‘भारत जोडो यात्रा’ : राहुल ‘सत्ता’ नाही, ‘राजकारण’च बदलायला निघालाय!
पडघम - देशकारण
अमेय तिरोडकर
  • राहुल गांधींसोबत चालताना लेखक - १५ नोव्हेंबर २०२२
  • Sat , 19 November 2022
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra काँग्रेस Congress

१.

सहसा लोकप्रतिनिधीना ‘अहो-जाहो’ करावं असा संकेत असतो. मी तो एरव्ही पाळतो, पण आज नाही. आज मी राहुल गांधींना ‘अहो-जाहो’ करणार नाही, तसं केलं तर मला ‘भारत जोडो’ यात्रेत जे दिसलं, ते नेमकं मांडताच येणार नाही. कारण या यात्रेत काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार, गांधी-नेहरू घराण्याचे वारसदार असलेले राहुल गांधी जरी चालत असले, तरी त्यांना बघायला आलेल्या हजारोंसाठी ते ‘तो राहुल गांधी’च आहेत.

मी बघितलंय, अक्षरशः शेकडो मुलींना त्याला ‘ए राहुल’ म्हणताना आणि त्यालाही त्या हाकेला हसून प्रतिसाद देताना.

मी बघितलंय, नऊवारी साडीतल्या महिलेला त्याच्या चेहऱ्यावरून फिरवलेली हाताची बोटं आपल्या दोन्ही कानशीलांकडे नेऊन कडाकडा मोडताना.

मी बघितलंय, अक्षरशः हजारो तरुणांना त्याच्या एका क्षणभराच्या शेकहॅन्डसाठी काट्याकुट्यातून झपाटल्यासारखं धावताना.

मी बघितलंय, आपल्या चिमुकल्यांना खांद्यावर घेतलेला बाप पळत पळत राहुलला ‘ए राहुल’ अशी हाक मारताना, जसा तो आपल्या त्या खांद्यावरच्या मुलाला मारत असतो!

या यात्रेत मी बघितलंय, या देशातल्या त्या तमाम डोळ्याना ज्यांना द्वेष आणि हिंसेच्या वातावरणातून बाहेर येऊन स्वच्छ आकाश बघण्याची आस आहे! जिथे लिंग, वर्ण, वय, वेष, भाषा, जात, धर्माचा भेद ओलांडून हजारोंच्या संख्येने जमणारी माणसं त्या एका माणसाला ‘ए राहुल’ म्हणून हाक मारत आहेत.

त्या यात्रेच्या या नायकाला मग मी तरी ‘अहो-जाहो’ कसं करू?!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

राहुल त्याच्या या आसेतुहिमाचल यात्रेला ‘तपस्या’ म्हणतोय.

ती तपस्या, जी गोपाळकृष्ण गोखलेंनी मोहनदास करमचंद गांधींना करायला लावली.

ती तपस्या, जी महात्मा गांधींनी आमच्या कणकवलीच्या आप्पासाहेब पटवर्धनांपासून ते मोतीलाल नेहरूपर्यंत सर्वांना करायला लावली.

ज्याच्या त्याच्या तपस्येने ज्याला त्याला त्याच्या वाट्याचं सत्य सापडतं. ते सत्य असतं चिमटीत पकडण्याएवढंच. पण जेव्हा ते सापडतं, तेव्हा विश्वाचा अवघा पसारा त्याच्या त्या चिमटीत येतो. राहुलला त्याच्या या तपस्येत हे असंच त्याचं सत्य सापडलंय. त्याचं प्राक्तन त्याने ओळखलंय. आणि त्याने हसत हसत या प्राक्तनाला स्वीकारलंयदेखील.

राहुलनी जेव्हा ही यात्रा सुरू केली, तेव्हा ते एक अपयशी आणि प्रचंड हेटाळणी झालेले नेते होते आणि ही यात्रा जेव्हा आता कुठे मध्यावर आलीय, तेव्हा हा माणूस सत्तेच्या खेळाचे सगळे बनचुके नियम उधळून लावणारा आणि या देशाच्या आत्म्याला प्राणांतिक साद घालणारा राहुल झालाय! अनेकांना वाटत होतं की, ते ही यात्रा पूर्ण करणार नाहीत. अनेकांना वाटत होतं की, ते निव्वळ राजकीय यात्रा काढतील आणि बनचुक्यांच्या खेळात रमतील. पण त्या सगळ्यांच्या अपेक्षा आणि समजांना फोल ठरवत राहुलने ही यात्रा गांधींच्या सत्याग्रहासारखी शुभ्र आणि नितळ ठेवलीय! आणि हेच या यात्रेच्या कुणीही नाकारू न शकणाऱ्या तेजाचं कारण आहे!!

...........................................................................................................................................

अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, भारत जोडो यात्रेमुळे देशात सत्ता परिवर्तन होईल का? राहुल गांधी एक राजकीय नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाने ही यात्रा काढलीय. त्यामुळे केंद्रात भाजपचा पराभव होईल का, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. ‘भारत जोडो’मुळे सत्ता परिवर्तन होईल की नाही, हा आज मुद्दाच नाही. भाजपची सत्ता ज्या भीती आणि भ्रम यांच्या जीवावर आहे, ते दूर करणे हे काम ‘भारत जोडो’ला करायचे आहे. हे अधिक महत्त्वाचे, दीर्घकालीन संघर्षाचे आणि येत्या काळात रचनात्मक राजकारणाचे असणार आहे. द्वेष पसरवून सत्ता मिळवणे आणि मिळालेली सत्ता द्वेष पसरवण्यासाठी वापरणे, या दुष्टचक्रात देशाचं राजकारण अडकलेलं आहे. त्यातून बाहेर यायचं असेल तर त्यासाठी ‘भारत जोडो’ हे पहिलं पाऊल आहे.

...........................................................................................................................................

मला अगदी खरंखुरं सांगा की, राहुलने अशी यात्रा काढावी, हे आपल्या सगळ्यांना वाटत होतं की नाही? खरं बोला. अगदी हे वाचताना एक मिनिट थांबा. स्वत:शी बोला. भाजप-मोदी-शहा-संघ यांच्या मूल्यहीन सत्ताकारणाला आव्हान देण्यासाठी राहुलने रस्त्यावर उतरलं पाहिजे, असं आपल्याला वाटत होतं की, नाही? जेव्हा जेव्हा राहुल परदेशात जातोय, असं आपल्याला कळायचं, तेव्हा तेव्हा आपण चिडून ‘अरे, इथे ये, रस्त्यावर उतर’ म्हणायचो की नाही? तुम्ही क्षणभर विचार कराल तेव्हा लक्षात येईल की, ‘हो, आपल्याला हेच वाटत’ होतं. हे अगदी असंच व्हावं असं वाटत होतं.

आता पुढचा विचार करा. जेव्हा रस्त्यावर मोठं आंदोलन उभं रहावं असं वाटायचं, तेव्हा ते कुणी उभारावं असं वाटायचं? तुमच्या लक्षात येईल की, आपल्याला तेव्हाही राहुलनेच पुढाकार घ्यावा असं वाटायचं. म्हणून मला जेव्हा अनेक राहुल विरोधक विचारतात की, ‘ही यात्रेची आयडिया कुणाची?’ मी सांगतो, ‘लोकांची! या देशाची!!’ राहुलने फक्त इतकंच केलं की, कुठल्या तरी एका मुद्द्याला धरून यात्रा काढण्यापेक्षा गेल्या आठ वर्षांत द्वेष, हिंसा, विखार यांच्यात होरपळणाऱ्या या देशात त्याने माणसांना माणसांशी जोडणारी ‘भारत जोडो’ यात्रा काढली!!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२.

मी जेव्हा या यात्रेला जायचं ठरवलं, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अनेक प्रसंग आले. मला आठवला माझाच एक फेसबुक स्टेटस जो राहुल यांची खिल्ली उडवणारा होता. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या टर्ममध्ये जेव्हा त्यांनी जमीन संपादन कायद्यात बदल आणू बघितले, तेव्हा विरोधकांनी संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला राहुल आले नव्हते. मी तेव्हा लिहिलं होतं – ‘गांधीजींचा दांडी मार्च होता, राहुल यांनी मार्चलाच दांडी मारली.’ वर्षं २०१५. आज त्याला सात वर्षं लोटली. आता राहुल एक अशी यात्रा काढत आहेत, जिची तुलना ती संपायच्या आधीच जगभरातल्या गाजलेल्या यात्रांशी होऊ लागलीय! काळ इतका बदललाय की, त्या यात्रेत सहभागी न झाल्याबद्दल राहुल यांच्यावर टीका करणारा माध्यमांचा वर्ग, आज राहुल यांनी देश जोडण्यासाठी काढलेल्या यात्रेबद्दल एक अक्षर बोलायला तयार नाहीये!!

घटनांची आठवण ही फटाक्यांच्या माळेसारखी असते. एकदा काहीतरी आठवलं की, मग पाठोपाठ फटाके फुटत जातात. साल २०१६. एक दिवस राहुल यांचा मित्र खासदार राजीव सातव यांनी मला त्यांच्या दिल्लीतील घरी बोलावलं. गेलो तेव्हा त्यांनी राहुल यांनी राजीव यांचा संसदेत बोलताना काढलेला फोटो त्यांना भेट दिला होता, तो दाखवला. सातव खुश होते. मला म्हणाले, ‘आपण दोघांनी मिळून या फोटोसोबत एक फोटो काढुया.’ मी म्हटलं, ‘नाही. ज्या नेत्यासोबत फोटो काढावा असं आतून वाटावं असा नेता आजकाल नाही. म्हणून मी नेत्यांसोबत फोटो काढत नाही.’ मला म्हणाले, ‘कोणत्या नेत्यासोबत काढला असता?’ म्हटलं, ‘तसे नेते अनेक. पण अगदी अलीकडे गेलेला आणि ज्याच्यासोबतचा फोटो घरी फ्रेम करून लावला असता, असा नेता म्हणजे हरकिशनसिंग सुरजित!’ सातव हसले. म्हणाले, ‘अमेयजी, आज ना उद्या तुम्ही माझ्या नेत्यासोबत पण एक फोटो काढाल!’ मी म्हटलं, ‘तुमचा नेता मला तशी संधी देवो राजीवजी. तो जर विधायक राजकारणासाठी लोकांमध्ये गेला, तर मीच तुम्हाला सांगेन की, मला त्याच्यासोबत फोटो काढायचा आहे!’

लोकं म्हणतात नियती क्रूर असते, मी म्हणतो नियती कविता करते. मी राहुलच्या ‘भारत जोडो’ला पहिल्यांदा बघितलं, तो दिवस होता १३ नोव्हेंबर. आणि कुठे बघितलं? कळमनुरीमध्ये! राजीव सातवच्या गावात!! नियतीची ही कविता किती जीवघेणी बघा, राहुल राजीवच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहायला येतोय, हे कळलं म्हणून यात्रेला त्या दिवशी सुट्टी असतानाही मी कळमनुरीला गेलो. सातवांच्या स्मृतींचा जागर केला, राहुलला यायला वेळ लागणार होता! सातवांच्या समाधीकडे उभा राहिलो, तेव्हा एक क्षण वाटलं, ‘हा माणूस असता तर राहुलसोबत फोटो काढायची व्यवस्था करून दे’ असं सांगितलं असतं! शेवटी १५ नोव्हेंबरला सकाळी राहुल चालताना त्याच्यासोबत फोटो काढला आणि माझ्या हृदयात असलेल्या मित्राला दिलेला शब्द मी पूर्ण केला!! असो!!!

मी यात्रेत एकटा गेलो नाही. माझ्यासोबत ६५ तरुण-तरुणी होते. रायगड-माणगाव इथल्या ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारका’तर्फे आणि ‘फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी’ला सोबत घेऊन गेल्या वर्षभरापासून लोकशाही मूल्यांचा जागर आणि संवैधानिक नीतिमत्ता या मुद्द्यांना धरून एक शिबीर चालतं. ‘महानिर्धार’ असं नाव आम्ही त्याला दिलं आहे. माझ्याकडे स्मारकाची कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आहे. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही साने गुरुजींची भूमिका आम्ही मानतो. प्रेम आणि सद्भावनेची ‘भारत जोडो यात्रा’ हेच तर सांगतेय! आम्ही गेलो ते आमच्या ‘महानिर्धार’ या बॅनरसोबत. आम्ही टी शर्ट बनवून घेतले. त्यात भारताच्या नकाशात १८ भाषांत भारत जोडो लिहिलेलं होतं. साने गुरुजींनी ‘आंतरभारती’ची भूमिका सर्वप्रथम घेतली आणि सर्व भारतीय भाषांना भगिनी मानून ‘भारत जोडो’ला हातभार लावला! आमच्या टी शर्टवर हीच ‘भारत जोडो’ची भूमिका दिसते! आणि त्यावर राहुल गांधींचा फोटोसुद्धा आहे! या यात्रेचा तो नायक आहे, हे नाकारण्याचा कृतघ्नपणा आम्ही करत नाही!! त्यामुळे लोकांनी मला विचारलं, ‘तुम्ही काँग्रेस जॉईन केली का?’ मी म्हटलं, ‘नाही! काँग्रेसने आम्हाला जॉईन केलंय!! हा आता ‘जनांचा प्रवाहो चालिला’ आहे, ‘दुरितांचे तिमिर जावो’ म्हणत!!!’

३.

मागच्या पंचवीस-तीस वर्षांत उथळ आणि उठवळ, प्रतिक्रियावादी आणि कातडीबचाव सोयीस्कर राजकीय भूमिका घेतल्यामुळे अनेकांना सखोल, सविस्तर विचार करून दीर्घकालीन समाजकारणाची व्यापक राजकीय भूमिका घेता येते, हेच सुचत नाही. आमची तशी वेळ आलेली नाही. परंपरेतून आम्ही रुजून आलेलो आहोत आणि नवतेच्या, आधुनिकतेच्या आकाशात बघत आहोत! आमच्या भूमिका पिंपळाला फुटणाऱ्या कोवळ्या पानाइतक्या नितळ आणि स्वच्छ आहेत!! ‘भारत जोडो यात्रा’ हा आजच्या वातावरणातला असाच एक प्रयोग आहे! आणि म्हणूनच आम्ही त्याच्याशी स्वतःला जोडून घेतलं आहे!!

...........................................................................................................................................

मी हे बघून आहे की, महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांनी आपल्या मुलांना प्रमोट करण्यासाठी यात्रेचा वापर केला. पण मी हेही बघून आहे की, जितकं या अशा बड्या लोकांच्या मुलांना राहुल भेटला ना, त्याच्या किमान १०० पट जास्त तो सामान्य लोकांना भेटला. माझ्याच टीममधल्या २३ जणांना त्याने हात हलवून बोलावून घेतलं. मी त्याच्या मागून चालत होतो, तेव्हा त्या पाऊण तासाच्या चालीत त्याने अनेकांना बोट दाखवून बोलावून घेतलं. ही संख्या नेत्यांच्या मुलांपेक्षा नक्कीच जास्त आहे. ज्यांना वस्तुस्थितीला प्रचाराचं वळण द्यायचं असतं, ते असली कारणं शोधत असतात. त्यांचे ‘बोलविते धनी’ कोण आहेत, हे काय मी सांगायला हवं?

...........................................................................................................................................

आम्ही थेट यात्रेत सहभागी झालो नाही. ‘नफरत छोडो, भारत जोडो’ हा विचार घेऊन आम्ही आधी तीन दिवस म्हणजे ११ नोव्हेंबरपासून स्वतंत्र यात्रा काढली. वसमत या गावापासून आमची ही यात्रा सुरू झाली. वसमत ते हिंगोली हे ६५ किलोमीटरचे अंतर आम्ही पायी चालून अडीच दिवसांत पूर्ण केले. या अडीच दिवसांत आम्ही वाटेत येणाऱ्या गावंतल्या लोकांशी, शेतकऱ्यांशी, मजुरांशी, स्त्रियांशी, लहान मुलांशी बोललो. द्वेष, हिंसा यांच्याऐवजी प्रेम, सद्भावना हीच कशी शाश्वत मूल्य आहेत, हे लोकांशी बोललो. या अडीच दिवसांत सर्वसामान्य लोकांनी आमच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद दिला. जो आम्हा स्वतःलाच आश्चर्यचकित करणारा होता.

एका गावातून जात असताना एक ७५ वर्षांच्या आजी आल्या. त्यांना वाटलं मुख्य यात्रा हीच आहे की, काय? त्यांनी आमच्यातल्या एकाला विचारलं, ‘तुमच्यात इंदिरेचा नातू कोण आहे?’ मग आम्ही त्यांना समजावून सांगितलं की, ‘इंदिरेचा नातू वेगळा आहे आणि ही यात्रा त्या यात्रेला जाऊन मिळणार आहे’. आजीना आम्ही विचारलं की, तुम्हाला त्या नातवाचं नाव ठाऊक आहे का? आजी म्हणाल्या, ‘नाव ठाऊक नाही, पण इंदिरेचा नातू देशासाठी चालतोय हे माहिती आहे!’ हा आम्हा सर्वांना धक्का होता! आणि मला पत्रकार म्हणून एक अनुभवसुद्धा!

मुख्य प्रवाहातील माध्यमांनी ज्या यात्रेवर अघोषित बहिष्कार घातलाय, त्या यात्रेबद्दल तळागाळातील शेवटच्या माणसाला - जो माणूस सोशल मीडिया वापरत नाही आणि बातम्या बघत नाही - त्या माणसाला या यात्रेबद्दल नीट माहिती आहे, हीच खरी ‘ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले’ या प्रक्रियेची ताकद आहे!

मला सांगा, महात्मा गांधी मीठ उचलायला चालले ते गुजरातमध्ये. तेव्हा आजच्यासारखे टीव्ही, रेडिओ, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप काही नव्हतं. पण तरीही तेव्हा पेशावरपासून मिरपूरपर्यंत पसरलेल्या देशाला हे कसं कळलं होतं की, गांधीबाबा आपल्यासाठी चालतोय! No idea can stop whose time has come! ‘भारत जोडो’चा सर्वदूर प्रसार प्रचार झालेला आहे, कारण ही या काळाची नितांत गरज आहे आणि ती गरज इथल्या प्रत्येक भारतीयाला जाणवलेली आहे!!

४.

आम्ही आमच्या स्वतंत्र यात्रेत चालत असताना अनेक अनुभव आले. नाक्यानाक्यावर थांबून आम्ही समतेची गाणी गायचो. आमच्यातले काही जण पोवाडा किंवा देशभक्तीपर गाणी म्हणत. लोक आम्हाला स्वतःहून पाणी आणि फळं देत. आमच्या यात्रेची चौकशी करत. आणि मुख्य यात्रेत आपण सहभागी होऊ शकत नसलो, तरी आपला कसा त्या यात्रेला मनापासून पाठिंबा आहे हे सांगत. हा देश गेल्या आठ वर्षांत बेरोजगारी, महागाईने जितका पिचलाय, तितकाच त्याला आता हिंसेच्या राजकारणाचा तिटकारा आलाय. त्याला हे रोजच्या रोज टीव्हीमध्ये दळलं जाणारं द्वेषाचं दळण नकोय. तो यातून बाहेर पडण्याचा मार्ग बघतोय. ‘भारत जोडो’ यात्रा नेमकी याच वेळी निघालीय!

आणखी एक असाच अनुभव सांगितला पाहिजे. सिंदगी नावाच्या गावातून जेव्हा यात्रा जात होती, तेव्हा आम्हाला तिथल्या गावकऱ्यांनी थांबवलं. सगळ्यांची चहा-पाण्याची व्यवस्था केली. आणि ‘महानिर्धार’ प्रकल्पबद्दल आमच्याकडून सविस्तर माहिती घेतली. जेव्हा आम्ही आमची ही यात्रा का काढतोय, हे सांगितलं तेव्हा या गावातल्या अनेक बुजुर्ग मंडळींनी आताची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रातून निघून गेली की, तुम्ही लोकांनी अशीच एक राज्यभर यात्रा काढा, असं आम्हाला सुचवलं. काहींनी तर आम्ही पण महिनाभर तुमच्यासोबत राज्यभर येऊ आणि हे मुद्दे शक्य तितक्या लोकांना समजावून सांगू असं म्हटलं. हे आमचं यश नाही. हे टीम ‘महानिर्धार’चं यश नाही. तर राहुलच्या ‘भारत जोडो’ यात्रेने देशातल्या तमाम सर्वहारा वर्गाला जो आत्मविश्वास दिलाय, त्याचं हे प्रतीकात्मक उदाहरण आहे!

लोक स्वतःहून रस्त्यावर चालायला तयार झालीत. या ना त्या प्रकारे देशाच्या या घुसळणीत स्वतःला जोडून घेऊ पाहतायत. प्रत्येक जण स्वतःच्या कुवतीने या यात्रेसाठी आणि मुख्यतः इथल्या शांती आणि सौहार्दासाठी योगदान देऊ पाहतोय. ‘भारत जोडो’ यात्रेचा मुख्य नायक जरी राहुल गांधी असला तरी आता ही त्याची एकट्याची यात्रा राहिलेली नाही. द्वेष आणि हिंसेचे घृणास्पद राजकारण नाकारणारे ते सर्वसामान्य जनतेचे एक ‘पोलिटिकल स्टेटमेंट’ झाले आहे.

...........................................................................................................................................

दीपक कराळे नावाचा माणूस आपल्या तीन वर्षांच्या मुलाला खांद्यावर घेऊन उभा होता. मुलगा विचारे, ‘कधी येणार राहुलदादा?’ दीपक सांगे, ‘येणार हां, थांब. आला की तुला भेटवतो.’ मी दीपकला विचारलं कधीपासून चालताय? म्हणाला, ‘तासभर तरी झाला असेल. मुलाला राहुलला भेटायचंच आहे.’ मी म्हटलं, ‘कशाला भेटायचं आहे? फोटो काढायचाय काय?’ तो तीन वर्षांच्या मुलाचा बाप काय विचार करत होता बघा. दीपक म्हणाला, ‘नाही साहेब. फोटोसाठी नाही करत आहे. मी मागचे दोन महिने राहुलचे व्हिडिओ बघतोय. तो ज्या प्रेमाने प्रत्येकाला भेटतोय, ते माझ्या मुलाला मला दाखवायचंय.’ पुढे म्हणाला, ‘राहुल चांगला माणूस आहे आणि माझ्या मुलाने आयुष्यात चांगल्या लोकांना भेटावं अशी माझी इच्छा आहे!’

...........................................................................................................................................

गंगा शंकराच्या जटेतून उगवते आणि समुद्राला जाऊन मिळते. गंगा माणसांची पापं आपल्यात सामावून घेते आणि वाहत राहते. भारताचा आत्मा मागच्या हजारो वर्षांपासून गंगेने धुतलाय आणि त्याला पुन्हा पुन्हा नवनिर्मितीसाठी तयार केलंय. ‘भारत जोडो’ यात्रेत जेव्हा आम्ही १४ नोव्हेंबरला - नेहरूंच्या जयंतीदिवशीच चालायला सुरुवात केली, तेव्हाचा माहोल हा या गंगेसारखाच होता. यावेळी गंगा कन्याकुमारीपासून निघालीय आणि काश्मीरला चाललीय. किती हजारोंच्या संख्येने लोक या गंगेत सामील होऊन पुढे पुढे जातायत, याची गणती आता राहिलेली नाही. तिथे कोण नाहीये? तिथे शेतकरी येतो आणि राहुलला आपल्या शेतातलं पीक प्रेमाची भेट म्हणून येतो. तिथे एखादा तरुण पोरगा येतो आणि राहुलला आपले प्रश्न सांगतो. एखादी तरुणी येते आणि राहुलच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडते. का? आजूबाजूच्या दमनकारी वातावरणाने घुसमटलेला श्वास, या यात्रेमुळे मोकळा व्हायला सुरुवात होईल, अशी खात्री तिला वाटत असते.

मी जेव्हा १४ तारखेला यात्रेत चालायला सुरुवात केली, तेव्हा एक बघत होतो की, यात्रेच्या दोन्ही बाजूने आबालवृद्ध अक्षरशः धावत होते की, फक्त एका क्षणासाठी राहुलने आपल्याला बोलवावं. मी माझ्या कर्नाटकातल्या, तेलंगणातल्या मित्रांकडून ऐकून होतो की, हा उत्साहाने भारलेला जमाव अशी धावपळ कैक किलोमीटरपर्यंत करत राहतो. तेव्हा मला यावर विश्वास बसलेला नव्हता. पण जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं, तेव्हा जाणवलं की, भारतीय मनाची नस या यात्रेने आता पकडली आहे!

याच धावपळीचा अनुभव स्वतः घ्यावा आणि राहुलच्या मागे धावत सुटणाऱ्या या सर्व लोकांना जवळून न्याहाळता यावं, म्हणून १४ तारखेच्या दुपारच्या सत्रात मग मीही असं धावायचं ठरवलं. यात्रा तेव्हा हिंगोली शहरातून जात होती. काही अंतर योगेंद्र यादव आणि ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारका’चे अध्यक्ष संजय मंगला गोपाळ यांच्यासोबत चालल्यावर मी त्यांची रजा घेतली. आणि राहुल जिथून चालत होता त्याच्या उजव्या बाजूला येऊन चालायला सुरुवात केली. राहुल चालतो तेव्हा रस्त्याची एक बाजू पूर्णतः बंद असते. त्याच्या मागे-पुढे ३०० मीटर अंतरावर पोलीस एक जाडजुड दोरखंड घेऊन चालत राहतात. त्या सुरक्षेच्या कड्यातून भेदून जाणं शक्य नसतं. तुम्ही रस्त्याच्या कडेला उभे राहता आणि हात हलवून किंवा एखादे पेंटिंग, पोस्टर, बॅनर घेऊन राहुलचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करता. जर राहुलने तुम्हाला आत बोलावलं तरच मग त्याची सुरक्षा यंत्रणा तुम्हाला तपासणी करून आत सोडते. मला बघायचं हे होतं की, किती जण ही अशी भेट मिळवण्यात यशस्वी होतात, भेट झाल्यावर किंवा न झाल्यावर त्यांच्या भावना काय असतात? म्हणून मग मीही साधारण ५ किलोमीटरपर्यंत असाच धावत गेलो.

आणि तेव्हा जे मी पाहिलं, ते सगळंच थक्क करणारं होतं. थक्क तीन अर्थाने. पहिला, अरे, हाच का तो राहुल गांधी, ज्याची मागचे आठ वर्षं अतिप्रचंड बदनामी झाली आहे. मग ज्याची इतकी बदनामी केलीय, त्याला ‘पप्पू’ म्हणून हिणवलाय त्याला भेटायला ही माणसं इतकी आतुर का? दुसरा, गलितगात्र असलेल्या काँग्रेस पक्षाला ही अशी गर्दी जमवताच आली नसती. ही जी सामान्य माणसं धावत सुटली आहेत, त्यांना नेमकं कोणी सांगितलं की, ही यात्रा आता इथे पोचलीय? मुख्य प्रवाहातील माध्यमांनी ज्या यात्रेवर अघोषित बंदी घातली आहे, तिची माहिती या सामान्य लोकांपर्यंत कशी पोचली? आणि तिसरं कारण हे की, आलेल्या लोकांमध्ये स्त्रियांची - मुलींची संख्या! हिंगोली शहरातून जेव्हा यात्रा जात होती, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला जणू महिलांनी भिंतच उभारली होती! राहुल गांधीला बघण्याची उत्सुकता, जमलं तर त्याला भेटण्याची इच्छा त्या तमाम महिलांच्या डोळ्यांत दिसत होती.

मी एव्हाना धावत होतो रस्त्याच्या दुभाजकावरून. तिथे लावलेली काटेरी फुलांची झाडं सर्वांना टोचत होती. त्या खाचखळग्यातून धावत सर्व जण राहुलचे लक्ष वेधू बघत होते. प्रियांका माळी नावाची एक मुलगी - साधारण बावीस-तेवीसची असावी, धावता धावता धडपडली. तिने जमिनीला हात टेकले, तेव्हा तिला काटे टोचले. ती तशीच परत उठली आणि जिद्दीने धावायला लागली. ती मोठ्याने ‘राहुल, राहुल’ अशी हाक मारत होती. साधारण एखाद किलोमीटर असं धावल्यावर तिला राहुलने बघितलं. हात हलवून त्याच्या त्या सुरक्षा दोरखंडाच्या आतमध्ये बोलावलं. ती जिवाच्या आकांताने आत घुसली. राहुलला भेटली. ती जेव्हा बाहेर आली, तेव्हा मी तिला गाठलं. तिचे डोळे आनंदाश्रूनी डबडबले होते. तिला मी कोण माहिती नाही, मला तिची पार्श्वभूमी ठाऊक नाही. मी म्हटलं, ‘ताई, तू बाजी मारलीस!’ तर तिला इतका आनंद झाला होता की, तोंडून शब्द फुटत नव्हता. मी तिला इतकंच विचारलं, ‘का ग, तू त्याला ‘राहुल राहुल’ म्हणून हाक मारलीस? मग जेव्हा त्याला भेटलीस तेव्हा काय म्हटलंस- राहुल सर?’ तर तिने पटकन आपले ओठ चावले. म्हणाली, ‘नाही हो. राहुलच म्हटलं. लक्षातच नाही आलं त्यांना ‘सर’ म्हणायला हवं होतं ते!’ मी म्हटलं, ‘असू दे!’

कुठून येत असावी ही इतकी आपुलकी? कुठून येत असावा हा इतका आपलेपणा? माझ्या ग्रुपमधली मुलगी- नीलिमा राऊत तिच्या नवऱ्यासहित अशीच राहुलला भेटली. राहुलने तिला विचारलं, ‘तू काय करते?’ मग तिने तिला मागच्या तीन वर्षात कश्या तीन नोकऱ्या बदलाव्या लागल्या हे सांगितलं. भेटून आल्यावर मी तिला विचारलं की, कसा वाटला राहुल? मला म्हणाली, ‘अमेय, खरं सांगू? असं वाटलंच नाही की, मी कुणा राजकीय नेत्याशी किंवा परक्याशी बोलतेय. आपण आपलं दुःख आपल्याच घरातल्या माणसाला सांगतोय असाच फिल येत होता!’

...........................................................................................................................................

जे मी पाहिलं, ते सगळंच थक्क करणारं होतं. थक्क तीन अर्थाने. पहिला, अरे, हाच का तो राहुल गांधी, ज्याची मागचे आठ वर्षं अतिप्रचंड बदनामी झाली आहे. मग ज्याची इतकी बदनामी केलीय, त्याला ‘पप्पू’ म्हणून हिणवलाय त्याला भेटायला ही माणसं इतकी आतुर का? दुसरा, गलितगात्र असलेल्या काँग्रेस पक्षाला ही अशी गर्दी जमवताच आली नसती. ही जी सामान्य माणसं धावत सुटली आहेत, त्यांना नेमकं कोणी सांगितलं की, ही यात्रा आता इथे पोचलीय? मुख्य प्रवाहातील माध्यमांनी ज्या यात्रेवर अघोषित बंदी घातली आहे, तिची माहिती या सामान्य लोकांपर्यंत कशी पोचली? आणि तिसरं कारण हे की, आलेल्या लोकांमध्ये स्त्रियांची - मुलींची संख्या! ​​​​​​​​​​​​​​

...........................................................................................................................................

प्रियांका माळीसारख्या किमान २० तरुण-तरुणींना मी भेटलो. सगळ्यांच्या भावना इतक्याच उचंबळून येणाऱ्या आणि प्रामाणिक होत्या. मी धावायचा थांबत नव्हतो. आपल्या डोळ्यांसमोर काहीतरी अफाट सुरू आहे आणि ते समजून घेण्यासाठी आपण कष्टांत कमी पडता नये, अशी भावना माझ्या त्या धडपडीमागे होती. राहुल त्या दिवशी चहा प्यायला एका ठिकाणी थांबला. तो थांबला की, सोबत हजारोंचा जमाव थांबला. राहुल परत चालायला यायची वाट सगळेच जण बघत होते. अंधार पडलेला. वेळ साधारण साडेसात वगैरे असावी. तिथे दीपक कराळे नावाचा माणूस आपल्या तीन वर्षांच्या मुलाला खांद्यावर घेऊन उभा होता. मुलगा विचारे, ‘कधी येणार राहुलदादा?’ दीपक सांगे, ‘येणार हां, थांब. आला की तुला भेटवतो.’ मी दीपकला विचारलं कधीपासून चालताय? म्हणाला, ‘तासभर तरी झाला असेल. मुलाला राहुलला भेटायचंच आहे.’ मी म्हटलं, ‘कशाला भेटायचं आहे? फोटो काढायचाय काय?’ तो तीन वर्षांच्या मुलाचा बाप काय विचार करत होता बघा. दीपक म्हणाला, ‘नाही साहेब. फोटोसाठी नाही करत आहे. मी मागचे दोन महिने राहुलचे व्हिडिओ बघतोय. तो ज्या प्रेमाने प्रत्येकाला भेटतोय, ते माझ्या मुलाला मला दाखवायचंय.’ पुढे म्हणाला, ‘राहुल चांगला माणूस आहे आणि माझ्या मुलाने आयुष्यात चांगल्या लोकांना भेटावं अशी माझी इच्छा आहे!’

५.

चांगला नेता कोण तर तो जो आपल्या कृतीतून समाजावर चांगले संस्कार करतो!! कुठल्याही भौतिक फायद्यासाठी नाही, तर आपल्या मुलावर चांगले संस्कार असावेत म्हणून दिपकला राहुलला भेटावं वाटतं!! ही यात्रा राहुलला राजकीय यश देईल न देईल, ते आपण नंतर बघू, पण या देशाला ही यात्रा काय देऊ लागलीय ते बघा!!!

राहुलचा ‘टी ब्रेक’ झाला आणि यात्रा परत सुरू झाली. या वेळी राहुलसोबत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा चालत होते. मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने लोकांना बघत, त्यांच्याशी बोलत चालत होतोच. अधूनमधून धावावं लागत होतो. असंच धावत असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बघितलं. लोक राहुलकडे जाण्यासाठी ज्या नेत्याची ओळख काढता येईल, त्याची ओळख वापरत होते. मला धावताना बघून नानाना वाटलं, मला पण आत येऊन राहुलला भेटायचं आहे. नानानी मला बोलावलं. सिक्युरिटीने आत घेऊन तपासणी केली. मला बघताच ‘भेटायचं आहे ना? थांब भेट घालून देतो’ असं म्हणत नानांनी थेट राहुलसमोर उभं केलं. मी राहुलशी शेकहॅन्ड केला. त्याला म्हटलं, ‘माझी तुमच्याशी उद्या सकाळी अपॉईंटमेंट फिक्स झाली आहे, मी तेव्हा भेटतो.’ राहुल ‘ओके भैय्या’ म्हणाला आणि मी मागे सरकलो. राहुलच्या मागे यूपी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय लुल्लू चालत होते. ते माझे जुने मित्र. त्यांनी मला हाक मारली आणि मग मी त्यांना जॉईन झालो. तिथून जवळपास पाऊण तास मी राहुलच्या मागून चालत होतो आणि या काळात मी जो राहुल बघितला, तो त्याच्या विरोधात केलेल्या प्रचाराच्या पूर्णतः वेगळा होता.

असं सांगितलं जायचं की, राहुलला माणसांना भेटायला आवडत नाही. हे किती धादान्त खोटं आहे, ते मी स्वतः बघितलं आहे. राहुल सर्वसामान्य माणसांना नुसतं भेटत नाही, तर त्यांच्याशी खूप गप्पा मारतो. मुख्य म्हणजे स्वतः बोलत नाही, तर समोरच्याला बोलू देतो. प्रश्न विचारतो. माझ्यासमोर भेटलेल्या एकाही माणसाला त्याने ‘तू कोण, कुठला, काय करतो?’ हे विचारल्याशिवाय सोडलेलं नाही. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की, तो जे इतरांना सांगतोय, ‘डरो मत!’ हे स्वतः जगतोय. ज्याने आपली आजी आणि वडील माथेफिरूंनी केलेल्या खुनात गमावले आहेत, त्याने हे असं इतक्या मोकळेपणाने लोकांना भेटणं हीच मुळात मोठी गोष्ट आहे.

राहुलच्या अंगरक्षकांना चकवून अनेक जण त्याच्या जवळपास जात होते. अनेकदा त्या सर्व अंगरक्षकांची धावपळ होई. ते माणसांना बाहेर लोटून देतात. कोणीही राहुलच्या जवळपास सिक्युरिटी चेक केल्याशिवाय पोचला असेल, तर सरळ त्याला उचलून बाजूला नेतात. इतकी मुलं-मुली - मध्यमवयीन माणसं घुसत असतात की, अशा वेळी त्या अंगरक्षकांचा संताप होणं साहजिक आहे. पण राहुल कोणीही अचानक घुसून त्याच्या जवळ पोचला तरी बिथरत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणाच्या शंभराव्या भागापुरतंही कमी होत नाही! लक्षात घ्या. या राहुलच्या वडिलांच्या जवळ असेच कोणी आले आणि त्यात झालेल्या स्फोटात त्यांचा मुत्यु झाला. ज्याच्या वडिलांचा असा मृत्यू झाला, तो आलेल्या प्रत्येक माणसाला आलिंगन देण्यासाठी आपले हात रुंदावत असेल, तर या धैर्याला सलाम करावा नाहीतर काय?!

मी हे बघून आहे की, महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांनी आपल्या मुलांना प्रमोट करण्यासाठी यात्रेचा वापर केला. पण मी हेही बघून आहे की, जितकं या अशा बड्या लोकांच्या मुलांना राहुल भेटला ना, त्याच्या किमान १०० पट जास्त तो सामान्य लोकांना भेटला. माझ्याच टीममधल्या २३ जणांना त्याने हात हलवून बोलावून घेतलं. मी त्याच्या मागून चालत होतो, तेव्हा त्या पाऊण तासाच्या चालीत त्याने अनेकांना बोट दाखवून बोलावून घेतलं. ही संख्या नेत्यांच्या मुलांपेक्षा नक्कीच जास्त आहे. ज्यांना वस्तुस्थितीला प्रचाराचं वळण द्यायचं असतं, ते असली कारणं शोधत असतात. त्यांचे ‘बोलविते धनी’ कोण आहेत, हे काय मी सांगायला  हवं?

...........................................................................................................................................

लोक स्वतःहून रस्त्यावर चालायला तयार झालीत. या ना त्या प्रकारे देशाच्या या घुसळणीत स्वतःला जोडून घेऊ पाहतायत. प्रत्येक जण स्वतःच्या कुवतीने या यात्रेसाठी आणि मुख्यतः इथल्या शांती आणि सौहार्दासाठी योगदान देऊ पाहतोय. ‘भारत जोडो’ यात्रेचा मुख्य नायक जरी राहुल गांधी असला तरी आता ही त्याची एकट्याची यात्रा राहिलेली नाही. द्वेष आणि हिंसेचे घृणास्पद राजकारण नाकारणारे ते सर्वसामान्य जनतेचे एक ‘पोलिटिकल स्टेटमेंट’ झाले आहे... गंगा शंकराच्या जटेतून उगवते आणि समुद्राला जाऊन मिळते. गंगा माणसांची पापं आपल्यात सामावून घेते आणि वाहत राहते. भारताचा आत्मा मागच्या हजारो वर्षांपासून गंगेने धुतलाय आणि त्याला पुन्हा पुन्हा नवनिर्मितीसाठी तयार केलंय. ‘भारत जोडो’ यात्रेत जेव्हा आम्ही १४ नोव्हेंबरला - नेहरूंच्या जयंतीदिवशीच चालायला सुरुवात केली, तेव्हाचा माहोल हा या गंगेसारखाच होता. यावेळी गंगा कन्याकुमारीपासून निघालीय आणि काश्मीरला चाललीय.​​​​​​​​​​​​​

...........................................................................................................................................

गंगा वाहताना बघत नाही की, आपल्यात डुबकी कोण मारतोय?! तिला सगळ्यांना पोटाशी धरायचं आहे. तिथे आपला त्यांचा भेद नाही. तिथे गरीब श्रीमंत वाद नाही. ती स्त्री-पुरुष विषमता नाही. तिथे उच्च-नीच असा अपमानास्पद फरक नाही. प्रदूषण झालं म्हणून गंगेच्या पाण्याचं महत्त्व कमी होतं काय? ‘भारत जोडो’ ही गेल्या आठ वर्षांत इथे मनं विकृत करण्याचा जो भयंकर खर्चिक प्रकल्प सुरू आहे, त्याच्या परिमार्जनाची यात्रा आहे! त्यातलं सौंदर्य आणि संघर्ष हेच मुळात इतकं भव्य आणि अद्भुत आहे की, बारीकसारीक प्रचारकी कुसळांकडे लक्ष द्यायला आता या देशाला वेळ नाहीये!!

६.

मी हे पण ऐकून आहे की, काही लोकांना ‘भारत जोडो’ हा एक इव्हेंट वाटत आहे. आपण जेव्हा लोकशाही मानतो, तेव्हा लोकांच्या अशा मतांचा आदर करायला हवा. तरच त्या लोकशाहीला अर्थ आहे. पण त्याच वेळी अशा मतांचा प्रतिवादसुद्धा करायला हवा. झालंय असं की, मागच्या आठ वर्षांत स्वतःच्या आईला भेटायचं असेल तरी त्याचाही इव्हेंट करता येतो, हा शोध विश्वगुरूंनी लावून ठेवलाय. त्यामुळे प्रत्येक राजकीय कृती ही इव्हेंटच असते, अशी या सर्वज्ञानी विश्लेषकांची समज आहे. त्यांना हे जरूर सांगायला हवे की, हा इव्हेंट नाही. हा सण आहे, उत्सव आहे. इव्हेंट एक वेळचाच असतो. सण आणि उत्सव हे परंपरेतून तयार होतात आणि ते कायमस्वरूपी असतात.

प्रेम, भाईचारा, आपुलकी ही भारतीय विचारांची शाश्वत मूल्य आहेत. ‘भारत जोडो’ या मूल्यांचा उत्सव आहे. एकमेकांशी ओळख पाळख नसलेली हजारो माणसं रोजच्या रोज सकाळी ५ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत चालतात, एकमेकांच्या गळ्यात पडतात, हातात हात घेतात, मिठ्या मारतात, रडतात, हसतात आणि तेही अशा ठिकाणी जिथे सतत दोन लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करलेल्या पक्षाने यात्रा काढलीय! ‘भारत जोडो’ यात्रा हा या देशाच्या अंगभूत माणुसकीचा उत्सव आहे!!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भारत हा यात्रेकरूंचा देश आहे. इथला प्रत्येक माणूस ना त्या कारणांसाठी एकदा तरी यात्रेला जातो. राजकीय कारणासाठी काढलेल्या यात्राही काही या देशात कमी नाहीत. अडवाणींच्या रथयात्रेने हा देश दुभंगला. त्याचे परिणाम आपण आजही भोगतोय. उदारीकरणाच्या अर्थव्यवस्थेने ‘टेक ऑफ’ घ्यायच्या वेळेस संघप्रणित रथयात्रेने विकासासाठी अत्यावश्यक असलेली इथली शांती बिघडवली. २०१४ला पूर्ण बहुमताने देशात सत्तेत बसल्यावर तर सत्ता आणि संपत्तीच्या केंद्रीकरणाला भयंकर वेग आला. आणि त्यातूनच या देशात एकीकडे जगात पहिल्या वीसमधले दोन श्रीमंत आहेत, तर दुसरीकडे जगाच्या हंगर इंडेक्समधील आपलं स्थान घसरलं आहे. श्रीमंत अतिश्रीमंत होतायत आणि गरीब देशोधडीला लागतायत. ही वाढती दरी कमी करणं हाच ‘भारत जोडो’चा उद्देश आहे. गरिबीचा, महागाईचा, बेरोजगारीचा एकमेकांशी थेट संबंध आहे. आणि यात होरपळणारा सामान्य भारतीयच ‘भारत जोडो’मध्ये सहभागी होतो आहे!

७.

अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, भारत जोडो यात्रेमुळे देशात सत्ता परिवर्तन होईल का? राहुल गांधी एक राजकीय नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाने ही यात्रा काढलीय. त्यामुळे केंद्रात भाजपचा पराभव होईल का, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. प्रश्न पडणाऱ्यांचेसुद्धा वेगवेगळे गट आहेत. म्हणजे एक गट आहे, जो कुत्सितपणे विचारतो, याने काय फरक पडेल? हा तोच वर्ग आहे, जो चरखा फिरवून स्वातंत्र्य मिळतं का, हा प्रश्न विचारतो. त्याला हे कळत नाही की, चरखा फिरवून स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा संघर्ष करायला कृतीशीर निर्धार वाढतो. चरखा फिरवणं ही सकारात्मक, निर्मितीशील क्रिया आहे, ज्यामुळे आंदोलनाची सकारात्मकता वाढते.

‘भारत जोडो’मुळे सत्ता परिवर्तन होईल की नाही, हा आज मुद्दाच नाही. भाजपची सत्ता ज्या भीती आणि भ्रम यांच्या जीवावर आहे, ते दूर करणे हे काम ‘भारत जोडो’ला करायचे आहे. हे अधिक महत्त्वाचे, दीर्घकालीन संघर्षाचे आणि येत्या काळात रचनात्मक राजकारणाचे असणार आहे. द्वेष पसरवून सत्ता मिळवणे आणि मिळालेली सत्ता द्वेष पसरवण्यासाठी वापरणे, या दुष्टचक्रात देशाचं राजकारण अडकलेलं आहे. त्यातून बाहेर यायचं असेल तर त्यासाठी ‘भारत जोडो’ हे पहिलं पाऊल आहे.

...........................................................................................................................................

एका गावातून जात असताना एक ७५ वर्षांच्या आजी आल्या. त्यांना वाटलं मुख्य यात्रा हीच आहे की, काय? त्यांनी आमच्यातल्या एकाला विचारलं, ‘तुमच्यात इंदिरेचा नातू कोण आहे?’ मग आम्ही त्यांना समजावून सांगितलं की, ‘इंदिरेचा नातू वेगळा आहे आणि ही यात्रा त्या यात्रेला जाऊन मिळणार आहे’. आजीना आम्ही विचारलं की, तुम्हाला त्या नातवाचं नाव ठाऊक आहे का? आजी म्हणाल्या, ‘नाव ठाऊक नाही, पण इंदिरेचा नातू देशासाठी चालतोय हे माहिती आहे!’ हा आम्हा सर्वांना धक्का होता! आणि मला पत्रकार म्हणून एक अनुभवसुद्धा!​​​​​​​​​​​​​​​​​​​​

...........................................................................................................................................

आपण जे करत आहोत तो ‘मास्टरस्ट्रोक’ नाही, याची पूर्ण जाणीव राहुलला आहे. १५ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर या तीन दिवसांत त्याने आमच्या ‘महानिर्धार’ या ग्रुपसहित अनेक समविचारी संस्था, संघटना यांना भेटीची वेळ दिली होती. सगळ्यांकडून जेव्हा २०२४च्या निवडणुकांबद्दल त्याला विचारलं जायचं, तेव्हा तो ‘भारत जोडो’चे उद्दिष्ट हे २०२४च्या निवडणुकांपुरते नाही हे नीट समजावून सांगायचा. या देशाची बिघडलेली घडी नीट बसवायची असेल, सामाजिक न्यायाची भूमिका जर पुनर्स्थापित करायची असेल आणि इथल्या सामान्य माणसाला प्रगतीचे आकाश जे आज दिसत नाहीये, ते पुन्हा दाखवायचे असेल, तर सत्ता मिळाल्यानंतरही या मुद्द्यांवर काम करत राहावे लागणार आहे, हे तो ठासून सांगत होता.

अनेक समविचारी कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर त्यांना त्याची सर्वांत भावलेली जर कोणती गोष्ट होती, तर ती ही आहे. दीर्घकालीन संघर्षासाठी आणि रचनात्मक कार्यासाठी राहुल तयार आहे. सत्ता त्याचं साध्य नाही, तर साधन आहे आणि मुळात या कामासाठीच त्याला सत्ता हवी आहे, अन्यथा तो काही सत्तेचा भुकेला नाही, हे त्याच्याशी बोललेल्या प्रत्येकाला जाणवलं आहे. जो आजवरच्या खोट्या प्रचारातून लोकांसमोर आला होता, त्या राहुलपेक्षा या थेट संवादातून समोर आलेला राहुल पूर्णतः वेगळा, नवा आणि आश्वासक होता. इम्रान प्रतापगढी या काँग्रेस नेत्याचे एरव्हीचे लिखाण मला आवडत नाही. पण त्याने अलीकडे जे एक ट्विट केले ते नेमकं आहे- ‘या यात्रेने देशाला राहुल आणि राहुलला देश नीट समजला आहे.’ हे इम्रानचे म्हणणे अगदी योग्य आहे!!

काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक/हितचिंतक यांनाही २०२४ला या यात्रेचा काय परिणाम होईल, याबद्दल उत्सुकता आहे. एक गोष्ट नक्की आहे की, मरगळ आलेला हा पक्ष आता पुन्हा ताजातवाना झाला आहे. पण या वातावरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. मुळात एकी ठेवावी लागणार आहे. लोक म्हणतात की, राहुल यांनी त्यांचं काम केलं, आता उरलेलं काम काँग्रेस नेत्यांना करावं लागणार आहे. मी याही मताशी सहमत नाही. एक दांडी यात्रा काढून झाल्यावर गांधी म्हणाले नाहीत की, झालं माझं काम. तसं राहुल गांधी पण म्हणत नाहीये. यानंतरची लढाई ही एकट्या राहुलची किंवा काँग्रेसची नाहीये, तर तमाम समविचारी संघटना, संस्था यांनी आता जो माहोल तयार झालेला आहे, तो कायम टिकवण्यासाठी खूप मेहनत करायची आहे. आणि तिथेच २०२४च्या लढाईचं भविष्य आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या यात्रेच्या माध्यमातून सर्वांत महत्त्वाची गोष्ट कुठली होत असेल तर ती ही आहे की, या देशाच्या राजकारणाचे ‘डायनामिक्स’च बदलत आहे. गांधी म्हणायचे की, जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर त्यांच्या मुळाशी जा. भाजपच्या चौफेर प्रचारयंत्रणेला कसं उत्तर द्यायचं, हा प्रश्न काँग्रेससमोर होता. मॅनेजमेंटच्या स्टाईलने सगळ्याचं भाजपने कॉर्पोरटायझेशन केलं होतं. इथं माणूस शिल्लक नव्हता. माणसाचा मतदार झाला होता. लोकांचे प्रश्न निवडणुकीत मतदानावर किती प्रभाव पाडू शकतात, त्यावर सोडवायचे की नाही, हे ठरवलं जात होतं. लोकांच्या भावना त्यांना हृदयाशी धरून समजून घेतल्या जात नव्हत्या, तर सर्व्हे काय सांगतात, त्यावर त्या भावनांची किंमत ठरत होती. या सगळ्याला अफाट यंत्रणा उभी करावी लागते आणि त्यासाठी प्रचंड पैसा लागतो. ज्याच्या हाती तो आहे, तोच या असमतोल खेळात जिंकणार हे नक्की असतं.

या अशा प्रश्नांना सामोरं जायचं असेल, तर एकच मार्ग होता तो म्हणजे गांधीजी सांगतात, तसं प्रश्नाच्या मुळाशी जायचं. इथे प्रश्न हा आहे की, माणसाची मशीन करायचा हा घाट आहे. माणसाचा जमाव करण्याचा हा डाव आहे. त्याचं उत्तर हेच आहे की, शेवटच्या माणसाला उरी धरा! त्याचे अश्रू, त्याची वेदना त्याची एकट्याची असली तरी त्यालाही तितकीच किंमत द्या, जितकी एखाद्या समूहाच्या प्रश्नाला द्याल! माणसाला माणसाची प्रतिष्ठा प्राप्त करून देणं ते हेच!!

‘भारत जोडो’ यात्रेने जमावाच्याऐवजी त्या जमावातल्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधलाय. ही गर्दी बिनचेहऱ्याची नाही. ही गर्दी संवेदनाहीन नाही. ही गर्दी खुनशी नाही. राहुलने गांधींचा मार्ग धरला, जो गांधींना गोखलेंनी सांगितला होता आणि मग सगळ्यांच्याच लक्षात आलं की, काळ्याकुट्ट अंधाराला आता छोट्याश्या पणतीने आव्हान दिलं आहे! यापुढची लढाई ही ती पणती जपून ठेवायची असणार आहे!

भारतीय तत्त्वज्ञान असं मानतं की, माणूस जेव्हा चालतो, तेव्हा त्याच्यासोबत त्याचं भाग्य चालतं. राहुल तर लाखो लोकांना सोबत घेऊन चालत आहे. ही यात्रा आता उभ्या देशाची स्वप्नं, आकांक्षा, इच्छा आणि प्रेरणा यांची केंद्रबिंदू होत चालली आहे. खरंय, आता राहुलसोबत त्याचंच नाही, तर या देशाचंच भाग्य चालत आहे!!

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘भारत जोडो यात्रा’ काही उद्दिष्ट साध्य करू पाहते. परंतु ही उद्दिष्टे संकुचित नसून चिरंतन मूल्यांवर आधारित आहेत - श्याम पाखरे

राहुल गांधीं यांची ‘भारत जोडो’ यात्रा  :  कशासाठी? कोणासाठी? - हेमंत कर्णिक

राहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का? - प्रवीण बर्दापूरकर

‘भारत जोडो’ ही काँग्रेसची आणि एका अर्थाने राहुल गांधींची पदयात्रा आहे आणि या यात्रेचा उद्देश देशाला जोडणं आणि सर्वांनी एकत्र येऊन देश बळकट करणं हा आहे, पण... - विवेक कोरडे

काँग्रेसची सर्वस्तरीय वेगवान घसरण सुरू आहे, ती थांबता थांबत नाही. ‘बुडत्याचा पाय खोलात’ याप्रमाणेच ती स्थिती आहे - विनोद शिरसाठ

काँग्रेस आणि राहुल गांधींचे भवितव्य ठरवणारी पदयात्रा... - प्रवीण बर्दापूरकर

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्राद्वारे जनतेची मनं आपल्या बाजूनं जरी वळवली, तरी त्याचा उपयोग तो काय? - कॉ. भीमराव बनसोड

राहुल गांधी काही महात्मा गांधी नव्हे, परंतु तो महात्म्याच्या पदचिन्हांचा शोध घेत निघाला आहे, हे नक्की! - श्याम पाखरे

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत... - शंकर सोलापूरकर

..................................................................................................................................................................

लेखक अमेय तिरोडकर राजकीय पत्रकार आहेत. 

ameytirodkar@gmail.com

ट्विटर - @ameytirodkar 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......