राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...
दिवाळी २०२२ - लेख
शंकर सोलापूरकर
  • ‘भारत जोडो’ यात्रेतील राहुल गांधींचे एक छायाचित्र
  • Thu , 27 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Soniya Gandhi भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra काँग्रेस Congress

दिल्लीतील किंग्जवे पोलिसांच्या मोठ्या सभागृहात मैफल जमलेली होती. मध्यभागी राहुल गांधी, भोवताली काँग्रेसचे नेते. इतर वेळी कदाचित नेत्यांनी संकोच केला असता, पण इथं आसपास सगळेच काँग्रेसी, राहुल गांधीही एकटेच. मग, मनातील बोलायला काय हरकत? या काँग्रेसींचा आग्रह होता की, राहुल गांधींनी पुन्हा पक्षाध्यक्ष बनले पाहिजे. हे पद न स्वीकारून ते मोठी चूक करत आहेत... राहुल गांधींनी सगळ्यांचे ऐकून घेतले. काँग्रेसी नेत्यांनी खडे बोल सुनावले म्हणून राहुल गांधींनी अपमान मानला नाही, ना त्यांनी नेत्यांना बोलण्यापासून रोखले. राहुल लोकांचे म्हणणे खुल्या मनाने ऐकायला तयार असतात, हा कार्यकर्त्यांचाही अनुभव आहे. सगळ्यांचे बोलून झाल्यावर, ते शांतपणे म्हणाले, तुम्ही काँग्रेससाठी काम करता की, गांधी कुटुंबासाठी? काँग्रेस मजबूत करायची असेल तर, माझी तुम्हाला काय गरज? तुम्ही काँग्रेससाठी काम करा, मलाही काँग्रेससाठी काम करायचे आहे!... राहुल यांनी नेत्यांना समजावून सांगण्यासाठी कदाचित वेगळे शब्द वापरले असतील, पण त्याचा अर्थबोध एकच. खरे तर इथेच स्पष्ट झाले होते की, राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे पक्षाध्यक्ष होणार नाहीत. त्यांनी आता वेगळी वाट धरली आहे. त्यानंतर दीड महिन्यात ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत व्यक्तीशी राहुल गांधींसंदर्भात चर्चा करताना ‘पप्पू’ शब्दाचा उल्लेख झाला. हे गृहस्थ सांगत होते, राहुल यांना ‘पप्पू’ ही उपरोधिक उपमा त्यांनी पहिल्यांदा दिली. त्यांच्या दाव्यातील सत्य कोणी तपासलेले नाही. पण, राहुल गांधींची बदनामी करणारा ‘पप्पू’ हा शब्द संघ-भाजपच्या सुपीक डोक्यातून आला हे नक्की. या शब्दाने राहुल गांधी यांची राजकीय वाटचाल अत्यंत खडतर करून टाकली. पण, कदाचित त्यांचे आडनाव गांधी असल्याने ते राजकारणातून पूर्णतः बाहेर फेकले गेले नाहीत. अन्यथा, दुसरा कोणी राष्ट्रीय स्तरावरील नेता दिल्लीच्या राजकारणात टिकून राहिला नसता.

काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अनौपचारिक गप्पांमध्ये सांगत होते, सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिमेला महत्त्व असते, एखादी छोटी चूक देखील तुम्हाला राजकारणातून बाहेर फेकून देते. मग, तुम्ही राजकारणात उंचीवर पोहोचण्याची शक्यता संपुष्टात येते! या नेत्याने काही नेत्यांची उदाहरणेही दिली. ‘माझ्या प्रतिमेबद्दल मी इतका सावध राहत असे की, एकदा इंदिरा गांधींनी मला बोलावून विचारले देखील’, अशी आठवण या नेत्याने सांगितली. मग, भाजपने पद्धतशीर हल्लाबोल केल्यानंतरही राहुल गांधी राजकारणात टिकून कसे राहिले? त्यांच्याकडे टिकून राहण्यासाठी गरजेचे असलेला प्रचंड मानसिक कणखरपणा असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तो आहे. राहुल आणि मोदींमध्ये हे एकमेव साम्य असेल. दोघांमधील सर्वांत मोठा फरक म्हणजे सत्तेची अभिलाषा! मोदींकडे ती आहे, राहुल यांच्याकडे ती नाही.

राहुल गांधींना भारत भ्रमण करावेसे वाटले, ही ‘पप्पू’ प्रतिमेला छेद देण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली आखणी आहे की, आयुष्यात काय करायचे आहे, याची स्पष्टता त्यांना आलेली आहे? ‘भारत जोडो’ यात्रा निव्वळ राजकीय डावपेच असेल तर, तो फोल ठरेल हे नक्की. बुद्धिबळाच्या पटावर एक-दोन नव्हे पुढील चार खेळ्या आधीच निश्चित करून डाव टाकण्यात मोदी-शहा आणि भाजपचे अख्खे केंद्रीय नेतृत्व माहीर आहे. रणनीती, आखणी, डावपेच आणि ‘किलर इन्स्टिंक्ट’ या जोरावर भाजप कोणावरही मात करू शकतो. त्यांनी राहुल गांधींवर गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत यशस्वी मात केली. इतकेच नव्हे तर, अख्खा काँग्रेस पक्ष खिळखिळा करून टाकला. भारत जोडो यात्रा एखाद्या डावपेचा पलीकडे जाणारा मार्ग असेल तर, राहुल गांधींचे ध्येय कोणते, याची कल्पना येऊ शकेल. राहुल गांधींना १५ वर्षे ओळखणारे, त्यांच्याशी तासन् तास चर्चा करणारे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते सांगत होते की, ‘भारत जोडो’ यात्रा ही राजकीय खेळी आहे, असे राहुल यांच्या बोलण्यात जाणवत नाही. त्यांच्याशी अनेकदा बोलणे झाले, ते लबाड नेते असल्याचे कधीही वाटले नाही. ते सरळमार्गी आहेत, त्यांना जे वाटते ते बोलतात, एखादी गोष्ट पटली नाही तर, तसेही स्पष्ट सांगतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

या सामाजिक कार्यकर्त्याच्या दाव्यात तथ्यही असेल. पण, ‘भारत जोडो’ यात्रा करून राहुल गांधींना काय मिळवायचे आहे? त्यांनी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांना सत्ता-पद नको, असे दिसते. केंद्रातील मनमोहनसिंग सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद स्वीकारण्यासही नकार दिला होता. इंदिरा गांधींनी जे केले, ते राहुल गांधींना का करावेसे वाटले नाही? इंदिरा गांधींनी पंडित नेहरूच्या कारकिर्दीतच काँग्रेस पक्षामध्ये राजकारणाचे धडे घेतले. त्या लालबहादूर शास्त्रींच्या मंत्रीमंडळात मंत्री झाल्या. शास्त्रींनंतर मात्र त्यांनी काँग्रेस आणि सरकार दोन्ही ताब्यात घेतले. पक्षांतर्गत विरोध मोडून काढला आणि इंदिरा काँग्रेस हीच खरी काँग्रेस हे सिद्ध करून दाखवले.

राहुल गांधींना यापैकी एकही गोष्ट करणे जमले नाही की, त्यांना ते करायचेच नव्हते? बहुधा दोन्हीही. राजीव गांधींना, सोनिया गांधींना राजकारणात यायचे नव्हते, नाइलाजाने दोघांनी काँग्रेसची जबाबदारी स्वीकारली होती. राहुल गांधी यांनीदेखील तेच केले असावे, असे कधी कधी वाटून जाते. अन्यथा त्यांनी मंत्रिपदाचा अनुभव घेतला असता. शासन-प्रशासन कसे चालते वा चालवले जाते? सत्ता टिकवण्यासाठी केलेल्या तडजोडी काय असतात? हे समजून घेतले असते तर, राहुल गांधींनी स्वतःच्या सरकारने तयार केलेल्या विधेयकाचा मसुदा भर पत्रकार परिषदेत फाडला नसता. राजकारणी म्हणून आपण अजून अपरिपक्वच आहोत, हे राहुल गांधींनी स्वतःच सिध्द केले होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, या काळात राहुल गांधी राजकारणात चाचपडत होते. २००४मध्ये राहुल गांधींनी पहिल्यांदा अमेठीतून लोकसभेची निवडणूक जिंकली आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

राहुल गांधी आल्यामुळे काँग्रेसींना आणखी एक गांधी मिळाला होता. नव्या गांधीच्या जीवावर काँग्रेसला सत्ता टिकवता येईल, याची काँग्रेसवाल्यांना खात्री होती. सोनिया गांधी पक्षाध्यक्ष होत्या. त्यांच्या समन्वयातून केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर टिकून राहिले. सोनियांची जागा राहुल गांधी घेणार, हे ठरलेले होते. त्यांना उपाध्यक्ष बनवले गेले. पूर्वी वारसाहक्कामुळे आठ-दहा वर्षांच्या मुलालाही राजा केले जात असे, तसे राहुल गांधी नावाच्या तरुणाला काँग्रेसचा राजा बनवले गेले. या तरुणाने लहानपणापासून राजकारणी पाहिले होते, पण, राजकारण कसे करायचे हे त्याला माहीत नव्हते. त्याने आजी आणि नंतर वडिलांची हत्या झालेली पाहिली. सत्तेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तींच्या वाट्याला काय येऊ शकते, याचा अनुभव त्याने कोवळ्या वयात घेतलेला होता. सत्ता हवी कशाला, सत्तेशिवायदेखील बरेच काही करता येऊ शकते, ही भावना कदाचित हिंसेत गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांमुळे निर्माण झाली असावी. लहान वयात इतका टोकाचा जगण्याचा किंबहुना मृत्यूचा अनुभव इतक्या जवळून घेतल्यावर व्यक्ती आयुष्याकडून वेगळे काही शोधत असावा. राहुल गांधींबाबत तसेच काही तरी झाले असावे असे वाटते.

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. किंग्जवे पोलिसांच्या सभागृहात त्यांनी काँग्रेसींना सांगितले होते की, त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. मी भाजपच्या कुठल्याही नेत्याशी हिंदू धर्मावर चर्चा करायला तयार आहे. भाजपच्या नेत्यांनी तरी वेद आणि उपनिषदे वाचली आहेत का, त्याचे सार समजून घेतले आहे का?...

राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना जाहीरपणे एखादी गोष्ट सांगितली असेल तर ती खरी असू शकते. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे, हे आता काँग्रेसमध्ये बहुतांश कार्यकर्त्यांना माहिती झालेले आहे. शंकराच्या व्यक्तिमत्त्वावर राहुल गांधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असतात. शंकराचा विरक्तपणा राहुल गांधींना आपला वाटत असावा. संसारात राहून विरक्त राहण्याचा शंकराचा स्वभावधर्म राहुल गांधींनी घेतला असावा. या विरक्तीमुळे त्यांना काय मिळाले? पक्षाचे राजकीय नुकसान झाले, हा आरोप करण्याची संधी मात्र काहींना मिळाली हे मात्र खरे!

राहुल गांधींचे पक्षांतर्गत विरोधकांचा युक्तिवाद अगदीच तथ्यहीन नव्हता. निवडणुकीच्या राजकारणामध्ये यशापयशाचा सामोरे जावे लागते. पराभव झाला म्हणून कोणी पक्षाध्यक्ष पद सोडून देत नाही. पक्षात हवे तसे काम करू दिले जात नाही, असे म्हणणे स्वतःच्या दोष बाजूला सारण्याजोगे ठरेल. पक्षाध्यक्ष सोडण्यापेक्षा समन्वयाने काम करून पुन्हा पक्ष संघटना उभी करा, भाजपविरोधात थेट संघर्ष करा, असे ज्येष्ठ नेत्यांचे सांगणे होते. राहुल गांधींना सत्ता नको होती तर, ते पक्षाध्यक्ष झाले कशासाठी? त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, ते संसदेत काँग्रेसचे खासदार म्हणून लोकसभेत भाषण करतात. मग, पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी ते का नाकारत आहेत? हे नेते काही चुकीचे सांगत नव्हते. राहुल गांधींचे काही तरी चुकले होते हे निश्चित. पक्षाध्यक्ष पद अचानक सोडून त्यांनी काँग्रेसला अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले. मग, काँग्रेस पूर्णतः दिशाहिन झाला. सत्ता मिळणार नाही, पक्षाला वाली नाही, वैचारिक स्पष्टता नाही, इतकी दैनावस्था झाली. काश्मीरचा विशेषाधिकार रद्द केल्यावर काय भूमिका घ्यायची, हेदेखील काँग्रेसला कळले नाही इतका हा पक्ष दिशाहिन झालेला होता. या निर्नायकीमध्ये तात्पुरता पर्याय म्हणून पुन्हा पक्षाध्यक्ष पदाची धुरा सोनिया गांधींकडे दिली गेली.

राहुल गांधींच्या राजीनाम्यामुळे पक्षाचे नुकसान होणार असेल तर, पक्षाचा डाव पुन्हा सावरावा लागेल या विचारातून सोनिया गांधींनी पक्षाची मोट बांधण्यास सुरुवात केली. राहुल गांधींच्या विरोधकांचे म्हणणे होते की, तुम्ही पक्षाची सूत्रे पूर्णपणे हाती घ्या आणि निर्णय घ्या. नाही तर पूर्णवेळ उपलब्ध असणारा पक्षाध्यक्ष निवडा. पक्षांतर्गत निवडणुका झाल्या पाहिजेत. काँग्रेसमधील हा ‘बंडखोर’ विचार निर्णयाक होता असे म्हणता येईल. गांधी कुटुंबातील सदस्यांनी निर्णय घ्यायचा आणि तो बिनबोभाट अंमलात आणायचा, का असा प्रश्न विचारायचा नाही, या गांधी कुटुंबाच्या मक्तेदारीला तडा गेल्याचे दिसू लागले. ‘जी-२३’ गटातील बंडखोर नेत्यांमध्ये काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची ताकद नाही, या गटातील बहुतांश नेते लोकसभेची निवडणूकही जिंकू शकत नाहीत. त्यांनी प्रामुख्याने राहुल गांधींना आव्हान दिले होते. सोनियांनी दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. हा सगळा पक्षांतर्गत संघर्ष सुरू असताना राहुल गांधींना संसदीय राजकारणामध्ये वैचारिक संघर्ष कोणाशी करायचा आणि तो का करायचा हे स्पष्ट होऊ लागले होते.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभवातून त्यांचा संघ-भाजपविरोधातील राजकीय संघर्ष अधिक अणकुचीदार झाला होता. त्याचाही परिणाम पक्षांतर्गत संघर्षावर होऊ लागला होता. पक्षांतर्गत संघर्ष दोन स्तरांवर सुरू होता. काँग्रेसने वैचारिक भूमिका कशी घ्यायची, त्याची रणनीती काय असेल, याबाबत मतभेद होते. काही नेत्यांचे म्हणणे होते की, मोदींवर थेट टीका करून काँग्रेसचे नुकसान होईल, त्यापेक्षा मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करा. देशातील सर्वात लोकप्रिय नेत्याला लक्ष्य करून लोकांची आपण नाराजी ओढवून घेत आहोत. पण, राहुल गांधी आणि त्यांच्या चमूने हा शहाणपणाचा सल्ला ऐकला नाही. ‘चौकीदार चोर है’ ही मोदीविरोधी घोषणा पूर्णपणे फसली, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. २००४ मध्ये मोदींसह भाजपचे नेते काँग्रेस सरकारच्या धोरणावर टीका करत असताना काँग्रेस मात्र २००२मधील गुजरात दंगलीचा संदर्भ देत भाजपला प्रत्युत्तर देण्याचा अपयशी प्रयत्न करत होते.

२०१९ मध्येही काँग्रेसने तीच चूक पुन्हा केली. मोदींवर आरोप करण्यापेक्षा नोटबंदी, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, उद्योजकांची नफेखोरी असे अनेक विषय घेऊन निवडणुकाला सामोरे न जाता फक्त मोदीविरोधाचा एककल्ली अजेंडा राबवला गेला, त्यातून नुकसान फक्त काँग्रेसचे झाले. आता ही चूक राहुल गांधींच्या लक्षात आली असावी. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये ते मोदींवर थेट टीका करताना दिसत नाहीत. ते मुद्द्यांवर बोलतात. दोन उद्योजकांनी देशाला वेठीस धरले, असे म्हणताना मोदींचा उल्लेख करणे ते टाळतात. आता काँग्रेस मोदींऐवजी मोदी सरकारवर टीका करत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने छुपा प्रचार सुरू केला असून तो भाजपला धोकादायक ठरू शकेल, असे मोदींनी जाहीरसभेत बोलून दाखवले. काँग्रेसच्या रणनीतीमध्ये झालेला बदल मोदींनी चाणाक्षपणे टिपला हे नाकारता येत नाही!

काँग्रेसमधील ‘जी-२३’ गटातील नेत्यांचे वा अन्य ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे होते की, राहुल गांधींनी नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी वेळ दिला पाहिजे. राजकारणात देखील सातत्य राखले पाहिजे. महिना-दोन महिने काम करायचे आणि नंतर दोन आठवडे लोकांच्या नजरेतून गायब व्हायचे, असा राजकारणी राष्ट्रीय पक्ष सांभाळू शकत नाही. काँग्रेससमोर मोदी-शहांसारखे चोवीस तास निवडणुकांच्या राजकारणाचा विचार करणारे विरोधक असताना, त्यांच्यासमोर टिकून राहायचे असेल तर, तुम्हीही २४ तास लोकांमध्ये असले पाहिजे. काँग्रेसींचा हाही युक्तिवाद योग्य होता. देशात राजकीय घडामोडी सुरू असताना त्यांची दखल घेण्याऐवजी राहुल गांधी परदेशात जात असत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

दुसरा आक्षेपाचा मुद्दा होता, एका लोकसभा निवडणुकीत पराभूत झाला म्हणून तुम्ही पक्षाध्यक्ष पद सोडले, इतक्या तडकाफडकी मैदान सोडून कशासाठी जायचे? तुम्ही पक्षाध्यक्षपदाची राजीनामा दिला मग, पक्षाचे निर्णय तुम्ही का घेता? पद आणि जबाबदारी न घेता तुम्ही पक्ष चालवत आहात. निर्णय तुम्हीच घेणार असाल तर, वेळ द्या, असे नेत्यांचे म्हणणे होते. काँग्रेसमधील एका तरुण नेत्याला राहुल गांधींनी दोन वर्षे वेळ दिला नाही, त्यांचा फोन उचलला नाही. भेटल्यावर राजकारणाबद्दल सोनियांशी बोलण्याचा सल्ला दिला, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. दिल्लीत अनेक अफवाही पसरतात पण, हा नेता भाजपमध्ये गेल्यामुळे नेमके सत्य काय, असा सवाल उपस्थित झाला.

‘जी-२३’ गटातील नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेले पत्र जाहीर झाल्यावर, कार्यकारिणी समितीच्या बैठकीत गुलाम नबी आझाद यांच्यापासून अनेक नेत्यांवर राहुल गांधी निष्ठावानांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला होता. त्यांच्यावर संघ-भाजपप्रेमी असल्याचा आरोपही झाला होता. राज्यसभेत विरोधी पक्ष नेते असताना आझाद यांचे मोदी सरकारसंदर्भातील वागणे सौम्य होते, आता तर ते काँग्रेससोडून गेले आहेत. मोदी आणि आझाद यांचे वैयक्तिक संबंध सलोख्याचे आहेत. आझाद वगळले तर अन्य बंडखोर नेते संघ वा भाजपचे कथित समर्थक नव्हते. हा फरक लक्षात घेतला गेला नसावा. ‘जी-२३’मुळे काँग्रेस आणि राहुल गांधींमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बदल घडला हे मान्य करावे लागते. काँग्रेसला गांधीतर पक्षाध्यक्ष मिळाला आहे. शशी थरूर यांच्यासारखे तुलनेत तरुण नेते सक्रिय झाले आहेत. आणि राहुल गांधींना रस्त्यावर उतरून थेट लोकांमध्ये मिसळावे लागले आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

दोन लोकसभेतील पराभव, अमेठी या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातील हार, पक्षांतर्गत संघर्ष, भाजपने राजकारणासाठी केलेला अप्रत्यक्ष वापर अशा एकामागून एक होत गेलेल्या घडामोडींमधून राहुल गांधींना लोकांमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरला नसावा. वयानुसार आलेले शहाणपणही उपयोगी पडू लागले असावे. जगण्याचे भानही आले असावे. सत्ता-पदांची आस नाही पण, लोकांसाठी काम करायचे आहे, असे राहुल गांधी म्हणू लागले आहेत. पक्षाध्यक्ष नको, मला बरेच काही करायचे आहे, असे ते म्हणतात. हे बरेच काही नेमके काय आहे? संघ-भाजपशी वैचारिक लढाई लढावी लागेल, त्यासाठी स्वतःला आणि लोकांना मानसिकदृष्ट्या तयार करावे लागेल. लोकांचे म्हणणे काय, हे समजून घेतल्याशिवाय ही लढाई लढता येणार नाही.

मग, ‘भारत जोडो’ यात्रेसारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. या यात्रेला मिळणारा लोकांचा प्रतिसाद त्याची प्रचिती देत आहे. लोकांचे पाठबळ ही कुठल्याही क्षेत्रातील नेत्यासाठी सर्वोच्च ताकद असते. ही सर्वोच्च ताकद मिळवली तर, नैतिक ताकदही मिळते. मग, विरक्तपणाला, त्यागाला महत्त्व येते. स्वातंत्र्य चळवळीत ही ताकद लोकांनी पाहिली आहे. त्या दिशेने जाण्यासाठी राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रेची आत्ता कुठे सुरुवात केली आहे. त्यांना अजून बराच मोठा पल्ला गाठावा लागेल!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......