आपल्याला ‘विज्ञानयुगा’त टिकून राहणारे सक्षम नागरिक निर्माण करायचे असतील तर, त्यांच्या एकूण जडणघडणीमध्ये ‘लिबरल आर्टस’ला स्थान असणं खूप गरजेचं आहे
पडघम - विज्ञाननामा
अनिल काकोडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 22 November 2022
  • फढघम विज्ञाननामा अनिल काकोडकर Anil Kakodka मुंबई मराठी साहित्य संघ Mumbai Marathi Sahitya Sangh विज्ञानयुग Science Era लिबरल आर्टस Liberal Arts उदारमतवादी कला

मुंबई मराठी साहित्य संघाचा ८७वा वर्धापनदिन २९ ऑक्टोबर २०२२ रोजी, मुंबई येथे साहित्य संघाच्या सभागृहात साजरा झाला. या कार्यक्रमात विविध प्रकारचे दहा पुरस्कार प्रदान केले गेले. त्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांनी छोटेच भाषण केले, पण त्यातून महत्त्वाच्या दोन-तीन मुद्द्यांकडे लक्ष वेधले. हेच ते भाषण…

.................................................................................................................................................................

मी बरीच भाषणे देतो. अणुशक्तीवर किंवा विज्ञानावर भाषण देण्यासाठी मला कधीच संकोच वाटत नाही. पण जो प्रांत आपला नाही, तिथे जाऊन काहीतरी बडबड करणं, हे मला खरं तर प्रशस्त वाटत नाही. पण आता मी तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळे आजची भूमिका तर निभावलीच पाहिजे. पण मी फार वेळ घेणार नाही. ‘आजचे विज्ञानयुग आणि सामान्य माणूस’ या विषयावर मी काही बोलावं, असं मला सुचवलं गेलं आहे. त्याविषयी मी काही मुद्दे अगदी थोडक्यात आपल्यापुढे मांडणार आहे.

‘मुंबई मराठी साहित्य संघा’त मी बऱ्याच वर्षांनी आलो. मुंबईत पहिल्यांदा आलो, तेव्हा मी इथे काही कार्यक्रमांकरता आलो होतो. त्यापैकी एक भाषणाचा कार्यक्रम होता; आणि तेव्हा इथे खुला रंगमंच होता, तिथे नाट्यस्पर्धेचा कार्यक्रम झाला होता. या दोन कार्यक्रमांमध्ये मी तेव्हा भाग घेतलेला आहे. अजूनही वर्तमानपत्रांमधून, इतर माध्यमांतून इथे चालू असलेल्या कार्यक्रमांची माहिती वेळोवेळी मिळतच असते. मुंबईच्या सांस्कृतिक विश्वात ‘मुंबई मराठी साहित्य संघा’ची महत्त्वाची भूमिका सतत राहिलेली आहे. त्याबद्दल सर्व मुंबईकरांना रास्त अभिमान वाटायला हवा.

प्रगत समाजाचं लक्षण काय? त्यासाठी चार गोष्टी सांगितल्या जातात- समाजात कुठल्या प्रकारच्या संस्था आहेत, त्यांचा दर्जा काय आहे, त्या किती सक्रिय आहेत, त्या किती स्वायत्त आहेत, हा पहिला मुद्दा असतो. त्या समाजात किंवा त्या राष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सोयीसुविधा कोणत्या व कशा आहेत हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की, त्या राष्ट्रामध्ये नवनिर्मिती- ज्याला ‘टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन’ म्हटलं जातं - ती किती होते. आणि चौथा मुद्दा म्हणजे, त्या समाजात काम करणारी जी मंडळी नवनवीन उपक्रम पुढे आणतात, त्यांना आपण यथायोग्य प्रकारे पुरस्कृत करतो की नाही, त्यांचं मोटिव्हेशन किंवा इन्सेटिव्हायझेशन होतं की नाही?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या चारपैकी दोन गोष्टी तर मला आजच्या कार्यक्रमात दिसतच आहेत. ८७ वर्षांची ही संस्था आहे. प्रा. उषा तांबे म्हणाल्या त्याप्रमाणे, १०० वर्षं हा माणसाच्या आयुष्यात भीती वाटावी इतका मोठा कालावधी असला - तरी १०० वर्षांच्या संस्थेबाबत बोलताना मात्र ती संस्था तरुणच आहे, असं म्हणायला हरकत नाही. संस्थांचं वय वाढत जातं, तसतशा त्या भरभराटीला येतात, मोठमोठे कार्यक्रम हाती घेऊन नावारूपाला येतात; की वर्षं वाढतील तसा संस्थांचा ऱ्हास होत जातो, यावरून त्या समाजाच्या प्रगतशीलतेचा अंदाज बांधता येतो. या दृष्टीने मुंबई मराठी साहित्य संघाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.

आता मी मला दिलेल्या विषयाकडे वळतो. आजचं युग हे विज्ञानयुग आहे, हे तर खरंच, पण कालचं युग विज्ञानयुग नव्हतं का? मानवाची उत्क्रांती आणि विज्ञान यांचा अन्योन्य संबंध आहे. मानवाला जर दगडावर दगड आपटून विस्तव निर्माण करणं जमलं नसतं, तर पुढे त्याला अन्न शिजवता नसतं आलं. शेतीसाठी मानवाने अवजारं निर्माण केली. ते जर जमलं नसतं, तर शेती जमली नसती. मग पुढच्या कित्येक गोष्टी शक्य नव्हत्या. त्यामुळे अनादी काळापासून जी मानवी प्रगती झालेली आहे, त्या सर्व काळात ‘विज्ञानयुग’ होतं असंच मी म्हणेन.

आज फार तर आपण असं म्हणू शकतो की, आजचं युग हे ‘ज्ञानयुग’ आहे. पूर्वीच्या काळी शेती हे उपजीविकेचं प्रमुख साधन होतं. ते शेतीप्रधान युग होतं. पुढे उद्योगधंदे हे आर्थिक विकासाचं किंवा मानवी उपजीविकेचं प्रमुख साधन बनलं, त्याला आपण ‘औद्योगिक युग’ म्हणतो. आणि आज आपण खऱ्या अर्थाने ‘ज्ञानयुगा’मध्ये आहोत. अर्थात मी त्याच्या फार खोलात जाऊ इच्छित नाही, पण आपल्याला एक मान्य करायला हवं की, सामान्य माणसाच्या जीवनावर विज्ञानाचा प्रभाव - मग तो स्वतः वैज्ञानिक असो किंवा नसो, विज्ञानावर विश्वास ठेवणारा असो किंवा नसो - पडलेला आहे, पडत आलेला आहे आणि पडत राहणार आहे हे नक्की.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आज घटकेला या विषयाची चर्चा करण्याचं विशेष प्रयोजन काय? मला असं वाटतं की, पूर्वीच्या काळी ज्या गतीने घटना घडत असत किंवा ज्या गतीने विज्ञानाची प्रगती होत असे, त्याच्या तुलनेत आज विज्ञानाची प्रगती कितीतरी जलद गतीने होते आहे. ही संधी आहे, पण हा आपल्यापुढचा मोठा प्रश्नदेखील आहे. सामान्य माणसावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकणारी कोणती गोष्ट असेल तर ती ही आहे की, विज्ञान फार झपाट्याने पुढे जातं आहे.

मला आठवतं- संगणक आले, तेव्हा जगभर सुरुवातीला लोकांना वाटलं की, आता आपल्या नोकऱ्या जातील. लोकांनी त्याविरोधात आंदोलनं केली. रेल्वेचे आरक्षण संगणकीकृत केलं, तेव्हा ते लोकांना पटलं नाही. पुढे ते सगळं स्थिरस्थावर झालं. नोकऱ्यांचं स्वरूप बदलत गेलं. ज्यांना नवीन परिस्थितीशी जुळवून घेता आलं नाही, त्यांना काही प्रमाणात यामुळे त्रास झाला हे जरी खरं असलं तरी; आज एकूण जीवनस्तर किंवा आर्थिक स्तर वाढण्यासाठी या गोष्टींचा खूप मोठा फायदा झाला आहे हे मान्य करावंच लागतं.

पण कल्पना करा, एखादं स्थित्यंतर २०-२५ वर्षांत एकदा घडतं, तर आपलं जीवन त्या बदलाच्या, त्या स्थित्यंतराच्या अनुषंगाने आपण वळवू शकतो. पण जर ही गोष्ट दरवर्षी घडायला लागली, तर मोठा प्रश्न निर्माण होईल. काल आपण ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’च्या गोष्टी करत होतो, आज आपण ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या गोष्टी करत आहोत. उद्या कदाचित ‘कॉग्निशन’च्या गोष्टी करू. या गोष्टी दर दोन-तीन वर्षांनी पुढे येऊ लागल्या, तर मानवाने करायचं काय?

आपल्या समाजरचनेमध्ये व्यवस्थापन किंवा गव्हर्नन्स हा फार मोठा मुद्दा आहे. त्यासाठी आपल्याकडे सरकारं आहेत, संस्थांमधलं व्यवस्थापन आहे. आसपासचं जग विज्ञानामुळे दर दोन-तीन वर्षांनी बदलायला लागलं तर गव्हर्नन्सचं काय होणार? पूर्वी प्रत्येकाला एखादी गोष्ट कागदावर लिहून हवी असायची. ‘ई-मेल’ आलं, तेव्हा ते एक ‘इन्फॉर्मल डॉक्युमेंट’ आहे, अशी कित्येक लोकांची समजूत होती. ‘‘अमुक एक गोष्ट लिहून मला त्यावर सही करून दे,’’ असं लोक म्हणतात. अजूनही बऱ्याच लोकांची तशी धारणा आहे. मात्र एखाद्या कागदावर लिहिलेल्या मजकुराची विश्वासार्हता जितकी आहे, त्याच प्रमाणामध्ये आज ई-मेलचं स्थान आहे.

‘ई-मेल इज ॲज गुड ॲज अ लिगल डॉक्युमेंट ॲज रिटन पेपर’. आता क्रिप्टोलॉजीचा जमाना आहे. आता व्हॉट्‌सॲपचे सगळे मेसेजेस ‘इन्क्रिप्टेड’ असतात. नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे या संदर्भातले जुने सरकारी नियम कालबाह्य ठरतात. तंत्रज्ञान झपाट्याने बदलू लागलं, तर दर दोन-तीन वर्षांनी आपल्याला नवीन बदल करता येतील का? या संदर्भातली आपली जी यंत्रणा आणि तिची रचना आहे, तिच्यामध्ये ही क्षमता आहे का? तशी क्षमता आपण निर्माण करू शकतो का? आतापर्यंतच्या जडणघडणीत आपल्याला ज्या सवयी लागलेल्या आहेत, त्या आपण इतक्या झपाट्याने बदलू शकतो का, हा मानवतेपुढचा खरा प्रश्न आहे, असं मला वाटतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तर आजच्या विज्ञानयुगामध्ये या प्रश्नावरची तोड आपण कशी काढतो यावर पुढची वाटचाल आपण कशी करणार याचं भवितव्य ठरेल. तंत्रज्ञानामुळे एरवी माणसाला जी कामं करणं अशक्य आहे, अशी मोठमोठी कामं करणं शक्य आहे. १०० माणसांचं काम एखादा संगणक सहज करू शकेल हेसुद्धा शक्य आहे. त्यामुळे लोकांच्या उपजीविकेचं काय आणि ‘चेंजिंग मोड ऑफ वर्क’शी जुळवून कसं घ्यायचं हा प्रश्न सततचा असणार आहे.

शाळेत जाऊन शिकणं ही एक अवस्था आणि नंतर त्याचा उपयोग करणं ही दुसरी अवस्था; याच्याऐवजी ‘लाइफ लाँग एज्युकेशन’ प्रचलित होते आहे. याचा विचार करून समाजाची नवी रचना कशी असेल याचं उत्तर आपण काढायला हवं. त्यासाठी सर्वांचा एकत्रित विचार करायला हवा, सर्वांचं एकमत निर्माण करायला हवं. ती प्रचंड कठीण अशी गोष्ट आहे. या परिस्थितीमध्ये नवीन युगाला तोंड देण्यासाठी आपण वैज्ञानिक प्रगती किती केली हे महत्त्वाचं असेलच; पण त्याहून महत्त्व याला असेल की, आपण मानवाची जडणघडण कशी केली.

तंत्रज्ञान हे चांगलं किंवा वाईट नसतं, तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान असतं! त्याच्यामुळे आपण मानवी क्षमता वाढवू शकतो. मात्र त्या क्षमतेचा उपयोग चांगल्यासाठी करायचा की, वाईटासाठी हे मानवाच्या बुद्धीवर अवलंबून आहे. त्यामुळे मला जेव्हा विचारलं जातं की, तुम्ही गांधीवादी घराण्यातून असूनसुद्धा अणुशक्तीवर काम करता, हा विरोधाभास नाही का? तेव्हा मी सांगतो की, मला हा विरोधाभास कधीच वाटला नाही. याचं कारण - आत्ताच सांगितल्याप्रमाणे - तंत्रज्ञान हे केवळ तुम्हांला अधिक शक्ती देणारं एक साधन आहे. त्याचा उपयोग कसा करायचा, हे तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. चांगलं किंवा वाईट काही असेल, तर ती मानवाची विचार करण्याची पद्धत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये ‘सायन्स’ घेतलं तर ‘आर्टस’शी संबंध येत नाही. ‘इंजिनिअरिंग’ घेतलं की, ‘मेडिसिन’शी संबंध येत नाही. असे चाकोरीबद्ध ‘सायलोज’ (Silos) आपल्याकडे तयार झालेले आहेत. त्याच्याऐवजी आपल्याला विज्ञानयुगात टिकून राहणारे सक्षम नागरिक निर्माण करायचे असतील तर, त्यांच्या एकूण जडणघडणीमध्ये ‘लिबरल आर्टस’ला स्थान असणं खूप गरजेचं आहे. एखादा प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतला, तर त्याला काही लोक पाठिंबा देतात, काही विरोध करतात. त्यांच्या विरोधामागचा किंवा पाठिंब्यामागचा विचार आपण समजून घेऊ शकलो नाही, तर आपण ते काम कधीच पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे हा केवळ तंत्रज्ञानाचा विषय नाही. हा मानवाने मानवाला समजून घेण्याचा भाग आहे आणि तोही तितकाच महत्त्वाचा आहे.

यासाठीच मला साहित्यिकांबद्दल मोठा आदर वाटतो. मानवी मूल्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांचा आविष्कार करण्यासाठी आणि मानवी जीवनाचे कंगोरे दाखवून त्याविषयीची संवेदनशील जाणीव निर्माण होण्यासाठी उत्तम साहित्याची मदत होते. विज्ञानयुगामध्ये प्रगती करायची असेल तर ते आवश्यक आहे.

शब्दांकन : सुहास पाटील

‘साधना’ साप्ताहिकाच्या १९ नोव्हेंबर २०२२च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......