अजूनकाही
१.
माझं बालपण कोकणात गेलं. आजोबा तेव्हा बऱ्यापैकी भातशेती करायचे. त्यामुळे कोकणातल्या पारंपरिक घरातल्या पोटमाळ्यावर धान्याचं टोपलं भरलेलं असायचं. घरात धान्यसाठा झाला की, उंदीर आलेच. आणि उंदरापाठोपाठ येतात मांजरं. उंदरांचं जग रात्री सुरू व्हायचं आणि मांजरांचंही.
या जगासोबत सुरू झालेलं असायचं माझं जग.
माझं बालपण मला सलग आठवत नाही. आठवतं ते उलटसुलट, तुकड्यांत. त्यातला एक तुकडा आहे मांजरांचा. खास असा तुकडा. त्याला बाजूला काढलं, तर सगळ्याच आठवणी अर्धवट राहतील. बोक्यांची भांडणं, अंगणात वावरणारी मांजरं, चुलीपाशी नोव्हेंबरात निवांत बसलेली मांजरं, बिबट्याच्या तावडीतून धूम पळालेली मांजरं वा गोबरगॅस जोडणीच्या एका पाईपमध्ये अडकलेलं मांजर, जिकडं तिकडं मांजरंच मांजरं...
पाळलेली नाही, तर हवी तेव्हा ये-जा करणारी, सुकवलेले मासे संधी मिळताच पळवणारी आणि लुसलुसशीत अंगावर चुलीतील उबदार राख दिसताच लोळून फासून घेणारी...
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
२.
जगात पाळीव मांजरांची संख्या ६० कोटींपेक्षा जास्त आहे. मांजर या प्राण्याला पाळीव होऊन दहा हजार वर्षं होऊन गेलीत. मार्जार कुळातील ३६ जातींपैकी जंगलातील वाघापेक्षा जास्त लोकप्रिय पाळीव मांजरं आहेत. वाघाच्या स्वभाववृत्तीचा ९६ टक्के भाग आजही पाळीव मांजरांमध्ये आहे. म्हणजे जवळपास शिकारीची तीव्र स्वभाव असलेल्या मांजरांना आज पाळलं जातंय. शेती करण्याची आणि मांजरं पाळण्याची सुरुवात यांचा काळही एकसारखाच आहे. आशिया खंडातील मध्य पूर्वेच्या एका सुपीक जमिनीच्या भागात मानवानं शेती करायला सुरुवात केली. ज्या भागात शेतीला सुरुवात झाली, त्याला ‘fertile crescent’ म्हणतात. सुपीक जमिनीचा चंद्रकोर सदृश्य भाग. तो भाग म्हणजे आताचे सीरिया, इराक, इस्राईल, जॉर्डन, लेबनॉन असे देश.
शेती वाढू लागली. धान्यसाठा वाढू लागला. आणि धान्यसाठा करण्याच्या ठिकाणी उंदरांचा उपद्रव सुरू झाला. धान्य कोठारांचं नुकसान होऊ लागलं.
याच दरम्यान मानवी वस्तीत जंगली मांजरांचा वावर वाढू लागला. तो वावर धान्याचा फडशा पाडणाऱ्या उंदरांच्या शिकारीसाठी होता. जंगली मांजरांचा उंदरांच्या शिकारीदरम्यान माणसांशी संपर्क येऊ लागला. जंगली मांजरं हळूहळू माणसाळली आणि ती पाळीव बनली. माणसाने मांजर पाळण्याचा पहिला उद्देश हा उंदरांचा बंदोबस्त करणं हाच होता.
इसाई धर्माच्या प्रसारासाठी मिशनरी जगभर प्रवास करू लागले आणि त्यांच्यासोबत जगभर मांजरं पोचली.
‘टॉम अँड जेरी’ हा उंदीर-मांजराच्या पाठशिवणीचा कार्टून शो माणसांच्या मांजर पाळण्याच्या प्राथमिक उद्देशाचं मनोरंजनात्मक वास्तव आणि त्यातील निसटत्या काल्पनिक शक्यतांचं अलीकडचं उदाहरण.
पण आता बदलत्या काळानुसार उंदरांच्या लीळांनी त्रस्त झाल्यास माणूस अनेक उपाययोजना करू शकतो. त्यामुळे आता तो मांजरांवर उंदीर पकडण्यासाठी अवलंबून नाही. गेल्या दोन शतकांपासून मांजर पाळण्याच्या शक्यता बदलून गेल्या आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
३.
मी बोका पाळायला आणला, २७ एप्रिल २०१९ रोजी. अर्थातच उंदीर पकडण्यासाठी मी बोका आणला नाही. आणला तेव्हा तो पाच-सहा महिन्यांचा होता. मांजर पाळण्याची माझी गरजही निराळी होती. आईचं आजारपण सुरू झालं आणि ते दीर्घकाळ चालणार, हे समजल्यावर मी हताश झालो. आईसोबतचे सगळे जुने मायेचे क्षण आठवू लागलो. डॉक्टरांशी विविध उपचारांवर बोलणं सुरू होतं. वेगवेगळी मतं जाणून घेत होतो. तेव्हा कुणीतरी सुचवलं- मांजर पाळ.
मांजर पाळणं ही माणसाला गुंतवून ठेवणारी खास गोष्ट आहे. बालपणापासून माझ्या कोकणातल्या गावात ती गोष्ट अनुभवत आलो होतोच. गावात तीन-चार मांजरं येऊन-जाऊन असायचीच (आजही आहेत). त्यामुळे त्यांचं खास असं आकर्षण होतं. पण इथं शहरात मांजर पाळण्याचा अनुभव नव्हता. थोडी धास्ती वाटू लागली. त्या दरम्यान बहीणही मांजर हवं म्हणून माझ्या मागे लागली. शेवटी ठरवलं मांजर आणायचं.
शोधाशोध सुरू झाली. एका मैत्रिणीला सांगितलं, तर तिने तीन-चार दिवसांतच एका मांजराविषयी कळवलं व छायाचित्र पाठवलं. ते बोक्याचं होतं. छायाचित्र बघताच क्षणी तो मला आवडला. शुभ्र. थोडासा बिथरलेला आणि वेगवेगळ्या रंगांचे डोळे (Heterochromia) असणारा.
४.
ज्यांच्याकडून हा बोका माझ्याकडे येणार होता, त्यांनी माझ्या संदर्भात खात्री झाल्यावर ते त्याला द्यायला तयार झाले. त्याला घरी आणला.
अर्जेटिनाचा महान लेखक ऱ्होर्हे लुईस बोर्हेसचं नाव त्याला दिलं. त्याला आणून आता चार वर्षं पूर्ण झालीत. या वर्षांत बोर्हेसचा बदललेला स्वभाव मनाची दमछाक करणारा आहे. बोका पाळणं ही सोपी गोष्ट नाही, हे समजलं. बोका पाळताना स्वतःच्या स्वभावाचे आकार-उकार समजून घेणं सहज शक्य वाटू लागलं. निरीक्षण करण्याच्या जितक्या संधी मिळाल्या, तितकं मी त्याचं निरीक्षण केलं. त्याला कंटाळा आला की, काहीतरी वेगळं बघण्याची, त्यात डोकावण्याची सवय आहे. मग मी बुकशेल्फ उघडतो, त्याला त्यात डोकावू देतो. अशा वेळी मी माझ्या मनाचा कप्पा उघडून त्यात त्याला डोकावू दिलंय, असं वाटतं.
मी अंबरनाथच्या ज्या भागात राहतो, त्यात दहाएक वर्षांपूर्वी एक अफवा पसरली होती. ती होती ‘बोलणाऱ्या बोक्याची’. बोका माणसाशी बोलतो, ही विचित्र गोष्ट आजूबाजूच्या माणसांना आकर्षित करून घेणारी होती. मित्राकडून असं समजलं की, तेव्हा त्या बोक्याला बघण्यासाठी माणसांची गर्दी जमली होती, पण तो कुणालाच दिसला नाही. कधी काळी अशा विचित्र अफवा पसरलेल्या ठिकाणी आज मी एक बोका पाळतोय, हे गंमतीचं वाटतं.
पूर्ण वाढ झालेल्या मांजरांच्या चेहऱ्यावर मांसपेशी कमी असतात. त्यामुळे सगळेच हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर कळून येत नाहीत. बोर्हेस रागावतो, तेव्हा ते स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. पण जर मांजरं हसत असतील, तर तेही स्पष्ट दिसायला हवं, असं मात्र मला उगाच वाटतं.
५.
जेव्हा बोर्हेसला आणत होतो, तेव्हा बाजूने एक आजी जात होत्या. त्या थांबल्या आणि म्हणाल्या, ‘राहिल का हा तुमच्याकडे? नाही राहिला, तर परत इथंच सोडा. बाळाला त्रास देऊ नका. त्याची आई इथंच कुठेतरी असेल.’
बोर्हेसकडे क्षणभर पाहिलं आणि त्याची आई कुठे दिसतेय का, ते उगाच पाहण्याचा प्रयत्न केला. मुळात तेव्हा त्याची आई कशी दिसते, हेच माहीत नव्हतं. (अजूनही माहीत नाहीये.)
६.
ते छायाचित्र (सुरुवातीचं डावीकडून पहिलं) पाहिलं, तेव्हा मलाही वाटलं होतं की, असा बाजूला निवांत पहुडलेला बोका सोबत असावा. शुभ्र. आणि तो मिळालाही. शुभ्र देखणा. डोळ्यांच्या दोन्ही बाहुल्या वेगवेगळ्या रंगांच्या. पाहताच क्षणी मी त्याला नावं दिलं ‘बोर्हेस’. दुसरं काही सुचलंच नाही.
एवढ्या मोठ्या लेखकाचं नाव एखाद्या प्राण्याला ठेवणं आधी विचित्र वाटलं. पण नंतर बोर्हेसचा एक सुंदर विचार सोबत आल्यानं बोक्याला ‘बोर्हेस’ अशी हाक मारणं फार सहज वाटू लागलं.
बोर्हेस म्हणतो, “Any life, no matter how long and complex it may be, is made up of a single moment - the moment in which a man finds out, once and for all, who he is.”
पन्नाशीनंतर बोर्हेसने (माझ्या माहितीनुसार त्याचं वय तेव्हा ५५ होतं) त्याची दृष्टी गमावली. लेखकानं दृष्टी गमावणं, तसंच माझ्या बोक्याचे दोन्ही डोळे वेगवेगळ्या रंगांचे असणं आणि बोर्हेसच्या छा/eचित्रातील मांजरासारखा तो शुभ्र असणं, हे ‘बोर्हेस’ नाव ठेवण्याचं कारण असावं, असं माझं मलाच वाटतं.
बोक्याच्या डोळ्यांत पाहिलं की, अर्जेन्टिनाच्या या महान लेखकाची आठवण येते. आणि मनातून ‘बोर्हेस’ ही हाक आपोआप घरभर भिरभिरते...
७.
सुरुवातीच्या छायाचित्रात मध्यभागी दिसणाऱ्या खुद्द बोर्हेसच्या बोक्याचं नाव आहे- ‘beppo’. बोर्हेसने ते नाव ब्रिटिश कवी लॉर्ड बायरनच्या दीर्घ कवितेतील एक व्यक्तिचित्रावरून दिलंय. मला ही कमालीची आश्चर्यचकित करणारी गोष्ट वाटली. विसाव्या शतकातला अर्जेटिनाचा महान लेखक स्वतःच्या बोक्याचं नाव अठराव्या-एकोणीसाव्या शतकाच्या दरम्यान वावरलेल्या कवीच्या एका कवितेतील व्यक्तिचित्रावरून ठेवतो, आणि इकडे मी २०१९ साली माझ्या बोक्याचं नाव बोर्हेस ठेवतो.
नाव ठेवल्यानंतर पाच-सहा महिन्यानंतर मला ही गंमत कळून आली.
कवी - कविता - कवितेतील पात्र /व्यक्तीचित्रं - लेखक - बोका - एकूण सगळी लिहित्या गोष्टींची साखळी.
८.
मी दररोज सकाळी साडे पाच-सहाच्या दरम्यान उठून बोर्हेसला दीड तास फिरवून आणतो. सकाळी उठून जोपर्यंत तो घराच्या आजूबाजूचा परिसर फिरत नाही, तोपर्यंत त्याला करमत नाही. अर्थातच बोर्हेस अगदी रमून गेलाय. घरातील प्रत्येक माणूस बोर्हेसवर प्रेम करतो. त्यात खासकरून आजीला बोर्हेसबद्दल असलेला जिव्हाळा खूप खूप मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. तिला कौतुक वाटत राहतं. कारण तिने पांढरा धोप आणि दोन रंगांच्या डोळ्यांचा बोका पहिल्यांदाच बघितला. गावात पट्टेधारी मांजरं असतात, तेवढंच तिला माहीत.
बोर्हेसचे खाण्यापिण्याचे नखरे आणि त्याच्या सवयी आजीला अजब वाटतात.
बोर्हेस जेव्हा माझ्या पायाला अंग घासतो, तेव्हा जर का आजी बाजूला असेल, तर मी तिच्या डोळ्यांत बघतो. तिच्या डोळ्यातलं हसू तिच्या गालावर येतं.
एकूणच काय तर मांजर + आज्जी हे कोकणातील भारी कॉम्बिनेशन आहे.
९.
मांजरं म्हणजे एक तंद्री लावणारी गोष्ट आहे. ज्या झाडावर पक्षी घरटं बांधतो, त्या झाडाखाली त्याचं एखाद-दुसर पिस मिळण्याची शक्यता असते. पण मांजरं तशी नाहीत. मांजरं सगळ्या शक्यतांवर हल्ला चढवतात. जणू काय माणसानं मांजरांविषयी ज्या शक्यता बाळगळ्या आहेत, त्या सगळ्या पराभूत करणं मांजरांचं कर्तव्यच असावं!
१०.
मांजरांच्या कसल्याही आणाभाका नसतात. त्यांचा एक विशिष्ट व्यवहार असतो. रोखठोक. टाळून निघून जाण्याची कला त्यांच्या मऊ पंजात किती कठोरपणे वावरते. घरभर त्यांचं नेमकं काय हरवतं आणि काय सापडतं हेच कळत नाही. जरी प्रयत्न केलाच, त्यांचं हरवलेलं काही शोधून द्यायचा, तर हाती काय लागतं? अपार उपरेपण. हा उपरेपणा मांजरं गळ्यात बांधत नाहीत. माणसाला मात्र हौस उपरेपणाच्या जाहिरातीची.
बोर्हेस तीन महिने गावी होता, तेव्हा तो आजीच्या पायाजवळच झोपायचा. आजीलाही त्याचं असं जवळ असणं फार आवडायचं. तिला कौतुक वाटायचं, तो पूर्ण शुभ्र आहे म्हणून.
या छायाचित्रात आजी गोधडी शिवतेय. शिवताना टाक्यातलं अंतर पहिल्यासारखं जमत नसलं तरी त्यातलं ऊबेचं अंतर काही कमी झालेलं नाही. आजी गोधडी शिवताना बोर्हेस त्या वेळी गोधडीवर जाऊन बसला. खूप वेळ तो तिथंच बसून होता. मी माजघरातून ओट्यावर आलो आणि हे दृश्य पाहिलं.
कोकणात घराघरांत वावरणारी मांजरं नुसती मांजरं नसतात. ती ‘कुणीतरी’ असतात. आणि त्यात त्यांचं नातं आजीशी जोडलेलं असेल तर... विचारू नका!
.................................................................................................................................................................
लेखक विजय बेंद्रे पुस्तक संग्राहक, वाचक आणि ‘द स्ट्रीट लायब्ररी’चे एक संस्थापक-संचालक आहेत.
vjbendre46@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment