अजूनकाही
‘मराठवाडा विद्यापीठा’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव झाला आणि दुसर्याच दिवशी मराठवाडा पेटला. अनेक गावांतील बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ले करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील अशा उदध्वस्त झालेल्या लोकांना शहराबाहेर तात्पुरता निवारा देण्यात आला होता. निवारा म्हणजे साधे कपड्याचे शेड. त्यातल्या एका शेडमध्ये एक तरुणी बाळंत झाली. एक-दोन दिवसांचे तिचे बाळ होते. तेव्हा ‘इंडियन एक्स्प्रेस’ची एक पत्रकार महिला नांदेड जिल्ह्यातील अन्यायग्रस्त लोकांना भेटत होती. एस. एम. प्रधान आणि सुरेश गायकवाड तिला सहकार्य करत होते. ही पत्रकार महिला या शेडमध्ये गेली, तेव्हा दोन-तीन दिवसांचे हे बाळ मांडीवर घेऊन त्या बाळाची आजी बसलेली. शेडवर तिने डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र बाभळीच्या काट्याने लावले होते. हे चित्र बघून ही पत्रकार महिला आश्चर्यचकित झाली. तिने आजीला प्रश्न केला की, ‘या छायाचित्रातल्या बाबासाहेबांमुळे तुमची अशी अवस्था झाली. संसार उदध्वस्त झाला आणि असा उघड्यावर तुमचा नातू जन्माला. तेव्हा हे छायाचित्र या शेडवर लावण्याची भीती नाही वाटत?’ तेव्हा आजीने उत्तर दिले, ‘‘भीती, भीती वाटते ना! पण ही दोन दिवसांची बाळंतीण आणि हे दोन दिवसांचे बाळ बाबासाहेबांच्या नावावर कुर्बान करायला मी तयार आहे...”
मला नेहमी प्रश्न पडतो की, हे बळ, ही हिंमत कोठून येते? ही प्रेरणा डॉ. बाबासाहेबांची… ती जागृत ठेवण्याचे काम केले ‘दलित पँथर’ने. थोडक्यात, पँथरने काय दिले, तर एका पिढीला असे बळ दिले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सत्तरचे दशक तसे मंतरलेले होते. फ्रान्ससह युरोपात तरुण रस्त्यावर उतरत होता, अमेरिकन युवक सरकारला जाब विचारत होता, भारतात नक्षलवादी चळवळीने राज्यव्यवस्थेवर जबरदस्त प्रहार केला होता. या चळवळीचे प्रणेते चारू मुजूमदार तुरुंगात शहीद झाले होते. क्युबा क्रांतीचा नेता चे गव्हेरा जगभरातील महाविद्यालयांत पोहोचला होता. भारतीय स्वातंत्र्य २५ वर्षांचे झाले होते… आणि या दरम्यान जन्मलेली पिढी स्वातंत्र्याने आम्हाला काय दिले, असा खडा सवाल करत होती. दुसरीकडे महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष सत्ताधारी वर्गाच्या दावणीला बांधला गेला होता… या पार्श्वभूमीवर ‘दलित पँथर’चा जन्म झाला.
आता नेमकी तारीख कोणती, ‘दलित पँथर’ हे नाव कसे ठरले वगैरे तपशील तेवढे महत्त्वाचे नाहीत. ज. वि. पवार आणि इतर नेत्यांमध्ये या तारखेबाबत आणि नाव कसे सुचले, याबाबत वाद आहे. संस्थापकांपैकी नामदेव ढसाळ आणि राजा ढाले हयात नाहीत, पण त्यांच्यासोबत हा आणि इतर अनेक बाबतीतील वाद मिटला नाही, तर ‘पँथर’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत असे अनेक वाद पुन्हा डोके वर काढत आहेत.
हे वर्ष सुरू झाले आणि काही कार्यकर्त्यांनी हे वर्ष साजरे करण्यासाठी समिती स्थापन केली. या समितीत डाव्या कार्यकर्त्यांचा भरणा आहे, त्यांचा ‘पँथर’शी संबंध काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. आणि मग काही रिपब्लिकन नेत्यांनी हा सोहळा साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात अर्थातच रामदास आठवले अग्रस्थानी आहेत.
‘पँथर’च्या स्थापनेला जशी जागतिक परिस्थिती आणि देशात सुरू असलेली घुसळून कारणीभूत ठरली, तशाच काही स्थानिक घटनाही कारणीभूत ठरल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील बावडा येथील दलितांवर बहिष्कार टाकण्यात आला, ही घटना पहिली ठिणगी ठरली. याच काळात महाराष्ट्रात अनेक खेड्यांत दलितवस्तीवर बहिष्कार टाकण्यात येत होता. अन्यायाच्या घटना वाढत होत्या, आणि दलितांचे पुढारी असलेले नेते निष्क्रिय होते. त्यामुळे आंबेडकरी प्रेरणेतून शिकलेला तरुण प्रश्न उपस्थित करत होता. त्यांच्या आक्रोशचा आवाज म्हणजे ‘दलित पँथर’.
‘पँथर’चे विश्लेषण करताना किंवा ५० वर्षांचा आढावा घेताना सरळ सरळ दोन प्रवाह दिसत आहेत. एक प्रवाह नेताना दोष देत आहे आणि त्याच वेळी या सुवर्ण महोत्सवी वर्षांत काही वेगळे घडवण्याची स्वप्ने रंगवत आहे. मात्र सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर ही फार अवघड बाब आहे. त्यामुळे या सुवर्ण महोत्सवी वर्षातून काही हाती लागेल का, याविषयी मनात शंका आहे. पण पुन्हा एकदा समाजात घुसळण सुरू आहे, हेही काही कमी महत्त्वाचे नाही.
‘दलित पँथर’ चळवळीचा इतिहास फक्त दोन-तीन वर्षांचा आहे. १९७२मध्ये स्थापना आणि अडीच वर्षांत फुट. या फुटीचे कारण राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यातील वैचारिक मतभेद असे सांगितले, मानले जाते. वैचारिक मतभेद म्हणजे काय तर ढसाळ यांनी तयार केलेला जाहीरनामा. त्यावर ढाले यांनी आक्षेप घेतला आणि ‘नामदेव डाव्यांच्या नादी लागला असून हा जाहीरनामा डाव्या कार्यकर्त्यांनी लिहिला आहे’, असा आरोप त्यांनी केला. त्यात सत्यही होते, पण हा जाहीरनामा कोणी लिहिला त्यापेक्षा जाहीरनामा कसा आहे, यावर फार चर्चा झाली नाही. सुनील दिघेंसारखे नक्षलवादाचे समर्थक या जाहीरनाम्यावर काम करत होते हे खरे आहे, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘स्वतंत्र मजूर पक्षा’च्या जाहीरनाम्याला ‘पँथर’चा जाहीरनामा समर्थन देणारा होता, हेही ढाले यांनी लक्षात घेतले नाही. तर दुसरीकडे इतर नेतेही काही मार्ग काढण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ढाले यांनी ‘पँथर’ बरखास्तीची घोषणा केली. इथे पर्वाचा एक अध्याय संपला.
त्यापूर्वी वरळीची दंगल मोठ्या जखमा ठेवून गेली होती. भागवत जाधवसारखे कार्यकर्ते शहीद झाले होते. गावोगावी एक वेगळाच समाज जन्मला होता आणि वरच्या जातीच्या ‘आरे’ला ‘कारे’ असे उत्तर मिळत होते. मुंबईत शिवसेनेच्या शाखेच्या विरोधात ‘पँथर’च्या छावण्या निर्माण होत होत्या, पण ‘पँथर’ बरखास्तीची घोषणा झाली आणि पुन्हा एकदा आंबेडकरी तरुण सैरभैर झाला, निराश झाला.
मात्र या काळात निर्माण झालेल्या चेतनेमुळे या तरुणांना स्वस्थ्य बसणे शक्य नव्हते. या काळात अगणित कार्यकर्ते पूर्ण वेळ चळवळ करत होते. त्यांची संख्या मोजता येणार नाही, इतकी आहे. काहीही भविष्य नाही, दिशा नाही, पण आंबेडकरी विचार डोक्यात घेऊन कार्यकर्ते पेटून उठले होते. पण या प्रक्रियेत हजारो कार्यकर्ते उदध्वस्त झाले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली. मात्र त्यांच्या त्यागाचे काही मूल्य कोणीही विचारात घेतले नाही.
इकडे मुंबईत वास्तव्य करणारे राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्यासह अनेक जण लेखक झाले, नेते झाले, विचारवंत म्हणून आयुष्यभर मिरवत राहिले. त्यामुळे ‘पँथर’चा विचार दोन पातळ्यांवर केला पाहिजे. एक, मुंबईतील नेत्याची ‘दलित पँथर’ आणि ग्रामीण महाराष्ट्रातील गावोगावी काम करणार्या कार्यकर्त्यांची ‘दलित पँथर’.
गावोगावी हे कार्यकर्ते लढत होते, काहीही हाती लागणार नाही, याची जाणीव असताना केवळ आंबेडकरी विचारांची लढाई ते लढत होते, लढत आहेत. त्यामुळे ‘पँथर’चा इतिहास हा कार्यकर्त्याच्या त्यागाचा आणि नेत्यांच्या अहंकाराचा इतिहास आहे. तिचे तुकडे झाले, भले कोणी त्याला वैचारिक संघर्ष म्हणोत, पण ही जहाल संघटना काही संघटनात्मक आकार घेण्याआधी फुटली, यामागे नेत्याचा आणि खास करून ढसाळ आणि ढाले यांचा अहंकार होता.
‘पँथर’च्या संस्थापकांपैकी अविनाश महातेकर १९८३नंतर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत गेले आणि आता रामदास आठवलेंना साथ देत आहेत. भाई सगारे यांनी काही काळ निळूभाऊ खाडिलकर यांच्यासोबत ‘प्रॅक्टिकल सोशालिझम’चा प्रयोग केला, ज. वि. पवार आधी ढाले यांची आणि गेली काही वर्षं प्रकाश आंबेडकर यांची पालखी वाहत आहेत. ज्या शिवसेनेला आवाज देण्याची ताकद ढसाळांनी कमावली होती, तेच बाळासाहेब ठाकरे यांना शरण गेले. ढाले यांनी आधी प्रकाश आंबेडकर यांना साथ दिली आणि शेवटच्या दिवसांत त्यांनी रामदास आठवले याचे नेतृत्व मान्य केले. प्रत्येकाची परिस्थितीची अपरिहार्यता असेल किंवा अजून काही, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. या नेत्यांना मानणारा कार्यकर्ता गावोगावी होता आणि आपली मूळ जमिनीवर घट्ट पकडून ठेवण्याच्या त्यांच्या संघर्षाची ही ५० वर्षं आहेत.
रिपब्लिकन नेत्याच्या साचलेपणाला कंटाळून ‘पँथर’ स्थापन करणारे नेते नंतर याच साचलेपणात अडकले. कधी काळी इंदिरा गांधी यांची गाडी अडवणारे नेते त्यांनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थक झाले, ही फार मोठी शोकांतिका म्हटली पाहिजे.
‘पँथर’चा राजकीय इतिहास फार काही सांगण्यासारखा नाही, पण तिने धार्मिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रांत मोठी कामगिरी केली. कट्टर हिंदुत्ववादी विचाराला थेट आव्हान दिले. साहित्य क्षेत्रात तर जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली.
‘पँथर’ फुटीनंतरही समाज लढत होता आणि शरद पवार यांनी नामांतर प्रश्न निर्माण केला. या काळात विकासाच्या मुद्द्यावर सर्व मतभेद विसरून तरुण एकत्र येत होता, पण नामांतर प्रश्नांवर आंबेडकरी तरुण वेगळा झाला आणि नामांतराच्या मागणीसाठी एक पिढी संघर्ष करत राहिली. या आंदोलनाने रामदास आठवलेसारखा नेता पुढे आला, आणि पुन्हा शरद पवार यांनीच आठवलेंना सत्ता देऊन भारतीय ‘पँथर’ बरखास्त करायला लागली. आता आठवले यांच्या प्रवासाबाबत सांगण्यासारखे काय आहे?
कोणत्याही संघटनेसाठी ५० वर्षं हा मोठा पल्ला आहे. ‘पँथर’ने या ५० वर्षांत खूप काही कमावले आहे. सर्व काही नकारात्मक नाही, पण ढोबळमानाने राजकीय पातळीवर फार काही हाती लागलेले नाही.
सध्याच्या काळात ‘दलित पँथर’सारख्या संघटनेची खूप गरज आहे. रॅडिकल आंबेडकर मांडणारी आणि कट्टरतेला थेट आव्हान देणारी संघटना म्हणून… पण आता ‘जर-तर’वर चर्चा करण्यात अर्थ नाही.
‘दलित पँथर’चा इतिहास काही जण आपल्या परीने लिहीत आहेत. त्यातून मी कसा मोठा, हे सांगायची स्पर्धा लागलेली आहे. वर्षभरात चार-पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत, पण वस्तुनिष्ठ इतिहास मांडला जात नाही. नामांतर आंदोलन आणि त्यानंतरच्या घटना या पुणे-मुंबईतील लेखकांच्या लिखाणाचा विषय झाला नाही. नामांतर आंदोलनात अनेक घटना घडल्या. त्यावर स्वतंत्र लिखाण झाले पाहिजे, पण लेखक उदासीन आहेत.
‘दलित पँथर’ एक झंझावात होता, एक ठिणगी होती, पण आता आपण त्याचे अवशेष सांभाळत सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत… यातून काही नवीन निर्माण झाले तर?
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
लेखक बंधुराज लोणे पत्रकार आहेत.
bandhulone@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment