‘विलोभ’ हा राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील मराठी भाषक कवी-कवयित्रींच्या मराठी आणि हिंदी रचनांचा प्रातिनिधिक कवितासंग्रह लवकरच जोश प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या संग्रहाचे साक्षेपी संपादन डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले आहे. या संग्रहात भारतीय विदेश सेवेतील माजी अधिकारी आणि लेखक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पाच कवितांचा समावेश आहे. त्यांनी या संग्रहाला लिहिलेली ही प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
पूर्वार्ध
राजधानी दिल्ली, इथे असणारा मराठी समुदाय, दिल्लीत मराठीचा ध्वज फडकवू पाहणारा. इथं पाच ते सात लाख मराठी असावेत. ते महाराष्ट्रातील आहेत, महाराष्ट्रात नाहीत. मराठी मनातही नाहीत. शासनाच्या कॅनव्हासवरती आहेतही आणि नाहीतही. महाराष्ट्रातून इथे आल्यामुळे तसे ते महाराष्ट्राचे नाहीत. दिल्लीत रोजी-रोटी उत्तम चालली असली तरी ते दिल्लीचेही नाहीत. माहेर आणि सासर दोन्हींकडे दुर्लक्षित राहिलेला हा मराठी समुदाय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून दिल्लीकडे महाराष्ट्र सतत बघत आला आहे. छत्रपतींच्या नंतरही जवळजवळ दोन शतके महाराष्ट्राची मोहर दिल्लीवर प्रभावीरित्या टिकून होती. इंग्रजांनी ‘शनिवारवाड्या’वर ‘युनियन जॅक’ फडकवला तरी मराठी शौर्य चार दशकांनंतरही १८५७च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर होते. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि नानासाहेब यांच्या अद्वितीय पराक्रमाने तो संग्राम गाजला. हे सर्व लढवय्ये शूरवीर कानपूर, झाशी, ग्वाल्हेर या भागांतच स्थायिक झालेले होते. स्वातंत्र्ययुद्ध संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात मराठ्यांनी वास्तव्य केले. शिवाय त्याआधी पानिपतच्या युद्धानंतर मोठ्या संख्येने मराठी लोक पानिपत, कुरुक्षेत्र या भागांत राहिले. जसे उत्तरेत मराठी जनतेने आपले बस्तान मांडले त्याच प्रकारे दक्षिणेत तंजावर, हैदराबाद, बंगळुरू; मध्य व पश्चिम भारतात धार, देवास, इंदूर, बडोदा, या ठिकाणी बऱ्यापैकी मोठ्या संख्येने मराठी मंडळी स्थायिक झाली. महाराष्ट्राने दुर्लक्षित केलेली ही बृहन्मराठी जनसंख्या सहज कोटी-दीड कोटी असावी, असे जाणकार सांगतात.
यातल्या अनेकांनी आता स्थानिक भाषा, सणवार, रीती, शिष्टाचार वगैरे स्वीकारले असले, तरी त्यांनी अनेक प्रकारे मराठी ओळख टिकवण्याचा प्रयत्नही केला आहे. मराठी ग्रंथालये, मराठी शाळा, शिवजयंती, गणेशोत्सव, मराठी साहित्य व पत्रिका असे अनेक उपक्रम आजही सुरूच आहेत. पण इतिहासाच्या ओघात अनेकांनी उपजीविका, नोकरी, व्यवसाय यांच्या सोयीसाठी परप्रांतात पूर्णपणे स्थायिक होणे पसंत केले आहे.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जसजसे लोक प्रवास करू लागले; नोकरी, व्यवसायाच्या संधी शोधत स्थलांतर करू लागले, तसतशी दिल्लीतील आणि अन्य शहरांतील मराठी भाषिकांची संख्या वाढू लागली. फेसबुक, ईमेल, मोबाईल यांच्या माध्यमातून बाहेरच्या मराठी भाषिकांनी महाराष्ट्रातील त्यांची मुळे शोधण्याबरोबरच संस्कृती व भाषा दृढ करण्यासाठी प्रयत्नशील व्हायला सुरुवात केली. त्यामुळे दिल्लीसारख्या ठिकाणी ‘नूतन मराठी विद्यालय’, ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ’, ‘चौगुले प्रशाला’, ‘छत्रपती शिवाजी म्युझिअम’, ‘स्नेह संवर्धक समाज’, ‘वनिता समाज’ इ. जुन्या संस्थांना नव्याने चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली. देशातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये शिवजयंती व गणेशोत्सव साजरे होऊ लागले. मराठी भाषेत रुची वाढून हैदराबाद, इंदूरसारख्या ठिकाणी मराठी दिवाळी अंक व पत्रिका निघू लागल्या. या दरम्यान महाराष्ट्र शासनही जागे झाले आणि बृहन्महाराष्ट्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान देण्याची योजना सुरू झाली. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या शासनाच्या अभियानातही बृहन्महाराष्ट्र मदत करत आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
या पार्श्वभूमीवर दिल्लीतील १८ मराठी भाषिक कवींच्या मुख्यत: मराठी व काही हिंदी कवितांचे हे संकलन रसिकांच्या हाती देताना आम्हा सर्वांना आनंद होत आहे. ही सर्व मंडळी गेली काही दशके महाराष्ट्राबाहेर तर आहेच पण जवळजवळ सगळीच तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, दूरसंचार अशा कवितेपासून दूर असणाऱ्या क्षेत्रांत आपापला ठसा उमटवलेली मंडळी आहेत. केवळ मातृभाषा आणि महाराष्ट्र हीच प्रेरणा, हाच दुवा आणि हाच ध्यास घेतलेली ही मंडळी आहेत म्हणूनच या कवितांना विशेष महत्त्व आहे.
या संग्रहात १८ कवींपैकी ७ कवयित्री आहेत. या कवयित्रीसुद्धा स्वतंत्र व्यक्तिमत्त्व व विचार घेऊन समोर येतात. काही जणींचे संग्रह यापूर्वी प्रसिद्ध झालेत, पण अनेक या संग्रहाच्या रूपाने पहिल्यांदा पुस्तकात पदार्पण करताहेत. सर्वच कविगण अभिनंदनाला पात्र आहेत.
या कवितांविषयी काही शब्द उचित ठरतील. या कविता मुख्यत: तीन प्रकारच्या विषयांवर आहेत. पहिला विषय आहे पारंपरिक प्रेम, स्त्री-पुरुष, नाते, माता व मातृभूमी यांच्याविषयीच्या- ‘तुझ्या डोळ्यात’, ‘भेट’, ‘भारत विश्व विधाता’, ‘विरह’, ‘सच्चा प्यार’, वगैरे शीर्षकाच्या कविता या वर्गात मोडतात. दुसरा प्रकार आहे - जगण्यातील सौंदर्यावर प्रेम करणाऱ्या कवितांचा. ‘पिंपळ’, ‘किनारा’, ‘जीवन ज्योत’, ‘पाऊस धारा’, ‘पाखरू’, ‘पायवाट’, अशा कविता जीवनाविषयीची बारीक निरीक्षणे नोंदवतात. यात पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या ऱ्हासाविषयी चिंता करणाऱ्या कवितांचाही समावेश होतो. तिसरा प्रकार दार्शनिक कवितांचा. यात जीवनाविषयीच्या निरीक्षणांबरोबरच विचार, चिंतन व तत्त्वज्ञानाकडेही झुकणाऱ्या कवितांचा समावेश होतो. ‘मृत्यु’, ‘दु:ख’, ‘प्रतिशोध’, ‘विधात्यास’, ‘पैलतीर’, वगैरे कविता या प्रकारात मोडतात.
वयोगट, जीवनानुभव आणि प्रगल्भता यांतील विविधतेमुळे अनेक स्तरांवर वावरणाऱ्या कवितांचे आपण स्वागत करू या. महाराष्ट्राबाहेर राहून महाराष्ट्रावर प्रेम करणारे कवी व लेखक महाराष्ट्राच्या संपन्न सांस्कृतिक परंपरेचे समर्थकच नव्हे, तर अस्सल राजदूत म्हणून कार्यरत आहेत.
या संग्रहाचे व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या पाच कलाप्रेमींचा उल्लेख इथे अपरिहार्य ठरतो. ज्यांनी बहिरंग आणि अंतरंग उजळून टाकणारी चित्रे काढली आहेत, ते चित्रकार सतीश भावसार, उमेश कवळे; सुगम मांडणी करणारे केतन बंगाल, मराठी आणि हिंदी शुद्धलेखन कटाक्षाने तपासणारे विकास पालवे आणि डॉ. अदिती जोशी. ‘विलोभ’च्या निमित्ताने आपण त्यांचे अभिनंदन करू या.
या प्रस्तावनेच्या उत्तरार्धात प्रत्येक कवीच्या कवितांवर थोडा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तरार्ध
अतुल मोघे शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने ऑटोमोटिव क्षेत्र आणि लेखणीत कविता. ‘कर्मठ’, ‘जीवनसाथी’, ‘आनंद स्तवन’, ‘नारी’ व ‘चाँद और सूरज’, या पाच कविता सर्वसामान्य जीवनातील पाच महत्त्वपूर्ण विषयांवर आणि हिंदीत लिहिलेल्या. त्यांच्या जीवनातील तंत्रज्ञानाचा प्रभाव कवितेतील सफाईदार रचनेत आणि उत्तमोत्तम यमकांमध्ये दिसतो. विषय परिचित असले तरी ‘जीवन में लय लानी हैं तो, मध्यम द्रुत ला, ठाह नहीं’, ‘थल में हो या फिर हो जल में, दूर गगन की शान हैं नारी,’ अशा सुंदर ओळींची पखरण कवीच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडवते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
अविनाश अनंत जोशी हे दुसरे कवीही अभियंते असून ऑटोमोटिव उद्योगात रमलेले. ‘हाफ मॅरेथॉन रनर’ असलेले त्यांचे कविमन आहे. त्यांच्या ‘मी पुन्हा येईन’, ‘खुळा मी’, ‘मनमीत’, ‘पावस’ व ‘घरची अबोली’ या कविता वेगळ्या ढंगाच्या असून त्यावर त्यांच्या व्यक्तित्वाची छाप स्पष्ट दिसते. ‘मी पुन्हा येईन’ ही कविता शीर्षकाच्या बाबतीत ओळखीची आहे, पण कविता एका ‘निश्चयाचा पुनरुच्चार’ अशा अर्थाने वाचनीय आहे. ‘तिमिराला सारून प्रकाश करीन’ हा कवीचा विश्वास प्रत्येक ओळीतून उघड होतो. ‘मनमीत’ कवितेतील ‘जन्मांतरीची साथ आपुली, मी राधा तू जगदीश रे,’ ही ओळ कवितेला उंची देते.
आरती शिरीष कुलकर्णी या संग्रहातील सात कवयित्रींपैकी सर्वप्रथम येतात. त्यांचा परिचय दिल्लीतील साहित्यिक, सांस्कृतिक पटलावर सजग असणाऱ्या सर्वांनाच आहे. ‘नि:संग’ या पहिल्याच कवितेतील पहिली ओळ वाचकाला पुढची एकेक ओळ मन लावून वाचायला भाग पाडते. ‘पापण्यांच्या तिजोरीत दडवलेले आसू’, ‘दोषारोपांच्या असीम व्यथा’, ‘जमेच्या राशीतली ही खणखणीत नाणी’ ('जमाखर्च'), ‘गमक तुझ्या शांतीचे मला यशोधरेत गवसते’ (‘यशोधरा’) वगैरे शब्दयोजना खूपच वेगळ्या व भावणाऱ्या आहेत.
यानंतरच्या उमाकांत खुबाळकरांच्या हिंदी कविताही त्यांच्या वेगळ्या शैलीचे दर्शन घडवतात. ‘संदर्शन’ कवितेत ‘अपनी उम्र से आगे निकल जाता हैं’, या शब्दात ते भिकाऱ्याच्या मुलाबद्दल सांगतात, तेव्हा समाजातील विषमतेचे विकट दृश्यच आपल्याला दिसते. ‘नियति’ कवितेत शनिदेवाच्या नावावर भीक मागणाऱ्या मुलाचे करुणामय चित्रण हेलावून टाकते. ‘समवाद’ या कवितेत ‘राजनीति और वेश्या टकरा गई’ ही ओळ ‘राजकारण व वेश्याव्यवसाय’ यांच्या ‘लव-हेट’ नात्याचे उत्तम दर्शन घडवते. बाकीच्या दोन कविता ‘माँ’ आणि ‘अनास्था’सुद्धा, आपल्या मनात रुजलेल्या ‘आई’ आणि ‘देवी कामाख्या' यांच्याविषयीच्या प्रतिमांवरचे वेगळे निरुपण सादर करतात, विचार करायला लावतात.
डॉ. जयश्री मोघे या हिंदी साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांच्या पहिल्या दोन कविता (‘जीवन ज्योत’ व ‘किनारा’) उत्तम गीतांचा नमुना आहेत. त्यानंतरच्या तीनही कविता- ‘मृत्यु’, ‘संघर्ष’, ‘बसंत का आगमन’ - मुक्तछंदात असल्या तरी वाचकांना त्यातील लय पकडता येते. त्यांची सहजता आणि तरलता लक्ष वेधून घेते.
जीवन तळेगावकर दूरसंचार व्यवस्थापनातील विशेषज्ञ असूनही कवितेच्या क्षेत्रातही खूप दूरवर संचार केलेले व्यक्तिमत्त्व. ‘रात उपाशी, ओठ अधाशी, सुकलेले’, ‘उपास पोटी, मोट चालवी, रान कितीसे, उरलेले’, या ‘संघर्ष’ कवितेतील ओळी समाजातील शोषणाचे व आर्थिक विपन्नतेचे व्याकूळ करणारे दर्शन घडवतात. पण अशा विपरीत परिस्थितीतही ‘तिथे दीप लावू, तिथे ऊब देऊ’, असा आश्वासक सक्रिय आशावादही मांडतात. ‘अबू बेन आदम’ या कथात्मक कवितेत माणसांवर प्रेम करून समाजसेवा करणारी व्यक्तीच देवाला प्रिय असते आणि ती देवपूजेपेक्षा श्रेष्ठ आहे, हा संदेश गेय कवितेतून व्यक्त केला आहे. जुन्या मराठीतील वाटावी अशी ही कविता अगदी नवीन वाटते. कर्णाला स्वत:च्याच व्यक्तिमत्त्वातील चांगली-वाईट धर्मस्थाने व मर्मस्थाने कशी दिसली असती, यावरची ‘कर्णाचे गडगर्जन’ ही कविता कर्णाला ३६० अंशाच्या कोनातून पाहणारी आहे. ‘खळाळणाऱ्या प्रपाताला रोखू पाहणारा वात मी; की द्रौपदीच्या निर्मळ वस्त्रांना दु:शासनाने घातलेला हात मी?’ असे अस्वस्थ करणारे प्रश्न कर्ण विचारतो तेव्हा त्यातल्या विरोधाभासाला रसिक दाद दिल्याशिवाय राहणार नाही. तळेगावकरांच्या कविता मनातील तळापर्यंतच्या गावाला स्पर्शून अंतर्मुख करतात.
डॉ. प्रमोद खाडिलकर व्यवसायाने डिझाईन इंजिनिअर व मनाने कवी असून या दोन्हींमध्ये विरोध नाहीच. दोन्हींतही निर्मितीच्या प्रेरणा व अभिव्यक्ती महत्त्वाच्या असतात. ‘दुक्ख’ या पहिल्याच कवितेत ग्रामीण बोलीत एक हृदयभेदक सूचना ते ‘पोरीला’ देतात, ‘आभाळभर दुक्ख असीना का, त्ये वाळतंच, जगत रहावं माय, जगत रहावं’, दु:खाची अशी आगळी अभिव्यक्ती वेदनेला वेगळीच धार देते. ‘एकदा’ या दुसऱ्या कवितेतही कवी, ‘ऐकू येतात... पावलांवरच्या भेगा... खांद्यावरचं वजन’ अशा आगळ्यावेगळ्या आस्थेतील पीडा व्यक्त करतो. ही कविता हृदय भेदते पण ते अगदी साध्या भाषेत, सरळ शब्दांत. ‘भेट’, ‘निकष’, आणि ‘घाई आणि तू’ या कविताही अशाच संथपणे जीवघेण्या वाटतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
डॉ. बाळकृष्ण मातापूरकर हे भारतीय दर्शनाने प्रभावित आंतरराष्ट्रीय व्यक्तित्व. त्यांच्या सर्वच कवितांत ‘माँ भारती’चे गुणगान आणि अभ्यासू निरीक्षणांची पेरणी आहे. पहिल्या कवितेत ‘विश्वमर्म’, दुसऱ्या कवितेत भारताच्या विश्व शक्तीची रूपे, तिसऱ्या कवितेत मायभूचे महात्म्य, चौथ्या कवितेत ‘वंद्य भारता’चे दर्शन आणि शेवटच्या ‘दीपक’या कवितेत राष्ट्र कशा प्रकारे ‘उजळत’ चालले आहे, त्याचे वर्णन येते.
राधिका गोडबोले या कवयित्रीही शिक्षणाने अभियंता आणि मनाने कवी आहेत. पावसाचं वर्णन करणारी पहिली कविता, ‘पाऊस धारा’ आणि मनाचं वर्णन करणारी शेवटची कविता ‘आस’, दोन्ही वाचनीय आहेत. ‘सच्चा प्यार’, ‘बालिका दिन’ व ‘आस’ या तीन कविता हिंदी आहेत; त्या दोन्ही भाषांत कविता करतात, हे विशेष.
लक्ष्मीकमल गेडाम या प्रस्थापित लेखिकेच्या पाच कविता आहेत. पहिल्या कवितेत ‘कल्पतरू’चा शोध आहे, दुसऱ्या कवितेत सांजवेळचे सौंदर्य, तिसऱ्या कवितेत एका पाखराचे आर्त जीवन याचं वर्णन आहे. पण कवयित्रीच्या मोकळ्या मनानं अनुभवलेलं ‘हरखलं मन’, ‘माझे लोपले ‘मी’ पण’ या शेवटच्या दोन कविता अतिशय मनोरम आहेत. ‘आनंदाच्या या झाडाला चैतन्याचा गं झोपाळा’, हे शब्द मनाचं हरखलेपण किती तजेलदार शब्दांत पकडतात! तसंच शेवटच्या कवितेतील ‘श्रीरंगाच्या बासरीचा नाद मधुर घुमला, माझे लोपले ‘मी’ पण जीव चिंतनी रंगला’, या ओळीतील काव्यात्मकता व श्रीकृष्णाप्रती समर्पण भाव मनमोहक आहेत.
पुढचे कवी सतीश देवतळेही अभियंता आहेत. पाचही कविता प्रेम आणि मैत्री यांच्यावर आधारित आहेत. एका अभियंत्याचा हा काव्यमय प्रवास ‘तू आहेस ना’, ‘तुझ्या डोळ्यात’, ‘आयुष्य काय असतं,’ ‘फक्त तुझ्यासाठी व 'मी आहे', या पाचही कविता प्रियेला उद्देशून तिला धीर व साथ दोन्हींच्या बाबतीत आश्वस्त करणाऱ्या आहेत.
स्मिता देशमुख या ‘क्लिनिकल न्यूट्रीशनिस्ट’ आहेत आणि त्याहून महत्त्वाचे चांगल्या कवयित्री आहेत. त्यांची प्रत्येक कविता वेगळी आहे. शैली खास स्वत:ची आहे. 'ठिणगी' ही पहिलीच कविता बांगड्या हातात सरकवणारा कासार आणि बांगड्या भरून घेणारी युवती यांच्यातील नाजूक गहिऱ्या निर्मळ नात्यावर आहे. ‘विकणारे दोन हात, अलगद सरकवती हातात, भरणाऱ्याही विश्वासाने, हात देती हातात’ या ओळीत केवळ कासार आणि गृहिणी यांचा संवाद नसून दोन संस्कृती, दोन धर्म व दोन समूह जोडणारे धागे आहेत. इतर कवितांमध्ये ‘सटवाईच्या छुप्या सारीपाटावर, कधीकधी उलटे पडतात फासे’ अशा प्रकारच्या ओळी चमकून लक्ष वेधतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
अशाच तरल कविता आहेत सुचेता जोशी-अभ्यंकर या कवयित्रीच्या. शास्त्रीय संगीत, भाषाविद अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या कविता फुलल्या आहेत. ‘कविता सखी’ या पहिल्याच कवितेत त्यांच्या अल्पाक्षरी पण प्रभावी शैलीचा परिचय होतो. ‘की गहाण पडले शब्द, अन शुष्क जाहली शाई... ही कविता संपत नाही,’ अशी गोड तक्रार करत सुरू होणारी ही कविता ‘माझ्यावर प्रेम उधळते, परी कुठेच गवसत नाही,’ या ओळीने समेवर येऊन विश्राम घेते. ‘अल्प वाक्ये अर्थ गहिरा’ या कवयित्रीच्या शब्दामध्येच कवयित्रीच्या कवितांची समर्पकता पटते.
दूरसंचार क्षेत्रात काम करणारे सुबोध करजगीर हिंदीतील पाच सुंदर कवितांमधून स्वत:ची संवेदनशीलता जागवताहेत. गजलसदृश्य असणाऱ्या या कविता प्रेमभावाबरोबरच तरल व आशावादी भाव व्यक्त करतात. ‘पेंसिल और इरेजर’ ही एक अलग हटके अशी कविता, ‘पेंसिल और इरेजर में बेवजह तकरार हो गयी... बनी बनाईं दोस्ती पलभर में बेकार हो गयी’, अशा शब्दांत कवी जीवनातील सत्याकडे बोट दाखवतात. ‘बच्चों सी मासूम, बड़ों-सी सयानी हैं दुनियाँ’, असं म्हणतच जग काय आहे हे सुंदर शब्दांत वर्णन करतात. सर्वच कविता मोठ्याने म्हणाव्यात अशा आहेत.
सौमित्र जोशी हे कवितेचे भक्त आहेत. त्यांच्या पाचही कवितांमध्ये आशा-निराशा, प्रगती-दुर्गती, वाटचाल व संघर्ष यांचे दर्शन होते. जीवनातील चढ-उतारांवर ते भाष्य करतात. ‘भूख की मौत से तो बच निकले, पर हमारी सड़क पर ही हमारा शमशान हो गया’ या ओळीतून जगाच्या गुंतागुंतीबरोबरच थरकाप उडवणाऱ्या वास्तवाचे अचूक दर्शन होते. ‘मेरे सपनों का गाँव’, ‘प्रकृति और मानव’ या कवितांतही जीवनाचा आणि जगाचा विनाशाकडे जाणारा प्रवास सूचित केला आहे.
कवयित्री संगीता भंगाळे याही ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स’ अशा पार्श्वभूमीवर कवितेचा छंद जोपासून लिहिताहेत. वेगळ्या रंगाच्या या कविता जीवनाशी जवळचे नाते सांगत मातीच्या स्पर्शाने चैतन्यपूर्ण झाल्या आहेत. ‘विधात्यास’ या कवितेतील ‘हा मायेचा सर्व पसारा... पलीकडचा तू दिसशी त्यातून...’ ही ओळ सुंदर तर आहेच पण मायेच्या या पसाऱ्यातूनच किंबहुना तिच्या लोलकातूनच विधाता दिसतो हा विचारच देखणा आहे. ‘जीवनाच्या धगीमध्ये होरपळतो पोळतो’ अशी दाहक शब्दयोजना करतानाच कवयित्री, ‘लाल कणांची जिवंत, वीज अंगात खेळते’ अशी स्वत:त दडलेल्या ऊर्जेची जाणीवही स्पष्ट करते. प्राजक्ताचा सडा पडावा तसे नाजूक केशराचे सौंदर्य त्यांच्या सर्वच कवितांमधून घडते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
संदीप बोबडे हे अभियंता आहेत. सातत्याने कविता करतात. ‘मखमली चंद्र’, ‘श्रृंगारी चंद्रमा’, ‘हर पल बदलती इच्छा’, ‘माती (अन) मोल’ व ‘माझी माय काळी माती’ या त्यांच्या पाच कवितांमधून निसर्ग आणि माती यांच्यावरची त्यांची श्रद्धा व ओढ दिसते. ‘माती मंदी उगवलं, रोप किती हळुवार’ अशा सृजनशील प्रक्रियेशी ते मनाने जोडले गेलेत. ‘धरतीच्या ममतेले कमी कधी लेखू नाही’ या ओळी थेट बहिणाबाई चौधरींशी नातं सांगणाऱ्या वाटतात. ‘खोटे लाखांचे पोशिंदे, भ्रष्ट पांढरे बगळे’ असे व्यवस्थेतील कुरूपतेवर ताशेरे मारायलाही ते विसरत नाहीत.
एकूणच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील मराठी भाषिक कवी आणि कवयित्री यांना सोबत घेऊन ‘जोश प्रकाशना’ने काढलेला ‘हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह साहित्यातील एक मैलदगड ठरावा, असाच घडला आहे.
.................................................................................................................................................................
ज्ञानेश्वर मुळे
dmulay@hotmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment