प्रा. पुष्पा भावे : ‘आम्ही बाईंना पाह्यलंय’ असे सांगणारी माणसे हयात असतील, तोवरच बाईंचा ‘आदर्श’ लखलखत राहील?
दिवाळी २०२२ - लेख
राम जगताप
  • प्रा. पुष्पा भावे (जन्म - २६ मार्च १९३९, मृत्यु - ३ ऑक्टोबर २०२०)
  • Fri , 21 October 2022
  • दिवाळी २०२२ पुष्पा भावे Pushpa Bhave राम बापट Ram Bapat यशवंत सुमंत Yashwant Sumant सामाजिक चळवळी Social movement सामाजिक कार्यकर्ते Social activist

१.

समाजजीवनात मौलिक योगदान दिलेल्या व्यक्तीचे निधन झाले की, आपल्याकडच्या प्रसारमाध्यमांमध्ये ‘पोकळी निर्माण झाली’ अशा स्वरूपाचा वाक्प्रचार हमखास वाचायला मिळतो. तो सातत्याने वापरला जात असल्यामुळे त्याची परिणामकारकता उणावत गेली आहे हे खरे, पण तो एका परीने खरा असतो. कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी एका कवितेत म्हटले आहे – ‘कृतीमागचा विचार आणि विचारामागची कृती या दोन्हींच्या दरम्यान असते मी दिलेली आहुती’. विचार आणि कृती यांची परस्परांशी सांगड घालून आपला वर्तनव्यवहार, जीवनशैली आणि आचार-विचार घडवणाऱ्या व्यक्ती या मानसिक पातळीवर स्वत:शी सतत झगडत राहून आधी स्वत:ला उन्नत करतात आणि पर्यायाने समाजालाही उन्नतीच्या मार्गाचे हमरस्ते, वाटा-आडवाटा सांगण्याचा प्रयत्न करतात- त्याही न थकता, निराश न होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आपल्या एकंदर समाजजीवनात पोकळी निर्माण होतेच.

राजकारणासारख्या संधीसाधू क्षेत्रात एखाद्या महनीय पुढाऱ्याच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी त्याचे अनुयायी, समर्थक भरून काढतात. कारण तिथे बऱ्याचदा वकुबापेक्षा संधीला महत्त्व असते. तसे समाजजीवनात, विचारांच्या क्षेत्रात नसते. त्यामुळे या क्षेत्रांतली पोकळी सहजासहजी भरून निघत नाही. त्यातही समाजासाठी मौलिक योगदान देणाऱ्या व्यक्ती एकामागोमाग एक जायला लागल्यानंतर समाजाची एकंदर वीण निदान काही प्रमाणात तरी उसवली जायला लागते. समाजाच्या वैचारिक घसरगुंडीला थोपवून धरत त्याचे वैचारिक भरणपोषण करण्याचे काम वादातीत निष्ठेने करणाऱ्या व्यक्ती या समाजाच्या एक प्रकारे ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतात. तेच नाहीसे व्हायला लागले की, समाजाचा पोत घसरतो.

गेल्या दहा वर्षांत शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रा. राम बापट, प्रा. यशवंत सुमंत आणि प्रा. पुष्पा भावे यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. विशेषत: शैक्षणिक-वैचारिक क्षेत्राचे आणि सामाजिक संस्था-संघटना-चळवळी यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे म्हणण्यात कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही.

बापट, सुमंत आणि भावे यांच्यामध्ये काय साम्य आहे? हे तिघेही प्राध्यापक होते आणि महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संस्था-संघटना-चळवळी यांचे ‘फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईड’ होते. त्यांचा अनेक संस्था-संघटना-चळवळींशी अतिशय निकटचा संबंध होता. अनेक चळवळींचे ते आधारवड होते. त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा यशोकाळ पाहिला होता आणि या सामाजिक चळवळींची वीण उसवत चाललेली असतानाही ते या चळवळी वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. संस्था-संघटना-चळवळी यांच्या भरणपोषणासाठी वैचारिक अधिष्ठानाची गरज असते. आणि कृतीशील प्रयत्नांचीही. या तिघांनीही त्यासाठी आपल्या आयुष्याचा बहुमोल वेळ खर्च केला.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयुष्यभर निष्ठेने संस्था-संघटना-चळवळी यांच्यासाठी काम करूनही त्यांना कधी नैराश्येने, निराशेने आणि वैफल्याने ग्रासले नाही. आपल्या उमेदीच्या काळातल्या भारावून टाकणाऱ्या दिवसांचाच युटोपिया करत ते राहिले नाहीत. समाजाशी, बदलांशी, माणसांशी असलेली त्यांची नाळ तुटली नाही. अनेक वर्षं संस्था-चळवळी-संघटना यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना उत्तरायुष्यात वास्तवाचे भान राहत नाही. त्या स्वत:लाच जास्त मोठे समजू लागतात. या तिघांचेही शेवटपर्यंत तसे काही झाले नाही.

२.

सामान्य माणसे आणि तळमळीचे कार्यकर्ते यांच्या कायम संपर्कात राहणाऱ्यांना कुणी सहसा ‘स्टॉलवर्ट’ असे विशेषण वापरत नाही. अशा व्यक्तींचा स्वत:चा मठ, संप्रदायही तयार होत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर असणारे, त्यांचे चाहते असणारे आणि त्यांच्यासारखे काम आपल्याला करता यावे, यासाठी प्रयत्न करणारे परस्परविरोधी विचारांचेही लोक त्यांचे परोक्ष-अपरोक्ष ‘शिष्यत्व’ पत्करतात. बापट, सुमंत आणि भावे यांच्याविषयी महाराष्ट्राच्या समाजजीवनात अशी भावना असलेल्यांची संख्या संस्था-संघटना-चळवळी यांच्याखेरीज शिक्षण, पत्रकारिता, साहित्य अशा विविध क्षेत्रांत पाहायला मिळते ती त्यासाठीच.

हे तिघेही प्राध्यापक होते, पण ‘प्राध्यापकी’ नव्हते. समीक्षकी थाटाचे लेखन, समीक्षा आणि संशोधन करण्यात त्यांना रस नव्हता. त्यापेक्षा एखाद्या चळवळीशी जोडून घेणे, तिच्यातल्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणे, हे त्यांना आपले श्रेयस वाटत असे. किंबहुना त्यामुळेच त्यांचा लेखनापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून समाज प्रबोधन करण्यावर जास्त भर होता. संवाद ही त्यांना लेखनापेक्षा जास्त आवडणारी गोष्ट होती. लेखनाचा प्रभाव किती होतो, याची पारख आपल्याला करता येत नाही; पण प्रत्यक्षातल्या, समोरासमोरच्या संवादातून त्याचा परिणाम नेमकेपणाने जोखता येतो. त्यामुळे बापट, सुमंत आणि भावे यांनी कृती-संवादापेक्षा लेखनाला तुलनेने कमी महत्त्व दिले. त्यांनी तसे प्रसंगोपात बरेच लेखन केले. पण त्यांच्या हयातीत त्यातले खूपच कमी पुस्तकरूपाने प्रकाशित झाले आहे.

बापट सरांचे त्यांच्या हयातीत ‘परामर्श : सहा प्रस्तावना’ हे एकमेव पुस्तक प्रकाशित झाले. त्यांच्या निधनानंतर ‘भारतीय राजकारण : मर्म आणि वर्म’ आणि ‘राज्यसंस्था, भांडवलशाही आणि पर्यावरणवाद’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली. याशिवाय ‘स्वराज्य आणि राज्यसंस्था’ या सारख्या त्यांच्या काही छोट्या पुस्तिका प्रकाशित झाल्या आहेत. पण याशिवाय त्यांचे बरेचसे लेखन, भाषणे अजूनही अप्रकाशित आहेत.

असेच काहीसे प्रा. यशवंत सुमंत यांच्याबाबतीतही झाले आहे. त्यांचे त्यांच्या हयातीत एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही. ‘महात्मा गांधींची विचारदृष्टी : काही अलक्षित पैलू’ हे त्यांचे पहिलेवहिले पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. त्यानंतर ‘भारतीय लोकशाही, नागरी समाज आणि वंचित समूह’ हा तीन भाषणांचा संग्रह आणि ‘विचारसरणीच्या विश्वात’ हे सदर लेखनाचे पुस्तक प्रकाशित झाले. ‘विवेकानंद साधक की हिंदुत्वाचे प्रचारक’ आणि ‘ओळख स्त्रीवादाची’ या त्यांच्या पुस्तिका प्रकाशित झालेल्या आहेत. मात्र याव्यतिरिक्त त्यांचे कितीतरी लेख-भाषणे अजूनही अप्रकाशित आहेत.

हाच प्रकार प्रा. पुष्पा भावे यांच्याबद्दलही झालेला पाहायला मिळतो. बाईंनी १९७१-७५ या काळात साप्ताहिक ‘माणूस’मध्ये नाटकांची समीक्षा करणारे एक सदर लिहिले होते. तात्त्विक पातळीवर नाटकांची समीक्षा करणाऱ्या बाई महाराष्ट्रातील बहुधा एकमेव नाट्यसमीक्षक म्हणाव्या लागतील. पण त्यांच्या या सदरातील निवडक लेखांचे ‘रंग नाटकाचे’ हे पुस्तक कधी प्रकाशित व्हावे? २०१२ साली. म्हणजे ३७ वर्षानंतर. साहजिकच आहे इतक्या उशिरा प्रकाशित झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. कारण बाईंनी या पुस्तकात ज्या नाटकांविषयी लिहिले आहे, ती नाटके आता केवळ इतिहासरूपाने शिल्लक आहेत किंवा पुस्तकरूपाने.

नाटकांविषयी काही संकल्पनात्मक विचार मांडणारे लेखही या पुस्तकात आहेत. पण त्याहीबाबतीत सध्याचा काळ असे काही वाचून समजून घेण्याचा राहिलेला नाही. शिवाय या पुस्तकात ‘सखाराम बाइंडर’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’ या तीन महत्त्वांच्या नाटकांवरील लेख घेतलेले नाहीत. कदाचित ते घेतले गेले असते, तर या पुस्तकाची थोडीफार दखल घेतली गेली असती. हे लेख या पुस्तकात का घेतले गेले नाहीत, माहीत नाही, पण ते घ्यायला हवे होते, हे मात्र खरे.

३.

बापट, सुमंत आणि भावे या तिन्ही व्यक्ती स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्तृत्त्ववान होत्या. हे तिघेही विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. विद्यार्थ्यांच्या मनाची आणि पर्यायाने समाजाच्या मनाची मशागत करणे, हे कुठल्याही प्राध्यापकाचे कामच असते. पण तेवढेच पुरेसे नसते. त्यामुळे पुरोगामी विचाराचा पुरस्कार करणाऱ्या आणि समाजात विधायक बदल घडून यावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्था-संघटना-चळवळी उभ्या करणे, त्या चालवणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हेही तितकेच गरजेचे असते. ते काम या तिघांनी अगदी हिरिरीने, व्रत घेतल्यासारखे केले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. काट्याकुट्यांचे रस्ते आणि आडवाटांची पर्वा केली नाही. आपल्याला पटलेली भूमिका मांडण्यासाठी जे जे व्यासपीठ मिळाले, तिथे तिथे त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. स्वच्छ भाषा, स्पष्ट विचार आणि विचारप्रवृत्त करणारी शैली, ही तिघांचीही वैशिष्ट्ये होती.

या तिघांनीही खरे तर आत्मचरित्रे लिहायला हवी होती, पण त्यांनी ती लिहिली नाहीत. त्यांनी लिहिलेली आत्मचरित्रे एकप्रकारे ‘कार्यकथन’ झाली असती. त्यातून महाराष्ट्रातील काही सामाजिक चळवळी कशा आकाराला आल्या, त्यांनी कसा प्रवास केला आणि त्यांचे फलित काय निघाले, यावर चांगला प्रकाश पडला असता. पण सामाजिक प्रश्नांचे प्रखर भान असलेली व्यक्ती स्वत:च्या आयुष्याचे पोवाडे गायला सहसा तयार नसते. त्यात या तिघांचे काम ‘फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईड’ या स्वरूपाचे होते. त्यामुळेच आपण आत्मचरित्र लिहिण्याएवढी कुठलीही महत्त्वाची कामगिरी केलेली नाही, असे त्यांचे म्हणणे होते. पण त्याच वेळी त्यांच्याविषयी त्यांचे विद्यार्थी, सहकारी आणि इतरांनी बरेच लिहिले आहे.

सुमंतांविषयी एक गौरवग्रंथ प्रकाशित झाला आहे. बापटांविषयी अजून तसे काही झालेले नाही. भावे यांच्याबद्दल ‘पुष्पा भावे : विचार आणि वारसा’ हा गौरवग्रंथ आणि ‘माय मावशी’ या नियतकालिकाचा गौरवांक प्रकाशित होतो आहे. शिवाय नुकतेच बाईंच्या मुलाखतीचे ‘लढे आणि तिढे’ (मनोविकास प्रकाशन, पुणे, सप्टेंबर २०२०) हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी खरे तर आत्मचरित्र लिहायला हवे, असे प्रकाशक अरविंद पाटकर यांचा आग्रह होता. पण अनेक वेळा त्यांच्याशी बोलूनही त्या तयार होईनात, तेव्हा त्यांना मुलाखतीचा मध्यममार्ग काढला. त्यातून हे पुस्तक तयार झाले. बाईंना ते प्रत्यक्षात पाहता आले. ते पाहून कदाचित त्या संकोचल्याही असतील, पण करोनाकाळात सगळे काही ठप्प झालेले असतानाही या पुस्तकाला महाराष्ट्रातल्या वाचकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला, ही आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. हे पुस्तक एक प्रकारे बाईंचे ‘कार्यकथन’ आहे. त्यात त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फारसे काही लिहिलेले नाही. पण आपल्या काळाचा, कामाचा एक धावता पट त्यांच्या मुलाखतीमधून उलगडत जातो. त्यामुळे या पुस्तकासाठी प्रकाशक अरविंद पाटकर आणि मुलाखतकार मेधा कुळकर्णी यांना धन्यवाद द्यायला हवेत.

४.

पुष्पाबाईंच्या नावावर किती पुस्तके आहेत?

१) ‘विविध ज्ञानविस्तार लेख सूची’ – संपादन पुष्पा भावे (मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई, १९६८)

२) ‘वेचक पुंडलिक’ - संपादन पुष्पा भावे (सन पब्लिकेशन्स, पुणे, १९८५)

३) आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू – संपादन पुष्पा भावे (रोहन प्रकाशन, २००२)

४) जहन्नम (निवडक प्रतिमा जोशी) – संपादक पुष्पा भावे (लोकवाङ्मय गृह, २००९)

५) ‘रंग नाटकाचे’ (राजहंस प्रकाशन, २०१२) - नाट्यसमीक्षा

६) ‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’ – महमूद ममदानी (रोहन प्रकाशन, २०१४) अनुवाद – पुष्पा भावे, मिलिंद चंपानेरकर

७) ‘लढे आणि तिढे, चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी’ (मनोविकास प्रकाशन, २०२०) - मुलाखत मेधा कुळकर्णी 

बस्स, एवढीच. यातली पहिली चार पुस्तके ही संपादित स्वरूपाची आहेत. ‘विविध ज्ञानविस्तार’ या एकेकाळी मराठीमधल्या गाजलेल्या मासिकाचा अभ्यासाच्या निमित्ताने त्यांना अभ्यास करावा लागला. तेव्हा या मासिकाची कामगिरी लक्षणीय असून त्याची सूची प्रकाशित करायला हवी, या भावनेतून त्यांनी या मासिकाची समग्र सूची संपादित करून प्रकाशित केली.

‘वेचक पुंडलिक’ या पुस्तकामध्ये मराठीतील नवकथेचे एक प्रणेते विद्याधर पुंडलिक यांच्या निवडक कथांचे संपादन केले आहे. या पुस्तकातला लिहिलेल्या प्रस्तावनेत बाईंनी पुंडलिकांच्या कथा, त्यांची घडण, बांधा, कथेतून प्रकट होणारी बालमन, एकाकीपणा आणि मृत्यू यांविषयीची रूपे, प्रतिमा यांचा आढावा घेतला आहे. थोडक्यात एका कथाकाराच्या कथा वाचताना, समजून घेताना कोणत्या गोष्टींचे व्यवधान ठेवायला हवे, याचे दिग्दर्शन बाईंनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केले आहे.

‘आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू’ हे पुस्तक डॉ. लागू यांच्या पंचाहत्तरीनिमित्त प्रकाशित झालेला एकप्रकारे गौरवग्रंथच आहे. पण बाईंचे संपादन असल्यामुळे या पुस्तकाला केवळ गुणगौरवपर गौरवग्रंथाचे स्वरूप आले नाही. डॉ. लागू यांचे कुटुंबीय, सहकारी, मित्र आणि त्यांची कारकीर्द तटस्थपणे पाहिलेले अभ्यासक यांनी लिहिलेले विचक्षण लेख या पुस्तकात आहेत. या पुस्तकात बाईंनी ‘समकालीन आणि अभिजात’ या नावाने २१ पानी लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी डॉ. लागू यांच्या जडणघडणीच्या काळापासून त्यांच्या नाटक-सिनेमाक्षेत्रातल्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचा अतिशय मर्मग्राही असा आढावा घेतला आहे. डॉ. लागूंची नाट्यनिष्ठा, त्यांचे पेशाने कान-नाक-घसा तज्ज्ञ असणे आणि त्याचा त्यांनी आपल्या रंगमंचीय आविष्कारासाठी करून घेतलेले वापर, वाचिक-कायिक अभिनय आणि त्यांच्या कलात्मक जाणिवा, त्याचबरोबर डॉ. लागूंची सामाजिक बांधीलकी, बुद्धिप्रामाण्यवाद, तर्कनिष्ठता यांचाही अन्वयार्थ बाईंनी इतक्या जाणकारीने घेतला आहे की, बस्स! बाईंचा लेख हा या पुस्तकाचा दिंडी दरवाजा आहे. त्यातून आत प्रवेश करताना डॉ. लागूंकडे कसे पाहावे, याची संदर्भचौकट मिळते. तिचा उपयोग करूनच या पुस्तकातले लेख वाचावे लागतात. 

‘जहन्नम’ हे बाईंचे चौथे संपादन. यात त्यांनी पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा जोशी यांच्या निवडक कथांचे संपादन केले आहे. खरे म्हणजे तोवर जोशी यांच्या कथालेखनाचे एकही पुस्तक प्रकाशित झालेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कथांचा पहिलाच संग्रह ‘निवडक’ मालिकेअंतर्गत प्रकाशित व्हायला नको होता. पण लोकवाङ्मय गृहाने त्यांच्या निवडक मालिकेअंतर्गत जोशी यांचे पुस्तक काढायचे ठरवले आणि त्याचे संपादन करण्याची बाईंना विनंती केली, तेव्हा त्यांनी आवडती लेखिका असल्याने होकार दिला असावा. एकदा होकार दिल्यानंतर बाईंनी जाणकारीने या संग्रहाचे संपादन केले आहे. जोशी या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या. दोन्ही क्षेत्रे धगधगत्या समाजवास्तवाचे सत्यदर्शन घडवणारी. त्यामुळे त्यांच्या कथालेखनाचे वेगळेपण बाईंनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अचूकपणे उलगडून दाखवले आहे.

‘रंग नाटकाचे’ या पुस्तकात आधीच उल्लेख केल्याप्रमाणे ७१ ते ७५ या काळात बाईंनी साप्ताहिक ‘माणूस’मध्ये लिहिलेल्या काही नाट्यप्रयोगांवरील लेख आहेत. काही लेख दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेले आहेत. हा लेखसंग्रह खूप उशिरा प्रकाशित झाल्यामुळे एक विशिष्ट सूत्र घेऊन त्यातील लेखांची निवड करावी लागली आहे. त्यामुळेच या पुस्तकाला ‘आधुनिक रंगभूमी : नवे भान देणारी समीक्षा’ असे अन्वयर्थक उपशीर्षक दिले आहे. या पुस्तकाला नाट्यसमीक्षक माधव वझे यांनी प्रस्तावना लिहिली आहे, तसेच त्यांनी बाईंची घेतलेली मुलाखतही या संग्रहात आहे. वझे यांनी बाईंच्या नाट्यसमीक्षेविषयी, तिच्या वेगळेपणाविषयी जे लिहिले आहे, ते वाचल्यानंतर बाईंचे हे पुस्तक इतक्या उशिरा का वाचायला मिळाले, असे दु:ख नाट्यक्षेत्रातल्या धुरिणांना आणि सामान्य रसिक वाचकांना होऊ शकते.

‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद बाईंनी मिलिंद चंपानेरकर यांच्यासह केला आहे. हेही अतिशय उत्तम पुस्तक आहे. ममदानी हे जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंशशास्त्रज्ञ. ९\११ नंतर जगभर मुस्लीम समाजाबद्दल संशयाने, तिरस्काराने लिहिले-बोलले जाऊ लागले. अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी आपले राजकारण रेटण्यासाठी ‘गुड मुस्लीम’ आणि ‘बॅड मुस्लीम’ अशी वर्गवारी केली. तिचा पंचनामा करताना ममदानी यांनी इस्लाम धर्म, अमेरिका आणि दहशतवादविरोधी युद्ध यांचा साक्षेपी आढावा, या पुस्तकाच्या माध्यमातून घेतला आहे. अमेरिकेसह पाश्चात्य राष्ट्रांनी मुस्लीम द्वेषाचे जे राजकारण चुकीच्या सिद्धान्ताआधारे मांडण्याचा प्रयत्न केला होता, त्याला ममदानी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून उघडे पाडले आहे. ‘भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी’मध्ये सक्रिय असलेल्या बाईंनी या पुस्तकाचा अनुवाद करून खरे तर मोठेच काम केले आहे.

‘लढे आणि तिढे, चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी’ हे पुस्तक नावाप्रमाणेच बाईंच्या मुलाखतीचे पुस्तक आहे. बाईंनी आणीबाणी, सेन्सॉरशिप, रमेश किणी खून प्रकरण अशा अनेक प्रश्नी दिलेले लढे आणि चळवळी-संस्था-संघटना यांच्यात आणि समाजात निर्माण झालेले तिढे, कशा प्रकारे सोडवले, याचा आलेख या पुस्तकातून जाणून घेता येतो. या पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात विद्या बाळ, वंदना भागवत, नीरजा, प्रतिमा जोशी आणि मेधा पाटकर यांचे बाईंविषयीचे लेख आहेत. या लेखांतून बाईंचे कर्तृत्व आणि प्रतिभा चांगल्या प्रकारे समजून घेता येते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

या शिवाय काही वर्षांपूर्वी बाईंनी एका ग्रंथवेड्या पुस्तकविक्रेत्याच्या पुस्तकांच्या आठवणी सांगणाऱ्या पुस्तकाचाही अनुवाद केला आहे. तो ‘ललित’ मासिकातून प्रकाशित झाला आहे, पण अजून पुस्तक रूपाने प्रकाशित झालेला नाही.

५.

याशिवाय बाईंनी अनेक विषयांवर लिहिलेले लेख, मुलाखती, भाषणे आहेत. ७१मध्ये बाई जेव्हा साप्ताहिक ‘माणूस’मध्ये नाट्यप्रयोगांवर लिहायला लागल्या, तेव्हा त्यांनी मराठी पुस्तकांवर लिहिलेले आहे. वर्षभरात दहा-अकरा पुस्तकांविषयी त्यांनी लिहिले आहे. त्याशिवाय बाईंच्या लेखांचा विविध ग्रंथांत समावेश आहे. ‘रङनायक’ (१९८५) या अरविंद देशपांडे यांच्यावरील गौरवग्रंथात ‘प्रायोगिक रंगभूमी’, ‘प्रदक्षिणा - खंड दुसरा’ (१९९१)मध्ये ‘मराठी नाटक - १९५५-७५’ असे दीर्घ लेख लिहिले आहेत. तसेच ‘अभिरुची : ग्रामीण आणि नागर’ (१९७६) (संपादक : गो.म. कुलकर्णी), ‘मराठी टीका’ (संपादक : वसंत दावतर), ‘महात्मा फुले गौरवग्रंथ’ अशा काही पुस्तकांतही त्यांच्या लेखांचा समावेश आहे.

साप्ताहिक ‘माणूस’मध्ये ‘विकली जाणारी भारतीय माणसे’ (२३ डिसेंबर १९७२) हा बाईंनी नरेंद्र सिंदकर यांच्यावर लिहिलेला लेख तेव्हा बराच गाजला होता. ‘तेंडुलकरांच्या नाटकातील स्त्रीप्रतिमा’ (दै. लोकसत्ता, लोकरंग, २ ऑक्टोबर २००५) या लेखात बाईंनी तेंडुलकरांच्या नाटकातील स्त्रियांकडे कसे पाहावे, याची दिशा दाखवणारा लेख लिहिला आहे. याशिवाय दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘आपलं महानगर’, ‘साप्ताहिक साधना’, ‘मिळून साऱ्याजणी’ अशा नियतकालिकांत आणि विविध दिवाळी अंकांत त्याचे कितीतरी लेख प्रकाशित झालेले आहेत.

बाईंचा शेवटचा लेख दै. ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ या पुरवणीत २६ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. हा लेख ‘मदरिंग अ मुस्लीम- द डार्क सिक्रेट इन अवर स्कूल्स अ‍ॅण्ड प्लेग्राऊंडस्’ या नाझिया इरम यांच्या पुस्तकाचे परीक्षण आहे. कोवळ्या मुलांच्या जगातही भेदभावाचे स्वरूप कशा प्रकारे भिनलेले आहे, याविषयीचे हे पुस्तक. त्याचा मनोज्ञ परिचय बाईंनी या पुस्तकात करून दिला आहे. शेवटच्या काळात अंथरुणावर खिळलेल्या असताना बाईंच्या वाचनात हे पुस्तक आले आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचावी, यासाठी त्यांनी त्याचा सविस्तर परिचय करून दिला. या लेखातून बाईंची संवेदनशीलता, सजगता आणि त्यांचे सामाजिक प्रश्नांबद्दलचे तीव्र भान दिसते.

६.

प्रगल्भ आणि सुस्पष्ट विचारधारा, व्यासंग आणि कृतिशीलता, यांमुळे बाईंचे शिक्षण-समाजकारण या क्षेत्रातले काम जितके स्पृहणीय ठरले, तितकेच त्यांचे राजकारण, शिक्षण, रंगभूमी, साहित्य, समीक्षा या विषयांवरील लेखनही प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी, कादंबरीकार आणि समीक्षक भालचंद्र नेमाडे यांची ‘देखणी’ या कवितासंग्रहात एक नितांतसुंदर कविता आहे. त्यातील काही ओळी अशा आहेत -

“चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत

लक्षात राहात नाहीत बिचारी त्यांना दीर्घायुष्य लाभो”

पण गंमत अशी असते की, चांगली माणसे हजारोच्या संख्येने एकाच काळात कुठल्याच समाजात निर्माण होत नाहीत. ती नेहमी अल्पसंख्यच असतात. पण त्यांचे काम बहुमुखी, उर्ध्वगामी असते. त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभावे, ही समाजातल्या सत्शील लोकांची इच्छा असतेच. मात्र ती कधीच अमरत्वाचा वर घेऊन आलेली नसतात. पण त्यांचा कृतीवारसा आणि विचारवारसा अमर होऊ शकतो. तो होण्यासाठी त्यांच्या कामाचे, लेखनाचे दस्तवेजीकरण करण्याची, त्याचे जतन-संवर्धन करण्याची नितांत निकडीची गरज असते. पण नेमका याबाबतीत महाराष्ट्राचा लौकिक निदान अलीकडच्या काळात तरी स्पृहणीय राहिलेला नाही. ही बेपर्वाई आणि आळस आपण शक्य तितक्या लवकर झटकून टाकण्याची गरज आहे.

बाईंचे अनेक लेख, मुलाखती, भाषणे वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये विखुरलेली आहेत. त्यातील निवडक, विचारप्रवर्तक लेखनाची पुस्तके प्रकाशित व्हायला हवीत. कारण बाईंसारख्या सत्त्वशील, चारित्र्यसंपन्न, त्यागी, नीतीमान आणि प्रेरक व्यक्तिमत्त्वांची आज, उद्या आणि परवाही आपल्याला गरज आहे.

फार वर्षांपूर्वी बाईंनी डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल दै. ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये ‘आम्ही लागूंना पाह्यलंय’ असा लेख लिहिला होता. लेखाचे शीर्षक म्हटले तर साधे आहे, पण नेमके, थेट आणि बाईंच्या समीक्षकीवृत्तीची जाण सांगणारे होते. ‘आम्ही बाईंना पाह्यलंय’ असे सांगणारी माणसे हयात असतील, तोवर बाईंचा ‘आदर्श’ महाराष्ट्रात लखलखत राहील. बाईंना पाहिलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार संग्रहित करण्याची, त्यांचे जतन-संवर्धन करण्याची आणि इतरांसमोर मांडण्याची जबाबदारी निभवायला हवी. ती बाईंना खऱ्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली असेल आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला केलेला तो सलामही असेल…

‘पुष्पा भावे : समकालीन आणि अभिजात’ हे प्रा.डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी संपादित केलेलं पुस्तक लवकरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील हा एक लेख.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......