अजूनकाही
उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या गोरक्षनाथपीठाचे महंत योगी आदित्यनाथ हे आता धर्मसत्तेबरोबरच राजसत्तेच्या गादीवर विराजमान झाले आहेत. योगी आदित्यनाथ हे सर्वांत तरुण असणारे तिसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी अखिलेश ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते, तर मायावती ३९व्या वर्षी मुख्यमंत्री झाल्या होत्या. परंतु अखिलेश आणि मायावती यांच्यापेक्षा आदित्यनाथ यांचा राजकीय प्रवास वेगळा आहे. 'एक हात में माला, दुसरे हाथ में भाला' घेणाऱ्या आदित्यनाथांची महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे. त्यामुळेच सर्वत्र विरोध असतानाही स्वतःचे उपद्रव्यमूल्य दाखवून त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची पटकावली आहे.
योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तराखंडमध्ये झाला. ते मूळ पौडी गढवाल येथील आहेत. त्यांचं खरं नाव अजय सिंग नेगी. राजपूत कुटुंबात जन्मलेल्या आदित्यनाथ यांनी गोरखनाथांवर संशोधन करण्यासाठी गाव सोडलं. त्यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं कायमचं वास्तव्य केलं. गोरक्षनाथ पीठाचे महंत अवैद्यनाथ यांनी १९९४मध्ये आदित्यनाथ यांना उत्तराधिकारी घोषित केलं. तेव्हापासून योगींची कारकीर्द चढत्या आलेखाप्रमाणे राहिली आहे.
'गॉडफादर'शिवाय संघटन
मायावती यांना कांशीराम यांनी राजकारणात आणलं. ते त्यांचे गॉडफादर होते. त्यांचं लक्ष्यही स्पष्ट होतं. त्यामुळे दलित वोटबॅंकेभोवती मायावतींचं राजकारण राहिलं. तर अखिलेश यांचे वडील मुलायम सिंग यादव हे राजकारणात मुरलेले नेते. यादव-मुस्लीम मतदार यांच्या जोरावर मुलायम सिंग यांनी सत्ता काबीज केली आणि अखिलेश यांच्यासाठी सत्तेची लुसलुशीत गादी तयार ठेवली. आदित्यनाथ यांना अशी राजकीय पार्श्वभूमी लाभली नाही. गोरखपूरचे पीठाधीश अवैद्यनाथ यांनी आदित्यनाथ यांना उत्तराधिकारी केले, परंतु त्यांच्या पाठीशी अनुभवी राजकारणी नव्हता, संघटना नव्हती, तरीही त्यांनी स्वत:च्या बळावर उत्तर प्रदेशात संघटन निर्माण केलं.
भाजपविरोधातही एल्गार
योगी आदित्यनाथ आणि वाद हे समीकरण ठरलेलं आहे. हा वाद केवळ हिंदूविरोधी शक्तींसोबत नव्हता, तर स्वकीयांसोबतही दिसून आला आहे. अनेक वेळा त्यांच्या हट्टापुढे भाजपचंही काही चाललं नाही. २००२च्या निवडणुकीत भाजपचे तत्कालीन मंत्री शिवप्रकाश शुक्ल गोरखपूरमधून निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात योगी आदित्यनाथ यांनी स्वतःचा उमेदवार उभा केला. भाजपनं तिकीट दिलं नसल्यामुळे हिंदू महासभा पक्षाच्या बॅनरखाली योगी आदित्यनाथ यांनी स्वतःचा उमेदवार उतरवला. शिवप्रकाश शुक्ल यांच्या प्रचारासाठी स्वत: अटल बिहारी वाजपेयी यांनी गोरखपूरमध्ये सभा घेतली, परंतु निकाल योगी आदित्यनाथ यांच्या बाजूने लागला. यावरून आदित्यनाथ हे कोडं किती क्लिष्ट आहे, हे समजून घेता येईल.
'एक हाथ में माला, दुसरे हाथ में भाला'
योगी आदित्यनाथ यांची ओळख 'एक हाथ में माला, दुसरे हाथ में भाला...' अशी आहे. जपतपाबरोबरच आदित्यनाथांनी हिंदू संरक्षणासाठी हाती शस्त्र घेतल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. संसदेच्या परिसरात योगी आदित्यनाथ आल्यानंतर वातावरण लगेच बदलून जातं. ते आले म्हणजे वादग्रस्त काहीतरी बोलणार, हे नक्की असायचं. बाकी त्यांचं प्रत्येकाशी वागणं मैत्रीपूर्ण असतं.
राजपूत जोडो...
उत्तर प्रदेशात ७.२ टक्के राजपूत आहेत. राजनाथ सिंग, संगीत सोम आणि योगी आदित्यनाथ हे युपीमधील राजपूत चेहरे आहेत. राजनाथ सिंग केंद्रात गेल्यामुळे राजपूत मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ उपयोगी ठरले. राजनाथ सिंग यांनीच योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आग्रह धरला. राजनाथ सिंग, योगी आदित्यनाथ आणि संगीत सोम यांच्यांमुळे उत्तर प्रदेशातील क्षत्रिय मतदार भाजपकडे राहिला.
ध्रुवीकरणाचं यशस्वी राजकारण
पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये संगीत सोम यांनी भाजपचा किल्ला लढवला. योगी आदित्यनाथ आणि संगीत सोम या दोघांचीही कार्यपद्धती एकसारखीच आहे. दोघांमध्येही वादग्रस्त वक्तव्य आणि कट्टर हिंदुत्व हे दोन्ही गुण आहेत. मुजफ्फरनगर दंगली भडकवण्यात संगीत सोम यांचा हात होता. या संदर्भात संगीत सोम यांच्यावर केसेस दाखल झाल्या आहेत. तशाच पद्धतीने योगी आदित्यनाथ यांचंही राजकारण चाललं आहे. २००७मध्ये मुस्लिमांच्या मुहरम सणात गोळी चालवल्यामुळे एका हिंदू युवकाचा जीव गेला. त्या युवकाला श्रद्धांजलीला जाण्यासाठी आदित्यनाथ यांनी आग्रह धरला, परंतु दंगली भडकतील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. त्या वेळी आदित्यनाथांच्या हजारो समर्थकांनी मुंबई-गोरखपूर गोदान एक्स्प्रेसचे डबे पेटवले. यासाठी योगी आदित्यनाथ यांना जबाबदार ठरवून जेलमध्ये पाठवलं गेलं. संगीत सोम आणि योगी आदित्यनाथ यांच्यात फरक एवढाच की, योगींनी हिंदूंना एकत्र आणण्यासाठी संघटना निर्माण केली. 'हिंदू युवक वाहिनी'च्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना संघटनेत सामील करून घेतलं, वेळप्रसंगी राज्य सरकारविरोधात दंड थोपटले, काठ्या खाल्ल्या, जेलची हवा खाल्ली, परंतु चिकाटी सोडली नाही. ७ सप्टेंबर २००८ रोजी आजमगडमध्ये आदित्यनाथ यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हिंदूंसाठी लढणारा नेता म्हणून आदित्यनाथ यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्यामागे मोठा समाज उभा राहिला. त्यामुळेच उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण व्हावा, यावर ऑनलाईन घेतलेल्या सर्व्हेमध्येही योगी आदित्यनाथ पहिल्या पसंतीचे 'सीएम मटेरियल' बनले.
त्यांच्या आदेशावरून सण होतो साजरा...
गोरखनाथ पीठाची सण साजरी करण्याची वेगळी पद्धत आहे. या ठिकाणी हिंदूंचे सण कधी होणार, याची घोषणा गोरखनाथ मंदिरातून केली जाते. सध्या मठाचे महंत योगी आदित्यनाथ सण कधी साजरा करायचा याची घोषणा करतात. ज्या वेळेस देशात सण असतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी गोरखपूरमध्ये सण साजरा केला जातो. हिंदूंना एकत्र आणण्यासाठी आदित्यनाथांनी अस्पृश्यता मोहीम हाती घेतली. त्यातून हिंदू धर्मातील जातींना एकत्र आणण्यात योगींना यश मिळालं. त्यांनी १९९७, २००३, २००६ आणि २००८ या सालांमध्ये विश्व हिंदू महासंघांचं आयोजन केलं होतं.
हिंदू हदयसम्राट कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील काळात कोणी आव्हान देऊ शकत असेल, तर ते योगी आदित्यनाथ आहेत. 'कट्टर हिंदुत्ववादी' ही मोदींची प्रतिमा आता हळूहळू नष्ट होत चालली आहे. विकासाचा अजेंडा राबवताना 'सबका साथ, सबका विकास'ची हाक द्यावी लागत आहे. अशा वेळी योगी यांनी राजकीय पोकळी भरून काढण्यास सुरुवात केली आहे. ‘एका हिंदू तरुणीचं धर्मपरिवर्तन केलं, तर १०० मुस्लीम मुलींचं धर्मपरिवर्तन करण्याची’ डरकाळी फोडणारे योगी आदित्यनाथ आता सत्ता हातात आल्यावर कोणत्या अराजकाला निमंत्रण देतात, हे लवकरच पाहायला मिळेल. त्यांचा रुद्रावतार पुढच्या काळात मोदींनाही पाहावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश निवडणुकीत स्टार प्रचारकाची भूमिका पार पाडतात, परंतु आता मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी वेगळी आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत.
१. वचन पाळणं : उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप सरकारने विकासाचा अजेंडा म्हणून अनेक घोषणा केल्या. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आता योगी आदित्यनाथ यांच्यावर आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं, त्याचबरोबर सुकन्या योजना, जनधन योजना, उज्ज्वल योजना राबवून यशस्वी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
२. कायदा व सुव्यवस्था : योगी आदित्यनाथ यांना कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करणं परवडणार नाही; कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावं लागेल. अँटी रोमिओ दल ही संकल्पना त्यांची होती. ते दल स्थापन करून महिला-तरुणींची सुरक्षा करण्याचं, गुंडगिरी नष्ट करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.
३. प्रशासनावर पकड : महत्त्वाच्या योजना राबवण्यासाठी तसंच वेगात काम करण्यासाठी प्रशासनावर पकड आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्ता असलेल्या अधिकाऱ्यांना संधी द्यावी लागेल, त्यांना या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल, तर काही वेळा कठोर भूमिका घ्यावी लागेल.
४. सामाजिक समतोल : योगी आदित्यनाथ आता एका समाजाचे नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना मुस्लिमांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घ्यावीच लागेल. तसंच दोन्ही समाजात दरी निर्माण होईल, अशी कृत्यं टाळावी लागणार आहेत. 'हे सरकार आपल्या हिताचा विचार करत आहे', हा विश्वास मुस्लीम समाजाला वाटायला हवा, याची दक्षता त्यांना मुख्यमंत्री म्हणून घ्यावी लागेल.
५. महंत आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वाढलेल्या आशा : कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कर्ता मुख्यमंत्री झाल्यामुळे महंत, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या आशा वाढल्या आहेत. अशा वेळी भलता अतिरेक होऊ शकतो. अति उत्साहाला आवर घालून अघटित घटना होऊ नये, याची काळजी योगी आदित्यनाथ यांना घ्यावी लागेल.
६. राम मंदिर : राम मंदिराचा मुद्दा हा हिंदूंच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केंद्रात आणि राज्यांत भाजप सरकार असल्यामुळे राम मंदिराच्या हालचाली तीव्र होतील. अशा वेळी राम मंदिर उभं करण्याचं स्वप्न योगी आदित्यानाथांनी बाळगलं, तर पुन्हा मोठा वाद निर्माण होईल. त्यामुळे अयोध्या आणि राम मंदिरासंदर्भात विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल.
७. युपी में रहना होगा तो 'योगी योगी' कहना होगा? : गोरखपूर भागात एक घोषवाक्य पूर्वीपासून गाजत आलं आहे - 'गोरखपूर में रहना होगा, तो 'योगी योगी' कहना होगा.’ गोरखपूर परिसरात योगी आदित्यनाथांच्या नावाशिवाय पानसुद्धा हलत नाही. आता तर राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यांच्या एकेका शब्दावरून उत्तर प्रदेशात रामायण-महाभारत होऊ शकतं. आता तर योगी केवळ गोरखपूर नव्हे, तर संपूर्ण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. आता तिथं नवीन घोषणा जन्म घेत आहे - 'युपी में रहना होगा तो योगी योगी कहना होगा'.
‘शूट आऊट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटात अमिताभ बच्चनचा एक संवाद आहे - ‘तुमच्या घराबाहेर एक माणूस बंदूक घेऊन उभा आहे. तुम्हाला काय वाटतं, तो कोण असावा? तुमचं संरक्षण करणारा पोलीस की, तुम्हाला लुटण्यासाठी आलेला गुन्हेगार?’ उत्तर प्रदेशच्या जनतेनं मतांच्या माध्यमातून त्याचं उत्तर दिलं आहे, परंतु भाजपने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथांची निवड करून अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
लेखक झी मीडियाच्या दिल्ली ऑफिसमध्ये कार्यरत आहेत.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ganesh Kadam
Mon , 20 March 2017
Very nice article Ram