‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स ॲन्ड अब्युज’ अर्थात ‘मावा’ ही मुंबईस्थित संस्था गेल्या २६-२७ वर्षांपासून महिलांवरील हिंसा आणि लिंगभाव यांविषयी युवक व पुरुषांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहे. स्त्री-पुरुषांकडे पाहण्याची पारंपरिक, साचेबद्ध चौकट मोडून लैंगिक विविधतेचा उदारपणे कसा स्वीकार करावा, यासाठी या संस्थेकडून वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. समाजातलं पुरुषी वर्चस्व कमी करून लैंगिक असमानतेबाबतचा दृष्टीकोन बदलणं ही सोपी गोष्ट नाही, नसते. त्यासाठी खूप चिकाटीनं प्रयत्न करावे लागतात. संयमानं हे प्रश्न हाताळावे लागतात आणि तितक्याच संयमानं ते तरुण आणि पुरुषांपर्यंत पोहचवावेही लागतात. हे आव्हान पेलत ही संस्था काम करते आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेतर्फे दरवर्षी ‘पुरुषस्पंदनं’ हा दिवाळी अंकही काढला जातो. गेली २६ वर्षं लैंगिक असमानतेबाबतचे वेगवेगळे पैलू केंद्रस्थानी ठेवून हा अंक प्रकाशित होतो आहे.
यंदाचा ‘पुरुषस्पंदनं’चा २७वा दिवाळी अंक आहे. या अंकाची मध्यवर्ती संकल्पना आहे - ‘माणूस ते माणूसपण यातला अदभुत प्रवास’. त्याअनुषंगाने या अंकात लेख, कविता, मुलाखती आहेत.
‘बलात्कार-संस्कृती थांबवण्यासाठी’ हा परिसंवाद हे या अंकाचं मुख्य आकर्षण आहे. त्यातला हा एक लेख संपादकांच्या पूर्वपरवानगीसह...
.................................................................................................................................................................
“तिने देवाचे नाव घेऊन त्या बलात्कार करू पाहणाऱ्या पुरुषांपैकी एकाचा हात धरला असता आणि त्याला ‘तुला मी माझा भाऊ मानते आणि मी असहाय्य आहे’ असे म्हणाली असती... त्यांतील इतर पुरुषांचेही हातपाय धरले असते, तर ते गैरवर्तन झालेच नसते. त्या अघोरी कृत्याला ती मुलगीही (जिला पुढे ‘निर्भया’ म्हणून संबोधले गेले) त्या पुरुषांइतकीच जबाबदार आहे...”
- आध्यात्मिक गुरु आसाराम, साल २०१३
“लड़कियाँ पहले दोस्ती करती हैं। लड़के-लड़की में मतभेद हो जाता हैं। मतभेद होने के बाद उसे रेप का नाम दे देती हैं। लड़के लड़के हैं।... लड़कोंसे गलती हो जाती हैं । क्या रेप केस में फांसी दी जाएगी?”
- समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, साल २०१४
“तरुण तेजपाल यांनी तिच्यावर लैंगिक आघात केला असा दावा करणारी मुलगी घटना घडल्यानंतर जराही डिस्टर्ड, भेदरलेली, अस्वस्थ अशी दिसली नाही....”
- न्यायाधीश क्षमा जोशी यांनी तेजपालला निर्दोष असल्याचे सुनावताना व्यक्त केलेले मनोगत, साल २०२१
वरील तीन प्रसंगांतून धर्म, राजकारण, न्यायव्यवस्था या तीन समाज घटकसंस्थांतील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेल्यांचा बलात्कार, बलात्कार-पीडितेविषयीचा दृष्टीकोन कुठल्याही संवेदनशील माणसाला हेलावून सोडेल, पण बलात्कार-संस्कृती वृद्धिंगत करण्यामध्ये हा दृष्टीकोन किती खोलवर आपल्या समाजात रुजलाय, ते आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ, आणि ही संस्कृती थांबवण्यासाठी काय ठोस करायला हवं, तेसुद्धा समजून घेऊ.
बलात्कार हा स्त्रियांवरील लिंगाधारित हिंसाचारापैकी एक प्रकार, टोकाचा पण स्त्रियांच्या आयुष्यावर, समाजमानसावर दूरगामी परिणाम करणारा, एक माणूस म्हणून स्त्रीचा अनादर करणारा तीव्र स्वरूपाचा अत्याचार.
बळाचा वापर करून, जबरदस्तीने पुरुषाने एखाद्या स्त्रीच्या (पत्नीव्यतिरिक्त) योनीमध्ये लिंगप्रवेश करणं, ही ढोबळमानाने भारतीय समाजात कायद्याच्या चौकटीत बलात्काराची व्याख्या केली जाते. डिसेंबर २०१२मध्ये दिल्लीतील बसमध्ये एका पॅरामेडिकल मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर जो देशभर आक्रोश झाला, त्यानंतर बलात्काराची व्याख्या अधिक विस्तृत करण्यात आली- पुरुषाने स्वतःची बोटं वा कुठलाही अवयव किंवा वस्तू स्त्रीच्या योनीभागात जबरदस्तीने घालणे, जबरदस्तीने केलेले मुखमैथुन वा गुदामैथुन हे प्रकारदेखील त्या सुधारित व्याख्येमध्ये येतात.
बलात्कारामध्ये अनुस्युत काय आहे? तर बळाचा वापर, स्त्रीच्या शरीरावरील पुरुषाची मालकित्वाची भावना अधोरेखित करणं. आठ वर्षीय मुलगी असो की, ६५ वर्षांची स्त्री, ग्रामीण भागातील असो व शहरी-निमशहरी भागातील, निरक्षर गृहिणी ते सुशिक्षित, कमावत्या स्त्रिया - वय, जात, स्तर, धर्म, शिक्षण कोणतेही असो, देशातील असंख्य खियांवर बलात्काराच्या घटना होत असल्याबद्दल आपण ऐकत असतो, दूरचित्रवाणीवर पाहत असतो. या सर्व घटनांमध्ये पुरुषांच्या मनात कामवासना असते, म्हणून केवळ तो बळजबरी करत नसतो, तर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी व स्त्रियांवर दुय्यमत्व लादण्यासाठी, मुलींना- स्त्रियांना कशाही पद्धतीने ‘जिंकणे’ म्हणजेच पुरुषार्थ अशा भ्रामक समजुतीतून असंख्य पुरुषांकडून बलात्कार केले जात असतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
मुलगी/स्त्री म्हणजे ‘घराची इज्जत’ अशी संकल्पना वर्षानुवर्षे बिंबवल्याने आपण ऐतिहासिक युद्ध - लढाया, सामुदायिक दंगली यांवर एक दृष्टिक्षेप टाकला तर आपणास लक्षात येईल की, एका समुदायाच्या गटाने दुसऱ्या समुदायाच्या व्यक्तींना विशेषतः पुरुषांना / शत्रूंना धडा शिकवण्यासाठी, नामोहरम करण्यासाठी स्त्रियांना पळवून लावणे, त्यांच्यावर बलात्कार हे शस्त्र म्हणून वापरले गेले आहे. आपला स्वातंत्र्याचा इतिहासही असंख्य हिंदू तसेच मुस्लीम स्त्रियांच्या देहाची विटंबना झाल्याच्या दाखल्यांनी (अशाच सामूहिक पुरुषी मानसिकतेमुळे) काळाकुट्ट आहे. त्याचा उल्लेख केला तर अनेकांच्या जखमा ताज्या होतील, या भीतीपोटी तो कधी जनसमुदायांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये चर्चेला आणला जात नाही, हे कटू वास्तव आपण समजले पाहिजे.
स्त्रियांवरील दुय्यमत्व समाजात बिंबवण्यामध्ये विविध क्षेत्रांतील पुरुषांप्रमाणे काही स्त्रियाही पद्धतशीरपणे पसरवू पाहताना आपल्याला दिसेल. सोलापूरच्या अपर्णा रामतीर्थकर यांचे स्त्रियांबाबतचे प्रतिगामी विचार ग्रामीण महाराष्ट्रात अनेक वर्षे तरुण मुला-मुलींवर प्रभाव टाकत असल्याचे दिसून येते. “उंबऱ्याची मर्यादा असते मुलगी. बाईनं उंबरा ओलांडायचा नसतो. उंबरा म्हणजे मर्यादा... एक भारतीय स्खी नुसत्या शिक्षणामुळे कधीच यशस्वी होऊ शकत नाही... बायकोनं नवऱ्याला चहा देतानाही थरथर कापलं पाहिजे, तीच खरी संस्कृती...” यांसारखी त्यांची व्याख्यानांतील वक्तव्ये स्त्री-पुरुष विषमतेलाच खतपाणी घालण्याचे काम करत आली आहेत.
स्त्रियांना मिळणारी दुय्यमत्वाची वागणूक कुठेतरी त्या बलात्कार-संस्कृतीच्या मुळाशी दडलेली आहे, हे समजून घ्यायला हवे. ही बलात्कार-संस्कृती काहीएक दिवसांनी रुजवलेली बाब नव्हे. ती वर्षानुवर्षे रुजवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्या सर्वांचा समाचार या लेखात घेणे शक्य नाही. पण महत्त्वाच्या काही घटकांबद्दल आपण विचार करू.
हिंदी सिनेमा वा बॉलिवुडमधील गाणी, संवाद, हिरो-हिरोईनचे हावभाव-केशभूषा या सर्वांचा वाढाळू मुलं-मुलींवर प्रभाव होतच असतो. ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इन्कार मगर इक्रार तुम्ही से कर बैठे’ यांसारखे सिनेगीत स्त्री आपला नकार ठामपणे व्यक्त करण्यात असमर्थ असल्याचे जसे अधोरेखित होते, तसेच ‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी’ किंवा गेल्या दशकांतील ‘जादू तेरी नज़र, खशबू तेरा बदन, तू हाँ कर या ना कर, तू हैं मेरी किरण’ या सिने-गीतांमध्ये स्त्रियांवरील पुरुषांची मालकित्वाची भावना अधोरेखित होत असताना आपण पाहतो.
हिंदी सिनेमांतील केवळ अभिनेत्यांद्वारे पुरुषी वर्चस्व व मालकित्वाची भावना रुजवलेली दिसत नाही, तर अभिनेत्रींद्वारे देखील त्या भावना चित्रित केलेल्या बघायला मिळतात, ‘तूने मारी एंट्रीयां और दिलमें बजी घंटीया’ या गाण्यात चित्रपट नायिका सामील होऊन ‘मैंने मारी एन्ट्री और दिल में बजी... पीछे मेरी आशिकोकी पूरी पूरी कन्ट्रियाँ’ असे गाऊन स्त्रीची मादी म्हणून असलेली भूमिकाच ठसवत असते.
सुमारे चार वर्षांपूर्वी मी दिल्लीतील एका विश्वविद्यालयात गेलो असताना मला एका प्राध्यापिकेने त्या वेळी बहुचर्चित असलेले सिने-गीत ‘कद्दू कटेगा तो सब में बटेंगा’ या गीतामध्ये दडलेला ‘सामूहिक बलात्कार’ मला समजावला. या गीताच्या चालीवर दिल्लीत अनेक ठिकाणी कोवळ्या मुली सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये (गाण्यातील गर्भित भाग न समजता) नृत्य करत असल्याचे त्यांनी दाखले दिले, त्याने मी चक्रावूनच गेलो. बॉलिवुडच्या सिनेमांमधून ‘Male Gaze’ (पुरुषी नजर) सिनेदिग्दर्शक, सिनेकलाकार व प्रेक्षकांद्वारा कशी पद्धतशीरपणे बिंबवली जाते, त्याविषयी आपण सर्व चांगले सुपरिचित आहोत.
आया-बहिणींच्या नावावरून केली जाणारी शिवीगाळ ही भारतीय समाजमनाच्या आरशाचे प्रतिबिंबित होणारी बाब. राग, संताप अनावर झाला की पुरुष अशी शिवीगाळ करतात, हे बऱ्याचदा कारण सांगितले जाते. पण त्या सर्व शिव्या आया-बहिणीवरूनच, त्यांच्या लैंगिक अवयवांवरून अधिक असल्याचे दिसून येते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
उत्तर प्रदेश (पूर्व)मध्ये तर लग्नांमध्ये स्त्रिया अशा प्रकारे शिवीगाळ करण्याचा रिवाज कैक वर्ष पाळला जातो. गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या मनीष कुमार यांनी अनेक वर्षं शिवीबंद अभियान जनसमुदायामध्ये यशस्वीjfत्या राबवले आहे. ‘सवाल-जवाब’च्या स्वरूपात लग्नसोहळ्यामध्ये स्त्रिया करत असलेल्या शिवीगाळबद्दल मनीष म्हणतो- “उन गालिओं से भरे गानों को अधिकतर लोग बड़े चाव से, मजे ले कर सुनते हैं. गानेवाली लड़कियां / महिलाएं भी उस समय महिलाओं के यौनिकता, योनिक अंगो से सम्बन्धित, एक महिला के अलग अलग रिश्तेदारों से शारीरिक सम्बन्ध करने, पुरुषों के यौनिक अंगो / लिंग / योनिक व्यवहार पर गाने गाती हैं और उनको शर्म / झिझक / परेशानी नहीं होती. जो बातें उस समय गा दी जाती हैं, बोल दी जाती हैं उसी बात को अन्य जगहों पर या किसी और दिन कह दिया जाय तो उन्ही लोगों को बुरा लग जा सकता हैं.”
यांवर अधिक तपशील देत मनीष सांगतो, “उत्तर प्रदेश (पूर्व) में शादियों में जब लड़की का भाई लड़के को ‘तिलक’ चढ़ाता हैं, वहाँ पर लडके के भाई / बहन को गाली दी जाती हैं. लड़के के द्वारपूजा (जब लड़का पहली बार बारात ले कर लड़की के दरवाजे पर जाता हैं) समय गाली गाया जाता हैं. जब लड़का लड़की की शादी होती रहती हैं, तो उस जगह (माड़ो) पर लडके के पिता, फूफा, माँ, बहन, मामा, मामी को गाली दी जाती हैं. जब शादी के बाद बिदाई से पहले लड़का लड़की को लेने उसके घर जाता हैं, उस समय उसको गाली दी जाती हैं. उसके बहन को गाली दी जाती हैं. सभी गाली लड़की की ओरसे आई, बहन और महिला रिश्तेदार लोगही देते हैं / गाते हैं. चिंता इस बात कि हैं कि गाली गाते वक़्त वह छोटे बच्चे- बच्ची, बुढे उम्रदराज लोग भी रहते हैं और उनको कोई फर्क नहीं पड़ता. गालियां औरतों के खिलाफ़ ‘शाब्दिक हिंसा’ हैं - जब तक इस दुष्टिसे समाज देखता नहीं तब तक हम महिलाओंको एक दुय्यम, लैंगिक उपभोग की वस्तु करके ही देखते रहेंगे।”
मनीषकडून हेही समजले की, उत्तर प्रदेशच्या एका प्रसिद्ध विद्यापीठात जास्तीत जास्त खालच्या पातळीवरच्या शिव्या म्हणण्याची विद्यार्थ्यांमध्ये वार्षिक स्पर्धा अनौपचारिकपणे होत असते (जरी त्या शिक्षक वा प्रशासनाद्वारे पुरस्कृत नसल्या तरी). थोडक्यात, शिवीगाळ ही आपली जुनी राष्ट्रीय सवय बनली आहे. आणि जुन्या सवयी सहसा जात नाहीत.
स्त्रियांवरील लिंगाधारित हिंसाचाराला सोबत दिलेल्या पिरॅमिडकडे पाहन समजून घेऊ. पिरॅमिडच्या खालच्या पातळीवर ‘लॉकर रूम हवाच, रेप जोक्स, लैंगिक शेरेबाजी, शिवीगाळ, वस्तूकरण’ हे दिसते, त्यावर ‘लिंगविशिष्ट भूमिका, लिंगभावातील साचेबद्धता. ‘छेडछाड, बलात्काराविषयी धमक्या, लैंगिक छळ’ हे त्यावर येते, तर ‘बलात्कार, लैंगिक जबरदस्ती, शारीरिक गैरवर्तन’ हे त्याच्या वरच्या पातळीवर, पिरॅमिडमध्ये खालच्या पातळीवर घडणाऱ्या घटना वरच्या पातळीवर घडणाऱ्या घटनांना बळकटी देत असतात, आणि त्यातूनच बलात्कार-संस्कृती वाढीस लागते.
‘लॉकर रूम उवाच, रेप जोक्स, लैंगिक शेरेबाजी, शिवीगाळ, वस्तूकरण’ हे प्रकार समाजात पुरुषांइतकेच स्त्रियांमध्येही इतके नॉर्मलाईझ (म्हणजेच दैनंदिन आयुष्यात सामान्य बाब म्हणून बघितले जाणे) झाले आहेत की, ते लैंगिक हिंसाचाराचे प्रकार म्हणून बहुसंख्याकांकडून पाहिलेच जात नाहीत.
ही संस्कृती थांबवण्यासाठी समाजाच्या तसेच व्यक्तिगत पातळींवर प्रत्येकाने ठोस पावले उचलायला हवीत.
१) स्त्रीला एक दुय्यम व्यक्ती किंवा लैंगिक उपभोगाचे साधन (मादी) म्हणून न पाहता स्वतःच्या आवडीनिवडी असणारा ती एक हाडामांसाचा माणूस आहे आणि तिला सन्मानाने, सुरक्षितपणे जगण्याचा मूलभूत मानवी हक्क आहे, असे समाजात विशेषतः पुरुषांमध्ये, मुलग्यांमध्ये रुजवले गेले पाहिजे.
२) स्त्रियांवरील कुठल्याही हिंसाचाराच्या घटना समोर घडलेले पाहताना मौन सोडा, त्या घटनेबद्दल बोला, स्त्रियांच्या हक्कांबद्दल ठोस भूमिका घ्या. संबंधित घटनांमध्ये हिंसक असणाऱ्या पुरुषाचे नाव खुलेपणाने जाहीर करत (calling out) त्याचा तीव्र शब्दांत इतर पुरुषांनी निषेध करायला हवा. सर्वच क्षेत्रात हे व्हायला हवे. पण दुर्दैवाने अशी उदाहरणं फार कमी आढळतात.
३) लैंगिकता याविषयी मोकळेपणाने बोलल्याशिवाय आपल्याला बलात्काराच्या मुद्द्यावर पुढे जाताच येणार नाही. ‘लैंगिकता शिक्षण’ हा आजही देशातील असंख्य शालेय, किशोरवयीन मुला-मुलींसाठी वर्जित विषय आहे. आपल्या तथाकथित पुरोगामी राज्याच्या एका माजी शिक्षणमंत्र्याने एकदा मंत्रालयात या विषयावर मी शासनाच्या धोरणाबद्दल वाच्यता केल्यावर मला ‘लैंगिकता’ शब्दाला काही पर्यायी शब्द आहे का असे विचारले होते. लैंगिकता शब्द बोलायला (‘जीवनकौशल्यविषयक शिक्षण’सारखे पर्यायी शब्द असले तरी) जर आपल्या राज्यातील शिक्षणमंत्र्यालाच त्रास होत असेल, तर या विषयावर आपल्याला किती काम करणं बाकी आहे, हे सुज्ञ वाचकांना सांगायची गरज नाही!
४) नातेसंबंधांमध्ये ‘सहमती नकार’ (Consent Dissent) या विषयावर तरुणांमध्ये नियमितपणे संवाद व्हायला हवा. देशात अस्तित्वात असलेल्या लैंगिक गुन्ह्यांविषयीच्या कायद्यांमध्ये या मुद्द्यांवर स्पष्ट व्याख्या जरी असल्या, तरी अनेक तरुणांना हे विषय नीटपणे सोप्या भाषेत समजावून सांगण्याची गरज आहे. ‘Partners for Law in Development’ या दिल्लीतील संस्थेने हा विषय सोपेपणाने समजावण्यासाठी अनेक व्हिडिओंची निर्मिती केली जे यु-ट्युबवर सर्वांसाठी आज उपलब्ध आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
बलात्कार-संस्कृती थांबवायची असेल तर पर्यायी, स्त्रीचा आदर करणारी संस्कृती रुजवायला हवी. आणि हे काम देशात अधिकाधिक मुलग्यांसोबत, पुरुषांसोबत व्हायला हवं.
महाविद्यालयीन युवकांसोबत मी लिंगसमभाव व संबंधित मुद्द्यांवर काम करत असताना काही वर्षांपूर्वी आम्ही मुलग्यांसाठी एक पथनाट्य कार्यशाळा घेत होतो. विकासाच्या क्षेत्रात संवाद माध्यमाविषयी अथकपणे काम करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील राजू इनामदार यांनी ती कार्यशाळा घेतली होती. विविध तारुण्यसुलभ माध्यमांद्वारे मुलग्यांमध्ये प्रबोधन केल्यानंतर राजूच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले हे गीत बलात्कार-संस्कृती थांबवू इच्छिणाऱ्या व सशक्त, निरोगी समाजनिर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वच पुरुषांना मोलाचा संदेश देणारे असे गीत आहे-
आवर दादा रं, मनाला सावर दादा रं
बाई नाही खेळणं रं, जीवाला तिच्या जाण रं //धु//
मर्दपणा तुझा हा बोकाळला फार रं /
वस्तू नाही बाई जरा मोल तिचं जाण /
मादी म्हणून लागू नको नुसता तिच्या मागं रं /
तिला वाटल सुरक्षित याचं ठेव भान /
सन्मानानं जगण्याचा आहे तिचा हक्क रं /
आवर दादा रं, मनाला सावर दादा रं //१//
प्रेमाला ती नाही म्हणते, मान तिचा ठेव /
स्पर्शाला ती नाही म्हणते, जाण याची ठेव /
लग्नाला ती नाही म्हणते, भान जरा ठेव /
हिंसेला ती नाही म्हणते, आन म्हणी ठेव /
तिच्या तना मनावर तिचाच हक्क रं /
जाण दादा रं तू मान दादा रं /
नाही म्हणण्याचा आहे बाईला हक्क रं /
आवर दादा रं, मनाला सावर दादा रं //२//
आवडीचं शिक्षण तिला घेऊ दे रे दादा /
मैदानात खेळ तिला खेळू दे रं काका /
रोजगाराचा हक्क तिचा आहे की रे बाबा /
नाही तुझा अपमान, तिचा सन्मान रं /
आवर दादा रं, मनाला सावर दादा रं //३//
‘पुरुषस्पंदनं’ - माणूसपणाच्या वाटेवरची : संपादक हरीश सदानी
पाने - २६८, मूल्य - २५० रुपये.
.................................................................................................................................................................
हरीश सदानी
saharsh267@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment