अजूनकाही
मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचा मार्च-एप्रिल-मे-जून २०२२चा अंक ‘श्रीचक्रधर अष्ट जन्मशताब्दी विशेषांक’ म्हणून प्रकाशित झाला आहे. चालू वर्ष हे श्रीचक्रधरांचे अष्ट जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेषांकाचे संपादन हंसराज जाधव यांनी केले आहे. त्यांनी या विशेषांकासाठी लिहिलेले हे संपादकीय...
.................................................................................................................................................................
प्रस्तुत वर्ष हे सर्वज्ञ श्रीचक्रधरांचे अष्ट जन्मशताब्दी वर्ष! मराठी भाषकांसाठी ही मोठीच आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या भूमीत पहिल्यांदा समाजक्रांतीचे बीज पेरले ते श्रीचक्रधरांनी. वर्णव्यवस्थेला नाकारत सर्व जातीवर्णातल्या लोकांना त्यांनी जवळ केले. स्त्रीस्वातंत्र्याचा उच्चार जाहीरपणे करत त्यांना मोक्षाचा अधिकार बहाल केला. धर्माचे ज्ञान संस्कृत भाषेत बंदिस्त झालेल्या काळात मराठीसारख्या लोकभाषेला धर्मभाषेचा दर्जा देऊन तिच्या वापराचा आग्रह धरला आणि सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे खऱ्या अर्थाने खुली केली. धर्मज्ञानाच्या तात्त्विक व्यवहाराबरोबरच दैनंदिन व्यवहारातही मराठीचा आग्रह धरला. तोच आदर्श पुढे त्यांच्या शिष्यपरिवारानेही डोळ्यांपुढे ठेवला. त्यातूनच ‘लीळाचरित्रा’सारखा आद्यग्रंथ आणि महदंबेसारखी आद्य कवयित्री मराठी भाषेला मिळाली.
श्रीचक्रधरांच्या या अष्ट जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने श्रीचक्रधरांचे जीवन आणि कार्य, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, ‘लीळाचरित्र’ आणि त्यातील भाषा या बाबी मराठी वाचकांपुढे नव्याने याव्यात या हेतूने आम्ही ‘प्रतिष्ठान’चा ‘सर्वज्ञ श्रीचक्रधर अष्ट जन्मशताब्दी विशेषांक’ संपादित करत आहोत. यात मान्यवर अभ्यासकांनी सर्वज्ञांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कार्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे.
आधुनिक संज्ञापन शास्त्रात वक्ता, श्रोता, संदर्भ, संदेश, संपर्क आणि माध्यम हे जे सहा घटक असतात, यांचा योग्य वापर करून श्रीचक्रधरांनी सामान्यजनांशी जे भाषिक संप्रेषण साधलं, ते अफलातून परिणामकारक आहे. त्याचा सूत्रबद्ध ऊहापोह प्राचार्य खासेराव शितोळे यांनी ‘श्रीचक्रधर स्वामींची अध्यात्म संज्ञापन प्रणाली’ या लेखात केला आहे. माणसा-माणसांमध्येच नव्हे, तर प्राण्या-प्राण्यांमध्ये आणि माणसा-प्राण्यांमध्येसुद्धा भेद करू नये, असे तत्त्व प्रतिपादन करणाऱ्या श्रीचक्रधरांची समत्वदृष्टी लीळाचरित्रातून पदोपदी पाहायला मिळते. त्याची चर्चा डॉ. अशोक राणा यांनी ‘सर्वज्ञांची समत्वदृष्टी’ या लेखात विस्तृतपणे केली आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
डॉ. सतीश बडवे यांनी ‘भाषिक अभिव्यक्तीचे सौंदर्य लाभलेला गद्यग्रंथ : लीळाचरित्र’ या लेखात लीळाचरित्राच्या भाषासौंदर्याची चर्चा नव्या अंगाने घडवून आणली आहे. श्रीचक्रधरांचे यथासांग दर्शन घडवणाऱ्या ‘लीळाचरित्रा’तील ललित आणि ललितेतर गद्यशैलीचे दाखले देत त्यातील भाषेचे अल्पाक्षरत्व, त्यातील सहजता, रमणीयता, भाषेचे घरगुती आणि देशी मराठी वळण, या गोष्टी त्यांनी वाचकांपुढे मांडल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब बीडकर यांचा ‘महानुभाव संप्रदायाचा उत्तर भारतातील प्रचार आणि प्रसार’ हा वेगळ्या धाटणीचा लेख यात मुद्दाम दिला आहे. श्रीचक्रधरांच्या रूपाने मराठी भाषा आणि साहित्य महाराष्ट्राबाहेर पोहचवण्यात आणि त्याचे अस्तित्व वाचन, पठणाच्या रूपाने आजही शाबूत ठेवण्यातले महानुभावांचे योगदान या लेखाने अधोरेखित होते. ‘श्रीचक्रधर हे आद्य कुशल अध्यापक होते.’ असे विधान प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी ‘श्रीचक्रधर स्वामींची अध्यापन पद्धती’ या लेखात केले आहे. यात त्यांनी ज्ञाताकडून अज्ञाताकडे, प्रश्नोत्तरांतून विचार प्रतिपादन, नित्यव्यवहारातून तत्त्वज्ञानाकडे इत्यादी वर्तमान अध्यापनशैलीतील बीजे श्रीचक्रधर आपल्या निरूपणात कसे वापरायचे, यावर प्रकाश टाकला आहे.
श्रीचक्रधरांचा महाराष्ट्रातला संचार हा चार यादव राजांच्या (सिंघणदेव, कान्हरदेव, महादेव, रामदेव) काळातला राहिलेला आहे. या संपूर्ण राजकीय स्थितीचा आढावा घेत श्रीचक्रधरांच्या (पूर्वाश्रमीचे हरिपाळदेव) राजकीय वंश परंपेरचा विस्तारपट डॉ. महंत सोनपेठकरांनी त्यांच्या ‘श्रीचक्रधर स्वामी आणि तत्कालीन राजकीय स्थिती’ या लेखात सादर केला आहे.
श्रीचक्रधरांनी लोकभाषेच्या रूपाने लोकतत्त्वाचा अवलंब केला. भ्रमंती करत असताना श्रीचक्रधरांना लोकमानसाचे जे दर्शन झाले, त्यातून प्राप्त झालेले लोकतत्त्व त्यांनी निरूपणात वेळोवेळी वापरल्याचे दाखले ‘लीळाचरित्रातील लोकतत्त्वाचे प्रतिबिंब’ या लेखात डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी सोदाहरण दिले आहेत. डॉ. राजेंद्र राऊत यांनी ‘कथाकार श्रीचक्रधर’ वाचकांपुढे मांडला आहे. त्यांनी श्रीचक्रधर निरूपित दृष्टांतांचे कथा आणि वार्ता यात विभाजन करून आलेखाद्वारे केलेली वर्गवारी नव्या संशोधकांना सुक्ष्माभ्यासाकडे नेणारी आहे.
श्रीचक्रधरांना आयुष्यभर जो त्रास झाला तो मुख्यत: ‘हा आमुचा मार्ग उच्छेदिती’ आणि ‘स्त्रियांना वेधती’ या दोन आरोपांखाली. आपल्या स्वातंत्र्याची भाषा करणारे ‘जी:जी:’ आपल्याला प्रश्न विचारण्याची संधी देतात, आपल्या प्रश्नाची उत्तरे देतात, याची खात्री स्त्रियांना पटली. त्यामुळे विधवा, परित्यक्ता, संसारतापाने पोळलेल्या अनेक स्त्रिया स्वामींच्या परिवारात दाखल होणे स्वाभाविक होते. या कारणाने श्रीचक्रधरांच्या परिवारात स्त्रियांचे प्रमाण अधिक होते. यातील महत्त्वाच्या स्त्रियांचा, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांसह आढावा डॉ. संजय जगताप यांनी ‘श्रीचक्रधर स्वामींच्या परिवारातील स्त्रिया’ या लेखात घेतला आहे.
आपल्या अनुयायांनी ब्राह्मण्यत्व सोडावं आणि शूद्रांना आपल्या बरोबरीने वागवावं, यासाठी श्रीचक्रधरांनी दिलेली शिकवण, सांगितलेला आचारधर्म आणि आचारधर्माच्या पालनासंबंधीची त्यांची जागरूकता या संबंधीची मांडणी मी ‘सर्वाधमत्व ब्राह्मण्यत्व’ या लेखात केली आहे. श्रीचक्रधरांना बाप, भाऊ मानून त्याच्या प्रेमास पात्र होण्याची आळवणी करणारी, श्रीचक्रधरांचे गुणवर्णन करणारी स्त्रियांची ओवीगीते महानुभावांच्या लोकसाहित्यात पुष्कळ आहेत. त्याचा संशोधनात्मक परिचय मंगल पठाडे यांनी ‘स्त्रियांच्या ओवीगीतांतून घडणारे श्रीचक्रधर दर्शन’ या लेखातून करून दिला आहे.
मध्ययुगीन संत, महापुरुषांच्या जीवनकार्यावर अनेक भक्तिगीते, आळवणीगीते किंवा लोकपरंपरेत ओव्या, पदं निर्माण झाल्याचे पहावयास मिळते पण पोवाडे लिहिल्याचे कुठे फारसे आढळत नाही. इथे मात्र आम्ही श्रीचक्रधरांच्या चरित्रातील ‘श्रीचक्रधर आणि निळभट्ट भंडारेकार भेट’ या प्रसंगावर आधारित असलेला शाहीर दामोदर वजीरगावकर यांचा पोवाडा दिला आहे. श्रीचक्रधर स्वामी आणि भक्त निळभट्ट भंडारेकार यांच्यातील अद्वैत आणि भंडारेकारांची निष्ठा या बाबी शाहिरांनी पोवाड्यातून वर्णन केल्या आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी श्रीचक्रधरांच्या आयुष्यातील ठळक घटनांचा उल्लेख करत त्याचे संदर्भमूल्य ‘बा चक्रधरा’ या दीर्घकवितेच्या रूपाने मांडले आहे.
या विशेषांकाची रचना करत असताना या व्यतिरिक्तही काही महत्त्वाचे लेख आम्हाला प्राप्त झाले, पण ते सर्वच या ठिकाणी घेणे शक्य झाले नाही. श्रीचक्रधर सर्वार्थाने वाचकांपुढे उभे राहावेत आणि एक संदर्भमूल्य असलेला अंक हाती यावा, अशी धारणा ठेवून आम्ही हे लेख या ठिकाणी निवडले आहेत. लेख पाठवणाऱ्या सर्व लेखकांचे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने मी आभार मानतो.
वाचक आणि श्रीचक्रधरप्रेमी अभ्यासक या अंकाचे निश्चितपणे स्वागत करतील, अशी आशा करतो.
..................................................................................................................................................................
लेखक हंसराज जाधव पैठणच्या ‘प्रतिष्ठान महाविद्यालया’मध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.
hansvajirgonkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment