नांदेडहून प्रकाशित होणाऱ्या ‘उद्याचा मराठवाडा’ या दैनिकाचा दिवाळी अंक गेल्या काही वर्षांपासून लक्षवेधी, वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पकता या तीन वैशिष्ट्यांमुळे वाचनीयता आणि संग्राह्यता या बिरुदांचा धनी होतो आहे. गेल्या दोन वर्षांचीच उदाहरणे पहा. २०२०मध्ये करोनाकहर जोरावर होता. सबंध जग करोना महामारीच्या फेऱ्यात अडकलेलं होतं. तेव्हा करोनाने निर्माण केलेल्या समस्यांचे स्वरूप आणि त्यावरील चिंतन या अनुषंगाने ‘पुनर्निर्माण पर्व’ या विषयावर ‘उद्याचा मराठवाडा’चा २०२०चा दिवाळी अंक होता.
२०२१मध्ये करोनाकहर काहीसा ओसरला होता, पण भीती कायम होती. चीन, अमेरिका, लंडन, रशिया यांसारख्या देशांतून करोनाच्या तिसऱ्या, चौथ्या लाटेच्या बातम्या येत होत्या. तेव्हा ‘उद्याचा मराठवाडा’चा २०२१चा दिवाळी अंक ‘नवे पर्व’ या विषयावर होता. यंदाची दिवाळी मात्र पूर्णपणे करोनामुक्त आहे. त्यामुळे यंदाचा या दिवाळी अंकाचा विषय आहे - ‘मुक्तपर्व’.
यंदाचे या अंकाचे अतिथी संपादक आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर. त्यांच्या साक्षेपी संपादनातून या अंकातला ‘मुक्तपर्व’ हा मुख्य विभाग आकाराला आला आहे. हेमंत देसाई (ठाकरे फोर-जी), अतुल देऊळगावकर (नरकपुरीतून निसर्गरम्यतेकडे), मधुकर धर्मापुरीकर (व्यंगचित्रातील चिंतनशीलता), प्रवीण बर्दापूरकर (कोरोनोनुभव), श्रीकांत उमरीकर (लळा बारवांचा), राजेश भिसे (ड्रायपोर्ट - मराठवाड्यासह राज्याच्या विकासाचे नवे पर्व), निशिकांत भालेराव (असा लढा होणे नाही), अशा मान्यवर लेखकांचा या विभागात समावेश आहे.
अजेय गंपावार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची घेतलेली सविस्तर मुलाखत हे या अंकाचे विशेष आकर्षण आहे. या मुलाखतीचे शीर्षक आहे - ‘अनावश्यक गोष्टींवर वाद घालण्याची आपल्याला जरा जास्तच आवड आहे...’. हिंदी सिनेमा, अभिनेते यांच्याबद्दल आणि स्वत:बद्दलही नसीरुद्दीन शाह यांनी अतिशय रोखठोकपणे आपली मतं मांडली आहेत. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ असा सध्याचा काळ आहे. नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे काही मोजके कलावंत ‘खरं सांगेन आणि तेही ठासून सांगेन’ या पंथातले आहेत. त्यामुळे ही मुलाखत वाचायलाच हवी.
याशिवाय या अंकात कथा, कविता, बालसाहित्य, व्यंगचित्रे यांचाही प्रथापार समावेश आहेच.
या अंकातला हा एक लेख... संपादकांच्या पूर्वपरवानगीसह...
.................................................................................................................................................................
‘शहरात लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय!’ असा ठळक फॉन्टमध्ये छापलेला मथळा, आणि त्यासोबत एक माणूस मुले पळवतानाचा, आणि त्यानंतर काही नागरिक त्या माणसाला मारतानाचा व्हिडिओ, अशी पोस्ट गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपवर फिरू लागली. पुणे, कल्याण, अकोला, औरंगाबाद आणि राज्यांत इतरही अनेक ठिकाणी ही टोळी सक्रिय असल्याचे सांगणारा हा मेसेज वाऱ्यासारखा पसरला. आपापल्या गावातील लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी आणि त्या टोळीपासून गावाला वाचवण्यासाठी तरुणांनी रात्री गावात गस्त घालावी, असंही त्या मेसेजमध्ये सांगण्यात आलं होतं.
सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातही ही बातमी गावोगाव पोचली होती. त्याने लोकांमध्ये घबराट पसरली. परिणामी एका ठिकाणी या अफवेतून चार साधूंना, तर अन्य एका घटनेत एका तृतीयपंथी व्यक्तीला मारहाण झाली. या मारहाणीनंतर पोलिसांनी या प्रकरणात स्पष्टीकरण दिलं आणि अशी कोणतीही टोळी जिल्ह्यात सक्रिय नसल्याचं स्पष्ट केलं.
खरं तर महाराष्ट्रात अशा अफवा पसरण्याची ही पहिली वेळ नव्हे. याआधी कित्येक वेळा अशा अगम्य अफवा पसरल्या आहेत. प्रसंगी त्यातून हिंसाही घडली आहे. अशा अफवा का पसरवल्या जातात, फेक न्यूज पसरवण्यामागे एखाद्याचा हेतू काय असतो, यातून बातमी पसरवणाऱ्या व्यक्तीला काही फायदा होतो का? हे प्रश्न अनेकदा विचारले गेले आहेत, आणि त्यावर बरीचशी चर्चाही झाली आहे, पण ‘फेक न्यूज’ नावाचा हा व्हायरस अजून समाजातून पूर्णत: हद्दपार झालेला नाही. किंबहुना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून फेक न्यूज पसरवण्याचे आणि त्यातून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. जगातील कोणताही देश यापासून दूर राहू शकलेला नाही.
भारतात २०२० साली केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार, त्या वर्षी करोनाची साथ चालू असताना फेक न्यूजच्या प्रमाणात २१४ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्या एका वर्षात तब्बल १५०० फेक न्यूजची प्रकरणे नोंदवण्यात आली. करोनाच्या साथीदरम्यान जगभरातील विविध देशांमध्ये पसरलेल्या ९ हजार ६५७ फेक न्यूजचा अभ्यास केला गेला. त्यापैकी सर्वांत जास्त फेक न्यूज या भारतात पसरलेल्या होत्या.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
भारतात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर, आणि त्या प्रमाणात सोशल मीडियाबद्दलची साक्षरता नसणे, ही काही कारणे यामागे आहेतच, पण फेक न्यूज पसरण्यामागील कारणांचा आणि हेतूंचा आढावा घ्यायला गेल्यास काही गंभीर निरीक्षणं समोर येतातच. त्याचबरोबर भारतासारख्या खंडप्राय देशात, अभिव्यक्ती आणि माहिती प्रसारणाचं स्वातंत्र्य असलेल्या लोकशाहीत फेक न्यूज हा प्रकार मोठ्या जनसमुदायावर विपरीत परिणाम करत असतो, त्याचा थेट संबंध देशाच्या स्थैर्यासोबत व राज्यघटनेने दिलेल्या मूल्यांसोबत असतो. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची, त्यामागची कारणे आणि परिणाम समजून घेण्याची गरज आहे.
साधारण २०१६ सालच्या नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान भारतात ‘जिओ’चं आगमन झालं. ‘जिओ’ बाजारात दाखल होण्याच्या आधीच इतर मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी त्यांचे इंटरनेटचे दर कमी केले होते. त्याच सुमारास मोबाईलचे दरदेखील कमी झाले होते. मायक्रोमॅक्ससारख्या भारतीय कंपन्यांनी २०१२पासून आणलेले तंत्रज्ञानाचे इनोव्हेशन व त्यानंतर ‘एमआय’सारख्या चिनी कंपन्यांनी त्याला टक्कर म्हणून अधिकाधिक कमी दरात आणलेले स्मार्टफोन या सगळ्याचा परिणाम म्हणून २०१६पर्यंत अगदी ५ ते ६ हजारांपर्यंत स्मार्टफोन मिळू लागला; म्हणजेच स्वस्त फोन आणि स्वस्त इंटरनेट! मे २०१६ ते मार्च २०१७ या केवळ नऊ महिन्यांच्या कालावधीत भारतातील इंटरनेट वापर साडेसहा पट वाढला.
हे सगळं अभूतपूर्व होतं. इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढल्याची उदाहरणं जगात क्वचितच आहेत. डेटाची उपलब्धता आणि स्मार्टफोनच्या किमती कमी झाल्यामुळे या काळात अधिकाधिक माहिती लोकांकडे येऊ लागली. एका अर्थाने माहितीचा विस्फोट झाला. त्यातलं नक्की खरं काय आणि खोटं काय, हे शोधण्याचे कोणतेही मार्ग, शिक्षण व ज्ञान नव्हतं. याचाच परिणाम म्हणजे तेव्हापासून भारतात फेक न्यूज नावाच्या या विषाणूचा जो उद्रेक सुरू झाला. त्याआधीही फेक न्यूज होत्याच, पण त्यांची व्याप्ती मर्यादित होती. २०१६नंतर याचा विस्तार जो वाढला तो आजही तसाच वाढता आहे. नव्याने आलेल्या या डेटा क्रांतीमुळे माहितीचा बेसुमार भडिमार होऊ लागला.
हे स्थित्यंतर ज्या वेगात घडलं, त्या वेगात त्यातील धोके समजून घेऊन उपाययोजना करण्यात आपण समाज म्हणून कमी पडलो. हे खेदाने मान्य करावं लागेल. याला कारण म्हणजे समाजमन ज्या गतीने तयार होते त्याहून प्रचंड अधिक वेगाने वाढलेले माध्यम. टीव्ही, रेडिओ अशा या आधीच्या मास मीडियाला सर्वदूर पोहोचायला काही वर्षे किंबहुना काही दशके लागली होती. या कालावधीत या माध्यमांचे धोके, चांगले काय, वाईट काय, यांचे ठोकताळे बनवता आले होते. मात्र इथे अवघ्या काही महिन्यात इंटरनेट सर्वदूर पोहोचल्याने ही सगळी प्रोसेस घडूच शकली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून फेक न्यूज चे संकट उभे राहिले.
जनसामान्यांसाठी बातमी म्हणजे फक्त ‘माहिती’ नसते. भोवतालच्या राजकीय, सामाजिक, भौगोलिक, भावनिक जगाशी स्वत:ला संलग्न ठेवण्यासाठीचं त्यांचं ते एक महत्त्वाचं साधन असतं. भोवती घडणाऱ्या बऱ्या-वाईट गोष्टींची आपल्या रोजच्या आयुष्याशी सांगड घालायला, विचारपूर्वक निर्णय घ्यायलाही त्या त्यांना मदत करतात. म्हणूनच खऱ्या बातम्या जशा सर्वसामान्यांच्या उपयोगी येतात, तेवढ्याच ताकदीने खोट्या बातम्याही त्यांचे आयुष्य ढवळून टाकू शकतात. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर आदी शक्तिशाली सोशल मीडिया माध्यमं सर्वसामान्यांना त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी संधी बहाल करतात. या सगळ्या तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी माध्यमांचे तर लोकशाहीकरण केले आहेच, पण लोकशाही आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य बळकट केले आहे. त्यामुळे यावरील एखाद्या माहितीचे किंवा बातमीचे मूल्य हे समाजातील एका मोठ्या वर्गासाठी खूप जास्त आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
या धारणेला पूरक म्हणून पाहायचे झाल्यास व्हॉटस्अॅप कंपनीने फेक न्यूज रोखण्यासाठी निबंध जारी केले. त्या वेळी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे बोलकी आहेत. ते म्हणतात की, भारतीय लोक ‘फॉरवर्ड’ करण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. भारतीयांच्या या ‘फॉरवर्ड’ प्रेमाचा फायदा हे फेक न्यूजवाले घेतात.’ एखादी बातमी, किंवा साधा मेसेज फॉरवर्ड करताना आपण किती कमी जागरूक असतो, कारण ही गोष्ट करायला मिळत आहे याचाच आनंद सर्वाधिक असतो, हे या निरीक्षणातून दिसते. केवळ कुणाला तरी फसवणं, हा फेक न्यूजचा हेतू नसतो. ९९ टक्के फेक न्यूजमागे काहीतरी राजकीय, धार्मिक, सामाजिक, गुप्त हेतू हा असतोच असतो, आणि आपण कळत-नकळत तो साध्य करण्याचे त्याचे माध्यम बनतो. कधी या प्रतिक्रिया धर्म, जात, प्रांतभेदांच्या नावाखाली कुणाचाही जीव घेण्यापर्यंत भयानक बनू शकतात. महनीय व्यक्तींना जिवंत असताना मारण्याचे कारनामे तर फेक न्यूजच्या जगातील रोजचीच गोष्ट.
पूर्वी आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नये, असे म्हणायचो. आता तर असे फोटो तयार केले जातात की, त्यावर नकळतपणे विश्वास बसतो वा ठेवला जातो. त्यामुळे कानांनी ऐकलेलेच नव्हे तर डोळ्यांनी पाहिलेलेसुद्धा खरे असेल का नाही, अशी परिस्थिती आता तयार झाली आहे.
‘ट्रस्ट डेफिसिट’ असणारा हा काळ आहे, आणि हा ट्रस्ट डेफिसिट संख्यात्मकदृष्ट्या इतका मोठा आहे की, भारतात साधारण ६५ ते ७० कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. त्यापैकी समारे ४८ कोटी लोक व्हाट्सअॅप या मेसेंजर अॅपचा वापर करतात. व्हॉटस्अॅप हे माध्यम म्हणून तांत्रिकदृष्ट्या वापरायला अतिशय सोपं असल्याने ते वापरणारे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात असणं आश्चर्यकारक नाही. अर्थात याचा मोठा फायदा व्हॉट्सअअॅपला झाला.
आज भारत व्हॉट्सअॅप वापराच्या बाबतीत जगभरात प्रथम क्रमांकावर आहे. एखादी बातमी, फोटो किंवा व्हिडीओ आपल्यापर्यंत पोहोचणं आणि तो आपल्या माहितीतील इतर लोकांना पुढे पाठवणं, ही संपूर्ण प्रक्रिया व्हॉट्सअॅपने अत्यंत सुलभ करून टाकली. याचा परिणाम असा झाला की, फेक न्यूजचा प्रसार करण्यासाठी व्हॉट्सअॅप हे अत्यंत सोपं साधन बनलं. स्वत: व्हॉट्सअॅपच्या व्यवस्थापनाने या प्रश्नावर उत्तर देताना ‘भारतात फेक न्यूज पसरवण्यासाठी काही लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात’, असं म्हणत खेद व्यक्त केला आहे. याबद्दल याच वर्षी भारत सरकार आणि मेटा कंपनीचे काही अधिकारी, यांच्यात चर्चा झाली. फेक न्यूजचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबद्दल ही चर्चा होती. त्यातून काय निष्पन्न होईल, हे अद्याप सांगता येणं अवघड असलं, तरी याची दखल भारताच्या सरकारनेही गांभीर्याने घेतलीय एवढं मात्र नक्की.
या समस्येवर उपाय म्हणून काही गोष्टी आपण प्रत्येकाने करता येण्यासारख्या आहेत. त्या करण्यासाठी फार काही कष्ट किंवा अद्ययावत तंत्रज्ञान यांची गरजही लागत नाही. पहिली गोष्ट म्हणजे गुगल रिव्हर्स इमेज सर्च. एखादा फोटो जेव्हा व्हॉट्सअॅप किवा फेसबुकसारख्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतो, तेव्हा तो फोटो आणि त्याबद्दल केला जाणारा दावा खरा आहे की खोटा, हे तपासण्यासाठीचा सर्वांत उत्तम उपाय म्हणजे ‘गुगल रिव्हर्स इमेज सर्च’. गुगलने उपलब्ध करून दिलेल्या या टूलमध्ये हा फोटो जेव्हा आपण अपलोड करतो, तेव्हा त्याच्याशी संबंधित सर्व माहिती, बातम्या, इतर संबंधित बाबी आपल्याला एकाखाली एक दाखवल्या जातात. तो फोटो इंटरनेटवर नेमका कधी अपलोड केला गेला, तो कुठला आणि आणि त्यामागची स्टोरी काय आहे, ही सगळी माहिती गुगल रिव्हर्स इमेज सर्चमधून मिळवता येते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
दुसरं म्हणजे एखादी बातमी जेव्हा आपल्यापर्यंत येते, तेव्हा ती कोणत्या ना कोणत्या स्रोताच्या माध्यमातून प्रसारित केलेली असते. हा स्रोत अगदी एखाद्या फेसबुक पेज किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपपासून एखाद्या न्यूज चॅनेलच्या वेबसाईटपर्यंत कोणताही असू शकतो. बातमी देणारा स्रोत विश्वासार्ह आहे की, नाही, हा विचार करून त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवणं, हा अशा वेळी सर्वोत्तम मार्ग आहे. एखाद्या व्हाट्सअॅप ग्रुपवर आलेला फॉरवर्ड, आणि एखाद्या राष्ट्रीय पातळीच्या न्यूज चॅनेलवर आलेली बातमी, यापैकी जास्त विश्वासार्ह कोण हे ठरवणं फारसं अवघड नसतं. त्यामुळे बातमी वाचताना, ती पुढे पाठवताना सजग राहणं, हा फेक न्यूज रोखण्याचा उत्तम मार्ग आहे असं म्हणावं लागेल.
सोशल मीडियाचे सगळे डिझाईन हे ‘रिअॅक्शन’ ड्रिव्हन आहे, म्हणजे काय तर अवघ्या काही सेकंदांत तुम्ही एखादी गोष्ट वाचून, पाहून, ऐकून त्यावर लाईक, शेअर, कमेंट करण्याची कृती करावी, अशी या सगळ्याची रचना आहे. तुम्ही आता मेसेज वाचलात आणि दोन तासाने मग फॉरवर्ड केलात, असे कधी झाले आहे का? शक्यतो अवघ्या काही सेकंदात आपण ती कृती करतो आणि मग या काही क्षणाच्या अवकाशात माहितीची सत्यात पडताळणे, त्यावर सारासार विचार करणे इतक्या सगळ्या गोष्टी आपला मेंदू करू शकत नाही. त्यामुळे ‘थिंक ट्वाईस’ हा सोपा मंत्र वापरल्यास म्हणजेच एखादा लाईक, शेअर, फॉरवर्ड करायच्या आधी फक्त दोनदा विचार केल्यास मेंदूला पुरेसा वेळ मिळू शकतो आणि अवघ्या काही सेकंदातच आपण आपल्या रिअक्शनला ‘रिस्पॉन्स’मध्ये बदलू शकतो. स्वत:मध्ये हा छोटासा बदल केल्यास आपण फेक न्यूज विरोधातील शिलेदार बनू शकतो.
तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत चलाखीने फेक न्यूज पसरवल्या जाण्याचा प्रकार आताशा फारसा नवीन राहिलेला नाही. कोणती बातमी ही फेक न्यूज आहे, हे ओळखण्यासाठीचे काही प्रभावी मार्गही आता उपलब्ध आहेत. येणाऱ्या माहितीबद्दल जागरूकता असेल, तर ते मार्ग वापरून माहिती खरी आहे की नाही, हे ओळखणं आता शक्य झालं आहे. पण कोणत्याही मार्गाने ओळखताच येणार नाहीत असे फेक न्यूजच्या पुढे जाणारे काही प्रकार आता मोठ्या प्रमाणावर घडू लागले आहेत.
खरंच वाटेल असं खोटं बनवण्यासाठी इतके प्रगत तंत्रज्ञान वापरले जात आहे की, येणाऱ्या दशकात हे संकट अधिकाधिक गहिरेच होत जाणार आहे असे दिसते. त्याचं एक उदाहरण म्हणजे ‘डीपफेक’! आपल्याला फेसबुकवर खूपदा असं नोटिफिकेशन येतं की, एखादी ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती प्रत्यक्षात असती तर ती कशी बोलेल, कसे डोळे फिरवेल, कशा प्रकारे आपल्या शरीराची, विशेषत: तोंडाची हालचाल करेल. बहुतांश वेळेला ते एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीबाबतीत किंवा अगदी एखाद्या धार्मिक व्यक्ती बाबतीतसुद्धा असतं. ज्या व्यक्तीचं कोणतंही व्हिडिओ फुटेज उपलब्ध नाही. अशा लोकांचे खोटे पण काही क्षणाचे व्हिडिओ फुटेज ही अॅप्स तयार करतात आणि आपण त्याच्यावर क्लिक करून वॉव फॅक्टरने, डोळे विस्फारून हे बघत राहतो.
या सगळ्या घटना वेगवेगळ्या असल्या तरी या सगळ्यांच्या मागे काम करणारं तंत्रज्ञान एकच आहे. त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे 'डीपफेक'. फेक इमेजेस. फेक न्यूजच्या पलीकडचं हे तंत्रज्ञान आहे. वास्तवात खोटे, पण खऱ्यासारखे हुबेहूब व्हिडीओ बनवू शकणारं तंत्रज्ञान म्हणजे 'डीपफेक'. गेली जवळपास दहा वर्ष क्रमाक्रमाने या तंत्रज्ञानाचा विकास होतोय. इमेजेस मॉर्फ करता येतात, एकाचा चेहरा दुसऱ्याला लावता येतो, हे आपल्याला एव्हाना माहीत झालंय. पण आपला एक समज असा होता की, व्हिडिओला अशी काही छेडछाड करता येत नाही. दहा मिनिटे एखादी व्यक्ती बोलत असेल. एखादा व्हिडिओ प्ले होत असेल तर त्यांच्यात काहीतरी फेक असणं अवघड आहे. एखादा व्हिडिओतील व्यक्ती जे बोललाच नाहीयेत, तीच वाक्य त्याच्या तोंडी व्हिडीओत टाकणं आणि ती इतक्या शिताफीने टाकणं की, त्यातलं खोटं काही कळणारच नाही, असं आजवर सहजासहजी कधी घडलं नव्हतं.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
आजवर आपण ऑडिओ वेगळा आणि व्हिडिओ वेगळा, उदाहरणार्थ तमिळ पिक्चरचं हिंदी डबिंग बघत आलोय, पण त्यात अगदी स्पष्ट कळतं की, हे खोटं आहे. त्यात लिपसिंक नसतं. त्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओचं काहीही कोऑर्डिनेशन नसतं. त्यामुळे हे वेगळं आहे, हे खोटं आहे; हे सहज कळतं. पण मशीनचा वापर करून जे एखादी व्यक्ती प्रत्यक्षात बोललेलीच नाही, तस वाक्य बोलतानाचा, त्याच्या ओठांची हालचाल, चेहऱ्याची हालचाल हे सगळं हुबेहूब पण खोट्या पद्धतीने घडणारा व्हिडिओ बनवणं म्हणजे ‘डीपफेक’.
या डीपफेकला अजून एक नाव आहे, ते म्हणजे ‘सिंथेटिक मीडिया’. सिंथेटिक म्हणजे अर्थातच आर्टिफिशल. जे अस्तित्वातच नाही असा मीडिया, असा कंटेंट म्हणजे सिंथेटिक मीडिया. हे कसं बनतं? तर याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे फेस स्वॅप आणि दुसरं म्हणजे ‘जीएएन’ अर्थात ‘जेनरेटीव्ह अॅडव्हायझरल नेटवर्क’. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर दुसऱ्या कुणीतरी व्यक्तीने एखादा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. त्या व्यक्तीची अंगकाठी तुमच्यासारखीच आहे आणि तो व्हिडिओ त्याने तुमच्यासारखेच कपडे घालून तयार केला आहे. नंतर डीपफेकचा वापर करून संगणकावर फक्त त्याचा फक्त चेहरा बदलला आणि तिथे तुमचा चेहरा लावला. त्या चेहऱ्याची हालचाल, त्याच्या भुवयांची हालचाल, त्याच्या ओठांची हालचाल ही तुमच्यासारखीच आहे, पण ती व्यक्ती जे बोलत आहे, ते मात्र जुन्या व्यक्तीचं आहे. असा जेव्हा खोटा व्हिडीओ बनवला जातो, तेव्हा त्याला 'फेस स्नॅप' तंत्रज्ञानाने बनवलेला सिंथेटिक मीडिया असे म्हणतात.
थोडक्यात, व्हिडिओतील चेहऱ्यांची अदलाबदली. हे कसं शक्य झालं? तर गेल्या काही वर्षांत तुम्ही ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’, ‘डीप लर्निंग’ हे शब्द ऐकले असतील. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चं आपल्याला माहीत असणारं उदाहरण म्हणजे आपल्या घरातलं ‘ॲलेक्सा’ किंवा ‘सिरी’. ज्याला काही ठरावीक गोष्टी करता येतात, असा तो स्मार्ट असिस्टेंट असतो. खरं तर हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचं खूप बेसिक काम झालं. या तंत्रज्ञानावर गेली काही वर्षे खूप काम चालू आहे, आणि त्याची झेप आता फक्त काही ठरावीक गोष्टी करण्यावर ना थांबता स्वतः विचार करणं, स्वतः शिकणं इथपर्यंत गेली आहे.
माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, कारण तो विचार करू शकतो, असं आजवर आपण म्हणत आलो आहोत. पण आता मशीनसुद्धा माणसासारखे विचार करतात. माणसाच्या मेंदूत विचार करण्यासाठी न्यूरॉन्स असतात, तसं न्यूरॉन्सचं नेटवर्क या तंत्रज्ञानात मशीनकडे असतं. बुद्धिबळातील जगज्जेते खेळाडू एखाद्या सुपरकॉम्प्युटरबरोबर डाव खेळतात आणि बहुतांश वेळेला हरतात, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जगज्जेत्या खेळाडूला सुपरकॉम्प्युटर इतक्या सहज कसा हरवू शकतो? तर स्वतःच्याच पूर्वीच्या मूव्ज, इतरांच्या मूव्जचा, या जगज्जेत्या खेळाडूंच्या खेळण्याच्या पद्धतीचा अभ्यास करत करत त्याची स्वतःची एक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार होते. मग ती इतकी ताकदवान होते की, ती खऱ्या खेळाडूलापण हरवते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
खरं तर हे तंत्रज्ञान काही वाईट गोष्टींसाठी बनवलेले नाही, या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील असंख्य प्रश्न सुटायला मदत होत आहे. 'आयबीएम वोट्सन' सारखे प्रोजेक्ट हे या तंत्रज्ञानाच्या चांगल्या उपयोगाचे एक उत्तम उदाहरण आहे, पण हेच सगळं तंत्रज्ञान जर व्हिडिओजच्या बाबतीत लावलं, तर आजवर असणारे एखाद्या व्यक्तीचे व्हिडिओ, त्याचे हावभाव, त्याच्या हालचाली, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स या सगळ्या डेटाचा जर अभ्यास केला आणि त्याला मशीन लर्निंगची जोड दिली, तर अर्थातच त्यातून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ह्या व्यक्तीचा चेहरा चिकटवणं, त्याच्या चेहऱ्याच्या स्नायूंच्या हालचाली मॅच करणे हे सहज शक्य आहे. हे फक्त शक्य नाहीय, तर हे आता लोक करू लागले आहेत. त्याच्याहून पुढची आणि सगळ्यात अधिक धक्कादायक, धोकादायक गोष्ट म्हणजे ‘जेनरेटीव्ह अॅडव्हायझरल नेटवर्क’. म्हणजे थोडक्यात काय तर, आपला मेंदू जसा स्वतः विचार करायला लागतो, तसे हे संगणक स्वतः विचार करतात आणि दिलेल्या टेक्स्टचा व्हिडीओ स्वतःच बनवतात. एखाद्या
व्यक्तीचे जुने व्हिडिओ, जुन्या गोष्टी, जुने फोटो दिले तर त्याच्यावरून आपल्याला जे त्याच्याकडून वदवून घ्यायचंय, आपल्याला जे त्याच्याकडून म्हणायचंय, असा व्हिडिओ संगणकावर आटोमॅटिक तयार होऊ शकतो. त्यासाठी आधीच्या तंत्रज्ञानासारखं दुसऱ्या कोणीतरी ते बोलायची आणि मग या माणसाच्या शरीरावर ते चिकटवायची गरज नाही. हे तंत्रज्ञान थोडं अधिक किचकट आहे, कारण यात फक्त चेहराच नाही तर आपलं संपूर्ण शरीर तंत्रज्ञानाद्वारे तयार करावं लागतं. त्यातून मोठ्या स्केलवर खोटे व्हिडिओ बनवता येतात.
खरं तर काही वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान खरंच फक्त काही मोठ्या कंपन्यांच्या होतं. आता मात्र हे तंत्रज्ञान इतकं डेव्हलप होत गेलंय, आपल्या हातात यूट्यूबवरच्या व्हिडिओ कंटेंटमधून त्याला इतकं खाद्य मिळालंय की, आता एखादा सामान्य यूट्यूबरसुद्धा डीपफेक व्हिडिओ बनवू शकतो, कारण मशीनचं शिक्षण पूर्ण झालय! सिंथेसिया, डीप न्यूज, डीपफेक, फेसस्वॅप, रिफ्रेज, टोपाज ही सगळी त्या कंपन्यांची नावं आहेत, की, ज्या कंपन्या प्रोफेशनली डीपफेक व्हिडिओ बनवतात. या विषयातले जे अभ्यासक आहेत, त्यांच्या मते २०१८ सालापर्यंतच यूट्यूबवरच जवळपास पंधरा हजार डीपफेक व्हिडिओ होते, म्हणजे आज २०२२ साली हा आकडा नक्की काही लाखात गेला असेल. त्यामुळे काय खरं, काय खोटं? हा प्रश्न अधिकाधिक गहिरा झालेला आहे.
आता कळीचा प्रश्न असा उभा राहतो की, फेक न्यूज, फेक इमेजेस, व्हिडीओज या सगळ्यांपासून दूर राहायचं असेल, तर काय करायला हवं? तर वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्यापर्यंत जी माहिती सतत पोहोचत असते, ती वाचताना, पाहताना आणि पुढे पाठवताना सजग असणं हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आपल्यापर्यंत आलेली प्रत्येक माहिती खरी नसते, हे ध्यानी आल्यानंतर त्यातील खोटेपणा ओळखणं फारसं अवघड नसतं. मुळात सजगता नसेल तर बातमीबद्दल शंकाच उपस्थित होत नाही. ही सजगता प्रत्येकाने स्वत:मध्ये आणण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
संशय व शंकेला जागा ठेवूनच कोणतीही बातमी वा माहिती स्वीकारायला हवी. त्यासाठी फेक न्यूजचा पर्दाफाश करणाऱ्या वेबसाईटसना भेटी द्याव्या लागतील. माहितीचा स्रोत कोणता हे तपासून घ्यावं लागेल. कोणतेही तंत्रज्ञान कायमस्वरूपी नसते. त्यात बदल होत असतो. त्याच्या बदलत्या स्वरूपानुसार त्याच्या वापरामागील हेतूमध्येही बदल होत असतो. किंबहुना वापरकर्ता त्याच्या सोयीने त्याचा वापर करत असतो. त्या वापरकर्त्याचा उद्देश सकारात्मक की नकारात्मक हे महत्त्वाचं असतं, आणि जगात सगळेच सकारात्मक असण्याची शक्यता शून्य आहे. आणि ज्या गतीने हे तंत्रज्ञान बदलत आहे, त्या गतीने समाजमन घडणे अशक्य आहे. त्यामुळे आभासी जगात रमण्यापेक्षा प्रत्येक नागरिकानं स्वत: अधिकाधिक वास्तवाच्या जवळ जाणं, सकारात्मक आणि सजग राहणं हाच फेक न्यूजवरचा खरा उतारा ठरू शकतो.
‘उद्याचा मराठवाडा’ दिवाळी २०२२मधून साभार
............................
‘उद्याचा मराठवाडा’ – अतिथी संपादक – प्रवीण बर्दापूरकर
पाने – २१६
मूल्य – २०० रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment