अनियतकालिकांच्या चळवळीचे एक प्रणेते, कवी आणि ग्रंथसंग्राहक सतीश काळसेकर यांचा २४ जुलै २०२२ हा पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘विस्मरणापल्याड’ हा त्यांच्यावरील गौरवग्रंथ अलीकडेच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाला आहे. उदय नारकर, जयप्रकाश सावंत, मेघा पानसरे, नीतीन रिंढे यांनी संपादित केलेल्या या ग्रंथातील हा एक लेख... काळसेकरांचे प्रदीर्घ काळचे मित्र आणि मराठीतील प्रसिद्ध कवी डहाके यांचा...
.................................................................................................................................................................
१.
२०२१च्या जानेवारी अखेरीस मुंबईच्या ‘साहित्य अकादमी’च्या कार्यालयात सतीशची भेट झाली होती. छान शर्ट, प्रसन्न चेहरा. पुष्कळच दिवसांनी भेट झाली होती. मलाही खूप छान वाटले होते. कामाशिवाय थोडे अवांतर बोलणे झाले. इतर कामांमुळे लवकरच तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी पनवेल रस्त्याने जाताना त्याची आठवण आली. फोन केला. तो मुंबईतच होता. त्यानंतर घरी पोचल्यानंतर अधूनमधून फोनवर बोललो. मग जुलैमध्ये अचानक सतीशच्या निधनाची दुःखद वार्ता आली. अविश्वसनीय असे काही ऐकत आहोत असे वाटले. सुन्न झालो. मग सतीशच्या भेटीचे अनेक प्रसंग आठवत राहिलो.
बहुतेक १९६७ साली आमची पहिल्यांदा भेट झाली. त्यापूर्वी पत्रव्यवहार होता. तो माझ्या ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेमुळे सुरू झाला होता. ६७मध्ये मुंबईत आलो होतो. त्या वेळी सतीश आणि त्याच्यासोबत वसंत दत्तात्रेय गुर्जर, प्रदीप नेरुरकर, चंद्रकांत खोत, शरद साटम, मनोहर ओक अशा सर्वांची भेट झाली होती. मुंबईतले ते दोन-तीन दिवस मजेत गेले. १९६९मध्ये पुन्हा मुंबईत आलो, तेव्हा त्याच्या डोंबिवलीच्या घरी राहिलो. गिरगावातल्या माधवाश्रमातून काढून मला त्याने आपल्या घरी नेले. सतीश त्या वेळी काढत असलेल्या ‘फक्त’चे अंक पाहिले. ‘फक्त’च्या छापील अंकात माझ्या काही रचना नंतर त्याने छापल्या होत्या. त्याच वेळी राजा ढालेची ओळख झाली. ‘चक्रवर्ती’ दैनिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले तेव्हा मी तेथे होतो. हॉर्निमन सर्कलजवळ अनेक लोक जमले होते, असे एक दृश्य नजरेसमोर आहे.
नंतरच्या काळात सतीशच्या भेटी कमी झाल्या, मुंबईत आलो की, कुठेतरी भेट होत असे. १९७२ साली योगायोगाने वाराणसी, प्रयाग, लखनौ येथे भेटलो. सतीशसोबत मित्रांची टोळी होती. नंतर ही टोळी एकदा अमरावतीलाही येऊन गेली. नंतर मुंबईत काही कामानिमित्ताने आलो तर क्वचित भेटी व्हायच्या.
१९८२ साली मुंबईत राहायला आल्यानंतर सतीशच्या अधिक भेटी होत गेल्या. ‘पीपल्स बुक हाऊस’ हे भेटीचे केंद्र होते. एल्फिन्स्टन कॉलेजपासून एशियाटिक लायब्ररी जवळ होती. त्याचप्रमाणे ‘स्ट्रॅन्ड बुक स्टॉल’ आणि ‘पीपल्स’ही. त्या काळात जवळजवळ रोजच मी अशी त्रिस्थळी यात्रा करत असे. संध्याकाळी त्याचे कामकाज झाल्यावर तो दुकानात येत असे. नवीजुनी पुस्तके, लिहिणे-वाचणे यांविषयीच्या गप्पा होत असत. ‘स्क्रीन यूनिट’च्या चित्रपटांना मी जात असे त्या वेळी भेटायचो.
पुढे ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’च्या निवड समितीवर आम्ही एकत्र काम केले... तीनदा उत्तराखंडच्या यात्रांना गेलो. सतीशच मार्गदर्शक होता. या यात्रांचा वृत्तांत माझ्या ‘यात्रा-अंतर्यात्रा’ या पुस्तकात आलेला आहे. सतीशमुळेच हिमालयाच्या यात्रा घडल्या. प्रकाश विश्वासरावांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कर्नाटक आणि कोकण येथल्या सहलीमध्ये सोबत होतो. १९९६ नंतर ‘लोकवाङ्मय गृहा’शी संबंध आला. सतीश संपादक असलेल्या ‘वाङ्मय वृत्ता’मध्ये लेखन केले.
‘वृत्तमानस’ या नावाचे एक साप्ताहिक वर्तमानपत्र निघायचे. त्यात आम्ही दोघेही सदरलेखन करायचो. त्यातल्या माझ्या लेखांची कात्रणे त्याने मला एकदा दिली होती. त्यातून माझे एक पुस्तक झाले. निवृत्त होऊन अमरावतीला परत गेल्यानंतर प्रकाश विश्वासराव यांच्या प्रकल्पांमध्ये मी काम केले. पंजाबराव देशमुख, मुंबई विद्यापीठ, डॉक्टर आंबेडकर, साने गुरुजी असे ते प्रकल्प होते. त्या वेळी महिन्यातून पंधरा दिवस लोकवाङ्मय गृहातच माझा मुक्काम असे. या प्रकल्पांशी सतीशचा थेट संबंध नव्हता, पण तो आसपास असायचा. सतीश, जयप्रकाश सावंत आणि विश्वासराव हे तिघे कायम असत. हा काळ माझ्यासाठी खूपच चांगला गेला होता. विशेषत: ‘डॉक्टर आंबेडकर चित्रमय चरित्र’ या ग्रंथाचे काम, आणि नंतर साने गुरुजी स्मारकाचे काम.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
दिवसभर प्रकल्पाच्या कामात मग्न असलो तरी दुपारचे जेवण सगळे एकत्र घ्यायचो. ही विश्वासरावांची पद्धती होती. संध्याकाळी विश्वासराव निघून जात असत. मग आम्ही थोडा वेळ थांबून आपापल्या ठिकाणी जायचो. या काळात माझी आणखी काही पुस्तके लोकवाङ्मयने केली. त्यांच्याकडे सतीश आणि जयप्रकाश यांचे लक्ष असायचे. भूपेश गुप्ता भवनात आलो की, पहिल्यांदा सतीश आणि जयप्रकाश यांच्या केबिनमध्ये जायचे. त्यांच्याशी गप्पागोष्टी करायच्या, कोणी लेखक-कवी आलेले असले तर त्यांच्याशी बोलायचे. नंतर आगरकर लायब्ररीच्या खोलीत जायचे असा परिपाठ असायचा. अनेक नवे कवी, लेखक तिथे येत असत. त्यांच्या भेटी होत.
२४ जुलैच्या सकाळी हे सारे प्रसंग मनात उलगडत गेले.
२.
सतीशच्या आणि माझ्या वयात फार अंतर नव्हते. आम्ही एकाच पिढीचे. त्याचे व्यक्तिमत्त्व, वागण्याची-बोलण्याची पद्धती, त्याचा स्वभाव, त्याचे ग्रंथप्रेम या गोष्टी वेगळ्या होत्या, विरळा होत्या. माणसे जोडणे ही त्याच्यातली मोठी गुणवत्ता होती. त्याच्यामुळेच माझ्या अनेक लोकांशी ओळखी झाल्या. मराठीतले कवी-लेखकच नव्हे तर हिंदी साहित्यिकांच्या जगातही त्याचा संचार होता. जग सुंदर झाले पाहिजे, सगळ्यांना प्रेमाने एकत्र राहता आले पाहिजे अशी त्याची कामना होती आणि हे शक्य आहे असेही त्याला वाटत असे. अर्थातच आजच्या जगातल्या अनेक आपत्तींची त्याला कल्पना होती. त्याचे राजकीय, सामाजिक भान पक्के होते. त्याने लिहिले होते, हे आधीचंच सुंदर असलेलं जग, आहे याहून अधिक सुंदर करायचं आहे.
सतीशचा ग्रंथसंग्रह मोठा होता. तो ग्रंथ केवळ गोळा करत नव्हता, त्याचे वाचन सूक्ष्म होते, गंभीर ग्रंथांप्रमाणे तो नियतकालिकातील लेखांचेही गांभीर्याने वाचन करत असे. मात्र एखाद्या विषयात खोल घुसून त्याचे विवरण करावे ही त्याची प्रवृत्ती नव्हती. तो उत्तमोत्तम साहित्यकृतींचा वाचक होता. एखाद दुसऱ्या ओळीतूनही त्याने ती साहित्यकृती कशी आत्मसात केलेली आहे, हे जाणवत असे. त्याला कविता उत्तम प्रकारे कळत असे. एखाद्या परिच्छेदातून हे जाणवते. पण त्याने ललित साहित्यावरही दीर्घ असे काही लिहिले नाही.
त्याचे ग्रंथांविषयीचे आणि प्रवासाविषयीचे ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ व ‘पायपीट’ ही दोन्ही पुस्तके उत्तम लेखनाचा नमुना आहेत. त्याने मनावर घेतले असते तर उत्कृष्ट साहित्यकृतींचा वेध घेणारे लेख त्याला लिहिता आले असते. तो त्याचा स्वभाव नव्हता. त्यानेच म्हटल्याप्रमाणे त्याच्यात संशोधनवृत्तीचा अभाव होता. त्याचे वाचन विस्कळीत होते, पण त्याच्याच मते माणसांवर, निसर्गावर, मानवेतर चल-अचलावर, अवघ्या प्राणिमात्रांवर जीव जडला असल्याने असा विस्कळीत वाचनाचा फायदाच अधिक.
त्याचे वाचन विस्कळीत पण अफाट होते. डिसेंबर २००३ ते जानेवारी २००९ या कालावधीत त्याने लिहिलेले साठ लेख ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या पुस्तकात आहेत. त्याची मागणी एकच होती, माझे मला वाचू द्यावे, ऐकू, पाहू आणि बोलू द्यावे. पुढे त्याने म्हटले होते, लोकशाही शासन व्यवस्थेत किमान इतकी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी.
अशी अपेक्षा आपणा सर्वांचीच असते, त्यामुळे आपण या विचाराशी सहमत होतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पुस्तकांविषयी आस्था असणाऱ्यांसाठी हा ग्रंथ एक मोलाचा ठेवा आहे. लेखकांविषयी अनेकांनी लिहिले आहे, सतीशने वाचकांविषयी जे लिहिले आहे ते महत्त्वाचे आहे. त्याच्या मते वाचणाऱ्याच्या वाचनाचा त्याच्या एकूण पर्यावरणाशी संबंध असतो. त्याचा सांस्कृतिक वारसा, आर्थिक स्तर, व्यवसाय आणि वाचनाची जागा या काही महत्त्वाच्या बाबींचा प्रभाव त्याच्या वाचनावर असतो. या सबंध ग्रंथात वाचक या साहित्यव्यवहारातील महत्त्वाच्या घटकाचे स्वरूप अधोरेखित होत राहते. भारतीय साहित्यशास्त्रात जो सुहृद आहे तोच हा वाचक आहे.
सतीश वाचता-वाचता समकालीन राजकीय, सामाजिक संदर्भ देत असतो. उदाहरणार्थ, सतीश एक वाक्य लिहितो : “सर्व देशभरात जे काही घडत आहे ते लाजिरवाणे आणि देशाविषयी, त्याच्या भवितव्याविषयी काळजी वाटायला लावण्याजोगे आहे.” यानंतर सतीश एक छोटी कविता देतो, ती अशी :
ते प्रथम कम्युनिस्टांचा वेध घेत आले
मी काही बोललो नाही
कारण मी कम्युनिस्ट नव्हतो
त्यानंतर ते कामगार कार्यकर्त्यांच्या शोधात फिरू लागले
मी मनात म्हटले, माझा कुठाय कामगार संघटनेशी संबंध
मी बोललो काहीच नाही
मग ते ज्यू वंशविच्छेदनाचे सूत्र घेऊन सर्वत्र धावू लागले
मी मनात म्हटले, मी काही ज्यू नाही
मी शांतच राहिलो
त्यानंतर ते माझाच शोध घेत आले
पण तोपर्यंत विरुद्ध आवाज
काढू शकतील असे बाकी कोणी उरलेच नव्हते
....ही कविता देऊन सतीश म्हणतो :
ही कविता वेगवेगळ्या रूपांत आळवण्याची वेळ आपणांवर येणार नाही, इतकी खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायलाच हवी.
हे सगळे वाचन चाललेले असताना आणि नव्या वाचनाची ओढ कायमच मनात असताना हा वाचक सुखदुःखाच्या, आशा-निराशेच्या प्रसंगांतूनही गेलेला असावा, आणि हे प्रसंग केवळ वैयक्तिक आयुष्यातले नसावेत, याच्या अंधूक खुणा जाणवतात. ते सगळे खोल मनात ठेवून हा वाचक नव्या वाचनाकडे वळतो.
सतीशला पुस्तकांच्या वाचनाची ओढ असे, तशीच त्यांचा संग्रह करण्याचीही जबरदस्त खेच असे. यातूनच त्याचा ग्रंथसंग्रह वाढत गेला. ‘विलंबित’ या कवितासंग्रहात त्याची ‘पुस्तकांच्या संग्रहाविषयी’ ही एक अप्रतिम कविता आहे. तो म्हणतो :
पुस्तके म्हणाल तर तुमची असतात
पुस्तके म्हणाल तर दुःख देतात
पुस्तके म्हणाल तर आधार देतात
पण पुस्तके कधीही नसतात
स्थावरजंगम मालमत्तेसारखी
या कवितेच्या शेवटी म्हटले आहे :
... पुस्तके भाकरीसाठी
विकता येत नाहीत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तो पुस्तकातले शब्द, ओळी वाचत असे, तसेच तो भूमी, रस्ते, डोंगर, नद्या वाचत असे. तो एकदा म्हणाला होता, हिमालय आपल्याला बोलावतो, तेव्हा आपल्याला जावे लागते. हिमालयाने त्याला खूपदा बोलावले होते, मी केवळ तीनदा त्याच्यासोबत होतो. त्याचे पुस्तकांवर, हिमालयावर, प्रेम होते, तसेच त्याचे सर्व माणसांवर प्रेम होते. हिमालयातल्या कष्टकरी लोकांविषयी त्याने एकदा सुनावले होते, ही माणसे इतकी गरीब आहेत, पण तुमचा सुतळीचा तोडादेखील चोरीला जाणार नाही, माणसांवर विश्वास ठेवा.
हे प्रॅक्टिकल नाही, माणसांवर विश्वास ठेवणे सोपे नाही असेच कोणीही म्हणणार, पण मला या वाक्यांतून सतीशची माणसांकडे पाहण्याची विशाल दृष्टी दिसते, जी दुर्मीळ आहे. ती कवीची दृष्टी आहे. आणि कवीची दृष्टी विशालच असते.
३.
सतीश निःसंशय कवी होता, पण त्याने कविताही फार लिहिली नाही. ‘इंद्रियोपनिषद’, ‘साक्षात’ आणि ‘विलंबित’ हे त्याचे तीनच संग्रह आहेत. पण ती उत्तम कविता आहे. विशेषतः ‘विलंबित’मधली.
कवीला, लेखकाला कुठे शोधायचे असते? जगतानाचे त्याचे वागणे-बोलणे त्या त्या क्षणी आपण अनुभवतो, मग विसरतो, नंतर त्यांच्या केवळ प्रतिमा असतात. त्याही काही अंधूक, काही उजळ असतात.
जे त्याने लिहिलेले असते त्यात तो असतोच. सतीशच्या कवितांमध्ये तो आहे.
खिन्न
...म्हणणं की या देशाच्या दिशांत
खिन्नता भरून आहे
तर यात अतिशयोक्तीचा आक्षेप
येऊ नये.
मी जेव्हा बोलू लागतो
तुझ्याविषयी
तेव्हा सर्वच म्हणतात
मी देशाविषयी का बोलत नाही
मी जनतेविषयी का बोलत नाही
…
आता मी तुझ्याविषयी बोलत असतो
तेव्हा खरे तर
मी या सर्वांविषयीच बोलत असतो.
सतीश पुस्तकांविषयी लिहितानाही सर्वांविषयीच बोलत होता. कवितेत येणारे वैयक्तिक संदर्भ केवळ वैयक्तिक राहत नाहीत, किंबहुना वैयक्तिक, सामाजिक यांच्यामधल्या रेषा धूसर होऊन जातात. पांगाऱ्याचा विचार करताना हा कवी छपरांचा, फुलांचा, आणि दारिद्र्यरेषेखाली माणसं कशी जगतात याचाही विचार करतो. त्याला जागोजाग उगवणारी कमळे गरिबांच्या हताश आसवांसारखी दिसतात. आपल्या भोवतीच्या प्रदेशात वावरताना हताशताही येते. ‘याही दिवसांतून’ या कवितेत सतीशने लिहिले आहे :
पाहिलं एसटीच्या प्रत्येक थांब्यावर
झोपलेल्या पावलांना, पाठींना, चेहऱ्यांना,
पाहिल्या दशा झालेल्या चादरीवर
दिसतायत का आपल्या घराच्या खुणा
...या कवितेच्या शेवटी सतीशने लिहिले आहे :
तपासला पुन्हापुन्हा
माझ्या गतायुष्यातला हिशोब
निरर्थक
....वैयक्तिक आणि सामाजिक यांतली सीमाच नाहीशी झालेली ही अभिव्यक्ती आहे. अस्वस्थ भोवताल अनुभवताना कधी कधी असेही वाटते :
आणि
कविता वापरता आलेली नाही
अजून
धारदार हत्यारासारखी
...याची खोल जाणीवही होते. पण सतीशच्या कवितेचे पोत धारदार हत्याराचे नाही. त्याच्याच ओळी वापरून सांगायचे तर,
सगळ्या आयुष्यातल्या बऱ्यावाईटाचं हलाहल पचवून
त्याचं निळंशार शालीसारखं आभाळ पसरायचं होतं
सगळ्यांवर कवितांच्या ओळींतून थेट.
सगळे हलाहल आत आहे, बाहेर निळेशार आभाळ आहे. ही सतीशची आणि त्याच्या कवितेची प्रकृती आहे. त्यामुळे त्याला माणसे जोडता आली, माणसांचे प्रेम त्याला मिळाले.
तुम्ही मला खूपच दिलेत भरभरून
आणि अजून खूप घाल
तुमच्या अनंत हातांनी
असे ओसंडून जाणारे आयुष्य पाहायचे
खूप बाकी आहे अजून!
....असे म्हणणारा हा कवी आज आपल्यात नाही ही अतिशय दुःखद गोष्ट आहे.
४.
काळसेकरांना श्रद्धांजली म्हणून सतीश काळसेकर स्मृतिजागर हे आयोजन करण्यात आले. यात एजाज अहमद यांचे ‘आय काण्ट ब्रीद’ हे विशेष व्याख्यान झाले. तसेच सतीश काळसेकर आणि लघुनियतकालिक चळवळ या विषयावर चंद्रकान्त पाटील, अर्जुन डांगळे, कुमार केतकर, आणि भालचंद्र नेमाडे यांची व्याख्याने झाली.
‘आठवणीतले काळसेकर’ या अभिवादन सभेत भालचंद्र कानगो, उदय प्रकाश, रंगनाथ पठारे, प्रकाश बुरटे, विजय कुमार, दौलत हवालदार, उर्मिला पवार, जितेंद्र भाटिया, सुधीर पटवर्धन, सुमती लांडे, रणधीर शिंदे, रत्नशंकर पांडे, सुबोध मोरे, जयप्रकाश सावंत, मेघा पानसरे हे सुहृद बोलले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या शिवाय येथे चंद्रकान्त पाटील, सुनील तांबे, गणेश विसपुते, नीतीन रिंढे, विजय चोरमारे, सुहासिनी कीर्तिकर, विकास पालवे, राजेंद्र साठे, अन्वय जवळकर, ऋत्विज काळसेकर, विद्या काळसेकर यांचे लेख समाविष्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे सतीशविषयीच्या शरद साटम आणि आनंद विंगकर यांच्या कविता आहेत.
‘आय काण्ट ब्रीद’ या एजाज अहमद यांच्या भाषणात आजच्या काळाविषयीचे गंभीर चिंतन आहे. कम्युनिस्ट राज्यव्यवस्थांचा पराभव झाल्यानंतरच्या या काळात भांडवलशाही ही जागतिक व्यवस्था बनलेली आहे. बहुसंख्य देशांतील राज्यव्यवस्था उजव्या शक्तींनी ताब्यात घेतल्याचा हा राजकीय काळ आहे. एजाज अहमद यांच्या मते आज फॅसिझम नाही, शंभर वर्षांपूर्वीच्या त्या परिस्थितीची आज तुलना करता येत नाही. आजची परिस्थिती अधिक भयाण आहे. आजच्या भांडवलशाही राजकीय व्यवस्थेत उदारमतवादी व्यवस्था आणि फॅसिस्ट व्यवस्था यांचे मिश्रण आहे. भांडवली लोकशाहीच्या संस्थांचा ढाचा कायम ठेवून त्या आतून पोखरल्या जाऊ लागल्या आहेत.
एजाज अहमद म्हणतात, ‘आय काण्ट ब्रीद’ ही दहशत भारतात रोजची झालेली आहे. तशी ती सर्वच उदारमतवादी लोकशाही देशांत झाली आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयी ते म्हणतात, भारतात अभिव्यक्तिस्वातंत्र्य खूप म्हणजे खूपच आहे. अर्थात ते काही लोकांना. पुरोगामी लोकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाही, प्रागतिक अभिव्यक्तीवर बंधने आहेत. विवेकी भाषा आणि अविवेकी भाषा यांतली सीमारेषा पुसली गेली आहे. सत्य भाषा आणि असत्य भाषा यांतली रेषा पुसलेली आहे. एजाज अहमद यांचे हे भाषण आपण कोणत्या काळात जगत आहोत याचे भान देणारे आहे..
‘सतीश काळसेकर आणि लघुनियतकालिक चळवळ’ या विषयावर चंद्रकान्त पाटील, अर्जुन डांगळे, कुमार केतकर आणि भालचंद्र नेमाडे यांची भाषणे झाली. पाटील यांच्या मते लघुनियतकालिक चळवळीत अशोक शहाणे यांच्यानंतर राजा ढाले आणि सतीश काळसेकर ही दोनच महत्त्वाची नावे आहेत. या दोघांची व्यक्तिमत्त्वे भिन्न होती. राजा हा एक प्रखर विद्रोही माणूस होता, तर सतीश सर्वांशी मिळून-मिसळून वागणारा, संयत भूमिका असलेला आणि अतिशय सौम्य अशा प्रकृतीचा माणूस होता.
पाटील यांच्या मते सतीशने जे लघुनियतकालिक सुरू केले, त्याने एक मोठा पाया घातला गेला. सतीशचा खूप लोकांशी संबंध होता, त्याचा मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे सतीशचे लघुनियतकालिक अधिक व्यापक स्वरूपात पुढे आले. या भाषणाच्या शेवटी पाटील यांनी म्हटले आहे : “सतीशचे सर्जनशील लेखन, लघुनियतकालिकांची चळवळ, आणि महाराष्ट्रातले एकूण सांस्कृतिक रूप या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा जोडणारा धागा दिसतो.”
अर्जुन डांगळे यांच्या मतेही सतीशचे सगळ्यात मोठे योगदान म्हणजे नवीन लेखक शोधणे. महाराष्ट्राच्या संवेदनशील, सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीत नवी पिढी घडविण्याचे सतीशने केलेले काम खूपच मोठे आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
कुमार केतकरांनी लघुनियतकालिक चळवळीचा विस्तृत आढावा घेतलेला आहे. साठच्या दशकातले विविध विचारप्रवाह, चळवळी यांच्या अनुकूल-प्रतिकूल परिणामांविषयी त्यांनी लिहिले आहे. सतीशविषयी त्यांनी म्हटले आहे, काळसेकर यांचा दृष्टिकोन हा संयत, समन्वयवादी होता. ते कम्युनिस्ट विचारांचे होते, कम्युनिस्ट विचारांशी ठाम होते. काळसेकरांना जगात चाललेल्या चळवळींचे भान होते. भालचंद्र नेमाडे आपल्या भाषणात म्हणाले, सतीश काळसेकरांसारखे लोक ज्या स्तरातून आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने मोठे काम केले, ते आपल्याला याच्या आधीची कित्येक शतके सापडणार नाही.
सतीश काळसेकर अभिवादन सभेत अनेकांनी काळसेकरांच्या आठवणी सांगितल्या. भालचंद्र कानगो म्हणाले, कम्युनिस्ट म्हणून लोकांमध्ये जी प्रतिमा असते, तिला छेद देणारी सतीशची प्रतिमा होती. लोकवाङ्मय गृहाला एक स्वतंत्र ओळख निर्माण करून देणाऱ्यांमध्ये सतीशचे नाव आवर्जून घ्यावे लागते. एखादा लेखक, कलाकार किंवा नागरिक असतो, त्याचे राजकारणापेक्षा वेगळे असे स्वत:चे विचारही असतात, असे उदय प्रकाश यांनी म्हटले आहे.
रंगनाथ पठारे म्हणाले, सतीशमध्ये मला मार्दव, मैत्र, वाचनाची प्रचंड असोशी आणि पुस्तकांवर व्यसनासारखे प्रेम दिसून येते. दौलत हवालदारांनी सतीशच्या पुस्तकसंग्रहाविषयी आणि त्याच्या संग्राहक वृत्तीविषयी लिहिले आहे. सतीशचा पुस्तकसंग्रह किती विविधतेने परिपूर्ण होता हे वाचत असताना आपण चकित होतो. जितेंद्र भाटिया यांनीदेखील सतीशच्या पुस्तकांशी असलेल्या अंतरंगी मैत्रीचा उल्लेख केलेला आहे. सुमती लांडे यांनी लिहिले आहे, त्याने पुस्तके दिली, पुस्तकाविषयीची समज दिली, माणसांविषयीची समज दिली. रणधीर शिंदे यांनी लिहिले आहे, बहुसंख्याकांच्या आवाजांमुळे गावोगावच्या, दूरदूरच्या ज्या अल्पसंख्याक आवाजांना अवकाश मिळत नाही, जे म्यूट राहतात अशा आवाजांना, अशा हातांना सतत शोधण्याचे, लिहिते करण्याचे काम ते करत होते. जयप्रकाश सावंत यांनी सतीशच्या लोकसंग्रहाविषयी लिहिले आहे, ते फार हृद्य आहे.
५.
सतीश काळसेकर यांच्याविषयी प्रसिद्ध झालेले निवडक लेख येथे घेतलेले आहेत.
चंद्रकान्त पाटील यांचा मर्मस्पर्शी मृत्युलेख येथे आहे. सुनील तांबे यांचे निरीक्षण आहे : ‘सतीश तन मन धनाने गुंतला होता ग्रंथसंग्रह, वाचन, पायपीट, साहित्य व समाजसेवेत.’ बुद्धाच्या मैत्रभावाचे मूल्य त्यांनी (काळसेकरांनी) मनोमन स्वीकारलेले होते असे गणेश विसपुते यांनी लिहिलेले आहे. नीतीन रिंढे म्हणतात, ‘लघुनियतकालिक चळवळीला डाव्या विचारांचे अधिष्ठान देणाऱ्या लेखक-कवींपैकी काळसेकर हे प्रमुख कवी.’ विजय चोरमारे म्हणतात, ‘चांद्यापासून बांद्यापर्यंतच्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी माणसांशी आणि देशभरातल्या साहित्यिकांशी उत्तम संवाद असलेला हा खऱ्या अर्थाने वैश्विक कवी होता.’
हे सगळे लेख सतीशविषयी बोलत असताना तो काळ आपल्यासमोर उभा करतात. तो काळ, विचारप्रवाह, चळवळी, नवे-जुने लेखन, नव्या पिढीची ऊर्जा आणि आविष्कार यांविषयी ते बोलतात.
विकास पालवे यांनी लिहिले आहे : “लोकवाङ्मय गृह आणि पीपल्स बुक हाऊस यांच्या जडणघडणीत काळसेकरांचे अमूल्य योगदान आहे.” हे सर्वमान्य होण्यासारखे विधान आहे. राजेंद्र साठे यांनी लिहिलंय, “काळसेकर हे कवी व कार्यकर्ते होतेच; पण आतूनचा जिव्हाळा आयुष्यभर टिकवून ठेवण्याची देणगी लाभलेले ते एक दुर्मीळ गृहस्थ होते.” अन्वय जवळकरांनी एक मार्मिक वाक्य लिहिले आहे : “तुम्ही तुमचं माणूसपण जपलंत सदैव. फळाफुलांनी बहरलेल्या सदाहरित वृक्षासारखं.”
विद्या काळसेकरांनी सतीशच्या सहवासातील अनेक आठवणी सांगितल्या आहेत. या ग्रंथातील ऋत्विज काळसेकर यांचा लेख विलक्षण आहे. बाप आणि मुलगा यांच्यातले नाते किती घट्ट, गुंतागुंतीचे, समृद्ध करणारे आणि आतड्याला पीळ पाडणारे असते, हे या लेखातून दिसते. त्याचबरोबर, अनेक दिवे असलेल्या झुंबरासारखे सतीशच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अनोखे पैलू उजळलेले आहेत. मुलाविषयीची माया आणि त्यातील अंतर्विरोधांनी विद्ध झालेले बापाचे मन, त्याचे विव्हळ होणे ऋत्विजने पकडलेले आहे.
६.
सतीश आता आपल्या या नश्वर जगात नाही, पण तो आपल्या मनात, त्याच्या कवितांत, त्याने केलेल्या कामात आणि हिमाचलाच्या पर्यटनात आहे. त्याने गोळा केलेली अमूल्य पुस्तके इतर वाचकांच्या हाती पडतील तेव्हा पानापानातून त्यांना सतीश भेटत राहील.
‘विस्मरणापल्याड : सतीश काळसेकर स्मृतिजागर’ -
संपादक -उदय नारकर, जयप्रकाश सावंत, मेघा पानसरे, नीतीन रिंढे
लोकवाङ्मय गृह, मुंबई, पाने - २६३, मूल्य - ४५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment