‘ते पन्नास दिवस’ : मानवी जीवनातल्या आशा-निराशा, सुखदुःख, अहं, ईर्ष्या, अपमान, अवहेलना अशा चढ-उतारांचं मनोज्ञ दर्शन घडवत ही कादंबरी आपल्यालाही एका प्रवासाला घेऊन जाते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नितीन साळुंखे
  • ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 05 November 2022
  • ग्रंथनामा शिफारस ते पन्नास दिवस Te Pannas Divas पवन भगत Pavan Bhagat करोना Corona करोना व्हायरस Corona Virus कोविड 19 Covid 19

करोना काळातल्या निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित संकटात अक्षरशः लक्षावधी लोक होरपळून निघाले, भरडले-चिरडले गेले. आपल्या गावात, जिल्ह्यात, राज्यात काम मिळत नाही, म्हणून पोटासाठी अन्य राज्यात जावं लागलेल्यांना आणि आजार, नोकरी, गाठीभेटी अशा निरनिराळ्या कामांसाठी घरापासून दूर जावं लागलेल्या प्रत्येकाला आहे तिथं थांबणं शक्य नव्हतं. पैसे असले तरी प्रवासासाठी साधनं उपलब्ध नव्हती. चालत जावं तर खायला अन्न नाही, अशा विचित्र, अमानुष कोंडीत लाखो लोक त्यांचा काही दोष नसताना सापडले. त्या होरपळीची ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी आहे, महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारशा या गावचे कवी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांची.

गोष्ट अर्थातच खरी घडलेली, पण प्रातिनिधिक. तिला पार्श्वभूमी आहे करोना काळातल्या अचानक जाहीर केलेल्या कठोर टाळेबंदीची आणि तिच्या अमानवी अंमलबजावणीची... लाखो लोकांना हजारो किलोमीटर चालत जावं लागल्यामुळे त्यांच्या झालेल्या परवडीची… शासनकर्त्यांच्या, प्रशासनाच्या आणि त्यावेळी स्वतःच्या घरात सुखनैव बसलेल्या लोकांच्या संवेदनहीनतेची.

पण हे केवळ एक निमित्त आहे. करोना काळात शासन-प्रशासनाने दिलेल्या त्रासाचे विशेष कौतुक या देशातल्या कोट्यवधी माणसांना असण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्यासाठी ती आणखी एक, जरा जास्तच लांबलेली त्रासदायक रात्र आहे… एखाद्या दु:स्वप्नासारखी. लेखकाला त्या कालखंडाच्या निमित्ताने गोष्ट सांगायचीय. ती आहे आपल्या समाजातल्या जुन्या दुखण्यांची. धर्म, जात, आर्थिक परिस्थिती असे न जाणो कितीएक घेट्टो बनवून लोक पिढ्यानपिढ्या आपापल्या कोषांमध्ये मरत- सडत- जगत राहतात. त्यांच्या या घेट्टोंना खिडक्या नसतात आणि त्यांच्या मनालाही. त्यामुळे आपल्याशिवाय आणखीही माणसं आपल्या आजूबाजूला राहतात, याची त्यांना जाणीवच नसते. आणि यदाकदाचित चुकून ती झालीच, तर मात्र त्यांचे सहृदय माणसात रूपांतर होते, हा आशावाद जागवणारी ही कादंबरी आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक  : ‘मोदी महाभारत’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या कादंबरीचे दृश्य खलनायक आहेत - अचानक लादलेली टाळेबंदी, तिची निर्घृणपणे अंमलबजावणी करणारे प्रशासन आणि रस्त्यावरून हजारो किलोमीटर चालत निघालेले लक्षावधी लोक हे आपण राहतो त्या समाजाचाच एक भाग आहेत, याचं भान नसलेले, आपापल्या घरात सुरक्षित बसलेले लोक, आणि त्यांच्या असहायतेचा फायदा उचलणारे दुकानदार, व्यापारी.

मात्र कादंबरीकाराच्या दृष्टीतून खरे खलनायक आहेत- जात, धर्म, त्यातल्या निरर्थक कालबाह्य चालीरिती यांना माणसापेक्षा जास्त महत्त्व देणारी मानसिकता. भेदाभेदाच्या, उच्चनीचतेच्या धारणा, ‘आम्ही’ आणि ‘तुम्ही’, ‘आपण’ आणि ‘ते’ यातल्या अभेद्य भिंती. थोडक्यात, एकंदर सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था.

सहनायक आहेत मार्क्स, फुले, आंबेडकर, शाहू, कबीर, दुष्यंतकुमार, वामनदादा कर्डक, निदा फ़ाजली, वीरू सोनकर अंजुमन शर्मा, राहत इंदोरी, बाल गंगाधर त्यागी, अनुराग अनंत, बाबा नागार्जुन, मार्टिन ल्युथर किंग, धुमिल, भिखारी ठाकूर, राहुल संकृत्यायन असे शोषितांचं दुःख शब्दबद्ध करणारे मान्यवर साहित्यिक, नेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते.

या गोष्टीत नायक कोणी नाही. चार प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. समाजातल्या प्रमुख चार वर्गांचे प्रतिनिधी. ते आपापल्या धारणा, अहं, चालीरिती यांचं आयुष्यभर वाहत आणलेलं बोजड ओझं डोक्यावर आणि डोक्यात घेऊन टाळेबंदीच्या काळातल्या सक्तीच्या चालण्याला सुरुवात करताना नाईलाजानं एकत्र येतात. पन्नास दिवसांच्या चालण्याचा त्यांचा हा प्रवास आहे- त्यांच्या डोक्यावरचं ते ओझं गळून जाऊन, त्यांचा माणसाच्या मूळ रूपाकडे परत येतानाचा.

या चारमधील पहिली व्यक्तिरेखा कांदबरीच्या सुरुवातीलाच भेटते- रामस्वरूप मौर्य. ‘नाही रे’ वर्गाचा, सामाजिकदृष्ट्या मागास मानल्या गेलेल्या शूद्र समूहाचा प्रतिनिधी. मिळेल ते काम करून रोजच्या जेवणाची सोय होईल का, याच्या सततच्या विवंचनेत असलेला मजूर. मुंबईतल्या मडकेबुवा चौकात मजुरी शोधणारा. दुसऱ्यांच्या शेतांवर मजुरी करून आईने एकटीने वाढवलेला मुलगा.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

हा बनारस हिंदू विद्यापीठामध्ये इतिहासात एमए करत असतो. हा संत कबिरांचा निस्सीम चाहता आईला मदत व्हावी म्हणून आणि शिकत असतानाचा स्वतःचा खर्च भागवण्याची तरतूद व्हावी म्हणून, कामाच्या शोधात मुंबईत आलेला असतो. त्याच्या घरात, म्हणजे मुंबईतल्या खुराड्यासारख्या खोलीत चटई, एक ताट-वाटी, ग्लास, लोटा आणि चादर असते. शिवाय आईनं दिलेला लोणच्याचा डबा, सुक्या मटणाची पोटली आणि गूळ-शेंगदाण्याच्या सुक्या पोळ्या एवढाच ऐवज. सकाळी बाहेर पडल्यावर रस्त्यावरच्या गाडीवर दोन वडापाव किंवा डबल आमलेट पाव हेच त्याचे जेवण.

एक दिवस सकाळी उठून मडकेबुवा चौकात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे बाहेर पडलेल्या रामस्वरूपला मुंबई नेहमीसारखी दिसत नाही. दुकानं बंद, रस्त्यावर वाहन नाही. मयत असलेल्या घरात असतो, तसा भयंकर शुकशुकाट रस्त्यावर. घाबरून तो एका अरुंद गल्लीत शिरतो आणि तिथं लपूनछपून वडापाव घेऊन येणाऱ्या लोकांशी बोलून माहिती मिळवतो. तेव्हा त्याला समजतं- काल रात्रीच पंतप्रधानांनी ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केलाय, आज ‘ऑल इंडिया शट डाऊन’ आहे. तो तीन वडापाव विकत घेऊन आणि रस्त्यात पोलिसांच्या शिव्यांच्या भडीमारासह पायावर, पाठीवर लाठ्या खाऊन पुन्हा घरी परत येतो.

त्यानंतर एक-दोन दिवसांत पुन्हा पंतप्रधान ‘आज रात्री १२नंतर संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात येईल’, अशी नेहमीच्या शैलीत शांतपणे घोषणा करतात. देशभर स्मशान शांतता पसरते, आणि त्याच वेळी हलकल्लोळही उडतो. ते २१ दिवस पैसे असलेले लोक, विशेषतः सरकारी, निमसरकारी नोकरदार आणि बँकांमधले कर्मचारी मजेत एन्जॉय करतात. हातावर पोट असलेले कसेबसे दिवस ढकलतात. मात्र घरापासून दूर असलेल्या रामस्वरूप मौर्यसारखे कित्येक जवळजवळ पाण्यावर दिवस काढतात.

२१व्या संध्याकाळी पंतप्रधान तितक्याच शांत, स्थितप्रज्ञतेने ‘लॉकडाऊन’ आणखी वाढवण्याची घोषणा करतात, तेव्हा मात्र रामस्वरूपला त्याच्या खुराड्याचा मालक खुराडं खाली करायला सांगतो. तो आईने दिलेले खाद्यपदार्थ घेऊन बाहेर पडतो, आणि गावाकडे जाण्यासाठी १०-१२ किलोमीटर अंतरावरच्या सीएसएमटीच्या दिशेने चालत निघतो. पोलिसांच्या काठ्यांचा मार खाणाऱ्या लक्षावधींच्या जमावाचा भाग होतो. तिथं त्याला भेटतात बनारसच्या जवळ राहणारे टिळाधारी शेंडीवाले पंडित ब्रिजमोहन मिश्रा आणि शेख आरिफ. तिघं एकाच राज्यातले, एकाच जिल्ह्यातले. नाईलाजानं एकत्र येऊन न सुटणाऱ्या गाड्यांबद्दल अंग चोरून, एकमेकांविषयी थोडा संशय बाळगत, थोडा दुरावा ठेवून बोलतात.

पंडित ब्रिजमोहन मिश्रा गौरवर्णी, निळसर घाऱ्या डोळ्यांचे, कपाळावर चंदन टिळा, लांब केस आणि त्यांना गाठ पडलेली चुट्टी. गळ्यात भगव्या रंगाचा गमछा. गरखा आणि काखेत झोळी. दोन्हीचा रंग भगवा. घराबरोबरच वेदपाठशाळेतूनही मुसलमानांचा द्वेष करण्याचे संस्कार झालेले. पंडितजी एका मोठ्या पंडित दलालाच्या बोलावण्यावरून मुंबईत आलेले असतात. मुंबईत बनारसी पंडितांच्या टोळ्या सक्रिय असतात. श्राद्ध, पूजापाठ, सत्यनारायण, वास्तुशांत, अभिषेक, कालसर्पयोग वगैरे करणाऱ्या या टोळ्यांचे कमिशन एजंटही असतात. आधीच प्रस्थापित झालेले महापंडित लोक हे या टोळ्यांचे प्रमुख. ते पंडित मिश्रासारख्या नंतर आलेल्या पुजाऱ्यांकडून दलाली घेऊन त्यांना रोजंदारीवर काम देतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

शेख आरिफ डोक्यावर मेहंदी रंगवलेल्या तांबड्या आणि उरलेल्या काळ्या पांढऱ्या केसांचा. गळ्यात रंगीबेरंगी धागा आणि त्यात ओवलेला कोणी सुफी पीर संताने दिलेला ताबीज. डोळ्यात जरा जास्तच सुरमा घातल्यामुळे डोळ्यांचा रंगही थोडा काळा झालेला. कानात मजमुआ अत्तराचा फाया आणि तितकंच अत्तर कपड्यांवर मारलेलं. नळ फिटिंग ते गॅस शेगडी दुरुस्ती ते सायकल पंक्चर ते गाड्यावर चायनीज, भुर्जी, पावभाजी बनवणं, असं कोणतही काम करू शकणारा. कष्टकरी म्हणून मुंबईत जगायला पूर्णपणे लायक असा हरहुन्नरी इसम.

हे तिघं त्या हेलकावणाऱ्या गर्दीचा भाग होतात. गर्दी निघते म्हणून तेही दादरच्या दिशेने चालू लागतात. पाच तास चालल्यावर दादरला पोचतात, तेव्हा रेल्वे प्रशासनाची घोषणा होते : ‘आजपासून अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी रेल्वे स्टेशन त्वरित रिकामे करावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.’

घोषणा संपताक्षणी रेल्वे पोलीस जमलेले मजूर, बायका, लहान मुलं, अपंग, म्हातारे अशा सगळ्यांवर लाठीमार करतात. हे तिघंही पाठीवर, पायांवर काठ्यांचे रट्टे खात पळत सुटतात आणि गर्दीतून निघालेल्या सुरानुसार आपणही गावाकडे चालत जाऊया, या निर्णयावर येऊन पोहोचतात.

…आणि सुरू होतो एक प्रवास… जिथे उपजीविकेसाठी काम नाही म्हणून बाहेर पडावं लागलं, त्या घराच्या दिशेनं… पोलिसांच्या शिव्या आणि काठ्यांचा मार खाऊन सुजलेल्या पाठ आणि पायांनी... पण त्यांना वाटतेल्या कुठल्याही गावात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे रस्त्याकडेच्या जंगलात काही मिळालं तर खायचं… फुटलेले ओठ लॉकडाऊन इतक्याच कडक उन्हात सुकलेल्या आणि आटलेल्या पाण्याच्या स्त्रोतांनी भिजवून घेत.

या प्रवासात वाईट-चांगले अनुभव या तिघांना येतात. वेगवेगळ्या कारणांसाठी घराबाहेर पडलेले, आणि चालत जावं लागलेले अनेक लोक… त्या प्रत्येकाची आयुष्याशी चाललेली लढाई… त्या लढाईची कहाणी… काही कहाण्या उदास करणाऱ्या… काही प्रेरणा देणाऱ्या. २४ तास एकत्र राहताना या तिघांच्या मनातले अहंगंड गळून पडतात. माणूस म्हणून परस्परांना समजावून घेण्याचा प्रवास समांतररित्या सुरू होतो. त्यातून आयुष्यभर जपलेल्या, उराशी बाळगलेल्या धारणा, समज गळून पडतात. धर्माच्या भिंती ढासळतात… आणि माणूस म्हणून शिल्लक राहण्याचा प्रवास सुरू होतो.

याच प्रवासात त्यांना भेटते दीपाली. कापड गिरणीमध्ये वरच्या पदावर काम करणारी, आकर्षक व्यक्तिमत्त्वाची. धीट आणि प्रेमळसुद्धा. आर्थिकदृष्ट्या सक्षम, पण लॉकडाऊनमुळे रस्त्यावरून चालणं नशिबी आलेली. पुढच्या प्रवासात ती या तिघांच्या बरोबरीनं त्यांची साथी म्हणून सहभागी होते. आजच्या काळात आत्मविश्वास असलेल्या, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत, संवेदनशील अशा या मुलीच्या सहअस्तित्वात या तिघांचा माणूसपणाकडे सुरू झालेला प्रवास वेग घेतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

रोजच्या चालण्याच्या या प्रवासात रामस्वरूप, पंडितजी आणि आरिफ यांच्यातल्या चर्चा, त्या वेळी होणाऱ्या निरनिराळ्या साहित्याचे उल्लेख वाचल्यावर जाणवतं की, लेखकाचं मराठी आणि विशेषतः हिंदी-उर्दूचं भरपूर वाचन असावं, आणि त्यावर सखोल विचारही. या चर्चांमुळे ही कादंबरी तत्त्वज्ञानाच्या अंगाने पुढे सरकत राहते. मानवी स्वभाव आणि जीवनातल्या आशा-निराशा, सुखदुःख, अहं, ईर्ष्या, अपमान, अवहेलना अशा चढ-उतारांचं मनोज्ञ दर्शन घडवत ही कादंबरी स्वतःबरोबर आपल्यालाही एका प्रवासाला घेऊन जाते. ती संपते, तिथून आपल्या मनात पुढचा प्रवास सुरू होतो…

लेखक पवन भगत यांच्याकडून यापुढे अशाच अर्थवाही आणि सशक्त लेखनाची अपेक्षा आहे.

‘ते पन्नास दिवस’ : पवन भगत

मैत्री पब्लिकेशन, पुणे | पाने : १६८ | मूल्य : ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

नितीन साळुंखे

salunkheneetin@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......