अजूनकाही
समाजमाध्यमांचा स्फोटक आविष्कार हे खरं तर २१व्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धाचं आणि तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीचं व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. या पुढच्या काळात या माध्यमांचं काय होईल, त्यांचं स्वरूप कसकसं बदलत जाईल… लोक जसा अन्नपदार्थांच्या इच्छेपासून लांब राहण्यासाठी एखाद्या दिवसाचा उपवास करतात, तसा कदाचित समाजमाध्यमांचा उपवास करायला लागतील किंवा कामामधून वर्षातून एखादी सुट्टी घेतात, तशी समाजमाध्यमांपासूनही ‘सबॅटिकल’ घेतील, असंही भविष्यात घडू शकतं. पण आज मात्र या माध्यमांचं स्वरूप ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ असं झालं आहे, हे कुणालाच नाकारता येणार नाही.
समाजमाध्यमांपासून फटकून राहण्याची मुभाच कुणालाही राहिलेली नाही. तसं केलं तर एका क्षणात तुम्ही कालबाह्य ठरता, प्रवाहाबाहेर फेकले जाता. आणि तसं करायचं नाही, असं ठरवलं तर समाजमाध्यमंच तुम्हाला गिळंकृत करतात, त्यापासून तुमची सुटका नाही, अशी अवस्था निर्माण होते.
अशा सगळ्या परिस्थितीत काय करायचं, समाजमाध्यमांच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची, हा मोठाच यक्षप्रश्न आजच्या समाजासमोर उभा आहे. पण एखाद्या शब्दामधलं एखादं अक्षर ‘सायलेंट’ असतं, तसा तो ‘सायलेंट’ असल्यामुळे आज तरी तेवढ्या तीव्रतेनं अंगावर येताना दिसत नाही. किंवा तेवढ्या तीव्रतेनं त्याची चर्चा होताना दिसत नाही. आज ना उद्या तो येणार आहे, हे नक्की.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
कुठेही जा, नजर इकडे तिकडे वळवा, हातामधल्या स्मार्टफोन नामक यंत्रात डोकं खुपसून बसलेले लोक दिसतात. त्यांना इकडचंतिकडचं काहीही बघायचं नसतं, अनुभवायचं नसतं. आसपासचं प्रत्यक्षातलं जग सोडून त्यांना त्या आभासी जगामधलं वास्तव हवंहवंसं असतं. साधं नाटक-सिनेमाला जाणाऱ्या लोकांनाही तो अनुभव पूर्णांशानं न घेता, मध्ये मध्ये आपल्या समाजमाध्यमांवरचे अपडेट हवे असतात. भोकाड पसरणारं लहान मूलदेखील पोटात अन्न जाणं आणि हातात मोबाइल मिळणं, या दोन गोष्टींनीच फक्त आजकाल गप्प बसतं.
असो, हे नमनाला घडाभर तेल झालं. कारण हा या लेखाचा विषयच नाही मुळी. तो आहे, या समाजमाध्यमांचा लोकांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम. तो खरं तर आहे ‘कानगोष्टी’ या पारंपरिक खेळासारखा. या खेळात सहभागी होणारे गोलाकारात बसतात आणि कुणीतरी एक जण त्याच्या शेजारच्याच्या कानात काहीतरी सांगतो. त्याने ते आपल्या शेजाऱ्याच्या कानात सांगायचं असतं. असं करत करत प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याच्या कानात आपण काय ऐकलं ते सांगत जातो आणि शेवटी ज्याने सुरुवात केली, त्या माणसापाशी ‘कानगोष्ट’ येते, तेव्हा त्याने काय सांगितलं होतं आणि प्रत्यक्षात त्याच्यापर्यंत काय आलं, याचा ‘गौप्यस्फोट’ होतो! समजा की, ‘आज बुधवार आहे आणि आज मी वडापाव खाणार आहे’ असं त्याने पहिल्याला सांगितलं असेल तर गोलाकारातील शेवटच्या माणसापर्यंत येताना ती कानगोष्ट ‘अमेरिकेच्या अध्यक्षांची चड्डी निळ्या रंगाची आहे आणि तिची नाडी पिवळ्या रंगाची आहे’, अशी होऊन आलेली असते!
मूळ वाक्य, ऐकणाऱ्या प्रत्येक पुढच्या माणसापर्यंत काय पोहोचलं आहे, त्यातून त्याने काय घेतलं, त्याचं स्वतचं आकलन, त्यात त्याने स्वत:ची काय भर घातली, किंवा स्वत:च काय बदलून टाकलं, आणि पुढच्या प्रत्येक माणसाने काय काय केलं, यातून ही कानगोष्ट घडत पुढे जात राहते आणि माणूस क्रमांक एकने दिलेल्या माहितीवर त्याचं स्वत:चं काहीही नियंत्रण राहत नाही. कदाचित तो देऊ पाहत असतो, ती माहिती त्याच्यापुरती अगदी खरी, प्रामाणिक, सत्याचा अपलाप न करणारी, अतिरंजित नसलेली, कुणाचाही उपमर्द न करणारी, संवेदनशील अशीच असू शकते, पण त्याच्या हातातून तिचा बाण सुटला की, ती कुठे कशी जाईल, हे काहीच आणि कुणालाच सांगता येत नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सध्याच्या समाजमाध्यमांचं नेमकं असंच झालं आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या पातळ्यांवर अगदी रोजच्या रोज आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपण हे घडताना पाहतो आहोत. कानगोष्टींमध्ये ज्याप्रमाणे आपल्या कानात जे काही सांगितलं जात आहे, ते खरं आहे का, मागच्याला नेमकं तेच म्हणायचं आहे का, आपण पुढे ढकलतो आहोत, ती माहिती बरोबर आहे का, हे तपासून बघण्याची कुणालाही आवश्यकता वाटत नाही. तसंच प्रत्येक गोष्टीवर आक्रस्ताळेपणा करण्याची, प्रतिक्रिया देण्याचं टोक गाठण्याची गरज नसते. थोडं थांबून विचार करण्याची गरज असते, हेच आजघडीला लोक समाजमाध्यमांवर वावरताना लक्षात घेईनासे झाले आहेत.
आता नुकतंच उघडकीला आलेलं वसईतील तरुणीच्या दिल्लीत झालेल्या खुनाचं प्रकरण घ्या. तिची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते जंगलात फेकून देणारा तरुण मुस्लीम आहे, हे गृहित धरून दुसऱ्या सेकंदाला ‘लव्ह जिहाद’चा पुकारा सुरू झाला. कुणी खात्री करून घेतली? प्रत्येक हिंदू-मुस्लीम लग्न ‘लव्ह जिहाद’च असा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढला गेला? प्रत्येक ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ ही काहीतरी वाईटच निष्पन्न करणारी ठरते, हे कशाच्या आधारावर ठरवलं गेलं? ‘ ‘लिव्ह इन’ वाईट, भारतीय संस्कृतीच चांगली’ हा धोषा लावताना लग्नांतर्गत झालेल्या खुनांच्या, अगदी भावानं वा वडिलांनी ‘ऑनर किलिंग’ केल्याचं कसं काय नजरेआड केलं जाऊ शकतं? खुन्याने ‘डेक्स्टर’ ही मालिका बघून सगळं नियोजन केलं, तेव्हा असं काहीतरी बघणं वाईटच, असे निष्कर्ष धडाधड समाजमाध्यमांमधून फिरायला लागले. या सगळ्या मध्ये एकानं एक म्हटलं, दुसऱ्यानं त्यात आपली भर घातली. मग तिसऱ्यानं, चौथ्यानं….
एखाद्या घटनेचा धक्का बसणं, परिणाम होणं, व्यक्त व्हावंसं वाटणं समजण्यासारखं आहे, पण त्यात आपण आपली भर घालत चुकीची माहिती तर पुढे ढकलत नाही ना, याची खात्री कुणालाच का करून घ्यावीशी वाटत नाही? घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपण प्रतिक्रिया व्यक्त केलीच पाहिजे, तिला लोकांनीही प्रतिसाद दिलाच पाहिजे, अमूक इतके लाइक्स मिळालेच पाहिजेत, हे सगळं कुठून येतं?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अलीकडेच घडलेल्या सुधा मूर्ती प्रकरणातही प्रत्यक्षात नेमकं काय घडलं असेल, याचा विचार न करताच अनेकांनी व्यक्त व्हायला सुरुवात केली. कुणाचा आक्षेप सुधा मूर्ती यांनी नमस्कार करण्याला, कुणाचा आक्षेप त्यावर व्यक्त झालेल्या तथाकथित स्पष्टीकरणाला, कुणाचा आक्षेप आणखी कशाला... आपण व्यक्त होण्याचं आपलं व्यक्तिस्वातंत्र्य बजावताना इतरांचं ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ हिसकावून घेतो आहोत, याचं भान सुटत चाललं आहे, हे या आणि अशा प्रकरणांमधून पुन्हा पुन्हा, सातत्यानं दिसतं आहे.
असं का होतं आहे? समाजमाध्यमे वाईट अजिबातच नाहीत. वाईट आहे त्यांचा अतिरेक. प्रत्येक गोष्टीवर काहीतरी म्हटलंच पाहिजे, आपलं मत इतरांपर्यंत पोहोचलंच पाहिजे, हा आग्रह. तो असायलाही काही हरकत नाही. पण त्या अट्टाहासातून व्यक्त होण्याचं टोक गाठलं जातं आहे. तो ओरडतो आहे का, मग मी किंचाळेन. तो एखाद्याला नावं ठेवतो आहे का, मग मी त्याच्यापुढे जाऊन शिव्या देईन. दुसऱ्याच्या म्हणण्याशी, मांडण्याशी मी सतत स्पर्धा करेन, त्याच्या पुढे धावेन हा विचार घेऊन बहुतांश जण समाजमाध्यमात वावरताना दिसतात.
माहितीची देवाणघेवाण, जग जोडलं जाणं, ते विस्तारणं या समाजमाध्यमांकडून असलेल्या अपेक्षांपासून आपण समाज म्हणून खूप पुढे निघून गेलो आहोत. सुरुवातीचा काळ असा होता की, आपण त्यांच्यावर स्वार होतो, आता ही माध्यमंच आपल्यावर स्वार झाली आहेत. त्याचे परिणामही भयानक पद्धतीनं समोर येताना दिसताहेत.
हे असंच चालू राहिलं तर समाजमाध्यमांपासून अंतरानं कसं रहायचं, यासाठीच्या शिकवण्या सुरू होण्याचा दिवस काही फार दूर नाही.
.................................................................................................................................................................
लेखिका सुनिता कुलकर्णी या मुक्त पत्रकार आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment