‘जिस लाहौर नइ देख्या...’ : माणुसकी हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे, हे वास्तव समोर आणणारा हा नाट्यानुभव घेतला पाहिजे
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘जिस लाहौर नइ देख्या...’ या नाटकातील काही प्रसंग
  • Sat , 12 November 2022
  • कला-संस्कृती नाटकबिटक ‘जिस लाहौर नइ देख्या वो जन्म्याइ नइ असग़र वज़ाहत

विसाव्या शतकात जागतिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. ऑक्टोबर १९१७मध्ये झालेली रशियन क्रांती‚ १९१४ ते १८ दरम्यान झालेले पहिले महायुद्ध‚ तसेच १९३९ ते ४५ दरम्यान झालेले दुसरे महायुद्ध‚ ऑगस्ट १९४५मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या दोन जपानी शहरांवर टाकण्यात आलेले अणुबॉम्ब, अशी मोठी यादी आहे. यात भारताने अहिंसेच्या मार्गाने मिळवलेले स्वातंत्र्यही गणले जाते.

भारताच्या स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ‘ब्रिटिश भारता’ची फाळणी‚ ही महत्त्वाची पण दु:खद घटना. फाळणीवर आजवर अनेक साहित्यकृती लिहिल्या गेल्या आहेत. त्यातील चटकन आठवणारे नाव म्हणजे भीष्म सहानींची ‘तमस’ ही कादंबरी आणि असग़र वज़ाहत यांचे ‘जिस लाहौर नइ देख्या, वो जन्म्याइ नइ’ हे दोन अंकी पंजाबी‐उर्दू नाटक. काही वर्षांपूर्वी या नाटकाचा शफाअत खान यांनी ‘राहिले घर दूर माझे’ या नावाने मराठी अनुवादही केला आहे.

अर्थातच नाटकाचा काळ आहे १९४७ सालचा. फाळणी नुकतीच झालेली. पाकिस्तानातील बरेच हिंदू भारतात आलेले आहेत, तर इकडचे बरेच मुस्लीम पाकिस्तानात गेलेले आहेत. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या या दोन्ही देशांना फाळणीमुळे पुनर्वसनाची मोठी समस्या सोडवावी लागली. त्यात मुख्य समस्या होती घरांची. त्यासाठी दोन्ही सरकारांनी खास विभाग बनवले होते. ते रिकाम्या झालेल्या घरांची माहिती जवळ ठेवत सीमेपलीकडून आपल्या देशात आलेल्या धर्मबांधवांना रिकामी झालेली घरं मिळवून देत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

असेच एक कुटुंब म्हणजे लखनौचे. मिर्झा‚ त्यांची पत्नी बेगम हमीदा‚ तरुण मुलगी तन्नो आणि तरुण मुलगा जावेद. या चौकोनी कुटुंबाला लाहोर शहरातील दोन मजली हवेली दिली जाते. हे कुटुंब मोठ्या आनंदाने नव्या घरात‚ नव्या शहरात राहायला, जगायला सुरुवात करतात. अर्थात मनात लखनौच्या आठवणीत ठेवत.

मिर्झा कुटुंबाच्या अचानक लक्षात येते की, हवेलीच्या वरच्या एका खोलीत एक म्हातारी राहत आहे. ती त्या हवेलीची मालकीण असते. रतनलाल नावाच्या हिंदू व्यापाऱ्याची आई. फाळणीमुळे तिचे कुटुंब भारतात स्थलांतरित होतं, पण ‘ज्या लाहोरमध्ये मी आयुष्य काढलंय, ते मेले तरी सोडून जाणार नाही’‚ असे म्हणत ही म्हातारी त्यांच्यासोबत जात नाही. आणि तिच्या रिकाम्या झालेल्या या हवेलीत लखनौचे एक मुस्लीम कुटुंब कायमचे राहायला येते. अशी या  नाटकाची दमदार सुरुवात होते.

या म्हातारीला लाहोर शहराचा प्रचंड अभिमान असतो. ज्याने लाहोर पाहिले नाही‚ जो लाहोर शहरात राहिला नाही‚ त्याचा जन्म फुकट गेला, असे तिचे मत असते. आणि तेच नाटकाचे शीर्षकही आहे. सरकारने आपल्याला दिलेल्या हवेलीत एक हिंदू म्हातारी आहे आणि ती हवेली सोडण्यास ठाम नकार देते म्हटल्यावर मिर्झा कुटुंबाची पंचाईत होते. मिर्झासाहेब पापभीरू‚ माणुसकी जपणारे असतात. त्यामुळे ते म्हातारीवर जबरदस्ती करत नाहीत. मात्र एकदा चिरडीला येऊन ते नाक्यावरच्या गुंडांच्या मदतीने म्हातारीला घराबाहेर काढण्याचे ठरवतात. पण त्यासाठी गुंड अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. त्यामुळे मिर्झा कुटुंब तो पर्याय सोडून देते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

मधल्या काळात म्हातारीचा सर्वांना लळा लागतो आणि ती घरातील एक व्यक्ती म्हणून वावरायला लागते. मात्र एका हवेलीत एक हिंदू स्त्री राहत आहे‚ ही माहिती मोहम्मद शहा नावाच्या गुंडाला समजते. तो मिर्झा कुटुंबाला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. फक्त मुसलमानांसाठी निर्माण झालेल्या पाकिस्तानात एक ‘काफीर’ महिला कशी राहू शकते‚ हा त्यांच्यासारख्या धर्मांध शक्तींचा सवाल असतो. मात्र एक वयोवृद्ध मौलवी धार्मिक एकतेचा उपदेश करतो.

काही काळानंतर म्हातारी आणि मिर्झा कुटुंबीय एवढे एकजीव होतात की, ते धुमधडाक्यात दिवाळी साजरी करतात. हवेलीवर रोषणाई‚ देवदेवतांची पूजा करतात. मोहम्मद शहासारख्या गुंडांच्या रूपाने वावरत असलेल्या धर्मांध शक्तींना हे सहन होणे शक्यच नसते. ते पुन्हा या हवेलीत येतात आणि धमक्या देतात. वयोवृद्ध मौलवीचा धार्मिक एकतेचा उपदेश कानाआड करतात. एका प्रसंगी तर मोहम्मद शहा एवढा संतापतो की, तो मौलवीला चक्क मारहाण करतो.

सर्वांची नजर या हवेलीवर असते, आणि एका बाहेरच्या (म्हणजे लखनौच्या) मुसलमानाला आयतीच मिळालेली असते, याचे त्यांना दु:ख होते. गुंड ‘हवेलीचा वरचा मजला तरी आम्हाला मिळाला पाहिजे’ अशी मागणी करतात. मिर्झा ती धुडकावून लावतात. परिणामी एका रात्री गुंड हवेलीवर सशस्त्र हल्ला करतात. त्यात म्हातारी मारली जाते.

त्यातून एक नवीनच समस्या निर्माण होते. म्हातारीचे अंत्यसंस्कार कसे करायचे? ती धर्माने हिंदू होती, पण तोपर्यंत लाहोरमध्ये हिंदूंची स्मशाने संपलेली होती. या ना त्या शक्तींनी स्मशानाच्या जागा हडप केल्या होत्या. म्हातारीचे मुस्लीम पद्धतीने अंत्यसंस्कार करता येत नव्हते. शेवटी ते नदीच्या किनाऱ्यावर हिंदू पद्धतीनेच केले जातात. त्या वेळी तिच्या गल्लीतील अनेक मुस्लीम स्त्री‐पुरुष ढसाढसा रडतात. कारण म्हातारीने अनेकांना नि:स्वार्थ बुद्धीने मदत केलेली असते. हा नाटकाचा शेवट चटका लावतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

अलीकडच्या काळात या नाटकाचे प्रयोग ‘अंक’ (स्थापना : १९७६) या मुंबईतील नाट्यसंस्थेने सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन कै. दिनेश ठाकूर यांनी केलेले आहे. त्यांनी नाटकाचा आशय ओळखून पात्रांच्या संवादांच्या उच्चारांवर विशेष मेहनत घेतलेली दिसते. पंजाबी‐उर्दूचं मिश्रण असलेली म्हातारीची लाहोरची भाषा, तर लखनौसारख्या नवाबी शहरातून आलेल्या मिर्झा कुटुंबाची खानदानी उर्दू भाषा यांवर खास मेहनत घेतल्याचे जाणवते. संवादांमुळे नाटकात कमालीचा सच्चेपणा उतरला आहे.

म्हातारीच्या भूमिकेत ज्येष्ठ रंगकर्मी प्रीता माथूर‐ठाकूर यांनी जान ओतली आहे. आजूबाजूला कडवट हिंदूविरोधी वातावरण‚ हिंसाचार असूनही म्हातारीची माणसाच्या चांगुलपणावरील श्रद्धा तसूभरही कमी होत नाही. हा तिच्या व्यक्तिमत्त्वातला पीळ प्रीता यांनी सहजपणे व्यक्त केला आहे. याशिवाय इतर पात्रंही महत्त्वाची आहेत. उदाहरणार्थ, लखनौ शहरातला भरभराटीला आलेला व्यवसाय सोडून अचानक लाहोरला यावं लागल्यामुळे आतून अस्वस्थ असलेला मध्यमवयीन मिर्झा (अजय चौधरी)‚ सतत ‘आमच्या लखनौमध्ये असं नसतं’ म्हणणारी मिर्झाची पत्नी (मीना वैभव)‚ त्यांची मुलगी तन्नो (सोनल माथुर)‚ जावेद (जय प्रकाश), मोहम्मद शहा (रोहित)‚ मौलवी (ब्रीज भूषण सोनी) या सर्वांनी छोट्या पण नाटकाचे कथानक पुढे नेण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भूमिका मन:पूर्वक केल्या आहेत.

नेपथ्य प्रवीण बनसोडे यांचं आहे. लाहोरमधील १९४७ सालची दोन मजली हवेली त्यांनी चांगल्या प्रकारे उभी केली आहे. वरचा मजला न दाखवता, त्या जिना न दाखवता रंगमंचाच्या डावीकडे एक उंचवटा उभा करून तिथून पात्रं वरच्या मजल्यावर येतात‐जातात. उजवीकडे हवेलीतील मध्य भाग‚ आत स्वयंपाक घर असेल‚ असे सूचित केले आहे. मध्य भागी चहाची टपरी‚ गावातील चावडी उभी केली आहे. तिथे होणाऱ्या गावगप्पांतून त्या काळच्या लाहोरमधील जनजीवन‚ टांगेवाले वगैरे डोळ्यांसमोर उभे करण्यात बनसोडे यशस्वी झाले आहेत. 

अनेक प्रसंग असलेल्या अशा नाटकात प्रकाशयोजना फार महत्त्वाची असते. ती जबाबदारी शिवाजी शिंदे यांनी समर्थपणे पेलली आहे. दिवाळीला जेव्हा हवेलीभर दिवे‚ पणत्या लावल्या जातात, तेव्हा खरोखर दिवाळी आलीय‚ असेच वाटते. हे प्रकाशयोजनेचे यश आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

या नाटकात दिनेश ठाकूर यांनी मोठ्या खुबीने प्रसिद्ध शायर निदा फाज़ली यांची काही गीतं वापरली आहेत. ती जसविंदरसिंग‚ उपग्न पंडया आणि दीपाली सोमैय्या यांनी गायली आहेत, तर संगीत ज्येष्ठ संगीतकार, कुलदीप सिंग यांनी दिले आहे.

नाटककाराने आणि नंतर दिग्दर्शकाने एक दर्जेदार कलाकृती निर्माण केली आहे. त्यातून एक कालातीत संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे अशी नाटके बघितली की, माणुसकीवरचा विश्वास दृढ होतो. शेवटचा प्रसंग तर खऱ्या अर्थाने ‘क्लायमॅक्स’ आहे. म्हातारीची प्रेतयात्रा हिंदू पद्धतीने निघते. तेव्हा अंत्ययात्रेतील सारे मुस्लीम हिंदू समाजात जे गीत गायिले जाते, ते गातात. धर्म‚ देशांच्या सीमा‚ भाषा वगैरे कोणतीही बंधने शुद्ध माणुसकीपुढे थिटी ठरतात, हे त्यातून नाटककार असग़र वज़ाहत यांनी अधोरेखित केले आहे.

गेली काही वर्षे जगभर अमानुष प्रकारचे धार्मिक लढे‚ भाषिक लढे‚ वांशिक लढे हिरीरीने लढले जात आहे. असे असले तरी माणुसकी हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे, हे वास्तव हे नाटक कलात्मतेने समोर आणते. त्यामुळे हा नाट्यानुभव अवश्य घेतला पाहिजे. 

.................................................................................................................................................................

लेखक अविनाश कोल्हे निवृत्त प्राध्यापक आणि कथाकार, कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......