आनंदी राजपुत्र : देव प्रसन्नतेने म्हणाला, “या स्वर्गातल्या बागेत हा छोटा पक्षी आनंदाने गाणी म्हणत बसेल आणि माझ्या सोन्याच्या नगरीत हा आनंदी राजपुत्र आनंदात राहील.”
दिवाळी २०२२ - लेख
ऑस्कर वाइल्ड
  • ‘The Happy Prince : A Tale by Oscar Wilde’ या Thames and Hudson यांनी प्रकाशित केलेल्या आवृत्तीचे मुखपृष्ठ व त्यातील एक चित्र Maisie Paradise Shearring यांचे आहे
  • Fri , 28 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख ऑस्कर वाइल्ड Oscar Wilde आनंदी राजपुत्र The Happy Prince

एका शहरात एका उंच स्तंभावर एक पुतळा होता. तो आनंदी राजपुत्राचा पुतळा होता. तो संपूर्ण पुतळा सोन्याच्या पातळ पत्र्याने मढवला होता. त्याच्या डोळ्यांमध्ये चमकदार नीलमणी बसवले होते. त्याच्या तलवारीच्या मुठीवर असलेले मोठ्ठे माणिक चमकत होते.

येणारे-जाणारे सगळे त्या पुतळ्याकडे अत्यंत कौतुकाने पाहत. प्रत्येक जण आपल्या आपल्या नजरेने पाही. एक महापौर म्हणे, ‘काय सुंदर दिसतोय हा पुतळा! अगदी वातकुक्कुटासारखा!’ त्याला वाटे आपल्या अशा बोलण्याने जनतेला वाटेल, आपण किती अलंकारिक बोलतो. पण पुढे तो असंही म्हणे, ‘पण याचा उपयोग काय?’ त्याला वाटे, जनतेला आपण अगदीच अव्यवहारी आहोत, असे वाटायला नको उगाच. तसा तो नव्हताही खरं तर!

एखादी आई चंद्रासाठी हट्ट करणाऱ्या आपल्या लहान मुलाला म्हणे, “तू का रे नाहीस त्या आनंदी राजपुत्रासारखा?”

एखादा निराशेने पोळलेला माणूस त्या सुंदर पुतळ्याकडे पाहता पाहता पुटपुटे, “बरंय, या जगात कोणीतरी असं आनंदी आहे!'

“हा तर एखाद्या देवदूतासारखा दिसतो!” चर्चमधून बाहेर पडलेली, धर्मादाय संस्थेतील जांभळ्या पांढऱ्या पोशाखातली  मुले म्हणत.

“तुम्हाला काय माहीत? तुम्ही तर कधी त्याला बघितलं सुद्धा नाही!” एखादा गणिताचा शिक्षक म्हणे.

'“हो, पण आम्ही त्याला आमच्या स्वप्नात पाहिलंय.” मुलं म्हणत. त्यांच्या अशा उत्तराने त्या गणिताच्या शिक्षकांच्या कपाळावर आठी उमटे, कारण मुलांनी स्वप्न बघणं, त्यांना मान्यच नव्हतं.

एके रात्री, त्या शहरात एक छोटा भिंगरी (स्वॅलो पक्षी) आला. सहा आठवड्यांपूर्वीच त्याची मित्र मंडळी इजिप्तच्या दिशेने गेली होती. हा मागे राहिला होता. कारण वाटेने येताना तो एका अत्यंत सुंदरशा वेळूच्या प्रेमात पडला होता. वसंताच्या सुरुवातीला, तो एकदा तो पिवळ्या रंगाच्या मोठ्या पाकोळी मागे उडत असताना त्या वेळूला भेटला होता. तिची  नाजुकशी कंबर त्याला खूप आवडली… म्हणून तो तिच्याशी बोलायला थांबला.

“मी तुझ्यावर प्रेम करू?” भिंगरी म्हणाला. त्याला एकदम मुद्द्याचं बोलायला आवडे. आणि वेळूने अगदी कमरेतून वाकून त्याला अभिवादनही केलं. खुश होऊन, मध्येच पाण्याशी खेळत, पंख बुडवून चंदेरी लहरी निर्माण करत, त्याने तिच्याभोवती अनेक गिरक्या घेतल्या. प्रेम करण्याची त्याची ही पद्धत होती. वसंत ऋतू संपेपर्यंत त्याचा हा दिनक्रम चालू  होता.   

“ही असली नात्याची गुंतागुंत अगदी हास्यास्पद आहे.” इतर भिंगरी पक्षी आपल्या दोस्तांना म्हणाले.

“तिच्याकडे पैसे पण नाहीत, आणि कित्ती ते नातेवाईक!” खरोखरच त्या नदीत अनेक वेळूची बनं पसरली होती. म्हणता म्हणता शिशिर ऋतू आला आणि सगळे भिंगरे उडून गेले.

हा एकटाच मागे राहिला. सगळे पक्षी गेल्यावर त्याला जरा एकटं वाटत होता. त्याला वेळूच्या प्रेमाचा पण कंटाळा यायला लागला होता. मनाशी तो म्हणे, “तिला काही बोलता येत नाही आणि काही नाही! आणि मी सोडून ती त्या वाऱ्याच्या सोबत प्रेमाचे चाळे करत असते. आणि खरंच, वारं  वाहायला लागलं की, वेळूच्या हालचाली इतक्या डौलदार दिसत! ती येथून बाहेर पडू शकणार नाही, मला मान्य आहे, पण मला तर प्रवास आवडतो. आणि माझ्या बायकोने पण माझ्याबरोबर प्रवास करायला पाहिजे नं?” त्याचे विचार सुरूच असत.

“तू येशील माझ्याबरोबर?” एकदा त्याने तिला विचारलंच; पण मान हलवून तिने नकार दिला. ती तिच्या घराशी इतकी एकरूप झाली होती की, ते सोडून जाणे तिच्याच्याने शक्यच होणार नव्हते.

“छे! निष्कारण मी वेळ घालवला.” तो जरा ओरडूनच म्हणाला. “ठीक आहे. मी चाललो पिरॅमिड्सकडे. बाय बाय!”

दिवसभर उडत उडत रात्री तो या शहरात येऊन पोचला. “इथे कुठे राहू बरं? या शहराने माझ्या येण्याची तयारी करून ठेवली असती तर...?” तो स्वतःशीच बोलला.

आणि तेव्हढ्यात त्याचं लक्ष त्या स्तंभावरच्या पुतळ्याकडे गेलं. “हां! ही छान आहे जागा! मी इथेच राहतो.” असा विचार करत तो हलकेच राजपुत्राच्या पायांपाशी  येऊन बसला.

“पहा, पहा! मला झोपायला सोन्याची खोली!” खुश होऊन हळूच तो स्वतःशी पुटपुटला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि झोपायच्या तयारीला लागला. आपल्या पंखात डोकं खुपसून तो निजणार, एव्हढ्यात त्याच्या अंगावर भला मोठा पाण्याचा थेंब पडला. “अरे! हे काय? आकाशात तर एकही ढग नाही, इतके स्पष्ट दिसणारे सगळे तेजस्वी तारे, आणि आत्ता पाऊस कसा? हे उत्तर युरोप मधलं वातावरण चमत्कारीकच आहे!... वेळूला पाऊस कित्ती आवडायचा! पण स्वार्थी होती ती!”

एव्हढ्यात आणखी एक थेंब पडला.

“श्या! जर पावसापासून माझं संरक्षण करणार नसेल, तर उपयोग काय या पुतळ्याचा! चला, एखाद्या उंच धुराड्याजवळ जाऊ या!” भिंगरी  स्वतःशीच बोलत होता.

पंख पसरून तो उडणार, एव्हढ्यात त्याच्या अंगावर आणखी एक थेंब पडला. त्याने वर मान करून पहिले... अरे! काय दिसलं त्याला? त्या आनंदी राजपुत्राचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. त्याच्या सोनेरी गालांवरून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. चंद्रप्रकाशात त्याचा चेहरा इतका सुंदर दिसत होता की, त्या छोट्या भिंगरीला त्याची दया आली.

“कोण आहेस तू?” त्याने विचारलं.

“मी आनंदी राजपुत्र!”

“तू रडतोयस  का?” भिंगरीने विचारलं. आपले ओले पंख झटकत तो म्हणाला, “हे बघ.. मला ओलं चिंब करून टाकलंस तू!”

“अरे, मी जेव्हा जिवंत होतो ना, आणि जेव्हा माझं हृदय माणसाचं होतं, तेव्हा मला अश्रू काय असतात हेच माहीत नव्हतं.” राजपुत्र सांगू लागला, “मी एका अशा महालात राहत होतो की, जिथे आत यायला दुःखाला परवानगीच नव्हती. दिवसभर मी माझ्या सवंगड्यांसोबत बागेत खेळायचो, आणि संध्याकाळभर एका मोठ्या सभागृहात नाच! बागेभोवती मोठ्ठीच्या मोठ्ठी भिंत होती. त्याच्या पलीकडे काय आहे, हे जाणून घेण्याचा विचारही मला कधी शिवला नाही. माझ्या सभोवताली सगळं नितांत सुंदर होतं... सगळे दरबारातले लोक मला ‘आनंदी राजपुत्र’ म्हणत. मी होतोपण आनंदात! म्हणजे सुखात असणं म्हणजे आनंदात असणं, असं असेल तर! असा मी जगलो आणि एके दिवशी मेलो. मेल्यानंतर त्यांनी मला इतकं उंच ठेवलं आहे की, इथून मला सगळं कुरूप जग, माझ्या नगरीतली सगळी दुःखं दिसतात. त्यांनी माझं हृदय जरी शिसाचं बनवलं असलं तरी हे सारं बघून मला खूप रडू येतं.”

“म्हणजे!? हा पुतळा पूर्ण सोन्याचा नाही तर!” भिंगरी स्वतःशी म्हटला. आपलं वैयक्तिक मत मोठ्यांदा न बोलणारा तो एक शहाणा पक्षी होता.

“खूप दूर” राजपुत्र मंजुळ आवाजात सांगत होता, “एका छोट्या रस्त्यावर एक झोपडी आहे. त्याची एक खिडकी उघडी आहे. त्या खिडकीतून मला दिसतंय की, एक स्त्री टेबलापाशी बसली आहे. तिचा अशक्त चेहरा दमून गेलाय. ती कपडे शिवणारी असल्यामुळे तिच्या हातात सुया टोचून टोचून तिचे हात खूप खडबडीत आणि लाललाल झाले आहेत. ती राणीच्या आवडत्या दासीच्या कोर्ट बॉल समारंभासाठी, तिच्यासाठी सॅटिन कापडाच्या झग्यावर, नाजूक दिसणारी पॅशन फळांच्या नाजूक फुलांच्या नक्षीचे भरतकाम करतेय. तिच्या कोपऱ्यातल्या अंथरुणावर तिचा छोटा आजारी मुलगा रडतोय. त्याला ताप आलाय आणि तो संत्री मागतोय. बिचाऱ्या त्याच्या आईकडे त्याला द्यायला नदीचे पाणी सोडून काहीच नाहीय. भिंगरी, भिंगरी, मी या चबुतरऱ्यावरून हलू शकत नाही. माझं एक काम करशील? माझ्या तलवारीच्या मुठीला बसवलेला रुबी तिला देशील?”

भिंगरी म्हणाला, “अरे, इजिप्तमध्ये माझी सगळे वाट बघतायत. मला तिकडे गेलं पाहिजे. माझे सगळे मित्र आधीच नाईल नदीपर्यंत पोचलेत आणि तिथल्या मोठ्या कमळांशी खेळतायत. मग ते तिथल्या राजाच्या थडग्यापाशी पोचतील आणि तिथे झोपतील. त्या राजाची शवपेटी म्हणे खूप रंगीबेरंगी आहे! त्या राजाला पिवळ्या लिनन कपड्यामध्ये गुंडाळलं आहे आणि त्याच्या सगळ्या अंगाला काय काय सुवासिक गोष्टी लावल्या आहेत... त्याच्या गळ्यात पाचूंची माळ आहे. मात्र त्याचे हात वाळलेल्या पानासारखे झाले आहेत.”

“अरे भिंगरू,” राजपुत्र कळवळून म्हणाला, “एक, एकच दिवस नाही थांबणार माझ्यासाठी? माझं एवढं काम नाही करणार? बघ नं, त्या छोट्या मुलाला किती तहान लागलीय, आईला किती वाईट वाटत असेल!”

भिंगरी म्हणाला, “मला नाही छोटी मुलं आवडत. गेल्या वर्षी, वसंत ऋतूमध्ये मी जेव्हा नदीकिनारी राहत होतो, तेव्हा तिथे दोन मुलं होती. अगदी दुष्ट! त्यातला एक गिरणीवाल्याचा मुलगा माझ्यावर नेहमी दगडं टाकायचा.. उगाचच! मला कधी दगड लागला नाही, ही गोष्ट वेगळी, कारण आम्ही भिंगरीपक्षी खूप चपळाईने उडतो. माझं घराणं चपळतेसाठी विशेष प्रसिद्ध आहे... पण तरी त्याचं वागणं काही प्रेमाचं नव्हतं...”

हे ऐकून तो आनंदी राजपुत्र खूप दुःखी झाला. आणि भिंगरीला त्याची दया आली. “इथे खूप थंडी आहे रे.. पण तुझ्यासाठी थांबतो मी एक रात्र आणि तुझं निरोपाचं काम करतो.”

“भिंगरू राजा, कसे आभार मानू रे तुझे!” राजपुत्र म्हणाला.

सांगितल्याबरहुकुम, त्याने राजपुत्राच्या तलवारीच्या मुठीतला रुबी काढला आणि चोचीत पकडून तो शहराकडे उडाला.

उडता उडता, त्याने संगमरवरात शिल्पं कोरलेलं चर्च ओलांडलं. राजवाडा ओलांडला. जाता जाता तिथे सुरू असलेल्या नाचाचा आवाज ऐकला. तिथल्या एका सज्जामध्ये एक सुंदर तरुण मुलगी आपल्या प्रियकराबरोबर गप्पा मारत होती. “पाहिलेस, किती सुंदर चांदणं पडलंय! प्रेमाची ताकद किती अफाट असते नाही? माझा झगा भरतकाम करून वेळेत मिळावा रे.. मी दिलाय एका शिलाई करणाऱ्या बाईकडे, पण या बायका इतक्या आळशी असतात ना!”

हा संवाद ऐकत भिंगरी एका नदीवरून उडत होता. तिथे त्याला बोटीच्या शिडांना दिवे लटकवलेले दिसत होते. तिथून तो एका वस्तीवरून चालला असता, काही ज्यू व्यापारी एकमेकांशी घासाघीस करत असताना आणि तांब्याच्या तराजूत पैसे मोजताना त्याला दिसले. शेवटी तो ज्या घराच्या शोधात होता, तिथे येऊन पोचला. तो छोटा मुलगा तापाने तळमळत होता. आई थकून झोपी गेली होती. तो दोन्ही पायांवर उड्या मारत घरात गेला आणि आईच्या हाताला लागेल असे ते माणिक ठेवले. तापलेल्या मुलाला बरं वाटावं, म्हणून त्याने त्याच्याभोवती फेऱ्या मारून आपल्या पंखाने वारा घातला. “कित्ती छान वाटतंय मला! बहुतेक मी बरा व्हायला लागलोय.” असं त्या छोट्या मुलाला वाटत असतानाच तो झोपेच्या आधीन झाला.

सांगितलेलं काम करून भिंगरी पुन्हा आनंदी राजपुत्राकडे आला. “केलं रे काम तुझं.” त्याने सांगितलं. आणि पुढे म्हणाला, “इतकी थंडी असून मला खूप उबदार वाटतंय रे!”

राजपुत्र म्हणाला, “याचं कारण माहितेय? तू चांगलं कृत्य केलं आहेस, म्हणून तुला छान उबदार वाटतंय.” भिंगरी याचा विचार करता करता झोपी गेला. विचार करायला लागलं की त्याला नेहमीच लगेच झोप यायची.

सकाळ झाल्यावर तो उडत नदीवर गेला, छानपैकी आंघोळ केली.

नदीवर एक पक्ष्यांच्या शास्त्राचा अभ्यास करणारे एक प्राध्यापक आले होते. भिंगरीकडे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. हिवाळ्यात हा पक्षी इथे कसा काय? त्यांनी तिथल्या स्थानिक वृत्तपत्रात त्याबद्दल लगेच पत्र लिहून कळवलं. इतके अवजड शब्द त्यांनी वापरले होते की, कोणाला नीट समजलंच नाही.

“आज रात्री मात्र मी इजिप्तला जाणार बरं का..!” भिंगरीने सांगितले. येणाऱ्या नव्या अनुभवांना जाणून घ्यायला तो अतिशय उत्सुक होता. तो उडत उडत सगळी स्मारकं बघून आला आणि एका उंच चर्चच्या मनोऱ्यावर टेकला. तिथल्या चिमण्या त्याच्याकडे बघून एकमेकीत चिवचिवत, ‘कोण पाहुणा आहे हा!’ त्याला या सगळ्याची मजा येत होती.

चंद्रोदय झाल्यावर तो पुन्हा आपल्या राजपुत्राकडे गेला.

“भिंगरू, भिंगरू, अजून फक्त एकच दिवस थांबशील माझ्यासाठी?” राजपुत्राने पुन्हा कळवळ्याने विचारले.

“अरे, सगळे माझी वाट बघतायत इजिप्तला. उद्या माझे सगळे मित्र नाईल नदीच्या दुसऱ्या धबधब्यापाशी जाणार आहेत. तिथले पाणघोडे त्या फुगीर लाटांवर पहुडलेले असतात आणि तिथे एका ग्रानाईटच्या सिंहासनावर म्हणे देव मेमनॉन आहे. रात्रभर तो ताऱ्यांकडे पाहत असतो आणि पहाटे पहिला तारा उदयाला येतो, तेव्हा तो आनंदाचा चित्कार काढतो आणि पुन्हा गप्प. दुपारी म्हणे तिथे पिवळ्या धम्मक रंगाचे सिंह पाणी प्यायला येतात. त्यांचे डोळे हिरव्या स्फटिकासारखे असतात आणि धबधब्यापेक्षा त्यांची डरकाळी मोठ्ठी  असते.”

“भिंगरी रे,'' राजपुत्र म्हणाला, “तुला सांगू? शहराच्या लांब दूर तिकडे मला एक तरुण माणूस एक पडक्या घरात पोटमाळ्याखाली बसलेला दिसतोय. तो नाटकाची संहिता लिहितोय. त्याच्या शेजारी पाणी पिण्याचं एक भांडं दिसतंय, आणि त्यात सुकलेली जांभळ्या रंगाची फुलं आहेत बघ. थंडीने तो इतका गारठला आहे की, त्याला लिहिता पण येत नाहीय. त्याच्याजवळ शेकोटी करायला काही नाही आणि भुकेने बिचारा व्याकूळ झाला आहे.”

“ठीक आहे. मी अजून एक रात्र थांबतो,” भिंगरी म्हणाला. त्याचं हृदय खरंच खूप प्रेमळ होतं. “त्याला पण एक रुबी देऊन येऊ का?”

“नाही रे.., माझ्याकडे आता रुबी नाही.” राजपुत्र म्हणाला, “आता माझे डोळे फक्त शिल्लक आहेत. ते अतिशय दुर्मीळ नीलमणी आहेत. ते भारतातून आणले होते. हजारो वर्षं झाली, या गोष्टीला. तू त्यातला एक काढ आणि त्या तरुणाला नेऊन दे. तो ते एखाद्या सराफाला विकून त्याच्यासाठी थोडेफार अन्न आणि शेकोटीला लाकूड तरी आणू शकेल. आणि त्याचे नाटक पण लिहून पूर्ण करेल.”

“प्रिय मित्रा, मी नाही हे करू शकणार... ” भिंगरी म्हटला आणि रडू लागला.

“भिंगरी, अरे भिंगरी, माझ्या भिंगरू,” राजपुत्र म्हणाला, “मी सांगतोय तसं कर.”

भिंगरीने राजपुत्राच्या डोळ्यातला नीलमणी काढला आणि त्या पोटमाळी गेला. छपराला खबदाड पडले असल्याने, त्याला आत सहज जाता आलं. तो तरुण माणूस हतबल होऊन, हातांच्या ओंजळीमध्ये तोंड खुपसून बसला होता, त्यामुळे त्याला पक्ष्याच्या पंखांचा आवाज काही ऐकू आला नाही... जेव्हा त्याने मान वर उचलली, तेव्हा त्याला त्याच्या सुकलेल्या जांभळ्या फुलांच्या गुच्छात तो सुंदर नीलमणी दिसला.

आनंदातिरेकाने तो म्हणाला, “अरे व्वा! माझं लिखाण लोकांना आवडू लागलेलं दिसतंय. कोणा चाहत्याने मला हा नीलमणी पाठवलेला दिसतोय. आता मी नक्की माझं नाटक लिहून  पूर्ण करेन.”

दुसऱ्या दिवशी सकाळी, भिंगरी उडत उडत एका बंदरावर गेला. तिथल्या एका मोठ्या जहाजाच्या शिडाच्या डोलकाठीवर बसून तिथल्या खलाशी लोकांची गडबड पाहत होता. ते मोठ्या दोरखंडाच्या मदतीने मोठ्या मोठ्या ट्रंका बाहेर काढत होते. त्या काढताना ते ‘जोर लगाके... हुश्श्या...’ असं ओरडत होते. त्यांच्याकडे बघून भिंगरी ओरडला, ‘मीपण आता इजिप्तला चाललोय.’ पण त्याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. चंद्रोदय झाल्यावर तो पुन्हा आपल्या राजपुत्राजवळ आला.

त्याने आल्या आल्या सांगितलं, “मी तुझा निरोप घ्यायला आलोय रे..”

“भिंगरू, भिंगरू... अजून फक्त फक्त एक म्हणजे एकच दिवस नाही थांबणार माझ्यासाठी?”

“अरे किती हिवाळा आहे!”भिंगरी म्हणाला, “आणि थोड्याच वेळात इकडे बर्फ पडायला लागेल. आत्ताच्या या दिवसांत इजिप्तला पामच्या हिरव्यागार झाडांतून उबदार सूर्य दिसतो. मगरी चिखलात खुशाल लोळत असतात. माझे सगळे मित्र तिकडे बाल्बेकच्या मंदिरात आमच्यासाठी घरटं बांधतायत. आजूबाजूला कुं, कुं करणारी  गुलाबी आणि पांढरी कबुतरं आहेत. ते बघत असतात त्यांच्याकडे. प्रिय मित्रा, मला आता जायलाच पाहिजे रे. पण मी तुला कधीच विसरणार नाही. पुढच्या वसंत ऋतूत येताना मी तुझ्यासाठी दोन रत्नं घेऊन येईन. तू तुझी दिलीस ना, त्याच्या बदल्यात! मी आणेन तो रुबी, लाल गुलाबापेक्षा लाल चुटूक असेल, आणि नीलमणी महासागराच्या पाण्यापेक्षा जर्द निळा!”

“ऐक ना, खालच्या चौथऱ्यावर,” राजपुत्र सांगू लागला, “एक छोटी मुलगी उभी आहे. काड्यापेट्या विकणारी. तिच्याकडे असलेली काड्यापेट्या गटारीमध्ये पडून खराब झाल्यात बघ. तिने त्यांचे पैसे घरी नेले नाहीत, तर तिचे वडील तिला मारतील. घाबरून ती रडत बसलीय. बघ, तिच्या पायात बूट नाहीत, मोजे नाहीत.तिचं छोटंसं डोकं पण उघडं आहे बघ. माझ्या दुसऱ्या डोळ्यातला नीलमणी तिला दे, म्हणजे तिचे वडील तिला मारणार नाहीत.”

भिंगरी म्हटला, “तुला हवं तर मी अजून एक दिवस तुझ्याबरोबर थांबतो, पण मला तुझ्या डोळ्यातला नीलमणी काढायला सांगू नकोस रे. अशाने तू  पूर्ण आंधळा होऊन जाशील की!”

“भिंगरी, भिंगरी, मी सांगतोय तसं कर.” राजपुत्राने हुकुमच केला.

भिंगरीने त्यानुसार राजपुत्राच्या डोळ्यातला नीलमणी काढला आणि झुपकन खाली उडाला. एक सुरकांडी मारून त्या मुलीच्या जवळ गेला आणि तिच्या तळहातामध्ये तो नीलमणी टाकला. “कित्ती छान! मस्त काचेचा तुकडा!” असं म्हणत, आनंदाने खिदळत, ती घरी गेली.

भिंगरी परत राजपुत्राकडे आला... त्याने राजपुत्राकडे पाहिलं आणि म्हणाला, “तू तर आता ठार आंधळा झाला आहेस. आता मी नाही तुला सोडून जाणार.”

“नाही, नाही.. भिंगरू, असं नको करूस. आता तुला इजिप्तला जायलाच पाहिजे.”

“नाही, मी तुझ्यापाशीच राहणार.” असं म्हणून तो राजपुत्राच्या पायांपाशी झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी, राजपुत्राच्या खांद्यावर बसून त्याने आत्तापर्यंत पाहिलेल्या बाहेरच्या जगातल्या गमतीच्या गोष्टी त्याला सांगत बसला. त्याने पाहिलेल्या नाईल नदीच्या किनाऱ्यावर ओळीने उभ्या असणाऱ्या आणि सोनेरी मासे पकडणाऱ्या लाललाल आयबीस पक्ष्यांबद्दल (करकोच्यासारखा एक पक्षी) सांगितलं, बाईचं डोकं आणि सिंहाचं शरीर असलेल्या इजिप्तमधल्या स्फिंक्सच्या पुतळ्याबद्दल सांगितलं. जगाच्या निर्मितीइतकाच तो जुना आहे आणि दूर वाळवंटात राहूनदेखील तिला जगातलं सगळं, म्हणजे सगळं कसं माहीत असतं वगैरे. चंद्रावरच्या पर्वतांच्या काळ्याकभिन्न राजाबद्दल, जो एका मोठ्या स्फटिकाची पूजा करतो, पाम झाडांमध्ये झोपणाऱ्या भल्या मोठ्या सापांबद्दल, त्याला खायला वीस वीस मधाची पोळी तिथल्या पुजाऱ्यांना द्यावी लागतात, आणि मोठ्या पानांवर तरंगत येऊन फुलापाखारांशी युद्ध करणारे ठेंगू अशा कितीतरी सुरस कथा तो राजपुत्राला सांगत बसे.    

“मित्रा भिंगरी”, राजपुत्र म्हणाला, “तू मला खूप अद्भुत गोष्टी सांगतोस. पण माणसाचं दुःख हे या पेक्षा अधिक अद्भुत असतं रे. दुःखासारखं दुसरं रहस्य नाही, या जगात मित्रा! तू माझ्याच शहरावरून उडून तुला काय काय दिसतं सांगशील?”

भिंगरी उडाला, शहरावरून चक्कर मारली. त्याला दिसलं, शहरातले सगळे श्रीमंत लोक त्यांच्या अलिशान घरात आनंद साजरा करताहेत, आणि दुसरीकडे उपाशी राहिल्याने पांढरे फटक पडलेले, काळ्या रस्त्यांकडे शून्य नजरेने पाहणारे गरीब लहान मुलांचे चेहरे! पुलाच्या कमानीखाली दोन छोटी मुलं, थंडीपासून रक्षण करायला एकमेकांच्या कुशीत झोपली होती. “आम्हाला खूप भूक लागलीय!” काकुळतीने एका घरापुढे काही मुलं म्हणत होती आणि त्या घराचा रक्षक त्यांच्यावर ओरडला, “चला, निघा इथून! इथे थांबू नका...” आणि त्यांना बाहेरच्या पावसात हाकलले.

परत येऊन त्याने पाहिलेले सगळे राजपुत्राला सांगितले.

“हे बघ भिंगरी, माझ्या सर्वांगावर सोन्याचा पत्रा आहे.” राजपुत्र म्हणाला, “तो काढ आणि एकेक तुकडा त्या मुलांना दे. जिवंत माणसांना वाटतं की, सोन्यामुळे ते आनंदी होतील.”

भिंगरीने सोन्याच्या पत्र्याचा एकेक तुकडा काढला आणि सगळ्यां गरीब मुलांना वाटून टाकला... मुलांचे चेहरे आनंदित झाले. “आता आमच्याकडे पण खायला खाऊ आहे!” ते आनंदाने हासू लागले, खेळू लागले. राजपुत्र आता भकास आणि विद्रूप दिसू लागला.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

एव्हाना हिवाळा वाढला, बर्फ पडायला लागला.रस्तेयावर पडलेल्या बर्फामुळे ते चंदेरी, चकचकीत आणि घसरडे दिसू लागले. घराघरांवरून स्फटिकासारख्या दिसणाऱ्या, लांब आणि अणकुचीदार निमुळत्या बर्फाच्या कांड्या लटकू लागल्या. सगळ्यांनी लोकरीच्या कपड्यांत स्वतःला गुंडाळून घेतलं.छोटी छोटी  मुलं डोक्यावर लाललाल टोप्या घालून बर्फावर स्केटिंग करू लागली.

बिच्चारा भिंगरी थंडीने काकडून गेला. राजपुत्रावर त्याचं इतकं प्रेम होतं की, त्याला सोडून जायला त्याचे मन तयार होत नव्हतं. कधीतरी बेकरीच्या बाहेर बेकरीवाल्याने झटकलेले पावाचे कण खाऊन आणि पंख फडफडवून अंगात ऊब आणण्याचा तो प्रयत्न करत होता.

पण एका क्षणी त्याला कळून चुकलं की, आता सारं संपलं आहे. तो मरणार आहे. सगळी ताकद एकवटून कसाबसा तो राजपुत्राच्या खांद्यापर्यंत पोचला. त्याच्या कानात पुटपुटला, “प्रिय मित्रा, जातो मी. गुड बाय! जाण्यापूर्वी एकदा तुझ्या हाताची पापी घेऊ?”

आनंदित होऊन राजपुत्र म्हणाला, “बरं झालं.. मला इतका आनंद होतोय की, आता एकदाचा तू इजिप्तला जाणार.” खूप दिवस इथे राहिलास तू! माझं पण तुझ्यावर खूपच प्रेम आहे रे! माझ्या हाताची नको माझ्या ओठांची पापी घे.”

“अरे, मी इजिप्तला नाही, मृत्यूच्या घरी चाललोय.” भिंगरी म्हणाला, “मृत्यू म्हणजे झोपेचा भाऊच असतो. हो ना?”

असं म्हणून त्याने आनंदी राजपुत्राच्या ओठांची पापी घेतली आणि त्याच्या पायाशी कोसळला.

त्याच क्षणी, त्या पुतळ्याच्या आतून काहीतरी मोडल्यासारखा चमत्कारिक आवाज आला. त्याचं शिशाचं हृदय दोन भागात चिरलं गेलं. कदाचित बर्फाचा थंडावा जरा जास्तच असावा.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शहराचे महापौर चार लोकांबरोबर तिथे फिरायला आले असताना, त्यांनी त्या पुतळ्याकडे पाहिले आणि म्हणाले, “अरे अरे, किती वाईट दिसतोय हा आनंदी राजपुत्र!”

“खरंच! अगदीच वाईट!” महापौरांच्या कोणत्याही म्हणण्याला री ओढणारे नगरसेवक म्हणाले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

“अरे, त्याच्या तलवारीच्या मुठीचा रुबी पडलेला दिसतोय, डोळे गेलेत, आणि पूर्वीसारखा तो सोनेरी पण दिसत नाहीय. अगदीच भिकाऱ्यासारखा दिसतोय.” महापौर म्हणाले.

“भिकाऱ्यापेक्षा जरा बरा!” नगरसेवक म्हणाले.

“आणि पहा! तिथे चक्क एक पक्षी मरून पडलेला दिसतोय.” महापौर बोलत होते, “आपण तातडीने एक नियम जरी केला पाहिजे की, पक्ष्यांना इथे मरायला परवानगी नाही.” बरोबर आलेल्या कारकुनाने आपल्या वहीत या नियमाची नोंद करून घेतली.

सगळ्यांनी मिळून तो पुतळा जमीनदोस्त केला. “आता काही तो सुंदर दिसत नाही, त्यामुळे त्याचा काय उपयोग?” विद्यापीठात कला आणि सौंदर्यशास्त्र शिकवणारे एक प्राध्यापक बोलले.

तो पुतळा एका भट्टीत टाकून सगळ्यांनी जाळून टाकला. महापौर म्हणाले, “आता वितळून राहिलेल्या या धातूचे काहीतरी करायला पाहिजे. इथे आपण एक नवा पुतळा उभा  करू या. तो पुतळा माझा असेल.”

“नाही नाही... माझा...”, “नाही माझाच!” सगळे नगरसेवक आपसांत भांडू लागले.

“हे काय आश्चर्य आहे पहा!” भट्टीवर काम करणारा मुख्य माणूस म्हणाला, “या शिशाचे हृदय वितळलेच नाही पहा. हे फेकून द्यावे लागेल.” असं म्हणून त्यांनी ते न वितळलेले हृदय शेजारच्या कचऱ्याच्या ढिगावर फेकले. ते नेमकं जिथे भिंगरी पडला होता, तिथे जाऊन पडलं.

इकडे स्वर्गात देवाने आपल्या दूतांना हुकुम दिला, “माझ्यासाठी शहरातल्या दोन मौल्यवान गोष्टी आणा.” आणि दूतांनी आणले ते शिशाचे हृदय आणि तो मृत पक्षी.

“अगदी योग्य निवड आहे तुमची.” देव प्रसन्नतेने म्हणाला, “आता माझ्या या स्वर्गातल्या बागेत हा छोटा पक्षी आनंदाने गाणी म्हणत बसेल आणि माझ्या सोन्याच्या नगरीत हा आनंदी राजपुत्र आनंदात राहील.”

.................................................................................................................................................................

आयरिश कवी, नाटककार आणि कथाकार ऑस्कर वाइल्ड यांच्या ‘द हॅपी प्रिन्स’ या जगप्रसिद्ध कथेचा हा मराठी अनुवाद आहे. ही मूळ कथा वाचण्यासाठी क्लिक करा -

https://www.wilde-online.info/the-happy-prince.html

अनुवाद : अपर्णा महाजन

aparnavm@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......