अजूनकाही
९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नांदेड येथे झालेल्या सभेत राहुल गांधी म्हणाले, “...हा देश तपस्वींचा देश आहे. छ. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार पटेल आणि इतर महापुरुष हे तपस्वी होते. त्यांनी आयुष्यभर तपस्या केली. अशा तपस्वींसमोरच हा देश नेहमी आपले मस्तक झुकवतो...”
त्यापूर्वी भारत जोडो यात्रा सुरू होण्यापूर्वी नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमधे झालेल्या बैठकीत “ही यात्रा माझ्यासाठी एक तपस्या आहे. जर कोणी सोबत आले नाही तरीदेखील मी एकटा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत जाईन”, असे राहुल म्हणाल्याचे समजले होते.
‘तपस’ या मूळ धातूपासून ‘तपस्या’ या शब्दाची निर्मिती होते. ‘तपस’चा अर्थ आहे उष्णता निर्माण करणे किंवा प्रज्वलित करणे. तपस्या शब्द उच्चारताच आपल्याला ‘रामायण’-‘महाभारता’तील तपस्या करणारी पात्रे आठवतात. त्यातील काही पात्रे रावणासारखे राक्षसदेखील असतात, जे तपश्चर्या करून इच्छित वर प्राप्त करून घेतात. त्यानंतर कुंभमेळ्यांमध्ये दिसणारे आणि कठोर व्रत घेतलेले विविध आखाड्यांचे साधू आठवतात. कोणी अनेक वर्षे एक हात उंचावून ठेवलेला तर कोणी एका पायावर उभा. त्यामुळे लोकांना असे वाटते की, सर्व कर्मे बाजूला सारून एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी एखाद्या वृक्षाखाली बसून शरीराला क्लेश देत कठोर साधना करणे म्हणजे तपस्या. परंतु ही काही तपस्या नव्हे. अंतिम सत्याची आत्मानुभूती होण्याची प्रक्रिया म्हणजे तपस्या. ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी शरीर, वाचा, विचार आणि मन यांवर नियंत्रण मिळवणे आणि त्यांचे शुद्धीकरण होणे आवश्यक असते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांमध्ये तपस्येला फार महत्त्व आहे. ऋग्वेद काळात धर्म हा ईश्वर कृपाभिलाषी होता. देवतांकडून आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ विविध ऋचा रचल्या गेल्या. उत्तर वैदिक काळात देवतांना आपल्या इच्छा पूर्ण करण्यास भाग पाडण्यासाठी अनेक प्रकारची यज्ञे आणि कर्मकांडे करण्याची प्रथा सुरू झाली.
उत्तर वैदिक काळातच ब्राहमण परंपरेतंर्गत जटिल कर्मकांडांवर काही दार्शनिक टीका करू लागले आणि त्यातील फोलपणा सांगू लागले. त्यातून उपनिषदांची परंपरा निर्माण झाली. उपनिषदांनी कर्मकांडांना त्यागून ध्यानसाधनेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. कृपाभिलाषी होऊन कर्मकांडे करण्याऐवजी ध्यानाद्वारे आत्मा आणि परमात्मा यांतील संबंधांची अनुभूती घेणे, यात पुरुषार्थ असल्याचे मानले गेले.
ब्राह्मण परंपरेला समांतर अशी श्रमण परंपरा भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. या श्रमण परंपरेतून जैन आणि बौद्ध धर्मांचा उदय झाला. जर मनुष्य वासनेच्या पलीकडे गेला, तर तो स्वतः ईश्वरसम होतो, असे जैनांनी मानले. बुद्धाने मध्यममार्गाद्वारे निर्वाणाचा मार्ग दाखवला. जैन आणि बौद्ध धर्मांमध्ये सांगितलेली साधना किंवा तपस्या करणे, यात मोठा पुरुषार्थ आहे, असे मानले गेले. मध्ययुगात भक्ती आणि सुफी संतांनी तपस्येची पुनर्व्याख्या केली. केवळ आत्मउद्धारात संतोष न मानता समाजामधे राहून जनसामान्यांच्या अध्यात्मिक उद्धरासाठी यत्न करणे, असा नवीन अर्थ त्यांनी तपस्येला दिला. त्यांनी भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील द्वैत संपवले.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
ख्रिश्चन मिशनऱ्यांमुळे आपल्याला जनसेवा हीच ईश्वरसेवा, असा तपस्येचा नवीन अर्थ समजला. आधुनिक काळात गांधींनी संतांनी सांगितलेल्या तपस्येच्या अर्थाला अधिक व्यापक केले आणि त्यानुसार कृतीदेखील केली. भारतातील हजारो लाखो साधूंनी आता चरखा चालवण्याची तपस्या करावी, असे ते म्हणाले होते. असा हा तपस्या शब्दाच्या उत्क्रांतीचा थोडक्यात इतिहास आहे.
‘भारत जोडो यात्रे’दरम्यान राहुल गांधींमुळे ‘तपस्या’ शब्द चर्चेत आला आहे. भाजपच्या धार्मिक राजकारणाला शह देण्यासाठी तर ते अशा शब्दांचा वापर करत नाहीत ना, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण २०१४मध्ये जेव्हा भाजप प्रचंड बहुमताने केंद्रामध्ये सत्तेत आला, तेव्हा डावे सोडून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या धार्मिकतेचे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये निवडणूक काळात विविध मंदिरांना भेटी देणारे आणि आपले गोत्र सांगणारे, जान्हवे दाखवणारे राहुलदेखील होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर १९२०पर्यंत काँग्रेसने कटाक्षाने धर्मनिरपेक्ष राजकारण केले. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, परंतु तो काही काँग्रेसचा अधिकृत कार्यक्रम नव्हता. ह्या उत्सवाद्वारे टिळकांनी धर्माचा राजकारणासाठी उपयोग करून घेतला. परंतु गांधींनी जे केले ते टिळकांपेक्षा वेगळे होते. गांधींनी काँग्रेसच्या राजकारणाला नवीन दिशा देऊन राजकारणाचे आध्यात्मिकरण केले. ते धर्माच्या नैतिक अधिष्ठानाला सर्वाधिक महत्त्व देत आणि राजकारणाला धर्मापासून विभक्त केल्यास राजकारणाचे अधःपतन होईल, असे म्हणत. त्याच वेळी स्वतंत्र भारताचे शासन हे धर्मनिरपेक्षच असावे, असे त्यांचे ठाम मत होते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
राजकारणासारख्या सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती एकाच वेळी धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष कशी असू शकते, याचे गांधी उत्तम उदाहरण आहेत. गांधींनी ‘सत्याग्रह’ आणि ‘रचनात्मक कार्या’द्वारे दरिद्रनारायणाच्या उद्धारासाठी तपस्याच केली. गांधींनंतर अध्यात्म आणि राजकारण यांच्यात प्रामाणिक आणि कल्पकपणे अन्योन्नसंबंध प्रस्थापित करणारा नेता काँग्रेसमध्ये उरला नाही. सामान्य मनुष्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचे असे धर्माचे क्षेत्र केवळ काँग्रेसच नव्हे, तर इतर पक्षांतील पुरोगाम्यांनी धर्मांध शक्तींसाठी मोकळे सोडून दिले. त्याचा फायदा घेत धर्मांध शक्तींनी राजकारणाचे सांप्रदायिकीकरण केले आणि आज आपण त्याचे परिणाम पाहत आहोत. तपस्या धर्मांध शक्तींनीदेखील केली होतीच, परंतु ती सकाम तपस्या होती. त्याचे फळ ते उपभोगत आहेत, परंतु सकाम तपस्येमुळे मिळालेली फळे चिरंतन नसतात, याची अनेक उदाहरणे ‘रामायण’ आणि ‘महाभारता’त आपल्याला वाचायला मिळतात.
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल अजूनही धार्मिक स्थळांना भेटी देतात, परंतु त्यात प्रसिद्धी मिळवण्याचे क्षुद्र राजकारण आता दिसत नाही. यात्रा केरळमध्ये असताना अनेकदा सायंकाळी भाषण करताना अज़ानचा आवाज ऐकून मुसलमानांच्या धार्मिक भावनांचा आदर राखत आपले भाषण काही काळ थांबवण्याची त्यांची कृतीदेखील सहजच घडत होती. सद्यपरिस्थितीत तसे केल्याने धर्मांध नेते आपल्यावर मुस्लिमधार्जिणे असल्याची टीका करतील, अशी भीतीदेखील त्यांना कधी वाटली नाही. अनेक वर्षांनंतर आज पुन्हा आपल्या संकृती आणि संविधानात अंतर्भूत असलेला सर्वधर्मसमभावाचा विचार अत्यंत ठामपणे राष्ट्रीय पातळीवर मांडला जात आहे.
तर मग राहुल आज निष्काम तपस्या करत आहेत, असे म्हणावे काय? म. गांधींनी ‘गीते’वर भाष्य लिहिले आहे. ‘अनासक्तीयोग’ हे भगवद्गीतेचे सार आहे, असे ते मानत. परंतु आपण करत असलेल्या कर्मांच्या परिणामांविषयी उदासीन राहणे म्हणजे अनासक्तीयोग नव्हे, तर मनुष्याला आपल्या प्रत्येक कृतीच्या संभाव्य परिणामांची जाणीव असायला हवी आणि त्याबद्दल सजग राहून निरपेक्षवृत्तीने कृती करणे म्हणजे अनासक्तीयोग, असे ते लिहितात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
‘भारत जोडो यात्रा’देखील काही उद्दिष्ट साध्य करू पाहते. परंतु ही उद्दिष्टे संकुचित नसून चिरंतन मूल्यांवर आधारित आहेत. त्यामुळे त्यासाठी या लोकशाहीच्या काळात केवळ एकट्या राहुलनी तपस्या करणे पुरेसे होणार नाही. लोकशाहीत सर्व नागरिकांनी ही तपस्या करणे आवश्यक आहे. या यात्रेला दिवसेंदिवस अधिकाधिक जनसामान्यांचा मिळणारा पाठिंबा हे आशादायक चित्र आहे. परंतु तपस्येमधे सातत्यपूर्ण साधना करावी लागते, त्याग करावा लागतो.
ही यात्रा तपस्येची केवळ सुरुवात मात्र आहे. राहुलसह सर्व यात्रींना, तसेच या यात्रेला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांना अजून भरपूर तपस्या करावी लागणार आहे. समकालीन परिप्रेक्ष्यात राष्ट्राचे चैतन्य जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या तपस्येद्वारे समाजमनामध्ये सातत्याने मंथन होणे आवश्यक आहे.
..................................................................................................................................................................
हेही पाहावाचाअनुभवा -
राहुल गांधीं यांची ‘भारत जोडो’ यात्रा : कशासाठी? कोणासाठी? - हेमंत कर्णिक
राहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का? - प्रवीण बर्दापूरकर
काँग्रेस आणि राहुल गांधींचे भवितव्य ठरवणारी पदयात्रा... - प्रवीण बर्दापूरकर
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment