आमचा टाहो या तथाकथित देवदेवतांना कळलाच नाही, ना त्यांनी आमचे रक्षण केले. मग मी त्यांना देव का मानावे?
दिवाळी २०२२ - लेख
पंढरीनाथ हरी अवघडे
  • पंढरीनाथ हरी अवघडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • Fri , 21 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar दलित Dalit मांग Mang जात Caste उच्चवर्णीय High caste

दरवर्षी वातावरण ढगाळ झालं की, हाडाची जुनी दुखणी डोकं काढून वर येतात. आणि मग त्यातून निघतो असह्य वेदनेचा ठणका. आज पण असंच झालं- आकाशात ढग भरून आलेले, पावसाला कधीही सुरुवात होईल असं वातावरण. आणि दरवर्षीप्रमाणे डाव्या हाताच्या कोपऱ्यातून हळूच सणक आली. हळूहळू वेदना वाढायला लागल्या, असह्य झाल्या. आकाशात जशी मेघांची गर्दी, तशी माझ्या मनात विचारांची गर्दी, पण या वर्षी मी ठरवून या गर्दीला वाट मोकळी करून दिली. पेन-कागद समोर होतेच. भराभर पेन चालू लागला आणि डोक्यातील विचारांचं, अनुभवांचं जंजाळ कागदावर उतरू लागलं.

महामानव डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला माणूसपण दिलं, अधिकार दिले, जगण्याची उमेद दिली, कायद्यानं सर्व प्रकारचे अधिकार दिले, कवचकुंडलं दिली, पण स्वतःला उच्चवर्णीय म्हणवून घेणारा समाज आम्हाला खरोखर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो काय?

१.

अशिक्षित, अडाणी, विशेषत: मागासवर्गीय समाजातील - साधारणपणे ज्यांनी वयाची साठी पार केलेली आहे अशा - लोकांची जन्मतारीख एक जून असते. नव्हे तशी असायलाच पाहिजे. अर्थात याविषयी अनेकांनी लिहिलेदेखील आहे. त्यातून समाजातल्या शिक्षणाबद्दलच्या अनास्थेवर प्रकाश पडतो. ही अनास्था हे एक जूनच्या पाठीमागील कारण असू शकतं. माझे वडील हरी बंडू अवघडे १९२३ साली लो.बो.(लोकल बोर्ड) मुलांची शाळा केम (तालुका करमाळा) येथून सातवी पास झालेले. मला सात आत्या. वडील भावंडांत एकटेच. त्यामुळे आजोबांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला आपल्यापासून कधीही परगावी पाठवलं नाही. सरकारी नोकरी त्या वेळी सहज उपलब्ध असतानादेखील वडिलांना आजोबाच्या मायेपोटी कुठेही जाता आलं नाही. परंतु शिक्षणाची गंगोत्री घरात निर्माण झाली आणि पुढे माझ्या आजोबामुळे आमच्या घरातही शिक्षणाची गंगा वाहू लागली.

वडलांचं अतिशय सुंदर, वळणदार अक्षर, मराठी आणि मोडी लिपीवर कमालीचं प्रभुत्व. गणिताची पावकी, निमकी, औटकी ते तीसपर्यंत पाढे तोंडपाठ. आपल्याला एखादं गणित सोडवायला दहा मिनिटं लागत असतील, तर तेच गणित ते सहज तोंडी सोडवत. अशा या आमच्या वडिलांना आम्ही सहा अपत्यं- चार मुलं, दोन मुली. आम्ही चारही भाऊ वडिलांच्या देखरेखीखाली वाढलो. आमची आई स्वतः अशिक्षित असूनदेखील शाळा व शिक्षणाबद्दल अतिशय काटेकोर नियम पाळून कडवी शिस्त लावणारी होती. आम्ही आमचं शिक्षण पूर्ण करू शकलो असं म्हणता येणार नाही, परंतु घरात दारिद्र्य असल्यामुळे व्यवसाय-नोकरी करण्याइतपत शिक्षण झालं. थोरले बंधू १९५६ साली वयाच्या अठराव्या वर्षी प्राथमिक शिक्षक या पदावर रुजू झाले. त्यानंतर दोन नंबर भाऊ सातवी पास झाले, १९६२ साली महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाले. माझ्यापेक्षा मोठा भाऊ माझ्यापुढे दोन वर्ग होता. मी पहिलीत असताना तो तिसरीत होता.

मला अजूनही प्रश्न पडतो की, आम्हा भावांचा शैक्षणिक प्रवास एवढा व्यवस्थित आहे, पण मग माझ्या दोन्ही बहिणींना वडिलांनी शाळेत का घातलं नाही? कदाचित त्या वेळी मुलींना शाळेत घालण्याची परिस्थिती नसेल. आम्हा सर्व भावंडांच्या जन्मतारखा वडिलांनी व्यवस्थित लिहून ठेवलेल्या होत्या. माझ्या तिन्हीही भावांच्या जन्मतारखा शाळेत खऱ्या खऱ्या लिहिलेल्या. मग माझे भाऊ, माझे वडील सर्व जण सुशिक्षित असूनदेखील माझी जन्मतारीख एक जून का?

त्या वेळी म्हणजे मी शाळेत जाण्यास योग्य झालो, तेव्हा अंगणवाड्या-बालवाड्या नव्हत्या. मुलांच्या प्रवेशाच्या वेळी शाळेत मुलाखती घेत नसत. गुरुजी जून महिन्यात घरोघरी जाऊन योग्य मुलं शोधून त्यांची नावं शाळेत दाखल करत. मुलांच्या आई-वडिलांनी त्यांची जन्मतारीख लिहून ठेवलेली नसे. गुरुजीच मुलांचे दात बघून वय ठरवायचे आणि जन्मतारीख लिहायचे- एक जून… वर्षं पाठीमागील सहा.

पण माझ्याबाबतीत वेगळी गोष्ट घडली. वास्तविक ही गोष्ट मला स्मरणात राहायचं कारण म्हणजे, दुसरीमध्ये असताना गुरुजींनी सर्वासमक्ष केलेलं माझं कौतुक. आमच्या घराच्या पश्चिमला दगडामध्ये बांधलेली आणि वरती लाल भडक कौलं असलेली भलीमोठी शाळेची इमारत होती. समज आल्यानंतरचं माझं आकर्षणाचं ते ठिकाण होतं. कधी एकदा तिथं जाईल असं व्हायचं. बऱ्याच वेळा मोठ्या माणसांना चुकवून खेळत खेळत ती इमारत जवळून पाहणं हा माझा छंद होता.

एके दिवशी वडील थोरल्या भावाकडे परगावी गेले होते. माझ्यापेक्षा मोठा भाऊ शाळेत, आई शेतात कामाला गेलेली, आम्ही खेळगडी खेळात रंगून गेलेलो. खेळ कुठला, तर आंब्याच्या वाळलेल्या कोया उकिरड्यातून गोळा केलेल्या त्यांचा. आमचा डाव रंगात आला असताना पांढरेशुभ्र कपडे घातलेला एक मनुष्य आमच्या वस्तीत आला. हातात वही आणि पेन. आमच्यात कुजबुज सुरू झाली. नंतर कळलं की, हे गुरुजी आहेत आणि पहिलीत नाव दाखल करून घेण्यासाठी आले आहेत. त्या वेळी शाळेत जायला मिळणार म्हणून माझा आनंद ओसंडून वाहत होता.

गुरुजी शाळेत घालण्यासाठी एकेकाचं नाव लिहून घेत होते. माहिती सांगण्यासाठी प्रत्येकाच्या घरातील कुणीतरी येत होतं. माझी पाळी येताच ‘तुझ्या वडिलांना घेऊन ये’ असं सांगितलं, पण वडील परगावी. घरी कोणीही मोठी व्यक्ती नव्हती. गुरुजींनी मी सोडून इतर मुलांची सर्व माहिती लिहून घेतली आणि मला म्हणाले, ‘वडिलांना घेऊन शाळेत ये’. मला वाटलं, ‘संपलं, आता मला शाळेत घेणार नाहीत. आपल्याला शाळेत जाता येणार नाही.’ या विचारानं माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी रडायला लागलो. गुरुजींनी पुन्हा माझी चौकशी केली. शाळेत नाव घालायचं म्हटल्याबरोबर मुलं पळून जातात किंवा रडायला लागतात. पण हे पोरगं तर शाळेत घेत नाहीत, म्हणून रडतंय, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी माझी समजूत काढली. मला विचारून माझी माहिती लिहिली आणि माझं नाव शाळेत दाखल केलं. मला कोण आनंद झाला. इतर मुलांप्रमाणे माझी जन्मतारीख ‘१ जून १९५४’ अशी गुरुजींनी शाळेत नोंदवून टाकली. त्यांनीच एकदा मी दुसरीत असताना भर वर्गात उभा करून शाळेबद्दल, शिक्षणाबद्दल प्रेमओढ कशी असावी, याचं उदाहरण म्हणून माझ्या शाळा प्रवेशाचा सांगितलेला किस्सा अजून आठवतोय.

दोन-तीन दिवसांनी वडील परत आले. माझ्या शाळाप्रवेशाचा किस्सा त्यांच्या कानावर गेला. त्यांनी मला जवळ घेतलं, पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन गुरुजींना भेटले. जन्मतारखेविषयी विचारलं. खरी जन्मतारीख लिहून आणली आहे असं सांगितलं, पण ‘शाळेच्या रजिस्टरमध्ये खाडाखोड चालत नाही’ असं गुरुजींनी सांगितलं. वडिलांनाही ते पटलं. त्यामुळे आम्ही सर्व सवंगडी एकाच जन्मतारखेचे निघालो, कोणी पुढे नाही कोणी मागे नाही. इयत्ता दुसरीत होतो, तेव्हापासून रात्री शाळेत अभ्यासासाठी जायचो. इतर मित्र बरोबर असायचे. प्राथमिक शाळेच्या त्या दिवसांनीच मला घडवलं. पुढे मी माझं प्रत्येक काम कोणाच्याही मदतीशिवाय केलं, याचा मला अजूनही सार्थ अभिमान आहे. त्यामुळे एक जून जिंदाबाद. एक जून चिरायु होवो.

२.

माझी शाळा व्यवस्थित चालू होती. मुळात ज्या गोष्टीचं आकर्षण होतं, ती मिळालेली. अभ्यासातील हुशारी वडिलांकडून मिळालेली देणगी. सगळ्या बाबतीत मी पुढे असायचो – मग तो अभ्यास असो, खेळ असो, शाळेतील इतर कामं असोत.

माझं गाव बरंच मोठं, सुरक्षित. गावाला जुन्या पद्धतीच्या तीन वेशी, उत्तरेकडील बाजूला मोठा ओढा. त्यामुळे कदाचित उत्तरेकडे वेस नसावी. पूर्व बाजूच्या वेशीतून येण्याअगोदर गावाची सुरुवात व्हायची. वेशीच्या बाहेर ढोरांची घरं, त्यानंतर चांभारवाडा… पुढे दक्षिणेकडे वेशीच्या बाहेर मांगवाडा. त्यापुढे महारवाडा, नंतर वडार, कैकाडी, पाथरवट इत्यादी इत्यादी जाती आणि या सर्वांची कवचकुंडलं धारण करून वेशीच्या आत राहणारा स्वतःला उच्चभ्रू म्हणवणारा समाज, अशी रचना असणारा माझा गाव.

उत्तरेकडे उत्तरेश्वराचं भलंमोठं मंदिर. आख्यायिकेप्रमाणे गावात सर्व दिशेनं छोटी-मोठी उत्तरेश्वराच्या भावंडांची, म्हणजे महादेवाची मंदिरं. लहानपणी वडील खांद्यावर घेऊन या मंदिराची वारी करायचे. मंदिराची भव्यता फारच मोठी. भलंमोठं प्रवेशद्वार. आत गेल्याबरोबर छोट्याशा मंदिरात नंदीची मूर्ती, समोरच महादेवाचं, उत्तरेश्वराचं सुंदर कोरीव काम असलेलं मंदिर. या दोन्हीच्या मध्ये भलामोठा लोखंडी खांबावर उभा केलेला सभामंडप. प्रत्येक खांब चार चार नट-बोल्टमध्ये बसवलेला, पण नंदी मंदिराच्या बाजूला मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या खांबाला फक्त तीनच नट-बोल्ट. रिकाम्या जागेत राखुंडी ओतून ठेवलेली असे. याच खांबाजवळ वडील मला खाली उतरवत. त्या खोबणीतून राखुंडी घेऊन स्वतःच्या कपाळाला, मलाही लावत.

त्या वेळेस वाटायचं कुठे आहे देव, आपल्याला का नाही दिसत. माझ्या मनातला तो प्रश्न वडिलांना कसा कळायचा माहीत नाही. ते पुन्हा मला खांद्यावर घेत आणि सांगत- ‘पुढे बघ उत्तरेश्वराची मूर्ती दिसते’. हात जोडून नमस्कार करायचो. वाटायचं मंदिरवाल्यांना आमची किती काळजी- मंदिरात प्रवेश केल्याबरोबर देवाचं दर्शन आणि अंगारा मिळतोय!

पहिली-दुसरीचे दिवस आनंदात गेले! अवघडे, देडगे, गाडे, कांबळे, ओहोळ यांच्या दोन ओळी व्हायच्या. त्यानंतर गावातील मुलांच्या ओळी. काही वेगळं वाटायचं नाही. परंतु आमच्या ओळीतील ज्या विद्यार्थ्यांचं लक्ष नाही, अशांना गुरुजी बरोबर नेम धरून खडू फेकून मारायचे. काही दिवसांनी लक्षात आलं की, हे महाशय याच दोन ओळींना खडू फेकून मारतात. बाकीच्या मुलांना टेबलाकडे बोलावून छडीनं मारतात. या देशपांडे गुरुजींनी आम्हाला मात्र छडीनं कधीच मारलं नाही. मला प्रश्न पडायचा - असं का?

माझ्या थोरल्या बंधूची येडशी येथून वांगी (तालुका करमाळा) येथे बदली झाली. दुसरी पास झालो, तिसरीला माझं वांगीच्या शाळेत नाव घातलं. सगळंच नवीन. मात्र माझी शाळेतील प्रगती व हुशारी बघून लवकरच सर्वांच्या ओळखीचा झालो. वांगीच्या पश्चिमेस कोरीव दगडानं बांधलेलं भव्य भवानी मातेचं मंदिर. समोर उंचच उंच दगडी दीपमाळा. गुढीपाडवा झाल्यानंतर पाच दिवसांनी देवीची मोठी यात्रा असायची. मी तिसरीत होतो. थोडी समज आलेली. एकटा हिंडू-फिरू लागलेलो. यात्रेतून फिरून मंदिराकडे गेलो. दर्शनासाठी भली मोठी रांग, तरी पण रांगेत उभा राहिलो. हळूहळू मंदिराच्या दरवाज्याजवळ माझा नंबर येत होता. मी मंदिरात पाय ठेवणार तेवढ्यात दरवाज्यातील पुजार्‍यानं विचारलं, ‘तू अवघडे गुरुजीचा भाऊ का रे?’ मी उत्तरलो ‘हो’. त्याची ताबडतोब प्रतिक्रिया आणि सूचना- ‘इथूनच पाया पड’. अवघडे गुरुजी आणि माझ्या मंदिरात जाण्याचा काय संबंध? हे असं का घडतंय? असं का?                                  

तिसरी पास झालो. चौथीसाठी मला पुन्हा केमला माझ्या आवडीच्या शाळेत घालण्यात आलं. शाळेची इमारत तशी जुनीच. खाली फरशी नव्हती. शनिवारचा दिवस शाळा सारवणाचा असायचा. त्यासाठी आमच्या टीम तयार केल्या जायच्या. शेण गोळा करून आणणारी टीम, सारवण करणारी टीम, पाणी आणून देणारी टीम, इतर कामाची टीम. शाळेजवळच पारखे यांची विहीर होती. तित उतरून पाणी आणावं लागे. प्रत्येक टीम आपापलं काम करी. पण आमच्या टीमला पाणी आणण्याचं काम कधीच दिलं जायचं नाही. कळायला लागल्यावर समजलं, विहीर मराठ्याची होती, मांगा-महाराच्या मुलांना विहिरीत कसं उतरू देणार? विहीर बाटवली जाण्याची भीती. मनावर प्रचंड ताण- आम्हीही हिंदू आहोत, देव-धर्म जसा तुमचा, तसा आमचा पण आहे, आम्हीही तुमच्यासारखीच माणसं आहोत. तरीही तुमच्या धर्मात माणसाला, देवांना आमचा विटाळ होतो कसा?, नाही, हे देव, ही माणसं माझी नाहीत.  

वडशिवणे मामाचं गाव. केमपासून जवळच. मामा-मामी दोघंच राहत. एकदा चौथीत असताना पहिल्यांदाच मामाकडे जाण्याचा प्रसंग आला. गावाच्या बाहेरच काळ्या पाषाणात बांधलेला भलामोठा चौथरा. त्यावर चार-पाच फूट उंच मोठी शिळा, पांढरा शुभ्र चुन्याचा रंग, बघता क्षणी धडकीच भरावी असं वातावरण. वेताळ (भुताचा राजा) वडशिवणेचं ग्रामदैवत. मी तर भीतभीतच बघत राहिलो. तेवढ्यात चार-पाच कुत्री पारावर पळत चढली. त्यातील एकानं त्या शिळेवर पाय वर केला. मला हसू आलं. असो. योगायोगानं त्याच वर्षी मामाने यात्रेला बोलावलं. आईबरोबर आम्ही यात्रेला दाखल. प्रत्येक घरात गोडधोड केलेलं. वेताळासाठी खास नैवैद्य. घरोघरचे लोक आपापली पूजेची ताटं घेऊन वेताळाच्या पाराजवळ हजर. मीसुद्धा तिथंच बघत उभा. एकेक जण नैवेद्य देण्यासाठी पुढे सरकत होता. मी त्याच रांगेत. काही वेळानं पुजारी नामक व्यक्तीनं बरोबर मलाच विचारलं- ‘कुठला आहेस? कुणाकडे आलास?’ मी मामाचं नाव सांगताच पुजाऱ्याचा आवाज बदलला. त्याने मला त्या चौथऱ्याच्या खाली उतरायला सांगितलं. तिथूनच दर्शन घेण्याची सूचना केली. मला जाम हसायला येत होतं. देव समजल्या जाणाऱ्या त्या दगडावर कुत्री चढाओढीत लघुशंका करत होती, तो प्रसंग आठवला. जिथं कुत्री मुक्तपणे संचार करू शकतात, तिथं आम्ही जाऊ शकत नाही. मनाला यातना देणारा तोच प्रश्न- ‘असं का?’                  

पांगरे (ता.करमाळा) हे वर्षातून एकदा तरी जाण्याचं ठिकाण. भैरवनाथ आमचं कुलदैवत. यात्रेला जायचं म्हणजे किती आनंद व्हायचा. यात्रेत फिरून झाल्यावर नवसाने झालेली मुलं देवाच्या दरवाजावरून खाली टाकली जात. मला भारी गंमत वाटायची. कित्येक तास हे बघण्यात घालवायचो. पण भैरोबाच्या दर्शनासाठी जायचं म्हणजे पोटात गोळा यायचा. मला कळायचं नाही की, या लोकांना माझी जात कशी कळते? हिंमत करून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केल्यास एखादा भक्कम हात बखोटं पकडायचा, मग दोन-चार शिव्या खाऊन देवळाच्या बाहेर पडायचं. जे देव, जी माणसं मला जवळसुद्धा येऊ देत नाहीत, ती माझी कशी? डोक्यावर प्रचंड ताण. नेहमीचाच प्रश्न- ‘असं का?’

त्या वेळी पाण्यासाठी नळ नसत. पाणी पुरवठ्याची साधनं नव्हती. प्रत्येक जातीचा आपला आड (विहीर) असे. रहाटानं पाणी शेंदून काढावं लागायचं. कुठून तरी पाण्याची सोय करावी लागायची. उन्हाळ्यात पाणी आणणं म्हणजे भयंकर काम. पाण्यानं आडाचा तळ गाठलेला असायचा. घराच्या पाठीमागे तळेकर, मराठ्याची विहीर. तिला भरपूर पाणी असायचं. पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी कमानीतून पायऱ्या. त्यामुळे त्या विहिरीला ‘कमान विहीर’ म्हणत. तिथून जाणाऱ्या पायवाटेनं एखादा मराठ्याचा माणूस दिसला की, त्याच्या पाठीमागे पळत जाऊन त्याला गाठायचं. घागर भरून देण्याची आर्जवं करायची. त्याला दया आलीच, तर त्याने घागर पाण्यात बुडवून पायरीवर ठेवायची. मग तिथून आम्ही उचलून घरी आणायची.

विहिरीचं पाणी आणि आम्ही यांत फक्त एका पायरीचं अंतर. पण हे अंतर ओलांडून कधीच जाता येत नव्हतं. जिवावर बेतायची शामत. पाणी तर निसर्गाची देणगी. हे लोक त्यात उतरतात, घाण करतात, परंतु आम्हाला त्याला शिवण्याचादेखील अधिकार नाही. आमच्या घशाला कोरड पडलेली, या देवदेवतांना का दिसत नाही? आमचा हंबरडा यांच्या कानावर का जात नाही? ‘असं का?’

पाणी तर आणायला पाहिजे, कमान विहिरीवर जाणारं कोण भेटतंय का, वाट बघत होतो. तेवढ्यात तिकडे जाणारा आमच्या पुढच्याच गल्लीत राहणारा पठाणाचा चाचा आपल्या छोट्या मुलीला घेऊन शेतात जाताना बघून पळतच त्याला गाठलं. एक घागर बुडवून देण्याची गळ घातली. त्याला नाही म्हणवलं नाही. पण त्याच्या चिमुकलीनं त्याला प्रश्न केलाच- ‘आब्बा ये छोरा हमको पाणी देनेको क्यू कहता हैं? खुद क्यू नहीं भरता?’ चाच्याचं उत्तर- ‘बेटा ये धेड मांग को बावडी को छूने नहीं देते’. बिच्चारी ती छोटी, तिला काय कळालं माहीत नाही, पण माझ्या मनातलं काहूर आणखीनच गडद झालं. कसला हा धर्म, कसले हे देव, आमची कुणालाच कशी दया येत नाही? 

एकदा वडिलांना विचारलं- ‘अण्णा हे लोक आपल्याशी असं का वागतात?’ वडिलांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. पण माझा एकंदरीत सूर, जाणून घेण्याची इच्छा बघून शेवटी अण्णा म्हणाले- ‘‘बेटा, महामानव बाबासाहेबांनी आपल्याला कायद्याने माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला. ही शिवाशीव कोणी पाळल्यास कायद्याने त्याला वेसण घालण्यात आली. आपल्याला एक प्रकारची कवचकुंडलेच दिली. हे कायदे लागू होऊनदेखील १४-१५ वर्षं झालीत. पण स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या या समाजाची मानसिकता बदलायला आणखी किती वर्ष लागतील सांगता येत नाही. सध्या तू फक्त अभ्यास कर, इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस.’’ अण्णांनी सांगितलं ते पटलं, पण मनाशी पक्की खूणगाठ बांधली- जो देव, जी मंदिरं, मला माणूस म्हणून नाकारतात, ते देव, ती मंदिरं माझी कशी? मन बंड करून उठलं… आणि माझा नास्तिकतेकडे प्रवास सुरू झाला… 

३.       

लिहिता-वाचता येऊ लागल्यापासून वाचन आवडीचा छंद झाला. चौथीपासून वाचनालयात जाऊन मिळतील ती पुस्तकं वाचू लागलो. हिंदू धर्माची पुस्तकं वाचली. भरपूर वाचन केलं. माझी अभ्यासातली प्रगती बघून मला एक वर्ष पुढे घालण्यात आलं. थेट सहावीत गेलो. आतापर्यंत चांगली समज आलेली. वाचन चालू होतंच. वाचनालयाची फी भरण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत सायकलवर बर्फाच्या कांड्या विकल्या, पण वाचन सोडलं नाही. वाचनामुळे माझ्यात अमूलाग्र बदल होऊ लागला. सभोवती काय चालू आहे, याची जाण येऊ लागली. पण ती देवळं, ते देवळातले देव मला आपले वाटेनासे झाले. जे देव, जी देवळे, त्यातले ते तथाकथित पुजारी मला माणूस म्हणून धड जगू देत नाहीत, त्यांचे देव माझ्यामुळे विटाळतात, त्यांना का म्हणून मी आपलं मानानं? नाही, हे देव माझे नाहीत. त्यापेक्षा मला त्या छोट्याशा देवळात यायला कुणीच बंदी घालत नाही- ती लक्ष्मीआई, मरीआई, म्हसोबाची देवळं आपली आहेत, असं वाटे.

१९६७ साली सातवी (psc) पास झालो. माझ्या घराण्यात माध्यमिक शाळेत प्रवेश घेणारा मीच पहिला. केमच्या उत्तरेला उत्तरेश्वराच्या मंदिराजवळ, रेल्वे स्टेशनच्या अलीकडच्या बाजूला असणाऱ्या श्री उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये आठवीला प्रवेश घेतला. इंग्रजी शिकायला मिळणार याचा आनंद सांगता येत नव्हता. थोड्या दिवसांत शाळा सुरू झाली आणि माझी एबीसीडीची उजळणी चालू झाली. लवकरच इंग्रजी विषय आवडीचा झाला. त्या वेळी हा विषय आठवीपासून असल्यानं बऱ्याच जणांना फार अवघड वाटत असे. माझी इंग्रजीची प्रगती बघून सर चकित व्हायचे. तिमाही, सहामाही परीक्षेचे मार्क कळाल्यावर आनंद व्हायचा. मला १०० पैकी असायचे ८०-८५ मार्क आणि दुसऱ्या नंबरला असायचे ३५-३६ मार्क. अभ्यासात वर्गातील विद्यार्थी माझ्या जवळपासही येऊ शकत नव्हते. स्वतःचा अभिमान वाटायचा. लवकरच मी शिक्षकांचा आवडता विद्यार्थी झालो.

हायस्कूलमधील माझा पहिला गणेशोत्सव. आम्हाला आमच्या इयत्तेप्रमाणे कामं दिलेली. शेवटच्या दिवशी शाळेच्या बँड पथकासह मिरवणूक आणि त्यानंतर मूर्तीचं उत्तरेश्वराचं भल्या मोठ्या बारवेत (विहिर) विसर्जन. त्या भल्या मोठ्या बारवेभोवती सर्व मुले कडं करून उभी राहिलेली… अचानक जयजयकार करत मूर्ती पाण्यात टाकण्यात आली. ज्यांना पोहता येत होतं, त्यांनी दहा-बारा फुटांवरून पाण्यात उड्या मारल्या. विसर्जन झाल्यानंतर मुलं पोहून वर आली. बारवे शेजारी दोन झोपड्या. त्यात राहणारे दोन भगवी कपडे घातलेले. छातीवर रूळणारी दाढी. गांजा पिऊन तर्रर झालेले डोळे. साधू कमी राक्षस वाटावेत, असे दोन महाराज. त्यांची नजर आमच्याकडेच. आम्ही पाण्यात उड्या मारू नयेत म्हणून जणू काही आम्हाला दहशतीतच ठेवण्याच्या प्रयत्नात समोरच उभे. माझ्या डोक्यात विचार आला- ‘आपणही पाण्यात उड्या मारल्या तर?’ माझे वर्गमित्र, भाऊ, जिवाला जीव देणारे वामन आणि भिवाला मनातला विचार बोलून दाखवला. त्यांनी होकार दिला. पुढील वर्षीचा बेत आखला.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

या वर्षी नववीत. अभ्यास, शाळा, व्यायाम नित्यनेमानं चालू होती. कब्बडी टीममध्ये निवड होऊन करमाळ्याला जाऊन आलो. याच वर्षी शाळेत खेळासाठी नवीन शिक्षकाची नेमणूक झाली होती. हे केमचेच शिक्षक. त्यामुळे आपुलकी वाटायची. हसत, खेळत आनंदात दिवस जात होते. दरवर्षीप्रमाणे गणेश आगमनाची तयारी सुरू झाली. उत्सव सुरू झाला, पण आम्ही तिघे वाट बघत होतो, ती विसर्जनाच्या दिवसाची. बघता बघता नऊ दिवस सरले. आणि तो दिवस उद्यावर येऊन ठेपला. आम्ही तिघांनी विचार केला- काही जरी झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. मिरवणूक संपली, गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी बारवेच्या कठड्यावर आणली. आरती झाली, जयजयकारात मूर्ती पाण्यात टाकण्यात आली.

आम्ही तिघं एका कोपऱ्यात उभे. जाणवत होतं, आमच्यावर कुणाची तरी नजर असेलच, पण मनाशी पक्कं ठरवलेलं. तिघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले आणि पुढच्याच क्षणी मुलांनी धपाधप पाण्यात उड्या टाकल्या. क्षणाचाही विलंब न लावता कुणाला काही कळायच्या आत, आम्हीही स्वतःला बारवेच्या पाण्यात झोकून दिलं. पाण्यातून डोकं वर आल्याबरोबर तिघांनी एकमेकांकडे पाहिलं, पोहत आलो पायऱ्याजवळ. कफनी घातलेला तो साधू महाराज म्हणवणारा धिप्पाड राक्षस आमच्यासमोरच पायरीवर उभा. जणू त्याचं सर्व पुण्य एकवटून, उत्तरेश्वराला आमच्यापासून वाचवण्यासाठी सर्व ताकदीनिशी उभा. आत्ता आम्ही काही करू शकत नव्हतो. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं, शिवाजी महाराजाच्या मूठभर सैनिकांनी मोगलांच्या अफाट सैन्याचा पराभव केल्याचा आनंद आमच्या मनात येऊन गेला. पुढच्या क्षणी धरपकड झाली, सर्वांना सूचना देणारा तो राक्षसच म्हणाला- ‘धरा यांना, घ्या पोलीस स्टेशनला’. कुणी तिथंच मारण्याचं सुचवलं, पण आमच्या अंगाला हात लावण्याची कुणाची हिंमत झाली नाही. पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत शाळाभर, गावभर बातमी पसरली. एकच चर्चा- मांगाच्या पोरांनी उत्तरेश्वराची बारव बाटवली. आमच्या तिघांची ओल्या कपड्यासहीत हायस्कूलपर्यंत धिंड काढण्यात आली.

एव्हाना मुख्याध्यापकांच्या कानावर ही बाब पोचलेली. मुख्याध्यापक श्री ए.ए.लोंढे सर. अतिशय हुशार, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व. आमची धिंड शाळेत पोहचण्याच्या अगोदरच आम्हाला काय शिक्षा करायची, हे ठरलेलं असेल कदाचित. सरांनी इतरांना बाहेर जायला सांगितलं. आतून कडी लावली. आम्हा तिघांभोवती एक चक्कर मारली. वातावरण एकदम शांत. आमचं ओरडणं ऐकण्यासाठी बाहेरच्यांचे कान आतूर झालेले. पण आत एकदम शांतता. आम्ही कोणत्याही शिक्षेस सामोरे जायची तयारी ठेवलेली. आम्ही शांत, सर आमच्या पाठीमागे गेले अन् अनपेक्षितपणे माझ्या पाठीवर हात ठेवला, नंतर दोघांच्याही पाठीवर हात. सरांनी शांतपणे माझ्याकडे नजर टाकली. एकच वाक्य बोलले- ‘अरे, पोरांनो, कपडे ओले झालेत. घरी पळा, कपडे बदलून पटकन या.’ अपेक्षा केली होती, त्याच्या विपरितच घडत होतं. त्या वेळच्या जनता एक्सप्रेसचाही वेग कमी वाटावा, इतक्या वेगात घर गाठलं. वस्तीत सर्वांनी ठरवलेलं की, पोरांना साथ द्यायची. पण आम्ही हुंदडत आलेलो बघून सर्वजण शांत.

पण मुख्याध्यापकाच्या ऑफिसमध्ये जे घडलं, ते सर्वांना कसं मानवणार? पण काही करू शकत नव्हते. त्यांचे देवदेवता, धर्म आम्ही बाटवला होता. त्यांना गप्प बसवणार तरी कसं? आमचा वचपा कधीतरी काढू असं ठरवल्याप्रमाणे सर्व शांत. पण मनातला सल जाणं शक्यच नव्हतं. त्यांच्या देवता त्यांना शांत बसू देणार नव्हत्या. दुसऱ्याच दिवशी उत्तरेश्वराच्या बारवेला दोन इंजिन बसवून आम्ही बाटवलेलं पाणी ओढ्यात सोडून देण्यात आलं.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

दुसऱ्या दिवसापासून शाळा व्यवस्थित चालू झाली. कुणाच्याही चेहऱ्यावर राग नव्हता, पण मनातली खदखद काहींच्या बोलण्यात जाणवत होती. आम्ही रणांगणात विजयी झाल्याप्रमाणे वागत होतो. मात्र ‘हुशार असला म्हणून काय झालं? कसं वागायचं याच भान ठेवलं पाहिजे, अक्कल असावी लागते?’ अशा अनेक प्रकारच्या शब्दरचना कानावर येत. त्याची प्रचीती लवकरच आली. शारीरिक शिक्षणाचा तास. आज घुंगुरकाठीची कवायत. प्रत्येकानं आपापली काठी घेतली. ड्रम वाजू लागले. तालावर घुंगराचा आवाज येऊ लागला. कवायत एकदम तालासुरात. अचानक माझ्या काठीची दोन घुंगरं निखळली, खाली पडली, पुन्हा सापडणार नाहीत म्हणून मी ती उचलून खिशात ठेवली. कवायतीनंतर परत काठीत अडकवण्यासाठी. पण काय झालं माहीत नाही, पीटी टिचरने झडप घालून घुंगरं काढून घेतली. मला हात पुढे करायला सांगितलं आणि हातावर सपासप काठीचे घाव बसू लागले. वर तोंडाचा पट्टा – ‘फारच माजलास ना, आज तुझा सगळा माज जिरवतो बघ’.

एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं, हे सर मला या घुंगराचं निमित्त काढून पाठीमागचा वचपा काढताहेत. मी आणखीन बेफिकीर, आज मार खात रहायचं. मग सरांनी हाताऐवजी पार्श्वभागावर काठी चालवायला सुरू केली. चुकून हात मध्ये आला. काठीचे दोन तुकडे झाले, हातातून असह्य वेदना, डोळ्यासमोर अंधार दाटून आला. मटकन खाली बसलो. रागातच उठलो, काही तरी ठरवून, पण अनर्थ टळला… सर पसार झाले होते.

४.

…तर आज हे जुनं दुखणं उफाळून वर आलंय. कित्येक वर्षांपासून सहन करतो आहे. पण मनात समाधानाची लकेर सणसणत जाते. रणांगणात एखाद्या योद्ध्याला झालेल्या जखमा तो जशा अलंकाराप्रमाणे मिरवतो, तसंच काहीसं वाटतं. बाबासाहेबांनी कायद्यानं आम्हाला संरक्षण दिलं, कवचकुंडलं दिली, माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्यालाही आता ७५ वर्षं उलटली. पण स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या समाजाच्या मनातील सल, दलित समाजाविषयीचा तिरस्कार उफाळून वर येतोच. आमची प्रगती उच्चवर्णीयांना खपणार कशी?

बाबासाहेबांच्या पूर्वी या लोकांनी काय अवस्था केली असेल आमच्या पूर्वजांची? त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही, समाज एकसंध नाही. मनाचा थरकाप होतो नुसत्या विचारानं. कोण वाली असेल त्यांचा? परमेश्वर, देव तर त्यांचा रक्षणकर्ता कधीच नसेल. कारण आमच्या स्पर्शानेदेखील हे देव बाटतात, विटाळ होतो आमचा त्यांना.

धन्य ते माझे पूर्वज, कोटी कोटी प्रणाम बाबासाहेब आंबेडकरांना, आम्हाला माणूसपण दिल्याबद्दल, जगण्याची उमेद दिल्याबद्दल…

आम्ही स्वतःला हिंदू समजत होतो, हिंदूंच्या देवदेवता आम्हाला पूजनीय वाटत असत, पण आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही, कारण आमच्या स्पर्शानं देव विटाळतात म्हणे! वा रे न्याय! या आणि अशा असंख्य हृदयस्पर्शी घटनांनी माझं इवलंसं मन बालपणापासूनच पोखरून गेलंय. समज आल्यावर बंड करून न उठेल तरच नवल. मोजक्याच घटना इथं दिल्यात, पण या कर्मकांडामुळे पावलोपावली मन ठेचकाळत राहिलं.

आमचा टाहो या तथाकथित देवदेवतांना कळलाच नाही, ना त्यांनी आमचं रक्षण केलं. मग मी त्यांना देव का मानावं? आमच्या इवल्याशा हृदयावर लहानपणापासून घणाघात झाले, न पुसणारे वळ उठले.

…ज्यांना मृगजळाच्या पाठीमागे पळायचंय त्यांना काही मी थांबवू शकत नाही, पण मी मात्र या देवदेवतांच्या कर्मकांडापासून अलिप्त झालो... धन्य झालो…

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

लेखक पंढरीनाथ हरी अवघडे सोलापूर जिल्ह्यातील केम या गावचे रहिवासी आहेत. ते काही काळ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीला होते. त्यांचा संपर्क नंबर - 74988 63954

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......