‘लाल सावट’ : ग्रामजीवनाची उलघाल चितारणाऱ्या, काळीज पिळवटून टाकणाऱ्या जळजळीत कथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अशोक कौतिक कोळी
  • ‘लाल सावट’ या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 05 November 2022
  • ग्रंथनामा शिफारस लाल सावट Lal Sawat सुभाष किन्होळकर Subhash Kinholkar

सुभाष किन्होळकर यांनी कथा-कादंबरीकार म्हणून मराठी साहित्यविश्वात आपली नाममुद्रा ठळकपणे उमटवलेली आहे. ‘झळ’, ‘यब्बो’ या कादंबऱ्या; ‘मशाल’, ‘रानमेवा’ हे कवितासंग्रह;  ‘गगनगंध’ हा कथासंग्रह आणि काही बालसाहित्याची पुस्तकंही त्यांच्या नावावर आहेत. सुमारे डझनभर ग्रंथसंपदा नावावर असलेला हा लेखक मात्र तसा अलिप्तच आहे. प्रसिद्धीपासून चार हात दूर आहे. त्याचे कारण त्यांचा संकोची स्वभाव आणि रहिवासाचे आडवळणाचे गाव. बुलढाणा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील अजिंठा डोंगर तळाशी असलेल्या अगदीच दुर्गम म्हणता येईल अशा किन्होळा या छोट्याशा गावात ते राहतात. पूर्व खानदेशाला लागून असलेला हा परिसर रितीभाती आणि नातीगोती यांमुळे खानदेश आणि विदर्भ यांच्याशी एकजीव झालेला आहे

लेखक किन्होळा शेती करतात आणि जवळ असलेल्या धामणगाव बढे या गावी विद्यार्थ्यांची शिकवणी घेतात. ते उच्चशिक्षित आहेत. खेड्यापाड्यांतून मोठ्या उमेदीने उच्चशिक्षण घेऊन नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या पिढीतील इतर अनेक तरुणांसारखीच या लेखकाच्या पदरीही उपेक्षा आली; परंतु निराशेने खचून न जाता त्यांनी शेतीचा व स्वयंउद्योगाचा मार्ग निवडला. त्यामुळे ग्रामीण भागाशी व तेथील भौगोलिक संस्कृतीशी त्यांची नाळ कायम राहिली. नोकरी पेशात आलेली उपेक्षा व आतबट्यातील शेती व्यवसाय, यातील अनुभवांमुळे मुळात संवेदनशील असलेल्या लेखकाचे मन भावनांनी उचंबळून आले आणि ते लिहिते झाले.

स्वतःसह आपल्या भवतालाला आकळत गावखेड्यातील माणसं, समस्या, व्यथा वेदना, निसर्ग, गायवासरांसह मांडू लागले… यातूनच ‘शिक्षणसेवक कृष्णा डोळसे’सारखी कादंबरी आकाराला आली. पुण्याच्या कॉन्टिनेन्टलसारख्या प्रतिथयश प्रकाशन संस्थेने ही कादंबरी प्रकाशित केली. तेव्हापासून आपले दु:ख, वेदना अक्षरबद्ध करण्याचा सपाटाच या लेखकाने लावला. त्यातून अनेक साहित्यकृती आकाराला आल्या. तरीही हा लेखक काहीसा अलक्षितच राहिला.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक  : ‘मोदी महाभारत’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पण जाणकारांचे लक्ष स्वतःकडे  खेचून  घेण्यात किन्होळकर यशस्वी ठरले आहेत. अशा या बहुगुणी लेखकाचा ‘लाल सावट’ हा ग्रामजीवनाचा वेध घेणारा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.  या संग्रहातून त्यांनी आपल्या जगण्याला वेढून असलेल्या विविध अनुभवांना शब्दरूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. स्वतःसह आपल्या परिसरातील व परिघातील शेती क्षेत्रातले हे अनुभव आहेत. या लेखकाची विलक्षणता व प्रामाणिकता एवढी आहे की, सारा परिसर व देखावा चित्रमय पद्धतीने जिवंत होतो. गोष्ट सांगण्याची पद्धत अनोखी आहे. त्यात नादमयता आहे, नाट्यही आहे. हुबेहूब वातावरण निर्मिती ते करत जातात, सोबतच पात्रांची लकबही ठसठशीत करतात. पात्रांच्या तोंडचे संवाद भाषेची उभारणी करत जातात. या परिसरात बोलली जाणारी तावडी बोली लेखकाने चांगलीच आत्मसात केलेली आहे. तिचीच पेरणी ‘लाल सावट’च्या पानोपानी आढळते. हे या कथासंग्रहाचे खास वैशिष्ट्ये आहे.

या संग्रहातील सर्वच कथा वाचनीय आहेत. त्या वर्तमान ग्रामवास्तव व शेतशिवाराशी संबंधित आहेत. शेतकरी, शेतमजूर व कारागीर, आलुतेदार-बलुतेदार यांनी मिळून बनलेला गावगाडा आता पुरता बदलून गेलेला आहे. उपासमार, बेरोजगारी, अपयश, अवहेलना, हेटाळणी, फसवेगिरी, राजकारण, शासन-प्रशासनाकडून होणारी अडवणूक, सावकारी, सरंजामदारी, दादागिरी या सगळ्यांनी गावगाडा वेढून टाकलेला आहे. शोषणाची पारंपरिक व आधुनिक रूप त्यात ठाण मांडून आहेत. गरीब-श्रीमंत दरी वाढतच आहे. त्यातून आलेलं तुटलेपण, विविध ताणतणाव या सगळ्यांची मांडामांड या कथा करतात.

‘ठणकतळ’ ही या संग्रहातील पहिलीच कथा, गावगाड्यातील सुष्ट आणि दुष्ट प्रवृतींचे स्पष्ट दर्शन घडवते. गावगाड्यातील गरीब-श्रीमंत हा संघर्ष पूर्वापार आहे. त्याला जातीयता व वर्गसंघर्षाचीही झालर आहे. मुख्यत्वे शेतकरी-शेतमजूर असा हा संघर्ष आहे. अनेक सरंजामी शेतकऱ्यांना नेहमीच असे वाटत आले आहे की, आम्ही आहोत म्हणून मजूर आहेत. आमच्या शेतीवर राबतात म्हणून मजुरांची पोटं भरतात, घरं चालतात. त्यातून उद्भवणाऱ्या संघर्षाची अचूक आणि कलात्मक मांडणी लेखकाने या कथेतून केलेली आहे. यातील रामोजी मरतुकड्यासारखे अनेक रगेल बडे आसामीदार शेतकरी गावागावात भेटतात. असय्य हतबल कमजोर मजुरांवर असूरी आसूड चालवणाऱ्या अशा मुजोर सरंजामदार सावकार शेतकऱ्यांच्या विकृत मनोवृत्तीचा बुरखा फाडण्याचे काम, या कथेत लेखकाने केलेले आहे. गोविंदा आणि सोयरा यांच्या जीवनसंघर्षातून ही कथा फुलत जाते आणि रामोजीची मुजोरी उतरवते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

गावखेड्यातला मध्यम, अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्याची जास्त मरणूक-अडवणूक असते. एकतर अपुरे ज्ञान, त्यात परिस्थिती लाचार. त्यामुळे यंत्रणांकडून तो जास्तच नाडवला जातो. मोठे शेतकरी आपल्या लाग्याबांध्याच्या जोरावर आपली कामं करून घेतात. अडते, दलाल, अधिकारी-पदाधिकारी त्यांच्यासाठी पायघड्या पसरवतात, पण हा अनुभव मध्यम शेतकऱ्यांना येत नाही. त्यांची जागोजागी कशी अडवणूक होते, याचे वर्णन ‘आगडोंब’ या कथेत आहे.

या कथेत मला कादंबरीचा आवाका जाणवला. अगदी तपशीलवार वर्णन, बारीकसारीक निरीक्षण व चित्रदर्शी शैली, यामुळे मला ही कथा फारच आवडली. यातील पात्रं बोलकी आहेत. त्यांचा वावर आपल्या आसपासच असल्याचा भास होतो. सोबतच परिसर, गावखेडी प्रत्यक्ष फिरून आल्याचा भास होतो. किन्होळा गावचे श्रीरंग आणि अभिराम हे दोन अल्पभूधारक शेतकरी मलकापूरच्या बाजार समितीत तुरी विकायला घेऊन जातात. तेथे अडते, दलाल, व्यापारी हातमिळवणी करून कसे शेतकऱ्यांना नाडतात, याचे सविस्तर वर्णन लेखकाने या कथेत केलेले आहे.

या शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी करावी लागणारी कसरत, बाजारभाव मिळावा म्हणून करावे लागणारे कसोशीचे प्रयत्न, त्यासाठी वाट पाहणे, शेतमाल साठवून ठेवणे इत्यादी प्रयत्नांची कसोशी,  याचे तपशीलवार वर्णन या कथेत येते. जणू आपण स्वतःच हा अनुभव घेत आहोत, याचा भास होतो.

या परिसरातील मलकापूर येथील कृषीमालाची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. तेथील व्यवहार कसे चालतात, याची प्रत्येक अनुभूती वाचकाला मिळते. शेतमालाची विक्री कशी होते, शेतमाल बाजार समितीपर्यंत पोहचवण्यासाठी करावी लागणारी कसरत, ज्या वाढलेल्या भावाच्या अपेक्षेने माल बाजारात नेला जातो, ती अपेक्षा कशी फोल ठरते, शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्यासाठी साखळी कशी कार्यरत असते, याचे तपशीलवार वर्णन ही कथा करते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

“आरे सकाळ पासून आमच्या पोटात भाकरीचा तुकडा नही. चहाले बी तोंड लावेल नही. पाण्याचा एक घोट नही गिवला. आता व्हईन हार्रासि ताव्हा व्हईन हार्रासि… नुस्ते डोये चालले हार्रासि साठी… बोलता बोलता श्रीरंगचा चेहरा लालभडक पडला होता. जशी काही पळसाचि फुलत त्याच्या चेहऱ्यावर फुललि होति. अन् हामाल आझूनच त्यावर आग पाखडत होता,” अशी भाषेची नजाकत येथे अनुभवायला मिळते. सोबतच शेतकऱ्यांच्या मनातील भावनांचा आगडोंब मनाला होरपळून काढतो.

शेतकरी नेहमीच अस्मानी-सुलतानी संकटात भरडला जातो. कधी तो व्यवस्थेकडून लुबाडला जातो, तर कधी निसर्गाकडून नागवला जातो. ज्या निसर्गाच्या भरवशावर त्याच्या आशा-आकांक्षा एकवटलेल्या असतात, त्याच्याकडून जेव्हा दगाफटका होतो, तेव्हा शेतकऱ्याची अवस्था केविलवाणी होते. ‘लाल सावट’ या कथेतून अशाच अपेक्षाभंग झालेल्या शेतकऱ्याची अवस्था लेखकाने रेखाटली आहे.

या कथेचा नायक मुकुंदा मोरे हा अल्पभूधारक शेतकरी आहे. अर्थातच तो कोरडवाहू शेती करतो. खूप खूप मेहनत करतो. शेतारानावर त्याचा अपार जीव आहे. शेतीची अशी काही मेहनत करतो की, इतर सगळे त्याच्याकडे नवलाईने बघतात. सगळ्यांना त्याचा हेवा वाटतो. मुकुंदा शेतात कापूस लावतो. खूप मेहनत करून वावर फुलवतो. शिवारात त्याची कपाशी तरारून, फुलारून, फुलपात्यांनी लदबदून जाते. तशीच त्याची लेक चंद्रा, गावात एक नंबर सुंदर. चंद्रा लग्नाला आलेली. फुलपात्यांनी लदबदलेल्या कपाशीकडे पाहून मुकुंदा चंद्राच्या लग्नाचे स्वप्न पाहू लागतो, पण त्याच्या या स्वप्नाची कशी राखरांगोळी होते, त्याचे करुणामय वर्णन ही कथा करते.

ज्येष्ठ ग्रामीण कथा लेखक भास्कर चंदनशिव यांच्या ‘लाल चिखल’ या प्रसिद्ध कथेची आठवण व्हावी एवढी ही कथा सरस झालेली आहे. ग्रामीण जीवन आणि तेथील माणसाची चाललेली जगण्याची धडपड लेखकाने मोठ्या शिताफीने रेखाटली आहे. पावसापाण्याची वाट पाहणारे शेतकरी, राबराब राबणारे कष्टकरी, त्यांच्या छोट्या छोट्या अपेक्षा, त्यांचा होणारा अपेक्षाभंग, उपेक्षा लेखक कलात्मकतेने रेखाटत जातो.

ग्रामीण भागात शिक्षणाची सोय असतेच असे नाही, तरी पण आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावे, असे कष्टकरी पालकांनाही वाटत असते. त्यांच्याही काही अपेक्षा असतात, पण त्या पूर्ण होतातच असे नाही. जशी शेतीमध्ये त्यांची फसगत होते किंवा हंगाम चांगला येतो, तशीच काहीशी अवस्था मुलांच्या बाबतीत घडल्याचे दिसून येते. तशा परस्परविरोधी आशयाच्या दोन कथा या संग्रहात आहेत- ‘देवमाणूस’ आणि ‘पापणभिज’.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

यातील ‘देवमाणूस’ कथेतील सदाशिव नवलाखे या शेतकऱ्याचा मुलगा नंदकिशोर हा प्रसंगी बैलाची जागा घेतो आणि बापाला पेरणी करू लागतो. बापासोबतच तो स्वतःला शेतीमातीत गाडून घेतो. या उलट परिस्थिती ‘पापणभिज’ कथेतील सुधाच्या मुलाची आहे. सुधा मोठ्या अपेक्षेने मुलगा देवलालला शिकवते. कर्ज काढून उच्चशिक्षणासाठी पुण्याला पाठवते, पण हा मुलगा आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. ग्रामीण भागातील हेसुद्धा एक वास्तव आहे. तरुण पिढी आईबापांना समजून घेत नाही. त्यातून नवेच प्रश्न तयार होत आहेत, ताणतणाव वाढीस लागत आहेत. अंतर्गत कलह, अपेक्षाभंग, उपेक्षा वाढत जाऊन नैराश्यात रूपांतर होत आहे. परिणामी आत्मक्लेशाच्या खाईत महाराष्ट्र ढकलला जात आहे. त्यातून शेतकरी आत्महत्यांची मालिका उभि  ठाकत आहे.

या संग्रहातील ‘गुलमोहर’, ‘जीवनछटा’ आणि ‘नातं’ या कथा नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या आहेत. ग्रामीण जीवन हे सुखदु:खाने भरलेले आहे. येथील माणसं एकमेकांवर जीव ओवाळून प्रेम करतात. विशेषतः आपली नाती व कर्तव्य कुणी फारसं विसरत नाही. काळ कितीही बदलला तरी ग्रामीण मातीतला मायेचा ओलावा अजून जिवंत आहे, हे सांगणाऱ्या या कथा आहेत.

‘गुलमोहर’ या कथेतला बिघडलेला जावई सुधारत ताळ्यावर येतो, तेव्हा सपनाच्या डोळयातही गुलमोहर खुलून येतो. ‘जीवनछटा’मधील गोदा आजी आणि ‘नातं’मधील राधाक्का यांच्या व्यक्तिरेखा फारच गडद झालेल्या आहेत. दोन्हीही आपल्या कर्तव्याप्रति सजग आहेत. वय झालेलं असलं तरी आपला स्वाभिमानी व करारी बाणा त्यांनी शाबूत ठेवलेला आहे. ग्रामीण जीवनाची हीच खरी खुमारी आहे.

लेखकाने फार कसोशीने हे लेखन केलेले आहे. त्यांची या लेखनामागे निश्चित अशी भूमिका आहे. केवळ आत्मप्रौढीसाठी हा प्रपंच केलेला नाही, तर एका आंतरिक ऊर्मीतून मांडले आहे. म्हणून या लेखकाचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

‘लाल सावट’ -  सुभाष किन्होळकर

क्लेव्हर फाक्स प्रकाशन, चेन्नई

मूल्य - १२८,

मूल्य – १९९ रुपये.

.............................................................................................................................................

लेखक अशोक कौतिक कोळी कथा-कादंबरीकार आहेत.

ashokkautikkoli@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......