राहुल गांधी यांनी तोंड न उघडता ‘भारत जोडो’ यात्रा पार पाडली असती, तर कदाचित काँग्रेस आणि सर्वसामान्य जनता यांच्यात कुठेतरी थोडाफार ‘कनेक्ट’ आला असता अन् त्यांना थोड्या फार प्रमाणात का होईना ‘राष्ट्रीय पप्पू’ हा शिक्का पुसता आला असता. या यात्रेपासून किमान एवढे फलित पदरी पडेल, असा एक अंदाज होता. पण कसचं काय! त्यामुळे मतदारांना ‘कुछ मिठा हो जाय’ म्हणता येत नाही. ते अजूनही शिळ्या कढीला ऊत आणत बसलेत. राहुल गांधी भाजपला हव्या त्याच ‘ट्रॅक’वर चालत आहेत, हेच पुन्हा समोर आले आहे.
रोज पायी चालत जाणं, लोकांना ऐकणं, त्यांच्यात मिसळणं, अनुभवणं यातून माणसाचं व्यक्तिमत्त्व आरपार बदलतं, त्याचा पोच वाढतो, जगाकडे उघड्या नजरेने बघण्याची ‘नजर’ तयार होते, व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता येते, असा एक समज आहे. तो येत्या काही दिवसांत राहुल गांधी सिद्ध करतात की नाही, हे दिसेलच. तूर्तास त्यांच्या यात्रेची तुलना महात्मा गांधींच्या ‘दांडी यात्रे’शी, ‘चले जाव’शी करणाऱ्या विश्लेषकांची संख्या वाढतेय, एवढं नक्की.
सरंजामशाही अथवा घराणेशाहीचा भाग म्हणून नेतृत्व करायला आलेल्या राहुल यांना सुरुवातीपासूनच चांगले सल्लागार मिळाले नाहीत. जे मिळाले त्यांनी दिलेल्या बदसल्ल्यावरच राहुल गांधी अधिक विसंबून राहिले. मुळात राहुल यांना इतिहासाने नव्या पद्धतीने पक्षबांधणीची, पक्षाचे सरंजामी प्रारूप बदलण्याची, लोकशाही मूल्यांच्या आधारे संघटनेला नवे वळण देण्याची संधी दिली होती.
काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या आजवरच्या तुष्टीकरणाच्या, ध्रुवीकरणाच्या प्रचार पद्धतींना छेद देऊन विकासाच्या मुद्द्यांवर जनतेचा आवाज ऐकायची मोठी संधी त्यांनी घालवली. हे सगळे करण्याइतपत राजकीय समज एक व्यक्ती म्हणून त्यांच्यात आधी होती का? आणि आता या यात्रेनंतर तरी येणार आहे का?
भारतीय लोकशाही आणि मतदार अजून पुरता प्रगल्भ झालेला नाही, हे खरंय, पण पणजोबा-आजी ग्रेट होती, एवढ्या पुण्याईवर नातवाला सत्ता द्यायची का, हा विचार करण्याएवढी सजग नक्कीच आहे.
राहुल यांची पाटी कोरी नाही, ५२ वर्षांच्या या तरुण नेत्याकडे आजच्या प्रगल्भ मतदाराने आणि तरुणाईने गांभीर्याने पहावे, असे काहीही नाही. उलट ते नव्या पिढीच्या चेष्टेचा विषय आहेत. यात मनमोहन सिंग यांचा अध्यादेश फाडणे ते संसदेत मिठी अन् डोळे मारण्यापर्यंतच्या सुरस कथांचा समावेश होतो. संसद सदस्य म्हणून कारकीर्द सुरू करताना जो गोंधळ राहुल गांधी यांच्याकडून होत होता, तोच आताही सुरू आहे. मोदी राजवटीला विरोध करणारे ‘भारत जोडो’ यात्रेला मुलामा देताना, सुरस कथांचे वर्णन करताना, त्यांचा साधेपणा, निष्कपटी वृत्तीचे गौरव करताहेत, त्यांच्या इंदिरेचा नातू असल्याचेही कौतुक होत असल्याचे सांगताहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हे का वाडवडिलांच्या पुण्याईवर जगायचे दिवस आहेत? एखादे घराणे कधी काळी मोठे होते, त्या घरात आर्थिक समृद्धी होती, म्हणून आज कोणी त्या घराशी विवाह संबंध जोडत नाहीत, तिथे देशाची सत्ता कशी देतील? या अशा गौरवशाली इतिहासावर वर्तमानात जगण्याचा काळ गेला. उद्याच्या मतदारांना या पोकळ प्रतिष्ठित दाखल्यांचं काहीच सोयरसुतक असणार नाही.
राहुल यांची ‘काँग्रेस बचाव’ यात्रा रंगात आणण्याचा त्यांच्या समर्थकांचा प्रयत्न यशस्वी होत असतानाच ते मुद्द्यापासून भरकटले (हिंदूंच्या भावना दुखवायच्या मूळ मुद्द्यावर आले) हे स्पष्ट झाले आहे. अर्थात त्यांचे समर्थक राहुल यांनी या निमित्ताने सगळा फोकस आपल्याकडे वेधला असल्याचे सांगतात. उलट त्यांचे विरोधक श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरील फोकस हटवण्यासाठी राहुल गांधी यांनी सावरकर टीकेचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगताहेत.
या दोहोंचे दावे जरा बाजूला ठेवूयात. भाजप राहुल यांच्या जाळ्यात अडकली आहे की, राहुल भाजपच्या जाळ्यात? यातली दुसरी शक्यता अधिक आहे. कारण काँग्रेस आरोप करते, त्यानुसार घटनात्मक संस्थांचा गैरवापर करू शकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांच्या अथवा त्यांच्या सल्लागारांच्या जाळ्यात अडकतील इतके दुधखुळे नक्कीच नसणार!
‘भारत जोडो’कडे फार मोठ्या अपेक्षेने बघणाऱ्या लोकांना राहुल गांधी मोदी-शहा यांच्या जाळ्यात अडकल्याचे का दिसत नाही? नोटाबंदी, बेरोजगारी, आर्थिक विकास दर या प्रमुख मुद्द्यांवर राहुल यांनी देश ढवळून काढला असता, तर कदाचित त्यांच्या या पदयात्रेपासून काही अपेक्षा ठेवता आल्या असत्या. काँग्रेसने आजवर केल्या त्या चुका सोडून द्या, पण मी नव्या पिढीचा राजकारणी म्हणून लोकांत जातोय, त्यांचे प्रश्न जाणून घेतोय, आजवरील ठराविक राजकारणाची चौकट मोडून नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतोय, अशी काही भूमिका त्यांनी घेतली असती, तर कदाचित राहुल वेगळे भासले असते.
राहुल यांच्या आजवरील वर्तनामुळे, काँग्रेसच्या सरंजामी व्यवस्थेमुळे अन्य पर्याय धुंडाळणारे, सक्षम पर्याय नसल्याने भाजपची निवड करणारे अथवा अगदीच जनलोकपाल आंदोलनात सहभागी होऊन केजरीवाल प्रारूपामुळे विश्वासघात झाल्याची भावना असणारे, मोदी यांच्या एकाधिकारशाहीला वैतागलेले, चिडून ‘नोटा’चा पर्याय निवडणारे, या सगळ्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांना सोबत घेऊन एक पर्याय उभा करणे, ही गोष्ट राहुल यांना अथवा त्यांच्या यात्रेला जत्रेचे स्वरूप देणाऱ्यांच्या लक्षात का येत नसावी?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या देशात केवळ आपला पक्षच एकमात्र ‘सेक्युलर फोर्स’ असल्याचे दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी? अल्पसंख्याकांचा विकास करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बहुसंख्याकांना दुखवायलाच हवे का? त्यांच्या धार्मिक भावना, अस्मितांवर आणि श्रद्धस्थानावर चिखलफेक करायलाच हवी का? हे धोरण घेऊन काँग्रेसला उर्जितावस्था कशी मिळणार? ‘सेक्युलॅरिझम’ची भंजाळलेली संकल्पना सोडून मूळ मुद्द्यावर जनतेला आवाहन करता येते, त्यांचे प्रश्न लक्षात घेता येतातच की! त्यासाठी तुष्टीकरणाला खतपाणी घालायची काय गरज?
नाही म्हणायला राहुल यांच्या जत्रेमुळे राज्यातल्या पक्षाच्या सरंजामदारांना आपली पोरं ‘लाँच’ करायची संधी मिळाली, ही त्यांच्या दृष्टीने यात्रेची फलश्रुती ठरली. ज्याला मनापासून राजकीय परिवर्तन घडवून आणायचं आहे, तो इतिहासात फारसा रमत नाही, आजवरच्या धोरणांना कवटाळून बसत नाही, दीर्घकाळच्या वाटचाल करताना अशा तडजोडी कराव्या लागतात. शरद पवार म्हणाले, तसे ही ‘पडकी हवेली’ जमेल तशी सावरण्यासाठी बाहेर पडलेल्या राहुल गांधी यांनी आजवरच्या चुका टाळायला हव्या होत्या. आजवर करत आलेली विधाने, नको ते मुद्दे उचलून धरणे टाळले असते, तर खचित त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि जनसामान्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असता.
लोकशाही संकटात, संविधान धोक्यात या असल्या विधानांचा वापर बोथट ठरतोय, हे ना राहुल समर्थक विचारवंतांना लक्षात आलेय, ना खुद्द राहुल गांधींना. संघ, मनुवादी, सावरकर हे मुद्देही असेच काँग्रेसला असलेला हिंदूंचा थोडाफार जनाधार संपवणारे आहेत. सद्दाम हुसेनसारखी दाढी वाढवून राहुल गांधी प्रत्येक राज्याच्या कडेकडेने जी यात्रा करत सुटले आहेत, ती सावरकरांनी माफी कशी मागितली, हे जनतेला सांगण्यासाठी तर खचितच नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहासातील एका महापुरुषाचा गौरव करताना त्याची दुसऱ्या महापुरुषाशी तुलना करणे गैर आहे. मला सावरकरही वंदनीय आहेत अन् महात्मा गांधीही. महात्मा गांधींचे मोठेपण ठरवण्यासाठी मला त्यांच्या समकालीनावर चिखलफेक करायची गरज का भासावी?
हिंदुत्ववादी मांडणी केली म्हणून केवळ सावरकरांच्या त्यागाचे, देशप्रेमाचे मूल्य कमी कसे होईल? नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांची काही धोरणे चुकली म्हणून व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दलचा माझा आदर कसा कमी होईल?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एकाला मोठे ठरवण्यासाठी दुसऱ्यावर शिंतोडे उडवायची गरज नसते. विचार कालसापेक्ष असतात, त्यानुसार या व्यक्तींच्या कृती, निर्णयसुध्दा तत्कालीन काळानुसार, परिस्थितीनुसार घडलेल्या असतात. त्याला आजची परिमाणे लावून कसे चालेल? महापुरुषांच्या इतिहासातल्या चुका शोधून राजकीय पक्ष काय साध्य करणार आहेत? राहुल सावरकरांवर चिखलफेक करणार म्हणून भाजपकडून नेहरू-गांधींवर टीका होत राहणार. उकरायचीच म्हटली तर जमीन पुरणार नाही, पण ही उकराउकरी थांबवण्यात ना काँग्रेसला रस आहे, ना भाजपला.
हिंदू समूहाबद्दल द्वेषभावना मनात ठेवून राजकारण करता येत नाही, एवढी किमान समज राहुल यांना येणार नसेल तर अवघड आहे. एका समूहाला गोंजारण्यासाठी दुसऱ्याला खिजवायचा सिलसिला सुरू ठेवायचा होता, तर त्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेची गरज कशाला भासावी? मोदींसारख्या कसलेल्या मुत्सद्दी नेत्यासमोर आत्मविश्वासाने उभे राहायचे असेल, सक्षम पर्याय द्यायचा असेल, तर स्वतःची आयुधे घेऊन मैदानात उतरावे लागेल. अपेक्षाभंग झालेल्या मतदारांना विश्वास द्यावा लागेल अन् हे करताना त्यांच्या धर्मभावनाही जपाव्या लागतील.
फारशी आर्थिक गती नाही, रोजगारनिर्मितीही नाही, अन् हिंदुत्वाचा उमाळा आहे म्हणावे, तर हिंदूंचेही काही कल्याण केल्याचे दिसत नाही. तरीही मोदी हिंदूंचे तारणहार आहेत, केंद्रात पुन्हा सत्तेवर येण्याची तजबीज त्यांनी करून ठेवली आहे, काँग्रेस वा अन्य विरोधकांपेक्षा हिंदु बहुसंख्याकांना मोदी जवळचे वाटतात. अशा अवस्थेत राहुल यांनी किमान विचारी हिंदूंच्या सद्सद्विवेकाला आवाहन करायचे की, महापुरुषांवर चिखलफेक करण्यात रस घ्यायचा?
मुस्लीम अनुनयाच्या नादात (मुस्लीम समुदायाची फसवणूक करण्याच्या) काँग्रेस हिंदुत्वविरोधी असल्याचे चित्र इतके गडद झाले की, निव्वळ उत्तम इव्हेंट करणारा नेता (काँग्रेसमधले विचारी लोक मोदींवर हा आरोप करतात) भाजपवाल्यांना सत्ता मिळवून देऊ शकला. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपला मित्र पक्षांच्या आधाराचीही गरज उरली नाही, त्यांच्या जागांत वाढ झाली. त्यावेळीच काँग्रेसने काही पावले उचलली जाणे अपेक्षित होते. उलट काँग्रेस, राहुल आणि समस्त विरोधक मोदींच्या जाळ्यात अडकत गेले.
‘जो हिंदुहित की बात करेगा, वहीं देश पे राज करेगा’ ही घोषणा आम्ही लहान असताना (त्या वेळी केंद्रात काँग्रेसचे वर्चस्व होते) कानावर पडली होती. आता यातला अतिशयोक्तीचा भाग सोडा, पण लोकसंख्येचे समीकरण साधत भाजपने वा मोदींनी ही घोषणा सत्यात उतरवली, हे कसे नाकारणार?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हिंदूविरोधी हा शिक्का अधिक गडद झालेल्या काँग्रेसचा हक्काचा मतदार स्वतंत्र विचार करायला लागला. किमान काँग्रेस सोडून अन्य राजकीय पर्यायाचा विचार तरी करू लागला. ओवेसी ही भाजपची ‘बी टीम’ आहे, या काँग्रेसच्या आरोपात काही दम नाही. त्यांनी आपला मतदार आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे, मुस्लीम राजकारणातील आपली ‘स्पेस’ मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपची भीती दाखवून आपल्या दावणीला बांधलेली हक्काची मतपेढी ओवेसी यांनी पळवली, हे काँग्रेसचे खरे दुखणे आहे.
भाजप हिंदुत्वाबद्दल बोलतेय, एमआयएम मुस्लिमांना त्यांचा हक्काचा राजकीय पक्ष मिळवून देण्याचा प्रयत्न करतेय. मग राहुल गांधी ‘भारत जोडो’त नको ते मुद्दे का उगाळत आहेत? शिल्लक राहिलाय तो जनाधार दुखावेल असे का बोलत सुटलेत? हिंदूंच्या दृष्टीने ते मुस्लिमांचे कैवारी बनले आहेत, प्रत्यक्ष मुस्लीम समाजालाही काँग्रेसने आजवर केलेली फसवणूक लक्षात आल्याने ते स्वतःचा नवा कैवारी शोधत आहेत. आता सावरकरांना शिव्या घालून, त्यांचे चारित्र्यहनन करून मुस्लीम मतदार राहुल गांधी यांच्यावर खुश होणार आहेत का? की या अशा विधानांमुळे केवळ प्रसिद्धीचा झोत आपल्यावर राहतो, हे ठाऊक असल्याने राहुल तसे बोलत सुटले आहेत?
..................................................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment