर्रिदार लिखाणाच्या ओघात हे जोशी महाशय त्यांच्या काव्याबद्दलच्या लिखाणाच्या कारणाने एक फार मोठा प्रतिरोध बनून राहिले होते. त्यांचा आम्ही निषेध करत आहोत. आणि, अर्थातच त्यांचे समर्थक बनून राहिलेल्या संपादकीय मंडळातील आमच्या सहकार्यांचाही निषेध करत आहोत!
शिरोजी अत्यंत शांतपणे इतिहास लिहीत होता, या मागचे कारण आपण समजून घेतले पाहिजे. इतिहास ही हळूहळू आणि अत्यंत साकल्याने लिहिण्याची गोष्ट आहे. काव्यलेखनाचे उंदीर सतत इकडे तिकडे बागडत असताना इतिहास लेखनाचा ऐरावत आपली शांत आणि समंजस पावले टाकत ऐटीत चाललेला असतो.
इतिहासकार अंतोजी आणि त्यांचे लेखनिक नंदा खरे अशीही एक जोडी तत्कालीन महाराष्ट्रात होऊन गेली. अंतोजी हेच नंदा खरे होते, असा एक प्रवाद सध्या रुजू पाहतो आहे. कुठे शिरोजी आणि कुठे श्रीनिवास जोशी! कुठे अंतोजी आणि कुठे नंदा खरे!
ब्रिटिश नंदी हेच प्रवीण टोकेकर आणि तंबी दुराई हेच श्रीकांत बोजेवार, असेही प्रवाद आजच्या बाविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रुजू पाहात आहेत! टोकेकर आणि बोजेवार हे अनुक्रमे ब्रिटिश नंदी आणि तंबी दुराई यांचे केवळ लेखनिक होते, हे आमचे मत जगजाहीर आहे. तंबी दुराई आणि ब्रिटिश नंदी एकविसाव्या शतकाच्या पूर्वर्धातील श्रेष्ठ राजकीय विनोद निर्मिती करणारे लेखक होते, हे आज सर्वांना विदितच आहे. असो.
हे वादाचे विषय आपण शिरोजीच्या बखरीच्या अकराव्या प्रकरणाकडे जाताना बाजूला ठेवू. या विषयांकडे आपल्याला परत परत यावे लागणार आहे. कारण तंबी दुराई आणि ब्रिटिश नंदी इतिहासकार आहेत की केवळ विनोदी लेखक आहेत, अशा एका वादाला आजच्या महाराष्ट्रात तोंड फुटू पाहते आहे. असो.
२०२२च्या डिसेंबर महिन्यात गुजरात आणि हिमाचल प्रदेशात राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका जाहीर झाल्या. गुजरात हे तत्कालीन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे स्वतःचे राज्य. त्यामुळे या निवडणुकीला भलतेच महत्त्व प्राप्त झाले होते. गुजरातमध्ये मोदी हरले, तर ‘मोदी-मॅजिक’ संपले आहे, असे सर्वांना कळून चुकणार होते. मोदींच्या या पराभवाचे सर्वगामी परिणाम २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीवर होणार होते.
आजच्या बाविसाव्या शतकातील सामान्य वाचकाला नरेंद्र मोदी कोण, हे माहीतही नाही. त्या वाचकाला या देशात दहा वर्षांसाठी ‘मोदी-मॅजिक’ नावाची वावटळ येऊन गेली होती, हे समजून घेणे थोडे अवघड पडणार आहे. आज बाविसाव्या शतकातील जगतात एक महान शांतिदूत म्हणून राहुल गांधी हे जगप्रसिद्ध आहेत. त्यांचे हे मोदी महाशय विरोधक होते, ही फार मौजेची गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल. पुढे असे घडणार आहे, हे तत्कालीन भारतातील मोदीभक्तांना सांगितले असते, तर त्यावर कुणाचाही विश्वास बसला नसता. शिरोजी केवळ विनोदनिर्मिती करत आहे, असे या भक्तांना वाटले असते. किती प्रतिगामी वातावरणात शिरोजी लिहीत होता, याची कल्पना आजच्या वाचकाला येणार नाही.
श्रीमान मोदी हे भगवान विष्णूचे अवतार आहेत, अशी वदंता त्या काळी उठवली गेली होती आणि त्यावर मोदीभक्तांचा विश्वास होता, हे सांगितले तर आजच्या बाविसाव्या शतकातील वाचकाला फार मौज वाटेल. श्रीमान राहुल गांधी यांना हे मोदीभक्त ‘पप्पू’ म्हणजे कमी डोके असलेला म्हणत, हे वाचून आजच्या वाचकाला उद्वेग वाटल्याविना राहणार नाही. इतिहासाला अनेक उद्वेगजनक गोष्टींना साक्षी राहत राहत प्रवास कसा करावा लागतो, याचा अंदाज वाचकांना यावरून यायला हरकत नाही. असो.
आम्ही आता फार उशीर न करता वाचकांच्या हाती बखरीचे अकरावे प्रकरण ठेवत आहोत. मोदीभक्त अविनाश, अच्युत आणि नाना यांचा मनोहारी संवाद घडतो आहे, लोकशाहीचे भक्त भास्कर, समर आणि पांडेजी यांच्यामध्ये! - श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
शिरोजीची बखर : प्रकरण अकरा
दुर्गाप्रशाद दुबेजी आपल्या ठेल्यावर काम करत होते. भास्कर आणि समर नुकतेच आले होते. दुर्गाप्रशाद दोन चहा आणि एक प्लेट भजी घेऊन आले. त्यांनी तो सर्व ऐवज टेबलावर ठेवला. ते स्वतः खुर्ची ओढून बसले.
पांडेजी - कहिए भास्करबाबू क्या होगा गुजरात में?
भास्कर – ‘बदलाव’ होणार असे मला वाटते आहे.
पांडेजी - आपको सचमुचमें लगता हैं?
समर - विरोधकातल्या फुटीमुळे शेवटी मोदीच येणार.
पांडेजी - उत्तर प्रदेश में भी वहीं हुआ. मायावती और ओवैसी ने विरोधकोंका सारा खेल बिगाड़ दिया. ये लोग अखिलेशके वोट नहीं काटतें, तो पचास सीटें बढ़ जाती समाजवादी पार्टी की!
(मायावती या तत्कालीन दलितांच्या नेत्या होत्या आणि असदुद्दीन ओवैसी, हे तत्कालीन मुस्लीम पक्षाचे नेते होते. हे दोघे म्हणजे भाजपची ‘बी टीम’ होती, असा संशय होता आणि आहे. आपण ज्यांचे नेते आहोत त्यांचेच नुकसान करत करत या दोघांनी आपला स्वार्थ साधला, असे म्हटले जाते. - संपादक)
तेवढ्यात एक नवी कोरी स्कॉर्पिओ गाडी येऊन थांबली. त्यातून नाना, अविनाश आणि अच्युत उतरले.
पांडेजी - (उठत) आईए आईए नानाजी!
नानांकडे आता नवीकोरी स्कॉर्पिओ आली होती. नानांनी साध्या स्लीपर घालून जन्मभर राष्ट्रकार्य केले होते. नानांच्या आयुष्यात श्रीमंती येईल असे त्यांच्यासकट कुणाला वाटले नव्हते. आता त्यांची अविवाहित मुलगी ऑस्ट्रेलियामधील भारतीय कॉन्शुलेटमध्ये ‘मानद’पदावर ‘नियुक्त’ झाली होती. त्यांचा आता एक मोठा पेट्रोल पंप होता. नाना अनेक धनिकांची मंत्रालयात आणि अगदी दिल्लीमध्येही कामे करून देतात, अशी वदंता पसरली होती. माणूस श्रीमंत झाला की, अशा अफवा म्हणा किंवा बातम्या पसरतातच. माणूस भ्रष्टाचार करूनच श्रीमंत झाला आहे, असे आपण पुराव्याशिवाय कसे म्हणावे? पण तरीही निसरलस नानांच्या आयुष्यात एवढी श्रीमंती एकदम कशी आली, हा विचार नाही म्हटले तरी आपल्या मनात येत राहतोच!
नाना खाली उतरले. त्यांच्या पांढऱ्या ड्रेसमधील ड्रायव्हरने एक शुभ्र भट्टी केलेला टॉवेल खुर्चीवर आणून ठेवला.
भास्कर आणि समर बघतच राहिले.
अविनाश खूप एक्साईट झाला होता.
अविनाश – या वेळी गुजरात इलेक्शनवर पैज घेण्याची हिंमत नसेलच तुमच्यात.
भास्कर - का?
अविनाश - सगळ्या मोठ्या ‘ओपिनियन पोल्स’वाल्यांनी भाजपला १२० ते १४० जागा मिळणार, असं सांगितलं आहे.
समर – ‘आम आदमी पार्टी’च्या सभांना गर्दी होते आहे.
अविनाश - तीच तर गंमत आहे. आम आदमी पार्टी काँग्रेसची मतं खाणार. काँग्रेस ४२ टक्के मतांवरून वीस टक्क्यांवर येणार.
अच्युत - आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या भांडणात भाजपचा लाभ!
अविनाश - आम आदमी पार्टी ही भाजपची ‘बी टीम’ आहे. काय नाना?
नाना गालातल्या गालात हसले.
भास्कर - मी असं ऐकलंय की, आम आदमी पार्टी ही काँग्रेसची ‘बी टीम’ आहे.
अविनाश - (चिडत) जर आम आदमी पार्टी काँग्रेसची मतं खाणार असेल, तर ती काँग्रेसची ‘बी टीम’ कशी असेल?
भास्कर - काँग्रेसने ग्रामीण भाग सांभाळायचा आणि आम आदमी पार्टीने शहरी भागात भाजपला शह द्यायचा, अशी आखणी झाली आहे.
अविनाश - पण ‘ओपिनियन पोल्स’वाले तसं काही म्हणत नाहियेत.
भास्कर - हे बघ, ‘ओपिनियन पोल्स’ नेहमी चुकत आलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये हे लोक चुकले. ‘हंग असेंब्ली’ होणार असे म्हणाले हे लोक आणि ‘ममता दीदी लॅंडसलाईड’ बघितली आपण. उत्तर प्रदेशात ‘हंग असेंब्ली’ म्हणाले बहुतेक लोक आणि शेवटी योगीमामा आले.
अविनाश - तू योगीमामा म्हणू नकोस त्यांना. ते काही मामा नाहियेत तुझे. भारताचे भाग्यविधाता आहेत ते!
भास्कर - (दुर्लक्ष करत) पंजाबमध्ये आपला चाळीस जागा मिळणार म्हणाले, त्यांना ९२ मिळाल्या.
अच्युत - या लोकांचं काही खरं नसतं. सगळे पैसे खाऊन सर्व्हे करतात.
समर - (हसत) या वेळी गुजरातमध्ये भाजप येणार म्हणतायत ते.
अविनाश - हे बघ गुजरात हे युगपुरुष मोदीजींचं राज्य आहे. त्यांना काही गरज नाही ‘ओपिनियन पोल्स’वाल्यांना पैसे खाऊ घालायची. काय नाना?
नाना गालातल्या गालात हसले. पांडेजींनी भजी समोर ठेवली होती. नाना चर्चा ऐकत ऐकत भजी खात होते. त्यामुळे गालातल्या गालात हसताना नानांचे गोरे गोरे गाल गोबरे गोबरे दिसत होते.
अविनाश - सगळ्या ‘ओपिनियन पोल्स’वाल्यांचं म्हणणं आहे की, आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेस एकमेकांशी लढून मरणार!
अच्युत - असं कसं होईल? आम आदमी पार्टी दोघांचीही मतं खाईल.
अविनाश - खाईल नं, पण भाजपची दोन-चार टक्के खाईल आणि काँग्रेसची २० टक्के मतं खाईल. भाजपला गेल्या वेळी ४७ टक्के मतं होती, ती या वेळी ४४ टक्के होतील आणि काँग्रेसच्या ४२ टक्के क्क्यांची २२ टक्के होतील.
अच्युत - म्हणजे सगळा खेळ खलास!
अविनाश - म्हणून तर रेकॉर्ड ब्रेक १४५ जागा भाजपला मिळतील. काँग्रेस ३०, आम आदमी २ ते ४ आणि बाकीचे निर्दलीय.
समर - पण आम आदमी पार्टीनं दोघांचीही दहा-दहा टक्के मतं खाल्ली तर?
भास्कर - (हसत) ‘हंग असेंब्ली’!
अविनाश - शक्य नाही. ‘ओपियन पोल्स’वाले असं कसं चुकतील?
भास्कर - बंगालमध्ये कसे चुकले होते? तेव्हा तू नाचत होतास ‘बीजेपी दो सौ पार’ म्हणून. (हसत) शेवटी ‘ममता दीदी दो सौ पार’ झाल्या.
अविनाश - त्या बंगाल्यांचं काही सांगू नकोस. भंगार लोक आहेत ते. त्यांना मुसलमान व्हायचं असेल तर होऊ दे.
भास्कर - विषय बंगाली मतदारांचा चालू नाहिये. ‘ओपिनियन पोल्स’ चुकले, त्याचा विषय चालू आहे.
अच्युत - कधी कधी चुकणार की ते!
भास्कर - तेच म्हणतोय मी. नेमके या वेळी चुकले तर काय करायचं?
नाना - शक्य नाही! मोदी पंतप्रधान आहेत. गुजराती लोकांना अभिमान आहे त्याचा.
भास्कर - गेल्या वेळीसुद्धा ते पंतप्रधान होते, तेव्हा काँग्रेसने जवळ जवळ मारली होती इलेक्शन.
नाना - अहं, त्या नंतर कामं किती झाली आहेत गुजरातमध्ये!
भास्कर - कामं वगैरे काही झाली नाहियेत. भारतभर रस्ते तसेच आहेत पूर्वीसारखे. हॉस्पिटल्स होती तशीच आहेत पूर्वीसारखी.
समर - उलट महागाई किती वाढली आहे!
अविनाश - महागाईचा सगळा पैसा राष्ट्रकार्यासाठी खर्च होतो आहे. लोक खुश आहेत महागाईवर.
अच्युत - अजिबात नाही हं! मी नाही खुश. आजकाल बाहेर पडलं की, हजार रुपयांची नोट उडते. काय चाललंय काय या देशामध्ये? मोदीजी असताना महागाई होतेच कशी या देशात? …म्हणजे मी मत मोदीजींनाच देणार आहे. पण मी महागाईवर खूश नाही.
अविनाश - तू गप रे!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अच्युत - मी ‘अखंड भारत’ व्हावा म्हणून मोदीजींना मत दिलं. खूप दिवस झाले बालाकोट नाही, गलवान नाही. काही नाही. या रेटने तुम्ही ‘अखंड भारत’ कधी करणार आहात?
नाना - हळूहळू होतात या गोष्टी.
अच्युत - १४ साली मला मेसेज आला होता की, मोदीजी पंतप्रधान झाले की, तीन दिवसांत आपल्या फौजा लाहोरमध्ये जाणार म्हणून. आज आठ वर्षं झाली काही नाही झालं.
भास्कर - महागाई झाली की!
अविनाश - ३७० कलम गेलं.
अच्युत - तू एक प्लॉट घेऊन दाखव श्रीनगरमध्ये.
अविनाश - माझ्याकडं पैसे नाहियेत. पाच लाख तरी लागतील.
भास्कर - (बॅगमधून चेकबुक काढून सात लाखाचा चेक लिहितो) हे घे सात लाख. श्रीनगरमध्ये प्लॉट घेऊन दाखवायचा.
समर - तू आणि नाना जा श्रीनगरला. व्हिडिओ कॉल करून तिथल्या लोकांशी डील करत आहात, हे दाखवा आम्हाला.
अविनाश - मला असले मोदी विरोधकांचे पैसे नकोत.
समर - (जोरात हसतो.) ही अवस्था आहे!
भास्कर - श्रीनगरमध्ये प्लॉट नाही आणि लाहोरमध्ये सैन्य नाही. उलट मोदीजी लाहोरला जाऊन बिर्याणी खाऊन आले.
अविनाश - (अत्यंत चिडून) खोटं आहे हे.
समर - काय खोटं आहे? गेले नाहीत मोदीजी लाहोरला?
अविनाश - गेले होते. पण त्यांनी मटण बिर्याणी खाल्ली नाही. व्हेज बिर्याणी खाल्ली.
भास्कर - आम्ही कुठं म्हणालो की, मोदीजींनी मटण बिर्याणी खाल्ली म्हणून?
अविनाश - तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, त्यावरून तसंच वाटत होतं.
समर - मटण बिर्याणी न खाता व्हेज बिर्याणी खाल्ली म्हणजे लाहोरमध्ये सैन्य नेल्यासारखं झालं का ते?
भास्कर - विषय का टाळतो आहेस?
अविनाश - मोदीजी आहेत म्हणून पाकिस्तान येत नाहिये.
समर - गेल्या सत्तर वर्षांत मोदीजीच होते का?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पांडेजी - मैं क्या कह रहां हूँ, ये ‘अखंड भारत’ वगैरा दूर की बातें हैं. आज गुजरात में क्या हो रहां हैं ये देखो ना!
नाना - बरोबर आहे.
पांडेजी - मुझे क्या लग रहां हैं की, धीरे धीरे ‘मोदी मैजिक’ खत्म होता जा रहां हैं.
भास्कर - खरं आहे.
पांडेजी - उत्तर-प्रदेश में मायावती ओर आवैसी अखिलेशजी के वोट नहीं काटते, तो भाजपा को बहुमत मिलता मुश्किल था.
अविनाश - केजरीवाल इथंसुद्धा काँग्रेसचीच मतं खाणार फक्त. केजरीवालने दिल्लीमध्येसुद्धा फक्त काँग्रेसची मतं खाल्ली. भाजपची ३५ टक्के टक्के मतं जशीच्या तशी आहेत दिल्लीमध्ये.
(अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि नेते होते. या काळात फक्त मोदीजींना ‘मोदीजी’ म्हणायची पद्धत होती. बाकी केजरीवाल आणि राहुल यांना ‘अरे-तुरे’ केले जायचे. हे योग्य नव्हते, पण ही पद्धत होती हे खरे. - संपादक)
भास्कर - हो, भाजपची मतं दिल्लीमध्ये कायम आहेत, पण दिल्ली विधानसभेत भाजप ७०पैकी आठ जागांवर आलं त्याचं काय?
अविनाश - गुजरातमध्ये तसं नाही होणार!
भास्कर - का नाही होणार?
अविनाश - तू गप रे!
अच्युत - केजरीवालनं वीज फुकट दिली, पाणी फुकट दिलं म्हणून तसं झालं. पंजाबमध्येही तेच झालं.
समर - गुजरातमध्येही तो वीज आणि पाणी फुकट देणार आहे.
भास्कर - आणि जे देईन असं केजरीवाल म्हणतो तो ते देतो. मोदीजींसारखं नाही, ‘बोलाचा भात आणि बोलाची कढी’!
अविनाश - तू गप रे! मोदीजी फिरवतील सगळी परिस्थिती.
भास्कर - मोदीजी सगळी परिस्थिती फिरवू शकतात, तर मग दिल्ली आणि पंजाब का नाही फिरवू शकले ते?
अविनाश - भंगार लोक आहेत दिल्ली आणि पंजाबमधले.
समर - मघाशी तू बंगाली लोकांना ‘भंगार’ म्हणाला होतास.
भास्कर - म्हणजे मोदीजींना पाडलं की, ते लोक भंगार का?
अविनाश - मोदीजींना कुणीही पाडू शकत नाही. पडलं तर भाजप पडेल, पण मोदीजी पडणार नाहीत.
(त्या काळात भक्त लोकांमध्ये अशी आचरट वाक्ये बोलण्याची पद्धत होती. काहीही झाले तरी हार मानायची नाही, अशा मनोवृत्तीमुळे अशी वाक्ये बोलली जात. तत्कालीन अर्थमंत्री निर्मला सीतारामनसुद्धा अशी वाक्ये बोलत, हे ऐकून आजच्या वाचकांना आश्चर्य वाटेल. डॉलरच्या संदर्भात रुपया पडला, तेव्हा ‘रुपया पडलेला नाही डॉलरवर गेला आहे’ असे दिवाळखोर वाक्य या दिव्य श्रीमतीजी बोलल्या होत्या. आणि तेसुद्धा न्यू यॉर्कमधील प्रेस कॉन्फरन्समध्ये. सगळ्या जगाची करमणूक झाली - संपादक)
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पांडेजी - (नानांकडे बघत) नानाजी मैने सुना हैं की, संघ बहुत खफा हैं मोदीजी से. गुजरात में अठ्ठाइस सीटें प्रॉब्लेम हैं बीजेपी की. इन सीटों पर संघ मदत नहीं करेगा बीजेपी की!
नाना - ऐसा कुछ नहीं है! सब स्वयंसेवक जी जान लगाकर मोदीजी को जिताने में लगे हैं. एक दिल से!
भास्कर - शिवाय, भाजपने ३८ सिटिंग आमदारांची तिकिटं कापली. त्यातल्या १९ आमदारांनी बंड केलं आहे. अपक्ष म्हणून उभे आहेत ते.
समर - ते नाही का भाजपची मतं खाणार?
अविनाश - त्यांनी मोदीजींना सोडलं आहे. त्यांचा खेळ खलास झाला आहे. मोदीजी १४० घेणार. संपला विषय!
नाना – अरे, हे लोक अगदी निवडून जरी आले, तरी त्यांना भाजपमध्ये परत घेता येईलच की!
भास्कर - खरं आहे, त्यांना जे काही पैसे पाहिजे आहेत, ते दिले की येतील ते!
समर - ब्लॅकमध्ये द्यावे लागतात ना हे पैसे?
भास्कर - ५० खोके एकदम ओक्के!
अविनाश - गप्प बस! नोटबंदीनंतर काळा पैसा संपला आहे.
अच्युत - काही संपला नाहिये. परवा मी एक शॉप बघायला गेलो, तर बिल्डर म्हणाला ३० टक्के पैसे ब्लॅकमध्ये द्यावे लागतील. त्याला मी म्हटलं की, नोटबंदीनंतर काळा पैसा संपला आहे.
भास्कर - (हसत) मग काय म्हणाला तो?
अच्युत - तो म्हणाला शॉप खरंच घ्यायचं असेल, तर बसा नाहीतर बाहेर व्हा!
अविनाश - तू जातोच कशाला असल्या बिल्डर्सकडे?
अच्युत - (विषय बदलत) पण हे बंड केलेले लोक निवडून येतील?
भास्कर - नाही आले तर नाही आले. त्यांनी नुसती मतं खाल्ली भाजप तरी खूप आहे.
पांडेजी - मैं थोडे बहुत यू-ट्यूब के चॅनेल्स देखता रहता हूँ. उनका कहना हैं की, हिंदुत्व की हांडी को चूल्हे पर पहले जैसे चढ़ नही रहीं हैं गुजरात में! लोग महंगाई की बातें कर रहें हैं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
भास्कर - सीएसडीएस सर्व्हे म्हणतोय की, गेल्या वेळी फक्त १३ टक्के लोकांना महागाई हा सर्वांत महत्त्वाचा विषय वाटत होता आणि या वेळेस ५१ टक्के लोकांना तो सगळ्यात महत्त्वाचा विषय वाटतो आहे.
अविनाश - बकवास सर्व्हे आहे तो.
भास्कर - पण असं असलं तरी मोदीजींना १४० जागा मिळणार आहेत, असं म्हणतो आहे हा सर्व्हे. वोटस् स्प्लिट झाल्यामुळे!
अविनाश - मग ठीक आहे.
भास्कर - बेरोजगारी हा विषय १२ टक्के लोकांना महत्त्वाचा वाटत होता, आता १९ टक्के लोकांना महत्त्वाचा वाटतो आहे.
अविनाश - वाटू दे ना!
भास्कर – अरे, म्हणजे सत्तर टक्के लोकांना आता आर्थिक विषय महत्त्वाचे वाटू लागले आहेत. वाटू दे काय? लोक मतं नाही देणार तुम्हाला अशानं.
पांडेजी - आप समझ नहीं रहें हैं अविनाशजी. उनका कहना ये हैं की, अगर सत्तर प्रतिशत लोगों का मन अगर आर्थिक विषयों की तरफ मुड़ा हैं, तो हिंदुत्व की हांडी चूल्हे पर चढाना मुश्किल हो जाएगा.
भास्कर - असं झालं तर फार गोंधळ होईल.
पांडेजी - मैंने सुना हैं की, आज की गुजरात में न राष्ट्रवाद चल पा रहा हैं, ना काँग्रेस पर अल्पसंख्यांकपरस्त होने के आरोप चल रहा हैं.
नाना - हिंदुत्व की हांडी नही हैं ये! हिंदुत्वका सूरज हैं ये! और ये सूरज अब गुजरात में डूबनावाला नहीं हैं.
अविनाश - आणि विकाससुद्धा खूप झालाय गुजरातमध्ये. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणत होते एका मीटिंगमध्ये की, गुजरात असाच धावत राहिला तर एकटा गुजरात अमेरिका, चीन आणि युरोप अशा तिघांनाही मागे टाकेल.
भास्कर - तुला कसं कळलं?
अविनाश - व्हॉट्सअॅप मेसेज आला होता.
(काही भंपक लोकांना वर्तमानपत्रात छापून आलं की, ते खरं आहे असं वाटतं. त्याचप्रमाणे त्या काळी अंधभक्तांना व्हॉट्सअॅपमधले सगळेच मेसेजेस खरे वाटायचे. मोदीकालीन भारतात वैचारिक दिवाळखोरी सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. - संपादक)
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
समर - गुजरातमध्ये खूप विकास झाला आहे, तर मग महाराष्ट्रातून तीन-तीन लाख कोटी रुपयांचे प्रोजेक्टस् का पळवावे लागतायत?
नाना - ते प्रोजेक्ट शिवसेनेच्या लोकांनी खंडणी मागितली म्हणून गेले गुजरातला.
भास्कर - हो का? मग तसं होतं तर भाजपचं सरकार सत्तेत आल्यावर का गेले हे प्रोजेक्ट गुजरातमध्ये?
अच्युत – हो, हे बरोबर आहे. सेना खंडणी मागत होती, तर भाजपवाले सत्तेत आल्यावर का गेले, हे प्रोजेक्ट्स? सेनेचं सरकार होतं, तेव्हा का नाही गेले?
अविनाश - तू मोदीजींच्या विरोधात का बोलतो आहेस? तूसुद्धा गद्दार झाला आहेस का?
अच्युत - यात मोदीजींच्या विरोधात काय आहे? प्रोजेक्ट्स भाजपचं सरकार आल्यावर गेले, हे खरं आहे, एवढंच म्हटलं आहे मी.
नाना – अरे, हे महत्त्वाचे निर्णय असतात. विचारपूर्वक घ्यावे लागतात.
भास्कर – ‘गुजरात मॉडेल’ यशस्वी झालं आहे, तर गुजरातमधल्या बेकारांवर इम्प्रेशन मारण्यासाठी महाराष्ट्रातले प्रोजेक्ट न्यायला लागतायत तिकडे?
अविनाश - तुम्ही कितीही बोंबला - आयेगा तो मोदीही.
पांडेजी - मैंने सुना हैं की, नोटबंदी और जीएसटी के चलते सूरत के व्यापारियों में बदहवासी का माहौल हैं.
समर - काल सूरतला मोदी-रॅलीमध्ये ‘केजरीवाल जिंदाबाद’ अशा घोषणा झाल्या.
नाना - चार पोरं-टोरं ओरडली म्हणून काही फरक पडत नाही.
अविनाश - तुम्ही कितीही नाचा आता शेवटी केजरीवाल काँग्रेसची मतं खाणार आणि निवडून येणार आम्हीच!
भास्कर - उत्तर-प्रदेशात मायावती आणि ओवैसी यांनी मतं खाल्ली म्हणून तुम्हाला पन्नास जागा मिळाल्या. नाहीतर सगळं संपलं होतं. आता गुजरातमध्येसुद्धा केजरीवाल काँग्रेसची मतं खाईल म्हणून देव पाण्यात घालून बसला आहात तुम्ही!
समर - असं कुबड्या घेऊन किती दिवस जिंकून येणार आहात?
भास्कर – ‘मोदी-मॅजिक’ संपलं आहे.
अविनाश - आयेगा तो मोदीही!
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
भास्कर - दर्शन देसाई नावाचे ‘इंडियन एक्सप्रेस’चे जुने संपादक आहेत. ते म्हणत होते की, ‘हंग असेंब्ली’ व्हायची खूप शक्यता आहे.
समर - मयूर जानी नावाचे पत्रकार आहेत ते म्हणत आहेत की, सौराष्ट्रात कोळी-ठाकूर आहेत, ते खूप चिडले आहेत.
अविनाश - त्यांना कोण विचारतो?
भास्कर - मयूर जानी म्हणत होते की, ज्या पक्षाकडं हे कोळी-ठाकूर जातात, त्याला सौराष्ट्रात बहुमत मिळतं.
समर - शिवाय पाटीदार समाज चिडला आहे.
नाना - असे खूप लोक चिडतात.
समर - राजकोट या एका जिल्ह्यात मोदींना चार वेळा जावं लागलं.
नाना - शहरी भाग मोदीजींच्या मागे उभा आहे, तोपर्यंत चिंता नाही आम्हाला.
भास्कर - दर्शन देसाई म्हणत होते की, केजरीवाल शहरी भागातल्या गरीब लोकांना आकर्षित करू लागला आहे. रिक्शावाले, ठेलेवाले, बस कंडक्टर सगळ्यांना केजरीवालचं आकर्षण वाटू लागलं आहे.
समर - म्हणजे आता केजरीवाल भाजपची मतं खायला लागला असं म्हणावं लागेल.
पांडेजी - केजरीवालजी बोले की, नोटोंपर लक्ष्मीजी और गणेशजी की प्रतिमा चढ़ानी चाहिए. ये केजरीवालजी तो मोदीजी से बड़े हिंदू बनते चले जा रहें हैं.
अविनाश - हा कसला हिंदू? केजरीवाल हा देशद्रोही, आतंकवादी आहे.
भास्कर - मघाशी, ‘केजरीवाल हा आमची ‘बी टीम’ आहे’ असं म्हणत होतास तू.
समर - म्हणजे, सत्ता मिळावी म्हणून तुम्ही एका देहद्रोही आतंकवाद्याला टीममध्ये घेतलं आहे का?
अविनाश - तू गप रे.
समर - म्हणजे केजरी जेव्हा काँग्रेसची मतं खातो, तेव्हा तो तुमची ‘बी टीम’ असतो आणि जेव्हा तो तुमची मतं खातो, तेव्हा आतंकवादी असतो का?
अविनाश - आयेगा तो मोदीही!
पांडेजी - हमने सुना हैं की, संघ केजरीवालकी मदद कर रहाँ हैं!
नाना - नाही नाही. अजिबात नाही.
भास्कर - संघात अजूनही काही थोडे लोक असे आहेत की, जे प्रामाणिक आहेत. त्यांना वाढू लागलेला भ्रष्टाचार आवडत नाहिये. (या वाक्यावर भास्करने नानांच्या स्कॉर्पिओकडे नजर टाकली. नाना कावरेबावरे झाले.)
नाना - (सावरत) अजिबात नाही. सगळा संघ मोदीजींच्या मागे आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पांडेजी - बीजेपी का प्रॉब्लेम ये हैं की, महंगाई की वजह से हिंदुत्व की, हांडी पक नहीं रही हैं और अब उपरसे केजरीवाल हिंदू वोट खा रहां हैं!
अविनाश - भ्रष्टाचार मोडून काढलाय मोदीजींनी!
भास्कर - कसला मोडून काढला? आख्ख्या गुजरातभर दारू माफियाचे राज्य आहे.
अच्युत - हो हो, आमचा एक बॉस गेला होता, संपूर्ण गुजरातच्या टूरवर. तो जिथं जिथं गेला, तिथं तिथं दारू मिळाली, त्याला दारूबंदी असूनसुद्धा!
अविनाश - तू आता एकदा त्या राहुल गांधीला मत दे आणि बरबाद कर देशाला.
अच्युत - मी मत मोदीजींनाच देणार, कारण मी हिंदू आहे. महागाई वाढली आहे, बेकारी वाढली आहे, भ्रष्टाचार वाढला आहे, तरीही मी मत मोदीजींनाच देणार.
अविनाश - मग मध्ये मध्ये बोलू तरी नकोस निदान.
अच्युत - मी बोलणार! मी खरं बोलणार, कारण मी खरा हिंदू आहे.
पांडेजी - ये महंगाई मोदीजी का बेड़ा गर्क करा देगी एक दिन!
अविनाश - अजिबात नाही. इकॉनॉमी खूप जोरात पळते आहे.
पांडेजी - वो बाते आप लोग करते रहिए. लेकिन मुझे अब लगने लगा हैं की, जनमानस में कुछ तो पक रहा हैं आजकल. और जो पक रहां हैं वो बीजेपी के लिए अच्छा नहीं हैं.
भास्कर - १७ सालच्या इलेक्शनमध्ये ७ जागांवर मार्जिन १०००पेक्षा कमी होतं, ३५ जागांवर मार्जिन ५००० पेक्षा कमी होतं.
समर - आणि आज ७० टक्के लोकांना आर्थिक विषय महत्त्वाचे वाटू लागले आहेत. महागाई वाढली आहे. या सगळ्या कमी मार्जिनवाल्या जागा भाजपकडून जाऊ शकतात.
पांडेजी - आपको लग रहां हैं, इतनी ये इलेक्शन इजी नहीं हैं बीजेपी के लिए.
भास्कर - काहीतरी गोंधळ उडणार आहे गुजरातमध्ये!
पांडेजी – ‘4 PM इंडिया’ के संजय शर्मा बता रहें थे की, मूर्खोंका एक तबका ऐसा हैं भारत में की जिसने व्हॉट्सअॅप और फेसबुक की अफीम चाटी हैं. ये मूर्ख लोगोंका तबका खडा रहेगा मोदीजी के साथ!
भास्कर - शक्य आहे!
समर - बिल्किस बानोवर रेप करणाऱ्या लोकांना सरकार सोडून देतं आणि हे लोक टाळ्या वाजवतात!
अच्युत - नक्कीच चुकलं ते सरकारचं!
नाना - पण तरीही तू मत मोदीजींनाच देणार आहेस ना?
अच्युत - प्रश्नच नाही.
भास्कर - मजा अशी आहे की, सगळे अच्युतसारखे नाहियेत. या समाजाचा एक मोठा भाग असा आहे की, ज्याला कळलेले आहे की, आपल्याला फसवलं गेलं आहे. फक्त तो भीतीमुळे बोलत नाहिये.
अविनाश - मोदीजींनी कुणालाही फसवलेलं नाहिये. अतिशय सरळ मनाचे आहेत ते. तुमच्यासारखे देशद्रोही सोडले तर बाकी सगळे खुश आहेत.
समर - गुजरातच्या आदिवासी भागात तर ‘जल-जंगल-जमीन’ हा आदिवासी लोकांचा इश्यू आहे. नर्मदा प्रोजेक्टमुळं यावर भाजपकडे उत्तर नाहिये.
अविनाश - आम्ही एका आदिवासीला राष्ट्रपती केलंय की.
भास्कर – अरे, त्यांच्या जगण्याची गोची झाली आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पांडेजी - मैने सुना हैं की सौराष्ट्र रीजन में आम आदमी पार्टी बीजेपी से बारा सीटें छीन रहीं हैं.
अविनाश - उत्तर-प्रदेशच्या वेळी असंच बोलला होतात तुम्ही. इकडे अखिलेशच्या इतक्या सीट्स येणार आणि तिकडे त्याच्या तितक्या सीट्स येणार. आला शेवटी मोदीच!
अच्युत - पैज लावा ना दोघं!
अविनाश - मागच्या वेळेसारखं करू. आम्ही जिंकलो तर तुम्ही दोन प्लेट भजी द्यायची. तुम्ही जिंकलात तर आम्ही एक प्लेट भजी देणार.
नाना – या वेळी भजी नको, बटाटा वडा ठेवा.
पांडेजी - चलो ठीक हैं आप जीते तो हम चार प्लेट वडा देंगे और हम जीते तो आप दो प्लेट वडा देना.
नाना - बुरा मत मानना पांडेजी आपको चार प्लेट देनी पड़ रही हैं क्यों की, आपका ५० टके का मार्जिन रहता हैं हर प्लेट पर.
पांडेजी - मोदीजी की कृपा से इतना मार्जिन नही बचा हैं अब. गैस का कर्शियल सिलिंडर २००० पार हो चुका हैं. फिर भी ठीक हैं, हमे मंजूर हैं शर्त!
नाना - (खुश होत) मागच्या वेळी आणली तशी इमरतीसुद्धा आणा जौनपुरवाली.
पांडेजी - हम इमरती लाए थे क्यों जीते-हारे कोईभी, हमेशा लोकशाही जीतती हैं. इसलिए इसबार जीते-हारे कोईभी, चितले बंधू की जिलेबी आप लाईएगा! दो किलो जिलेबी लोकशाही के नाम!
नाना - नहीं, नहीं हम नहीं लाएंगे जिलेबी! क्यों की, हमे सिर्फ बीजेपी के जीतने में मजा हैं. लोकशाही के जीतने और हारने में हमें बिल्कुल मजा नहीं हैं! लोकशाही हारेगी तो भी चलेगा, बीजेपी अवश्य जीतनी चाहिए.
अविनाश - (टाळ्या वाजवत) अगदी योग्य बोललात नाना! लोकशाही टिकण्यापेक्षा भाजप निवडून येणं महत्त्वाचं आहे! लोकशाही गेली खड्ड्यात!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
बखरीच्या शेवटच्या दोन वाक्यातील क्रूरता बाविसाव्या शतकातील वाचकाला हादरवून गेली असेल. आपल्याला आज शंभर वर्षांनंतर या वाक्यांचा इतका त्रास होत असेल, तर ही वाक्ये बोलली जात असताना शिरोजीच्या संवेदनशील मनाला किती वेदना होत असतील, याचा आज विचारही करवत नाही.
काही लोकांना स्वार्थ हाच न्याय आहे असे वाटते. हे लोक इतिहासाच्या प्रगतिशील प्रवाहातले अतिप्रचंड पाषाण असतात. इतिहास या लोकांना कधीच माफ करत नाही.
अतिशय विषण्ण अशा मनःस्थितीत आम्ही हे संपादकीय संपवत आहोत.
हे वाक्य लिहिताना या बखरीच्या संवादातील विनोद आम्हाला खुणावतो आहे आणि मोठ्या कारुण्याने आमच्या मनातील विषण्णतेवर फुंकर घालतो आहे. - श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment