दरवर्षी पुण्या-मुंबईबाहेरून जे वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक प्रकाशित होतात, त्यापैकीच एक म्हणजे ‘चौफेर समाचार’. गेली काही वर्षं हा दिवाळी अंक पत्रकार अरुण नाईक यांच्या अतिथी संपादनाखाली प्रकाशित होतो आहे. विषयवैविध्य, नवनवे लेखक आणि त्यांची सुंदर, कलात्मक मांडणी, ही या दिवाळी अंकाची ‘कायमस्वरुपी’ वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील.
यंदाचा ‘चौफेर समाचार’चा दिवाळी अंकही त्याच्या परंपरेला साजेसाच आहे. त्यात यंदा ज्ञानपीठ विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो (कथा), प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (पाच कविता), नितीन दादरावाला (लि मिल्लर), सुरेश प्रभू (नदी जोड प्रकल्प), डॉ. विनया जंगले (संशोधकाची शोधयात्रा), अरविंद पाटकर (महानगरीतले चळवळीचे दिवस), अतुल देऊळगावकर (न जीवनसत्व) अशा विविध मान्यवरांचे लेखन आहे. मौजला १०० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने या प्रकाशनसंस्थेशी ५०हून अधिक संबंधित असलेल्या अरुण गाडगीळ यांची ही मुलाखत... संपादकांच्या पूर्वपरवानगीसह...
.................................................................................................................................................................
प्रश्न : गाडगीळ, ‘मौज’ बरोबर तुम्ही १९६२ सालापासून २०१६ अखेर असे सुमारे ५५ वर्षे काम केले. आज ‘मौज’ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. याप्रसंगी तुम्हाला काय वाटते?
गाडगीळ : मौज प्रकाशन शंभर वर्षांचे झाले, मीदेखील ७७व्या वर्षात पदार्पण केले आहे. आयुष्याची निम्म्याहून अधिक वर्षे ज्या संस्थेसाठी काम केले, ती शंभर वर्षांची झाली, याचा मला मनस्वी आनंद आहे. अनेक भावनांची मनात दाटी होत आहे. भागवत बंधूंबरोबर मी दीर्घकाळ काम केले. त्यांनी मला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक दिली. खूप मोठा विश्वास माझ्यावर टाकला. त्याला धरून मीही ‘मौज’साठी महाराष्ट्रभर तसेच शेजारील राज्यांतही खूप काम करू शकलो. या सर्व गोष्टींचा विचार करताना आज खूप समाधान वाटते. आनंद होतो. आयुष्याचे सार्थक होणे असे जे म्हणतात, तसे वाटते. शंभर वर्षांपूर्वी भागवतांनी हा व्यवसाय सुरू केला. पूर्वीचे दिवस अतिशय खडतर होते. खूप कष्टाने भागवत बंधूंनी हा व्यवसाय वाढवला आणि नाव कमावले. मुळात भागवत हे सहा भाऊ. सर्व जण या एकाच व्यवसायात आले. या भावांचा प्रामाणिकपणा, एकी, कष्ट करण्याची तयारी वाखाणण्याजोगी होती. या पिढीने व्यवसायात स्थिरावण्यासाठी जाम कष्ट केले आहेत.
प्रश्न : गाडगीळ, तुम्ही ‘मौजे’त कधी दाखल झालात?
गाडगीळ : मी १९६२ साली ‘सत्यकथा’ या वाङ्मयीन मासिकात कारकून म्हणून दाखल झालो. याच दरम्यान ‘मौज’ने नवे नवे लेखक जमवायला सुरुवात केली होती. माझी ‘सत्यकथा’ मासिकातील कारकुनी चालू होती, पण अचानक मला मुंबई विद्यापीठात नोकरीसाठी एक संधी चालून आली. आरती प्रभू तथा चिं. त्र्यं. खानोलकर ‘मौज’मुळे माझ्या चांगले परिचयाचे होते. ते मुंबई विद्यापीठात क्लार्क होते. त्यांना ‘रायटर्स सेंटर’ची स्कॉलरशीप मिळाली. त्यामुळे त्यांना एक वर्षाची रजा हवी होती. त्यांनी विद्यापीठाकडे रजेचा अर्ज केला. विद्यापीठाने त्यांना सांगितले की, ‘तुम्ही आम्हाला एक अनुभवी माणूस आणून द्या, म्हणजे आम्ही रजा मंजूर करतो’. खानोलकरांनी मला हे सांगितले आणि मला घेऊन विद्यापीठात गेले. त्यांना म्हणाले, ‘हा मौज प्रिंटिंग ब्यूरोत काम करणारा अनुभवी माणूस आहे, याला घ्या.’ विद्यापीठाने मला घेऊन खानोलकरांची रजा मंजूर केली. पुढे वर्षानंतर त्यांची रजा संपता संपता मी अकाउन्टस विभागात बदली करून घेतली आणि तिथे पर्मनंटही झालो. याच दरम्यान मौज आणि इतर पाच प्रकाशकांनी मिळून ‘ग्रंथप्रसार केंद्र’ या नावाने फिरत्या ग्रंथ विक्री केंद्राची सुरुवात केली होती.
विष्णूपंत भागवत नेहमी म्हणायचे की, आपण अनेक लेखकांची पुस्तके छापतो, पण ती वाचकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. त्यासाठी गावोगावी पुस्तक प्रदर्शन भरवली पाहिजेत. या विष्णूपंताच्या कल्पनेतून ग्रंथप्रसार केंद्राची सुरुवात झाली. त्यांना मॅजेस्टिक प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, नवलेखन प्रकाशन, परचुरे प्रकाशन आणि वोरा आणि कं. हे पाच प्रकाशक जॉईन झाले. ‘मौज’च्या कार्यालयातच केंद्राचे ऑफिस होते. त्यांना हे काम करण्यासाठी पूर्ण वेळ माणूस हवा होता. विष्णूपंतांनी मला विचारलं, ‘काय बाबा, तुला या केंद्राचं काम करायला आवडेल काय? तू हे काम करायला नोकरी सोडून आमच्याकडे येऊ शकशील काय? हे विचार करून सांग.’ तर मी म्हटलं की, ‘मला यायचं आहे. मी करीन या केंद्राचे काम’. मग मी विद्यापीठाच्या नोकरीचा राजीनामा देऊन पुन्हा ‘मौजे’त दाखल झालो.
ग्रंथप्रसार केंद्राच्या कामासाठी महाराष्ट्रभर मी एकटा गावोगावी जाऊन पुस्तक प्रदर्शने भरवू लागलो. अशी नॉनस्टॉप शंभर प्रदर्शने मी केली. या केंद्राला ‘युसिस’ या अमेरिकन संस्थेचे सहकार्य होते. त्या वेळी ‘युसिस’तर्फे अनेक उत्तमोत्तम अमेरिकन पुस्तके मराठी प्रकाशकांकडे भाषांतरासाठी दिली जायची. प्रकाशक आपल्या लेखकांकडून त्यांचे अनुवाद करून घेत असत. लेखक जयवंत दळवी आणि लेखक रमेश मंत्री हे दोघे ‘युसिस’चे काम पहायचे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
प्रश्न : ‘मौज’चा प्रकाशन विश्वात एक दबदबा कायम आहे. त्याबद्दल तुम्ही काही सांगा.
गाडगीळ : ‘मौज’च्या ‘सत्यकथा’ मासिकाचा आणि ‘मौज’ वार्षिकाचा साठच्या दशकात चांगला जम बसला होता. त्या निमित्ताने बहुतेक नामवंत लेखकांचा ‘मौजे’त राबता असे. ‘समतानंद’ अनंत हरि गद्रे यांनी १९ मार्च १९२२ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘मौज’ साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. पुढे ‘मौज’च्या भागवत बंधूंनी त्याचा विस्तार केला. अनेक महत्त्वाचे लेखक ‘मौज’, ‘सत्यकथा’ आणि प्रकाशनाकडे आकर्षित झाले होते. असे म्हणत की, प्रत्येक लेखकाला आपले एकतरी पुस्तक ‘मौजे’ने काढावे असे वाटत असे. प्रकाशक म्हणून या काळात ‘मौजे’ची सॉलिड वट होती.
हा ‘मौज’चा जो दबदबा होता, त्याचा फायदा मला कायमच मिळत असे. मी कोणालाही भेटायला गेल्यावर माझे (प्रतिनिधी, मौज प्रकाशन) कार्ड आत पाठवत असे. ते कार्ड बघून मला लगेच आत बोलवले जाई. मला महाराष्ट्रभर असा मान नेहमीच मिळत आला आहे.
प्रकाशनाच्या बाबतीत ‘मौजे’चे धोरण अतिशय कडक शिस्तीचे होते. लेखकांना त्यांच्या पुस्तकांच्या रॉयल्टीचा हिशेब वर्षाअखेरीस जायलाच पाहिजे. मग तो चेक कितीही रकमेचा असो, तो लेखकाला वेळेत पोचलाच पाहिजे, असा दंडक होता. ‘मौज’नं हे कायम पाळलं. त्यांचा हा मोठा गुण ‘मौज’चा दबदबा वाढवण्यास कारणीभूत झाला.
पुस्तक विक्रीच्या सर्व उपक्रमांत ‘मौज’चा कायमच सहभाग असे. भागवत बंधुंचे ते मुख्य धोरणच होते. गावोगावच्या पुस्तक प्रदर्शनांबरोबर ‘मौज’ने इतर राज्यांतही अशी प्रदर्शने भरवली. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ या राष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने ‘मौज’ने अहमदाबाद, इंदूर, कलकत्ता या ठिकाणी भरवलेल्या प्रदर्शनांना मीच गेलो होतो. नॅशनल बुक ट्रस्टची (NBT) स्थापना पंडित नेहरूंच्या कल्पनेतून झालेली. त्यांचं पाहिलं ग्रंथप्रदर्शन त्यांनी मुंबईत भरवलं. क्रॉस मैदानावर. त्यासाठी त्यांनी ‘मौज’ची मदत घेतली. त्या वेळी श्रीपुंनी मला सांगितलं की, ‘तू त्यांच्याकडे जाऊन त्यांना प्रदर्शनासाठी सगळी मदत कर’. त्यामुळे १५ दिवस मी ऑन ड्युटी एनबीटीकडे जात होतो. पगार ‘मौज’चा, काम एनबीटीचे! एक अभिनव विक्री योजना ‘मौजे’ने काही वर्षं फक्त पुस्तक विक्रेत्यांसाठी राबवली होती, ती म्हणजे १+१. म्हणजे एकावर एक फ्री.
प्रश्न : गाडगीळ, तुम्ही इतकी वर्षे ग्रंथ व्यवसायात आहात, तर तुम्हाला ‘मौज’ प्रकाशनाची अशी कोणती वेगळी वैशिष्ट्ये जाणवतात?
गाडगीळ : ‘मौज’चे वेगळेपण म्हणाल तर आर्थिक व्यवहाराची त्यांनी स्वीकारलेली शिस्त. लेखकांच्या रॉयल्टीबाबत मी मघाशी सांगितलेच. पण त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहा बंधू या व्यवसात एकत्र होते. प्रत्येकाकडे विशिष्ट कामाची जबाबदारी दिलेली असे. त्या संदर्भातील सर्व निर्णय त्याचे एकट्याचे असत. आता पुस्तक प्रकाशनासंदर्भात पुस्तकांची निवड, संपादन आणि इतर सर्वच निर्णय श्रीपु एकटेच घेत असत. त्यात इतर बंधू दखल देत नसत. प्रॉडक्शन आणि इतर आर्थिक बाबीत श्रीपुंचा सहभाग नसे. सर्व भावांच्या कामाची शिस्त वाखाणण्याजोगी होती. मुद्रण आणि प्रकाशन व्यवसायातील त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकमत झाल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही, अशी भागवतांची पद्धत होती. एकाचा जरी विरोध असेल तर तो निर्णय प्रलंबित ठेवला जायचा आणि असे निर्णय पेंडिंग ठेवणं ही भागवत बंधूंची खासीयत होती.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
प्रश्न : ‘मौज’च्या संपादकीय कामकाजाबद्दल काही सांगू शकाल काय?
गाडगीळ : श्रीपु भागवतांना लेखनातील चांगल्या-वाईटाचे सूक्ष्म आकलन होते. एखाद्या लेखकाच्या लेखनातील, विचारातील ताकद श्रीपुंना जाणवत असे. मग ते त्याच्याशी खूप चर्चा करत, निरनिराळ्या अंगाने त्याच्या लेखनाचा विचार करत. लेखकाकडून पुनर्लेखन करून घेत. पण आपल्या मनाजोगते लेखन झाल्याशिवाय त्याचा पाठपुरावा सोडत नसत.
व्यंकटेश माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ हे याचं उत्तम उदाहरण आहे. श्रीपुंनी या लेखनावर इतके कष्ट घेतले. माडगूळकरांना इतक्या वेळा त्याचे पुनर्लेखन करायला लावले की बोलायची सोय नाही. श्रीपु सांगायचे की, ‘ ‘बनगरवाडी’ जितकी व्यंकटेश माडगूळकरांची कादंबरी आहे, तितकीच ती माझी पण आहे. कारण तितके संस्कार मी तिच्यावर केले आहेत’. त्यामुळे ‘बनगरवाडी’चे हक्क कायमपणे ‘मौज’कडे राहिले आहेत. माडगूळकरांची इतर सर्व पुस्तके नंतर मेहतांनी काढली, पण ‘बनगरवाडी’ ‘मौज’कडेच राहील, असे त्यांच्या कुटुंबियांनीही मेहतांना सांगितले.
‘मौज’चा संपादकीय विभाग श्रीपु नंतर त्यांचे विद्यार्थी आणि त्यांच्याच हाताखाली तयार झालेले श्री. राम पटवर्धन पाहू लागले. पुढे श्रीनिवास विनायक कुलकर्णी संपादन करू लागले, ते कराडला ओगले ग्लास वर्क्समध्ये नोकरी करत होते. त्यांच्या ‘डोह’मुळे ते ‘मौजे’च्या संपर्कात आले. पुढे राम पटर्वधनांसह काम करू लागले. आता मोनिका गजेंद्रगडकर संपादन विभाग पहातात.
राम पटवर्धनानी श्रीपुंचा संपादनाचा वारसा पुढे तर नेलाच, पण तो रस्ता अधिक प्रशस्त केला. त्यांनी लेखकांशी अधिक चांगले, सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले, जे श्रीपुंना कधी जमले नाही.
प्रश्न : सर्व भागवत बंधूंशी तुमचे कसे संबंध होते?
गाडगीळ : १९६२ साली ‘मौजे’त आल्यापासून सर्व भागवत बंधूंशी माझे संबंध आले आणि उत्तरोत्तर ते वाढतच गेले. भागवतांनी मला कधी परका मानलेच नाही. मला आपल्या कुटुंबात सामावून घेतले. सर्वांचाच मी ‘आपला’ माणूस होतो. भागवत कुटुंबातील बरेच जण कोल्हापुरात माझ्या घरी येऊन जेऊन गेले आहेत. त्यांच्याकडील सर्वच समारंभात माझा सहभाग असायचा. भागवत बंधूंनी मला आपला भाऊच मानले होते. कायम तशीच वागणूक त्यांनी मला दिली आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
विष्णुपंत भागवत आणि प्रभाकर भागवत दोघे मौज प्रिंटींग ब्युरोचे काम बघत, वासुदेव भागवत प्रेसचे हिशेब संभाळत, जयराम भागवतही प्रॉडक्शन पहात असत. श्रीपु फक्त प्रकाशन विभागाचे सर्वेसर्वा होते.
या वरच्या फळीनंतर पुढे माधवराव भागवत मौज प्रिंटिंग ब्यूरोचे काम पाहू लागले. ते मुद्रणतज्ज्ञ होते. संजय भागवत मौज प्रकाशनाचे प्रॉडक्शन पाहू लागले. श्रीकांत भागवत आणि संजय भागवत हे दोघे जण इंग्लंडमध्ये मुद्रणाचे शिक्षण घेऊन तिथेच काही काळ नोकरी करून पुन्हा परत आले. मुकुंद भागवत सर्व भागवत बंधूंचे अकौन्टस् तसेच मौज प्रिंटिंग ब्यूरो, प्रकाशन आणि टाईप फौन्ड्री या तिन्ही व्यवसायांचे हिशोब पाहत असत. आजही पहात आहेत.
आज टाईप फौन्ड्री अस्तित्वात नाही. प्रेसचा व्यापही खूप कमी करत आणला आहे. आज ‘मौज’ पूर्णपणे प्रकाशन व्यवसायावर अवलंबून आहे.
प्रश्न : गाडगीळ, ‘मौज’नं तुम्हाला काय दिलं?
गाडगीळ : मला खूपच काही दिलं असं मी म्हणीन. गरजेच्या वेळी नोकरी दिली. आपल्यात सामावून घेतलं. जबाबदारी दिली, आत्मविश्वास दिला. नाव, प्रतिष्ठा दिली. मौजच्या पाठिंब्याने मी महाराष्ट्रभर पुस्तकांचा व्यवसाय केला. मौजेचे कमिशन अत्यंत कमी, त्यामुळे त्यांची पुस्तके विकून फार पैसे मिळत नसत. त्यामुळे मौजने इतर प्रकाशकांची पुस्तके विकायलाही मला परवानगी दिली. त्यातून मला बरे पैसे मिळत.
प्रश्न : गाडगीळ, या सर्व काळातील असे काही प्रसंग वा घटना सांगाल का, की ज्यामुळे तुमचा मौजबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.
गाडगीळ : मी जेव्हा मौजचं काम सांभाळून कोल्हापूर येथे ‘गुलमोहर बुक डेपो’ची सुरुवात केली, तेव्हा मौजेची पुस्तके येत राहिली. आम्ही ती विकत राहिलो पण मौजेला पुस्तकांचे पैसे काही कारणांमुळे नियमितपणे पाठवता आले नाहीत. यातून मौजेचे देणे प्रचंड वाढले. इतके की, १९७५ साली ९७,०००/- रुपये देणे होते. शेवटी त्यांनी मला बोलावून मिटिंगमध्ये विचारले की, ‘काय बाबा, तुझे काय प्लॅन आहेत? तू पैसे देणार आहेस की नाहीस? कसे देणार?’ मी म्हटले, ‘हो, देणार की. पैसे देणारच. तुमचे काम करूनच देणार’. तेव्हापासून मी गुलमोहर बुक डेपो बरोबरच मौजचे महाराष्ट्रभर फिरून काम करू लागलो. त्या कामाच्या पेशातूनन मी हे मौजेचे देणे थोडे थोडे करत फेडून टाकले. माझ्यासाठी मौजने ही मोठी जोखीम स्वीकारली होती. माझ्यावर प्रचंड विश्वास टाकला. इतके होऊनही त्यांनी माझ्याबद्दल कुठे वाईट शब्द काढले नाहीत.
याचे एक उदाहरण आहे. सोलापूरचे श्रीराम पुजारी नावाचे ग्रंथविक्रेते हे श्रीपुंचे मित्र होते. त्यांच्याशी माझा एकदा कमिशनवरून काही मतभेद झाले. ते म्हणाले की, ‘मी श्रीपुंकडे तुमची तक्रार करीन’. त्यांना वाटत होतं की, आमचे मालक आणि नोकर असे संबंध असतील. पण त्याहीपलीकडचे आमचे संबंध आहेत, हे त्यांना माहीत नव्हते. त्यावर मी म्हणालो, ‘तुम्ही कुठेही तक्रार करा, काहीही करा, पण मी सांगतो हे फायनल. मार्केटमध्ये मी काम करतो आणि मी सांगेन त्या टर्म्स आणि कंडिशनवरतीच धंदा करणार. तुम्ही ‘मौजे’त काहीही सांगितलंत तरी यात फरक पडेल असं मला वाटत नाही.’ त्यांनी श्रीपुंकडे तक्रार केली. म्हणाले, ‘गाडगीळ आम्हाला असं असं बोलले वगैरे.’ पण श्रीपुंनी मला बॅकिंग दिले. ते म्हणाले, ‘बरोबर आहे त्यांचे म्हणणे. बिझनेसच्या बाबतीत आम्ही त्यांच्या व्यवहारात कोणतेही इंटरफिअर करत नाही. तिथं गाडगीळ म्हणतील ते प्रमाण.’ अशा प्रकारे ‘मौज’ कायम माझ्या पाठीशी राहिली. हा भागवतांचा मोठा व्यावसायिक गुण किंवा माझ्यावरील अढळ विश्वास म्हणावा लागेल.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
अशीच कॉन्टिनेन्टल प्रकाशनासंबंधीचीही एक आठवण आहे. कॉन्टिनेन्टल व्यवहाराच्या बाबतीत फारच स्ट्रिक्ट आहेत. गुलमोहर बुक डेपोने त्यांचे पुस्तकांचे पैसे देणे होते. ते आम्हाला म्हणाले, ‘तुमचे हे पैसे फारच दिवस येणे आहेत. आम्ही तुमच्यावर केस करणार.’ हे कळल्यावर श्रीपुंनी त्यांना सांगितले की, ‘गाडगीळ आमचा माणूस आहे. तो तुमचे पैसे नक्की देईल. पैसे शंभर टक्के तुम्हाला मिळतील. पण त्याला थोडी सवलत द्या. तुम्ही केस वगैरे करण्याच्या विचारात असाल तर तुमचे आमचे संबंध इथेच संपवू. पुढे काहीही करू नका.’ श्रीपुंनी असे सांगितल्यावर कॉन्टिनेन्टलने काहीही केले नाही. पुढे हे त्यांचे पैसे मी हप्त्याहप्त्याने फेडले. पण एका प्रकाशकाने दुसऱ्या प्रकाशकाला असे सांगणे आणि आपल्या कर्मचाऱ्याची हमी घेणे, ही फारच महत्त्वाची तसेच दुर्मीळ गोष्ट आहे.
श्रीपु साहित्य संमेलनात पहिल्यांदा आमच्या स्टॉलला भेट द्यायचे. पहिल्यांदा गाडगीळांना भेटणे, नंतर बाकीची कामे असा त्यांचा रिवाज होता. ते स्टॉलवर यायचे. माझे हात हातात घेऊन विचारायचे, ‘काय गाडगीळ, कसं काय चाललंय? काही प्रॉब्लेम नाही ना? घरची मंडळी कशी आहेत?’ अशी सर्व ख्यालीखुशाली विचारणार. त्यांच्याबरोबर लेखकांचा ताफा नेहमीच असायचा. त्यामुळे श्रीपुंसह सर्व लेखकांचीही स्टॉलवर वर्दळ वाढत असे. त्याचा विक्रीसाठी उत्तम उपयोग होई.
आज मौज पूर्णपणे प्रकाशन व्यवसायावर अवलंबून आहे असे मी म्हटलेच. मौज सध्या नवीन लेखकांची पुस्तके फारशी प्रकाशित करताना दिसत नाहीत. ज्या जुन्या नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे हक्क मौजकडे आहेत, तीच पुस्तके शक्यतो सध्या ते छापत असतात. अशा नामवंतांच्या अनेक पुस्तकांचे कॉपीराईट मौजकडे आहेत. पुलंची सुमारे २८ पुस्तके मौज नियमित छापत असते. हेच काम इतके प्रचंड आहे की, तेच सांभाळणे सध्या त्यांना अवघड जात आहे. बाजारात चालणारी अनेक पुस्तके मौजकडे आहेत.
या संस्थेने मराठी प्रकाशन विश्वामध्ये अढळ स्थान प्राप्त केले आहे. आणि या संस्थेचा मी दीर्घकाळ घटक होतो, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. मौजेची अशीच शतकोत्तर घोडदौड सुरू रहावी, यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
‘चौफेर समाचार’ दीपावली वार्षिक २०२२मधून साभार
............................
‘चौफेर समाचार’ दीपावली वार्षिक २०२२ : अतिथी संपादक - अरुण नाईक
चौफेर पब्लिशिंग हाऊस, सांगली
पाने - २४४
मूल्य - ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment