जयंत पवार हा समकालीन मराठी साहित्यातला ‘अनन्यसाधारण’ आणि ‘जागल्या लेखक’ होता...
ग्रंथनामा - झलक
गणेश विसपुते
  • ‘रंगकथा’ या गौरवग्रंथाचं मुखपृष्ठ
  • Mon , 28 November 2022
  • ग्रंथनामा झलक रंगकथा Rangkatha जयंत पवार Jayant Pawar

आपल्या आगळ्यावेगळ्या कथनतंत्राने आणि आविष्कारशैलीने मराठी कथेत मोलाची भर घालणारे कथाकार आणि वैशिष्ट्यपूर्ण नाटकं लिहिणारे नाटककार जयंत पवार यांचा २९ ऑगस्ट २०२२ हा पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘रंगकथा : जयंत पवार स्मृतिग्रंथ’ हे पुस्तक गणेश विसपुते, संध्या नरे-पवार, मुकुंद कुळे, समर खडस यांच्या संपादनाखाली प्रकाशित झाले आहे. लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालेल्या या स्मृतिग्रंथाला संपादक मंडळाच्या वतीने गणेश विसपुते यांनी लिहिलेले हे संपादकीय…

.................................................................................................................................................................

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर, २२ डिसेंबर १८४९ रोजी फ्योदोर दस्तयवस्कीला बंदूकधारी जथ्यासमोर हात बांधून उभं केलं होतं. काही क्षणांतच त्याला गोळ्यांनी उडवलं जाणार होतं. निकोलस झारच्या योजनेप्रमाणे अगदी शेवटच्या क्षणी त्याचा मृत्युदंड रद्द झाला आणि पुढे त्याला चार वर्षांच्या सश्रम कारावासासाठी सायबेरियात पाठवलं गेलं. अमानुष बर्फाळ सायबेरियातल्या हालअपेष्टांहूनही दस्तयवस्कीच्या मनात मरणाच्या दारातले हे क्षण कायमचे गोठले गेले. पुढे त्यानं त्याच्या ‘इडिअट’ या कादंबरीत एका पात्राद्वारे तो क्षण पुन्हा जागवला. तेव्हा ते पात्र म्हणतं, ‘यापुढचा प्रत्येक क्षण मी युगासारखा वापरीन, वेळ अजिबात वाया जाऊ देणार नाही, प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवून तो जगेन.’

जयंतच्या अखेरच्या दिवसांत मला या वाक्याची आठवण होत होती. थोड्या काळात तो नसणार आहे, याचं विकल करणारं सावट तर होतंच, पण जयंत त्या काळात ज्या घाईनं, ज्या निष्ठेनं, लेखकाच्या ब्रीदाला जागून लेखक असण्याची जी जी कामं करत होता, त्यांतून मला हेच प्रतीत होत होतं. एका मेसेजमध्ये तसं त्यानं लिहिलेलंही होतं. त्यानं सुरुवातीच्या काळात परिस्थितीमुळे आणि अखेरच्या काळात प्रकृतीमुळे जे सोसलं, ते विलक्षण होतं. त्यानं कधी त्याचा उच्चार केला नाही. पण मृत्यूविषयीचं चिंतन शाळकरी वयापासूनच तो करत होता, असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलेलं आहे. जीवनाचा असुंदरपणा त्यानं भरपूर पाहिलेला होता.

रोजच्या जगण्याच्या लढाईत लढणारी, पण पिचलेली माणसं तो पाहात होता. त्याची कळत्या वयापासूनच ‘आयुष्य शोकात्म आहे आणि प्रत्येक माणूस त्यात अडकलेला आहे अशी धारणा’ झाली होती. घरातल्या माणसांचे बरेच मृत्यू त्यानं शाळकरी वयापासूनच पाहिलेले होते. त्यामुळे त्याच्या अगदी शेवटच्या काही कथांपर्यंत मृत्यूविषयीचं चिंतन उमटत होतं. पाच नाटकं, चार कथासंग्रह, तीन एकांकिकांचे संग्रह, विचारोत्तेजक भाषणं, मुलाखती यातल्या संख्येपेक्षाही त्यातला मोठा मौलिक ऐवज तो मागे ठेवून गेला.

दीर्घ काळानंतर मराठीला असा लेखक सापडला होता, ज्याच्यात भविष्यात अजूनही विलक्षण साहित्य निर्माण करण्याच्या शक्यता होत्या. त्या अर्थानं त्याचं जाणं खूपच अकाली होतं. त्याला आणखी दहा-वीस वर्षं मिळती, तर मराठी साहित्य आणखी केवढं तरी लखलखीत आणि समृद्ध झालं असतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

जयंत अचानक सोडून गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोकांनी हळहळ व्यक्त केली. उत्स्फूर्तपणे त्याच्याविषयी लिहिलं गेलं. त्याच्यावर विशेषांक प्रकाशित झाले. त्याच्या साहित्याचा परामर्ष करणारं एक पुस्तकही अलीकडेच प्रकाशित झालं. एक वर्षानंतर त्याची स्मृती जागवताना त्याच्या कामाची, व्यक्तिमत्त्वाची आणि लेखक-वाचकांनी त्याला दिलेल्या प्रतिसादाची नोंद व्हावी, असं वाटल्यानं प्रस्तुत स्मृतिग्रंथाची योजना झाली. जयंत अनेक विधांमध्ये काम करत होता. तो कथाकार, नाटककार, नाट्यसमीक्षक, पत्रकार आणि सार्वजनिक जीवनातला चिंतनशील विचारक होता. पण वाचकांसाठी तो रंगभूमीवर लक्षात राहतील, अशी अर्थपूर्ण नाटकं लिहिणारा नाटककार आणि मराठी कथेचा परीघ प्रशस्त करणारा, आधुनिक कथेला नवी परिमाणं देणारा कथाकार म्हणून अधिक परिचित असल्यानं या पुस्तकाचं शीर्षक ‘रंगकथा’ असावं असं मुक्रर झालं.

स्थलांतरित होणाऱ्या, विस्थापित होणाऱ्या माणसांचे समूह आपल्या संस्कृतीतल्या संचिताची मूलद्रव्यं आपल्या रक्तातूनच घेऊन विस्थापित होत असतात. जयंतचं बालपण ज्या गिरणगावात गेलं, तिथल्या कष्टकऱ्यांच्या वस्तीत भजनं, सोंगी भारुडं, तमाशे-वग, शाहिरी कलापथकं, जाखडी नृत्यं, आंबेडकरी जलसे, दशावताराचे नमन-खेळे, कवाल्यांच्या जुगलबंदी हीच मनोरंजनाची साधनं होती. या कष्टकऱ्यांची मुळं मुंबईबाहेर दूरच्या लहान लहान ग्रामीण भागांत होती. मूळचे शेतकरी आणि शेतमजूर महानगरात कामगार म्हणून पोटापाण्यासाठी आले.

तुलनेसाठी जागतिक पातळीवरचं उदाहरण घ्यायचं तर, आफ्रिकनांचे जथे गुलाम म्हणून जेव्हा पश्चिमेत नेले गेले, तेव्हा त्यांना जहाजांवर कोंबड्या-मेंढ्यांप्रमाणे फळ्यांवर भरून नेलं गेलं होतं. अख्खा सारा प्रवास दाटीवाटीनं उभं राहून अत्यंत हालात केला जायचा. त्यात कुणी आजारी पडलं, मेलं तर त्याला जहाजावरून समुद्रात फेकून दिलं जात असे. यातून जे जगले-वाचले, त्यांनी गुलामीत जगतानाही आपल्या सोबत त्यांच्या आपल्या संस्कृतीतलं संचित सोबत नेलं होतं. त्यांचं संगीत, त्यांची चित्रकला, गाणी त्यांच्यासोबत होती. मग त्यांनी टीन्स, पत्रे, काठ्या जमेल त्या साधनांनिशी हे संगीत आणि गाणी नव्या ठिकाणीही सुरू केली.

आजच्या आफ्रो-अमेरिकन संगीतातल्या विविध रूपांत त्याचे आविष्कार आपल्याला दिसतात. गिरणगावासारख्या भागातल्या कष्टकऱ्यांनीही आपल्या संस्कृतीतलं हे संचित तिथं याच प्रकारे टिकवलं होतं. याचा जवळून परिचय जयंतला झालाच, पण ते त्यानं स्वत:च्या वाढीत स्मृतिसंचित म्हणूनही जपलं. याची अर्थात दुसरी बाजूही होती. विषमतेची कडूझार फळं तिथल्या प्रत्यक्ष जगण्यात त्याला दिसत होती. माणसांचं उद्ध्वस्त होत जाणं, ससेहोलपट, जागांचा-साध्या भौतिक सुखांचा अभाव यांनी एक प्रकारची जगण्याची उघडीवाघडी-भीषण बाजूही त्यानं पाहिली-अनुभवलेली होती. विशीबाविशीत असताना तो स्वत:ही गिरणीत काम करत होता. हे सगळं मनात टिपून ठेवलेलं आणि पुढे शिकताना, नवं जग धुंडाळताना, समजून घेताना अनेक गोष्टींचे अन्वय तो स्वत:च लावत गेला.

जगणं हे गूढ आहेच आणि अतर्क्यही आहे, ही गोष्ट त्याला उमजू लागली होती. आपण आपलंच - आपल्या अनुभवातलं, खास आपल्याच कल्पनाविश्वातलं असंच लिहायला पाहिजे, हे त्याला एका टप्प्यावर कळलं. आहे त्या परिस्थितीच्या कारणांच्या मुळाशी जाणं, शोध घेणं हे सुरू झालं. त्याच्या कथाविश्वात हे सगळं नेपथ्यासारखं आपल्याला दिसू शकतं, पण नेपथ्यापुढची मांडणी त्यानं स्वत:च्या वैचारिक वाढीतून केली होती. अस्सल लेखक म्हणून आवश्यक असलेली जीवद्रव्यं जयंतनं अशी आपल्या जगण्यातून, आसपासच्या वास्तवातून मिळवलेली होती. शिवाय अतिशय कष्टानं आणि सर्जकतेनं अर्जितही केली होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जयंतचं लेखन वाचताना लक्षात येतं की, त्यात मागील चार दशकांतल्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-आर्थिक उलथापालथीचा दस्तऐवज सामावलेला आहे. नेमका हा काळ जटिल, विखंडित होत गेलेला काळ आहे. आपल्या लेखनात आपला काळ, त्यातली व्यामिश्रता, पेच, गुंते, हवा, भलेपणा, क्रौर्य, भूगोल, राजकारण या सगळ्यांचा लेखाजोखा दस्तऐवजासारखा यायला पाहिजे हे जयंतला वाटे. हे सगळंच आहे, त्या वास्तवाच्या रूपात येत नाही. त्यासाठी लेखकाची म्हणून काही आयुधं असतात. वास्तवाचं उर्ध्वपातन, पुनर्मांडणी करून स्वत:च्या शैलीच्या भाषेत ते वेगळ्याच रूपात प्रत्यक्षात येतं, हेही त्याला माहीत होतं. ‘कल्पितही न दिसलेलं वास्तवच असतं’ हे त्याच्या लेखनातून त्यानं प्रभावीपणे पटवलेलं आहे.

दुसरीकडे, पटणाऱ्या न पटणाऱ्या गोष्टींना उलट बाजूंनीही पाहता येतं, सत्याला समजून घेताना विविध कोनांतून ते पाहाता येतं, असं त्याचं मत होतं आणि ते तो त्याच्या लेखनातून स्पष्टपणे मांडतही होता. माणसाचं आयुष्य रहस्यमय असतं आणि त्या रहस्याचा शोध लेखकानं सातत्यानं घ्यायचा असतो, हा ध्यास त्यानं अखेरपर्यंत बाळगला.

या काळात बेदरकारपणे वाढत गेलेल्या उघड्यावाघड्या बाजारवादी रेट्यात निर्दयतेनं तळाशी लोटत गेलेली, परिघाबाहेरच्या काळोखात फेकली गेलेली माणसं जगण्याच्या अतोनात धुमश्चक्रीनं बेजार झालेली आहेत, चंगळवादाच्या नशेत मश्गूल असलेल्या व्यवस्थेच्या ती खिजगणतीतही नाहीत - अशा माणसांचा लेखक म्हणून कैवार घेणं हे कर्तव्य मानत आपल्या लेखनानं त्यांचं प्रतिनिधित्व करणं हा आपला नैतिक हस्तक्षेप असला पाहिजे अशी जयंतची धारणा होती.

अधोविश्वात असणाऱ्या या लोकांच्या शोषणाची मुळं शोधणं, हे त्याला लेखक म्हणून कर्तव्य वाटत होतं. सत्तेच्या उतरंडीतली विद्रूप अमानुषता दिसल्यावर आणि ती तपासल्यावर ते लेखनात मांडताना आपण सर्वथा नवीन रूपात, आपल्या भाषेत ते मांडू शकतो का, याच्या शक्यता तो अभ्यासूपणे तपासत होता. त्याचं नातं बाबुराव बागूल, भाऊ पाध्ये यांच्याशी जुळत असलं तरी निवडलेल्या आशयाच्या कलानं अकृत्रिमपणे आपल्या घडवलेल्या भाषाभानासह तो लिहीत असल्यानं त्याच्या लेखनावर त्याची स्वत:चीच मुद्रा उमटू शकली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्याच्या सगळ्या कथांचा आणि नाटकांचा आढावा घेणं, हा इथं उद्देश नाही. अनेक लेखांमधून आलेला आहे आणि अनेकांनी इतरत्रही त्याच्यावर लिहिलेलं आहे. केवळ काही ठळक बिंदूंचा उल्लेख इथं करायचा आहे. जयंतच्या निव्वळ वैशिष्ट्यपूर्ण भाषेविषयी लिहायचं झालं तर असं दिसतं की, तो भाषेविषयी काटेकोरपणे जागरूक होता, याचं कारण त्याचं परंपरेतल्या साहित्याचं, समकाळातल्या भारतीय आणि विदेशी साहित्यातलं सूक्ष्म वाचन होतं.

बालपणापासून आसपास पाहिलेली भारूडं, जलसे, तमाशा, मेळे-कीर्तनं, संतवाङ्मय, विविध प्रांतांतून आलेल्या त्याच्या समूहातल्या लोकांच्या बोली, यांतून त्याचं भाषाभान समृद्ध झालेलं होतं. त्यामुळे त्याच्या लेखनात आशयातल्या कोणत्याही कोपऱ्यातले लहानसे आवाजही सहजपणे मुखर होत. याचं कारण भाषेच्या सगळ्या शक्यता वापरण्याचा तो कसोशीनं प्रयत्न करीत होता. त्याच्या कथेत अनेक आवाजांना स्थान असतं. ते ऐकू येतात, त्यांचं म्हणणं, त्यातल्या आवाजांचं अस्तित्व न्याय्य वाटतं.

‘कथक आणि श्रोता यांचा साक्षात संबंध असलेली आपली दीर्घ मौखिक परंपरा आहे, तिच्याकडे आपण अधिक गांभीर्यानं पाहायला पाहिजे,’ असं त्याचं म्हणणं होतं. मुंबईत एकेकाळी जवळपास १५५ भाषा होत्या. दीर्घकाळात अनेक वंश-धर्म-जातींच्या वास्तव्यानं मुंबई ही भाषांचं एक प्रकारे मिसळण-पात्र झालेली आहे. देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित कुटुंबं, पारशी, गुजराती, ख्रिश्चन, ज्यू, बेने इस्रायली, उत्तर भारतीय, पंजाबी, सटोडिये, बिल्डर, असे असंख्य प्रकारचे लोक इथं नांदतात. या ‘मेल्टिंग पॉट’चं त्याला भान होतं.

‘मोरी निंद नसानी होय’ ही मराठीतील एक उत्कृष्ट कथा आहे. त्यातली पात्रं नंदकिशोर, बिरजी, माई, नन्हे, बडकी, शबो ही उत्तर भारतीय आहेत. झगझगीत दुनियेच्या उजेडाच्या बाहेर काळोखात काकडणारे कष्टकरी तिथं आहेत. वेश्या आहेत, स्टेशनवरचे कामगार आहेत. या अनाम, निःशब्द, पिचलेल्या, हतबल लोकांची भाषा भोजपुरी, बिहारी आहे. ती चपखलपणे येते आणि कथेचा परिणाम गहिरा करते. बय, डिग्या, बाबी, धनू, या पात्रांच्या बोलीभाषेची विभिन्न रूपं आशयाच्या स्तराशी अतिशय वास्तविक जवळिकीनं आणि सहजपणे वापरलेली आपल्याला दिसतात.

त्याच्या लेखनात अधोविश्वातले लोक, भिकारी, भंगारवाले, वेश्या, कामगार, बेकार, व्यवस्थेतले अखेरच्या कडीतले शोषक-पोलीस वगैरे, चाळीतले-रस्त्यावरचे-फुटपाथवरचे सामान्य, सफाई कामगार, साहित्यविश्वातले, भांडवलदार, नगरसेवक-भाई-गुंड अशी असंख्य माणसं येतात आणि ती महानगराचा उभा काटछेद आपल्याला दाखवतात. त्या सगळ्यांनी स्वतःच्या आवाजात, स्वत: च्या स्वरांच्या पट्टीत त्यांची स्वत:ची भाषा बोलणं ही जयंत पवार या लेखकाची किमया आहे आणि ती त्यानं सजगपणे घडवलेली आहे.

नंतरच्या कथांमध्ये आपल्याला आणखी वेगळे प्रयोग केलेले दिसतात. त्याच्या कथांच्या दुनियेत अद्भुत, कल्पित, फॅन्टसी, इतिहास, असंगतता, गूढ, अतार्किकता आणि मिथकं येतात. त्यानं या मिथकांना डोक्यावर उभं केलं, ती उलटीपालटी केली, नवी मिथकं रचली. ते करताना आशयाला नेमकी अनुरूप भाषा वापरली. त्यात जुन्या मराठीचे नमुने आहेत, पोथ्या- पुराणांतल्या भाषेच्या वळणाची भाषा वापरलेली आहे. एक लेखक भाषेचा किती खोलवर विचार करून वैविध्यपूर्ण वापर करू शकतो, याची उदाहरणं जयंतच्या लेखनात आपल्याला सर्वत्र सापडतील.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जयंत पवार या कथाकार, नाटककार, पत्रकार, विचारकाच्या लेखनातील सगळ्या वैशिष्ट्यांचा उल्लेख विस्तारभयास्तव करता येणार नाही. तरीही त्याच्या कथांचे प्रारंभ हे वाचकाला अद्भुत अनुभवात नेणारे ‘टेक ऑफ पॉइंट्स’ आहेत हे निश्चितपणे म्हणता येतं. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ असेल, किंवा ‘वरनभातलोन्चा…’, किंवा ‘निंद नसानी...’ची सुरुवात पाहिली, तरी तो कॅमेऱ्याच्या लेन्सच्या गतीनं आपल्याला जणू एक चित्रकथा दाखवत आहे, असं वाटतं.

सिनेमॅटिक तंत्राचा वापर असल्यासारखी आपल्याला कथा 'दिसत' उलगडत जाते. ‘पटकथेची शैली मी वापरतो’, हे जयंतनंही मान्य केलं होतं. लाँगशॉटमधून दृश्यप्रारंभ होतो आणि कॅमेरा सिनेमातल्या ओपनिंग सिक्वेन्ससारखा आशयाच्या जवळ किंवा अधिक समीप आलेला दिसतो. तोच कॅमेरा गर्दीतून फिरताना सूक्ष्मतेनं तपशील टिपत राहतो. तो तपशिलांवर तसाच संथपणे रेंगाळत राहतो आणि आशय गडद होत जातो. प्रसिद्ध जपानी चित्रपट दिग्दर्शक यासुजिरो ओझुच्या शैलीप्रमाणे अधिकतः तो डोळ्यांच्या पातळीवर क्लोजॲप्स-मिडशॉट्ससारखा परिणाम दाखवतो. निवेदनातून कॅमेऱ्यानं गरगरा फिरवत दृश्यमालिका टिपाव्यात तसा कथकाचा डोळा सगळ्या कोनांमधून फिरतो. वस्त्यांमधली बकाली, मॅनहोलमधली घाण, तिथला काळोख, दुर्गंधी सगळं तपशिलानं टिपतो. त्याच्या लेखनावर अभ्यास करणारे त्यातील वेगवेगळ्या पैलूंचा भविष्यात अभ्यास करतील, अशी आशा आहे.

जयंत हा प्रयोगशील, कष्टाळू लेखक होता. त्याचा लेखनपट पाहिला, तर त्यानं किती प्रयोग केले, हे लक्षात येतं. हे प्रयोग रूपाच्या आशयाच्या पातळीवर होते. भाषेच्या वापरावर होते. निवेदनाच्या पद्धतीवर होते. एकाच कथेत तिसरा एक निवेदक आणण्यासारखे प्रयोगही होते. रूपकं आणि प्रतीकांचा अभिनव वापर त्यानं केलेला होता. वास्तव तपशिलांना फॅन्टसीत उभं करणं होतं. संदर्भांचा वापर होता. रहस्य, अद्भुत आणि कल्पिताचा सर्जक वापर, स्वप्नप्रतिमांचा वापर, इतिहासाची पुनर्तपासणी करताना इतिहासातले आणि परंपरेतले सशक्त बंध सजगपणे वापरण्याचं भान होतं.

हे सगळं करताना तो गोष्टी सांगत होता. दाखवत होता. सामान्यांच्या पडझडीचा इतिहासही तो नव्यानं लिहीत होता. विस्कटलेली माणसं, समूह यांच्या शोकांतिका मांडताना, एकट्या पडलेल्या, भयभीत व्यक्तींच्या मनातले तळ झोत टाकून तपासताना त्यांना भयावह दुःस्वप्नांमधून आलेला अपराधभाव, काळोखभय, त्यांचं क्रौर्य, हिंसा आणि विकार-विखारही दाखवत होता.

‘लेखकाचा मृत्यू’ या कथेत एकट्या पडलेल्या लेखकाचा उल्लेख आहे. त्या लेखकाविषयी कथेत असं म्हटलं आहे, ‘त्याच्या पेनाच्या शाईत पारा मिसळलेला होता असं म्हणतात...’ हे जयंतच्या बाबतीतही खरं वाटतं. त्याच्या लिहिलेल्या शब्दांतल्या पानं मानवी जगण्यातले कंगोरे, वास्तव आणि वास्तवातले भास, कल्पितं, जगण्यातल्या सगळ्या परीना आरसा मिळत होता. जे दृश्य आणि अदृश्य पातळीवर अनुभवायला येतंय, ते सगळं त्या आरशात लख्ख दाखवण्याचा तो प्रयत्न करत राहिला.

त्याच्या सगळ्या प्रकाशित कथांचा काळ साधारण तप-दीड तपाचा आहे. या एवढ्या अवधीत तब्येतीत लिहिलेल्या या कथांनी मराठी कथेविषयीची धारणा बदलवली. जयंतनं मराठी कथेला मौलिक उंची मिळवून दिलेली आहे. त्यामुळे मला जयंत पवार हा समकालीन मराठी साहित्यातला अनन्य लेखक वाटतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

समकालीन मराठी साहित्य व्यवहारात दुर्मीळ झालेला एक महत्त्वाचा विशेष जयंतमध्ये होता. अलीकडच्या अत्यंत असहिष्णू आणि विषाक्त काळात तो सर्वसामान्य माणसांच्या बाजूचाच राहिला. त्याच्या मूलभूत स्वातंत्र्यांसाठी, अभिव्यक्तीच्या खुलेपणासाठी स्पष्टपणे तशी जाहीर भूमिका घेत राहिला. जयंतनं आपल्या लेखनासकटच्या सगळ्या कृतींतून ही प्रतिबद्धता जागी ठेवली.

जगण्याच्या लढाईत आपण कुठल्या आणि कोणाच्या बाजूनं उभे आहोत, हे ठरवावंच लागतं, आपली प्रत्येक कृती राजकीयच असते, त्यामुळे भूमिका घ्यावीच लागते. त्याचबरोबर लेखकानं डोळस राहून वास्तव समजून घ्यावं, डोळ्यांच्या कक्षेबाहेरही वास्तव असतं. त्याचं गतिशास्त्र, त्याचं राजकारण समजून घ्यावं आणि त्यात सामान्य माणसाचं काय होतं हे जागं राहून पाहताना निर्ममपणे ते मांडलंही जावं असा त्याचा आग्रह होता.

आपल्या मताला, आग्रहाला आणि भूमिकेला तो जागला, हे आपल्याला त्यानं वेळोवेळी लिहिलेल्या पत्रकांतून, भाषणांतून आणि मुलाखतींमधूनही दिसतं. तो जागल्या लेखक होता.

‘रंगकथा : जयंत पवार स्मृतिग्रंथ’

संपादक - गणेश विसपुते, संध्या नरे-पवार, मुकुंद कुळे, समर खडस

लोकवाङ्मय गृह, मुंबई, पाने – ४८०, मूल्य ७५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......