‘शब्दांची रोजनिशी’ : वरवर हे नाटक जरी भाषेच्या राजकारणाचा प्रश्न उपस्थित करत असले, तरी ते मानवी संस्कृतीच्या ऱ्हासाच्या मूलभूत स्त्रोतांचा परिचय करून देते
दिवाळी २०२२ - लेख
दीपक बोरगावे
  • ‘शब्दांची रोजनिशी’ या नाटकातील दोन प्रसंग
  • Sat , 22 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख शब्दांची रोजनिशी Shabdanchi Rojnishi रामू रामनाथन Ramu Ramanathan अतुल पेठे Atul Pethe केतकी थत्ते Ketaki Thatte भाषा Language

‘शब्दांची रोजनिशी : एक सुरस प्रेमगाथा’ हे रामू (रामकृष्ण) रामनाथन यांचे इंग्रजी नाटक. प्रागतिक नाट्यचळवळीतील एक महत्त्वाचे नाटककार म्हणून त्यांचे नाव परिचित आहे. याशिवाय नाटकावर व्याख्याने देणे, लेखन-संपादन करणे, आपल्या आणि इतर नाटकांच्या तालमी घेणे, अशा कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे.

कामगार, कार्यकर्ते, महाविद्यालय-विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घेऊन, रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांना घेऊन नाटक सादर करणारा हा नाटककार अगदी वेगळ्याच बौद्धिक आणि सांस्कृतिक रसायनाने तयार झालेला आहे. मुंबईत नाटकांच्या तालमी करणे ही एक फार मोठी समस्या आहे, हा एक सत्तेचाच प्रश्न आहे, असे रामनाथन यांनी म्हटले आहे. बिल्डिंगच्या टेरेसवर, महाविद्यालयात, विद्यापीठाच्या कॅम्पसवर, रस्त्यात, चौकात आणि जिथे जिथे नाटक होऊ शकेल, त्या त्या ठिकाणी ते जात राहिले. एकदा विजय तेंडुलकर यांनी रामनाथन यांना सांगितले की, नाटकाला त्याच्या त्याच्या पद्धतीने जाऊ द्या. तुम्ही यामध्ये वेळ घालवू नका. यापेक्षा नवीन नाटके लिहा. त्यावर चिंतन करा. लेखन करा. व्याख्याने द्या. रामनाथन यांनी त्यांचा सल्ला पाळला, त्यामुळे त्यांचे नाट्यलेखन विपुल प्रमाणात होऊ शकले.

रामू रामनाथन यांच्या या मूळ इंग्रजी नाटकाचा मराठीत अनुवाद अमर देवगांवकर यांनी केला आहे. हे नाटक खासकरून उत्तराधुनिक आहे. पण त्याचे पाय मात्र मातीत घट्ट रोवलेले आहेत. भाषेच्या अनुषंगाने हे नाटक काही सांगतेच, पण इतरही बरेच काही सांगते. आपले भविष्य आपणच निर्मित केलेल्या अनेक घटकांमुळे कलुषित झाले आहे. सर्वसामान्य माणसाची उपेक्षा, निसर्गाची हेळसांड, पर्यावरणाचे अभूतपूर्व नुकसान, सामाजिक-सांस्कृतिक संस्थांचा स्वार्थ आणि जात-वर्गीय हितसंबंध जपण्याच्या स्पर्धेतून निर्माण झालेली समाजाची अराजकता, भाषेचा विलोप, सध्याच्या अति-तंत्रशास्त्रीय निर्मित समाजाचे झालेले अपार विघटन आणि त्यातून तयार झालेला विघटित माणूस, या अशा पार्श्वभूमीवर साहित्य, कला, संगीत आणि एकूणच मानवी संस्कृती धोक्याच्या कचाट्यात सापडली आहे.

तरीही समाजातील एक मोठा वर्ग निवांतपणे स्वतःच्या जगात मश्गुल आहे. त्याला सर्वसामान्य माणसाच्या दुःखाशी, त्याच्या जगण्यातल्या कोलाहलाशी काही देणेघेणे नाही. या अशा आक्रित आणि विपरीत परिस्थितीचे विदारक चित्रण, हे नाटक अत्यंत प्रभावीपणे करते. सर्वच गोष्टींचे विघटन झालेले आहे, अशा परिस्थितीत भाषेची मोडतोड आणि हीच मोडतोडीची भाषा, या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे.

‘गुगल’ नावाची वैश्विक संस्था आपणाला मूर्ख बनवते आणि आपण त्याला बळी पडत आहोत. या पार्श्वभूमीवर आपल्याला काय सांगायचे आहे, हे जरी माहीत असले, तरी ते कसे सांगायचे, हा प्रश्न गंभीर होतो आहे. त्यामुळे या नाट्यसंहितेत लिहिला गेलेला प्रत्येक शब्द हेच मुळी मोठे आव्हान ठरते. सामान्य माणसांचे रोजचे प्रश्न हे ‘तमाशा’ झाले आहेत. भ्रष्ट व्यवस्था, सावकारांची मक्तेदारी, रोज वाढत जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे कर, उच्चभ्रू समाजाची वाढत चाललेली दादागिरी आणि मिजासखोरी, अनेक रूपात सरकारी संस्थांना दिली जाणारी लाच, या व अशा अनेक ज्वलंत प्रश्नांचा उल्लेख एका मुलाखतीमध्ये रामू रामनाथन यांनी केला आहे. मानवी संस्कृतीचा हा प्रश्न गंभीर आहे आणि आज तो शिगेला पोहोचला आहे, याचा इशारा हे नाटक सतत देत राहते.

या नाटकात दोनच पात्रे आहेत. एक पुरुष आणि एक स्त्री. पुरुषाचे नाव ‘ज्ञ’ आहे आणि स्त्रीचे ‘अ’. या अतितंत्रशास्त्रीय जगात भाषा लुप्त होत आहेत. जिवंत माणूस मोबाईलचा... आधार कार्डचा नंबर झाला आहे. त्याला जिवंत आयडेंटिटी राहिलेली नाही. केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचा जगाशी संपर्क आहे. प्रत्यक्ष जैवसंबंध पूर्णपणे अनुपस्थित आहे. त्यामुळे हे जणू अति-उत्तर-आधुनिक काळातील ३२१व्या मजल्यावर राहणारे ईव्ह आणि ॲडमच असावेत असे वाटते.

तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे माणसाचे ‘अमानवीकरण’ झाले आहे, त्याचे तर हे चिन्ह नसावे? का या उत्तरआधुनिक महानगरीय (आणि आदिवासी, ग्रामीण, अतिग्रामीण, अर्ध-ग्रामीण, शहरी, अर्ध-शहरी व इतरत्र पसरलेल्या सर्व मानवी समाजाचासुद्धा) अतितंत्रज्ञानाच्या सांस्कृतिक माहोलात भाषेचाच संपूर्ण ऱ्हासच झाला आहे? ३२१व्या मजल्यावर राहणारा ‘ज्ञ’ कुठल्या तरी अतितंत्रज्ञानीय कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत असावा.

बाहेर धुवांधार अवकाळी पाऊस कोसळत आहे. अशा परिस्थितीत त्याची भावी बायको (‘अ’) प्रवेश करते. ‘ज्ञ’ हा घटस्फोटीत आहे, तर ‘अ’ने भाषेत पीएच.डी. केलेली आहे. ती लोप पावत चाललेल्या भाषांचा अभ्यास करणारी संशोधिका आहे. ‘अ’ ही एका लहान बाळाला बेबी गाडीत झोपवून एक आदिवासी गीत म्हणत प्रवेश करते. हे बाळ समा ई या आदिवासी कवयित्रीचे बाळ आहे. तिने वैतरी भाषेत लाखो कविता लिहिलेल्या आहेत. तिला दोन नवरे होते. एकाला तिने ९९९ ‘प्रेमाचे शब्द’ शिकवले, तर दुसऱ्याला ९९९ ‘यातनेचे शब्द’ शिकवले. आता हे तिघेही आणि त्यांच्याबरोबर त्यांची भाषा- म्हणजे हे चौघेही मृत्यू पावलेले आहेत. जिवंत राहिलेली आहे ती फक्त त्यांची मुलगी. आणि या बाळाला जतन करण्यासाठी, तिचे पालनपोषण करण्यासाठी ‘अ’ तिला आपल्याबरोबर घेऊन येते. ‘अ’ची ही कृती लोप पावत चाललेल्या भाषा किमान टिकाव्यात, याची आशादायी खूण आहे.

या वेळी ‘ज्ञ’ला त्याच्या आईचे सारखे मेसेजेस येत राहतात (आजच्या काळातील आई-मुलाचे एवढेच जैवसंबंध राहिले आहेत असे यातून ध्वनित होते). आपल्या घटस्फोटीत मुलाची आईला काळजी असते. त्याचे लग्न व्हावे म्हणून ती प्रयत्नात असते, पण ‘ज्ञ’ला त्याचा वैताग येतो. आपल्या आया लग्न जुळवायच्या. लग्न जुळवणे हा आपल्या काळातील एक मूर्खपणाच होता... अशी ॲब्सर्ड आणि उत्तराधुनिक जाणीव ‘ज्ञ’ला होते. पारंपरिक विवाह संस्थेच्या मर्यादा काही काळासाठी बाजूला ठेवल्या तरी, एकूणात मानवी संस्कृतीची ही परंपरा निसटत चालली आहे. मानवी जीवनाच्या अति-तांत्रिकीकरणामुळे या परंपरेला निरर्थकता प्राप्त होत चालली आहे, असे गडद चित्र त्यातून उभे राहते. परंपरेच्या भिंती सैल होत आहेत, हे जाणवते. परंपरेच्या या विरचनांतून भाषेचे हरवणेसुद्धा येते.

भाषेला वाळवी लागली आहे

‘वाळवी’ हे एक रूपक या नाटकात येते. लाकूड पोकळ करत जाणारी वाळवी भाषेलाही लागली असावी का? आतून भाषेला खात जाणारी, पोकळ करत जाणारी... ही कोणती वाळवी असावी, ज्यामुळे अनेक भाषा लुप्त होत आहेत? त्यामुळे अनेक ग्रंथ, अनेक लेखक नष्ट होत आहेत. उदाहरणार्थ, अल-नदीम या लेखकाचे ‘किताबे अल-फिहरिस्ट’ हे पुस्तक नष्ट झाले आहे, असे ‘ज्ञ’ सांगतो. सगळीकडेच ‘वाळवी’ आहे. बघेल तिकडे वाळवीच वाळवी... बिल्डिंगमध्ये, भिंतीमध्ये, फायरवॉलमध्ये त्याला वाळवीचा आवाज ऐकू येतो. वाळवीमुळे सगळ्याच मानवी संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागला आहे. म्हणून ‘वाळवी’ हाच संस्कृतीचा मोठा विषय होऊन बसला आहे. त्याबद्दलची मीटिंग ‘ज्ञ’चा बॉस घेणार असतो.

हे नाटक भाषेच्या या अंगाने काही सांगू इच्छिते. अनेक गोष्टीप्रमाणे भाषेलाही वाळवी लागल्यामुळे अगणित भाषा नष्ट होत आहेत. लेखक, कवी, विचारवंत, वैज्ञानिक विस्मरणात ढकलले जात आहेत. काही पूर्णतः नाहीसे झाले आहेत. ते काय म्हणत होते, हे आज कोणाला माहीत नाही. त्यांच्या कलाकृती काळाच्या प्रवाहात गायब झाल्या आहेत.

‘ज्ञ’ देशातील काही महत्त्वाच्या लेखकांची ‘अ’ला छायाचित्रं दाखवतो. हे सर्व लेखक केवळ महत्त्वाचेच नव्हते, तर त्यांच्या साहित्यकृती त्यांच्या काळात वाचकांनी उचलून धरलेल्या होत्या. ‘ज्ञ’ म्हणतो ‘अ’ला – ‘‘ही काही नावे पहा. जी. शंकरा कुरूप (मल्याळी), ताराशंकर बंडोपाध्याय (बंगाली), कुप्पली वेंकटप्पा पुटप्पा म्हणजेच कुवेंपु (कन्नड), उमाशंकर जोशी (गुजराती), विश्वनाथ सत्यनारायण (तेलगू), र. वा. दिघे (मराठी), गोपीनाथ मोहंती (उडिया)... हे सर्व लेखक आज विस्मरणाच्या घड्यांमध्ये बंदिस्त झाले आहेत. यांना आज कोणीही ओळखत नाहीत.’’ याशिवाय महाश्वेतादेवी, वाय. टी. वासुदेवन नायर, गुरुदयाल सिंग, वि. वा. शिरवाडकर, फिराक गोरखपुरी, शिवराम कारंथ याही लेखकांचे उल्लेख येतात.

सन ४४४मधील संस्कृत-कन्नड द्वैभाषिक ताम्रपट, पश्चिम गंगा घराण्याचे तंबुला शिलालेख नष्ट झाले. वाळवीने या सर्व कलाकृती खाऊन टाकल्या. एवढेच नव्हे तर ‘गाथा सत्तसई’, कालिदास, वेद, व्यास, काम्यू, बेकेट, शेक्सपिअर, हेदेखील नामशेष झाले, असे ‘ज्ञ’ म्हणतो. बहा उद-दिन वलादन यांनी टिकवून ठेवलेली सर्व पर्शियन पुस्तकेही नष्ट झाली, याबद्दल ‘ज्ञ’ला खेद वाटतो.

‘अ’ आदिवासी अभ्यासाच्या निमित्ताने आर्मी ट्रकमधून एका गावात प्रवेश करते. तांदूळ, सुरण, पालक, संत्री, आलं, डुक्कर आणि शेळ्या या प्रत्येकांवर पिवळ्या पिवळ्या रंगाच्या चिठ्ठ्या डकवलेल्या होत्या. अशा चिठ्ठ्या चिकटवण्याचे कारण ती विचारते, तेव्हा तेथील वाटाड्या म्हणतो, हा आमचा शब्दकोश आहे. आम्ही मूळ शब्द त्या त्या वस्तूवर चिकटलेला आहे. हीच पद्धत आमच्या लहानग्यांना कळते. त्यांना तेवढंच कळतं, जेवढं शिकवलं जातं. या लोकांचे शब्दकोश लुप्त होत चालले आहेत. ते टिकवण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे. पण हे टिकणार नाहीत, हे सत्य या प्रसंगातून गडद होते.

या नाटकात एका स्थानिक भाषेचा उल्लेख होतो. ‘चहा’ या एकाच पदार्थासाठी त्या भाषेत ३६४ शब्द आहेत. उदाहरणार्थ, गरम चहा, कोमट चहा, पहाटेचा चहा, संध्याकाळचा चहा, काम करताना घेतला जाणारा चहा, चिडलेले असताना घेतला गेलेला चहा वगैरे वगैरे. या भाषेतील एखाद्याला तुम्ही ‘केवळ चहा द्या’ असे जर म्हणालात, तर त्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणत आहात, तुम्ही काय मागत आहात हे कळणारच नाही. कारण जोपर्यंत तुम्हाला कोणता नेमका चहा हवा आहे, त्याचा उल्लेख होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला तुमचा मेसेज पोहोचत नाही.

दक्षिण भारतामध्ये भात या प्रकारासाठी जवळपास २५ प्रकारच्या डिशेज आहेत. इंग्लंडमधील उत्तर भागात इग्लू नावाची इंग्रजी भाषेतील एक अ-प्रमाण व्हरायटी आहे. या भाषेत ‘बर्फ’ या शब्दाला बारा शब्द आहेत. सतत बर्फात राहणाऱ्या लोकांना बर्फाच्या वेगवेगळ्या अवस्था, वेगवेगळी रूपे ही भाषेतून पकडावी लागतात. जो पदार्थ एखाद्या प्रदेशांमध्ये विपुल प्रमाणात असतो, त्याबद्दलच्या अर्थछटा या अर्थातच वेगवेगळ्या असतात. मोठ्या प्रमाणात कोकणात मासे खाणारे लोक माशांबद्दल असेच बोलू शकतील. हा एक भौगोलिक-सांस्कृतिक आणि त्या अर्थाने होणारा भाषेचा विकास, या गोष्टी भाषेच्या समाजशास्त्रीय अभ्यासातून समजतात. अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील.

‘अ’ म्हणते, अंदमानच्या बेटापासून अरुणाचल प्रदेशापर्यंत प्रत्येक पंधरवड्याला एक भाषा मरते. शब्द नाहीसे होत आहेत. ‘अ’ एका लुप्त झालेल्या भाषेची गोष्ट ‘ज्ञ’ला सांगते. समा ई या वैतरी भाषेच्या लेखिका. त्यांचं छायाचित्र दाखवता येत नाही. कारण ते उपलब्धच नाही. समा ई यांनी वैतरी भाषेत लक्षावधी कविता रचल्या. त्या त्यांच्या समाजाचा भाग होत्या, पण त्यांना विस्थापित व्हायला भाग पाडलं गेलं. त्यामुळे या सर्व कविता त्यांच्याबरोबरच नाहीशा झाल्या. त्यामुळेच त्यांचं छायाचित्र सापडत नाही. समा ई या घनदाट जंगलात रहायच्या. फुलपाखरे आणि सुरवंट यांच्याशी बोलण्याची कला त्यांना अवगत होती, पण त्याबद्दलचे कोणतेच पुरावे आणि खुणा आज शिल्लक उरलेल्या नाहीत.

तुम्ही म्हणाल हे काय तुम्ही नवीन सांगत आहात? हे भाषातज्ज्ञांनी सांगितले आहे. गणेश देवी यांचा यावरचा अभ्यास प्रसिद्ध आहे. हे झालेले आहे, होत राहणार. त्याला कोण काय करणार? भाषा मरतच आलेल्या आहेत, पुढेही मरत राहतील. या गोष्टी थोड्याच आपल्या हातात आहेत? ज्या भाषा जिवंत आहेत, त्याच आपण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे वगैरे. पण आपण काही गोष्टी विसरतो किंवा या पाठीमागची समाजशास्त्रीय, सांस्कृतिक आणि राजकीय कारणमीमांसा आपणाला माहीत नसते वा ती जाणूनबुजून आपल्यासमोर आणली जात नाही.

१९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाच्या आठव्या परिच्छेदात केवळ १४ भाषा निवडल्या गेल्या. उरलेल्या आपल्या देशातील अधिकृत १९८६ भाषा अनुसूचित बनल्या. १६५२ नोंदवलेल्या मातृभाषा १९७१च्या जनगणनेत निव्वळ १०८ शिल्लक राहिल्या. मग १५४४ मातृभाषांचे काय झाले? भाषा आयुक्तांच्या एका स्वाक्षरीने या १५४४ भाषांचा मृत्यू झाला. याचबरोबर त्या भाषांचा इतिहास, गाणी, सुभाषितं, म्हणी, गोष्टी, आपुलकीच्या हाका, तोडक-मोडकं व्याकरण- या साऱ्या अत्यंत मोलाच्या गोष्टीही नामशेष झाल्या.

सरकारी अधिकृत आदेशाने भाषा जरी मरत नसली तरी, प्रस्थापित भाषेचे अतिक्रमण या भाषांवर होत राहते. एखाद्या भाषेला जर सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठाच उरली नाही, तर त्या भाषेतील व्यवहार कमी कमी होत जातात. मग भाषा केवळ त्या बिरादरीपुरती राहते. नंतर हळूहळू तिचा विलोप होत जातो. प्राचीन भारतात संस्कृतने हीच भूमिका बजावलेली दिसते. मात्र तत्कालीन ‘भाषा साहित्या’तून (म्हणजे बोल-भाषेतील साहित्यातून) संस्कृत भाषेने बऱ्याच ज्ञानाची उचलेगिरी केली होती. हे असे होणे काही गैर नाही. ज्ञानाची, भाषेची सरमिसळ ही पहिल्यापासून होत आलेली आहे आणि पुढेही होत राहणार आहे. पण दुसऱ्या भाषा साहित्याला असे करण्यापासून मज्जाव करणे आणि तसा कडेकोट बंदोबस्त करणे, ही गोष्ट नक्कीच उचित नाही.

आधुनिक भारतातील उत्तम उदाहरण म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेचे आक्रमण झाल्यानंतर ही प्रक्रिया भारतातील हजारो भाषांवर कार्यरत राहिली. वसाहतवादाचे हे परिणाम आपण आजही नक्कीच भोगत आहोत. भाषा मरते म्हणजे केवळ ती तिच्यापुरती नष्ट होत नाही. त्या भाषेतून निर्माण झालेले ज्ञान, तत्त्वज्ञान, संस्कृती, जीवन पद्धती, औषध वनस्पतींची जाण... या व अशा अनेक गोष्टी नाहीशा होतात. हे नुकसान कधीही भरून निघणारे नसते. याबद्दल जगभरच्या भाषातज्ज्ञांनी वारंवार जगातल्या सर्व शासनांना आणि प्रशासनांना कल्पना दिली आहे, पण परिस्थिती फारशी सकारात्मक नाही, हे खेदजनक आहे.

भाषेचा मृत्यू

प्रसिद्ध भाषातज्ञ डेविड क्रिस्टल यांनी ‘Language Death’ (Cambridge University, 2002) या पुस्तकात काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहे. ते म्हणतात, ‘A language is said to be dead when no one speaks it any more. It may continue to have existence in a recorded form, of course-traditionally in writing, more recently as part of a sound or video archive (and it does in a sense ‘live on’ in this way) – but unless it has fluent speakers one would not talk of it as a ‘living language’.

(‘उदाहरणार्थ, एखाद्या भाषेत-- ती भाषा वापरणारा शेवटचा माणूस जेव्हा मरतो, तेव्हा ती भाषा मरते. लेखन, नोंदी, या स्वरूपात ही भाषा कदाचित जिवंत राहण्याची शक्यता असते. किंवा आजचा विचार करता ध्वनी किंवा व्हिडिओच्या रूपात एक ऐतिहासिक नोंद म्हणूनही तिचे अस्तित्व टिकून राहू शकते. पण ती भाषा वापरणारे लोकसमूह जर नामशेष झाले, तर मात्र त्या भाषेला ‘जिवंत भाषा’ असे म्हणता येणार नाही.’)

ही निरीक्षणे वरवर पाहता अगदी बरोबर आणि स्वीकारार्ह वाटतात, पण थोडा गंभीर विचार केल्यास याचे समाजशास्त्रीय आणि राजकीय परिप्रेक्ष्य लक्षात येतात. एखादी भाषा किंवा त्या भाषेतील शब्द नाहीसे होत जाणे, ही गोष्ट केवळ नैसर्गिक नसते. एखादा समाज, लोकसमूह नामशेष होण्यापाठीमागे प्रामुख्याने आर्थिक आणि राजकीय कारणे असतात. त्याला प्रस्थापित आणि वर्चस्ववादी भाषेचे राजकारणही जबाबदार असते. जसे एखादे मोठे झाड छोट्या झाडांना वाढू देत नाही, तसाच हा प्रकार असतो. याचा निर्देश या नाटकात ठळक झालेला आहे.

मिजासखोर संस्कृतीचे वर्चस्ववादी मिरासदार मात्र प्रस्थापित भाषेचे गुणगान गात राहतात. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते. भाषेच्या नपुंसकतेला कुरवाळत राहणे, हाच एक पर्याय त्यांच्याकडे शिल्लक राहतो. याचा या नाटकात ‘ज्ञ’ उपरोधितपणे उल्लेख करतो.  तो विचारतो, मग आजचे लेखक कोण आहेत? ते काय करत आहेत? कोणत्या कलाकृती ते लिहीत आहेत? ‘ज्ञ’ अजून एक छायाचित्र दाखवतो. म्हणतो, ‘हे पहा आजचे लेखक- ब्रह्माजी. हे कोणते लेखक? त्यांना सतत पोलिसांचे संरक्षण लागते. उत्तम लेखकांना संरक्षणाशिवाय आम्ही वावरू देत नाही, असे लेखक म्हणजे देशाची बुद्धिमत्ता असते. ते देशाची संपत्ती असतात. ते देशाच्या संस्कृतीची श्रीमंती असतात.’ २६ जानेवारी या दिवशी त्यांनी आपल्या लेखनातील काही उतारे वाचले. सर्व मजकूर अगोदरच सेन्सॉर झालेला होता. त्यामुळे यात गैर असे काही नव्हते, पण संधिप्रकाशावर बोलण्याऐवजी ते पॉर्नोग्राफीमधील उतारे वाचू लागले. हे सर्व ऐकून सरकारी अधिकारी, नेते, मंत्री आणि उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यांना ‘स्टॅंडिंग ओव्हेशन’ देण्यात दिले.

 भाषा हे संप्रेक्षणाचे साधन?

भाषा हे म्हणूनच केवळ संप्रेक्षणाचे किंवा एकमेकांच्या विचार-भावनांचे आदान-प्रदानाचे साधन नसते. पण साधारणपणे आपणाला हेच सांगितले जाते की, भाषा हे अभिव्यक्तीचे प्रमुख हत्यार आहे. हे खरे आहे? का नेमके उलटे आहे? म्हणजे तुम्हाला जे सांगायचे आहे, तेच तुम्ही (भाषेतून) सांगत नाही किंवा तुमच्या अंगावर भाषेचे अनेक पोशाख चढवत ते तुम्ही दडवत असता? हे सहेतुक (सकारण) असते? का निर्हेतुक (विनाकारण) असते? का हे असे काहीच असत नाही? का भाषेतून काही सांगताच येत नाही?

नोम चॉम्स्की या भाषातज्ज्ञाने म्हटले आहे की, ‘Language is not a means of communication but a means of miscommunication, or at times, a discommunication.’

जे आपणाला सांगायचे आहे, नेमके त्याच्या उलटे आपण पोहोचवतो, तेव्हा त्याला आपण साधारणपणे ‘miscommunication’ असे म्हणतो. पण इथे ‘discommunication’चाही अर्थ आपणाला समजावून घेतला पाहिजे. काही सांगायचे आहे ते सांगून समजत नसेल, आपले सांगण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरत असतील, व्यर्थ होत असतील, तर अशा आकलनाच्या परिस्थितीला आपण ‘discommunication’ असे म्हणतो. इथे भाषेच्या सीमा गळून पडतात. शब्द-अर्थांच्या छटा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत, समूहापर्यंत, समाजापर्यंत पोहोचतच नाहीत. आकलनाची सीमा संपून जाते. विचार, भावना, अर्थ, शब्द सगळे थांबून जातात. अर्थांना परत माघारी फिरावे लागते. कुठल्याही प्रकारची ‘communication’ होण्याची शक्यता लोप पावते. अशा या स्थितीगतीला चॉमस्की  ‘discommunication’ म्हणतात.

हे असे होणे नैसर्गिक की अनैसर्गिक? शब्दांच्या, साहित्याच्या, विचारांच्या, अर्थांच्या भाषांच्या सीमा गळून पडाव्यात, निरर्थक व्हाव्यात- म्हणजेच या सर्वांचे ‘discommunication’ व्हावे, असेही प्रयत्न मानवी इतिहासात झालेले आहेत. साहित्यातून व्यक्त होणारा विद्रोह, प्रतिकार कमी व्हावा म्हणून, किंवा एखादी चळवळच लोप पावी म्हणून किंवा एखाद्या विशिष्ट विचार प्रवाहाचे नको असणारे आक्रमण संपवण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्याच्या नोंदीही इतिहासात जिवंत आहेत (अमेरिकेतील बीट जनरेशन चळवळ, साऊथ आफ्रिकेमधील एत्तदेशीय साहित्य चळवळ, निग्रो/ब्लॅक साहित्याची चळवळ, आपल्याकडील दलित चळवळ या साम्राज्यवादी आणि वर्चस्ववादी शक्तींनी संपवल्या).

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

टॉवर ऑफ बॅबेल

बायबलच्या ‘Genesis’मध्ये एक मिथक आहे- ‘टॉवर ऑफ बॅबेल’. हे होते भाषांचे; शब्दांचे युद्ध. बॅबिलोनियनच्या नागरिकांनी एका नव्या शहराची निर्मिती करताना एक प्रचंड मोठा टॉवर बांधला. त्यांना त्याच्या आधारे स्वर्गात जाण्याचा रस्ता तयार करायचा होता. देव घाबरून गेले. हे बॅबिलोनियन्स इथे स्वर्गात येऊन पोहोचले तर पंचाईत होईल. त्यामुळे देवांनी भाषेचा गुंता निर्माण करून त्यांच्यासमोर उभी ठाकलेली समस्या सोडवलीला. त्यांनी भाषिक गोंधळ निर्माण केला. लोक एकमेकांशी काय बोलत आहे, हे कळता कामा नये, अशी व्यवस्था तयार केली. परिणामी सगळ्यांच्या भाषा वेगवेगळ्या झाल्या. त्यामुळे लोक एकमेकांशी काय बोलत आहेत, हे समजणे अवघड होऊन बसले. त्यांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला. टॉवरचे काम आपोआप संपुष्टात आले. हे मिथक समाजातील काम आणि भाषा यांचा संबंध किती जवळचा असतो, याचे एक उत्तम उदाहरण आहे.

भाषा ‘miscommunication’ आहे आणि ‘discommunication’सुद्धा. तिच्या माध्यमातून सरकारे उलथवली गेली आहेत. तिच्या माध्यमातून दंगली घडवून आणल्या जातात, विचार उलटवले जातात. जसे तह घडवून आणले जातात, तशीच युद्धेही पेटवली जातात. संताप, चीड आणि द्वेषाची संस्कृती पोसली जाते. गैरसमज वा अफवा पसरवून, व्हिडिओ-चित्रपटसारखी प्रभावी माध्यमे वापरून भाषेचा हवा तसा वापर केला जातो.

भाषेतून काय घडवून आणता येत नाही! सर्व काही घडवून आणता येते!! हे एक दुधारी हत्यार आहे. त्याचा फार जपून वापर करायला हवा. यातून आभासी वास्तव, आवास्तवी वास्तव, अनाकलनीय आकलन पाझरू शकते. शब्द दगा देऊ शकतात. त्यांचे ब्रेनवॉश केले जाते... आणि जर शब्दांनीच बंड पुकारले, तर शेवटी त्यांनाही ठार मारले जाते. तीही कला आपण अवगत केली आहे.

‘डायस्फ्रोझियम’ या रासायनिक घटकाचा या नाटकात उल्लेख होतो. याला रसायनशास्त्रात ‘Dy’ हे चिन्ह वापरले जाते. निसर्गात हा घटक स्वतंत्रपणे कधीही सापडत नाही. पण तो नेहमी दुसऱ्या खनिज पदार्थात सापडतो. याचा अर्थ असा की, हा पदार्थ असल्याशिवाय कोणतेच खनिज निर्माण होऊ शकत नाही. भाषेचेही असेच आहे. मानवी संस्कृतीतील कोणताही पदार्थ हा भाषेशिवाय तयार होऊ शकत नाही (मग ती भाषा ध्वनी आणि चिन्हविनादेखील असू शकते). भाषा अवकाशात राहत नाही. तिला स्वयंभू आणि स्वतंत्र अस्तित्व नाही. ती जेव्हा प्रत्येक संस्कृती-घटकात मिसळते, तेव्हाच मानवी संस्कृतीचे खनिज तयार होते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

या नाटकात कन्नड, तमिळ, गुजराती, बंगाली, उर्दू तसेच अनेक आदिवासी बोली भाषेतील (गुजराती, हिमाचल, गढवाल, राजस्थानी, पोयरी) गाणी आहेत. आदिवासी साहित्याचे अभ्यासक, प्राची माया गजानन यांनी ही गाणी आदिवासी लोकांच्या प्रत्यक्ष सहवासातून संग्रहित केलेली आहेत. या नाटकातील सह-अभिनेत्री केतकी थत्ते यांनी ही सर्व गाणी अप्रतिम गायली आहेत. या गाण्यांतील सूर आणि संगीत आपणाला मानवी संस्कृतीच्या मूळ स्त्रोताकडे घेऊन जातात. याचबरोबर फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, रशियन, स्पॅनिश, लॅटिन या भाषांचेही उल्लेख या नाटकात येतात. त्यामुळे या नाटकाला एक वैश्विक परिमाण लाभते.

या नाटकाचे दिग्दर्शन व प्रकाशयोजना अतुल पेठे यांनी केली आहे. सध्याच्या भयंकर परिस्थितीमध्ये प्रागतिक मूल्यांना समोर ठेवून नाटक सादर करणारा हा अवलिया कलावंत या नाटकातील ‘ज्ञ’ म्हणजे मुख्य पुरुष पात्र सादर करतो. तसे पाहिल्यास या नाटकाची संहिता अत्यंत संक्षिप्त स्वरूपाची आहे. संवादामधील असणारा अवकाश मोठा आहे. तो भरून काढण्यासाठी अभिनयाचा कस लागते. या अवकाशात भाषा नसताना अव्यक्त भाषेला पकडून नाटक पुढे पुढे सरकवत राहायचे, ही काही साधी गोष्ट नाही. दीड तासाच्या या नाटकात कुठेही एक क्षण मोकळा जात नाही. आपण त्यात गुंतून राहतो. ही किमया या दोन्ही प्रभावी नाट्यकलाकारांमुळे शक्य झाली आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञ लुडविग विटेगेनस्टाईन यांनी एके ठिकाणी भाषेबद्दल म्हटले आहे- ‘भाषेला मर्यादा असणे म्हणजे माझे जगच मर्यादित करून घेणे.’ याची प्रचिती हे नाटक पाहताना प्रत्येक क्षणाला येते.

नेपथ्य (प्रदीप मुळ्ये), आदिवासी संगीत विचार (प्राची वैद्य- दुबळे), वेशभूषा (रश्मी रोडे), प्रकाशयोजना साहाय्य (राहुल लामखडे), छायाचित्रे (कुमार गोखले) या नाटकाला साजेसे आणि परिणामकारकपणे अवतरले आहे. ॲनिमेशन (शुभंकर सौंदणकर) हा या नाटकातील एक महत्त्वाचा भाग आहे.

वरवर नाटक भाषेच्या राजकारणाचा किंवा भाषेच्या भेदाचा प्रश्न जरी उपस्थित करत असले, तरी ते मानवी संस्कृतीच्या ऱ्हासाचे मूलभूत स्त्रोत कोणते आहेत, याचा परिचय करून देते. आणि हेच या नाटकाचे सामर्थ्य आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......