‘भारत जोडो’ यात्रा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासाठी एक प्रकारे ‘social listening’चं काम करत आहे…
पडघम - देशकारण
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • ‘भारत जोडो’ यात्रेचं एक छायाचित्र आणि सोशल मीडियाविषयीचं एक प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 21 November 2022
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra काँग्रेस Congress सोशल मीडिया Social Media अल्गोरिदम Algorithm सोशल सर्किट Social Circuit सेलेब्रिटी Celebrity प्रभावी व्यक्ती Influencers पंचिंग बॅग Punching Bag सोशल लिसनिंग Social Listening सामूहिक हित Collective Good

“Darkness cannot drive out darkness, only light can do that. Hate cannot drive out hate, only love can do that.” -  Martin Luther King Jr.

१.

१९४७ साली झालेल्या फाळणीने एकाचे दोन देश निर्माण झाले आणि करोडो भारतीयांच्या मनांत न पुसणारी रेषा ओढली गेली. भारत-पाकिस्तानची ही सीमारेषा डोळ्यांनी दिसते. तेव्हापासून ‘त्या’ पलीकडच्या देशाशी आपली दुश्मनी अनेक माध्यमांतून व्यक्त होत असते. मात्र एवढा रक्तरंजित इतिहास असूनही भारत-पाकिस्तानातील सांस्कृतिक आदानप्रदान सुरू आहे. कलाकार, खेळाडू, साहित्यिक यांच्यात वैचारिक देवाणघेवाण होते.

हेच बांगला देशाच्या बाबतीतदेखील आहे. ७५ वर्षं शेजारी राष्ट्रांशी टोकाचे मतभेद असूनही संवादाइतपत संबंध जपणारे आपण भारतीय मात्र गेल्या काही वर्षांत शेजारी, मित्रमैत्रिणी, ऑफिसचे सहकारी आणि रक्ताची नाती यांच्याशी रोज युद्ध करतोय, संबंध तोडतोय व द्वेषाचं वाण वाटतोय. हे युद्ध आपल्या फोनमधून 24×7 खेळलं जातं. त्यात रोज वेगवेगळ्या नात्याची आहुती पडते. एका अर्थानं भारताची दुसऱ्यांदा फाळणी झालीय.

या नव्या फाळणीला सोशल मीडियाचं अल्गोरिदम कारणीभूत आहे. पहिल्या फाळणीमुळे केवळ एक रेषा आखली गेली, मात्र अल्गोरिदमने असंख्य रेषा आखून भारतीयांची मनं एकमेकांपासून तोडली. हिटलरच्या प्रोपगंडापेक्षा लाखो पटीनं हे तंत्र भयंकर आहे. याची मोहिनी एवढी आहे की, वर्षानुवर्षं पुस्तकात वाचलेलं, जुन्या लोकांनी शिकवलेलं विसरून लोकांच्या मनात ‘नवीन’च इतिहास तयार झाला… किंबहुना तो तसा तयार होईल, याची काळजी घेतली जातेय.

आपल्यापैकी बहुतेक जण एकमेकांवर संशय घेत भांडत कसे करत राहतील, यासाठी लाखो लोक काम करतात, हे मानायला आपलं मन तयार होत नाही. आपला मेंदू गोंधळलेला असल्याने तसा विचार करण्याची ताकद तो गमावून बसला आहे. सोशल मीडियाची रचनाही तशीच आहे. त्याचबरोबर या नव्या फाळणीत 24×7 बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्यांचं मोलाचं योगदान आहे. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कोट्यवधी सामान्य भारतीय नागरिकांप्रमाणे मीदेखील राजकारणाचे अत्यंत माफक ज्ञान बाळगून आहे. ज्यांनी स्वातंत्र मिळवून दिले, असे सगळेच आदरणीय होते, कारण तसं आम्हाला शिकवलं गेलं होतं. सावरकर मोठे की गांधी मोठे असले वाद आमच्या पिढीने बघितलं नाहीत, हे आमचं नशीबच म्हणावं लागेल. आम्हाला शिकवला गेलेला इतिहास हा द्वेषाचा नव्हता, तर समावेशकतेचा होता. मात्र सोशल मीडियाने व 24×7 बातम्यांचं दळण दळणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी आपल्या स्मरणशक्तीवर घाला घातला. सतत एकच गोष्ट डोळ्यासमोर आली की, तेच आपलं वास्तव होतं. आपल्याला द्वेष शिकवला जातो आहे. ज्याला इच्छा नव्हती त्याच्या मेंदूत द्वेषाचं बस्तान बसेल याची काळजी घेतली गेली, जातेय. आपल्या मेंदूची माहिती ग्रहण करून ती प्रक्रिया करण्याची क्षमता अत्यंत कमी आहे, मात्र या मेंदूवर सतत माहितीचा मारा करत, त्याला थकवत तो त्याच्या क्षमतेनुसार काम करणार नाही, याची सोय केली की, लोकांचं मन हवं तसं वळवता येतं.

हा ‘प्रोपगंडा २.०’ आहे. जरा आठवून बघा, काही वर्षांपूर्वी आपण राजकारणावरून भांडत बसायचो? एखादं मत पटलं नाही, तर टोकाला जायचो का? गेली तीन वर्षं ट्विटर हे माध्यम वापरताना माझ्या लक्षात आलंय की, गांधी-नेहरूच्या विचारधारेवर चालणारे लोकसुद्धा द्वेषाला प्रत्युत्तर करण्यासाठी द्वेषाचीच भाषा वापरत आहेत. हा एवढा मोठा बदल घडवून आणणारे काय मानसिकतेचे असतील?

२.

एक समाज म्हणून आपण दिवसेंदिवस खालची पातळी गाठतो आहोत. वर्षानुवर्षं आपल्यासोबत असणारे, पण आपल्यासारखे न दिसणारे लोक अचानक दुश्मन का वाटायला लागले, हा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारून पाहिला आहे का? निनावी ओळख घेऊन ऑनलाइन वावरणाऱ्यांनी जनमत बदलावं, नात्यात संशय निर्माण करावा, एकमेकांना गलिच्छ भाषेत बोलावं, काहीही माहिती नसताना केवळ ट्रेंडच्या विरुद्ध बोलतो/लिहितो म्हणून ट्रोल करावं, हे सगळे कुठून आले?

आपण समाज म्हणून एकमेकांपासून तुटलो आहोत, अल्गोरिदमने केलेल्या फाळणीमुळे विखुरले गेले आहोत. अचानक वाढलेले मानसिक आरोग्याचे प्रश्न तुटत चाललेल्या समाजाचीच परिणती आहे. अशा समाजाचं काय होतं, हे इतिहासातून आपण शिकलो आहोत. ब्रिटिशांनीसुद्धा हाच फंडा वापरत दीडशे वर्षं भारतावर राज्य केलं, १९४७च्या फाळणीची बीजं पेरली. जाती-धर्मावरून आपला समाज दुभंगलेला आहे, त्याचा फायदा सर्वच आक्रमकांनी घेतला.

हे केवळ भारतात नसून अमेरिकेतसुद्धा केंब्रिज अ‍ॅनालिटीकाचा प्रयोग जगानं बघितला, ज्याने जगातील सर्वांत ताकतवान लोकशाहीला झुकवलं. बरं झुकवणारा कोणी उच्चशिक्षित, राजकीय उपलब्धी असणारा माणूस होता का? नाही, एक अट्टल व्यावसायिक, ज्याला फक्त पैशाशी मतलब आहे, त्याला लोकांशी कसलंही देणंघेणं नाही.

याच घटनाक्रमातील पुढचं पाऊल म्हणजे एलन मस्कने ‘ट्विटर’ विकत घेणं हे होय. ‘ट्विटर’ काबीज केल्यापासून एलन मस्कने जो काही तमाशा लावला आहे, तो अभूतपूर्व म्हणावा असा आहे. लोकांना अचानक कामावरून काढून टाकणं, काहींना ऑफिसात डांबून कामाला लावणं, नशेत असल्यासारखं ट्विट्स करणं, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचं अकाउंट परत सुरू करणं, त्याची जाहिरात करणं, असे अनेक बालिश प्रकार मस्कने चालवले आहेत. त्याला विरोध करणारे लोक असले, तरी पाठिंबा देणारेही आहेत. सोबत चीनची दडपशाही व रशियाची दादागिरी सुरू आहेच.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लोकशाहीत आपलं मत गुप्त असतं. त्यामुळे २०१४पर्यंत तरी उघडपणे कोणत्याही पक्षाला जाहीर पाठिंबा देणं, नेत्याचं गुणगान करणं, असले प्रकार अस्तित्वात नव्हते. नागरिकच जेव्हा आपल्या नेत्याचं जाहीर समर्थन करतात, तेव्हा आपण लोकशाहीत राहत नाही, याची जाणीव धोक्याची सूचना देते.

अशा ऑनलाइन व ऑफलाईन तुटलेल्या भारतात आशा कुठे शोधणार?

३.

‘भारत जोडो’ हे पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा वाटलं की, राहुल गांधी एवढा द्वेषानं टराटरा फाडलेला भारत कुठे कुठे जोडणार?

गेल्या दहा वर्षांत गांधीपरिवार, विशेष करून राहुल गांधींचं पद्धतशीरपणे प्रतिमाहनन करण्यात आलं आहे. तो ‘प्रोपगंडा २.०’चा भाग आहे. ज्याचा काही दोष नाही, काही गुन्हा नाही, त्याला कशाची शिक्षा दिली जातेय? भारताच्या इतिहासात जिवंत असताना कोणत्याही राजकीय नेत्याला इतकं बदनाम केलं गेलं नसावं. मी तरी एवढी अपमानजनक मोहीम इतर कोणाच्याही बाबतीत बघितलेली नाही. वेगवेगळ्या प्रकारे छळ करत, राजकीय हल्ले करत, हरेक प्रकारची बदनामी करत राहुल गांधी गेली १० वर्षं समाजजीवनात वावरत आहेत, यातून त्यांच्या मानसिक कणखरतेची प्रचिती येते. गंमत म्हणजे केलेल्या आरोपांपैकी एकही आरोप कोणालाही सिद्ध करता आला नाही, तरीही त्यांना ‘पप्पू’ म्हणून हिणवलं जातं.

राहुल गांधींचं वय फक्त ५२ वर्षं आहे. गेल्या काही वर्षांत एवढे हल्ले सहन करत त्यांनी कडवटपणा येऊ दिलेला नाही. उलट या सर्व ते अग्निपरीक्षेतून तावूनसुलाखून निघाले आहेत, हे ‘भारत जोडो’च्या निमित्तानं दिसलं.

प्रत्यक्ष भेट, बोलणं, स्पर्श ही आपली नैसर्गिक भाषा आहे. त्यामुळे आपण गेली हजारो वर्षं एकत्र आहोत. उत्क्रांतीच्या सिद्धान्तानुसार आपला मेंदू प्रत्यक्ष समोर दिसत असलेल्या व्यक्तीच्या हालचाली, हावभाव व आवाज अशा अशाब्दिक संकेतानुसारच संवाद साधू शकतो. कारण आपल्या मेंदूला याच गोष्टी कळतात, असंच प्रोग्रॅमिंग आहे. मनुष्य/प्राणी यांच्याशी आपण जेव्हा प्रत्यक्ष संवाद साधतो, तेव्हा आपल्यात एक भावनिक सर्किट तयार होत असतं. आपण एकमेकांचे अशाब्दिक संकेत स्मरणात ठेवून त्यानुसार नातं पुढं न्यायचं वा नाही, कसं न्यायचं हे ठरवतो. गेली शेकडो वर्षं हीच मेंदूची सवय आहे, पण गेल्या काही वर्षांत आलेल्या समाजमाध्यमांनी आपल्या या मेंदूतील मूळ साच्याला पूर्णपणे धक्का लावलेला आहे.

सोशल मीडियावर संवाद साधताना आपल्या मेंदूतील नैसर्गिक ‘सोशल सर्किट’ जागृत नसतं. त्यामुळे जे काही बंध निर्माण होतात, ते कुचकामी, भावनेचा ओलावा नसणारे असतात. द्वेष, राग अशा गोष्टींचा शरीरावर व मनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे द्वेष करणाऱ्या आणि त्याची शिकार होणाऱ्यांना चिंता, निराशा, औदासीन्य हे मानसिक आजार होतात. त्या सोबत झोप न येणं, बीपी वाढणं, अशा शारीरिक तक्रारीही वाढतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

ऑनलाईन अनोळखी व्यक्तीने एखाद्या जाती-धर्माबद्दल द्वेष सुरू केला, तरी प्रत्यक्ष आयुष्यात आपले जे अनुभव आहेत, त्यावरून मत/निर्णय ठरवण्याऐवजी लोक त्या अनोळखी ऑनलाईन व्यक्तीचं ऐकतात. इंटरनेटला मर्यादा आहेत, त्याचा चलाखीने वापर करत तिथं सेलेब्रिटी/प्रभावी असणारी मंडळी ग्रुप बनवतात, त्यातून अजेंडा राबवला जातो. त्यात नसणार्‍या लोकांना टार्गेट केलं जातं, त्यांची हेतुपुरस्सर बदनामी केली जाते. राजकीय-सामाजिक प्रश्नांवर भावनिक ओकऱ्या काढून आपलं दुःख कमी होत नसतं, तर त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात सामना करावा लागतो. मात्र बहुतेकांमध्ये तो बदल घडवून आणण्याची हिंमत नसल्यानं ते सोशल मीडियाच्या नादी लागून खर्‍या प्रश्नांपासून पळ काढतात.

४.

सोशल मीडियामुळे लोक आत्मकेंद्री झाले आहेत. स्क्रीनवर दिसणारी प्रतिमा कोणीतरी तयार करू शकतो, तंत्रज्ञानाचा वापर करत आभास निर्माण करता येतो, मात्र समोरासमोर आपण एकमेकांना फसवू शकत नाही. पण मानसशास्त्रज्ञांचं ऐकण्याऐवजी अनोळखी व्यक्तीचं ऐकण्यात आणि त्याद्वारे स्वतःचं नुकसान करून घेण्यात लोकांना काहीच वाटत नाही. 

या द्वेषावर प्रेम, दया, करुणा, सहसंवेदना हा उपाय आहे. त्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा महत्त्वाची ठरते. ही यात्रा ‘सामाजिक सलोखा’ हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन कन्याकुमारीपासून सुरुवात करून काश्मीरपर्यंत जाणार आहे. या यात्रेला मिळणारा प्रतिसाद अनपेक्षित आणि अद्भुत आहे. हजारो, लाखो अनोळखी लोकांसोबत रोज २५ किलोमीटर चालणं, हे राहुल गांधींचं शारीरिक व मानसिक चारित्र्य मजबूत असण्याचं लक्षण आहे. ते ज्या प्रकारे सामान्य लोकांमध्ये मिसळत आहेत, ते उत्साह वाढवणारं आहे.

गेल्या आठ वर्षांत वेगवेगळ्या कारणांनी कंटाळलेली सामान्य जनता रस्त्यावर उतरून राहुल गांधींना साथ देत आहे, आपलं दु:ख त्यांच्याशी शेअर करत आहे. आमच्या पिढीत शिक्षण संपल्यानंतर नोकरी मिळाली नाही, तर रात्री झोप यायची नाही. आता शिक्षण संपवून दोन-तीन वर्षं झाली तरी मुलं-मुली मोबाइलच्या आधारे आयुष्य जगतात. बेरोजगारीचं प्रमाण वाढत असलं, तरुण मुलांची लग्नं जमत नाहीत. त्यातून मानसिक आरोग्याच्या समस्या वाढताहेत, आत्महत्या होत आहेत. तरीही तरुण-तरुणी रस्त्यावर उतरत नाहीत, प्रश्न विचारात नाहीत, एवढी गुंगी मोबाईल-सोशल मीडियाने आणली आहे.

असा गुंगीत असणारा समाज घाबरलेला असतो, त्याला दिशा नसते. त्याला आपला राग-संताप-चीड काढण्यासाठी एखादी ‘पंचिंग बॅग’ हवी असते. काँग्रेस ती ‘पंचिंग बॅग’ आहे, असं अनेक वेळा जाणवतं. त्यामुळेच गेल्या आठ वर्षांत ‘जे काही वाईट झालं आहे, ते काँग्रेसमुळेच’ असा ‘ट्रेंड’च बघायला मिळतो आहे.

अशा आभासी जगातील गोंधळलेल्या जनतेला प्रत्यक्ष जमिनीवर आणण्याचं काम ‘भारत जोडो’द्वारे होतंय. या यात्रेत काँग्रेसचा सोशल मीडिया सेल उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात साहित्यिक, कलाकार व खेळाडू या यात्रेत सामील होतील, अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. महाराष्ट्र काँग्रेसचे जुने, निष्ठावान नेते व जमिनीवर राबणारे कार्यकर्तेदेखील कमी प्रमाणात या यात्रेत दिसले. नेहमीप्रमाणे गांधीपरिवारातील व्यक्ती मेहनत करत आहे, म्हणजे राहुल गांधी चालत आहेत, मात्र अनेक काँग्रेस नेते त्यांच्या मागे गाडीतून प्रवास करत आहेत, असंच चित्र बघायला मिळालं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

काही ठिकाणी नाना पटोलेंनी लोकांना धक्काबुक्की केल्याचंसुद्धा व्हिडिओत दिसलं. पटोलेंची एकंदरीत भाषा व वागणं काँग्रेसला साजेसं नाही. ते उपरे वाटतात, मात्र अजूनही त्यांना का त्या पदावर ठेवलं आहे, हा प्रश्नच आहे.

सूडाच्या राजकारणानं देश पेटला असताना सामान्य माणसाला भीती वाटत आहे. अशा वेळेस ‘डरो मत’ म्हणणारा विश्वासू आवाज गरजेचा होता… जो राहुल गांधी देत आहेत. सध्याच्या घडीला निष्कलंक चारित्र्य असणारा तरुण पिढीचा नेता म्हणून राहुल गांधी यांचं नाव घेता येईल.

५.

‘Social Listening’ हा कॉर्पोरेटमधील एक संवादाचा प्रकार आहे. त्याचा अनौपचारिक मत गोपनीयरित्या, कोणताही अडथळा न आणता ऐकणं हा उद्देश असतो. ‘भारत जोडो’ ही यात्रा काँग्रेस व राहुल गांधी यांच्यासाठी एक प्रकारे ‘social listening’चं काम करत आहे. मात्र या यात्रेमुळे काँग्रेस पक्षात लगेच कायापालट होईल, ही अपेक्षा बालिश आहे. राहुल गांधी काँग्रेसची विचारधारा स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांसमोर प्रभावीरित्या आणत आहेत, मात्र त्यांना काँग्रेसच्या इतर नेत्यांनी साथ देणं तेवढंच गरजेचं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत, सुशिक्षित, अभ्यासू, कणखर पण शालीन अशा नेत्यांची दुसरी फळी नाही. आमच्या पिढीने पाहिलेले नेते वाचाळ व बेताल नव्हते. त्यांच्यात राजकीय मतभेद असले तरी मैत्रीपूर्ण संबंध होते. नळावरच्या भांडणांसारखे विवाद नव्हते. आजचे नेते मात्र ‘खून’, ‘बदला’, ‘सूड’ असे शब्द लोकांसमोर वापरतात. मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी व सामान्य जनतेनं एकमेकांशी नीट बोलावं, मैत्री करावी, अशी अपेक्षा कशी करणार? नितीन गडकरींसारख्या सर्वपक्षीय संबंध असणाऱ्या बुजुर्ग नेत्याला सगळ्यांशीच बोलतात म्हणून हिणवलं जातं, यावरून समाजाच्या मानसिकतेचा अंदाज येतो.

असं म्हणतात की, ‘नंगे से खुदा भी डरता हैं’. त्यामुळे या हिंसक व आक्रमक नेत्यांना तोडीस तोड उत्तर देणं हे आगीत तेल ओतण्यासारखंच आहे. सोशल मीडियामुळे ‘इंटरनेट सेंसेशन’ म्हणता येईल, अशी अनेक नावं - ज्यांना कोणताही पूर्वानुभव नाही, विशेष शिक्षण नाही, अभ्यास नाही व मुख्य म्हणजे नेतृत्व गुण नाही अशी - अचानक वर आली. अशी मंडळी दीर्घकालीन काम कितपत करू शकतील? कारण प्रत्यक्ष काम जमिनीवर होतं. त्यासाठी वेगळ्या क्षमता लागतात, याचा विचार काँग्रेसने करणं गरजेचं आहे.

इंदिरा गांधी यांच्यासारख्या करिष्मा असलेल्या नेत्याच्या पक्षात आज प्रभावी स्त्रीनेतृत्व नाही. आयटी, प्रोफेसर, कॉर्पोरेट कर्मचारी, खेळाडू अशा सुशिक्षित मंडळींचा राजकीय तटस्थपणासुद्धा धोकादायक आहे. ‘पहिली कंपनी नाही पटली, तर दुसरी शोधायची’ या धर्तीवर ‘राजकारण नाही पटलं, तर देश सोडून द्यायचा’ ही वृत्ती कचखाऊ आहे.

काहीही कारण नसताना उगाच भांडणार्‍या भारतीयांना सामूहिक हित समजावून सांगणं गरजेचं आहे. देशासमोरच्या आव्हानांचा एकत्र येऊन, आपापसांतील मतभेद विसरून, अहंकार बाजूला ठेवून, सोशल मीडियापेक्षा आपल्या शरीराची हाक व मनाची स्पंदनं ऐकत सामना करणं, ही काळाची गरज आहे.

‘भारत जोडो’ यात्रेमुळे हा विचार भारतीयांच्या मनात रुजला, तरी राहुल गांधींच्या कष्टाचं चीज होईल.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘भारत जोडो यात्रा’ : राहुल ‘सत्ता’ नाही, ‘राजकारण’च बदलायला निघालाय! - अमेय तिरोडकर

‘भारत जोडो यात्रा’ काही उद्दिष्ट साध्य करू पाहते. परंतु ही उद्दिष्टे संकुचित नसून चिरंतन मूल्यांवर आधारित आहेत - श्याम पाखरे

राहुल गांधीं यांची ‘भारत जोडो’ यात्रा  :  कशासाठी? कोणासाठी? - हेमंत कर्णिक

राहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का? - प्रवीण बर्दापूरकर

‘भारत जोडो’ ही काँग्रेसची आणि एका अर्थाने राहुल गांधींची पदयात्रा आहे आणि या यात्रेचा उद्देश देशाला जोडणं आणि सर्वांनी एकत्र येऊन देश बळकट करणं हा आहे, पण... - विवेक कोरडे

काँग्रेसची सर्वस्तरीय वेगवान घसरण सुरू आहे, ती थांबता थांबत नाही. ‘बुडत्याचा पाय खोलात’ याप्रमाणेच ती स्थिती आहे - विनोद शिरसाठ

काँग्रेस आणि राहुल गांधींचे भवितव्य ठरवणारी पदयात्रा... - प्रवीण बर्दापूरकर

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्राद्वारे जनतेची मनं आपल्या बाजूनं जरी वळवली, तरी त्याचा उपयोग तो काय? - कॉ. भीमराव बनसोड

राहुल गांधी काही महात्मा गांधी नव्हे, परंतु तो महात्म्याच्या पदचिन्हांचा शोध घेत निघाला आहे, हे नक्की! - श्याम पाखरे

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत... - शंकर सोलापूरकर

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......