अमृताजींची ‘पिंजर’मधली पुरो प्रत्येक भारतीयाला भेटली पाहिजे... ओळखता, वाचता आली पाहिजे... पुरो समजली पाहिजे...
दिवाळी २०२२ - लेख
पाशा
  • अमृता प्रीतम
  • Fri , 28 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख अमृता प्रितम Amrita Pritam पुरो Puro पिंजर Pinjar साहिर लुधियानवी Sahir Ludhianvi इमरोज Imroz फाळणी Partition

‘रामायण’ किंवा ‘महाभारत’ मी कधी वाचलंय? आठवणीत नाही.

आईच्या कुशीत लोळत मी आणि बहीण, साशाने रामकथा, सीतेची अपहरण कथा... ‘महाभारता’तील भाऊबंदकीच्या कथा कधी ऐकल्याचं मला स्मरत नाही.

नव्वदीपार माझ्या आईला ते आठवेल?

आईकडून ऐकलेल्या कथा समजुतीच्या नावेतून आम्हाला पैलतीर पोहचवणाऱ्या होत्या.

त्यांचा ऋणानुबंध आमच्या वयाशी नाही, तर हळूहळू उमजत जाणाऱ्या समजुतीशी होता.

पण ते तेव्हा आईला कळत होते? ते मुद्दामून होते?

 

अशीच एका कथेची जन्मदात्री १९८४ साली आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत माझ्यासमोर बसली होती.

आज कळतेय, त्या दिवशी अमृता प्रीतम जवळपास ६३ वर्षांच्या होत्या...

त्यांची चण लहानखुरी होती. एक लहान मुलगी त्यांच्यात राहत असावी इतक्या त्या लहान आणि अलगद होत्या.

त्यांच्या दिसण्याकडे माझं इतकं लक्ष गेलं नाही, जितकं मला दिसलं ते त्यांच्यातल स्त्रीत्व. त्या स्टुडिओमधील काही मिनिटांच्या वास्तवात मला वाटलं की, सामान्य स्त्रियांपेक्षा जणू त्या जास्त स्त्रीत्वाच्या धनी आहेत… बाईपणापेक्षा काहीतरी ‘बाईपण’ त्यांच्याजवळ अधिक होतं...

त्याक्षणी मला साहिर आठवले… पण साहिर-अमृता यांच्याविषयी काही विचारण्यासारखं उरलंय असं मला वाटलं नाही...

त्यांचे सहजीवी इमरोज स्टुडिओत त्यांच्या शेजारीच खुर्चीवर बसले होते...

त्यांच्या खुर्च्या वेगळ्या होत्या, तरी एकाच खुर्चीवर बसावं इतके ते एकमेकांसमीप होते...

नियमानुसार मुलाखतीच्या कार्यक्रमात मुलाखत देणारा-घेणारा हेच स्टुडिओत असतात.

पण इमरोज सावलीसारखे अमृताजींच्या मागे स्टुडिओत आले.

आणि सावलीच ती… संगत करत बसली… मूकपणे...

ध्वनिमुद्रण सुरू झालं...

माझा आवाज चांगला नाही, त्यात पहिल्याच प्रश्नाला कापरा, चिरका…

मी थरथरत होतो...

‘‘अमृताजी, माझं आणि माझ्या बहिणीचं लहानपण तुमच्या पुरोची कहाणी ऐकण्यात गेलंय...

न समजणाऱ्या वयातही आमच्या आईने फाळणीमध्ये दुभंगून गेलेल्या तुमच्या पुरोची कहाणी आम्हाला खूपदा सांगितली…  आणि आमच्या हट्टानुसार कथा परत परत सांगताना आईच्या डोळ्यात आम्ही पाणी पाहिलंय तुमच्या पुरोकरता... त्या वयात झोपण्यापूर्वी पुरोची कथा ऐकताना ती कधी कळली, कधी उमगली, तर कधी जाणवली, पण आई सांगत असताना तुमची पुरो आम्हाला प्रत्येक वेळी भेटली... अमृताजी, आईच्या कुशीत आम्हाला भेटलेली ही पुरो, तुम्हाला कुठे भेटली? दिसली? तुम्ही का लिहिली?’’

‘पिंजर’मधली अमृताजींची ही पुरो प्रत्येक भारतीयाला भेटली पाहिजे...

कधीतरी... कोणत्याही वयात...

कुठे-न-कुठे भेटली तर ओळखता, वाचता आली पाहिजे...

पुरो समजली पाहिजे...

 

१९५०साली अमृताजींनी ही पुरो पंजाबी भाषेत ‘पिंजर’ या आपल्या कादंबरीत चित्तारली...

आपल्या देशाच्या फाळणीच्या वणव्यात भारत-पाक सीमारेषेच्या अल्याडपल्याड रशीद या मुस्लीम माणसाने अपहरण केल्यावर त्याच्या घरात अस्थिपंजर अवस्थेत जगणारी पुरो...

कशीबशी सुटका करून कुटुंबाकडे परत झेपावताना आपला परतीचा मार्ग आपल्या कुटुंबीयांनीच बंद केल्याची जाणीव...

परत रशिदच्या घरात आणि नंतर त्याच्याच संसारात...

निव्वळ अस्थिपंजर...

 

काळ सरतो.

आणि सीमारेषेवर अशा अनेक अपहृत जणींची आपापल्या कुटुंबात जाण्यासाठी देवाणघेवाण सुरू होते...

रशिद पुरोला आणि त्यांच्या लहानग्याला तिच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यासाठी घेऊन येतो...

पुरोचं कुटुंब तिला स्वीकारण्यासाठी जीव डोळ्यात घेऊन तिच्यासमोर उभं राहतं...

अमृता प्रीतम यांची ‘पिंजर’ हे या देशाच्या फाळणीवरचं आणि त्यात होरपळ झालेल्या जिवांवरचं महाकाव्य आहे.

आणि १९८४ च्या मार्च महिन्याच्या ९ तारखेला आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये ज्या बोटांनी हे महाकाव्य लिहिलं, ती बोटं अमृताजींच्या गालावर स्थिरावली होती...

अमृताजी पंजाबीतच बोलताहेत असं वाटावं, तसं त्यांचं हिंदी होतं...

त्यांच्या उच्चारात त्यांची मातृभाषा ऐकू येत होती...

फाळणीनंतर त्या या देशात आल्या, लाहोरहून,

फक्त मातृभाषेचं गाठोड घेऊन आल्या असाव्यात.

 

फाळणीचा अंगार त्यांना जन्मभर चटके देत राहिला.

आपली पिढी ते चटके आजही सोसते आहे, ही भावना तीव्रपणे त्यांच्या मनात होती,

विशेषतः असंख्य स्त्रिया,

आणि पुरो त्या असंख्य स्त्रियांचं प्रतिबिंब आहे असं त्या म्हणाल्या.

अमृताजी सांगत होत्या-

“म्हणून तर शेवटच्या क्षणी आपल्या आप्तांना अव्हेरून परत रशिदबरोबरच संसारात जायचा आपला निर्णय सांगताना पुरो म्हणते, सीमारेषेवर होणाऱ्या या घरपरतीच्या निर्णयामुळे... हिंदू असो की मुस्लीम असो... एकेक स्त्री आपापल्या घरी पोहचली की, मला वाटेल माझा आत्मा माझ्या घरी पोहचला… कुटुंबियांत विसावला...”

आकाशवाणीच्या मुलाखतीनुसार खरं तर मी अमृताजींना सविस्तर लेखनाबद्दल विचारायला हवं होतं, पण माझ्या मनात त्यांच्यासाठी एकच प्रश्न होता...

तो माझ्या जिभेवर रेंगाळत होता...

मी विचारणार होतोच…

अमृताजी बोलक्या असल्याने त्यांच्या उत्तरातून प्रश्न पण आपसूक येत होते…

स्त्रियांचं emancipation (सर्वस्वी त्यांचा शब्द), मजहब, पुरुषातील स्त्री अन् स्त्रीमधील पुरुष, घराघरात आचरण शाळा, धार्मिक तेढ हे लेखकांचे रूढ विचार आपल्या पंजाबी लहेज्यात त्या मांडत गेल्या...

(आकाशवाणीच्या बहुतेक मुलाखतीत बहुतेक लेखक असेच बोलतात.)

त्यांचे सहजीवी इमरोझ त्यांचं बोलणं प्रथमच ऐकत आहेत, असं त्यांच्याकडे बघत होते...

अत्यंत ममत्व होतं त्यांच्या डोळ्यात…

 

अमृताजी पाणी पिण्यासाठी क्षणभर थांबल्या...

आणि पाणी न पिताच मी विचारलेला प्रश्न ऐकून क्षणभर घुटमळल्या.

“अमृताजी, फाळणीचा अंगार आजही तुम्हाला इतक्या वर्षांनी चटके देतोय... पण तुमच्या प्राणप्रिय पंजाबमधील खलिस्तानी प्रवृत्तींनी आज परत हा देश फाळणीच्या उंबरठ्यावर आणून ठेवलाय. दहशतवाद त्या पंजाबमध्ये सामान्यांचं जगणं जिकिरीचं करतोय... माणसं मारली जाताहेत… धार्मिक द्वेष व्यक्त होतोय.... अशा वेळी पंजाबवर प्रेम करणारी अमृता प्रीतम… पंजाबी भाषेचा ज्ञानपीठ पुरस्कार जिच्या घरात नांदतोय, अशा अमृता प्रीतमला, तुम्हाला, परत तुमच्या लेखणीने या पंजाबकरता काही करावंसं, लिहावंसं वाटत नाही? आपकी उंगलिया आपसे पूछती नहीं हैं? आपकी कलम आपसे कहती नहीं की, वो कुछ लिखना चाहती हैं?”

१९८४च्या मार्च महिन्यात ९ तारखेला मी हा प्रश्न अमृता प्रितम यांना विचारला होता...

(१९८४मध्येच या मुलाखतीच्या ८० दिवसांनंतर, १ जूनला पंजाबमध्ये भारतीय सैन्य ‘ब्ल्यू स्टार ऑपरेशन’ करून पंजाबच्या सुवर्ण मंदिरात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणार होतं… पंजाबी हृदयाला म्हणजे सुवर्ण मंदिराला तडा जाणार होता...

आणि या कारवाईचा बदला म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबरला हत्या आणि त्यातून मग शिखांच्या त्यांच्याच देशबांधवांनी केलेल्या हत्या...

या घटना सहा-सात महिन्यांच्या कालावधीत हा देश बघणार होता.)

 

माझा प्रश्न ऐकून अगदी क्षणभर अमृताजी अन इमरोज यांची नजरानजर झाली...

अमृताजी काही बोलल्या नाहीत... त्यांचा चेहरा मला वाचता येत नव्हता...

स्टुडिओच्या काचेपल्याड ध्वनिमुद्रण सुरूच होतं... टेपवर स्तब्धता उमटत होती...

आणि मग अमृताजी बोलल्या...

“पंजाब... मेरा पंजाब मेरे लिये हमेशा हराभरा हैं...

सरसोंके लहलहाते हरेपिले खेत...

वो नीले नीले बादल...

वो चहकनेवाले पंछी...

वो नयी नवेली दुल्हन...

उनके बजते कंगन... हरी..लाल चुडियां...”

अमृताजी पंजाबबद्दल नेमकं काय सांगताहेत, मला कळेना... पण तलम सुती कापड बोटातून निसटून खोटी जर टोचावी असा सूक्ष्म बदल त्यांच्या आवाजात आला होता…

कधी काळी त्या आकाशवाणीवर पंजाबी निवेदिका होत्या… अभिनयनिपुण आवाज होता त्यांचा...

“पंजाब प्रेम का नाम हैं...

पंजाब आखिर हीर-रांझा दी मिट्टी हैं...

पंजाब दा महान कवी वारीस शाह दीं पुत्री हीर और पिंजर दी पुरो

ये दोनो मेरा पंजाब हैं...

हीर प्यार में मर गयी.. मगर पुरो? पुरोने नफरत हिंसा... बदला… अपमान… बलात्कार... अपनोंकी बेरुखी… अपनोसे जुदायी... इन सबको सेहकर अंत में चुना... किसे?... रशिदको!!

अपने गुनेहगारको!!

आज ऐसी पुरो

और उसके पुत्तर पंजाब में हैं…

गुनाह माफ करना पंजाब जानता हैं...

हमेशा से

क्योंकी

प्रेम करना पंजाब जानता हैं...

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

मुलाखतीनंतर आमच्या केंद्र निर्देशकांच्या खोलीत इमरोज यांनी मला त्यांचा दिल्लीचा पत्ता दिला फोन नंबरसह...

आईला भेटायला आवडेल, असं अमृताजी स्टुडिओबाहेर पडताना म्हणाल्या…

अमृताजी चहा प्यायला नाहीत...

इमरोज यांनी एक बिस्कीट हातात ठेवलं… बहुधा अमृताजींसाठी असावं...

 

आकाशवाणीवर मुलाखत प्रसारित झाली, ती शेवटचा प्रश्न गाळून...

कोणाला काही फरक पडला नाही...

काटछाट मी केली नव्हती...

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

मला आजही एक प्रश्न पडतो, अमृताजींनी स्वतः विचारला होता- वारीस शहाला.

१७९८मध्ये दफन झालेल्या हीर-रांझाच्या रचीयता पंजाबी कवी- वारीस शहाला.

फाळणीच्या आसपास अमृताजी एका कवितेत विचारतात -

“आज मैं वारीस शहा से कहती हूँ...

अपनी कब्र से बोल...

इश्क की किताब का नया पन्ना खोल

देख आज पंजाब की लाखों रोती बेटियां... तुझे बुला रही हैं…

उठ! दर्दमंद को आवाज देनेवाले!

और अपना पंजाब देख...

खेतों मे लाशे बिछी हैं

चेनाब लहू से भरी बहती हैं...”

 

हाच प्रश्न अमृताजींनी स्वतःला का विचारला नसावा?

 

गुगल चाळताना आज मला अमृताजी यांनी केलेलं एखादं राजकीय भाष्य कुठंही दिसत नाही, जरी त्या सहा वर्षं राज्यसभेच्या खासदार होत्या...

 

२००५मध्ये अमृताजी गेल्या... झोपेत...

तो दिवस ३१ ऑक्टोबर होता...

पंजाब हिंसाचाराला बळी पडलेल्या इंदिरा गांधी यांना देश त्या दिवशी श्रद्धांजली वाहत होता… दरवर्षीप्रमाणे...

अमृताजींच्या पलंगाजवळ डोक्याशी दोघींचा फोटो होता असं म्हणतात!

.................................................................................................................................................................

पाशा

yashpalpasha@Gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......