‘नमश्कार, मैं रवीश कुमार...’
टीव्हीच्या पडद्याकडून काहीतरी वेगळं, संवेदनशील ऐकायला-पहायला मिळावं, समजावं ही अपेक्षा असणाऱ्यांसाठी धीरगंभीर आवाजामधले हे तीन शब्द परवलीचे असतात. आता दिवसभरातल्या घडामोडींसंदर्भात वेगळा पैलू मांडणारं, वेगळा विचार देणारं काहीतरी मिळणार, म्हणून ते सरसावून बसतात. मग त्या वेगळ्यामध्ये माणसं असतात, विचार असतात, कृती असते, भूमिका असते. वेगळं काहीतरी अपेक्षिणाऱ्या आपल्या प्रेक्षकांना रवीश कुमार कधीच निराश करत नाही. पण त्यांना तो सतत धक्के देत राहतो. आणि तेही त्याने दिलेले धक्के आनंदाने सोसत राहतात.
आता हेच बघा ना, पत्रकाराने लोकांमधला माणूस असणं अपेक्षित आहे, त्याने ब्रॅण्ड बनता कामा नये, असं म्हटलं जातं. पण रवीश कुमार हा स्वत:च एक ब्रॅण्ड होऊन बसला आहे. या ब्रॅण्डला असलेली विश्वासार्हता कमालीची आहे.
पत्रकार हा बातमी देणारा असतो, त्याने स्वत: कधीच बातमी बनू नये, असं म्हटलं जातं. पण रवीश कुमार स्वत:च एक बातमी होऊन बसला आहे. अदानी समूहाचे एनडीटीव्हीमधील शेअर्स वाढण्याची बातमी आल्यावर आता या समूहाचे काय होणार, यापेक्षाही रवीश कुमार आता काय करणार किंवा त्याने राजीनामा दिला, याच बातम्या जास्त चालल्या. शेवटी रवीश कुमारला स्वत:ला ट्वीट करून आपण एनडीटीव्ही सोडला नसल्याचा खुलासा करावा लागला.
इतकंच नाही, तर त्याला मिळालेलं मॅगसेसे अॅवार्ड असो, त्याने सुरू केलेलं स्वत:चं यू-ट्यूब चॅनल असो, त्याच्या मुलाखती असोत, त्याचे फेसबुकवरील लेख असोत, पोस्ट असोत… रवीश कुमार नावाचा ब्रॅण्ड झालेला आहे.
रवीश कुमार टीव्ही माध्यमात काम करणारा पत्रकार. माहितीपट-डॉक्युमेंट्री बनवणं हा त्याच्या कामाचा भाग. पण विनय शुक्ला यांनी दिग्ददर्शित केलेली ‘व्हाइल वुई वॉच्ड’ ही डॉक्युमेंट्री खुद्द रवीश कुमारवरच तयार करण्यात आली आहे. नुकतीच ती टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आली आणि पारितोषिकाने सन्मानित करण्यात आली. २७व्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील या डॉक्युमेंट्रीला सिनेफिले पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.
बातमी देणाऱ्याने स्वत: बातमी बनू नये, हा पत्रकारितेमधला नियम रवीश कुमारने एका अर्थी मोडला आहे. वर दिलेल्या उदाहरणांवरून ते पुरेसं स्पष्ट होतंच. पण रवीश कुमारने दिलेले धक्के हवेहवेसे वाटतात.
याला कारणीभूत आहे, त्याने निर्माण केलेली स्वत:ची विश्वासार्हता. समाजमाध्यमांनी सगळं जग झपाटून टाकलेलं असताना; पारंपरिक माध्यमं, पत्रकार आपली विश्वासार्हता कमालीच्या वेगात गमावत असताना, हा माणूस जमिनीवर पाय रोवून उभा राहतो आणि लोकांना सांगतो- ‘अजिबात टीव्ही बघू नका. अजिबात समाजमाध्यमं वापरू नका. नाही बघितली, वापरलीत तरी तुमच्या आयुष्यात फारसा काहीच फरक पडणार नाही. पण बघितलीतच तर या माध्यमांमधून सत्य म्हणून तुमच्यासमोर जे काही येतं, त्याच्यावर अजिबात डोळे झाकून विश्वास ठेवू नका. माझ्यावरही ठेवू नका. तुमच्यासमोर सत्य म्हणून जे काही येतं, त्याचा पडताळा घ्या. ते तपासून बघा. आज सत्याचा अपलाप सुरू आहे, त्यापासून दूर रहा. तुम्हाला दाखवलं, सांगितलं जातं आहे, ते सत्य आहेच असं नाही. सतत खोटंनाटं सांगून तुम्हाला बनवलं जातं आहे, हे लक्षात घ्या.’
२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी तर त्याने एका मुलाखतीत लोकांना आवाहन केलं होतं की, पुढचे दोन-अडीच महिने टीव्ही बघूच नका. तुम्हाला देशामधली लोकशाही वाचवायची असेल, तर देशाच्या बरबादीचा ठेका घेतलेला टीव्ही बघू नका.
आपण काम करतो, त्या क्षेत्रातल्या त्रुटींविषयी असं उघड उघड कोण बोलेल? कुणी गेलंच असं बोलायला तर दुसऱ्या क्षणी ‘तुम्हीदेखील त्या सडलेल्या व्यवस्थेचाच एक भाग आहात’, हे तुम्हाला कानीकपाळी ओरडून सांगितलं जाण्याची आणि ‘तुम्हीदेखील तसेच नाही आहात हे कशावरून?’ असं विचारलं जाण्याची शक्यता असते. पण हा धोका पत्करूनदेखील रवीश कुमार ते पुन्हा पुन्हा आणि आवर्जून सांगतो.
...कारण तो ‘रवीश कुमार’ असतो!
एक वेगळाच विरोधाभास त्याच्या जगण्या-वागण्यात ठासून भरलेला आहे.
बिहारमधल्या कोपऱ्यामधल्या कुठल्या तरी लहानशा खेड्यामधून दिल्लीसारख्या महानगरात येऊन एनडीटीव्हीसारख्या देशामधल्या टॉपच्या माध्यम संस्थेत सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणं, हा विरोधाभस नाहीये, तर काय आहे?
उत्तम इंग्रजी बोलता आणि लिहिता-वाचता आल्याशिवाय तुम्ही अधिकारपदांच्या वरच्या थरांपर्यंत पोहोचूच शकत नाही, असं मानलं जात असताना बिहारमधल्या बोलल्या जाणाऱ्या हिंदी भाषेतूनच काम करत वरच्या पदापर्यंत पोहोचणं, हा विरोधाभास नाही, तर काय आहे?
देशामधल्या सर्वोच्च माध्यम संस्थेत काम करताना तळागाळामधल्या, रस्त्यावरच्या मूक माणसाचा आवाज बनणं, तशीच ओळख निर्माण होणं, हा विरोधाभास नाही, तर काय आहे?
इतिहास या अभ्यासविषयाची आवड असताना वर्तमानाशी जोडलेलं काम आपलंसं करणं, हा विरोधाभास नाही, तर काय आहे?
पत्रकार म्हणून राजकारण हे क्षेत्र हाताळलं, म्हणजेच राजकीय पत्रकारिता केली, तरच वरच्या पायऱ्या भराभर चढता येतात, पत्रकार म्हणून स्थान निर्माण करता येतं, ओळख निर्माण होऊ शकते, असा साधारण समज असतो. पण निव्वळ राजकीय पत्रकारिता न करता रस्त्यावरच्या माणसासाठीची पत्रकारिता करत करिअर घडवणं, हा विरोधाभास नाही, तर काय आहे?
प्रणव रॉय, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, विक्रम चंद्रा, श्रीनिवासन जैन अशी सगळी मोठमोठी नावं एनडीटीव्हीशी जोडली गेली आहेत. ही माध्यम संस्था फक्त ‘ब्ल्यू आईड बॉईज’नाच संधी देते, पुढे आणते असा तिच्यावर आरोप अगदी पहिल्यापासून होत आला आहे. पण बापजाद्यांची कसलीही सांगण्यासारखी पार्श्वभूमी नसतानाही अशा संस्थेत अगदी तळच्या पातळीवरून कामाला सुरुवात करून एका अर्थाने स्वत:च ‘ब्ल्यू आईड बॉय’ बनणं, हा विरोधाभास नाही, तर काय आहे?
एनडीटीव्ही या माध्यमसंस्थेची पत्रकारिता निर्णय प्रक्रियेमधील लोकांचं, धोरणकर्त्यांचं लक्ष वेधून घेणारी (त्यांना अॅड्रेस करणारी) असते, असं म्हटलं जातं. या वर्गाला तळागाळामधल्या माणसांचं म्हणणं काय आहे, त्यांना काय हवं आहे, हे दाखवणं आणि हे दोन टोकाचे वर्ग जोडणं, हा एका अर्थी विरोधाभासच नाही तर काय आहे?
रवीश कुमारच्या आयुष्यामधले असे कितीतरी पैलू वेगवेगळ्या पद्धतीने काढून दाखवता येतील, ज्यांच्यामुळे तो देशामधला महत्त्वाचा पत्रकार ठरतो. अर्थात इथपर्यंत येऊन पोहोचण्याचा त्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता आणि यापुढचादेखील नाही. अदानी समूहाच्या व्यवहारांमुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत एनडीटीव्ही समूहावर त्यांची अधिसत्ता प्रस्थापित होईल, असं म्हटलं जात आहे. एका अर्थानं एनडीटीव्ही समूहामधल्या प्रत्येकाचं, अर्थातच रवीश कुमारचंदेखील तिथलं भवितव्य या क्षणी तरी अंधारातच आहे. ‘रवीश कुमार ऑफिशियल’ हे यूट्यूब चॅनल ही कदाचित त्या भविष्याचीच सुरुवात असावी. पण रवीश कुमार जे काही करेल, त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष असेल हे नक्की. कारण तो आजच्या प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धाडस बाळगणाऱ्या काही मोजक्या पत्रकारांपैकी एक आहे.
रवीश कुमारचा जन्म ५ डिसेंबर १९७४ रोजी बिहारमधील मोतिहारी येथील जितवारपूर गावात झाला. पटनामधल्या लॉयल हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यावर तो दिल्लीत आला. दिल्लीसारखं मोठं शहर हा त्याच्यासाठी वेगळाच अनुभव होता. कुठेही जावं तर फाडफाड इंग्रजी बोलणारी तरुण मुलं-मुली भेटत आणि त्यामुळे आपल्याला इंग्रजी येत नाही, हा न्यूनगंड आणखी वाढे. इंग्रजी वर्तमानपत्रं वाचणं, इंग्रजी ऐकणं, यातून त्याने इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यात म्हणावं तितकं यश येत नव्हतं. महाविद्यालयातले मित्रमैत्रिणी, प्राध्यापक यांच्या सहवासात त्याचा लाजाळूपणा कमी होत चालला होता, पण पुढे काय करायचं ते अजून नक्की होत नव्हतं. सगळ्या बिहारी मुलांप्रमाणे त्यानेही नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास केला, पण तिथेही नशिबाने हुलकावणी दिली.
मग त्याने इतिहासात एम.ए करायचं ठरवलं. त्यासाठी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथल्या प्राध्यापकांच्या शिकवण्याने, सहवासाने त्याची विचारप्रक्रिया बदलायला लागली. मग ‘इतिहासाचा प्राध्यापक’ व्हायचं, असा तो विचार करायला लागला. पण तिथंही इंग्रजी आड यायला लागलं. मग त्याच्या एका प्राध्यापकांनी त्याला सांगितलं की, ‘तुझी हिंदी भाषा चांगली आहे. तुझं लिखाणही चांगलं आहे. तर तू पत्रकारितेत जा.’ त्यांचं ऐकून रवीश कुमार आयआयएमसी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन)मध्ये गेला. पण तिथला अभ्यासक्रम जमेना म्हणून त्याने तो अर्धवट सोडून दिला.
कवी मंगलेश डबराल यांनी त्याला पुस्तक मेळाव्याशी संबंधित काही काम दिलं. ते केल्यानंतर त्याला एनडीटीव्हीमध्ये काम मिळालं. काम काय होतं, तर ‘गुड मॉर्निंग इंडिया शो’साठी आलेली पत्रं हाताळायची. काही काळाने ‘एनडीटीव्ही इंडिया’ सुरू झालं, तेव्हा तो त्यात काम करायला लागला. हळूहळू तिथंच बातमीदार झाला. त्यानंतर मात्र रवीश कुमारने मागे वळून बघितलं नाही.
बिहारमधल्या एका गावातून दिल्लीसारख्या शहरात आलेल्या त्याच्यासाठी हे सगळं जगच नवं होतं. त्याच्या नजरेनं तो ते बघत गेला आणि लोकांनाही आपल्या बातम्यांच्या माध्यमातून दाखवत गेला. रस्त्यावर उभं राहून बातम्या देणाऱ्या बातमीदारापासून ते न्यूजरूममध्ये ‘प्राइम टाइम’चा अँकरपर्यंतचा त्याचा प्रवास झाला आहे. ‘प्राईम टाईम’, ‘हम लोग’, आणि ‘रविश की रिपोर्ट’सारख्या कार्यक्रमांनी त्याची लोकांशी नाळ जोडली गेली आहे. त्याच्या कार्यक्रमातून लोकांना आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि त्यांचे प्रश्न धोरणकर्त्यांच्या लक्षात आणून दिले जातात. सर्वोच्च पदावरची अधिकारी व्यक्ती आणि सामान्य माणूस यांच्यामधला पूल सांधण्याचं काम रवीश कुमार करतो. त्याच्या या भूमिकेत ना ‘एनडीटीव्ही इंडिया’चा संचालक झाल्यावर बदल झाला, ना रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यावर.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
रवीश कुमारच्या पत्रकारितेबद्दल वेगळं काहीच सांगायची गरज नाही, कारण ती रोज सतत टीव्हीच्या पडद्यावरून दिसत असते. सामान्य माणसाच्या प्रश्नांबद्दलची त्याची आस्था, गोष्ट सांगितल्यासारखं बातमी सांगण्याचं त्याचं कसब, साध्या साध्या विषयांची निवड करून आपल्या म्हणण्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं त्याचं कौशल्य, बोलताना सतत त्याचं ते ‘हैं ना?’ असं म्हणणं, कोणत्याही विषयाचं त्याला वावडं नसणं... एकाच वेळी अत्यंत सहज आणि अत्यंत उपरोधिक असं बोलणं, त्याच्यामधली अतिशय तरल अशी काव्यात्मकता आणि अतिशय तरल अशी विनोदबुद्धी...
त्याच्या बातम्यांत, शोमध्ये आणि लेखनातही कवितेचा नाद सतत घुमत राहतो. अतिशय सौम्य शब्दांमधला त्याचा उपरोधिक विनोद विसरता येत नाही. रवीश कुमारच्या शोपेक्षा त्याचं लेखन जास्त संवेदनशील, अलवार आणि नेमकं असतं. कदाचित टीव्हीवर जरा लाऊडच बोलावं लागतं, त्यामुळेही हे होत असावं. टीव्ही पत्रकार सहसा चांगले वाचक नसतात, आणि लेखकही. रवीशकुमार दोन्ही आहे. त्याचं ‘शहर में इश्क हो ना’ हे दिल्लीत प्रेमीयुगुलांना कशी जागा मिळत नाही, निर्विघ्नपणे प्रेम करता येत नाही, यावरच काव्यसदृश पुस्तक नितांतसुंदर आहे.
दोन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रवीश कुमार शझी झमान यांची मुलाखत घेणार होता. शझी झमान यांनी जवळजवळ २० वर्षं अभ्यास करून अकबराचं चरित्र लिहिलं होतं. मुलाखतीचा दिवस येईपर्यंत रवीश कुमारचं पुस्तक वाचून झालं नव्हतं. तो जयपूरला पोहोचला, पण त्याने ठरलेल्या दिवशी मुलाखत घेतली नाही. उलट कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन सांगितलं की, मला लेखकाची मुलाखत घ्यायची आहे, पण अजून माझं पुस्तकं वाचून झालेलं नाही. आज रात्रीत मी ते वाचतो आणि उद्या मुलाखत घेतो. आयोजकांपासून प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांनी ही गोष्ट स्वीकारली. दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला रवीश कुमारने मुलाखत घेतली.
रवीश कुमारची विश्वासार्हता अशा अनेक उदाहरणांमधून सांगता येते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
अशा कितीतरी खुबी सांगता येतील, पण त्याचं सगळ्यात वेगळेपण आहे, त्याच्या ठाम असण्यात. सध्याची राजकीय परिस्थिती आणि तिने बिघडवलेलं सामाजिक स्वास्थ्य यावर भाष्य करताना रवीश कुमार कधी धारदार होत जातो, ते कळतही नाही. मात्र त्याचं धारदार होत जाणं समोरच्याला या राजवटीबद्दल विखारी करणारं, पेटवणारं नसतं, तर अस्वस्थ करणारं, विचार करायला लावणारं असतं. म्हणूनच त्याने कॉइन केलेली ‘गोदी मीडिया’सारखी संकल्पना सहज रूढ होऊन गेली आहे.
‘तुम्ही मोदीविरोधी का आहात?’, असं एका मुलाखतीत विचारलं गेल्यावर रवीश कुमार म्हणाला होता, ‘मी कुठे मोदीविरोधी आहे? मोदीविरोधी असायला मला थोडीच त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे? मी पडलो एक साधा पत्रकार. मला माझं काम करायचं आहे. सामान्य लोकांच्या वतीने त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, पण ते तर मला वेळच देत नाहीयेत.’
म्हटलं तर ही साधीसरळ आणि म्हटलं तर मिश्किल टिप्पणी. पण तिच्यामधला उपहास कळणाऱ्याला बरोबर कळतो आणि रवीश कुमारला काय म्हणायचं आहे, तेही लख्खपणे कळून जातं. तो आवडणारे जितके आहेत, तितकेच किंवा त्याहूनही जास्त त्याचा द्वेष करणारे आहेत. त्यांचे हेट मेल, वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या, या दोन्हीमधला ‘बॅलन्स अॅक्ट’ हादेखील त्याच्या रोजच्या जगण्याचाच भाग आहे.
...तर असा आहे रवीश कुमार. तो रोज टीव्हीवर दिसतो, आपल्याशी बोलतो. आपल्यातच असतो. रोज, सतत काहीतरी सांगत असतो. त्याच्याकडे देण्यासारखं एवढं काही आहे की, रोज सांगूनही ते संपत नाही. हा माणूस एवढा ‘दबंग’ कसा, हा खरं तर प्रश्नच आहे. त्याचं उत्तर आहे, त्याच्या टिपण्याच्या क्षमतेत. अजूनही हा माणूस भरपूर फिरतो. रस्त्यावर उतरून लोकांशी बोलतो. त्यांचं म्हणणं समजून घेतो. आपण अजून कुठे पोहोचलेलो नाहीत आणि अजून आपल्याला जग समजून घ्यायचं आहे, या भावनेनं तो अजूनही पछाडलेला आहे, यातच बहुधा त्याचं रवीश कुमारचं ‘असणं’ दडलेलं असावं.
त्याला अलीकडेच कुणीतरी एका कार्यक्रमात विचारलं होतं, ‘समजा, उद्या एनडीटीव्ही बंद पडलं तर तुम्ही काय करणार?’
जराही विचलित न होता रवीश कुमारचं उत्तर होतं- ‘रस्त्यावर उभं राहून बातम्या देईन. अशा पद्धतीनं बातम्या देऊ नका, असं कुठे सांगितलेलं तर नाहीये ना?’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
लेखिका सुनिता कुलकर्णी या मुक्त पत्रकार आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment