अजूनकाही
मी माझ्या आईकडून खूप काही शिकले आहे. अगदी प्रत्येक बारीक सारीक गोष्ट करतानादेखील तिचा आवाज माझ्या डोक्यात घुमत असतो. याचं अगदी साधं उदाहरण द्यायचं तर काही छोटंसं विकत घेतानादेखील ‘हे किती गरजेचं आहे’ ही तिची शिकवण माझ्या मनात वाजत राहते. त्यामुळे काहीही करताना ‘ती आत्ता या जागी असती, तर तिने काय केलं असतं?’ हा खेळ माझ्या मनात सतत सुरू असतो. यातून तिच्या एकूण शिकवणीचा माझ्यावर किती खोल परिणाम झाला आहे, हे समजतं.
विशेषतः आता लग्न झाल्यानंतर तर मला तिचा विचार करताना वाटतं की, तीन पूर्णपणे वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या माणसांना – मी, माझी बहीण आणि माझे वडील - तिने कसं काय सांभाळलं? ही करामत तिला कशी साधली असेल, याचं मला कोडं पडतं. म्हणजे एकाच वेळी आम्हा सगळ्यांना प्राधान्य देणं, आमच्या आमच्या आवडी आम्हाला निभावता याव्यात म्हणून आम्हाला तयार करणं, त्या मार्गावर चालू देणं, मात्र त्याच वेळी आम्हाला शिस्तही लावणं, हे तिला कसं जमलं असेल? आता जेव्हा रणवीर म्हणतो की, वेळेवर घरी असण्याबाबत किंवा वेळेवर झोपण्याबाबत माझी बायको आग्रही असते, त्या वेळी मला वाटतं की, हे माझं नाही. हे आईकडून माझ्याकडे आलं आहे.
काही वेळेला मला वाटतं की, पालकत्व ही गोष्ट किती रोमांचक आहे! कारण एकाच वेळेला ती छाती दडपून टाकणारी आणि त्याच वेळेला आनंददायी असते. आता विचार करताना अनेकदा वाटतं की, “बाप रे, आपल्या आई-वडलांनी आपल्यासाठी किती काय काय केलं आहे आणि आपण तर अनेकदा त्यांना गृहीतच धरत आलो.’’ पण आज त्यांच्या त्या करण्याची किंमत कळते.
आई नेहमी म्हणते की, पालकत्व हा खाचखळग्यांचा प्रवास असतो. ती अतिशय कडक शिस्तीत वाढलेली असल्याने तिने आम्हालाही तसंच वाढवलं. त्या वेळी त्याचा ताप वाटला असला, तरी आता आम्ही तिच्या शिस्तीची फळं चाखतो आहोत. एक मात्र खरं की, तिच्या शिस्तीत इतका कठोरपणा कधीच नव्हता की, आम्हाला बंड करावंसं वाटावं. कारण हे सगळं आपल्याच भल्यासाठी असल्याचं आम्हाला पहिल्यापासून लख्खं माहीत होतं.
सुरुवातीला आम्ही तिघंही खेळाडू असल्यानं ती शिस्त आमच्या आयुष्याचा भाग होती, पण तीच शिस्त आमच्या घरातही पाळली जात असे. उदाहरणार्थ दोनपैकी एक जेवण सगळ्यांनी मिळूनच घ्यायचं, हा आमच्या घराचा नियम होता, किंवा अगदी सकाळचा नाश्तासुद्धा... म्हणजे नाश्ता आणि दूध जाता जाता कारमध्ये वगैरे करण्याची आम्हाला परवानगी नव्हती किंवा टीव्हीपुढे बसून जेवणं वगैरे... तुम्ही वेळेत उठणं आणि टेबलवर शांतपणे बसून लक्षपूर्वक नाश्ता करणं अपेक्षित होतं.
त्याचप्रमाणे प्रत्येकाला जे पदार्थ आवडतात, त्यानुसार त्या-त्या माणसाच्या आवडीचा वेगवेगळा स्वयंपाक असेही चोचले आईने कधी पुरवले नाहीत. दिवसाचा एक मेन्यू ठरलेला असायचा. तुम्हाला आवडो किंवा न आवडो प्रत्येकाला तेच जेवण मिळायचं. मात्र आळीपाळीने प्रत्येकाला आवडणाऱ्या पदार्थांचा जेवणात समावेश असेल, असं आई पाहायची. आणि बाहेरचं अन्न आठवड्यातून एकदाच आणि तेही आठवड्याअखेरीस खाल्लं जायचं. बाकी आठवडा घरचंच जेवण जेवायचं, हा नियम होता.
नवरा असो वा नसो, आपण आपल्या पायावर उभं असणं, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं आईला कायमच महत्त्वाचं वाटत आलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच तिने आम्हालाही घडवलं. लग्न होण्यापूर्वीपासून ती नोकरी करत होती. मात्र आमच्या संगोपनासाठी नंतर तिने नोकरी सोडून घरावर लक्ष केंद्रित केलं.
मी बालकलाकार म्हणूनही काही जाहिरातींमध्ये काम केलं होतं, आणि या कामाबद्दलची माझी ओढही आई-बाबांना जाणवत होती. मग दहावीच्या सुमारास अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावं म्हणून काही काळासाठी जाहिरातींमधलं काम आम्ही बंद केलं. कॉलेज सुरू झाल्यावर ते पुन्हा सुरू झालं. मी बॅडमिंटनने सुरुवात केली. कारण आमच्या घरात ते होतंच. त्यामुळे ते सोयीचं होतं, पण अभ्यासाशिवाय इतर उपक्रमांमध्ये – संगीत, नृत्य, वेगवेगळे खेळ - सहभागी होण्यालाही आई-बाबांचा पाठिंबा होता; प्रोत्साहन होतं. आम्हाला जे आवडत होतं, त्यात पुढे जायची मुभाही होती.
मी बॅडमिंटनही उत्तम खेळायचे. राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही माझा सहभाग होता. पण एका क्षणी लक्षात आलं की, मला बॅडमिंटनमध्ये करिअर करायचं नाहीये, मॉडेलिंगमध्येच काहीतरी करण्याची माझी इच्छा होती. तसं मी एक दिवस आई-बाबांना सांगितलं. त्यांना अर्थातच त्याबद्दल काही अडचण नव्हती.
आईचं माहेर मुंबई असल्यानं आणि आम्ही वर्षातून दोनदा तरी सुट्टीला मुंबईत येत असल्यानं, आमचे नातेवाईक इथं असल्यानं माझ्या मुंबईला राहण्याचं तिला फार दडपण आलं नाही. मात्र त्या वेळेला माझं वय थोडं धोक्याचं असल्यानं, मी एकटी राहत असल्यानं, रात्री-अपरात्री प्रवास करावा लागत असल्यानं तिला अर्थातच काळजी वाटायची. पण मी ते सगळं अगदी व्यवस्थित हाताळलं.
मी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केल्यावर माझ्या जवळ जवळ प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर आई एकदा तरी येऊन जायचीच. मी कोणाबरोबर काम करते आहे, माझं सगळं नीट चाललं आहे ना, याची एक दिवस येऊन, खातरजमा करून ती जायची.
प्रसिद्धीच्या क्षेत्रात असल्यानं तुमच्याबद्दल सतत काही ना काही उलटसुलट लिहिलं जातं. सुरुवातीला आईला या गोष्टींचा काहीसा त्रास व्हायचा, पण त्या फारशा मनावर घ्यायच्या नसतात हे तिला काळानुरूप कळत गेलं… आणि हळूहळू ती निर्धास्त झाली.
मी मुंबईत काम करत असले, तरी बाकी कुटुंब बंगळुरूमध्ये राहत असल्याचाही काही प्रमाणात फायदा झाला. कारण यामुळे सततच्या अनावश्यक जंजाळापासून त्यांना थोडं दूर राहता आलं. तसंच कुठलीही चित्रपटविषयक मासिकं आम्ही कधीच घेऊन वाचली नाहीत. त्याचबरोबर आई-वडलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता, आहे. माझ्या आयुष्यातल्या घडामोडी मी आपणहून त्यांना सांगेन, या विषयी त्यांना खात्री होती. परिणामी त्यासाठी इतर कशावर अवलंबून राहण्याची गरज त्यांना कधीच वाटली नाही.
माझ्या डिप्रेशनच्या काळाबाबतीतही बोलायचं, तर मला हा आजार झाला असल्याचं आईनेच पहिल्यांदा ताडलं. दर महिन्याला काही दिवसांसाठी ते मुंबईला माझ्या घरी येतात. ते जाताना दर वेळी मला रडू येतंच, पण माझ्या आजाराच्या सुरुवातीला ते जाण्याच्या वेळी माझं रडू थांबायलाच तयार नव्हतं. त्या वेळी आईला ते वेगळं वाटलं. तिने माझ्या वडलांना आणि बहिणीला पुढे जायला सांगून तत्क्षणी माझ्याबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला. आमच्या ओळखीत कोणाकोणाला पूर्वी डिप्रेशनचा त्रास झाल्याचं आईला माहीत असल्यानं तिने माझं डिप्रेशन लगेच ताडलं. आम्ही ताबडतोब आमच्या ओळखीच्या समुपदेशकांशी संपर्क साधला.
आईच्या भक्कम साथीमुळेच मी त्यातून बाहेर येऊ शकले. कारण मला काय होत होतं, ते माझं मलाही उमगत नव्हतं. आणि ज्याची आई-वडलांना काळजी वाटेल, अशा गोष्टी – मग त्या माझ्यासाठी कितीही त्रासदायक असल्या तरी – मी त्यांना कधीच सांगितल्या नाहीत. कारण ते सतत माझ्यासोबत नसल्यानं त्यांना थोडंही अपराधी वाटू नये, असं मला वाटत होतं.
माझे आई-वडील ही दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची माणसं आहेत, पण त्यांची एकजूट कमालीची आहे. पालक म्हणून कुठल्याही बाबतीतली त्यांची परस्पर सहमतीची भावना मला अचंबित करते. या अर्थी माझ्यासमोर त्यांनी खूपच मोठा कित्ता घालून ठेवला आहे.
पालक म्हणून त्यांनाही अनेकदा वाटतं की, आपण योग्य वागलो की नाही, पालक म्हणून आपण अपयशी तर ठरलो नाही ना... विशेषतः आम्ही वयात येताना आईला असं खूपदा वाटत असे. आपण कडक असल्यामुळेच प्रत्युत्तर म्हणून मुली ‘असं’ वागल्या असणार, असेही अनेक विचार तिच्या मनात येत असत. स्वतःच्या पालकत्वावर ती प्रश्नचिन्ह उपस्थित करत असे. मात्र माझ्या अनेक मित्रमैत्रिणी पाहिल्यानंतर तिच्या मनातल्या माझ्याबद्दलच्या शंका काही प्रमाणात फिटल्या असाव्यात.
आई स्वतःच्या करिअरसंदर्भात फार आग्रही होती आणि त्याची तिला ओढही होती, पण आमच्या संगोपनासाठी काही काळ तिने त्या सगळ्यापासून फारकत घेतली. त्या वेळी एका बाईंनी तिला सांगितलं की, ‘तू घेतलेल्या निर्णयासंदर्भात किंचितही किंतू मनात बाळगू नकोस किंवा वाईट वाटून घेऊ नकोस. याकडे एक प्रकारची गुंतवणूक म्हणून पाहा. मुली मोठ्या होतील, तेव्हा योग्य वेळी तुला त्याची फळं नक्कीच चाखायला मिळतील.’ तिच्या मते एखाद्या करिअरिस्टीक बाईने तिच्या मुलांमध्ये चांगली मूल्यं रुजवण्यासाठी, त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी म्हणून करिअरमध्ये काही काळ ब्रेक घेण्यात काहीच गैर नाही.
‘क्वालिटी टाइम’ या संकल्पनेवरही तिचा फारसा विश्वास नाही. तिच्या मते, मुलांसाठी क्वालिटी टाइम अशी काही गोष्ट नसते. त्यांना गरज असताना पालकांचा जितका वेळ त्यांना मिळेल, तितका त्यांना हवा असतो. त्यामुळे तुमची मुलं लहान असताना ते तुमचा प्राधान्यक्रम असायला हरकत नाही. ती पुरेशी मोठी झाल्यावर तुम्हाला जे करायचं असेल, ते तुम्ही करूच शकता.
आई म्हणून ती एकाच वेळी जशी शिस्तीची आहे, तशी ती काळजीवाहू, प्रेमळ आणि उत्तम संगोपन करणारीही आहे; आमच्यासाठी ती कायम उपलब्ध असते. आणि एक स्त्री म्हणून ती स्वतंत्र, स्वतःच्या अटींवर स्वतःचं करिअर घडवणारी, कामसू आणि उत्तम बायको आहे. मी तिच्याकडे असं वस्तुनिष्ठपणे पाहते, तेव्हा तिच्याव्यतिरिक्त आणखी चांगल्या आदर्शाची मी अपेक्षा करू शकत नाही.
११ जुलै २०२० रोजी SUPER 131R या यु-ट्युब चॅनेलवर प्रकाशित झालेल्या इंग्रजी मुलाखतीवरून हा लेख तयार केला आहे. मूळ मुलाखतीसाठी पहा - https://www.youtube.com/embed/-nNxceRcDqw
मराठी अनुवाद - भाग्यश्री भागवत
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment