१.
“We loose ourselves in books and we find ourselves there too…” हे सुभाषितवजा वाक्य निखिलेश चित्रेंनी त्यांच्या फेसबुक वॉलवर सात वर्षांपूर्वी पोस्ट केले होते. त्यांच्या वाचनविषयक दंतकथा, वाचनात आलेल्या अनवट पुस्तकांविषयीचं लेखन आणि अलीकडेच वाचनात आलेला कथात्म ऐवज असं सगळं एकत्रित आठवताना निखिलेशसाठी हे केवळ एक सुभाषितवजा वाक्य नाही, त्यांच्या एकंदर जगण्याचाच तो लसाविमसावि असावा असे वाटून जाते.
निखिलेशच्या लेखनाचा (का वाचनाचा) पहिला परिचय झाला, तो त्यांच्या ओरहान पामुकवरच्या लेखातून (‘म.टा. सांस्कृतिक’, २००७). नुकतेच त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. लेख अशा निमित्ताने येणाऱ्या विकीपिडियासदृश्य नोंदींनी भरलेल्या लेखांपेक्षा वेगळाच होता. मग या नावाच्या मागावरच राहिलो. त्यांचं लेखन, त्यापेक्षा सर्वार्थाने प्रचंड म्हणता येईल, अशा वाचनाबद्दलच्या दंतकथेत शोभतील, अशा गोष्टीही ऐकायला मिळाल्या. हेवा वाटेल अशी आपली उपजीविका आणि जीविका असलेलं वाचन यांचं संतुलन साधत त्यांनी जगण्याची बसवलेली घडी…
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘आशय’ दिवाळी अंकाचे शेवटचे दिवस होते. शेवटचा अंक (२०१०) ‘वाचनसंस्कृती’वर केंद्रित करून थांबूया असे ठरवल्यावर त्यात काहीही करून निखिलेशचा सहभाग असणे मस्टच होते. ओळखदेख नव्हती, तरी पत्रात विनंती केली, ‘वर्षभरात वाचलेल्या ऐवजातल्या आवडत्या पुस्तकांवर लिहावे’. त्यांचा आलेला हस्तलिखित लेख हे तेव्हा स्वप्नच वाटलेले. त्या लेखात त्यांनी सात पुस्तकांबद्दल थोडक्यात लिहिले होते. त्यातली सहा आवाक्याबाहेरची, पण मनोहर श्याम जोशींच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ‘क्याप’ या कादंबरीने जसे नवे दारच उघडले माझ्यासाठी. उत्तराधिकारिणी या अगदी सुरुवातीच्या कादंबरीपासून ‘क्याप’, ‘हरिया हर्क्युलस की हैरानी’, ‘कसप’, ‘कुरू कुरू स्वाहा…’ अशी साखळीच भेटली चढत्या रेषेत. पण त्याहीपेक्षा या लेखात त्यांनी आपल्या वाचनाबद्दल लिहिले, त्यातला काही भाग इथे देण्याचा मोह आवरत नाहीये.
“पुस्तकांच्या गुरुत्वाकर्षणाचे अनुभव…
वाचणं माझ्यासाठी श्वास घेण्याइतकी सहज आणि आपोआप घडणारी क्रिया आहे. पद्धतशीर, शिस्तबद्ध, नियोजनपूर्वक केलेल्या वाचण्याचे फायदे मला ठाऊक आहेत, पण माझं वाचन कायमच बेशिस्त आणि आडवतिडवं होत झालेलं आहे. मी त्याला वळणावर आणायचे प्रयत्न करतो, पण ते कायमच फसत आलेत. उदा. आता मला नॅटोलॉजी म्हणजे निवेदनशास्त्रावरचं काही वाचायचं म्हणून मी रोलां बार्थचं पुस्तक हाती घेतो. ते वाचून होईतो त्यात संदर्भ आलेल्या कादंबऱ्या डोक्यात शिरून बसतात. तसं मी नॅटोलॉजीतलं पुढचं पुस्तक हाती घेण्याऐवजी फ्लॉबेरची त्यातली ‘सेंटीमेंटल एज्युकेशन’ ही कादंबरी घेतो. ती वाचताना त्यातला त्याच्या पत्रांचा संदर्भ मला त्याच्या पत्रसंग्रहाकडे घेऊन जातो. तो वाचत असताना मध्येच पॉल व्हॅलरीच्या ‘नोट बुक्स’ देखणे खंड खुणावतात. त्यात घुसतो, तोवर एखादी नव्या दमाच्या मराठी लेखकांची नवी कादंबरी हातात येते, त्यात बुडून जातो. असं एका वेळी पाच-सहा पुस्तकं समांतर वाचत वाचत पूर्ण करणं ही माझी सवय. याचे फायदे आहेत तसे तोटेही. पण सवय सुटते असं नाही. अजून तरी विकत घेतलेली आणि वाचलेली पुस्तकं यांचं प्रमाण मी ५०-५० टक्के राखू शकलो आहे.
प्रत्येक पुस्तकाचं स्वतःचं असं गुरुत्वाकर्षण असतं, वाचकानं त्याच्या कक्षेत प्रवेश केल्यावर ते त्याला स्वतःकडे ओढायला लागतं. हे गुरुत्वाकर्षण जेवढं अधिक तेवढं पुस्तक लवकर आणि आनंदात सहज वाचून होतं. कमी असेल तर वाचन रेंगाळते. हे गुरुत्वाकर्षण पुस्तकाच्या आकारात वा विषयात नव्हे तर आशयामध्ये खोल कुठेतरी दडलेलं असतं. त्याच्या तावडीत सापडलं की, आरपार जाण्यावाचून सुटका नसते. प्रत्येक वाचकासाठी हे गुरुत्वाकर्षण सारखंच असतं असं नाही. म्हणजेच वाचक पुस्तकांची निवड करत नसून पुस्तकंच त्यांच्या वाचकाची निवड करत असतात. वाचक असहाय असतो.
माझ्यासाठी एका पुस्तकाकडे जाण्याच्या वाटा नेहमी दुसऱ्या पुस्तकातून फुटतात, ते पुस्तक अस्तित्वात आहे, याचा पत्ता आणखी तिसऱ्या पुस्तकातून लागतो, मग ते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. ते नेहमीच यशस्वी होतात असं नाही. मग हे न मिळत असलेलं पुस्तक एखाद्या दाट रानातल्या गुढ घरासारखं झपाटून टाकतं. अप्राप्य वस्तू बद्दल आपल्याला वाटतं ते आकर्षण त्या पुस्तकाबद्दल वाटू लागतं. ते हातात येईतो विचित्र अस्वस्थता असते.
ज्या पुस्तकांच्या अशा जबरदस्त गुरुत्वाकर्षणानं मला खेचून घेतलं त्यांनी माझ्या जगण्याविषयीच्या आकलनात सूक्ष्म पातळीवर पण मोलाची भर घातली. काही मतांमध्ये नकळत बदल घडले. सभोवतालची माणसं आणि समाज यासह स्वतःलाही समजून घेण्याच्या प्रक्रियेत मोलाचा हातभार लावला. असुरक्षित समाजात जगण्याचं भय कमी करून माझा आत्मविश्वास वाढवला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थळ आणि काळ यांच्या मितींपासून काही काळ तरी सुटका करणारा उच्च प्रकारचा आनंद त्यांनी मला दिला. पुस्तकांनी आपल्या गुरुत्वाकर्षणानं मला असं खेचून घेतलं नसतं, तर या एकाअर्थी आध्यात्मिक आनंदाला मी मुकलो असतो.”
या लेखात नंतर चित्रेंनी ‘क्याप’बरोबरच अगुस्तो मॉन्तेरोसो या स्पॅनिश लेखकाचं ‘कम्प्लिट वर्क्स ॲण्ड आदर स्टोरीज’ हे पुस्तक, इशत्वान ओर्केनी या हंगेरियन लेखकाच्या ‘वन मिनिट स्टोरीज’, सर्बियन लेखक मिलोराद पाविचची कादंबरी ‘लास्ट लव्ह इन कॉन्टन्टिनोपल’, फ्रेंच तत्त्वज्ञ गिल ल्यूदची ‘सिनेमा वन’ आणि ‘सिनेमा टू’ ही जुळी पुस्तकं, पोलिश कवी ज्बिगिन्यू हर्बर्तच्या ‘कलेक्टेड पोएम्स’ आणि आपल्या मूळ प्राकृतातलं उद्यतन सूरीचं ‘कुवलयमाला’, या पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून दिला होता.
२.
‘गॉगल लावलेला घोडा’ वाचताना मला हे नक्की आठवत होतं, तरी इतकं प्रचंड वाचणाऱ्याचं स्वतंत्र लेखन कसे असेल, याच्या काही नकारात्मक कल्पना डोक्यात होत्या. तरी काहीसं बौद्धिकदृष्ट्या दमवणारी ‘मौजे’तली ‘सममितीचा अन्वयार्थ’ आणि ‘पद्मगंधा’मधली ‘विस्थापन’ या कथा आधी म्हणजे २०२० आणि २१च्या दिवाळी अंकात वाचल्या होत्या. दोन्हीत वाचनाचा थेट संदर्भ नव्हता. काहीसा गूढ ऐवज… विशेषतः ‘विस्थापन’मध्ये आपल्यातून कुणीतरी डोळ्यासमोर आपली जागा घेत आपल्याला आपल्याच आयुष्यातून विस्थापित करतं हा व्याकूळ करणारा अनुभव होता. थोरल्या मतकरींच्या काही कथांमध्ये, विशेषतः ‘तुमची गोष्ट’सारखी कथा वाचताना येतो तसा. पण या संग्रहातल्या बाकी बहुतेक कथा हा त्यानं आशय'मधल्या उपरोल्लेखित लेखात म्हटलंय, तशा वाचनातल्या एक प्रकारच्या आध्यात्मिक आनंदातून निर्माण झालेला तरी स्वतंत्र, विलक्षण सर्जनशील ऐवज आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
रचण्याचा मोक्षाप्रत नेणारा असा आनंद गवसला की, त्याची पुनरावृत्ती करावीशी वाटते. अशा पुनरावृत्तीच्या असोशीतून या कथांची निर्मिती झालेली असावी. फिक्शनचं, कथात्मतेचं, वास्तव रचण्याचं सामर्थ्य कशात असेल, तर त्यातलं जग कितीही असंबद्ध असो ते आपल्याला पटतं, खेचत नेतं त्या-त्या वेळी आपल्याबरोबर, त्याचाही प्रत्यय या कथा वाचताना येतो. या अनुभवाचं - हे केवळ वाचणं नाही, हा वाचनानुभव आहे - विश्लेषण करावं यापेक्षा वाचावं आणि त्या अनुभवात हरवून जावं असा हा ऐवज आहे.
सर्व नऊ कथा पालघर-डहाणू परिसरात घडतात. (या संग्रहाची अर्पणपत्रिका ‘पालघर नावाच्या गावास’ अशीच आहे) या परिसराशी जोडलेलं बालपण, पौगंडावस्था आणि नंतर सततच्या पालघर-मुंबई प्रवासातून या मार्गावरचा तळहाताच्या रेषांसारखा माहीत झालेला, सवयीचा झालेला भूगोल. वाटेतली गावं, तिथले दुर्लक्षित राहिलेले लेखक, प्रकाशक, त्यांची पुस्तकं. आजच्या वेगवान युगात म्हटलं तर हाकेच्या अंतरावर असलेली पण प्रत्यक्षात दोन वेगळीच विश्वं असावीत असं वाटणारी गावं - डहाणू पालघर आणि मुंबई - दोन्हीत वावरताना होणारी ओढाताण, दमछाक… एकीकडे असणं गरजेचं असताना मन मात्र दुसरीकडे ओढ घेते यातली घालमेल…
कथाविश्वात पोटापाण्यासाठी न्यूज चॅनल्सच्या, सेल्सच्या काहीतरी सतत विकण्याच्या जगातला वावर, तिथला बातम्यांचा चहुबाजूंनी सतत होणारा मारा, त्याच्या रोजच्या नव्हे सततच्या डेडलाईन्सचं दडपण, कायम टीआरपीच्या मागे धावताना होणारी दमछाक आणि महत्वाचं म्हणजे यातल्या कशालाही पर्याय नसणं… चिडणार कुणावर, शिपायांपासून सीईओपर्यंत सगळ्या पायऱ्यांवर कमी-अधिक हेच असणारं महानगर एकीकडे आणि माणसाचं वैयक्तिक जगणं काहीसं शाबूत असलेल्या वाड्या-वस्त्या आणि महानगराचा संसर्ग होत त्याच वाटेवर चाललेली छोटी गावं…, सर्जनाचं हाकेच्या अंतरावर असूनही नजरेच्या टप्प्यात न येण्यामुळं होणारी घालमेल असं बरंच काही आहे. ‘मनात नक्की काय होतं आपल्या आणि काय करतोय आपण?’ संवेदनेला ‘अशा’ वाटण्यानं छळणं किती साहजिक, जणू अपरिहार्य… ही खिन्न करणारी अपरिहार्यता हे या कथांचं यश आहे.
३.
या कथांमध्ये लहानपणी वाचलेल्या जादू हा कॉमन फॅक्टर असलेल्या जाड टायपातल्या ३२ पानी पुस्तकांपासून पेसोआच्या स्वप्नसिद्धान्तसारख्या जडजंबाळ पुस्तकापर्यंत असंख्य पुस्तकांचे संदर्भ आहेत. म्हणजे चित्रेंनी लेखात त्यांची उलगडत जाणाऱ्या साखळीसारखी वाचण्याची सवय सांगितलीये, तसे आपणही अशा संदर्भांकित पुस्तकांकडे खेचलो जायला लागलो, तर हे असं अनंत काळ चालूच राहील. या विधानातली काही अतिशयोक्ती जमेला धरूनही यातला काही कथांमधला जादुई वास्तववाद वा अतिवास्तवता जमेला धरता हे खरेही आहे असे म्हणता येईल. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वाचलेल्या पुस्तकांनी कशी सोबत केली, याचे थेट न सांगता आलेले संदर्भ, या कथांना वेगळा आयाम बहाल करतात. या वाचनानं जी शहाणीव बहाल केली, ती पुढे सतत गुंतागुंतीच्या होत चाललेल्या आयुष्यात आठवते. पालघर डहाणू परिसरातले परिचित लेखक, प्रकाशक आणि त्यांची बाहेर फारशी न पोचलेली पुस्तकं या कथांमधून पात्रं म्हणून उभी राहतात.
खऱ्या प्रत्यक्षातल्या वास्तवाचा रखरखाट असह्य होतो,
परिस्थितीवरचे आधीच तोळामासा असणारे नियंत्रण हातून निसटत जाते,
प्रत्यक्षातले वास्तव आपल्यासाठी अधिकाधिक हिडिस, विरूप होत जाते
न टाळता येण्याजोग्या वास्तवाची मानेवरची ओझी असह्य होत जातात
तेव्हा काय होते? ‘आ चल के तुझे मैं लेके चलू इक ऐसे गगन के तले…’ म्हणत हव्याहव्याशा वास्तवात घेऊन जावे कुणी असे फक्त बालकुमारांनाच वाटते असे थोडेच आहे? याची पलायनवादी वगैरे संभावना सहजच शक्य आहे. पण हा प्रत्यक्षात तुम्हाला आतून काय वाटतं खरंच, याचा कष्टपूर्वक काढलेला नकाशा आहे. पुन्हा वास्तवाच्या अनिवार्य वाटेवर चालण्यासाठी बळ देईल असा.
हे असे, असेच निखिलेशला अभिप्रेत होते? नसेलच. पण पुस्तकं बाजारात आली की, वाचकांची होतात, लेखकाचं इतका वेळ धरलेलं बोट सोडून संवादी होतात ही कविकल्पना नव्हे, अनुभवसिद्ध गोष्ट आहे. त्याचा खणखणीत प्रत्यय या कथा वाचताना येतो.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
भुषण संखे यांचा या कथांसदर्भातला छोटासा मजकूर कव्हरच्या आतल्या फ्लॅपवर आहे- ‘‘या कथांमधली पात्रं ज्या जगात वावरतात ते आपल्याच आतलं जग आहे, तपशिलांचा अतिरेक आणि माहितीयुक्त वास्तवाचं कोरडंठाक चित्रण टाळून विलक्षणाचा दरवाजा थोडासा किलकिला केला की ते दिसतं. या कथा वास्तववादी वि अद्भुतवादीही नाहीत. त्या फिक्शनवादी आहेत.’’ तो अगदी खरा, नेमका आहे.
‘सिनाराचा प्रवासी’ ही यातली पहिलीच कथा. ‘सिनाराचे रहस्य’ ही ८०-९० वर्षांपूर्वी आलेली आणि नंतर १५ आवृत्त्यांमधून तीन-चार पिढ्यांतल्या बालकुमाराचं भावविश्व समृद्ध करणारी तीन भागांतली अद्भुतरम्य कादंबरी. समुद्रात विमान कोसळल्यानंतर मंदार कसाबसा जीव वाचवत भुमध्य समुद्रातल्या सिनारा बेटावर पोचतो. तिथं मध्ये गोलाकार सरोवराच्या बाजूला मराकी नावाच्या आदिवासी जमातीची वस्ती आहे. बेटाच्या दुसऱ्या बाजूला शलभ नावाची टोळांसारखी हिंस्त्र जमात राहते. ते मराकींवर वारंवार हल्ले करतात. तिथल्या अभेद्य गढीचा दरवाजा उघडण्यासाठीचा परवलीचा मंत्र शोधून मंदार मराकींना आत प्रवेश आणि शलभांपासून मुक्ती देतो.
आपल्या कथेचा लेखक आणि त्याचा समवयस्क चुलतभाऊ नंदू. नंदूला शिक्षणात, अभ्यासात रस नाही. वडिलांबरोबर त्याच्या त्यामुळे रोजच चकमकी झडतात. वडिलांचा मार आणि सततची बोलणी यानं मनात राग आणि वैताग भरलेल्या नंदूच्या हाती डहाणूमधल्या आजोबांच्या जुन्या घरी सुटीत आपला लेखक ‘सिनाराचे रहस्य’ ठेवतो.
भीती, वैताग, राग सगळं विसरलेला नंदू ही कथा काल्पनिक, हे विसरून त्यातल्या अद्भुत थरारात रमून जातो. आपल्याला काय करायचे आहे याचे उत्तर त्याला मिळाले आहे. तद्नंतर गायब झालेल्या नंदूचा ठावठिकाणा गेल्या २० वर्षांत लागलेला नाही. न्यूज चॅनलवरच्या सततच्या डेडलाईन्सचा ताण, मुंबईचं अफाट गर्दी आणि अपरिहार्य वेग असलेलं आयुष्य, अलीकडेच झालेला घटस्फोट या सगळ्याचं ओझं झुगारून पडणारी असंबद्ध वाटेलशी स्वप्नं. अशा एका उत्तररात्री स्वप्नोत्तर जाग येते, तर शेजारी अंधारात नंदू उभा आहे. विचित्र असा पोशाख आणि २० वर्षांनी वाढलेलं वय. शलभांनी निर्णायक आक्रमण केले आहे आणि गढीचा दरवाजा उघडण्याचा मंत्र आठवत नाहीये. ‘सिनाराचे रहस्य’च्या तिसऱ्या खंडात तो आहे. तो त्याला हवा आहे, तातडीने… पुढची कथा सांगण्यात अर्थ नाही. या वाटेवर चालायलाच हवे..
याच वृक्षाची आणखी एखादी फांदी असावी तशी दुसरी कथा, ‘गॉगल लावलेला घोडा’. लहानपणी डहाणूतल्या आठवणीत रसूलचाचांच्या टांग्याचा रूबाबदार घोडा आहे, मीर. त्याची झापड तुटली म्हणून एक दिवस चाचा त्याला मोठ्या मुलाचा काळा गॉगल लावतात… मोठेपणी तेच स्पर्धा, गर्दी, वेग यांनी भरलेलं आयुष्य. मल्टीनॅशनल कंपनीतलं सेल्स डिपार्टमेंट. एका रात्री स्वप्नात हा घोडा येतो, त्याच्या गॉगलच्या वर एक ठळक शब्द लिहिलेला असतो, ‘सिनारा’. दुसऱ्या दिवशी त्याला मेल येतो, सिनारा या देशात एसीसाठी बाजारपेठ शोधायची आहे… पुढे सिनारा हा देश जगात कुठं आहे यासाठी वेगवेगळ्या वाटांनी केलेली गूढ भासेलशी अथक शोधयात्रा, ही मेल म्हणजे कंपनीतल्या कुणी केलेली क्रूर थट्टा का कंपनीनंच निरोप देता यावा, यासाठी केलेली खेळी हे प्रश्नही एका टप्प्यावर संदर्भहीन होत जातात. ठरलेल्या वेळी, दिवशी सिनारा या कल्पनेतल्या देशी पण खऱ्या अंतहीन प्रवासाला सुरुवात होते. या एकट्यानंच तरी एकाकी नसलेल्या प्रवासातला निस्संगतेतला, जगण्यातली सगळी ओझी झुगारून आपल्या केवळ असण्यातला निराकार आनंद हेच कदाचित गंतव्यस्थान असावे.
‘गोष्टीत राहणाऱ्या बाईची गोष्ट’मधला भूषण संखे लेखक आणि वास्तूरचनाकार यांची तुलना करत साहित्य आणि इमारती या दोन्हींची निर्मिती माणसाला निर्विघ्न वास्तव्य करता यावे, यासाठीच झाली आहे या भरतवाक्यावर येतो. हाच विचार पुढे नेत इमारतीमध्ये एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज जाता-वावरता येते, तसे कथेतल्या वाक्याप्रसंगातही वावरता आले पाहिजे, यावर विचार करत राहतो आणि कथेत वास्तव्य करणं या कल्पनेचाच विस्तार करत कथा लिहीत असताना खेचला जावा, तसा एका वेगळ्याच वास्तवात ओढला जातो.
नव्यानं लिहिणारा लेखक यशानं हुरळून जात पुनःपुन्हा एखाद्या चकव्यात अडकावा, तसा तेच फॉर्म्युले गिरवत राहतो. जाणवते तेव्हा बाहेर येण्यासाठी काही दिवस लेखनातून रजा घेतो, या काळात एका वेगळ्याच चकव्यात अडकतो (‘पाषाणभूल’), भली मोठी पुस्तकं अधाशासारखी खात फुगत जाणारा सुरवंटासारखा प्राणी लोकऱ्या, अचानक आलेल्या ‘रायटर्स ब्लॉक’मुळे लेखन आपल्याला सोडून चाललंय या भावनेतून नैराश्याकडे नेणारी तगमग एकीकडे तर दुसरीकडे नंतर लेखनाच्या अमानवी शक्ती मधून थेट मिडीया, राजकारण ते अंडरवर्ल्ड… असा गर्तेतला प्रवास शेवटी लिहितं नक्की कोण इथवर येतो (‘मुंगीमानव अर्थात अनिकेत आख्यान’)…
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
...............................................................................................................................................................
बहुतेक सगळ्या कथांतून स्वप्न, भास, भ्रम वास्तवाचे चकवे येतात. हा प्रत्यक्षातला अनुभव की कथेचा नायक लेखक लिहितोय त्या कथेतला? आपण स्वप्नात आहोत का वास्तवात, की हे वास्तव वाटणारं घटित घडतंय त्या आणखी कुणाच्या स्वप्नात? या अनुभवांचं गुरुत्वाकर्षण याचा विचार करण्याइतकीही उसंत देत नाही. सिनारातल्या गढीचा दरवाजा उघडणारा परवलीचा मंत्र घेऊन आपण जणू बाहेर उभे आहोत असे वाटत राहते.
४.
‘पामुक’वरच्या उपरोल्लेखित लेखात निखिलेशनी पामुकचं एक संभाषित दिलं होतं. लेख जवळ नाही पण ते लक्षात राहण्याजोगे म्हणून त्याची पुस्तकखुण करून लगतच्या ग्रंथदिनी त्याचे वितरण केले होते, ते असे – “एखादी कादंबरी वाचणं, त्यातलं कल्पित वास्तव खरं मानणं आणि त्यात हरवून जाणं यासारखं सुख नाही. वाचक यामुळे आयुष्याशी बांधला जातो. एक लेखक या नात्याने माझं ध्येयही तेच आहे : वाचकाला आयुष्याशी घट्ट बांधून ठेवणं...”
आता लेखक झालेल्या निखिलेशनं वाचकांना तेच सुख या संग्रहातून भरभरून दिलं आहे, एवढे निश्चित म्हणता येते. बाकी आता चित्रेंचा असंख्य शक्यतांनी भरलेल्या वाटेवरचा पुढचा लेखनप्रवास आणखी कुठल्या चकव्यात नेईल, की काही वेगळ्या वाटेने होईल, याची उत्सुकता आतापासूनच वाटते आहे…
‘गॉगल लावलेला घोडा’ - निखिलेश चित्रे
पपायरस प्रकाशन, कल्याण
पाने - २३६
मूल्य - ३९९ रुपये.
............................................................................................................................................
लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment