अजूनकाही
१. संघटनेच्या रचनेचा विचार केल्यास भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर काँग्रेस कुठेही नाही. संघटनेच्या ढाच्याचा विचार केल्यास काँग्रेस आणि भाजपची तुलनाच होऊ शकत नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. ‘फिअरलेस अपोझिशन’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी चिदंबरम यांनी ही प्रांजळ कबुली दिली.
‘फिअरलेस ऑपोझिशन’ या पुस्तकाच्या नावाचा वेगळाच अर्थ लागलेला दिसतोय चिदंबरमसाहेबांना. ते आता पक्षांतर्गत निर्भय विरोधकाच्या भूमिकेत गेले आहेत, हे स्वागतार्हच आहे. मात्र, पक्षाकडे सत्ता असताना, सर्वसामान्य लोकांचा कट्टरतावादाला पाठिंबा नसताना, सर्व प्रकारची साधनं आणि वैचारिक बळ उपलब्ध असताना आपण अशा प्रकारची संघटनात्मक बांधणी का केली नाही, याचं उत्तर त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनीच द्यायला हवं, नाही का? की ते करायला संघातून कोणाला आयात करण्याचा विचार होता?
.............................................................................................
२. योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे कट्टरपंथीयांना थप्पड बसली आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या उमा भारती यांनी केले आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले तो क्षण आणि माझा लहान भाऊ आदित्यनाथ मुख्यमंत्री झाला, हा क्षण सर्वाधिक आनंदाचा आहे असे उमा भारतींनी म्हटले आहे. आदित्यनाथ हे विकास आणि राष्ट्रवाद हे दोन्ही मुद्दे घेऊन कार्य करतील, असे त्या म्हणाल्या.
उमाताईंनी हे विधान गाल चोळत केलं होतं का? आदित्यनाथांच्या निवडीने थप्पड बसलेले कट्टरपंथी कोण असतील नाहीतर? की हे काट्याने काटा काढण्याचं सूचन आहे? बाकी विकास तुम्हाला दत्तक आला आहे आणि राष्ट्रवाद तर तुमच्याकडे पाणी भरतो आहेच. त्यामुळे त्याबाबतीत कोणालाच कसलीही शंका नाही.
.............................................................................................
३. योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्याची उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा राम मंदिराची आठवण करून दिली आहे. योगी आदित्यनाथांच्या कार्यकाळात राम मंदिर झाले नाही, तर मग कधीच होणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
किती हे प्रभू श्रीरामचंद्राचं अवमूल्यन? मंदिरासाठी त्यांना (शिवसेना जिवंत असताना) कोणा योगी आदित्यनाथांवर अवलंबून राहावं लागणार आहे का? शिवसैनिकांनी मनात आणलं तर ते काय करू शकतात, हे पंचवीस वर्षांपूर्वी करून दाखवून झालेलं आहेच. घ्या पुढाकार! अर्थात एक राजकीय दुकान कायमचं बंद करायची तयारी असली तरच.
.............................................................................................
४. भारत बदलत असून आता एक रुपये प्रति किलो या दराने तांदूळ आणि गहू देऊन दलित तसेच आदिवासी मतदारांना आकर्षित करता येणार नाही, असे परखड मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मांडले आहे.
बरोबर आहे. मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता त्यांना तात्काळ ‘विकास’ हवाय. म्हणजे, आताच्याच निवडणुकांचा विचार केला तर मतदारामागे एक गुलाबो, एखादा खंबा, तीनचार सभांच्या पगारी पक्षकार्याची हमी अशी कुटुंबामागे १०-२० हजाराची तयारी ठेवावी लागते. सोसायट्यांमध्ये गळक्या टाक्या दुरुस्त करण्यापासून फरशा बसवण्यापर्यंत विकासकार्य करावं लागतं. नोटाबंदीनंतर ते सत्ताधाऱ्यांशिवाय कुणालाच परवडत नाही, हे दुखणं दिग्गीराजा सांगू शकत नाहीत.
.............................................................................................
५. हिंसक जनआंदोलनं आणि दहशतवाद यात फरक आहे. तो ओळखून सावधपणे कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा सध्या असंतुष्ट असलेले आंदोलक उद्या दहशतवादाकडे वळतील, असा सल्ला इस्रायलचे संरक्षणतज्ज्ञ प्राध्यापक बोएझ गनोर यांनी भारताला दिला आहे. हिंसक आंदोलने म्हणजे दहशतवाद आहे असे मला वाटत नाही. अशी आंदोलने घडू नयेत म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र ती हाताळताना बळाचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. आंदोलकांना कमीतकमी इजा पोहोचेल हे पाहिजे. अन्यथा आज केवळ प्रक्षुब्ध आंदोलक असलेले तरुण उद्या दहशतवादाचा मार्ग स्वीकारतील, असे गनोर म्हणाले.
एका इस्रायली संरक्षणतज्ज्ञाने असे विचार मांडणं फारच अन्वर्थक आहे. पण, गनोरसाहेब, देशाचं, जगाचं राजकारण चालवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या घटकाला दहशतवादी ठरवणं आवश्यक असतं. त्याशिवाय सत्तासमतोल राहात नाही. हिंसक आंदोलनंही त्यासाठीच पेटती ठेवायला लागतात, चिरडावी लागतात, लोक दहशतवादाकडे वळतील, असं पाहावं लागतं. कितीतरी लोकांची पोटं असतात या धंद्यांवर. त्या सगळ्यांना सांभाळावं लागतं. हे भारतीयांनी इस्रायलींना सांगण्याची वेळ यावी, हेच आश्चर्य.
.............................................................................................
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment