अजूनकाही
सामाजिक प्रबोधन आणि समाजपरिवर्तनाचा वैचारिक वारसा समृद्ध करण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन विसाव्या शतकात तब्बल चार दशके विविध माध्यमांतून सामाजिक-राजकीय विषयांवर समाजप्रबोधन करणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून (कै.) रा. ना. चव्हाण ओळखले जातात. प्रसिद्धीपासून लांब राहत रा.नां.नी प्रचंड लेखन केले. ते पुस्तकरूपाने समाजासमोर आणण्याचे काम त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण गेल्या काही वर्षांपासून निष्ठेने करत आहेत. आतापर्यंत त्यांनी एकूण ४३ पुस्तके प्रकाशित करून साहित्य, सामाजिक शास्त्रे, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांत मोलाची भर टाकली आहे. नुकतेच त्यांनी ‘लोकशाही समाजवादाची प्रेरकशक्ती : राजर्षी शाहू’ हे रा.नां.च्या लेखांचे पुस्तक प्रकाशित केले आहे.
या संग्रहाला राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार यांनी समर्पक प्रस्तावना लिहिली आहे. यात रा.नां.नी राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेचा तसेच क्रांतिकारक विचार व कार्याचा आढावा घेतला आहे. मात्र ते करताना पारंपरिक पद्धतीने मांडणी न करता त्याला तत्त्वज्ञानात्मक व मूल्यात्मक आशय देऊन १९व्या शतकात शाहूंनी समाजवादी-समाजरचनेचा एक आगळा-वेगळा आकृतीबंध कसा निर्माण केला होता, याबाबत केलेली मांडणी निश्चितच लोकशाही समाजवादाचा विचार आणि कृती कार्यक्रम, अशा दोन्ही आघाड्यांवर समृद्ध करणारी आहे.
त्याबाबत रमेश चव्हाण मनोगतात लिहितात, ‘‘लोकशाही स्वीकारून समाजवाद शब्दाचा भारतीय संविधानात समावेश करून चाललेली आपली वाटचाल आजचे वास्तव व परिस्थिती पाहता समाधानकारक आहे, असे म्हणता येत नाही.’’ म्हणजे शाहूंना अपेक्षित असा समाजपरिवर्तनाचा विचार संविधानकर्त्यांनी आपल्या लोककल्याणकारी राज्यात तत्त्वत: अंगीकृत केला असला तरी प्रत्यक्षात मात्र त्या दिशेने अपेक्षित वाटचाल झालेली नाही, अशी खंत रा. ना. व्यक्त करतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
पर्यायाने शाहूंच्या सत्यशोधक-समाजवादी विचारधारेची पुढील काळात पिछेहाट झाली, हे रा.नां.चे निरीक्षण मौलिक आणि दिशादर्शक असेच आहे. समाजक्रांती वा मूलग्राही समाजपरिवर्तन, हा शाहूंचा विचार रा.ना. अगदी नेमक्या शब्दांत मांडतात.
डॉ. पवार यांनी हाच धागा पकडून प्रस्तावना लिहिली आहे. शाहू महाराजांची ऐतिहासिक दृष्टी स्पष्ट करत अगदी त्यांच्या विचार आणि कार्याचे प्रेरणास्त्रोत काय होते, याची साधार चिकित्सा केली आहे. सत्ताशास्त्र, नीतीशास्त्र याचा आधार घेत रा.नां.नी शाहूंना ‘तत्त्वज्ञ राज्यकर्ता’ ही दिलेली उपाधी अगदी सार्थ ठरते. मात्र केवळ तत्त्वज्ञान मांडून रा.ना. थांबले नाहीत, तर भौतिकसत्ता व कृषी-औद्योगिक समाजव्यवस्थेचे पर्यायी मॉडेल देऊन खऱ्या अर्थाने राज्यकर्त्यांसमोर शाहूंच्या लोकशाही समाजवादाची कृतीप्रवणता व प्रेरणा उभी केली, यावरदेखील डॉ. पवार विवेचन करतात.
पहिल्या लेखात रा.ना. शाहूपूर्व काळातील सामाजिक-राजकीय पर्यावरणाची ऐतिहासिक मांडणी करून ब्राह्मणी वर्चस्व, ब्रिटिशांचे धोरण आणि एकंदरीत समाजव्यवस्थेतील दारुण अवस्थेचे चित्र उभे करतात. शाहूंनी अगदी प्रतिकूल वातावरणात समाजक्रांतीची धग कशी उभी केली, यावर सडेतोड भाष्य केले आहे.
शाहूपूर्व काळात महाराष्ट्रात ज्या काही सामाजिक संस्था व चळवळी उभ्या राहिल्या, त्यातून शाहूंच्या विचार व कार्याची कशी जडणघडण झाली, यावर प्रकाश टाकला आहे. रा.ना. लिहितात, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज व शेवटचे छत्रपती प्रतापसिंह या दोन पुरुषांनी सुरू केलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या चळवळीची पूर्तता शाहू महाराजांनी केली. अब्राह्मण पुरोहित व स्वकीय शंकराचार्य निर्माण करून आर्यसमाजात स्थान देऊन शाहू महाराजांनी अपूर्वाई साधली.’’ तात्पर्य, शाहूपूर्व काळातील समाजक्रांतीच्या मार्गात धोंड म्हणून उभ्या राहिलेल्या प्रथा-परंपरांना नकार देत शाहूंनी आपल्या भावी सत्यशोधक विचारांची पायाभरणी केली होती, हे रा.ना. स्पष्ट करतात.
दुसऱ्या बाजूने ‘स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य’ अशी परिभाषा करून शाहूंनी अप्रत्यक्षपणे लोकशाहीवर आधारित समाजव्यवस्थेचा विचार मांडला होता. सत्यशोधक चळवळीस प्रत्यक्षपणे सहभागी नसले तरी शाहू म्हणजे सत्यशोधक चळवळ आणि सत्यशोधक चळवळ म्हणजे शाहू, असा समाज तयार झाला होता, असे विधान करून त्यांच्या प्रेरणेतूनच सत्यशोधकी विचार फोफावला आणि त्यातूनच शाहूंची लोकशाही-समाजवादी निष्ठा निर्माण झाली होती, असे प्रतिपादन रा.ना. करतात. ते शाहूंना ‘समाजवादी-समाजरचनेची प्रेरकशक्ती’ ही उपाधी देण्यास पर्याप्त ठरते.
तात्पर्य, लोकशाही समाजवादासाठी अनुकूल अशी वैचारिक पार्श्वभूमी शाहूंनी तयार केली होती, असेही प्रतिपादन रा.ना. करतात. एका ठिकाणी ते लिहितात, ‘‘राजकीय स्वातंत्र्य आले आहे; पण धार्मिक-सामाजिक समता निर्माण व्हायची आहे. स्वराज्याचे सुराज्य व सुबत्तेचे राज्य झालेले नाही. गरीब हे गरीब होत आहेत, श्रीमंत हे श्रीमंत होत आहेत. दलितावर सर्वत्र अन्याय-अत्याचार होत असतात. याला तोंड कसे द्यायचे, हे फक्त राजर्षी शाहू महाराज या यशवंत पुरुषाचे चारित्र्य दाखवते.’’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
सुराज्य, सुबत्ता, दारिद्र्य निर्मूलन, समान संधी ही शाहूंच्या विचार व कार्यातील मूल्ये सत्यशोधक-समाजवादाकडे आपल्याला कसे घेऊन जातात. त्यामुळे ते लोकशाही समाजवादी तत्त्वज्ञानाचा आरंभ कसे ठरतात, यावर रा.नां.नी केलेले भाष्य आजही किती प्रस्तुत आहे, याची साक्ष पटते.
‘शाहूंची सामाजिक विचारधारा व कार्य’ हा एक महत्त्वाचा लेख या पुस्तकात आहे. त्यात रा. नां.नी शाहू चरित्रातील काही मौलिक घटनांची साधार चर्चा केली आहे. एक समाजक्रांतिकारक राज्यकर्ता म्हणून समाजसुधारणांच्या सर्व आघाड्यांवर शाहू कसे यशस्वीपणे लढले यावर त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात, ‘‘शाहू क्रांतिकारक होते, धर्मसुधारक होते, सत्यशोधकांना आश्रय देणारे होते, हिंदू धर्मात शुद्धीकरणाची मोहीम राबविणारे होते; ते एक कर्ते समाजसुधारक होते.’’
या लेखात रा.नां.नी विचार-आचाराची क्रांती शाहूंनी आपल्या संस्थानात कशी घडवून आणली, यावर सत्यशोधन पद्धतीने लिखाण केले आहे. एखाद्या संस्थानिक राज्यकर्त्यांकडे किती दूरदृष्टी असते, याचा वस्तुपाठच लेखकाने मांडला आहे. मात्र केवळ चरित्रात्मक मांडणी करण्यातच रा.ना. गुंतून पडले नाहीत, तर या राजाने सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या कार्याला कशी गती दिली, यावर अधिक भर दिला आहे.
खांबगांव येथे डिसेंबर १९१७मध्ये ‘मराठा आरक्षण परिषदे’त शाहूंचे जे भाषण झाले, त्यावर भाष्य करताना रा.नां.नी त्यांच्या सामाजिक आचार-विचारावर प्रकाश टाकला आहे. लेखक म्हणतात, शाहूंना स्वराज्य पाहिजे होते, मात्र केवळ सत्तांतर नको होते. पेशवाईप्रमाणे पुन्हा मूठभराकडे सत्ता जाईल, अशी त्यांना भीती वाटत होती. त्यासाठी शिक्षणाचा प्रचार व प्रसार त्यांना महत्त्वाचा वाटत होता. त्यासाठी त्यांनी वसतिगृहाची चळवळ उभारून कृतीप्रवण समाजसुधारकांची चळवळ महाराष्ट्रात उभारली. मराठा-बहुजन समाज शिकून स्वराज्याचा उपभोग घेण्यासाठी जागरूक व सक्षम झाला पाहिजे, असे महाराजांना वाटत होते. यावर लेखकाने चांगले विवेचन केले आहे. एकंदरीत शिक्षण हे समाजसुधारणेचा पहिला टप्पा आहे, यावर महाराज आग्रही होते.
शाहूंमधील सत्यशोधक-समाजवादी शोधताना व त्यावर भाष्य करताना लेखकाचे त्यांच्या आर्थिक धोरणावरदेखील प्रकाश टाकला आहे. शाहू लोकशाही समाजवादाचे पुरस्कर्ते होते, यावर मांडणी करताना रा.ना. म्हणतात, महाराजांनी भांडवलशाहीचे दोष सांगून मजूर संघ स्थापनेला प्रेरणा दिली. श्रमाची प्रतिष्ठा केंद्रस्थानी ठेवून महाराजांनी समाजवादाची महाराष्ट्रात पायाभरणी केली होती. शाहूंच्या काळात शेती व शेतकऱ्यांना काडीमात्रही प्रतिष्ठा नव्हती, मात्र त्यांनी आपल्या आर्थिक धोरणात शेतीव्यवसायाला प्राधान्य देऊन कृषी समाजवादाचा पुरस्कार केला.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
तात्पर्य, रा.नां.नी छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र, त्यांचे सामाजिक सुधारणेचे मार्ग, सामाजिक समतेसाठी समाजक्रांतीची आवश्यकता या विषयावर या पुस्तकात पाच लेख आहेत. त्यातून शाहूंच्या विचार व कार्याचे वेगळेपण जाणवते. शाहूंचा हा वैचारिक व समाजक्रांतीचा वारसा रा.नां.सारख्या सत्यशोधकाने मांडल्यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
महात्मा फुले, शाहू महाराज, महर्षी वि. रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा अगदी आस्थेवाईकपणे पुढे घेऊन जाणाऱ्या रा.नां.नी विसाव्या शतकात खंडित झालेली सत्यशोधकी चळवळ आपल्या लेखणीद्वारे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या काळातल्या भाषणांचा संदर्भ देत शाहू खरे सत्यशोधकी विचारवंत व कर्ते समाजसुधारक कसे होते, एवढेच नाही तर त्यांच्या विचार व कार्यातून देशात व महाराष्ट्रात समाजवादी-समाजरचनेची प्रेरणा मिळाली. मात्र पुढे सत्यशोधकी चळवळ थंडावल्यामुळे सामाजिक समतेचा विचार मागे पडला. ही त्यांनी चार दशकांपूर्वी व्यक्त केलेली खंत आजही विचारप्रवण आहे.
रमेश चव्हाण यांनी हे विचार पुस्तकरूपाने प्रकाशित करून मोलाची कामगिरी केली आहे. परिवर्तनवादी चळवळीत काम करणारा वाचक या पुस्तकाचे स्वागत करेल, असा विश्वास वाटतो.
‘लोकशाही समाजवादाची प्रेरकशक्ती : राजर्षी शाहू’ - रा. ना. चव्हाण
संपादक व प्रकाशक : रमेश चव्हाण
रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई
पाने - १९२
मूल्य - २५० रुपये
..................................................................................................................................................................
लेखक व्ही. एल. एरंडे माजी प्राचार्य व राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
vlyerande@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment