क्रांतिकारक बसवन्ना हे बाराव्या शतकातले आपले ‘कार्ल मार्क्स’च म्हणावे लागतील…
दिवाळी २०२२ - लेख
दीपक बोरगावे
  • बसवन्ना (बसवराज माधीराज मंडिगे, ११०५-११६७)
  • Thu , 20 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख बसवन्ना Basavanna अनुभव-मंटप Anubhava Mantapa लिंगायत Lingayat वचन साहित्य Vachana sahitya राजा बिज्जळ Raja Bijjal

डिसेंबर २०२०मध्ये बसव-कल्याण येथे एक आठवडाभर ‘अनुभव मंटपा’त राहण्याची संधी मिळाली. ही बसवन्ना (पूर्ण नाव बसवराज माधीराज मंडिगे, ११०५-११६७) यांची कर्मभूमी. ते ब्राह्मण होते. त्यांनी या भूमीमध्ये जातीअंताचा प्रयोग केला होता. या प्रदेशातील बहुधा हा जाती-अंताचा प्रारंभ बिंदू असावा. बाराव्या शतकातली बसवन्ना यांची जाती-अंताबद्दलची कृती पाहता ते जातीकलहाच्या प्रवाहातील आद्य क्रांतिकारक, आचार्य आणि कवी ठरतील. ते आर्मचेअर फिलॉसॉफर म्हणजे नुसतेच बोलणारे विचारवंत नव्हते, तर प्रत्यक्ष काम करणारे क्रांतिकारक तत्त्वज्ञ, संघटक, तत्कालीन समाजामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणणारे कार्यकर्ते आणि बरेच काही होते. बसवन्ना यांचे कार्यकर्तृत्व आणि योगदानाबद्दल कन्नड आणि इतर भारतीय भाषांमध्ये विपुल असे लेखन उपलब्ध आहे.

बसव विचारधारा क्षेत्रात काम करणारा राजू जुबरे हा ‘महाराष्ट्र बसव परिषदे’चा (भालकी, जिल्हा बिदर, कर्नाटक) सचिव. हा तरुण कार्यकर्ता, लेखक, वक्ता आणि अनुवादक म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आहे. तो माझ्यासोबत होता. या परिसरात हिंडत असताना साहजिकच कन्नड भाषाही सोबत राहिली आणि हरवत चालेल्या माझ्या भाषिक मुळांना काही काळ का होईना उभारी मिळाली. मुळात माझी मातृभाषाही कन्नड असल्यामुळे दोन-एक दिवसांतच बसव-कल्याणमधील लोकांसारखेच मी कन्नड बोलू लागलो. यातून भाषा कधी जात नाही, ती जाणीवेच्या तळाशी रुंजी घालत बसलेली असते. संधी मिळताच ती पटकन ओठावर येते, हे भाषाशास्त्रीय तथ्य इथे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

बसवन्ना यांच्या स्मृतींना उजाळा देत राजू आणि मी अनेक स्मृतिस्थळांना भेटी दिल्या. गावात बसवन्ना यांची १०८ फूट उंच बैठी मूर्ती आहे. ती भव्यदिव्य भावनांना निमंत्रित करते. इतिहासाची पावले आणि त्याच्या पाऊलखुणा अनेक ठिकाणी आमचा पाठलाग करत राहिल्या.

बसवन्ना या महान इतिहास-नायकाभोवती अनेक आख्यायिका, कथा विणल्या गेल्या आहेत (भारतातील अनेक इतिहास-नायकांबाबतीत असेच घडलेले आहे). बसवन्ना यांना देवत्वाचे रूप देऊन त्यांची मंदिरे बांधली गेली आहेत. अशाच एका भव्यदिव्य मंदिराची प्रस्थापना खुद बसव-कल्याणमध्येही आहे. या मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नूतनीकरण केले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे मंदिरात प्रवेश करणेदेखील मुश्कील होऊन गेले.

लिंगायत समाज हा प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात पसरलेला आहे. काही अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रात जवळपास एक कोटी लिंगायत समाज आहे. तो बहुतेककरून कर्नाटकातून स्थलांतरित झाला असून, आता त्याचे सांस्कृतिकदृष्ट्या पूर्णतः मराठीकरण झाले आहे. त्यामुळे या समाजाची धार्मिक ओळख ‘आम्ही लिंगायत आहोत’ एवढीच राहिलीय. हे स्वाभाविकही आहे. महाराष्ट्रातल्या या लिंगायत कुटुंबांच्या घरात गेल्यानंतर बसवेश्वरांचे किंवा शंकराचे एक छायाचित्र दिसते. ‘शिवलीलामृत’ नावाचा धार्मिक ग्रंथ हा कुठेतरी शोभनीय अशा ठिकाणी ठेवलेला असतो. कन्नड भाषा पूर्णतः हरवल्यामुळे हा समाज एका संस्कृतीला आणि एका भाषेला मुकला आहे. मानवी भाषिक इतिहास प्रवाहात या गोष्टी घडत असतात आणि त्या स्वाभाविकच असतात. भाषादेखील वेगवेगळी वळणे घेऊन पुढे पुढे जात राहते.

महाराष्ट्रातील या लिंगायत घरांत ‘शिवलीलामृत’ हा ग्रंथ साधारणतः मराठीत अनुवादित केलेला असतो. त्याचे वाचनही अधूनमधून होत असते. याशिवाय हा समाज ‘बसव-जयंती’ नावाचा एक उत्सवही साजरा करतो. जंगम, स्वामी यांना पूजा, धर्मविधी, लग्न, मयत वगैरे प्रसंगी अत्यंत आदराने निमंत्रण दिले जाते. मराठी समाजात जे स्थान ब्राह्मण/भटांना आहे, तेच स्थान लिंगायत समाजात जंगम, स्वामी यांना आहे. अलीकडच्या काळात जर जंगम, स्वामी मिळाले नाहीत, तर ब्राह्मण/भटांनाही निमंत्रण देण्यात येते.

आम्ही लहान होतो, तेव्हा घरात आई-वडील, मोठा भाऊ सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून कपाळावर विभूतीचे तीन पट्टे ओढून लिंगपूजा (‘गुनगडगी’ असा त्याला कन्नडमध्ये शब्द आहे) करत असत. म्हणजे एक छोट्या काळ्या दगडाच्या पिंडी (याला लिंगायत धर्मशास्त्रात ‘इष्टलिंग’ असे संबोधले जाते)वर विभूतीचे पट्टे ओढून त्याची पूजा केली जाते. हे ‘इष्टलिंगा’ एका बंदिस्त कप्प्यात ठेवून एका दोरीने बांधले जाते आणि गळ्यात अडकवले जाते. कपाळावर तीन विभूतीचे पट्टे आणि गळ्यात अडकवलेले इष्टलिंग, या लिंगायत व्यक्तीला ओळखण्याच्या दोन प्रमुख खुणा आहेत.

वास्तविक पाहता बसवन्ना यांनी समतेचे चिन्ह म्हणून इष्टलिंगाचा वापर केलेला दिसतो. अनेक समाजातील अठरापगड जातीचे लोक अनुभव-मंटपात येत असत. त्यात स्त्रियांचाही मोठा सहभाग होता. या इष्टलिंगामुळे ‘आपण सर्व जण एक आहोत’, ही समतेची आणि बंधुत्वाची भावना सर्वांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हे केलेले होते. त्या काळातील लोकांना एकत्र आणण्याच्या, संघटित करण्याच्या स्ट्रॅटेजीचा हा एक भाग होता (वास्तविक पाहता समाजवादी रचना निर्माण करण्याचा हा प्रयोग होता). त्यात बसवन्ना यशस्वीही झाले.

अलीकडच्या काही दशकांत मात्र ही चिन्हे लोप पावलेली आहेत. आधुनिकतेमुळे अशा अनेक धर्मातल्या अनेक विधी लोप पावल्या आहेत (त्या पुनरुजिवित करण्याचे काम मात्र नेटाने सुरू आहे, ही गोष्ट वेगळी), यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. वसाहतवादी कालखंडात इंग्रजांच्या आगमनामुळे आणि पाश्चात्य विज्ञानाच्या प्रभावामुळे या गोष्टी घडल्या.

या संदर्भात तत्कालीन सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेत डॉ. अब्राहम कोवूर (१९९८-१९७८) यांनी फार मोठी प्रागतिक विचारांची चळवळ उभी केली होती. अनेक धार्मिक अंधश्रद्धांना विरोध करणे, हा या चळवळीचा मुख्य गाभा होता. पुढे हीच परंपरा डॉ. एम. एम. कलबुर्गी  (१८३८-२०१५) यांनी कर्नाटकात अत्यंत विचारप्रवर्तक आणि संवेदनशील पद्धतीने कार्यरत ठेवली. डॉ. नरेंद्र दाभोलकर (१९४५-२०१३) यांची ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ हे काम अजूनही करते आहे. धर्म आणि धर्मातून निर्माण झालेल्या अंधश्रद्धेचे प्रश्न त्यांनी लावून धरले होते. त्यांचे आणि कलबुर्गींचे काय झाले, हे आपणाला माहीत आहेच. त्याची सखोल चर्चा अनेक विचारवंतांनी केलेलीदेखील आहे. केवळ विधी करण्यात काही अर्थ नाही. आजची आधुनिक लिंगायत व्यक्ती इष्टलिंगाची पूजा आणि कपाळावर विभूती लावणे, या दोन्हीही गोष्टी (विधी) करत नाही, असे सर्वसाधारण चित्र आहे. हे पूर्णतः खरे नसले, तरी हे बरेच खरे आहे. अर्थात यामुळे लिंगायत धर्म धोक्यात वगैरे काही आलेला नाही.

लिंगायत हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आणि स्वतंत्र आहे. त्याला तशी मान्यता मिळावी, अशा प्रकारच्या चळवळी झाल्या, मोर्चे वगैरे निघाले आहेत. या गोष्टी अलीकडच्या काळातल्या आहेत. आपल्या कालखंडात बसवन्ना यांनी जातिअंताचा जो प्रयोग केला, तो अर्थातच त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होता. पण त्याबद्दल या चळवळीत कुठेच उल्लेख किंवा वाच्यता नाही. हिंदू वैदिक धर्म हा कर्मकांड सांगणारा, अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा आहे. पोथ्या आणि पुराणे यातून भेदाच्या अनेक भिंती उभारणाऱ्या या धर्माला महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राणपणाने विरोध केला. आपल्या कालखंडात त्यांनी मोठ्या चळवळी उभ्या केल्या. डॉ. आंबेडकरांनी तर कंटाळून शेवटी शेवटी हिंदू धर्मच सोडून दिला. ही बसवन्ना यांच्या विचारांचीच परंपरा होती.

या अर्थाने विचार केल्यास लिंगायत हा नक्कीच स्वतंत्र आणि वेगळा धर्म मानायला हरकत नाही. पण तसे नेमके चित्र आहे की, हा वेगळाच राजकीय फंडा आहे, हे तपासायला हवे.

लिंगायत समाज हा कर्नाटकातील बहुसंख्याक समाज. जसा महाराष्ट्रात मराठा, तसा कर्नाटकात लिंगायत. बसवन्ना यांनी जाती-अंत, स्त्रीशिक्षण, अनुभव-मंटप (भारतीय इतिहासातील ‘पहिली लोकशाही संसद’ ही बहुतेक बसवन्ना यांनीच सुरू केली), हा समतेची परंपरा सांगणारा विलक्षण आणि क्रांतिकारक प्रयोग एका अत्यंत सनातनी अशा समाजात बाराव्या शतकात केला. आपण कुठला तरी नवा धर्म स्थापन करत आहोत, असा अभिनवेश त्यांच्याकडे नव्हता. देव, वेद, पुराण, पुनर्जन्म, कर्मकांड, जात, लिंगभेद, अनिष्ट रूढी-परंपरा आणि वैदिक सनातन धर्माचा त्यांनी कायम विरोध केला. श्रम आणि कष्टाला प्राधान्य दिले. त्यांच्या विचारधारेच्या केंद्रस्थानी माणूस होता. कोणत्याच भेदांच्या गोष्टी त्यांनी कधीच मान्य केल्या नाहीत. ते काळाच्या पुढे होते. बाराव्या शतकातला हा आपला ‘कार्ल मार्क्स’च म्हणावा लागेल. ते कवी आणि वचनकार म्हणून प्रसिद्ध होते. एका वचनात ते म्हणतात -

देवांवर वार करेन

शास्त्राला बेड्या ठोकेन

तर्काच्या पाठीवर आसूड ओढेन

आगमाचे नाक कापेन

मी मातंग चन्नय्याच्या घरचा पुत्र आहे

पाहा देवा

महाज्ञानी कुडलसंगमदेवा

तत्कालीन समाजस्थिती लक्षात घेता अनुभव-मंटपात पुरुषांबरोबर स्त्रियांचाही मोठा सहभाग असणे, ही गोष्ट विलक्षणच म्हणायला हवी. स्त्री-पुरुष समतेचा त्या काळातला हा बसवन्ना यांचा प्रयोग किती क्रांतिकारक तत्त्वे घेऊन काम करणारा होता, हे लक्षात येते. राजा बिज्जळ यांच्या राज्यात प्रधानमंत्री म्हणून काम करत असताना एक पैशाचाही भ्रष्टाचार त्यांनी होऊ दिला नाही. राजा बिज्जळ यांनाही त्यांनी तसे काही करू दिले नाही. त्यांचा नैतिक प्रभाव आणि दबाव हा कायम त्यांच्या कार्यकाळात राहिला. दानधर्मालाही बसवन्ना यांनी महत्त्वाचे स्थान दिले होते. ‘दानधर्म’ याचा अर्थ केवळ चॅरिटी म्हणून घेता येणार नाही. अत्यंत गरीब, दडपलेल्या शोषित समाजाला जगण्यास काही हातभार लावला पाहिजे आणि यातून त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणले गेले पाहिजे, हा उद्देश त्या पाठीमागे होता. त्यात अधिकतर मानुषता आणि समाज कल्याणाची मूल्ये होती.

स्त्रियांच्या शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या आणि जातीची चौकट मोडून टाकणाऱ्या या क्रांतिकारकाचा आज अन्वय काय आहे पहा? खुद लिंगायत समाजामध्ये इतक्या छोट्या-मोठ्या जाती आहेत की, गेल्या काही दशकांत ओबीसीचे फायदे मिळावे म्हणून अनेक चळवळी झाल्या आहेत. खरोखर मागासलेल्या व्यक्तीला या आरक्षणाचा फायदा मिळायला हवा, यात काही वाद नाही, पण तसे प्रत्यक्षात होताना दिसत नाही. कर्नाटकात लिंगायत आणि महाराष्ट्रात मराठा याच कारणासाठी लढताना दिसतात. पण याचा फायदा दुसरेच उपटताना दिसत आहेत. ढोर, चांभार, धनगर, कोष्टी, तेली, न्हावी, माळी, बुरूड, कुंभार, कांडण करणारे कामगार, वाणी, जंगम, स्वामी, (ही यादी खूप मोठी आहे) याही जातींमध्ये अनेक उपजाती असा हा प्रकार आहे. मी तेली (याला कन्नडमध्ये ‘घाणगेर’ असा शब्द आहे). काळे तेली (करी घाणगेर/गाणगेर), गोरे तेली (ब्बेळ घाणगेर) असाही एक प्रकार आहे. गोरे तेली काळ्या तेलींशी बेटी व्यवहार करत नाहीत. ज्या माणसाने आपले सारे आयुष्य जाती-अंतासाठी घालवले, त्याचे अनुयायी ‘गोरे तेली-काळे तेली’ या कचाट्यात आजही अडकलेले आहेत. 

बसवन्ना यांना दलित, श्रमिक, कष्टकरी, कुटिरोद्योग करणारे, कलाकुसर करणारे, परंपरागत कौशल्याची कामे करणारे कामगार यांच्याबद्दल खूप आदर होता (कोल्हापुरात शाहू महाराजांनी परंपरागत कौशल्याची कामे करणाऱ्यांना एकत्र करून त्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले, ही गोष्ट या निमित्ताने लक्षात घेण्यासारखी आहे. त्यात मुस्लीम समाजाची माणसेदेखील होती). या समाजाशी ते एकरूप झाले होते, त्यांच्याशी जवळून संबंधित होते. त्यांच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला.

त्यांनी बिज्जळ राज्यात एका चांभाराच्या मुलाशी ब्राह्मण मुलीचा विवाह लावण्याचे काम केले. हा विवाह पालकांच्या इच्छेने करण्यात आला होता. याला त्यांच्या संसदेने (अनुभव-मंटप) मंजुरी दिली होती. बसवन्ना यांच्या कारकिर्दीतला हा क्रांतिकारक निर्णय ठरला. त्यांचे एक लाख शहान्नव हजार अनुयायी उर्फ शरण या विवाहाच्या निमित्ताने हजर होते. हा आकडा फार महत्त्वाचा आहे. या निमित्ताने तत्कालीन समाजात (कल्याण आणि आजूबाजूचा परिसर) प्रागतिक घुसळण झाली असावी.

अर्थात तत्कालीन सनातन्यांना हा विवाह मान्य नव्हता. खुद राजा बिज्जळ यांनाही मान्य नव्हता. या घटनेमुळे बिज्जळ राज्यात हाहाकार माजला. सनातन्यांनी धर्मयुद्ध पुकारले. मुला-मुलीचे आणि आई-वडिलांचे डोळे काढून त्यांना हत्तीच्या पायाला बांधून भर रस्त्यातून त्यांची वरात काढली. शेवटी त्यांना ठार मारले गेले. याचबरोबर हजारो बसवन्नांच्या अनुयायांना ठार मारण्यात आले. वचन भांडाराला आग लावण्यात आली. त्यात अनेक जण नाहक मरण पावले.

या घटनेमुळे बसवन्नांना आपले मंत्रीपद सोडून द्यावे लागले. या अराजकतेमुळे त्यांना कुडलसंगम या त्यांच्या जन्मगावी सुरक्षितपणे हलवण्यात आले. याच दरम्यान त्यांचे निधन झाले. या प्रवासात त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा होता, असे म्हटले जाते. पण शत्रूंनी हल्ला करून बसवन्ना यांना रस्त्यातच ठार मारले, असा एक (अभ्यासकांचा) मतप्रवाह आहे. याच दरम्यान सनातनी राजा बिज्जळ याचाही खून करण्यात आला. त्याचा आळ मात्र बसवन्ना आणि शरणांवर ठेवण्यात आला.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

वादग्रस्त आणि अत्यंत वेगळ्या प्रकाराची कन्नड आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत नाटक लिहिणारे, नाट्यशास्त्राचे प्राध्यापक, एनएफटीआयआयचे (National Film and Television Institute of India, Pune) माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाड यांनी या घटनेवर ‘तलेदण्ड’ हे नाटक कन्नडमध्ये लिहिले आहे. त्याचा अनुवाद मराठी-इंग्रजीसह इतरही काही भारतीय भाषांत उपलब्ध आहे. 

‘अनुभव-मंटप’ ही एक विलक्षण अशा प्रकारची संस्था बसवन्ना यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच बिज्जळ राज्यात अस्तित्वात आली . लोकशाही पद्धतीने समाजातील अनेक समस्यांची चर्चा आणि त्यावर उपाययोजना, अशा प्रकारचे हे एक संभाषित (discourse) होते. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांनी एका लेखात या संकल्पनेवर भाष्य केले आहे. ते लिहितात, “देवालयाचे अर्चक आणि मठांचे आचार्य हे दोघेही धर्माच्या नावाखाली पुरोहितसत्ता बळकट करण्यात गुंतले होते. बाराव्या शतकापर्यंत शोषण करण्यासाठी राक्षस रूप धारण केलेल्या या दोन्ही पद्धती नाकारण्यासाठी ‘अनुभव-मंटप’ ही प्रजासत्ताक संस्था अस्तित्वात आली. ही संस्था आधुनिक संसदेचे प्रारूप होती. यात जातिभेद, लिंगभेद, वर्णभेद यांना थारा नव्हता. सर्व शरणांनी मुक्त चर्चा करून घेतलेले निर्णय तत्त्वरूप धारण करून आचरणात येत होते. ते साहित्यरूपातही अभिव्यक्त होते.” (‘अनुभव मंटप : उगम आणि पुनरुज्जीवन’ - संपा. राजू जुबरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, अनु. बसवंततनय, महाराष्ट्र बसव परिषद, भालकी, पृ.२-३, २०२०).

तत्कालीन समाजातील शोषण व्यवस्था नाकारण्यासाठी ‘अनुभव-मंटपा’चे अध्यक्षपद बसवन्ना यांनी मूळचे शूद्र पण ज्ञानी असलेल्या अल्लमास यांना दिले. हा क्रांतिकारी आणि विद्रोही निर्णय तत्कालीन जंगमांना (बसवन्ना यांच्या चळवळीतील एक प्रकारचे लोकशिक्षक. बसवन्ना यांचा विचार सामान्यांपर्यंत घेऊन जाणे, हे काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करत असत) मान्य झाला नाही. म्हणून काही कर्मठ जंगम या चळवळीतून मागे हटले.

‘अनुभव-मंटप’ ही एक प्रकारची लोकचळवळ होती, पण तिला या ‘पीठारोहणाच्या घटने’मुळेच तडे गेले असावेत, असे अनुमान कलबुर्गी यांनी वरील लेखात काढले आहे. ही घटना धिक्कारून गेलेल्या जंगमांना नंतर हे पीठारोहण करण्याची संधी न दिल्यामुळे अनेक वर्षे ‘अनुभव-मंटप’ परिकल्पना पुन्हा अस्तित्वात आली नाही, असे दिसते, असे कलबुर्गी यांनी म्हटले आहे.

अक्कमहादेवी ही तत्कालीन विद्रोही विचारांची कवयित्री ‘अनुभव-मंटपा’चा एक भाग होती. या मंटपात जवळपास ७० स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. त्यातील ३५ स्त्रिया वचन-साहित्य लिहिणाऱ्या होत्या. म्हणजे त्या विदुषी आणि कवयित्री होत्या. नीलांबिका ही बसवन्ना यांची पत्नीही (कवयित्री) या मंटपाचा महत्त्वाचा भाग होती. गंगांबिका ही बसवन्ना यांची दुसरी पत्नी (कवयित्री)देखील या मंटपाचा एक भाग होती. ती या चळवळीत सक्रिय होती. वचन-साहित्याचे संरक्षण करण्यासाठी या दोघींचे महत्त्वाचे योगदान आहे, असे या क्षेत्रातील अभ्यासकांनी म्हटले आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

संक्कव्वा ही पूर्वाश्रमीची वेश्याही या अनुभव-मंटपात होती. सत्यक्का ही सफाई कामगार स्त्री, अस्पृश्य उरिलिंगपेद्दीची पत्नी काळव्वे, सूत कातणारी काळव्वा, कांडण करणारी सोमव्वे, काश्मीरची राजकुमारी बोंतादेवी, मुक्तायक्का, न्हावी लिंगम्मा, मोळिगे महादेवी, धूप घालणारी गोग्गव्वे, विणकर अमुगे रायम्मा, तांदुळ वेचणारी लक्कम्मा, कुंभार गुंडय्याची पत्नी केतलदेवी, या अशा विविध शोषित समाजातील स्त्रिया या मंटपात सामील झाल्या होत्या.

हे कशाचे द्योतक आहे? शोषित समाजातल्या स्त्रियांना इतक्या उंचीपर्यंत घेऊन जाणे, ही बाब वाटते तितकी सोपी नाही. पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली म्हणून महात्मा जोतिबा फुले यांना एकोणिसाव्या शतकात काय काय सोसावे लागले? तेव्हा तर आधुनिकतेने आपल्या देशात प्रवेश केलेला होता. बसवन्ना यांच्या या अभूतपूर्व कार्यास खिळ बसवण्याचे काम सनातनी समाजाने केले. हाच कार्यक्रम सनातनी समाजाने बुद्धाच्या काळातही केला होता.

बसवन्ना यांनी परिवर्तनाच्या विद्रोहाचा हा पट किती व्यापक आणि विस्तृत केला होता, याची प्रचिती त्यांच्या कर्तृत्वात दडलेली दिसते. महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले यांनी एकोणिसाव्या शतकात स्त्रीशिक्षण आणि स्त्रीमुक्तीचा जो प्रारंभ केला, त्याची सुरुवात बसवन्ना यांनी बाराव्या शतकातच केली होती. मधल्या काही शतकांत केवळ अंधारच दाटला होता. समाज परिवर्तनाच्या घुसळणीत स्त्रियांचा सहभाग अत्यंत आवश्यक असतो, हे या दोन महात्म्यांनी आपणाला सांगितलेले आहे. तरीदेखील आपण त्याकडे लक्ष देत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, असेच म्हणावे लागेल.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......