अजूनकाही
१.
हिटलरने नाझी पक्षाची स्थापन केली. १९३३मध्ये तो हुकूमशहा म्हणून जर्मनीत सत्तेवर आला. विसाव्या शतकातला हा एक जगावेगळा क्रूर आणि हिंस्त्र अवतार होता. त्याने एकाधिकारशाहीचे राजकारण करून ज्यू जमातीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हिटलरने ज्यू जमातीबद्दल ‘द्वेषाची संस्कृती’ रुजवली, पण उलट ज्यू जमातीऐवजी त्याचाच अंत झाला. त्याच्या नाझी विचाराची चर्चा झाली आणि त्याचा जगभर निषेध झाला.
त्याच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक नाझी कार्यकर्त्यांना एक तर मारले गेले किंवा त्यांनी स्वतःहून आत्महत्या केल्या. हिटलरने आपल्या प्रियसीबरोबर आत्महत्या केली. त्याचा अत्यंत जवळचा मित्र, पॉल गोबेल्सनेदेखील आपल्या पत्नीबरोबर आत्महत्या केली. हा गोबेल्स नाझी पक्षाचा प्रचारप्रमुख होता. तो तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी. हेडलबर्ग या विद्यापीठातून त्याने तत्त्वज्ञान विषयात पीएच.डी.ची पदवी मिळवली होती. त्याला खरे तर लेखक व्हायचे होते, पण आपण अत्यंत प्रभावी वक्ता आहोत, हे लक्षात आल्यानंतर त्याने नाझी पक्षाचा प्रचार सुरू केला. १९३३मध्ये नाझी पक्ष सत्तेवर आल्यावर पुढे तो त्याचा प्रचारमंत्री झाला. एका विशिष्ट पद्धतीच्या प्रचारतंत्राचा त्याने विकास केला. तो अत्यंत प्रभावी भाषणे करत असे. या प्रचारतंत्रात चित्र, चिन्हे आणि चलचित्राचा त्याने परिणामकारक वापर केला. तत्कालीन जर्मन संस्कृतीमध्ये या माध्यमातून ज्यू-द्वेष व्यवस्थितपणे रुजवला.
अपभ्रंशीकरण आणि विकृतीकरण या माध्यमातून ‘उत्तम खोटे कसे बोलावे’ आणि पुढे ते समाज-संस्कृतीमध्ये ‘सत्य म्हणून कसे रुजवावे’, या त्याच्या धोरणांना ‘गोबेल्स नीती’ असे म्हटले जाते. वेगवेगळ्या खोट्या गोष्टींचा पद्धतशीरपणे प्रसार कसा करावा, हे तंत्र त्याने शोधून काढले. याचा परिणामकारक वापर करून ज्यू लोकांचा छळ, चर्चवर (ख्रिश्चन) हल्ले, अफवा पसरवणे, एखाद्या विशिष्ट जाती जमाती-धर्माबद्दल द्वेष, चीड निर्माण करणे, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, समाजातील आपले आर्थिक आणि इतर वांशिक, सामाजिक, सांस्कृतिक हितसंबंध जोपासण्यासाठी कुठल्या तरी गोष्टीबद्दल सतत गैरसमज पसरवणे, हा त्याचा सिद्धान्त होता. त्याचा त्याने अत्यंत परिणामकारकरित्या वापर केला. आजही नवनवे गोबेल्स तयार होत आहेत किंवा ते करण्याचे काम सुरू आहे. ट्रोलिंग हा प्रकारही त्यापैकीच एक.
‘सर्व जगाचा सत्ताधीश’ होण्याच्या महत्त्वाकांक्षेने हिटलरला पछाडले होते. त्याने फ्रान्स आणि इंग्लंडवरही हल्ला केला होता. जर्मनीच्या आजूबाजूची बरीच छोटी-मोठी राज्ये ताब्यात घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. ज्यू आणि कम्युनिस्टांबद्दल त्याला प्रचंड राग होता. म्हणून त्याने रशियावरदेखील हल्ला केला होता. मात्र तत्कालीन स्टॅलिनच्या अधिपत्याखाली असलेल्या रेड आर्मीने हिटलरला चांगलेच झोडपून काढले, आणि तिथून त्याच्या अंताचा आरंभ सुरू झाला.
दहशत, भीती, सिक्रेट पोलीस व्यवस्था आणि मिलिटरीचा वेळोवेळी केलेला दुरुपयोग, अशी ही यंत्रणा होती. (जॉर्ज ऑर्वेल यांनी ‘ॲनिमल फॉर्म’ आणि ‘नायन्टीन एटीफोर’ या कादंबऱ्यांत खरे तर स्टॅलिनच्या एकाधिकारशाही राज्याबद्दल लिहिले आहे. पण हे नाझी पोलीस यंत्रणेलाही लागू पडणारे आहे). या आधारे समाजात कुठल्याच प्रकारच्या कल्याणकारी योजना न राबवता व्यवस्थितपणे दारिद्र्य, रोगराई, मृत्यू व भयंकर अशा प्रकारची परिस्थिती कायम टिकून राहील, याची काळजी घेणारी व्यवस्था म्हणजे फॅसिझम असे म्हणता येईल. जर्मनीतला प्रत्येक ज्यू हा शत्रू आहे आणि त्याला ठार/नष्ट केले पाहिजे, त्याला जगण्याचा अधिकार नाही, असा हा प्रचार होता.
यासाठी हिटलरने ‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’ नावाची अमानुष योजनाही राबवली. मुख्य शहरापासून दूर एका अज्ञात प्रदेशात एक चेंबर बांधलेली असे. तिथे विनाअट अटक केलेल्या ज्यू लोकांना कैदी म्हणून ठेवण्यात येई. त्यांच्याकडून सगळी कामे करून घेतली जात आणि एक दिवस या चेंबरमध्येच त्यांना कोंबून, वरून विषारी गॅस सोडला जाई. क्षणात हजारो ज्यू ठार मारले जात.
हुरहम गुरिंग यांनी म्हटल्याप्रमाणे या कॅम्पमध्ये १,००,००० कम्युनिस्टांना ठार मारले गेले (कम्युनिस्ट हे धर्मविरोधी आणि प्रोटेस्टंट यांचे मित्र असल्यामुळे त्यांना नाझी राज्यात कुठलेच स्थान नव्हते. बरेच कम्युनिस्ट लेखक, कवी, विचारवंत, कार्यकर्ते या काळात युरोपमधल्या इतर देशांत किंवा अमेरिकेत पळून गेले. यात अनेक मोठे लेखक व विचारवंत होते. या काळात जर्मनीतील आख्खे फ्रॅंकफर्ट स्कूल अमेरिकेला स्थलांतरित झाले होते). किती ज्यू मारले गेले, याचा काही हिशोबच नाही. ३०,००० ते ४०,००० ख्रिश्चन प्रोटेस्टंटांना या काळात भयंकर छळले गेले. या काळात ३०–४०,००० दशलक्षापेक्षा अधिक लोक घाबरून/भीतीपोटी आजारी पडले. मानसिक रुग्ण झाले. त्यातून पुढे त्यांचे मृत्यू झाले. काही जणांना असाध्य रोग झाले. म्हणजे या व्यवस्थेमुळे मनुष्यहानी किती झाली, याचा हिशोब करणे, ही कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. हा कालखंड इतका भयंकर होता की, त्याचे दुष्परिणाम पुढे काही दशके युरोपला भोगावे लागले.
हिटलरच्या काळात हा हल्ला तसा सरळ आणि उघड होता, असेही म्हणता येणार नाही. काही वेळा तो तसा असायचादेखील. माणसे अचानक गायब व्हायची. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या कालखंडात साम्राज्यवादी शक्तींनी हा अजेंडा अत्यंत लपून-छपून मुस्लीम, कम्युनिस्ट आणि कृष्णवर्णीय समाजाच्या विरुद्ध वापरला. आजही विशिष्ट जाती, धर्म, आणि काही विशिष्ट लोकांचे हितसंबंध (विशेषतः आर्थिक आणि धार्मिक) जपण्यासाठी अशा प्रकारचा छळ, हल्ला किंवा ठार मारण्याचे षडयंत्र वापरले जातेच आहे.
आज ‘द्वेषाची संस्कृती’ अधिक परिणामकारकरित्या राबवली जात आहे. रोज काहीतरी सेन्सेशनल घडते आहे, अशा प्रकारचा भास आपल्याला ‘ब्रेकिंग न्यूज’मधून घरबसल्या किंवा मोबाईल फोनवर पाहायला मिळतो. खोटे दस्तावेज तयार केले जातात. समाजमाध्यमाचा व्यवस्थित वापर करून चित्र, चलच्चित्रे, चिन्हे, नवनवे फंडे तयार करून इतिहासाचे अपभ्रंशीकरण आणि विकृतीकरण केले जाते.
२.
‘द बॉय इन द स्ट्राईप्ड पायजमाज्’ (दिग्दर्शक- मार्क हर्मन) हा सिनेमा पाहिल्यामुळे या सर्व गोष्टींचे स्मरण झाले. या सिनेमात हिटलरचे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आणि ज्यू जमातीचा छळ प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला आहे.
‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’ म्हणजे काय, याचे चित्रण या सिनेमात तपशिलासह केले आहे. ‘शिन्डलर्स लिस्ट’ याही सिनेमात या छळछावण्यांचे प्रभावी चित्रण आले आहे. पण ‘द बॉय इन द स्ट्राईप्ड पायजमाज्’ या सिनेमात आठ वर्षांच्या दोन लहान मुलांच्या नजरेतून हे चित्रण सादर केले आहे. ब्रुनो (कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या कमांडरचा मुलगा) आणि शम्यूल (ज्यू कैद्याचा मुलगा) ही दोन मुले, या सिनेमात केंद्रस्थानी आहेत. हा सिनेमा जॉन बायोन यांच्या २००६ साली प्रकाशित झालेल्या याच शीर्षकाच्या कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमात ब्रुनोची भूमिका आसा बटरफिल्ड (Asa Butterfield), तर शम्यूलची भूमिका जॅक स्कॅलन (Jack Scanlon) या दोन मुलांनी अत्यंत प्रभावीपणे केली आहे.
या दोन मुलांना मध्यवर्ती ठेवून दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर नाझी व्यवस्थेने ज्यू जमातीचा जो अतोनात छळ केला, त्याचे अत्यंत प्रभावी चित्रण हा या सिनेमाचा विषय आहे.
बर्लिनमधून ब्रुनो आपल्या आई-वडिलांसोबत एका खेडेवजा भागात स्थलांतरित होतो. त्याचे वडील नाझी सैन्यात कमांडर (अधिकारी) असतात. त्यांच्याकडे एका ‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’चा ताबा दिलेला असतो. त्यांना या कामासाठी बढती मिळालेली असते.
सुरुवातीला ब्रुनोला या नव्या परिसरात आवडत नाही, पण तो शेजारी असलेल्या जंगल-झाडीतून हिंडतफिरत नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या तारेजवळ येऊन धडकतो. तिथं शम्यूल या ज्यू मुलाशी ब्रुनोची दोस्ती होते. त्यांच्या संवादातून जी देवाणघेवाण होते, ते सारे आतून हेलावून टाकणारे आहे.
काही दृश्ये, काही संवाद पहा.
ब्रुनो शम्यूलला विचारतो, “तुम्ही लोक पायजामा का घालता?”
शम्यूल म्हणतो, “मला माहीत नाही.”
“मला खूप भूक लागलेली आहे”, असे शम्यूल म्हणतो. दुसऱ्या दिवशी घरातून ब्रुनो चोरून शम्यूलला काही खायला घेऊन जातो.
एकदा तो शम्यूलबरोबर खेळण्यासाठी फुटबॉल घेऊन जातो. पण शम्यूल म्हणतो, हे इथे असले काही चालत नाही. It's dangerous. ताऱ्याच्या कंपाउंडला स्पर्श न करता तो फुटबॉल त्याला परत करतो.
एकदा शम्यूल म्हणतो, “माझे वडील गायब झालेत. त्यांना शोधायला हवे.”
त्याचे वडील कुठे गेले असतील, याचे उत्तर प्रेक्षकांना माहीत असते.
ब्रुनोचे आई-वडील एका विशिष्ट मिशनसाठी (ज्यूंना ठार मारण्यासाठी) आलेले असतात. शम्यूल हा ब्रुनोला नवा मित्र लाभेपर्यंत ब्रुनो एकाकी आणि मलूल असतो. कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून एका म्हाताऱ्याला घरकामासाठी बोलावलेले असते (तो मुळात डॉक्टर असतो, पण आता तो ब्रुनोच्या घरात बटाटे सोलण्याचे काम करत असतो). असे अनेक कामगार (ज्यू) कॉन्सन्ट्रेशन कॅम्पवरून ब्रुनोच्या आई-वडिलांच्या नव्या आलिशान घरी नोकर म्हणून काम करायला येत-जात असतात. पहिल्याच भेटीत ब्रुनो ज्यू म्हाताऱ्याला पाहून घाबरतो. आई विचारते, ‘काय झाले?’ तो म्हणतो, ‘म्हाताऱ्याने पायजामा घातला आहे.’ आई म्हणते, ‘मग काय झाले? तो त्याचा पोषाख आहे.’
फॅसिस्ट संकृती इतिहासाचे विकृतीकरण कशी करते, याविषयी एक महत्त्वाचे दृश्य आहे. बर्लिनमधील ब्रुनोची नेहमीची शाळा या ठिकाणी अनुपस्थित असते. म्हणून ब्रुनो आणि त्याच्या १२ वर्षांच्या बहिणीसाठी एका विशेष ट्यूटरची नेमणूक केली जाते. ब्रुनो गोष्टींची पुस्तके वाचतो, म्हणून ट्यूटर त्याला सत्याधारित, तथ्याधारित काही वाचायला सांगतात. ते त्याला एक पुस्तक देतात आणि ‘हे वाच’ म्हणतात. त्याची बहीण त्यातील काही वाक्ये वाचते -
‘‘ज्यू हे मूलतः क्रूर, दुष्ट आणि स्वार्थ बुद्धीचे असतात. त्यांनी आपल्या देशाचे (जर्मनीचे) भयंकर नुकसान केले आहे. म्हणून त्यांना या जगात राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांना नष्ट केले पाहिजे. ठार केले पाहिजे. नाहीतर ते अजून आपले नुकसान करतील.’’ वगैरे.
एका नव्या पुस्तकातील हा मजकूर असतो. ज्यू समाज आणि संस्कृतीबद्दलचा हा मजकूर ब्रुनोला विसंगत वाटतो. कारण त्याला आठवते की, शम्युलने त्याला सांगितलेले असते- आम्ही ज्यू आहोत म्हणून. आणि त्याने बघितलेले तारे पलीकडील चित्र त्याच्या समोर असते. ते तर या पुस्तकातील वाक्यांसारखे अजिबात नसते. उलट शम्युलच्या डोळ्यांत त्याने सतत भीती आणि दहशत बघितलेली असते. पलीकडे काम करणारी माणसे कमालीची गरीब आणि सतत कष्ट उपसताना दिसतात. तरीही या पुस्तकात या लोकांबद्दल असा मजकूर का छापला गेला असावा, याबाबतचे प्रश्नचिन्ह ब्रुनोच्या डोळ्यात निर्माण झालेले दिसते. कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधील ही सारी माणसे अत्यंत सुखात आणि आनंदाने जगत आहेत, अशा प्रकारची एक चित्रफित ब्रुनोचे वडील एका शिष्टमंडळाला दाखवतात. सिनेमाच्या शेवटी जेव्हा ब्रुनो तारेपलीकडच्या ज्यू कॅम्पमध्ये जातो, तेव्हा त्याला चोरून पाहिलेली ही चित्रफित आठवते. इथे तर तसे काही दिसत नाही, असे आश्चर्याचे भाव त्याच्या डोळ्यांत चमकतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
या सिनेमात ब्रुनोच्या वडिलांच्या आलिशान घरामध्ये नाझी पोलिसांची सतत ये-जा, संशयाचे वातावरण, मुकाटपणे काम करणारे ज्यू कामगार, यांचे प्रभावी चित्रण आहे. एकदा डायनिंग टेबलवर जेवण करताना ब्रुनोचे वडील एका सहकाऱ्याशी बोलत असतात. या नाझी सैनिकाचे वडील साहित्याचे प्राध्यापक म्हणून जर्मनीमध्येच काम करत होते, असे हा सैनिक सांगतो. पण ते आता जर्मनी सोडून दुसऱ्या देशात गेले आहेत, अशी माहिती ब्रुनोच्या वडिलांना त्यांच्या सहकाऱ्याकडून मिळते. हे माहीत झाल्यावर त्यांचा राग अनावर होतो. ते आरडाओरडा करून टेबलावरील वस्तू फेकायला लागतात. आपल्या वडिलांना नेमके काय झाले आहे, हे ब्रुनोला समजत नाही. काही दिवसानंतर समजते की, त्या सैनिकाच्या वडिलांना ठार मारण्यात आले आहे.
ब्रुनोच्या आईला हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागतात. आपला नवरा हिंस्त्र आणि अमानवी आहे. त्याबद्दल तिचे वादही होतात. ती आपल्या मुलांना घेऊन दुसरीकडे राहायला जायचे ठरवते, तेव्हा ब्रुनो शम्युलला शेवटचे भेटायचे ठरवतो. जाताना जमीन खणण्यासाठी आपल्याबरोबर एक फावडे घेऊन जातो.
तो शम्युलला म्हणतो, “मला तिकडे तारेच्या कंपाउंडच्या पलीकडे (तुझ्या भागात) येऊ दे. आपण दोघे मिळून तुझ्या हरवलेल्या बापाचा शोध घेऊ.” तारेखालची जमीन उकरून तिथे खड्डा करून आणि त्यात उतरून ब्रुनो तारांना स्पर्श न करता सहीसलामत पलीकडे जातो. अगोदरच ठरल्याप्रमाणे शम्युलने त्याच्यासारखे कपडे ब्रुनोसाठीही आणलेले असतात. त्यामुळे तो त्यांच्यातला होऊन जातो. ते आत जातात, पण वेळ चुकलेली असते. कारण पूर्वनियोजनाप्रमाणे सर्व ज्यूंना ठार मारण्याची वेळ येऊन ठेवलेली असते. गॅस चेंबरमध्ये सर्वांना कोंबण्यात येते आणि त्यात ही दोन मुलेही कोंबली जातात. ‘घाबरू नका’ असे सर्वांना सांगितले जाते. आपल्या अंगावरील सगळे कपडे काढून ठेवा. तुम्हाला छान शॉवर देण्यात येत आहे, अशा सूचना दिल्या जातात. सर्व जण आपापले कपडे बाजूला काढून ठेवतात आणि नग्न होतात. ही दोन मुले आपले हात एकमेकांना घट्ट पकडून थरथर कापत बसतात. पण शॉवरऐवजी चेंबरचे वरील झाकण दूर केले जाते आणि आत विषारी गॅस सोडला जातो. क्षणात सर्व काही संपते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
आई, बहीण आणि वडील ब्रुनोचा शोध घेतात, पण तो काही सापडत नाही. शेवटी ते तारेच्या कंपाउंडजवळ येऊन धडकतात. त्या ठिकाणी ब्रुनोचे कपडे सापडतात. ज्या हजारो ज्यूंना गॅस चेंबरमध्ये ठार मारलेले असते, त्यात ब्रुनोही असतो, असा या सिनेमाचा शेवट आहे.
निष्पाप वृत्तीला हिंसेचे राजकारण समजत नाही. या सिनेमात हिंसेचे स्वरूप निष्पाप मुलांच्या नजरेतून दाखवले आहे. नाझी आणि फॅसिस्ट वृत्तींचा आलेख त्यामुळे अधिक गडद होतो.
हिंसा अनादी काळापासून चालत आलेली आहे. मानवी समाजाचे हे एक ठळक चिन्ह आहे. पण औद्योगिक क्रांतीनंतर, यंत्राच्या प्रवेशानंतर आणि संहारक शस्त्रांच्या निर्मितीनंतर जगभर भयंकर हिंसा पसरली. हितसंबंध जपण्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी माणसे तिचा वाट्टेल तसा वापर करत आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment