‘दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ : आपल्या जीवनधारणांची पुनर्तपासणी करण्याची गरज वाटायला लावणाऱ्या कथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विकास पालवे
  • ‘दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 02 November 2022
  • ग्रंथनामा शिफारस दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट Dimitri Riyaz Kelkarchi Goshta प्रणव सखदेव Pranav Sakhadeo रोहन प्रकाशन Rohan Prakashan

प्रणव सखदेव हे आजघडीला कथनात्म लेखन करणाऱ्या तरुण लेखकांतील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. ते सातत्याने कथा, कादंबरी या साहित्य प्रकारांत लक्षवेधी लेखन करत आले आहेत. ते कथाकार म्हणून आपल्या पात्रांच्या जाणिवा, वरवर दिसणाऱ्या भावभावना जशा व्यक्त करतात, तशाच त्यांच्या नेणिवेत दडून बसलेल्या गोष्टीही अगदी सहज कथनाच्या ओघात पृष्ठभागावर आणतात. जे तात्काळ डोळ्यांना दिसतंय, त्याच्या पलीकडील सत्य शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या ‘दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ या कथासंग्रहातील सर्व कथा समकालातील शहरी भागातील समाजजीवनाचा आलेख सादर करतात.

‘गर्भगळीत’ या कथेत आस्तिक-नास्तिक यांच्यातला श्रद्धा-अंधश्रद्धा हा झगडा एका कुटुंबात घडणाऱ्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेखाटला आहे. वेदा ही तरुणी गर्भवती आहे. साधारणतः स्त्री गरोदर असल्यावर ज्या काही पारंपरिक समजुती लोकांच्या मनात रुजलेल्या आहेत, त्या तिची आई, सासू, ऑफिसमधील सहकारी, व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमधील सदस्य यांच्या सल्ल्यांतून डोकं वर काढतात. उदाहरणार्थ, गरोदर राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत कोणाला सांगू नये, त्या काळात ग्रहण असेल तर घराबाहेर पडू नये वगैरे. वेदा ही तार्किक विचार करणारी तरुणी आहे. तिला लहानपणापासूनच प्रश्न विचारण्याची चांगली सवय आहे, हे कथाकार तिला पहिल्यांदा पाळी येते, तेव्हा ती आईला जे प्रश्न विचारते, त्यातून सूचित करतो. त्यामुळे तिचं व्यक्तिमत्त्व ठाशीव स्वरूपात आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. तिची यूएसमध्ये राहणारी राधाकाकू तिने ग्रहणाच्या काळात काय करू नये, असा मेसेज पाठवते, यातून कथाकार वेदाचं अंधश्रद्धाळू माणसांच्या गराड्यात फसणं नेमकं दाखवून देतो. पण तरी तिचा ‘सगळ्याची कारणं सापडली नसली तरी ती आपण शोधत राहायला हवीतच, आपल्याला आज नाही, पण उद्या समजतील, परवा समजतील... हीच तर आदिम मानवी आस आहे, शोध घ्यायची,’ हा मनोनिग्रह आणि समजूतदार, वैज्ञानिक दृष्टीकोन मनावर ठसतो. त्यामुळे तात्कालिक स्वरूपात जरी तिला ‘एखाद्या अथांग पोकळीत अधांतरी, आधारहीन तरंगत असल्यासारखं वाटलं’ तरी त्या मनोनिग्रहावरच आपल्याला तगून राहता येईल, हे कथाकार सूक्ष्मपणे अधोरेखित करतो.     

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

‘अच्चीत गच्ची, गच्चीत टाकी...’ या कथेत दोन कथा समांतरपणे चालतात. या कथेतील निवेदक लेखक आहे. त्याने लेखनासाठी भाड्याने आउटहाऊस घेतलंय. त्याची देखभाल करणारी दादाताई ही बाई तिच्या तोवरच्या जगण्यात तिने जे काही सोसलंय, ते सगळं त्याला सांगते. त्यातून तिचं चरित्र उलगडत जातं. आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागू गेलं, तर तो खात्रीशीर मिळेलच, याचा तिला भरवसा वाटत नाही. दुसऱ्या बाजूला रोहन नावाच्या तरुणाचा कॉलेजमधील एका कार्यक्रमात त्याला आवडणाऱ्या मितालीकडूनच अपमान होतो आणि नंतर सबंध कॉलेजात तो ‘हास्यविषय’ होऊन जातो. यामुळे रागाने पिसाटलेल्या अवस्थेत तो ‘जगातल्या जास्तीत जास्त बायका-मुलींचा भोग घेण्याचा’ विकृत निश्चय करतो आणि पुढे दादाताई या बाईपर्यंत पोहोचतो. तिथे त्या दोघांचं जगणं एकमेकांना छेदतं. दादाताईने इतकी वर्षं हे दुःख कुणाकडेच व्यक्त केलेलं नसतं, तेव्हा मन मोकळं करावं, असं माणूसच तिला सापडत नाही का, आपल्यावरील अन्यायाचा सोक्षमोक्ष लावावा, असं वाटल्यानंतर तिला मदत करणाऱ्या कुणाचाच आधार मिळाला नसेल का, रोहनचा अपमान झाल्यानंतर त्याच्याशी समजुतीनं बोलणारं कुणीच नसतं का, तसा कोणी प्रयत्न करणारंही नव्हतं का, असे अनेक उपप्रश्न ही कथा निर्माण करते. हे उपप्रश्न समाजातील विसंवाद आणि तुटलेपण, व्यक्तीचं एकटं पडत जाणं, या गोष्टींकडे निर्देश करतात. 

हाच व्यक्तीच्या एकाकी पडत जाण्याचा धागा त्यांच्या ‘खचणारे बहर माथी घेऊन’ या कथेतील मानस या व्यक्तिरेखेबाबतही जोडता येतो. ही कथा कथाकाराने मनोगतात सांगितल्याप्रमाणे आधीच्या एका संग्रहातील ‘कथा सांगण्याची गोष्ट’ या कथेचीच ‘दीर्घ आवृत्ती’ आहे. या पुनर्लिखित कथेला करोना काळातील लॉकडाऊनची पार्श्वभूमी आहे. हा लॉकडाऊन सतत वाढत राहिल्याने अस्वस्थ झालेले लोक नाइलाजाने मिळेल, त्या साधनांनिशी घरं गाठण्याच्या प्रयत्नात होती. या लोकांना काही ठिकाणी पोलीस अडवून भर रस्त्यात काठीनं मारत, उठाबशा काढायला लावत. त्याचे व्हिडिओ व्हायरल होत, टीव्हीवरील बातम्यांतही दाखवत. पण या सगळ्याचा त्या व्यक्तीवर कोणता मानसिक परिणाम झाला असेल, याची फारशी चर्चा झाली नाही. कथेतील आलोक आणि जान्हवी यांचा मुलगा मानसला, अशाच एका अपमानजनक घटनेला सामोरं जावं लागतं. त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. तो हताश होऊन आत्महत्या करतो. या घटनेनं हादरलेल्या त्याच्या आईचं मानसिक स्वास्थ्य तहसनहस होऊन जातं. कथाकार तिच्या अस्थिर वागण्याचं प्रभावी चित्रण करतो. ही एक उत्तम मनोविश्लेषणात्मक कथा आहे, असं आपण म्हणू शकतो. लेखक आपला समकाल कशा वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो, हे या कथेतून लक्षात येतं.

त्यांची ‘ट्रिप्सी शिल्प’ ही कथा आजच्या तरुणाईच्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधावर बेतलेली आहे. कथेची भाषा, घडणारे सगळे प्रसंग यांतून समकालीन तरुणांचं जगणं अगदी नेटकेपणानं साकार होतं. लीना, काव्या आणि रियान हे प्रेमी त्रिकुट एकदा बाइकवरून ट्रिप्सी राईड करत बेभानपणे जात असताना अपघात होतो आणि तिघं तीन दिशांना फेकले जातात, तेव्हा एक म्हातारे गृहस्थ त्यांना मदत देऊ पाहतात. हे तिघं प्रत्येक मदतीचा पर्याय ठोकरून लावतात. त्या प्रसंगी ‘मग तुमचं करायचं तरी काय?’ हा त्यांनी विचारलेला प्रश्न हा आजच्या पिढीला एकंदरीतच जगण्यासंबंधी विचारल्यासारखा ध्वनित होतो आणि त्यावर त्या तिघांनीही एका सुरात दिलेलं ‘तुम्ही जा प्लीज, आम्ही आमचं काय ते पाहू,’ हे उत्तर या सबंध पिढीनं मागच्या पिढीला एकंदरीत जगण्याविषयी दिलेल्या उत्तरासारखं वाटत राहतं. कारण त्यानंतरही ते त्यांना हवं तेच हट्टानं करू पाहतात. कथेचा शेवट वास्तव आणि कल्पिताच्या रेषा धूसर करणारा आहे.

अशाच पद्धतीने वास्तव आणि कल्पिताची सरमिसळ करून ‘आठवलेची एक आठवण’ ही कथा सफाई कामगारांचं नरकसदृश जगणं पृष्ठभागावर आणते. एका ठरावीक जातीतील लोकांनीच ही कामं करावी, अशी रीतच पडून गेली आहे. तिला उच्च जातीय, वर्गीय लोकांचा पाठिंबाच नव्हे, तर पूर्ण समर्थनही असतं. त्यामुळे सफाई कामगारांच्या मुलांनी किंवा ते ज्या जातींतून येतात, त्या जातींतल्या मुला-मुलींनी शिक्षण घेऊन परिस्थितीत पालट करायचं स्वप्न पाहिलं तरी तथाकथित उच्च जातीय, वर्गीय लोकांकडून या ना त्या मार्गानं त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न होत राहतात. आणि त्यामागे जातिव्यवस्थेच्या उतरंडीतून प्राप्त झालेला अहंकार मोठ्या प्रमाणात कार्यरत असतो. या उच्च जातीयांकडून पद्धतशीरपणे एखाद्या षडयंत्रासारखं अगदी तळाच्या जातीतल्या लोकांत पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, बाबाबुवा, देवाची उपासना वगैरे भंपक कल्पना प्रसृत केल्या जातात आणि बुद्धिभ्रम केलेल्या पण या अन्यायी व्यवस्थेत पिचल्या जाणाऱ्या समाजाकडूनच जातिव्यवस्थेचा खुंटा बळकट केला जातो. हे सगळं आजचं गुंतागुंतीचं जातवास्तव आहे. कथाकार एका काल्पनिक घटनेच्या आधारे पात्रांच्या संवादांतून यातल्या बऱ्याचशा पैलूंना फार समर्थपणे स्पर्श करतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

एका कुत्र्याच्या हत्येच्या निमित्तानं समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील लोकांच्या जगण्यातील काळोख्या बाजूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ‘एक कुत्ते की मौत’ या कथेत केलेला दिसतो. समाजातील पारंपरिक नीतिनियमांमुळे ज्यांना आपल्या नैसर्गिक प्रेमभावना दडपून जगावं लागतं, त्यांच्या मानसिकतेवर कसा आघात होतो आणि काही वेळेस सुडापोटी ते कसे हिंस्र होतात, हे कथाकार निमकरकाकू या पात्राद्वारे अधोरेखित करतो. श्रीमंत वर्गाची मग्रूरी आणि पैशाच्या बळावर अनैतिक, बेकायदेशीर गोष्टी धकवून नेण्याची त्यांची वृत्ती यांचं अग्निहोत्री हे पात्र उदाहरण आहे. आणि या अग्निहोत्रीच्या घरी कुत्र्यांना सांभाळण्याचं काम करणारे केअरटेकर्स हे समाजातल्या निम्नवर्गीय स्तरात राहणाऱ्या, कायम असुरक्षिततेची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या आणि रोजीरोटीसाठी लाचार असणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात. कथाकार समाजातल्या या वेगवेगळ्या स्तरांतील माणसांचं जगणं रहस्यात्मक वाटाव्या, अशा कथानकात गुंफून घेतो. त्या त्या स्तरातील माणसांची भाषा अस्सल वाटते. वरवर शांत दिसणाऱ्या माणसांचं जगणं आतून किती खळबळ माजलेलं असू शकतं, याचा प्रत्यय फार कमी वेळा आपल्याला येतो. ही कथा तसा प्रत्यय देण्यात यशस्वी ठरते.

‘दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ ही कथा काळाच्या व्यापक पटावर उलगडत जाते. मुघल, ब्रिटिश आणि वर्तमान अशा तीन काळांत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची ही कथा आकार घेत जाते. कथा वरकरणी कौटुंबिक वाटली तरी तिला समाजातील असहिष्णू, हिंस्र परिस्थितीचा सूक्ष्म पदर लगडलेला आहे. मांसाहारी जेवण बनवण्यात प्रवीण असलेल्या, खानसामा म्हणून काम करणाऱ्या रियाझचा मुलगा - दिमित्री - जेव्हा स्वतः उत्तम बिर्याणी बनवतो, तेव्हा रियाझला आनंद होण्याऐवजी भीतीच वाटते. तो आपल्या पत्नीला एकदा म्हणतोदेखील, “...आता सरकार आपल्यावर मेहेरबान आहे म्हणून ठीक, पण उद्या काय होईल कुणास ठाऊक? इथं कोणाचं काही खरं नाही.” रियाझला तथाकथित संस्कृतिरक्षकांकडून धमक्या मिळालेल्या असतात. त्यामुळे दहशतीच्या छायेखाली जगणं काय असतं, हे त्याने अनुभवलेलं असतं. तो जे बायकोला म्हणतो, त्यामागे ते दिवस आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नयेत, अशी व्यक्तिगत आस असते, जी सद्य काळातील ठरावीक धर्मांतील करोडो पित्यांच्या प्रार्थनेसारखी आहे. दिमित्री रियाझ केळकर या नावाची उत्पत्ती कथन करणारा भाग फारच रोचक आहे.

‘बियास का उधाणली त्याची गोष्ट’ ही कथा स्त्रीच्या शरीरावर आपली मालकी असल्याच्या गुर्मीत वावरणारी पुरुषी मानसिकता जशी उजागर करते, तशीच या मानसिकतेचा प्रतिरोध करणारा किंवा तिचं सुसंस्कृतपणाच्या आड लपलेलं खरं रूप दाखवणारा प्रवाहही चित्रित करते. या कथेत समाजात होणाऱ्या अन्यायांविरोधात लढणारी माणसं आहेत, तशीच सर्वसामान्यांना कस्पटासमान लेखणारी कॉर्पोरेट क्षेत्रातील आपमतलबी बडी धेंडंही आहेत. या कथेत एक यांत्रिक रोबो आहे. हा रोबो आपल्या मालकाचाच खून करतो. या रोबोच्या कबुलीजबाबाचा व्हिडिओ बियास या पत्रकार तरुणीच्या हाती लागतो. या व्हिडिओतून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार असतो. कथाकाराने एखाद्या रहस्यकथेसारखी अत्यंत वेगवान अशी कथानकाची रचना केली आहे.

प्रणव सखदेव या कथासंग्रहातील कथांतून आजच्या काळातील काही ठरावीक जाती-वर्गांतील आणि भूप्रदेशातील माणसांच्या जगण्यातील गुंतागुंत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. ते निरनिराळ्या स्तरांतील, जातींतील माणसांचं जगणं त्यांच्या भल्या-बुऱ्या अनुभवांसह जिवंत करतात. या माणसांच्या जगण्यातील अंतर्विरोध, मनाच्या तळघरात लपून बसलेली असूया, ईर्ष्या, अतृप्त इच्छा-वासना यांमुळे उफाळून येणारी हिंस्रता, नैतिकतेला तिलांजली दिल्यामुळे कथणी-करणी यांत निर्माण होणारी विसंगती, जवळच्या माणसांशी मनमोकळा संवाद खंडित झाल्यामुळे संवेदनांना येणारी बधिरता, वाट्याला येणारा एकटेपणा, या बाबी ते कथानकातील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांत यथोचितपणे आणि फार कुशलपणे गोवून घेतात. त्यात कोणतीही कृत्रिमता जाणवत नाही, कारण हेच आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या जगण्यात आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतं.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

या कथा एकेका माणसाच्या, कुटुंबाच्या व्यथा-कथा कथन करत असल्या तरी बाह्य जीवनातील निरनिराळ्या पातळ्यांवरील राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील चांगल्या-वाईट प्रवृत्तींच्या वर्तनाचे, या सुट्या माणसांवर वा कुटुंबांवर होणारे आघातदेखील प्रच्छन्नपणे आणि काही वेळेस थेटच कथानकात खेळते ठेवले आहेत. वास्तव जीवनातही ते याच पद्धतीने माणसांच्या जगण्यावर भलेबुरे परिणाम करत असतात. कितीतरी जणांच्या ते लक्षातही येत नाही. अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या हाराकिरीत कुणाकडे इतका वेळही नसतो. म्हणूनच हळूहळू सगळ्यांचा प्रवास असंवेदनशील, आत्मलुब्ध होण्याकडे चाललेला आहे की काय, अशी शंका बऱ्याचदा येते. याचे संदर्भ या कथांतही आहेत.

तुर्किश भाषेत कथनात्मक साहित्य लिहिणाऱ्या एलिफ शफ़ाक या लेखिकेने हल्लीच एका मुलाखतीत म्हटलं आहे, “आपल्या आसपास माणसांचं जे ‘अ-मानवीकरण’ सुरू असलेलं दिसतं त्याला जाणीवपूर्वक प्रतिरोध करणं हा साहित्याच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा आहे. ज्यांचं ‘अ-मानवीकरण’ झालेलं आहे, त्यांचं कथांच्या किंवा गोष्टींच्या माध्यमातून पुन्हा ‘मानवीकरण’ केलं जाऊ शकतं, असा विश्वास साहित्याच्या केंद्रस्थानी असतो.”

याच न्यायानं असं म्हणता येईल की, प्रणव सखदेव यांच्या या कथांतील कथानकांत, पात्रांच्या संवादांत अध्याहृत असलेला अर्थ काळजीपूर्वक लक्षात घेतला, तर इतरांच्या जगण्याप्रती असंवेदनशील होऊ लागलेल्या आपल्या जीवनधारणांची थोडा वेळ थांबून पुनर्तपासणी करण्याची गरज वाटायला लावणाऱ्या या कथा नक्कीच आहेत. हेच या कथांचं यशदेखील आहे, असं वाटतं.         

‘दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट’ - प्रणव सखदेव

रोहन प्रकाशन, पुणे

पाने - १६८

मूल्य - २४० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......