जागतिक साहित्याची म्हैस बालसाहित्याची तीच ती वैरण रवंथ करत निवांत पहुडली आहे. तिला ढोसून, उभे करून नव बालसाहित्याचे ताजे व सकस दूध काढायची गरज आहे
पडघम - साहित्यिक
हृषीकेश गुप्ते
  • ‘Wolf Children Ame and Yuki’ या पुस्तकातील एक चित्र आणि ‘सजग’च्या पाचव्या अंकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 07 November 2022
  • पडघम साहित्यिक सजग बालसाहित्य Children's Literature जागतिक बालसाहित्य World Children's Literature मराठी बालसाहित्य Marathi Children's Literature हृषीकेश गुप्ते Hrushikesh Gupte

बालवाङ्मय म्हणजे काय?

बालवाङ्मयाची सर्वसाधारण आणि सहज सोपी व्याख्या म्हणजे ‘मुलांसाठीचे वाङ्मय’ किंवा ‘मुलांसाठीचे साहित्य’ अशीच केली जाते. ‘द थाऊजंड अँड वन नाइट्स’ म्हणजेच ‘अरेबियन नाइट्स’ या सार्वकालीन जागतिक साहित्यकृतींवर सातत्याने प्रभाव टाकणाऱ्या कलाकृतीचा इंग्रजी भाषेत अनुवाद करणाऱ्या सर रिचर्ड बर्टन यांची पत्नी इसाबेल बर्टन बालवाङ्मयाची व्याख्या करताना म्हणते, “बालवाङ्मय म्हणजे मुलांच्या आकलनासाठी योग्य असे वाङ्मय. जे त्यांची सामाजिक, सांस्कृतिक प्रगती करून त्यांच्या जाणिवा प्रगल्भ बनवते.” भारतीय साहित्यविश्वात या व्याख्येत किंचित बदल केला जातो. तो असा की, “बालवाङ्मय म्हणजे मुलांच्या आकलनासाठी सोपे असणारे आणि त्यांना संस्कारक्षम बनवणारे वाङ्मय.” भारतीय समाज हा मुळात संस्कारांच्या ओझ्याखाली दबला गेला असल्यामुळे, कोणत्याही बाबतीत (विशेषत: लहान मुलांच्या बाबतीतील) विचार करताना तो संस्कारांचे भिंग या ना त्या कारणाने वापरतोच. मात्र हे भारताच्या बाबतीतच घडते असे नाही, तर डोळे दिपवणारी प्रचंड वैज्ञानिक प्रगती करणाऱ्या युरोपातील बालवाङ्मयाच्या व्याख्येवरही मुलांना संस्कारक्षम बनवण्याच्या ओझ्याचा पगडा थोड्या फार फरकाने आढळतोच.

मनुष्यप्राणी जसजसा उत्क्रांत झाला, तसतसा त्याचा मेंदू अधिकाधिक विकसित होत गेला. प्रगत मेंदूने मानवाला इतर सजीवांपेक्षा जास्त आणि वेगळा विचार करण्याची क्षमता दिली. विचारांचे हे उभे, आडवे, तिरकस धागे एवढे वाढले की, विचारांच्या गदारोळात सुसूत्रता यावी, म्हणून मानवाकडून भाषेचा जन्म झाला. साहित्य हे या भाषेचेच अपत्य आहे; पण निव्वळ भाषेमुळे साहित्याचा जन्म अशक्य, म्हणून पुढे लिपी जन्माला आली. लिपी आणि लेखनसामग्री या दोहोंचा जन्म एकाच वेळी किंवा थोड्याबहुत अंतराने झाला असला, तरी त्या एकाच वेळी एकमेकांना पूरक ठरत गेल्या. लेखनसामग्रीमुळे मानवी मेंदूतील कल्पना शब्दबद्ध होत गेल्या.

पुढे मुद्रणाचा शोध लागल्यानंतर या कल्पना सर्वदूर, जलद पसरू लागल्या. हळूहळू जागतिक साहित्य ही एक मुख्य शाखा (governing body) आणि त्या साहित्याच्या देशपातळीवरील किंवा खंडप्राय स्तरावरील उपशाखा जन्माला येऊ लागल्या. या साहित्यविश्वांची स्वत:ची अशी एक शासनव्यवस्था बनली. पुढे इतर सर्वच शासनव्यवस्थांप्रमाणे ही व्यवस्थाही भ्रष्ट बनली. या भ्रष्ट व्यवस्थेमुळे पुढे बालवाङ्मय आणि प्रौढवाङ्मय यांच्या सीमारेषेवर संभ्रमांचे प्रचंड मोठे वादळ निर्माण झाले. या वादळाने अनेक तथाकथित बुद्धिमंतांच्या सुपीक मेंदूतील सारासार विचार करण्याची क्षमताच पुरती नष्ट करून टाकली. पुढे मूळ प्रौढवाङ्मय असणारे वाङ्मय बालवाङ्मय झाले, तर आकलनाच्या दृष्टीने बालवाङ्मयाचा दर्जा असणारे बरेचसे साहित्य प्रौढवाङ्मयात गणले जाऊ लागले. संभ्रमांच्या या गदारोळातून वाट शोधण्याची सुरुवात भारतीय बालवाङ्मयापासूनच करणे क्रमप्राप्त ठरते.

विरोधाभासी संस्कारांचे साहित्य

साधारण भारतीय बालवाचकाच्या वाचनात मूळ भारतीय, अरबी आणि युरोपीय देशांतून आलेल्या अशाच बालसाहित्याचा समावेश असतो. मूळ भारतीय वाङ्मयात ‘रामायण’-‘महाभारत’ या महाकाव्यांतून आलेल्या कथा-उपकथा, ‘पंचतंत्र’, ‘हितोपदेश’, ‘वेताळ पंचविशी’, ‘सिंहासन बत्तिशी’, अकबर-बिरबल आणि अगदी हाताच्या बोटांवर मोजल्या जातील अशा साहित्यकृतींचा समावेश असतो. ‘चांदोबा’सारखी नियतकालिके ही रंजन आणि संस्कारक्षमता अशी दोरीवरची कसरत करूनच तगून आहेत.

भारतीय बालवाचकांचे मनोविश्व गेली अनेक वर्षे जादूचा अंगरखा, जादूचा दिवा आणि जादूच्या इतर अनेक वस्तू अशा जादूमय वातावरणात कायम रंगलेले होते. यात राजपुत्र (नायक), राजकन्या (नायिका) आणि राक्षस (खलनायक) ही मुख्य पात्रे असतात. असे असले, तरी या कथा स्वयंभू नसून यांची बीजे ‘रामायण’-‘महाभारत’ या महाकाव्यांतूनच सापडतात. मूळ भारतीय साहित्याव्यतिरिक्त भारतीय बालवाचक अरब देशांतून (आखाती प्रदेश) आलेल्या ‘अरेबियन नाईट्स’ आणि त्यातील अनेक उपकथा, शिवाय युरोपीय देशांतून आलेल्या परीकथा यातही ग्रिम बंधूंच्या, हान्स अँडरसनच्या कथांशी विशेष परिचित असतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मुलांच्या जाणिवा समृद्ध करणारे आणि त्यांच्या आकलनाच्या दृष्टीने सौम्य असणारे बरेचसे बालवाङ्मय आज भारतात उपलब्ध असले, तरी हे साहित्य म्हणजे गेल्या काही दशकांतील निर्मिती आहे. त्यापूर्वी आणि बहुतांशी आजही भारतीय बालवाङ्मयावर पुराणकथांचा आणि इंग्रज राजवटीत भारतात आलेल्या या अरब अथवा युरोपीय कथांचाच पगडा आढळतो. थेट विषयप्रवेश करण्यापूर्वी येथे माझ्या एका मित्राच्या संदर्भात बालपणी घडलेल्या काही घटना नोंदवाव्याश्या वाटतात.

तो आणि मी पहिलीपासून एका वर्गात होतो. आजच्या भाषेत सांगायचं, तर त्याचा माझा चांगला रॅपो म्हणजे ‘गट्टी’ होती आणि आम्ही बहुतेक गोष्टी एकमेकांशी ‘शेअर’ करायचो. तर ही गोष्ट आहे, साधारण सातवीत असतानाची. रंजनाची आणि अभिरुची विकासाची आजच्यासारखी साधने तेव्हा उपलब्ध नव्हती. वाचन हे ज्ञानविकासाचे आणि विरंगुळ्याचे एकमेव आणि सहज उपलब्ध असणारे साधन होते. व्यवस्थित अक्षरओळख असणारी सभोवतालची बहुतांश मुले तेव्हा वाचत.

‘आजची बालपिढी आणि तेव्हाची बालपिढी यांकडे परस्पर सापेक्ष दृष्टीकोनातून पाहिले असता साधर्म्य आढळतच नाही.’, ‘आम्ही कसे वाचायचो? याउलट आजची मुले व्हिडिओ गेम्स आणि चॅनेल्समध्ये हरवून गेली आहेत.’ अशा अर्थाची विधाने नाकपुड्या फुगवून करणारी, साधारण चाळिशीला आलेली पिढी आज आसपास सर्रास आढळते; पण सूक्ष्म आणि पारदर्शी विचार केल्यानंतर आज समाजात असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक संभ्रमावस्थेचे मूळ बालपणी नेणिवेच्या (subconscious) पातळीवर झालेल्या संस्कारात, म्हणजेच वाचनात असलेले आढळते.

माझ्या त्या मित्राला वाचनाची प्रचंड आवड होती, त्यामळे मिळेल ते वाचायची सवय. चणे-दाणे घेतले, तर त्या पुडीच्या कागदावरचा मजकूरही तो वाचायचा. दिवाळीची सुट्टी चाल होती. घरातच कुठेतरी सापडलेले बाबूराव अर्नाळकरांचे ‘काश्मिरी बुलबुल’ की कायसं पुस्तक तो वाचत होता. ती एक रहस्यकथा होती. आकलनाच्या दृष्टीने थोडी कठीण असली. तरी ती वाचताना तो रंगून गेला होता. मध्येच केव्हातरी त्याचे वडील आले. त्यांनी रागावून त्याच्या हातून ते पुस्तक ओढून घेतले. माझा मित्र हट्टाला पेटला; पण काही उपयोग झाला नाही. उलट वडिलांनी ‘हा काय वाचतोय याकडे लक्ष ठेवत जा’, अशी तंबी आईला दिली. त्याच्याकडे वाचायला दुसरे काहीच नव्हते. तो कंटाळला होता. ‘काहीतरी वाचायला आणून द्या.’ म्हणून त्याने वडिलांकडे हट्ट धरला. वडिलांचे एक मित्र होते. त्यांच्याकडून वडिलांनी त्याला काही पुस्तके आणून दिली. पुस्तके धार्मिक होती. ‘धार्मिक म्हणजेच संस्कारक्षम’ असे तेव्हा सर्वांना वाटे. तो अधाशासारखा त्या पुस्तकांवर तुटून पडला. पुस्तकातली भाषा तशी सोपी होती. काही शब्दांचा अर्थ कळत नव्हता. ते अडलेले शब्द, तो त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या बहिणीला विचारायचा. तीही तात्काळ त्याला सांगायची.

हे धार्मिक वाङ्मय वाचता असताना, एके ठिकाणी उर्वशी आणि अर्जुनाची गोष्ट आली. तिच्याशी संग करण्यास नकार दिल्यामुळे उर्वशी अर्जुनाला शाप देते की, ‘तू काही काळासाठी नपुंसक होशील.’ ती गोष्ट वाचत असताना त्याने बहिणीला विचारले, ‘नपुंसक म्हणजे काय?’ यावर, ‘ज्याला मूल नाही तो.’ असे उत्तर तिने मोठ्या खुबीने दिले. नंतर एक कथा वाचत असताना त्याने तिला अचानक विचारले, ‘वीर्य म्हणजे काय?’ तिने प्रचंड धक्का बसल्याप्रमाणे त्याच्याकडे पाहिले आणि ‘तू काय वाचतो आहेस?’ असे म्हणत तो वाचत असलेले पुस्तक त्याच्या हातून खेचून घेतले. तिने असे का केले हे त्याला कळेच ना. पण त्यानंतर ते पुस्तक त्याच्या घरात त्याला कधीही दिसले नाही. त्याचे कुतूहल अर्थातच चाळवले गेले. पुढे काय घडले, यावर विस्तृत बोलण्याआधी ही दुसरी घटना पाहूया. साधारण त्याच काळात अलीकडे-पलीकडे कधीतरी घडलेली.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

आम्ही काही मित्र खेळत होतो. खेळता खेळता दोघांचे भांडण झाले. एक जण दुसऱ्याला तावातावाने म्हणाला, “तुझा आई व्यभिचारी आहे. कारण तू न्हावी आहेस. तुझे बाबा न्हावी आहेत. न्हाव्याची बायको व्यभिचारी असते.” त्या वेळी ‘व्यभिचार’ म्हणजे काय, हे माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. तो मित्र दुसऱ्या मित्राला आणखीही काही म्हणाला, ज्याचा साधारण अर्थ असा होता की, ‘अमुक अमुक जण तुझ्या आईकडे रात्री देवाच्या रूपात येतो आणि तिच्यासोबत झोपतो.’ यावरून दोघांची चांगलीच हाणामारी जुंपली; पण ज्याच्यावर आरोप केले गेले, त्या मित्राला ते आरोप, ते बोलणं कळलंच नव्हतं. त्यालाच काय, माझ्यासह तिथे असलेल्या इतर कुणालाच त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नव्हता. आरोप करणारा माझा अगदीच जिवलग मित्र असल्यामुळे मी त्याच्या बाजूचा होतो. भांडणात त्याची बाजू घेऊन संध्याकाळी गळ्यात गळे घालून घरी परतताना मी त्याच्यावर माझ्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांचा भडिमार केला.

‘व्यभिचारी म्हणजे काय?’

‘सोबत झोपणे म्हणजे काय?’

‘सोबत झोपण्यासाठी देवाचे रूप कशाला?’

अशा स्वरूपाचेच ते सारे प्रश्न असावेत किंवा होते. आता नेमके आठवत नाही. माझा तो मित्र हुशार. वर्गात पहिला येणारा. प्रचंड वाचनवेडा. त्याने मला जे सांगितले, ते ढोबळमानाने असे होते. व्यवसायाने आणि जातीने नाभिक घराण्यात जन्माला आलेल्या त्या दुसऱ्या मित्राच्या आईच्या बाबतीत त्याने त्याच्याच घरातील मोठ्या माणसांच्या तोंडून काही उलटसुलट चर्चा ऐकली होती. विशेषत: तिच्या चारित्र्याबद्दल. त्याला वाचनाचा प्रचंड नाद असल्यामुळे त्याने या साऱ्याचा संबंध त्याला त्या काळात वाचनामुळे मिळालेल्या ज्ञानाशी लावला. त्याने ‘पंचतंत्र’ वाचले होते. त्यात बदफैली आणि व्यभिचारी असणाऱ्या नाभिकाच्या बायकोविषयी उल्लेख होता.

आमचा दुसरा मित्र ज्याच्या आईविषयी उलटसुलट चर्चा होती, तोही व्यवसायाने नाभिकच होता. हे दोन्ही संदर्भ माझ्या त्या हुशार मित्राने तत्काळ जोडले. ‘पंचतंत्रा’तच विष्णूचे रूप घेऊन राजकन्येसोबत झोपणाऱ्या कोष्ट्याची गोष्ट आहे. शिवाय गौतम ऋषी, अहिल्या आणि इंद्र यांची सुप्रसिद्ध कथाही आम्ही त्या वयात वाचली होती. मूलत: चौकस असणाऱ्या आणि ज्ञानलालसेच्या मागे धावणाऱ्या बालमतीनुसार त्या मित्राने सारे संदर्भ जिथल्या तिथे जोडत आमच्या दुसऱ्या मित्रावर ते आरोप केले. हे सारे पुस्तकी ज्ञान त्याने मला आमच्या बालभाषेत समजावून दिले. मलाही ते बालजाणिवेच्या पातळीवर उमगले. मी पुन्हा एकदा ‘पंचतंत्र’ आणि ‘रामायणा’तील अहिल्या उद्धाराची कथा वाचून काढली, असे आजही आठवते. पुढे वयात येतानाच्या प्रवासात ‘देवाच्या रूपात जाणे’ ही आमच्यासाठी एक सांकेतिक भाषा बनली. अनेक गुप्त व आमच्या बालवयास निषिद्ध असणाऱ्या गोष्टी, आम्ही आमच्या या सांकेतिक भाषेत बोलत असू.

मात्र ‘वीर्य म्हणजे काय?’ या माझ्या मित्राच्या प्रश्नाने धक्का बसलेल्या त्याच्या बहिणीने त्याच्या हातून पुस्तक हिरावून घेतले, हा प्रसंग माझ्या त्या मित्राने मला सांगितल्यावर मलाही त्या शब्दाचा अर्थ माहीत नाही, हे जाणवलं. पण ‘वीर्य’ हा शब्द माझ्याही मनात घर करून राहिला आणि काही दिवसांनी तो माझ्याही वाचनात आला. ‘वीर्य’ या शब्दाचा परिचय मला ज्या कथेतून झाला, ती कथा मला आजही सुस्पष्ट आठवते. ती कथा कुंतीला वेगवेगळ्या देवपुरुषांच्या वीर्यापासून होणाऱ्या पुत्रप्राप्तीची होती. कुंतीला वायू, यम, इंद्र व सूर्यादी देवपुरुषांच्या वीर्यापासून पुत्रप्राप्ती होते, असा त्या कथेचा आशय होता. माझ्या मित्राच्या अनुभवावरून घरच्या कुणाला या शब्दाचा अर्थ विचारायचा नाही, हे समजले होते. मग माझे काही मोठ्या वयाचे मित्र होते, त्यांना जरा चाचरतच विचारत मी या शब्दाचा अर्थ काढला आणि त्या मित्रालाही सांगितला. तो अर्थ मला सांगणारा मोठ्या वयाचा मित्र कधी भेटला, तर अजून ती आठवण रंगवून खुलवून सांगतो. त्यानेच पुढे मला ‘हस्तमैथुन’ म्हणजे काय तेही समजावून सांगितलं! असो.

तर, या दोन घटनांच्या कथनानंतर विषयप्रवेश जास्त सुलभ व्हावा. जगातील मुख्य भाषांतील प्रचलित बालवाङ्मय हे कोणत्याही दृष्टीने संस्कारक्षम नाही. इथे संस्कारक्षम नसणे, हे निव्वळ त्यातील लैंगिक उल्लेखांच्या निकषावर म्हटलेले नाही. तर मुलांच्या जाणीव-नेणिवांचा विकास होण्याच्या दृष्टीने समृद्ध नसणे, हा या विधानाचा मुख्य आधार आहे. सध्या आपण फक्त भारतीय बालवाङ्मयाविषयी बोलूया.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

या लेखाच्या निमित्ताने जेव्हा मराठीतील उपलब्ध आणि परिचित बालवाङ्मय पुन्हा एकदा वाचले, तेव्हा खरोखरच धक्का बसल्यासारखे झाले. अर्थात हा धक्का काही लहान मुलांच्या निरागस बालविश्वाकडे प्रौढ मनाच्या जाणिवेतून पाहिल्यामुळे बसला नव्हता. हा धक्का सार्वकालीन मध्यमवर्गीय मनोवस्थेने त्या काळातील बालनेणिवेच्या (child subconscious) जडणघडणीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे बसला होता. या दुर्लक्षास अंशत: तुम्ही, आम्ही आणि बहुतांशी त्या त्या काळात अस्तित्वात असणारी साहित्यिक शासनव्यवस्था जबाबदार आहे.

आज भारतीय समाज हा सर्वाधिक गोंधळलेल्या आणि द्विधा अवस्थेत सापडतो. आजच्या एवढा सांस्कृतिक संभ्रम या समाजात कधीच नव्हता, नैतिकता आणि अनैतिकतेच्या व्याख्या आणि नेमक्या बाह्यरेखा (outlines) निश्चित करण्यासाठी आपल्या समाजाची एक अविरत, पण केविलवाणी धडपड चालू आहे.

वाचनाच्या सहवासात काही काळ व्यतीत केलेले आणि आयुष्याच्या उतरणीवर आलेले आमचे एक मध्यमवर्गीय आणि तथाकथित पापभीरू शेजारी नातवाला टीव्हीवर ‘सच का सामना’ हा कार्यक्रम पाहताना उद्गारले, “हे बरोबर नाही. जग बदलत चालले आहे. नैतिकता म्हणून काही शिल्लकच उरली नाही,” हे असले विधान करणे, म्हणजे खरे तर स्वत:भोवतीच एक रिंगण तयार करायचे आणि नंतर त्या रिंगणासच लक्ष्मणरेषा मानून ती कधीच ओलांडायची नाही, असे ठरवण्यासारखे आहे. आयुष्यभर भारतीय मध्यमवर्गीय समाजमानसाने मुलांसमोर लैंगिकतेचा विषय काढणे निषिद्ध मानले. मुलांना कोणत्याही प्रकारचे लैंगिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मुलांकडून कधी तसा प्रयत्न झालाच, तर त्यावर प्रचंड गहजब माजवला गेला. संस्कारक्षम वाङ्मयाच्या नावाखाली मुलांच्या हाती देव-देवतांच्या कथा देताना सेन्सॉरशिपचे थोडेही भान ठेवले गेले नाही. इंद्राने फसवून अहिल्येचा घेतलेला भोग असो, वा कुंतीला वेगवेगळ्या देवपुरुषांपासून झालेले पुत्र असो, वा एकलव्याच्या कथेतून झालेल्या अन्यायातून दिसणारा जातीय विद्वेष असो. बालवाङ्मयाच्या बाबतीत हा समाज आणि सार्वकालीन साहित्यिक शासनव्यवस्था कायम निद्रिस्त राहिली. याचे गंभीर परिणाम निश्चितच पुढच्या पिढीतील समाजाला भोगावे लागले.

भारतीय मुलांना काय करावे, काय करू नये, काय नैतिक, काय अनैतिक या (त्यातही विशेषत: लैंगिकतेच्या मुझ्याशी संबंधित) विषयांची समज वडीलधाऱ्यांकडून डोळे वटारून आणि शक्य तेवढ्या अस्पष्ट आणि म्हणूनच अनाकलनीय शब्दांत दिली जाते. त्याच वेळी संस्कारक्षम पुस्तके म्हणून त्यांच्या हाती जे ठेवले जाते, त्यातील आशय मात्र अगदी भिन्न असतो. त्यातून लहान मुलांना एक खोड असते, प्रश्न विचारायची! त्यांना नेहमी प्रश्न पडतात. त्यातला प्रमुख प्रश्न असतो- ‘हे खरे आहे का?’ प्रश्न देवादिकांच्या बाबतीतला असेल, तर बिनदिक्कतपणे ‘होय’ असे खास धार्मिक वातावरणातील उत्तर छाती फुगवून दिले जाते. मुळात मुलांनी ‘वाचलेले एक’ असते, पालकांनी ‘सांगितलेले’ दुसरे असते आणि त्यात मुलांना जे ‘उमगते’ ते आणखी तिसरेच असते. हे वर्षानवर्षं पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. आजपर्यंतची सामाजिक बधिरावस्था आणि आजचा हा नैतिक-अनैतिकतेचा गदारोळ या पूर्ण दुर्लक्ष झालेल्या बालवाङ्मयामुळे आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

वरील निवेदनामुळे एखाद्याला असे वाटू शकेल की, हा लेख लहान मुलांना वाङ्मयातून लैंगिकतेचा परिचय व्हावा, याच्या विरोधात आहे. पण असे नाही. विरोध आहे, तो समाजातील या दोन विरोधाभासी प्रवाहांना. संस्कार म्हणन घरातून ‘काय करावे आणि काय करू नये’, याचे काटेकोरपणे आखून दिलेले लैंगिक आणि नैतिक नियम वाचनातून उमगलेल्या कथांतून (विशेषत: देवादिकांच्या) छेदले जातात. तेव्हा मुळातूनच मुलांच्या नेणिवेत (subconscious) एक छुपा, बंडखोर आणि विरोधाभासी प्रवाह जन्म घेऊ लागतो. कारण देव करतात ती प्रत्येक गोष्ट अतुलनीय आणि आदर्श अशी असल्याने ती चुकीची कशी असेल, हा प्रश्न त्या त्या काळातील प्रत्येक बालमनास पडत असावा. त्यानंतर तो एका अव्यक्त आणि सुप्त अशा मनाच्या पातळीवर वाढीस लागत असेल. त्यानंतर तो सामाजिक आयुष्य जगताना कधी व्यभिचाराच्या रूपाने प्रत्यक्षातही उतरत असेल; पण ही झाली अव्यक्त नेणिवेच्या पातळीवरील व्यक्त आणि प्रकट क्रिया.

समाजाच्या दृष्टीने अनैतिक असणारे असे अपघात या समाजात कायमच घडत राहतात. प्रश्न उभे राहतात ते नंतर. वयात येतानाच्या काळापर्यंत आणि वयात येतानाही ‘हे चांगले नाही’, ‘हे अनैतिक’ या वाक्यांचा ठणठणाट कायमच मुलांच्या मनावर व्यक्त पातळीवर होत असतो. पण या जाणिवेच्या पातळीवरील लक्ष्मणरेषा ओलांडून नेणिवेच्या (subconscious) पातळीवर स्वीकारलेल्या गृहीतकातून अनैतिक कृत्य घडते, तेव्हा ते घडल्यानंतर अपराधीपणाच्या भावनेखाली समाजाचा तो घटक दबला जातो. त्याचे सामाजिक जीवन बिथरते, सैरभैर होते. याचे एक कारण वाचनातून झालेल्या अव्यक्त संस्कारांच्या नेमक्या उलट्या दिशेने घरातून झालेले व्यक्त संस्कार, हे असूच शकते. समाजात निर्माण झालेल्या या नैतिकतेच्या गोंधळास काही अंशी का होईना जबाबदार मानून, बालवाङ्मयाकडे लैंगिक-अलैंगिकतेच्या भिंगातून पाहण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

नैतिक असामंजस्यासोबतच जातीभेदाचे विषही या कथांमुळे बालमनात पेरले जात असावे, अशी शंका हे साहित्य पन्हा एकदा वाचताना येते. ‘पंचतंत्र’च नव्हे, तर ‘वेताळ पंचविशी’, ‘हितोपदेश’, ‘सिंहासन बत्तिशी’, ‘रामायण’-‘महाभारता’तील कथा या साऱ्यातून जातीभेदवाचक उल्लेख सातत्याने आढळतात.

या एवढ्या शब्दच्छलानंतर काही वस्तुनिष्ठ उदाहरणे पाहणे अत्यावश्यक ठरते. ‘पंचतंत्रा’तील विष्णूचे रूप घेतलेला कोष्टी या कथेचेच उदाहरण आपण पाहू. सदर कथेत राजकन्येच्या सौंदर्याची आणि रूपाची भुरळ पडून एक कोष्टी आपली शुद्धबुद्धच हरपून बसतो. राजकन्येच्या विचारानं तो वेडापिसा होतो. ही सारी हकिकत तो आपल्या सुतार असणाऱ्या मित्राला सांगताच सुतार म्हणतो, “ती राजकन्या आहे. ती क्षत्रिय तर तू वैश्य. उच्चवर्णीयांशी लग्न करण्याचं धाडस तू कसं करू शकतोस?” यावर कोष्टी म्हणतो, “शास्त्राप्रमाणे क्षत्रियाला क्षत्रिय, वैश्य व शूद्र या तीन जातींतील तीन बायका करावयाचा अधिकार आहे. राजकन्या ही वैश्य पत्नीपासून राजाला झालेली असावी, असे माझे मन मला सांगते आहे.” पुढे आपल्या कोष्टी मित्राला मदत करण्यासाठी सुतार एक लाकडी विमान तयार करतो आणि त्याला सल्ला देतो की, “राजकन्या भगवान विष्णूची अनन्यभावी भक्त आहे. तू विष्णूचे रूप घेऊन तिच्याकडे जा.” सुताराच्या सल्ल्यावरून कोष्टी विष्णूचे रूप घेऊन राजकन्येकडे जातो आणि तिच्यासोबत सहवास करतो.

कोणा एकाचे रूप घेऊन जाऊन वामकर्म करायचे, असे उल्लेख ‘वेताळ पंचविशी’तील काही कथांतही आढळतात. भवभूतीने मूळ संस्कृतमध्ये लिहिलेल्या ‘वेताळ पंचविशी’तही लैंगिक अनाचाराचे स्पष्ट वर्णन असणाऱ्या अनेक कथा आहेत. एरवी लहान मुलांनी टीव्ही पाहताना त्यांच्यावर सेन्सॉरशिप लादणाऱ्या या समाजाचा डोळा या कथांनी कसा चुकवला, हाही एक गहन प्रश्नच आहे. ‘पंचतंत्र’, ‘वेताळ पंचविशी’ यांसह बऱ्याच प्रचलित भारतीय बालवाङ्मयांतून पात्रांचा परिचय आणि उल्लेख त्यांच्या व्यवसायावरून आणि व्यवसाय हीच जात असल्यामुळे जातीवरून होताना आढळतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

उदा. कोष्टी, न्हावी, चांभार, सुतार, परीट असे अनेक जातीवाचक उल्लेख आणि बऱ्याचदा नेमक्या जातीचे नेमके असेच ठरवून दिलेले वर्तन, या कथांतून दिसते. अर्थात ‘पंचतंत्र’ किंवा ‘वेताळ पंचविशी’सारखे साहित्य ज्या काळात लिहिले गेले, त्या काळात समाजात व्यवसायावरून किंवा जातीवरून लोकांना ओळखण्याची पद्धत रूढ असली, तरी आज जातीमुक्त समाजाचे स्वप्न पाहत असताना, हे असे उल्लेख बिलकुलच अप्रस्तुत आहेत. या उल्लेखांना टाळून या वाङ्मयाची पुनर्रचना व्हायला हवी, असे प्रकर्षाने वाटते.

‘चांदोबा’सारख्या बालनियतकालिकांनी अनेक दशके भारतीय बालवाङ्मयाची अभिरुची जोपासली. वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या बालमनाच्या वाचन अभिरुचीस एक स्थिर ऊर्जास्रोत पुरवला. ‘चांदोबा’तील कथा तर मुलांच्या जाणिवा-नेणिवा कल्पकतेची पातळी उंचावण्यास खतपाणी घालणाऱ्या अशा अद्भुत वातावरणातील होत्या. ‘चांदोबा’तील कथा निर्विवादपणे बोधपर, नीतीमान आणि संस्कारक्षम वातावरणाचा विकास करणाऱ्याच होत्या, हे नाकारता येणार नाही; पण जवळपास बहुतांश जागतिक बालवाङ्मयाच्या बाबतीत जी गोची आढळते, त्या गोचीचे भारतीय बालवाङ्मय हे प्रातिनिधिक असे एक महत्त्वाचे आणि आद्य उदाहरण आहे.

जागतिक बालवाङ्मय हे शतकानुशतके, सार्वकालीन समाजमनावर, लोकमानसावर ठसलेल्या प्राचीन वाङ्मयावर बेतलेले असल्यामुळे, ते पूर्णत: शुद्ध आणि नि:सत्त्व नाही, असे वाटते. या प्राचीन वाङ्मयात लोककथा, दंतकथा आणि देवपुरुषांच्या ऐकीव अथवा कालानुरूप टप्प्याटप्प्याने बदलत गेलेल्या अदभुत कार्यक्षमतेचा परिचय देणाऱ्या कथांचा समावेश होतो. भारतीय बालवाङ्मयात एकच कथा वेगवेगळ्या स्वरूपात मांडलेली आढळते. ते कथानक आहे, एका राक्षसाला राजकन्या आवडते. तो तिचे अपहरण करतो वा तिला पळवून नेतो. राजकन्येच्या सौंदर्याने मोहित झालेल्या राक्षसाला तिच्याशी लग्न करायचे असते. राजकन्येला राक्षसाच्या तावडीतून सोडवण्यासाठी राजपुत्र येतो. तो राक्षसाचा प्राण ज्या वस्तूत असतो, तिचा शोध लावून राक्षसास ठार करतो व राजकन्या प्राप्त करतो.

बालवाचकांत प्रचंड लोकप्रिय असणारे असे हे कथानक आहे. भारतीयच नव्हे, तर जागतिक बालवाचकांतही. हे कथानक विशेष आवडीने वाचले जाते. पुढे जगातील बऱ्याच कलामाध्यमांवर रंजन क्षेत्रातील दृक्श्राव्य माध्यमांवर या कथानकाचाच प्रभाव पडत गेला. जसे चित्र, शिल्प, नाट्य, चित्रपट इत्यादी. या साऱ्या कथानकांचा प्रेरणास्रोत भारतीय पुराणकथांत, त्यातही विशेषत: ‘रामायणा’त आढळतो. ‘रामायणा’त रावणाने सीतेचे बलप्रयोगाने अपहरण केलेले आढळते. पुढे राम वानरसेनेच्या मदतीने लंकाधुनी ओलांडून जातो. राक्षसाचा, म्हणजेच रावणाचा वध करून सीता परत मिळवतो.

बालकथांमधून राजकन्येचे अपहरण करणारा राक्षस, म्हणजे रावणाचेच प्रातिनिधिक रूप आहे. राजपुत्र वानरसेनेसोबत, म्हणजेच आपल्या सहनायकांसोबत सप्तसमुद्र, सप्तपर्वत ओलांडून जातो आणि राक्षसाचा प्राण ज्या कोणत्या वस्तूत (रावणाचा प्राण त्याच्या मधल्या मुखात होता.) असतो, तिचा छेद करून राक्षसास ठार करतो. रामायणाची प्राचीनता लक्षात घेतल्यास, राम हा जागतिक वाङ्मयातील पहिला राजपुत्र, सीता ही पहिली राजकन्या, तर रावण हा पहिला राक्षस, पर्यायाने आद्य खलपुरुष ठरतो..

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

रामायणातील या कथेतून जन्माला आलेल्या अनेक बालकथा, बालवाचकांचं कुतूहल जागृत करतात. क्वचित जाणिवेच्या, तर बऱ्याचदा नेणिवेच्या पातळीवर त्यांना प्रश्न पडतात. ज्या प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे देण्यास सभोवतालचा वडीलधारा समाज असमर्थ असतो. हे प्रश्न साधारण असे असू शकतात. राक्षस राजकन्येच्या सौंदर्याने मोहित होतो म्हणजे काय? राक्षसाला तिच्याशी लग्नच का करायचे असते? पर्यायाने लग्न म्हणजे नेमके काय?

हे किंवा इतर बालवाङ्मय वाचताना लैंगिकतेच्या अनुषंगाने पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा जो प्रवास नेणिवेच्या पातळीवर बालमनात सुरू होतो, तो पुढे आयुष्याच्या अंतापर्यंत अखंड अविरत चालू असतो. अर्थात, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रवासात एका सुप्त पातळीवर अव्यक्त, पण अत्यावश्यक असे मूलभूत लैंगिक शिक्षणाचे धडे मिळतही असतील. पण अशा प्रकारे अव्यक्त पातळीवर नकळत होणारे, अस्पष्ट लैंगिक शिक्षण समाजास निरोगी बनवत नसते, हे लक्षात घ्यायला हवे.

लैंगिक बालवाङ्मयाचे जागतिक प्रांगण

आज भारतीय समाजव्यवस्थेचा नैतिक डोलारा डगमगताना दिसतो. आज भारतीय नैतिकतेभोवती जी संभ्रमावस्था दिसते, अशा संभ्रमावस्थेतून युरोपीय समाज गेली अनेक शतके जात होता. वैज्ञानिक प्रगती वेग धरत असतानाच कधीतरी या संभ्रमावस्थेचा स्फोट झाला आणि युरोपीय नैतिकता लवचीक झाली. या युरोपीय नैतिक संभ्रमावस्थेमागे भारतीय नैतिक संभ्रमावस्थेप्रमाणेच धर्मशासनाचा प्रचंड प्रभाव होता.

‘God fearing people’ असे युरोपीय देशात धार्मिक अथवा चर्चचे अधिष्ठान पाळणाऱ्या लोकांबद्दल सहसा म्हटले जाते. म्हणजे देवाला घाबरणारे. देवाला भिण्याचे हे नीतीनियम बऱ्याच अंशी लैंगिक वर्तनाला अनुसरूनच बनवलेले असतात. आज युरोपीय देशांतून जन्माला आलेल्या बालवाङ्मयातून या चिरडल्या गेलेल्या लैंगिक वर्तनाच्या कहाण्या पानोपानी आढळतात.

‘परीकथा’ या जगातील प्रत्येक भाषेतील बालवाचकाच्या आकर्षणाचा कायमच केंद्रबिंदू ठरल्या आहेत. याचे कारण म्हणजे, पऱ्यांचे मोहक रूप, त्यांची शारीरिक घडण आणि त्यांच्याभोवती असणारे गूढरम्य वातावरण हेच आहे. ज्या मानवाने त्यांची निर्मिती केली, त्या मानवाएवढ्याच या पऱ्या प्राचीन आणि अपार्थिव आहेत. असे असले, तरी या परीकथांचा जन्म बालवाङ्मयाच्या गरजेपोटी किंवा बालमनाच्या कोणत्याही प्रकारच्या विकासाच्या दृष्टीकोनातून झालेला नाही. मुळात मुलांसाठी एक वेगळ्या प्रकारचे स्वतंत्र वाचनखाद्य असावे, ही कल्पनाच अगदी अलीकडच्या काळातील आहे.

तत्पूर्वी, परीकथा हा लोककथांचाच एक भाग होता. घराघरातून, प्रासंगिक स्नेहसंमेलनातून सांगितल्या जाणाऱ्या या गोष्टी मुलांच्या कानावर पडत गेल्या. पुढे जेव्हा मुलांच्या शिक्षणाची आणि संस्कारक्षम होण्याची गरज भासू लागली, तेव्हा याच कथांना थोडे रूपांतरित करून बालसाहित्यात बदलण्यात आले. असे असले, तरी हा एक फसलेला, पलायनवादी आणि अनीतीमान प्रयत्न होता.

या पार्श्वभूमीवर युरोपीय देशातून परीकथांच्या धर्तीवर निर्माण झालेल्या बहुतांश साहित्यकृतीतून कृत्रिम अथवा अकृत्रिम लैंगिक वर्तनांचे दर्शन हे दडल्या स्वरूपात का होईना, पण घडतच राहते. खरे तर परीकथांना निसर्गाचे वा विज्ञानाचे नियम लागू होत नाहीत. ते तसे लागू झाल्यास नेमक्या विरुद्ध दिशांनी होतात; पण समाजाला निसर्गाचाच एक घटक मानून समाजाचे प्रचलित नियमही धाब्यावर बसवण्याचे काम या परीकथांतून पुढे होत गेले. व्यभिचार, परस्त्रीगमन, जवळच्या नात्यात शरीरसंबंध (incest) अशांसारख्या तत्कालीन समाजात निषिद्ध असणाऱ्या लैंगिक वर्तनांचा सुकाळ या कथांतून आढळतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘द ले ऑफ टेरीटरीज’ या पुस्तकातून (जे पुढे युरोपीय बालवाचकांसाठी अधिक सुलभ होऊन उपलब्ध झाले.) अशा तत्कालीन समाजात निषिद्ध असणाऱ्या न लैंगिक वर्तनांच्या कथा आढळतात. उदा. 'द ले ऑफ योनेक'मध्ये वृद्ध पतीने मनोऱ्यात कोंडून ठेवलेल्या पत्नीची कथा आहे. ‘द ले ऑफ डॉलर्स नाईट’मध्ये अनेक स्त्रियांची एका वेळी अनेक पुरुषांशी संबंध ठेवण्याची प्रबळ इच्छा असणारी कथा आहे, तर ‘ले ऑफ टूलव्हर्स’मध्ये पित्याला कन्येविषयी वाटणाऱ्या शारीरिक आकर्षणाची कथा आहे. हे सारे वाङ्मय आजही मूळ स्वरूपात उपलब्ध असून शिवाय मुलांसाठी खास शुद्ध केलेल्या स्वरूपातही उपलब्ध आहे.

‘आर्थर्सनाइ’ हीसुद्धा एक अशीच सुप्रसिद्ध बालकथा. ही कथा आजही जगातल्या बहुतांश बालवाचकांकडून मोठ्या प्रमाणावर वाचली जाते. या कथेचे मूळ स्वरूप मात्र पूर्णत: गळे आणि अर्थातच प्रौढवाङ्मयात मोडणारे आहे. कथा काहीशी अशी आहे - ‘एक सरदार एका स्त्रीवर बलात्कार करतो. राणी त्याला देहान्ताची शिक्षा देते; पण त्याच्या दयेच्या विनंतीवरून त्याला एक अट घालण्यात येते. ती अट म्हणजे ‘स्त्रीला कोणत्या गोष्टीची सर्वाधिक लालसा असते’, हे त्याने काही दिवसांच्या अवधीत राणीला येऊन सांगितले, तर त्याला देहान्ताच्या शिक्षेतून माफी मिळेल. खूप असफल आणि व्यर्थ प्रयत्नांनंतर त्याला एक वृद्धा भेटते, जी तिच्या इच्छापूर्तीच्या मोबदल्यात त्याला या प्रश्नांचे उत्तर देण्यास तयार होते. तो त्या वृद्धेच्या इच्छापूर्तीची अट मान्य करून तिने सांगितलेले उत्तर राणीला देतो. ते उत्तर असते, ‘आपल्या सर्व पुरुषांवर, पतीवर, प्रियकरांवर हुकूमत गाजवणे, हीच स्त्रीची सर्वांत मोठी आकांक्षा आणि लालसा असते.’ राणी हे उत्तर ऐकून खूश होते व त्याची सुटका करते.

त्यानंतर वेळ येते वृद्धेच्या इच्छापूर्तीची. वृद्धेची इच्छा असते, त्याने तिच्याशी लग्न करावे. तो ती इच्छा पूर्ण करतो. पण पहिल्या रात्री तिच्याशी संग करण्यास अनुत्सुक असतो. त्याचे व्यथित होणे पाहून ती म्हणते, ती स्वत:ला तरुण आणि सुंदर बनवू शकेल; पण त्यानंतर तिचा स्वत:वर ताबा राहणार नाही व ती फक्त त्याच्याशीच प्रामाणिक राहील, असे घडणार नाही. तो त्यावर तिला ‘जशी तुझी इच्छा’ असे म्हणतो. यावर ती त्याला तिचे सगळे कपडे काढायला सांगते. तो जसजसे तिचे एक एक वस्त्र फेडत जातो, तो तो उघडा पडणारा अवयव तरुण आणि तजेलदार होत जातो. या कथेच्या बालवाचकांसाठी उपलब्ध असणाऱ्या आवृत्तीत किती बदल झाले आहेत, हे ती कथा बालवाचक असताना वाचणाऱ्याच्या तत्काळ लक्षात येईल. अर्थात स्वरूप फारसे बदललेले नाही.

याच पार्श्वभूमीवर पेरोच्या (Perrault) ‘द स्लीपिंग ब्युटी’ किंवा ‘द लिटिल रेड रायडिंग हड’ या कथांचाही समावेश होतो. ‘द लिटिल रेड रायडिंग हुड’ ही कथा तर पुढे बालवाङ्मयातून व्यक्त होणाऱ्या क्रूर, हिंसक आणि लैंगिक वर्तनाचे प्रातिनिधिक उदाहरणच बनली. या कथेनुसार एक नुकतीच वयात आलेली मुलगी (जिने गर्द लाल रंगाचे वस्त्र व टोपी घातलेली असते.) जंगलाच्या वाटेतून तिच्या आजीकडे निघाली असता, मनुष्य व लांडगा अशी दोन्ही रूपे घेऊ शकणारा एक लांडगा (werewolf) तिला भेटतो. ती कुठे चालली आहे, वगैरे चौकशी करून तो तिच्या आधी तिच्या आजीकडे पोहोचतो. तिच्या आजीला तो खाऊन टाकतो आणि नंतर बिछान्यात तिची वाट पाहत थांबतो. यथावकाश ती मुलगी घरी पोहोचते. तिच्या आजीच्या रूपात बसलेल्या त्या लांडग्यास पाहून चपापते. तिची आजी आज काहीशी वेगळी दिसत असते. यावर ती तिच्या आजीला म्हणजेच त्या लांडग्याला काही प्रश्न विचारते. ते प्रश्न काहीसे असे असतात-

‘तुझे दात असे का दिसताहेत?’ मुलगी.

‘तुला खाण्यासाठी.’ लांडगा.

‘तुझे ओठ असे का थरथरताहेत?’ मुलगी.

‘तुला चोखण्यासाठी.’ आजीच्या रूपातला लांडगा.

असे बरेच काही.

शेवटी तो लांडगा त्या मुलीलाही खाऊन टाकतो.

सुसान ब्राऊनमिलर या लेखिकेने आपल्या ‘Against Our Will’ या गाजलेल्या पुस्तकात या कथेचा ‘बलात्काराचा पहिला लिखित पुरावा’ असे वर्णन केले आहे. बलात्काराचे ढळढळीत उदाहरण असणारी ही एक स्पष्ट कथा आहे. मुलींनी अनोळखी पुरुषांशी बोलू नये, अन्यथा वाईट परिणाम होतात, हाच संदेश देण्याचा या कथेद्वारे प्रयत्न होतो. ही कथा मुळात लोककथेतून जन्माला आलेली असल्यामुळे पेरोच्या आधीपासून या कथेमुळे प्रेरित झालेली एक असभ्य म्हण त्या काळच्या समाजात रूढ होती, ती म्हणजे ‘She has seen the wolf’. कौमार्यभंग झालेल्या मुलीच्या बाबतीत असे खोचकपणे म्हटले जाई. पेरोनंतर पुढे ग्रिमबंधूंच्या कथांतून या कथेचे थोडे अधिक सौम्य रूप प्रकाशित झाले असले, तरी मूळ कथेतला शारीरिक हिंसाचार आजही या कथेतून आढळतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

याशिवाय स्त्री-पुरुषांच्या इंद्रियांविषयी स्पष्ट प्रतीकात्मक उल्लेख असणाऱ्या कथाही युरोपीय बालवाङ्मयात सर्रास आढळतात. विहीर किंवा खड्डा हे योनीचे, तर झाड किंवा भूछत्र हे पुरुष इंद्रियाचे प्रतीकात्मक रूप म्हणून मध्ययुगीन लोककथांतून सर्रास वापरले गेले. ‘रूबेन्स लास्ट लेटर’ या कथेत मैत्रिणीच्या अंगणात खड्डा खणून भूछत्र लावल्याबद्दल नायक आपल्या मित्राचे आभार मानतो आणि पुढे म्हणतो, ‘त्या पेरलेल्या बीजास फळधारणा होवो’. यातून व्यक्त होणारे गर्भितार्थ हे लैंगिक धारणेचेच आहेत.

अकराव्या शतकात केव्हातरी जन्माला आलेल्या काही कोड्यांमध्ये लैंगिक उल्लेखांचे स्पष्ट संदर्भ आढळतात. ही कोडी (riddles 44 & 54 in Exter books) पुढे मुलांसाठी थोडेफार बदल करून वापरली गेली. यातली काही कोडी मूळ इंग्रजीतूनच पाहू.

John has a thing long

Mary has a thing hairy

John puts his thing long

into her thing hairy

किंवा

What is three inches round,

six inches long & all women like it?

नेणिवेच्या पातळीवर असेल, पण आपणच प्रतिमा निर्माण करायच्या आणि नंतर नाकारायच्या हा खेळ बालमनासमोर प्रौढ समाज नेहमीच खेळत आला आहे. ‘द स्पॅरो इन द स्काय’ हे एकोणिसाव्या शतकात गाजलेले बालगीत ज्या ‘द बर्ड इन द बुश’वर बेतले आहे, ते गाणे मुळातूनच वाचण्यासारखे आहे-

Three maidens a milking did go.

Three maidens a milking did go.

And the wind it did blow high & the wind it did blow low.

It did their pails to & fro.

 

Now they met with some young man they knew

they asked him if he had any skill

In catching a small bird or two.

 

Yes indeed I've a very fine skill.

Indeed I have a very fine skill.

If you come with me to the greenwood

I might catch you a small bird or two.

 

So along to the green wood they went.

The bird it flew in & the bird flew out.

Just above her lily white knee.

So here is the health to the bird in the bush.

Let the people say little or much.

या गीतातून प्रकट होणारे शृंगारिक वातावरण अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. युरोपीय परीकथांच्या माध्यमाद्वारे बालमनाची अद्भुताच्या आकर्षणाची तहान काही प्रमाणात शमली असली, तरी त्यात दडलेल्या प्रतीकात्मक (आणि बऱ्याचदा स्पष्ट) लैंगिकतेने पुढे नैतिक संभ्रमावस्था वाढवण्याचे काम केले, हे नाकारता येत नाही.

अरबी बालवाङ्मय

परीकथांमधले वातावरण अदभुत, गूढरम्य असले, तरी त्यास अशक्यप्रायतेचे एक बाह्य कवचही असते आणि बालमन कितीही अपरिपक्व असले, तरी या अविश्वसनीयतेचा त्याने एका पातळीवर स्वीकार केलेला असतो. याउलट ‘अरेबियन नाइट्स’मधील कथांना जो तत्कालीन सामाजिक वातावरणाचा स्पर्श झालेला आहे, तो या कथांना अधिक स्पष्ट आणि विश्वसनीय बनवतो. ‘सुरस आणि चमत्कारिक’ म्हणून संबोधल्या गेलेल्या (का हिणवल्या गेलेल्या?) या कथांतील समाजजीवनात जी पारदर्शकता आढळते, तशा इतर कोणत्याही भाषेतील वाङ्मयात अभावानेच आढळते. अल्लादिन काय, सिदबाद काय किंवा अलिबाबा काय, हे सारे नायक तत्कालीन समाजातील अगदी साध्या कुटुंबांतून आलेले असल्यामुळे सर्वच समाज स्तरांतील बालवाचकांस त्यांच्याविषयी जरा जास्तच आत्मीयता वाटते. परीकथांचा प्रदेश, पऱ्यांचे राज्य कुठे? तर ‘दूर दूर तिथे कुठेतरी’ याउलट अलिबाबाची गुहा गावाच्या बाहेरील डोंगरावरही सापडू शकते, यावर बालवाचकांचा विश्वास बसलेला असतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या पार्श्वभूमीवर पूर्वेकडच्या अगदी सुरुवातीच्या कथांना जनमानसात आपली मुळे रोवण्यासाठी जादू, चमत्कार आदी गोष्टींची आवश्यकता नव्हती. त्यातूनही ‘अरेबियन नाइट्स’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कथांतून, वा या कथांना समकालीन अशा काही कथांतून तत्कालीन समाजजीवनाचे जे थेट दर्शन घडले, त्याने उभे जग हादरून गेले. लैंगिक वर्तनातील चमत्कृतींचे जे थेट दर्शन या कथांनी घडवले, तसे इतर कोणत्याही भाषेतील वाङ्मयातून घडले नाही. इतर भाषेतील वाङ्मयातून अनाचाराच्या वा लैंगिक वर्तनातील चमत्कृतींविषयी घडलेल्या घटनांद्वारे सांगितले आहे; पण या अरबी कथांतून निव्वळ घटनाच नव्हे, तर त्या काळातील लैंगिक वर्तनातील चमत्कृतीपूर्ण चालीरितींविषयीही स्पष्ट भाष्य आहे. “यात स्त्रियांना घरी एकटेच ठेवून मोहिमांवर जाणाऱ्या पुरुषांच्या कथा आहेत. ज्यात एकांतवासात या स्त्रियांना व्यभिचाराच्या आणि अनाचाराच्या अनेक कल्पना सुचतात. अनाचाराच्या या वेगवेगळ्या कल्पना स्वतंत्र कथांचे रूप धारण करतात आणि वाचकास धक्का देऊन सोडतात.’’

‘अरेबियन नाइट्स’ या नावाने लोकप्रिय असणाऱ्या या कथांचे मूळ नाव ‘थाऊजंड अँड वन नाइट्स’ असे आहे. या कथांचा फ्रेंचमध्ये सर्वप्रथम अनुवाद चौदाव्या लुईसाठी आँत्वान गाला याने १७०४ ते १७१७ दरम्यान केला. या कथांचा पुढे इंग्रजीतही प्रवेश झाला; पण हा प्रवेश गालांच्या अनुवादावरून केला गेला होता. त्या काळी ‘पॉल मॉल गॅझेट’ या ब्रिटिश वृत्तपत्राने घेतलेल्या एका सर्वेक्षणात ‘अरेबियन नाइट्स’चा समावेश दहा वर्षे वयाच्या मुलांसाठी असणाऱ्या सर्वोत्कृष्ट दहा पुस्तकांत केला गेला. अल्लादिन, सिंदबाद आणि अलिबाबाने तोपर्यंत अवघ्या जगाला वेडे केले होते. पण खरा गौप्यस्फोट अजून व्हायचा होता!

१८८५पर्यंत ‘अरेबियन नाइट्स’च्या जगाला माहीत असणाऱ्या कथांचे स्वरूप अत्यंत सौम्य आणि त्यातील अद्भुतरम्य वातावरणाला केंद्रिभूत ठेवणारे असेच होते; पण १८८५मध्ये सर रिचर्ड बर्टनने मूळ अरबी कथांवरून इंग्रजीत अनुवादित केलेल्या या कथा ‘द थाऊजंड अँड वन नाइट्स’ या नावाने बनारसच्या कामशास्त्र सोसायटीने प्रकाशित केल्या आणि अवघ्या जगाच्या पायाखालची जमीन हादरली. खरे तर या कथा कामशास्त्र सोसायटीने निव्वळ वर्गणीदार असणाऱ्या सभासदांसाठी फार कमी प्रतींच्या आवृत्तीत प्रकाशित केल्या होत्या. या कथांचे सुरुवातीला दहा व नंतर सहा असे खंड प्रकाशित झाले. कथांतून होणारे जनानखान्यातील अनाचाराचे वर्णन वाचून जग स्तिमित झाले. कोवळ्या मुलांशी संबंध ठेवणाऱ्या प्रौढ पुरुषांच्या कथा (pederasty) वाचताना उभे वाङ्मयविश्व थरथरू लागले.

त्या काळातील प्रसिद्ध इंग्रज पत्रकार फिलिप मूर या कथा वाचून म्हणाला, “ज्या कथांतील पात्रांना आम्ही आमच्या मुलांच्या बालविश्वाचे अधिनायक बनवले, ती अल्लाद्दिन, सिंदबाद आणि अलिबाबासारखी पात्रे किळसवाण्या लैंगिक अनाचारी वातावरणाने बरबटलेली आहेत, हे थोडे लवकर कळायला हवे होते.” खरे तर फिलिप मूरचे हे विधान अत्यंत दयनीय आणि सामान्य असेच होते. अरबी काय, युरोपीय काय किंवा भारतीय काय, जगातील प्रत्येक बालवाङ्मय हे लैंगिक वर्तनाच्या कथा सांगणाऱ्या साहित्यातूनच जन्माला आले आहे. पुढे एकदा स्वत: रिचर्ड बर्टनने एके ठिकाणी म्हटले, “अल्लादिनने दिवा घासल्यावर त्यातून जिन बाहेर येणे व त्याने दिवा घासणाऱ्याची इच्छापूर्ती करणे, हे हस्तमैथुनातून मिळणाऱ्या आनंद प्राप्तीचेच प्रतीक आहे.”

काय, कुठे, कुणाचे आणि कितपत चुकले?

‘रामायण’, ‘महाभारत’, ‘वेताळ पंचविशी’, ‘पंचतंत्र’, युरोपीय वाङ्मय वा ‘अरेबियन नाइट्स’ यातले कोणतेही साहित्य हे सार्वकालीन सर्वोत्कृष्ट असे साहित्यच आहे. ‘रामायण’-‘महाभारता’तील मानवी वर्तनांचा उलगडा करण्यामागे कित्येक पिढ्यांनी आपली आयुष्ये खर्चली. ‘वेताळ पंचविशी’ किंवा ‘अरेबियन नाइट्स’मधून प्रकट होणारे तत्कालीन समाजीवन सद्य समाजजीवनाच्या नैतिकतेच्या दृष्टीने भले जरा जास्तच लवचीक असेल; पण या कथांतून त्या त्या काळातील समाजजीवनाच्या पाऊलखुणा, रीतीरिवाजांचे पुरावे अगदी स्पष्ट आढळतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

राजपुत्र-राजकन्या आणि राक्षस हा लैंगिक आकर्षणाचा प्रेम त्रिकोण (love triangle) एका सुप्त पातळीवर भिन्नलिंगी आकर्षणाचे लैंगिक शिक्षण बरीच वर्षे देत आला आहे. प्रश्न पुन्हा उद्भवतो, असे आहे तर मग चुकले काय?

तसे पाहता वाङ्मयाचे चुकत काहीच नाही, चुकते ते समाजाचे. एका वेळी वर्तणुकीतून आणि उपदेशांतून वेगळे संस्कार करायचे; पण त्याच वेळी मुलांना वाचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या वाङ्मयातून वेगळे संस्कार करायचे. यामुळे गेल्या काही दशकातील प्रत्येक पिढीची प्रचंड मानसिक आणि नैतिक कुतरओढ झाली आहे. नैतिकतेच्या सीमारेषांना धूसर आणि अस्पष्ट करण्याचे काम या विरोधाभासी संस्कारांनी केले आहे. हे वाङ्मय बालविश्वातून हद्दपार करण्याची गरज मुळीच नाही; पण सोबतीला एक समांतर, स्पष्ट आणि आकलनास सोपी अशी लैंगिक शिक्षण देणारी ज्ञानशाखा उघडायला हवी. घरांतून होणाऱ्या विरोधाभासी संस्कारांवर पडदा टाकून, लैंगिकतेविषयीचा अवघडलेपणा जाऊन पालक आणि बालक यांच्यात एक समजूतदार संवाद घडायला हवा.

मुळात चुकले ते सार्वकालीन साहित्यविश्वाचे.

भारतीय समाजाने संस्कारक्षम म्हणून काय आहे, हे न पाहता धार्मिक वाङ्मय मुलांच्या हाती सोपवले. चर्चने लैंगिक वर्तनांचे उल्लेख चिरडून टाकल्यानंतर आता हे शुद्ध झाले, अशी समजूत करून घेत पूर्णत: शुद्ध न झालेले पण बाल अभिरुचीस बिथरवणारे असे प्रौढ वाङ्मयच बालवाचकांच्या पारड्यात टाकले; पण या अनवधानाने घडलेल्या चुका क्षम्य होत्या.

अक्षम्य चूक सार्वकालीन साहित्यविश्वाने केली. बालवाङ्मयाविषयी असणाऱ्या जबाबदारीचे भान न ठेवता स्वतंत्र आणि अभिनव असे बालसाहित्य निर्माण करण्याकडे सुरुवातीचा बराच काळ पूर्ण दुर्लक्ष केले गेले. समाजजीवन आणि सांस्कृतिक अभिरुची अधिकाधिक शिस्तबद्ध आणि आखीव-रेखीव होत गेल्या, तसतशी नव्या साहित्याची निर्मिती होत गेली. असे होत असताना जुने साहित्य आपोआपच बालवाचकांच्या पारड्यात पडत गेले. एक वेळ अशी आली की, जे जे अद्भुत, जे जे निसर्ग नियमांविरुद्ध, जे जे बाळबोध भाषेत आणि शैलीत सांगितलेले, ते ते बालवाङ्मय! यावर आपोआपच शिक्कामोर्तब होत गेले. साहित्यातील या भ्रष्ट आणि गाफील शासनव्यवस्थेने ‘पंचतंत्र’, ‘वेताळ पंचविशी’, ‘हितोपदेश’, ‘अरेबियन नाईट्स’ यांसारख्या अनेक अजरामर कलाकृतींचे बळी घेतले. जे जे अदभुत ते ते बालरुचीस योग्य, हा दृष्टीकोन पुढे एवढा बळावला की, मोतीबिंदू झालेल्या या साहित्यिक व्यवस्थेने ज्यूल व्हर्न, आर्थर कॉनन डॉयल, असिमोव्ह यांनाही बालसाहित्यिकांत गणायला सुरुवात केली. हे सारे करत असताना या व्यवस्थेने शेरलॉक होम्सच्या मती गुंग करणाऱ्या अफाट बुद्धिमत्तेस ‘चातुर्य’ या एकाच शब्दात बंदिस्त करून टाकले, तर ज्यूल व्हर्नच्या विजीगिषेस ‘व्हर्नची अद्भुत सृष्टी’ अशी शिवी हासडली.

मुलांसाठी कोणतेही नवे साहित्य निर्माण करण्यासंबंधीच्या अनुत्सुकतेने (जी अजूनही थोड्याफार प्रमाणात आहे.) उपलब्ध जुने साहित्य तपासून न पाहता मुलांना देऊन, आपली पिढ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

जागतिक साहित्याची म्हैस बालसाहित्याची तीच ती वैरण रवंथ करत निवांत पहुडली आहे. खरे तर तिला ढोसून, जबरदस्तीने उभे करून तिच्यातून नव बालसाहित्याचे ताजे व सकस दूध काढायची गरज आज निर्माण झाली आहे.

हा मूळ लेख ‘सजग’ या त्रैमासिकाच्या जुलै-सप्टेंबर २०२२च्या अंकात ‘जागतिक बालवाङ्मयातील लैंगिकता’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला आहे.

.................................................................................................................................................................

‘सजग’चा अंक मागवण्यासाठी -

वार्षिक वर्गणी (चार अंक)- ४०० रुपये

GooglePay, Paytm, BHIM इत्यादी द्वारे वर्गणी भरण्यासाठीचा मोबाईल क्रमांक - 9422016044

इंटरनेट बँकिंग वापरून NEFT/IMPS द्वारे वर्गणी भरण्यासाठी बँकेच्या खात्याची माहिती -

Watermark Publication

A/C No. 62426108546

State Bank of India Kothrud, Pune Branch

IFSC - SBIN0020734

वर्गणी भरल्यानंतर ट्रान्स्फर डिटेल्स, नाव, फोन नंबर आणि पिनकोडसहित पत्ता पाठवण्यासाठी -

ई-मेल - watermarkpublication@gmail.com

 व्हॉटसअ‍ॅप नंबर - 9422016044

.................................................................................................................................................................

लेखक हृषीकेश गुप्ते प्रसिद्ध कथा-कादंबरीकार आहेत.

gupterk@yahoo.in

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......