अजूनकाही
उगो बेट्टी (१८९२-१९५३) या इटालियन नाटककाराचं ‘दि क्वीन अँड दि रीबेल्स’ हे एक उत्तम नाटक समजलं जातं. पक्क्या धार्मिक विचारांचे, निराशावाद आणि नैतिकता, अपराध व क्षमा या मूल्यांचा पाठपुरावा करणारे बेट्टी रोमन उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. त्यांच्यावर कॅथॉलिक ख्रिश्चन तत्त्वज्ञानाचा जबर पगडा होता. आपल्या लिखाणातून ते माणसाची देवाची उपेक्षा करण्याची घातक सवय आणि त्याचं अधःपतन, यावर भाष्य करतात.
ते एका नाटकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, “दैव-देव-नशीब आपलं अंतिम आयुष्य घडवत असतात. आपल्या चलनवलनाचं तंत्र ही एका सततच्या हलत्या यंत्राचा भाग आहे. आपणाला त्याच्या स्पंदनाचा अंधुकसा ध्वनी ऐकू येतो, आणि कदाचित क्षणभर का होईना आपणाला आशा करायला वाव आहे की, गोठवणाऱ्या एकटेपणाची भावना ही कधी कधी आपल्या बुद्धीला आलेल्या बुरसटपणामुळे आली असेल. आशा करूयात की, काही वेळा एवढंही पुरेसं असेल की, गर्द गडद अंधारातील उजेडाची तिरिप आम्हाला दिसू दिली जाईल. कदाचित हेही पुरेसं आहे की, आपणाला आपल्यावर लादलेल्या या आयुष्याकडे थोड्या कणवेनं पाहू दिलं जाईल.”
‘वास्तव आणि आभासी वास्तव’ या द्वैताच्या त्यांना असलेल्या जाणीवेतून त्यांचं नाट्य आकाराला येतं. चांगलं-वाईट, प्रेम-द्वेष, कोमलता-हिंसा यांच्या अविभाज्य गुंफणींची त्यांची समज पक्की होती. आपणाला भारावून टाकणारा, आकर्षित करणारा त्यांच्या नाटकातील भाग म्हणजे, आपण कसं जगतो आणि कसं जगायला हवं, यातील अघोरी विसंगतीचं मनाला शक्य होईल तसं स्पष्टीकरण देण्याचा त्यांचा प्रयास.
बेट्टी यांच्या नाटकातील पात्रांच्या वागण्याची तार्किक कार्यकारणभावानं संगती लावण्याचा प्रयत्न करू नये, ती ते मान्यच करणार नाहीत, कारण माणसाच्या कृतीत-वागण्यात, अंतर्मनातील प्रेरणांमुळे विसंगती असते, हे बेट्टी जाणून होते.
काहीशा पारंपरिक विचारसरणीच्या बेट्टी यांनी न्याय म्हणजे नक्की काय, असं विचारत; कल्पित आणि विचार करण्याला प्रवृत्त करणाऱ्या कथनाच्या संयोजनाचा प्रयत्न आपल्या नाटकांतून केला. पण हे सर्व करताना त्यांची नाटकाच्या संहितेवरची पकड, तंत्रावरची हुकूमत, पात्रांचे स्वभाव रेखाटन, भाषेचं सामर्थ्य, नाट्यवस्तुला कोणत्याही क्षणी प्रचाराच्या, उपदेशाच्या पातळीवर आणत नाही. नैतिकतेचा सूर आळवणाऱ्या या नाटककाराचं नाव लुई पिरांदलो या प्रसिद्ध इटालियन नाटककाराच्या बरोबरीनं घेतलं जातं. लिखाण अभिजात ग्रीक शोकांतिकेसारखं असूनही त्यांना तेवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मात्र मिळाली नाही.
आपल्या नाटकाचा गर्भित अर्थ सारांशानं का होईना, पण निसंदिग्धपणे प्रतीकात्मक रूपात व्यक्त होईल, असंच शीर्षक नाटकाला देण्यावर त्यांचा कटाक्ष होता. एका नाटकाच्या केवळ सुयोग्य शीर्षकाकरता त्यांनी चार वर्षं घेतली होती.
बेट्टी यांनी त्यांच्या डॉक्टरेटकरता सादर केलेल्या प्रबंधात जरी युद्ध हे एक धोरण म्हणून स्वीकारण्यावर कृतक माफी मागितली असली तरी त्यात त्यांनी लोकशाही व्यवस्थेवर मात्र जोरदार हल्ला केला होता. तथापि युद्ध आघाडीवरील तोफखान्यानाचा अधिकारी आणि नंतर जर्मन तुरुंगातील कैदी या अनुभवतून त्यांना परोपकार आणि सहनशक्ती या गुणांची महती पटली. ते फॅसिझमचे कट्टर विरोधक बनले.
‘दि क्वीन अँड दि रीबेल्स’ या नाटकात त्यांनी केलेली मांडणी, राजकीय घडामोडींवर केलेलं भाष्य आणि दाखवलेले मानवी स्वभावाचे कंगोरे आजही तेवढेच प्रासंगिक ठरतात. यातील घटना आणि त्यांची तर्कसंगत मांडणी सार्वकालिक वाटावी अशीच आहे.
बेट्टी आपल्या नाटकासाठी भौगोलिक परिस्थितीचं बंधन झुगारून देतात. कथेला पोषक अशा कल्पित स्थानात ते नाटकाची मांडणी करतात. या नाटकासाठी त्यांनी निवडलेलं ठिकाण आहे एका छोट्या गावातील ग्रामपंचायतीच्या समाजमंदिराचा दुर्लक्षित हॉल. आडवळणावरचं हे गाव डोंगराच्या कुशीत पण सरहद्दीजवळ असतं.
चारही अंकांसाठी हीच पार्श्वभूमी असून, त्याला फारशा नेपथ्याची गरज नाही. रंगमंचावरील प्रवेशद्वारांचा नाटकातील ताण वाढवण्यासाठी केलेला उपयोग, बेट्टी यांच्या नाट्यतंत्रावरील हुकमतीची साक्ष पटवतात. या हॉलमध्ये झालेल्या पात्रांच्या संवादातून नाटक चढत जातं.
हे नाटक एका रात्रीत घडतं. गेली पाच वर्षं राणीचे निष्ठावान सेवक आणि बंडखोर यांच्यात सत्तेसाठी लढाई चालू असते. राजवाड्यावर हल्ला करून या बंडाळींची सुरुवात होते. मरून पडलेल्या सुरक्षारक्षकांच्या रक्तानं माखलेली राणी पळून जाते. ती लपूनछपून राहते. तिच्याशी एकनिष्ठ असलेले तिच्या संपर्कात असतात.
बंडखोरांचा विजय जवळजवळ निश्चित झालेला असतो. पण त्यांना अजून राणी सापडलेली नसते. धरपकड, चौकशा, झडत्या, गोळीबार, फाशी, कोर्ट मार्शल, मारामाऱ्या, लूटमार यांना ऊत आलेला असतो. सर्वत्र अराजक, संशयाचं वातावरण असतं.
अशा वेळी सीमेकडे प्रवास करणाऱ्या, देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका गटात ‘राणी आहे’ असा संशय बंडखोरांच्या पक्षाला येतो. या लोकांचा मार्ग बदलून त्यांना या आडबाजूच्या गावात यायला भाग पाडलं जातं.
येथून नाटकाला सुरुवात होते. या प्रवाश्यांत दोन महिला असतात. त्यातील एक ‘अर्जिया’ (वेश्या) व दुसरी शेतकरीण बाई (राणी). ग्रामपंचायतीतील एक नोकर आणि रेम हा स्वत:ला दुभाषा म्हणणारा असतो (त्याला शोधायला ‘अर्जिया’ आलेली असते.) जबर जखमी झालेला जनरल बिएंत पण येथे येतो.
रेम स्वतःला बंडखोर पक्षाचा प्रतिनिधी म्हणून घेत अधिकार दाखवत असतो. प्रवाशांची कागदपत्रं तपासताना अर्जिया त्याच्यासमोर येते. तो तिची ओळख नाकारतो, भांडतो; तिची निर्भर्त्सना, वाटेल तसा अपमान करतो. सर्व प्रवाशांना सांगण्यात येतं की, सुरक्षा आणि गुप्ततेच्या कारणास्तव त्यांना आजची रात्र इथंच राहावं लागेल. महिला आणि पुरुषांची वेगवेगळी व्यवस्था करण्यात येते. अर्जिया आणि शेतकरणीला एका खोलीत ठेवलं जातं. अर्जिया शेतकरणीच्या वेशातल्या राणीला ओळखते. रेमला तसे सांगते. दोघं मिळतून याचा फायदा उठवायचं ठरवतात.
रेमच्या योजनेप्रमाणे दारावर धक्का बसल्यावर रक्षक गोळीबार करतात, पण राणी दुसऱ्याच दारानं पळून जाते. आवाजामुळे रक्षक आत येतात आणि अर्जियाच पळून जात होती, असं म्हणून सर्वांना बोलवतात. अर्जियाच खरी राणी आहे, असं सर्वांना वाटायला लागतं.
जनरल बिएंतच्या अध्यक्षतेखाली अर्जियावर राजद्रोहाचा आरोप ठेवून खटला सुरू होतो. रेम घाबरून तिची ओळख नाकारतो. पळून गेलेली शेतकरणीच्या वेशातली राणी अर्जियासमोर विष घेऊन प्राण सोडते. राणीला विजनवासात झालेल्या मुलाला अर्जियासमोर उभं करतात आणि ‘आता तरी कबूल कर’ असं सांगतात. रेम पळून जाण्याच्या प्रयत्नात गोळीबारात मारला जातो. अर्जियासमोर ती खरी राणी नाही, हे सिद्ध करायला कुठलाच पुरावा शिल्लक राहत नाही.
अर्जियाला मृत्यू समोर दिसतो, पण ती अत्यंत धीरोदत्तपणे त्याला सामोरी जाते. ‘या मुलाला, कोवळ्या जिवाला तरी काही अपाय होऊ नये’, अशी विनंती करते. ज्या ताठ मानेनं ती या चौकशीला सामोरी जाते, आरोपांचा प्रतिवाद करते... एका सामान्य स्त्रीच्या असामान्य धैर्याचं कौतुक करावंसं वाटतं. ती अपमानास्पद-हेटाळणारं जीवन आणि राणीच्या सहकाऱ्यांचा विश्वासघात, अशा सशर्त क्षमायाचनेची सूचनाही नाकारते.
अर्जियावर ‘राजद्रोह’ सिद्ध होतो. त्यासाठी मृत्युदंड ही शिक्षा असते. ती म्हणते, ‘मला फार थकायला झालंय, थंडी वाजते आहे. ती शाल द्या. आता मला गाढ निवांत झोप लागेल.’ ती बाहेर जाते. थोड्या वेळानं गोळीबाराचा आवाज येतो. अर्जिया मरते.
या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची नायिका असलेल्या एका वेश्येचं, वारांगनेचं ‘वीरांगने’त झालेलं रूपांतर. ती स्वतःची ओळख ‘मी म्हणजे तीन युद्धांच्या कचऱ्यातून वाढलेली, कोठेही सहज आढळणारी, अतिसामान्य झुडूप’ अशी करून देते. (One of those very common plants that you naturally find growing out of the manure of three wars) चौकीदाराने कोणाची तरी ओळख आणायला सांगितल्यावर ती म्हणते, ‘माझ्याकडे येणारे लोक स्वतःचं पहिलं किंवा टोपननावच सांगतात, आडनाव नाही.’
एके ठिकाणी ती म्हणते, ‘मी इथं एवढ्या लांबून धडपडत कशाला आले आहे, तर एका माणसाची शेज सजवायला.’ तिचा मित्र रेमबद्दल तिला प्रेम वाटत असतं आणि त्याने झिडकारलं तरी ती त्याला सोडायचा विचार करत नाही. ती म्हणते, ‘‘बाई असणंच मला अपमानास्पद वाटतंय, खरं तर जगणंच! ज्या माणसाला तुम्ही समोर उभंसुद्धा करणार नाही, त्याची शय्यासोबत करायला लागावं! किती घृणास्पद आणि अपमानकारक आहे, हे स्त्री असणं!’’
पण तिच्यात एक प्रकारचा हट्टीपणा असतो. वाचनामुळे आलेली बोलण्यातली सफाई असते आणि स्वतःला घरंदाज रूपात बघायची स्वप्नं पाहायची सवय. पण तिचं खरं माणूसपण जागं होतं, ते राणीची हकिकत ऐकून. ती राणीला पळून जायला मदत करते आणि स्वतः गोत्यात येते.
बेट्टी यांनी अर्जिया आणि अमॉस यांची जुगलबंदी आणि त्यातली अर्जियाची उत्तरं, हे सार्वकालिक राजकीय ढोंगबाजीवर केलेलं भाष्य, हा या नाटकाचा परमोच्च बिंदू आहे.
अर्जियाचे काही संवाद पहा-
“माझ्या जन्मापासूनच तुमच्यासारखे लोक मला सतत स्थलांतर करायला, शहरं बदलायला लावत आहेत, माझी झडती घेत आहेत, मला हाकलून लावत आहेत.’’
‘‘नुसते हुकूम सोडण्यापलीकडे तुम्ही काय करता? जगातल्या काही लोकांनी ठरवलं आहे की, इतरांनी काय करावं, हे फक्त त्यांनाच कळतं.’’
‘‘आम्हाला काय आवडतं, ते खाण्यावर बंदी; झोप आली तरी झोपण्यावर बंदी; थंडी वाजत असली तरी शेकोटी पेटवण्यावर बंदी. कारण काय? तर राजकीय हेतू साध्य होण्यासाठी हे आवश्यक आहे.’’
‘‘मला भीती कशाची? उलट लोकांच्या मनात तुमच्याबद्दल जी घृणा साठली आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी आपल्याला सर्व जण घाबरतात, असं समजत राहता.’’
बिएंत म्हणतो, ‘दगड फोडणारे गरीब लोक आता नव्या राज्यात असणार नाहीत.’
त्यावर अर्जिया म्हणते, ‘‘याचा अर्थ आता तुम्ही आम्हा सामान्यांसाठी नवीन काहीतरी कटकटी निर्माण करणार, तुम्हाला दुसरं काय करता येतंय? तुम्ही लोकांना प्रथम हेवा करायला शिकवता, द्वेषाची बीजं त्यांच्यात पेरता आणि त्यातून त्वेष निर्माण करता. जनमानसातील क्षोभ तुम्ही लोकांनी आणखीनच स्फोटक करून ठेवला आहे. हकनाक मरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तुमच्या कोणत्याच नव्या योजना, नाहक बळी गेलेल्या लोकांच्या रक्ताचा तुम्हाला येणारा वास बुजवू शकणार नाही.”
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
लोकांच्या मनात विद्वेशाचं बीज किती खोलवर पेरलं गेलंय, ते एका रक्षकाच्या संवादातून समोर येतं. ‘राणी सापडली आहे’ असं कानावर पडताच तो म्हणतो, ‘‘आम्हाला तिचा कोथळा बाहेर काढलेला बघायचा आहे. आमच्या साऱ्या त्रासाचं मूळ राणी आहे. आजारी माणसं जखमांनी विव्हळत आहेत, आमची मुलं मोठी होऊन विकलांग होत आहेत आणि मुलींनी तर लाज सोडली आहे. या साऱ्याला फक्त राणीच जबाबदार आहे, दुसरं कोणी नाही.”
रेम जेव्हा तिला ओळख दाखवायचं नाकारतो, तेव्हा ती म्हणते, “माझा मित्र घाबरला आहे. परिस्थिती त्याच्या अपेक्षेबाहेर गेली आहे. मी राणी आहे की नाही किंवा तो माझा मित्र आहे की, नाही, यापेक्षा तुम्हा लोकांना या ठिकाणी काही जणांना गोळ्या घालायलाच लागतील आणि त्याला तर जिवंत राहायचं आहे.”
“मला जाताना आनंद होतोय. देवानं माणसाला मुद्दाम असं बनवलं. अगदीच नम्र, मऊ नाही; तर त्यापेक्षा थोडासा अहंकारी, जो त्याच्याशी भांडेल, त्याला धिक्कारेल, त्याला चकित करेल असा. मला जाताना आनंद होतो आहे की, मला एक मुलगा मिळाला. मी समृद्ध होऊन जाते आहे.’’
तिच्या या धीट संभाषणाने जणू तिच्यात खरंच खानदानी रक्त आहे, असं वाटून बाजूचे लोकही भारावून जातात. बंडखोर पक्षाच्या लोकांनाच काय, पण आपल्यालाही वाटतं की, हिच्यात ‘तेज’ आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
स्वार्थी, पक्षबदलू रेमच्या स्वभावाचं दर्शन घडवणारा एक संवाद नमूद करण्यासारखा आहे. तो म्हणतो, “जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक कांदा-चटणी -भाकरी खाणारे, तर दुसरे चिकन-बिर्याणी, श्रीखंड-पुरी खाणारे! आणि जीत कोणत्याही पक्षाची असो, श्रीखंड-पुरी, चिकन-बिर्याणी खाणारे लोक तेच असतात, तेच राहतात. म्हणून आपण नेहमी कोणत्या पक्षात राहायचं? तर श्रीखंड-पुरी, चिकन-बिर्याणी खाणाऱ्यांच्या. त्यासाठी हुशारी लागते.”
या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात. त्यामुळे राणी बंडखोरांप्रमाणेच या निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त शांत झोप हवी असते.
या नाटकाचा प्रवास एका अपरिहार्य शेवटाकडे होत जातो. नियतीच्या खेळातील ही पात्रं कोणाचाच विजय किंवा पराभव साजरा करू शकत नाहीत. रेमो, बियांत, राणी आणि अर्जिया सर्वांचा मृत्यू होतो. मात्र अर्जियाच्या मृत्यूला एक वलय लाभतं.
नाटक संपल्यावर आपण सुन्न होतो.
आजही हा ‘क्रांती- बंडाळी’चा खेळ कुठे कुठे चालूच आहे!
.................................................................................................................................................................
लेखक जयंत लीलावती रघुनाथ यांनी ‘मराठी विश्वकोशा’त विज्ञान विभागात संपादन सहाय्यक म्हणून काम केलं आहे. ‘नवभारत’, ‘मिळून साऱ्याजणी’, ‘पुरुष ऊवाच’, ‘विश्रांति’ यांसारख्या नियतकालिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.
jayant.r.deshpande@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment