ख्रिस्ती समाजाकडे पैसा नाही किंवा ख्रिस्ती लेखकांकडे प्रतिभा नाही, असे नाही. मग ही दुरावस्था का?
पडघम - साहित्यिक
पौलस वाघमारे
  • २६व्या ‘मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलना’चे बोधचिन्ह आणि संमेलनाध्यक्ष पौलस वाघमारे
  • Mon , 07 November 2022
  • पडघम साहित्यिक २६वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन 26th Marathi Khristi Sahitya Sammelan पौलस वाघमारे Paulas Waghmare

२६वे ‘मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन’ कालपासून बीड येथे सुरू झाले आहे. या तीन दिवसीय (६ ते ८ नोव्हेंबर २०२२) संमेलनाची उद्या सांगता होईल. या संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरमध्ये २०२१मध्ये धुमधडाक्यात संपन्न झाले. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला ५७ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन, परंतु संख्येने २६वे असलेले बीड नगरीमध्ये पहिल्यानेच आज संपन्न होत आहे.

ख्रिस्ती साहित्य संमेलनाची वाटचाल

ख्रिस्ती साहित्याला तशी फार मोठी परंपरा आहे. १८४२मध्ये अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर येथे ‘ज्ञानोदय’ मासिकाची सुरुवात केली. आणि त्याने साहित्य क्षेत्रात इतिहास घडवला. तब्बल १८० वर्षे म्हणजे आजतागायत हे मासिक सुरू आहे. या मासिकाचे जुने अंक चाळले तर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वाटचालीचा सहज मागोवा घेता येतो. छपाई तंत्राची सुरुवातही ख्रिस्ती व्यतीने केल्याचे ऐतिहासिक सत्य आहे. कादंबरी लेखनाच्या अग्रपणाचा मानही ख्रिस्ती लेखकाकडेच आहे. दलित आत्मचरित्रात अग्रपणाचा मानही ख्रिस्ती लेखकाकडे असणे अपेक्षित आहे, परंतु तसे घडले नाही. असो.

१९२७ साली नाशिक येथे पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवल्याचा उल्लेख आढळतो, तर २०१४ साली २५वे साहित्य संमेलन सोलापूर येथे संपन्न झाले. म्हणजे गेल्या ९५ वर्षात केवळ २५ साहित्य संमेलने भरवण्यात आली. ख्रिस्ती समाजाकडे पैसा नव्हता किंवा ख्रिस्ती लेखकांकडे प्रतिभा नव्हती, असे म्हणता येत नाही. मग ही दुरावस्था का, हा प्रश्न उरतोच.

या भारतभूमीत ख्रिस्ती मिशनरींनी घट्ट पाय रोवल्यानंतर शिक्षणाचा प्रसार वाढला. ख्रिस्ती लेखकांच्या प्रतिभेला चालना मिळाली. साहित्यनिर्मिती होऊ लागली. मिशनरींच्या पुढाकाराने व त्यांच्या नेतृत्वाखाली १९२७मध्ये नाशिक, १९३०मध्ये मुंबई, १९३२मध्ये निपाणी, १९३३मध्ये नागपूर, १९५४मध्ये केडगाव, पुणे, १९५५मध्ये पुन्हा पुणे आणि १९५६मध्ये पुणतांबा, अशा सात ठिकाणी ख्रिस्ती साहित्य संमेलने भरवल्याचा इतिहास आहे. तोपर्यंत ख्रिस्ती साहित्य परिषद अशा संस्थेची स्थापना करण्यात आलेली नव्हती. १९७२च्या जुलै महिन्यात बी.टी.बी.एस. आणि ख्रिस्ती साहित्य प्रसारक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा प्रोटेस्टंटपंथियांनी आयोजित केलेली होती. तरीही ऐनवेळी काही कॅथॉलिकपंथीय साहित्यिकांना या सभेला निमंत्रित करण्यात आले, आणि प्रथमच प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक साहित्यिक एकत्र आले. त्यातून ‘ख्रिस्ती साहित्य संमेलना’ची कल्पना पुढे आली होती. या वेळी ‘पुणे ख्रिस्ती साहित्य संघ’ पुण्यामध्ये नुकताच कार्यरत झाला होता. नव्याने रुजू घातलेली ख्रिस्ती साहित्य संमेलनाची संकल्पना ‘पुणे ख्रिस्ती साहित्य संघा’ने उचलून धरली आणि ख्रिस्ती साहित्यिकांना ख्रिस्ती साहित्य संमेलन पुण्यात भरवण्याचे निमंत्रण दिले. ही संकल्पना त्वरीत अंमलात आणण्यासाठी नोव्हेंबर १९७२मध्ये पुण्यातील डी.नोबीली कॉलेज येथे आचार्य स. ना. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्जिवित झालेले पहिले तर क्रमवार आठवे ख्रिस्ती साहित्य संमेलन संपन्न झाले. त्या वेळी आचार्य दिनानाथ पाठक पुणे संघाचे अध्यक्ष असल्याने ते या संमेलनाचे स्वागताध्यक्ष झाले. सुमारे दोनशे साहित्यिकांनी या संमेलनात सहभाग घेतला होता.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

१९७२च्या या संमेलनातून महाराष्ट्र ख्रिस्ती साहित्य परिषद निर्माण झाली. त्यानंतर ख्रिस्ती साहित्य संमेलने महाराष्ट्रात भरवली जाऊ लागली. महाराष्ट्रातील प्रतिभावंत व नवोदित ख्रिस्ती लेखक या संमेलनात भाग घेऊ लागले. सुरुवातीला या संमेलनात कॅथॉलिकपंथीय लेखकांचे वर्चस्व होते आणि आजही आहेच.

साहित्य संमेलनातील अलिखित परंपरा

१९७२च्या संमेलनातून ‘महाराष्ट्र ख्रिस्ती साहित्य परिषद’ निर्माण झाली. ख्रिस्ती साहित्यिकांचे ऐक्य टिकून रहावे, म्हणून या संमेलनात एक अलिखित संकेत पाळण्याचे ठरले. तो म्हणजे प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक साहित्यिकांनी आलटून-पालटून संमेलनाचे अध्यक्षपद भुषवावे, यानुसार नवव्या, अकराव्या, तेराव्या आणि पंधराव्या संमेलनाचे अध्यक्षपद कॅथॉलिक साहित्यिकांकडे गेले. १७व्या साहित्य संमेलनाच्या बाबतीत ही परंपरा खंडीत झाली होती.

या घटनेने ख्रिस्ती नियतकालिकातून उलटसुलट चर्चा प्रसिद्ध झाल्याने पंथभेदाचे बीज मनात रूजून कॅथॉलिक साहित्यिक आणि साहित्यरसिक व्यथित झाले. अठराव्या संमेलनात मात्र गाडी पुन्हा रूळावर आणण्याचा प्रयत्न झाला. प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. ख्रिस्ती समाजाचे भूषण असलेले ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद परिषद कार्यकारिणीने निवडण्याऐवजी तो हक्क सर्वसाधारण सभेला द्यावा, अशी जोरदार मागणी नाशिक येथील अठराव्या साहित्य संमेलनात करण्यात आली होती.

संमेलनाध्यक्षांची निवड लोकशाही पद्धतीने

नाशिक येथे संपन्न झालेल्या अठराव्या साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात अनेक ठराव पारीत करण्यात आले. ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड लोकशाही पद्धतीने व्हावी, हा ठराव सर्वानुमते व वार्षिक सर्वसाधारण सभेतच करण्यात यावी, असे ठरवण्यात आले. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले प्रा. देवदत्त हुसळे हे पहिले एकमुखी अध्यक्ष झाले.

त्यानंतर डॉ. अनुपमा उजगरे, डॉ. सुभाष पाटील, डॉ. नाझरेथ मिस्किटा यांच्यासह फादर मायकल जी. हे अध्यक्षही निवडणुकांना सामोरे जाऊन अध्यक्ष झाले. काही अपवाद वगळता संमेलनाध्यक्षांच्या निवडणूका निर्भेळ वातावरणात पार पडल्या होत्या. या निवडणुकांत प्रामाणिकपणे मतदान झाले होते, या निवडणुकांच्या कार्यक्रमात साहित्य परिषदेने महत्वाची भूमिका पार पाडली होती. कॅथॉलिक प्रोटेस्टंट संबंधावर पंथभेदाचे विरजन पडू नये, म्हणून परिषदेने बऱ्याच वेळा सामोपचाराची भूमिका घेऊन निवडणूका पार पाडून योग्य आणि पात्र संमेलनाध्यक्ष ख्रिस्ती साहित्य परिषदेला आणि ख्रिस्ती समाजाला दिले आहेत, हे आम्ही अभिमानाने नमूद करतो.

आतापर्यंत संपन्न झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची अध्यक्षीय भाषणे पाहिल्यास त्यांची सुरुवात प्रासंगिक विषयावर असते आणि पुढे ज्या वेळी इतिहास नमूद करावयाचा असतो, तेव्हा जुन्या भाषणांतील रकानेच्या रकाने शब्दांचा फेरफार करून जसेच्या तसे छापले जातात. त्याच त्याच साहित्यिकांचा पुनउर्ल्लेख येतो. ही भाषणे जेव्हा ख्रिस्तीतेर वाचक वाचतील, तेव्हा ख्रिस्ती समाजात नवीन लेखक निर्माण झाले नाहीत काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर न्नकीच उभा राहत असेल. ही पायओढी ख्रिस्ती समाजाला अधोगतीकडे नेईल, यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

ख्रिस्ती साहित्याला वाचकांची वाणवा

ख्रिस्ती समाजातील मूठभर साहित्यिकांचे चिमूटभर साहित्य, त्यामुळे भरमसाठ वाचक असूनही यांचे साहित्य काय वाचायचे, ही मानसिकता. त्यामुळे ख्रिस्ती लेखकांच्या साहित्याला वाचक नाहीत, जे आहेत ते अगदी फुकटे वाचक आहेत. ख्रिस्ती समाजात निर्माण होणारे साहित्य, नियतकालिके वाचकांना फुकट कशी मिळतील अशी अपेक्षा असते. नियतकालिकांची वर्गणी भरण्याची तसदीदेखील घेतली जात नाही. किंवा नियतकालिकांच्या संपादकांकडूनही हक्काचा वाचक निर्माण व्हावा असा प्रयत्न केला जात नाही.

ख्रिस्ती समाजात वाचकांच्या संख्येची वाणवा नाही, पण वाचकांना हवे तसे साहित्य उपलब्ध होत नाही, हे खरे वास्तव आहे. समाजातील तथाकथित लेखक साहित्यिक यांनी निर्माण केलेले ‘रटाळ साहित्य’ वाचण्याची मानसिकता समाजाच्या वाचकात नाही. मग ख्रिस्तेतर वाचक तरी का वाचतील? ख्रिस्ती साहित्याचा उज्वल इतिहास अभ्यासण्यासाठी बरेच ख्रिस्तेतर लेखक, साहित्यिक, वाचक, अभ्यासक ख्रिस्ती साहित्याचे वाचन करतात, अभ्यास करतात, एवढेच काय ते आशादायक चित्र. बाकी सगळीकडे बोंबाबोंब.

ख्रिस्ती साहित्याचे वाचन व्हावे असे वाटत असेल, तर ख्रिस्ती लेखकांनी आपली लेखनाची शैली बदलणे आवश्यक आहे. केवळ ख्रिस्ती आशयाचे आणि विषयाचे लेखन करणे, या मर्यादेतून बाहेर पडणे गरजेचे आहे.

ख्रिस्ती समाजाची सद्य स्थिती

देशाच्या विविध कानाकोपऱ्यात ख्रिस्ती समाजावर होणाऱ्या हल्यांच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती समाजाचा विचार करू गेल्यास फारच धुसर चित्र डोळ्यासमोर उभे राहते. धर्माच्या नावाखाली अनेक स्वयंघोषित पुढारी, नेते, स्वतंत्र गटांची स्थापना करून स्वत:चा जयजयकार करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपला दुबळेपणा लपवण्यासाठी ख्रिस्ताच्या शिकवणूकीचा आधार घेऊन पळवाट शोधणारा आपला समाज पाहिला की, आमचीच आम्हाला लाज वाटते. ख्रिस्ताने सांगितले ‘जर एखाद्याने तुझ्या उजव्या गालावर मारले तर त्याच्यापुढे आपला डावा गाल कर’ हा एक धागा पकडून आमचे धर्मगुरू, समाजाचे अनभिषिक्त सम्राट समाजावर होणाऱ्या अन्यायाला तोंड देण्याऐवजी संयम राखण्याचे आवाहन करतात. परंतु येरूशलेमातील मंदिरात मांडलेला बाजार उलथून टाकतांना हातात आसूड घेतलेला प्रक्षुब्ध ख्रिस्त आम्ही जाणीवपूर्वक नजरेआड करतो. ख्रिस्ताने तत्कालिन धर्मपुढाऱ्यांसमोर केलेला उभा दावा आमच्या लक्षात बसत नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

येशू ख्रिस्ताने आपल्या संपूर्ण आयुष्यात एकमेकांवर प्रेम करण्याचीच शिकवण दिली, कुणाचीही लुबाडणूक, फसवणूक, पिळवणूक करू नका, असे सांगितले यासाठी विविध उदाहरणे आणि दाखले यांचा वापर त्याने केला. सरतेशेवटी वल्हांडण सणाच्या दिवशी शिष्यांचे पाय धुवून सेवेचा वसा त्याने आपणांस दिला. असे असतांना ढोंगी वृत्तीने आपली धार्मिकता लोकांसमोर आणण्यापेक्षा गोरगरिबांच्या सेवेतून ख्रिस्ताच्या शिकवणुकीची झलक आपल्या कृतीतून दिसली, तर निश्चितच ते स्तुतीस पात्र राहतील, परंतु असे मात्र आढळत नाही. यासाठी आमच्या धार्मिक पुढाऱ्यांनी समाजाला धर्म शिकवण्यापेक्षा धार्मिकता शिकवावी आणि धार्मिकतेचे मूळ ‘प्रेम’ आणि ‘सेवा’ आहे, याचीही जाणीव ठेवून आपल्या कृतीतून धर्म दर्शवावा. धार्मिकता हीच ख्रिस्ती समाजाची शक्ती ठरावी.

दिवस वैऱ्याचे…ख्रिस्ती समाजाच्या ऱ्हासाचे

‘ख्रिस्तशिष्यांचा छळ केला जाईल’ या पवित्र ‘बायबल’च्या भविष्याचा आधार घेऊन सध्या चालू असलेल्या छळाच्या वातावरणाचे समर्थन केले जाते. परंतु धार्मिकतेत कृत्रिमता आणून त्याचा अतिरेक केल्याने ख्रिस्तेतरांचे लक्ष मुद्दाम वेधून घेऊन त्यांना वाकुल्या दाखवण्याचे कार्य ख्रिस्ती समाजाकडून होत आहे.

ठिसूळ झालेली समाजाची एकात्मता, समाजाच्या हिताच्या दृष्टीने घातक ठरणार आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात ख्रिस्ती शिक्षणसंस्था आणि इतर स्वयंसेवी संस्थांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असल्याचे कोणीही नाकबूल करणार नाही. ख्रिस्ती शिक्षणसंस्थांची व ख्रिस्ती विद्यार्थ्यांची गुणवत्ता यांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या अत्यंत कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. ख्रिस्ती समाजातील आपमतलबी लोकांनी अशा संस्था आपल्या ताब्यात ठेवल्याने चरकात पिळल्याने चोथा झालेल्या उसासारखी ख्रिस्ती संस्थांची स्थिती झाली आहे. देवाच्या क्रोधाला वाट करून देण्यापेक्षा ख्रिस्ती समाजाने अधिक सुज्ञपणे परिस्थितीचा अभ्यास करून सावधपणे पावले उचलून कठीण परिस्थितीचा सामना केला पाहिजे. परमेश्वर आपणासोबत आहेच.

दलित ख्रिस्ती चळवळ

अलीकडच्या काही दशकांत ‘दलित ख्रिस्ती चळवळ’ अस्तित्वात आली. खेड्यातील अस्पृश्य, दलित गणले गेलेल्या लोकांना त्यांचा दर्जा परत मिळवून देण्याच्या उद्देशाने ही चळवळ मूळ धरू लागली. महाराष्ट्रात रेव्ह.डॉ. अरविंद निर्मळ यांनी या चळवळीचा पाया घातला. आपला विचार रुजावा, फोफवावा, दबलेले लोक जागृत व्हावेत म्हणून त्यांनी विविध प्रयत्न केले. चळवळीसाठी पैसा उभा केला. कार्यकर्त्यांची फळी उभी केली. सुरुवातीची काही वर्षे निर्मळांच्या नेतृत्वामुळे ही चळवळ जीव धरून होती. पुढे डॉ. निर्मळ ख्रिस्तवासी झाले, चळवळ खंडीत झाली.

मुळात दलित नसलेले आमचे लोक आहेत, कानामागून आलेल्या सवर्णांनी दलितत्व, अस्पृश्यता आमच्यावर लादलेली आहे. आमच्या असहायतेचा फायदा उठवत आम्हाला त्यांनी दास्यात ठेवले आहे. आणि त्यांचीच री ओढत, स्वतःला पुन्हा पुन्हा दलित म्हणवून घेत ही चळवळ पुढे रेटायचा प्रयत्न चालू आहे. ख्रिस्ती मिशनरींच्या आधाराने शिक्षण, आत्मसन्मान लाभलेले आणि आत्मभान लाभलेल्या लोकांनी या चळवळीला मान्यता दिली नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत ही चळवळ खुजी, खुरटी राहिली. याविषयीचे आत्मपरीक्षण या चळवळीतील कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे. अस्पृश्य नसताना दुसरे म्हणतात, वागवतात म्हणून किती दिवस स्वतःला ‘दलित’ म्हणवून घेणार आहोत आपण? आम्हाला केव्हा आत्मभान येणार? मिशनरींनी केलेले संस्कार, आम्ही विसरून गेलो की काय? मिशनरींच्या प्रेरणेने स्वीकारलेल्या ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीचा आम्हाला विसर पडला की काय? राजांचा राजा, प्रभुंचा प्रभू असलेल्या ख्रिस्ताच्या प्रजेने स्वतःला अस्पृश्य, दलित म्हणून स्वत:ला हिनवून घ्यायचे, ही शरमेची बाब आहे.

या चळवळीतील कार्यकर्ते वारंवार वास्तवतेचा टाहो फोडतात, खेड्यातील वास्तवता दाहक आहे, अजूनही सवर्ण आम्हाला आमचा दर्जा देत नाहीत. या वास्तवतेला खरे पाहिल्यास आम्हीच जबाबदार आहोत. सवर्णांप्रमाणेच आम्हीच आम्हाला वारंवार दलित म्हणवून घेतल्याने ‘दलितत्व’ जाण्याऐवजी टिकून राहत आहे, ही खरी वास्तवता आहे. कोणतीही गोष्ट वारंवार घोकल्याने ती सत्य वाटू लागते, या नियमानुसार आम्ही दलित नसतांना, अस्पृश्य नसतानादेखील दुसरे म्हणतात\गणतात, म्हणून आम्ही स्वतःला दलित म्हणवून घ्यायचे, यात पुरुषार्थ नाही. ‘दलित ख्रिस्ती चळवळ’ दलितत्व घालवण्यासाठी आहे की, टिकवण्यासाठी, असा विरोधाभास जाणवतो… हे या चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांने आत्मपरीक्षण केल्यास निश्चितच पटेल.

ख्रिस्ती समाजाची राजकीय भूमिका

भारतातील ख्रिस्ती समाज हा लोकसंख्येच्या प्रमाणात सामान्यतः २.४ टक्के इतकाच आहे. भारतीय ख्रिस्ती समाजाची आजची स्थिती फारच उदासीन आहे. मिशनरींच्या सामान्य ख्रिस्ती माणसाला ख्रिस्ती संस्थांकडून धान्य, दूध वा इतर पौष्टिक अन्न पदार्थ मिळत असत. त्याचबरोबर मिशनरी संस्थांनी आरोग्य सेवा, शैक्षणिक सेवा आणि इतर सामाजिक सेवांचे जाळे थेट ग्रामीण भागात पोहचवल्यामुळे ख्रिस्ती समाजाला स्वतःची ओळख निर्माण झाली होती.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

स्वातंत्र्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. या बदलत्या परिस्थितीला रोखण्यासाठी ख्रिस्ती समाजाकडे राजकीय नेतृत्व नव्हते. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम सामान्य ख्रिश्चन जनतेला लवकर समजलेच नाहीत. मुळातच बहुसंख्य धर्मांतरीत ख्रिस्ती समाजाची आर्थिक स्थिती कमकुवत होती. स्वातंत्र्यानंतर आणि आजही ख्रिस्ती संस्थावर सरकारकडून आर्थिक निर्बंध लादण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे संस्था अडचणीत येऊ लागल्या. ख्रिस्ती तरुणांसाठी नोकऱ्यांची विवंचना निर्माण झाली. ख्रिस्ती तरुणांनी व्यवसाय करावा म्हटले तर, व्यवसायासाठी लागणारे भांडवल आणावे कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. ख्रिस्ती समाजाची अशी अवस्था दूर करण्यासाठी राजकीय नेतृत्वाची आवश्यकता आहे, हे प्रकर्षाने जाणवू लागले. राजकीय नेतृत्व जर लाभले, तर समाजाला आपले प्रश्न सोडवणे सहज शक्य होईल. सरकारने मुस्लीम समाजाचा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमला, यामुळे मुस्लीम समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. परंतु ख्रिस्ती समाजाची बाजू मांडणारे कुणीच नव्हते. या समाजाकडे सक्षम नेतृत्व तर नव्हतेच, परंतु सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातही आपले म्हणावे, असे कुणी नव्हते. यामुळे या समाजाची स्थिती ‘आई जेवू घालीना व बाप भीक मागू देईना’ अशी झाली आहे.

धार्मिक पातळीवर या समाजाकडे नेतृत्वाची रास पडली आहे. या नेतृत्वाला समाजाच्या प्रश्नांची जाणीव असूनही ते सोडवण्यास ते लायक ठरले नाहीत. या समाजाच्या विकासासाठी आध्यात्मिक विकास जेवढा महत्वाचा आहे, तेवढेच राजकीय नेतृत्वही महत्त्वाचे आहे. आज ख्रिस्ती समाजाला समर्पित नेतृत्वाची गरज आहे. आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो याची जाणीव असणे गरजेचे आहे. त्यासाठी खंबीर राजकीय नेतृत्वाची गरज आहे. निरनिराळ्या राजकीय पक्षात ख्रिस्ती नेते कार्यरत आहेत, परंतु पक्षश्रेष्ठींसमोर ते नांग्या टाकतात. समाजाची बाजू पटलावर मांडत नाहीत. परिणामी ख्रिस्ती समाज विकासापासून कोसभर दूरदूरच राहिला आहे. ख्रिस्ती समाजाचा दबाव गट निर्माण करण्यात ख्रिस्ती समाज मागे आहे. लोकशाही पद्धतीत सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी, राजकीय नेतृत्व हवेच हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना राजकीय पक्ष आणि नेतृत्व दिले. राजकीय नेतृत्व ही सामाजिक विकासाची एक किल्ली आहे. समाजातून असे नेतृत्व उभे राहत असेल किंवा घडत असेल तर त्यामागे आम्ही एक दिलाने उभे राहिले पाहिजे. त्यातूनच सामाजिक विकास साधला जाईल.

मराठी भाषेला समृद्ध करणारी साहित्य संमेलने

समाज जागृतीच्या बाबतीत ‘ज्ञानोदय’ने उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजाच्या सद्यस्थितीचे वर्णन करून, अनावश्यक घटकांचे समाजातून उच्चाटन करणे आणि समाज जागृती साधणे, हे अंगच आजच्या ख्रिस्ती नियतकालिकांत दिसून येत नाही. विशेषतः ख्रिस्ती समाज आज ज्या अवस्थेतून जात आहे, त्यासंदर्भात ख्रिस्ती मासिके बरेच काही करू शकतात. काही वर्षांपूर्वी एक उल्लेखनीय गोष्ट घडली आहे ती म्हणजे नारायण वामन टिळकाच्या बाप्तिस्म्याला शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षांपूर्वी टिळकांनी महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्माची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे साहित्यातील स्थान आम्हाला आदरणीय आहे, त्यांच्या ख्रिस्तप्रेमाबद्दलही शंका घेण्यास अजिबात वाव नाही. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी ख्रिस्ती समाजाला दिलेल्या ‘उपासना गीतां’बद्दल तमाम ख्रिस्ती बांधव त्यांचे ॠणी आहेत. या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून साहित्यिक म्हणून आम्ही असे सूचित करू इच्छितो की, पाठ्यपुस्तकातून गाळण्यात आलेल्या टिळकांच्या साहित्यकृती पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेने आणि ख्रिस्ती साहित्यिकांनी संयुक्त प्रयत्न करावेत.

ख्रिस्ती साहित्य संमेलनाची वेगळी चूल कशाला, हा नेहमीच उगवणारा प्रश्न. परंतु आम्हाला तसे वाटत नाही. ख्रिस्ती साहित्य संमेलने ही ख्रिस्ती समाजाची अस्मिता आहे. ख्रिस्ती साहित्य संमेलनात ख्रिस्ती आणि साहित्य हा शब्दांची फारकत करून केवळ साहित्य या शब्दाला महत्त्वाचे मानून आपली खिस्ती अस्मिता आम्ही का सोडावी?

साहित्य संमेलनाचे १९७२ला पुनरुज्जीवन झाले. यावेळी ख्रिस्ती साहित्यिकांचा हेतू लक्षात घेण्याची गरज आहे. साहित्य संमेलनास मिळत असलेल्या लोकांच्या अत्यल्प प्रतिसादावरून संमेलनाच्या आयोजकांनी आणि साहित्य परिषदेनही काही बोध घेणे गरजेचे आहे. ख्रिस्ती साहित्य संमेलने साधारण अडीच ते तीन वर्षातून एकदा भरतात. दरम्यानच्या काळात संमेलनाध्यक्षांनी साहित्य संमेलन न भरवता ख्रिस्ती साहित्यिकांचे मेळावे भरवावेत, अशी सूचना आम्हाला करावीशी वाटते. यामुळे अनेक नवे साहित्यिक एकमेकांना ओळखू लागतील, परिषदेची ताकद वाढेल परिणामी संमेलनातील साहित्यिकांची उपस्थिती वाढेल. साहित्य संमेलनातून, आलेल्या साहित्यिकांला आणि साहित्य रसिकाला प्रेरक विचार मिळणे, हाच साहित्य संमेलनाचा मुख्य हेतू असावा. यामुळे नवनवे साहित्यिक परिषदेकडे आकर्षित होतील, अशी आमची सूचना आहे.

ख्रिस्ती साहित्य परिषदेंसमोरील आव्हाने

शतकाहून मोठा इतिहास असलेल्या ख्रिस्ती परिषदेने आतापर्यंत केवळ २५ साहित्य संमेलने भरवली आहेत. ही अनियमितता का? यामागे जर पैशाचा प्रश्न असेल तर परिषदेची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल, याकडे सजग दृष्टीने पाहणे व त्यासाठी सक्रीय काम करणे, हे परिषदेपुढील महत्त्वाचे आव्हान आहे.

ख्रिस्ती साहित्य परिषदेशी संबंधित असलेले व नसलेले अनेक ख्रिस्ती साहित्यिक समाजात वावरत आहेत. ते परस्परांशी परिचित आहेत, परंतु ते मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेत सक्रीय नाहीत. त्याची निरनिराळी कारणे आहेत. या कारणांचा शोध घेऊन अशा साहित्यिकांना परिषेदत सामावून घेऊन त्यांना सक्रीय करण्याचे आव्हान परिषदेसमोर आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

हल्लीची ख्रिस्ती समाजाची स्थिती पाहिली तर ख्रिस्ती समाज हा भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. ठिकठिकाणी ख्रिस्ती चर्चेसवर, संस्थांवर, समाजावर हल्ले होत आहेत. काही शक्ती समाजाचा द्वेष करत आहेत. हिंदू देवस्थानात करोडो रुपये दानपात्रात जमा होत असतात. परंतु ख्रिस्ती चर्चेसमध्ये दर रविवारी जमा होण्याऱ्या दानावर जीएसटी कर घेण्याचे या शक्तींनी ठरवले आहे. असे अन्याययकारक निर्णय घेतले जातात, परंतु ख्रिस्ती समाजाकडून कोणताही आक्षेप घेतला जात नाही.

ख्रिस्ती समाजाची नियतकालिके मूग गिळून गप्प आहेत. तर काही आध्यात्मिक प्रचारात धन्यता मानून गप्प राहतात. ख्रिस्ती समाजात समाजाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी अभ्यासू प्रव्कते नाहीत. किंवा सक्षम राजकीय नेतृत्वही नाही. हेही या समाजासमोरील आव्हान आहे.

सामाजिक प्रश्न म्हणून मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेने सर्व थरातील ख्रिस्ती साहित्यिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न केला तर समाजाकडून काही उणेदुणे ऐकावे लागेल, परंतु एक चांगले काम केल्याचे समाधान परिषेदेला मिळेल, यात तीळमात्र शंका नाही.

समाजातील काहींना मिशनरींची साथ मिळाली, त्यांनी शिक्षण घेतले आणि कामाच्या ठिकाणी मोठ्या हुद्द्याच्या जागा मिळवल्या. काहींनी डॉक्टर, वकील, इंजिनिअर इत्यादी व्यावसायिक शिक्षण घेऊन त्या त्या व्यवसायात स्थिरावले. या सर्वांचे राहणीमान व आर्थिक स्तर उंचावला. अशा लोकांमुळे समाजात मोठी दरी निर्माण झाली. अशा लोकांना आपल्या मूळ गावी जाण्याचीही लाज वाटते. कारण मूळ गावी गेल्यास तेथे जातीशी प्रत्यक्ष सामना करावा लागतो. मग तुमच्याकडे कितीका पैसा असेना. तुम्ही कोणत्या का हुद्द्यावर काम करत असेना. अशा पांढरपेशा समाजाला त्यांच्या स्वत्वाची जाणीव करून देण्याचे आव्हान परिषदेसमोर आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......