गांधीजी आपले राष्ट्रपिता आहेत. पंडित नेहरू आपले पहिले पंतप्रधान आहेत. आपल्या सगळ्यांना ते आवडतात. पण आपले सध्याचे पंतप्रधान अवतार-पुरुष आहेत आणि ते आपल्यालाच नाही, तर सगळ्या जगाला आवडतात! त्याचबरोबर ते सर्व नरांचे इंद्रसुद्धा आहेत. हे विधिलिखितच होते, त्याचमुळे आपल्या पंतप्रधानांच्या माता-पित्यांनी त्यांचे नाव ‘नरेंद्र’ ठेवले. पण एवढ्यानेही भागत नाही. सर्व नरांचे इंद्र ही आपल्या पंतप्रधानांची पूर्ण ओळख नव्हे. त्यांची अजून एक ओळख भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांनी नुकतीच करून दिली आहे. नड्डाजी परवा म्हणाले, आपले पंतप्रधान सुरांचे म्हणजे देवांचेही इंद्र आहेत. म्हणजे ते सुरेंद्रसुद्धा आहेत. आमचे कान अत्यंत तिखट असूनही आम्हाला हे ‘सुरेंद्र-प्रकरण’ अजिबात माहीत नव्हते, हे आम्ही सुरुवातीलाच अत्यंत नम्रपणे मान्य करतो.
आपले पंतप्रधान भारत देश चालवता चालवता देवांचेही राज्य चालवतात, हे आम्हाला खरंच माहीत नव्हते. नरांचे आणि देवांचे अशी दोन्ही राज्ये आपले पंतप्रधान चालवतात, हे म्हणजे फार म्हणजे फार म्हणजे फारच झाले!!!
रात्री आपले पंतप्रधान एक क्षणसुद्धा झोपत नाहीत, हे सर्वश्रुतच आहे. याचाच अर्थ असा की, ते योगीसुद्धा आहेत. त्या अर्थाने ते योगेंद्रसुद्धा आहेत. ‘नरेंद्र मोदीजी’ या नावाने आपण सर्व जण त्यांना ओळखतो, पण या एका नावात आपल्या पंतप्रधानांची ओळख अजिबात पूर्ण होत नाही. जे. पी. नड्डाजी यांनी ‘नरेंद्र-सहस्त्रनाम’ लिहायला घेतले असल्याचे आमच्या कानावर आले आहे. ते लिहून झाल्याशिवाय आपल्या पंतप्रधानांची खरी ओळख आपल्याला होणार नाही, हे नक्की. कल्पनाशक्तीचा तेवढा मोठा विलास फक्त नड्डाजींनाच शक्य आहे!
नड्डाजींनी बिहारमध्ये जाऊन ‘आता भारतात भाजप हा एकच पक्ष राहणार आहे’, असे वक्तव्य केले. त्यामुळे आमचे प्रिय मित्र नीतीशजी घाबरले. त्या भीतीच्या झटक्यात त्यांनी आपल्या ‘जनता दल युनायटेड’ या पक्षाची अवस्था शिवसेनेसारखी होऊ नये म्हणून एक तेजस्वी कदम उचलले. खरं तर ते एक अत्यंत बाद कदम आहे, हे आम्ही त्यांना फोन करून सांगितले आहे. ‘मोदी हे सुरेंद्रसुद्धा आहेत, हे तुम्हाला माहीत नाही का? आणि, असे असताना असे करण्याची तुमची हिंमतच कशी झाली?’ असे आम्ही त्यांना स्पष्टच विचारले. त्यावर नीतीशजी अतिशय चिडले आणि आम्हाला म्हणाले, ‘ये फेकू बातें हमें मत बताइएगा श्रीनिवासबाबू, हम बिहारी हैं, हम उडती चिड़िया को हल्दी लगा लेते हैं’. आम्हाला अर्थातच काहीच बोध झाला नाही. चिमण्या बिचाऱ्या उडत असतात. आपण काहीही कारण नसताना त्यांना हळद कशाला लावायला जायचे? नीतीशबाबू आणि एकूणच बिहारी लोक अशी अवघड आणि निरुपयोगी कामे करत बसतात, त्यामुळेच बिहार मागास राहिला आहे! असो. ‘नीतीशबाबू तुमचे काही खरे नाही’ असे आम्ही त्यांना स्पष्टच सांगितले. त्यावरही ते हसू लागले. आम्ही गंभीर वॉर्निंग त्यांना देतो आहोत, हे त्यांना पटेच ना. त्यांना वाटले की, आम्ही नेहमीप्रमाणे विनोदी लेख वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करतो आहोत. नंतर संभाषण संपवताना ते म्हणाले, “पटना आइए श्रीनिवासबाबू एक दिन, लिट्टी चोखा हो जाए!” लिट्टी-चोखाची पार्टी आम्ही आणि नीतीशबाबू नेहमी करतो. असो.
नीतीशबाबू आमचे कितीही जवळचे मित्र असले तरी आपले पंतप्रधान मोदी यांचा अपमान त्यांनी केला होता, म्हणून आम्ही त्यांचे निमंत्रण स्वीकारले नाही. ‘येतो नक्की’ असा मोघम होकार आम्ही त्यांना दिला. मोघम होकार म्हणजे राजकारणात नकारच असतो, हे ओळखण्याएवढे नीतीशबाबू कच्चे खिलाडी नाहीत. फोन ठेवण्याआधी नीतीशजी म्हणाले, “आपके उद्धवसाब को बताइए उड़ती चिड़िया को हल्दी कैसे लगा लेते हैं, ये शरद पवारसाहब से सिखीए”.
शरद पवारसाहेब आणि आमच्यातही अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. पण, आपले साहेब चिमण्यांना हळद वगैरे लावण्यासारखी कामे करत असतील, असे आम्हाला अजिबात वाटले नव्हते. मागे एकदा आम्ही त्यांना ‘गोविंदबाग’ या त्यांच्या बारामतीमधील घरी भेटायला गेलो होतो, तेव्हा साहेब मागे अंगणात होते आणि अंगणात खूप चिमण्याही होत्या. त्यानंतर साहेब आत आले, तेव्हा त्यांचे हात जरासे पिवळे दिसले. आम्ही आलो आहोत, हे कळल्यावर त्यांनी आपले पिवळे हात एकदम घाईघाईने धुवून टाकले. हा सगळा सीन आम्हाला नीतीशबाबूंच्या फोननंतर आठवला आणि आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आम्हीसुद्धा उडत्या चिमण्यांचे पर मोजण्यात तरबेज आहोत!
आम्ही इतके तरबेज वगैरे असलो तरी आपले पंतप्रधान मोदीजी स्वर्गाचा कारभार कधी चालवतात, हे काही आमच्या लक्षात येत नव्हते. आणि ते योग्यच होते. आम्ही कधी स्वर्गातील उडत्या चिमण्यांचे पर मोजले नव्हते.
खूप विचार करूनही आम्हाला उत्तर सुचले नाही. शेवटी नड्डाजींचा फोन आला की, मोदीजी स्वर्गाचा कारभार रात्री चालवतात, आणि मुख्य म्हणजे सूक्ष्म रूपात चालवतात. आम्ही चकित झालो. आम्ही म्हटले, ‘नड्डाजी तुम्हाला कसे कळले की, आमच्या डोक्यात हाच विचार चालू आहे?’ नड्डाजी गालातल्या गालात हसल्याचे आम्हाला व्हिडिओ कॉल असल्यामुळे दिसले. नड्डाजी भाजपच्या स्वर्गशाखेचेसुद्धा अध्यक्ष आहेत, हे आम्ही तात्काळ ओळखले.
आपले पंतप्रधान सुरेंद्र मोदीजी सूक्ष्म रूपात कारभार चालवतात, याचा अर्थ ते शरीराने छोटे होऊन स्वर्गाचा कारभार चालवतात, असा अर्थ कोणी घेऊ नये. अध्यात्मामध्ये देहरूप सोडून विचारांच्या पातळीवर जाऊन काम करण्याला सूक्ष्म रूपात जाऊन काम करणे, असे म्हणतात. देह न सोडता केवळ विचारांच्या पातळीवरसुद्धा स्वर्गाचे इंद्र होता येते, ही वेगळी गोष्ट! पण, ते अध्यात्म नव्हे. त्याला थापा किंवा वेड असे म्हणतात.
आम्ही नड्डाजींना म्हटले की, ‘मला आत्ता कळले की, आपले पंतप्रधान पत्रकार परिषद का घेत नाहीत. उगीच निरुपयोगी प्रश्नांना कोण उत्तरे देत बसणार?’
नड्डाजी गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, ‘देशात आता पत्रकारच उरणार नाहियेत.’ या वाक्यानंतर नड्डाजींनी अचानक फोन ठेवून दिला. त्यांच्या वाक्याने बिहारमधले सरकार पडले, तेव्हापासून आपण फार बोलतो आहोत, असा संशय जरी मनात आला तरी नड्डाजी लगेच तिथल्या तिथे फोन ठेवून देतात. आमने-सामने बोलत असतील तर पटकन स्वतःची जीभ चावतात!
आम्ही विचार करत राहिलो. तेवढ्यात नड्डाजींचा मेसेज आला – ‘सुरेंद्रजी धर्मेंद्रजी भी हैं!’
नरेंद्र झाले, सुरेंद्र झाले, योगेंद्र झाले, आता धर्मेंद्र? आम्हाला काही कळेना.
तेवढ्यात नड्डाजींचा ‘भारत का झंडा देखो’ असा गूढ मेसेज आला. आम्ही भारताचा झेंडा समोर घेऊन बसलो आणि विचार करत राहिलो. एके क्षणी आम्हाला झेंड्यावरचे धर्मचक्र दिसले. आपले पंतप्रधान आणि धर्मचक्र! अशोकाचे धम्मचक्र आता पुन्हा धर्मचक्र झाले आहे, हे चाणाक्ष वाचकांना कळलेच असेल.
त्या धर्मचक्राच्या चोवीस आऱ्या म्हणजे धर्मपालनाची चोवीस तत्त्वे. आपले पंतप्रधान आणि चोवीस तत्त्वे! आम्हाला हळूहळू स्लो-मोशनमध्ये सगळे उलगडत गेले.
आम्ही एक एक तत्त्व घेऊन मोदीजींचे जीवन बघायला लागलो, आणि नड्डाजी मोदीजींना ‘धर्मेंद्र’ का म्हणाले, हे लक्षात यायला लागले. आम्ही एक एक आरी म्हणजे एक एक तत्त्व घेत राहिलो आणि मोदीजींचे व्यक्तिमत्त्व आठवत राहिलो, तसतसे आम्हाला नड्डाजींचे म्हणणे उलगडत गेले.
पहिली आरी निस्वार्थ वृत्तीची. मोदीजींची मूळची राहणी अत्यंत साधी. ते संघ प्रचारक होते, तेव्हाची त्यांची राहणी बघा. अत्यंत साधी. पण आता पंतप्रधान झाल्यावर ते अत्यंत महागडे कपडे घालतात, गॉगल्स घालतात, महागातले महाग पेन्स वापरतात. देशासाठी त्यांनी आपल्याला स्वतःला अत्यंत प्रिय असलेल्या साध्या राहणीचा त्याग केलेला आहे. देशाचा नेता साधा दिसला, तर जगाला वाटेल की, भारत हा अजूनही गांधीजींचाच देश आहे. भारत आता ठोशाला ठोसा देणारा देश झाला आहे, हे सगळ्यांना कळावे म्हणून एक रोखठोक संदेश देणे आवश्यक होते. इंग्लंडच्या राजाला आणि जगाला एक संदेश देण्यासाठी गांधीजी फक्त कमरेचे नेसू नेसून जगले. आज मोदीजी त्याच कारणासाठी इंग्लंडच्या राजालाही परवडणार नाहीत, असे कपडे घालून आपले जीवन कंठत आहेत. काही दुष्ट लोक चेष्टा करत असतानाही त्याकडे ते लक्ष देत नाहीत. मोदीजींचा त्याग गांधीजींच्या त्यागापेक्षा खचितच मोठा आहे.
दुसरे तत्त्व आशेचे! पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात येऊन पडतील, असे सांगून मोदीजींनी भारतातल्या गोरगरीब आणि हताश जनतेला चांगलेच आशेला लावले. मोदीजींच्या आधी गोरगरीब जनतेच्या डोळ्यात एवढी चमक कोणीच आणली नव्हती.
तिसरे तत्त्व धैर्याचे. पंजाबमध्ये फिरोझपूरजवळ जेव्हा पंधरा-वीस शेतकऱ्यांनी पंतप्रधानांचा रस्ता अडवला, तेव्हा आपल्या चारशे लोकांच्या सशस्त्र ताफ्यासह पंतप्रधानांनी यशस्वी माघार घेण्याचे धैर्य दाखवले. आपल्याला लोक हसतील, हे काय त्यांना माहीत नव्हते का? तरीही त्यांनी माघार घेण्याचे धैर्य दाखवले. केवळ आपल्या भारतमातेसाठी! गांधीजी आणि नेहरू चिडलेल्या जनतेला सामोरे जात. त्यांच्या चिडलेल्या डोळ्यात आपले शांत डोळे घालून बघत. त्यांचे प्रश्न जाणून घेत. पण, हे झाले सामान्य प्रकारचे धैर्य! देशाचा विचार करून माघार घेण्यासाठी अत्यंत वेगळ्या प्रकारचे धैर्य असावे लागते.
चौथे तत्त्व प्रेमाचे. भारताच्या गोरगरीब जनतेवर मोदीजींचे आत्यंतिक प्रेम आहे. त्यामुळे आपले पंतप्रधान अंबानी आणि अडाणी यांच्यासारख्या थोर उद्योजकांवर प्रेम करतात. हे उद्योजक मोठे झाले की, गरिबांना नोकऱ्या मिळतील आणि देशातील गरिबी हटेल, हे त्यांना माहीत आहे. यालाच अर्थविचारामध्ये ‘लिबरलाझेशन’ असे म्हणतात, हे त्यांच्यावर टीका करणाऱ्या लिबरल लोकांना माहीत नसते. या लोकांचा अर्थविचार कम्युनिस्ट पद्धतीचा असल्याने असे होते. असो. काहीही असले तरी मोदीजी या लोकांच्या टीकेमुळे धर्माच्या मार्गावरून अजिबात हटत नाहीत.
पाचवे तत्त्व नैतिकता आणि सदाचरणाचे. मोदीजी फार मोठा नैतिक संयम दाखवून पंतप्रधानपदावर बसलेले आहेत. स्वस्ताई आली नाही, ‘अच्छे दिन’ आले नाहीत, दर वर्षी दोन कोटी नोकऱ्या तयार झाल्या नाहीत, शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल झाले नाही. मोदीजींनी पंतप्रधान बनताना दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यांच्या मनाला ही गोष्ट लागून राहिली नसेल का? एक तर ते संघाचे असूनही ‘फकीर आदमी’ आहेत. “मैं तो फकीर आदमी हूं जी, झोला उठाऊंगा और चल पडूंगा” असं ते म्हणाल्याचं आपण सगळ्यांनीच ऐकललं आहे. (मोदीजी जेव्हा ‘हम तो फकीर आदमी हैं जी’ असे म्हणाले, तेव्हा अनेक स्वयंसेवकांनी ‘हिंदू धर्मात वैराग्य आणि बैरागी या संकल्पना अस्तित्वात आहेत बरं का’, अशा तारा त्यांना केल्या होत्या. असो.) तर सांगत काय होतो की, आपल्या फकीर पंतप्रधानांना आपण दिलेले एकही आर्थिक आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे पंतप्रधानपदावर राहणे किती क्लेशदायक झाले असेल, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या जागी एखादा साधासुधा फकीर असता, तर खरंच राजीनामा देऊन केव्हाच निघून गेला असता. पण आपल्या पंतप्रधानांमध्ये एक अत्यंत गंभीर नैतिकता आहे आणि नैतिक संयमसुद्धा आहे! जुनी आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर नाहीत. त्यांच्याबद्दल एकही अक्षर न बोलता आता आपण पुढच्या आश्वासनांवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे, हे त्यांना कळते. ती पुढची आश्वासने पूर्ण नाही झाली, तर त्याच्याही पुढची आश्वासने देता येतात. त्यासाठी लगेच आपली झोळी उचलून चालू पडायची गरज नसते. तेवढी फखिरी आपल्या मोदीजींच्या अंगात नक्कीच आहे!
सहावे तत्त्व संयम आणि सहनशीलतेचे. आपल्या पंतप्रधानांवर कुणी विरोधकाने टीका केलीच, तर भाजपची ट्रोल आर्मी त्याच्यावर तूटून पडते. त्यांना ते अजिबात आवडत नाही. लोकशाहीसाठी हे चांगले नाही, हे का त्यांना कळत नाही? पण ट्रोल्सना आवरायच्या भानगडीत ते पडत नाहीत. आपल्या भक्तांच्या उतू चाललेल्या उत्साहावर पाणी ओतायला त्यांना नको वाटते. टीका सहन करता आली पाहिजे, हे लोकशाहीतले आणि अध्यात्मातलेसुद्धा पहिले तत्त्व आहे. आपल्यावर होणाऱ्या टीकेबद्दल सहनशीलता न दाखवून आपल्या पंतप्रधानांनी जगभरची टीका ओढवून घेतली आहे. पण, पंतप्रधान आपल्या ट्रोल आर्मीबाबत किती सहनशीलता दाखवत आहेत, हे कोणी लक्षात घेत नाही. लोकशाही वापरून आपण सत्तेत आलो आहोत, आता आश्वासने पूर्ण न करता सत्तेत राहायचे असेल, तर आपल्या भक्तांचा उन्मादच कामी येऊ शकतो, हे आपल्या पंतप्रधानांनी ओळखले आहे. म्हणूनच ते आपली सहनशक्ती लोकशाहीच्या तत्त्वांसाठी न वापरता आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी वापरत आहेत आणि ते योग्यच आहे. शेवटी लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. भक्त हेसुद्धा लोकांमधूनच येतात ना?
सातवे तत्त्व अंतिम ज्ञानाचे. सत्ता हीच अंतिम आहे, हे ज्ञान आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या वागणुकीतून नेहमीच दाखवून दिले आहे. सत्ता हीच अंतिम आहे, हे ज्ञान असल्यावर अजून कुठले ज्ञान अंतिम असते? तसेही आपले पंतप्रधान सुरेंद्रसुद्धा आहेत. मग ज्याला अध्यात्मात अंतिम ज्ञान म्हणतात, ते त्यांना अजून एकदा प्राप्त करून घेण्याची गरजच काय? पृथ्वीवर राज्य करत असताना ‘सत्ता हीच अंतिम असते’ हे अंतिम ज्ञान पुरेसे आहे.
आठवे तत्त्व ज्ञानाचे. आपले पंतप्रधान ज्ञानी आहेत आणि ते सतत ज्ञान वाटत असतात, हे सगळ्यांनीच पाहिले आहे. श्री मोदी यांचे ज्ञान प्रचंड आहे, असे अनेक परदेशी लोकांनीसुद्धा वेळोवेळी सांगितलेले आहे. यात मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, वर्ल्ड बँकेचे प्रेसिडेंट जिम याँग किम, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक लुईस रिचर्डसन आणि प्रसिद्ध मार्केटिंग तज्ज्ञ आणि लेखक फिलिप कोटलर या सगळ्यांचा समावेश आहे. पुढे, या सगळ्या बातम्या खोट्या आहेत, असे जगभरच्या ‘फॅक्ट चेक’ करणाऱ्या अनेक साईटसनी सांगितले. अशा खोट्या बातम्या ‘पेरल्या’ म्हणून जगभर खूपच हशा झाला. परंतु, शहाणे भक्त तोपर्यंत काय समजायचे ते समजून गेले आहेत. धूर आहे तेथे अग्नी आहे, हे न कळण्याएवढे भक्त खुळे नाहीत. तसं बघायला गेलं, तर गांधीजी, नेहरू, इंदिरा गांधी, इतकेच काय बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल, अशा कुणाबद्दलही अशा खोट्या का होईना कुठल्याच बातम्या कधीच आल्या नाहीत, यातच सगळे आले! खोट्या बातम्या हा काही ज्ञानाचा पुरावा असू शकत नाही, असे काही लोक म्हणत आहेत. पण त्याला काही अर्थ नाही. भक्त लोक काय समजायचे ते समजून चुकले आहेत. पवनचक्की फिरताना हवेतील बाष्प ‘सक’ (suck) करून घेता येईल, ही आयडिया आपल्या पंतप्रधानांनी एका जाहीर मुलाखतीत एका मोठ्या शास्त्रज्ञाला दिली. त्यावर भारतातील विरोधक शास्त्रज्ञांत मोठा हशा उठला, परंतु जगातील मोठे मोठे शास्त्रज्ञ गप्प राहून गालातल्या गालात हसले. भक्त लोकांना या सगळ्याचा अर्थ कळतो.
नववे तत्त्व सहानुभूतीचे. शेतकी कायद्यांच्या विरुद्धचे आंदोलन त्यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनाची अनुभूती प्राप्त झाल्यामुळे एक वर्षानंतर मागे घेतले. पण, तोपर्यंत सातशे शेतकरी मृत्यूमुखी पडले असे विरोधक म्हणत असतात. या विधानाला काही अर्थ नाही. एकतर मोदीजी ‘आंदोलन मागे घ्या’ असे स्पष्टपणे सांगत होते. शेतकऱ्यांच्या नीट लक्षात यावे म्हणून कडाक्याच्या थंडीमध्ये वॉटर कॅननमधून शेतकऱ्यांवर पाणी मारून मारून सांगत होते. कुणी ऐकलेच नाही. नंतर शेतकी कायद्यांचे फायदे समजावून सांगण्यात आपली तपस्या कमी पडली, हे त्यांना उत्तर प्रदेशची निवडणूक जवळ आल्यावर कळले. त्या क्षणी त्यांनी कायदे मागे घेतले. असे सगळे असताना शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी पंतप्रधानांवर कशी येऊ शकते? त्यांच्याकडे सहानुभूती नाही, असे कोण म्हणू शकते?
दहावे तत्त्व नम्रतेचे. आपल्या पंतप्रधानांनी गरिबातल्या गरीब जनतेच्या अन्नपाण्याची अत्यंत चांगली व्यवस्था केली आहे. प्रत्येक गरीब व्यक्तीला दर महिन्याला पाच किलो रेशनचे अन्न विनामोबदला मिळते. यासाठी लागणारे पैसे गरीब लोक ज्या वस्तू वापरतात, त्यांच्यावरील करांमधूनच मोदीजी मिळवतात. म्हणजे, लोक जो काही खर्च करतात, तेल आणतात, साबण आणतात, कपडे आणतात, या सर्वांवर जीएसटी लावला जातो. शिवाय पेट्रोल-डिझेलच्या किमती चढ्या ठेवल्या की, एकूण महागाई वाढते. गरिबाचा पैसा कराद्वारे सरकारच्या खिशात येतो. हा सगळा पैसा मोदीजी गरिबाला फुकटमध्ये अन्न देण्यासाठी वापरतात.
निवडणुका आल्या की, मोदीजी म्हणतात ‘आपने मोदी का नमक खाया हैं, आपको वोट मोदीकोही देना पड़ेगा’. ‘मी आपल्याकडून कररूपाने घेतलेल्या पैशानेच तुम्हाला खाऊ घालतो आहे’, असे मोदीजी म्हणाले असते, तर ती नम्रता झाली असती, असे काही वाचकांना वाटेल, पण तसे नाहिये. तसे सांगितले तर लोक बाकी कुणाला तरी मतदान करतील आणि विरोधक निवडून आले, तर देशाचे नुकसान होईल, म्हणून मोदीजी अत्यंत नम्रपणे आत्मस्तुतीचा दोष स्वीकारतात. आपण आत्मस्तुती करतो आहोत, याबद्दल कुणाच्याही मनात कसलाही संशय राहू नये, म्हणून जनतेच्या पैशाने जनतेला दिलेल्या रेशनच्या पिशव्यांवर मोदीजी आपलं छायाचित्रसुद्धा छापतात. विरोधकांना ही ‘सुपरफाईन’ नम्रता कधीच कळणार नाही.
अकरावे तत्त्व न्यायाचे. सर्वोच्च न्यायालयातल्या काही न्यायमूर्तींना मोदीजींनी संसदेचे सदस्यत्व वगैरे बहाल केले आहे. न्यायमूर्तींनी आपल्यासाठी केलेल्या कामाचे बक्षीस त्यांना मिळालेच पाहिजे, असा मोदीजींचा आग्रह असतो. न्यायाबद्दलची अशी चाड स्वतंत्र भारताच्या इतिहासात पूर्वी फारशी कधी दिसून आली नव्हती.
बारावे तत्त्व क्षमेचे. मोदीजींच्या काळात अनेक लोक भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून भारत सोडून पळून गेले. यात मेहुल चौकसी, नीरव मोदी, विजय मल्ल्या वगैरे नावांचा समावेश आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. गरिबांना नोकऱ्या द्यायच्या असतील, तर श्रीमंतांच्या हातात पैसा खेळला पाहिजे. त्यांना धंदापाणी करण्यासाठी कर्ज मिळालेच पाहिजे. पण गंमत अशी आहे की, धंदे बुडू शकतात. धंदे बुडाले की, कर्ज बुडतात. लोकक्षोभ होतो. सगळेच कर्ज बुडवे तुरुंगात जायला लागले, तर बँकांकडून कर्ज कोण घेणार? धंदा कोण करणार? गरिबांना नोकऱ्या कोण देणार? या सगळ्यामुळे या कर्ज बुडवणाऱ्या लोकांना क्षमा करून पळून जाऊ द्यावे लागते. असे केल्याने आर्थिक विकास तर होतोच, पण क्षमेचे तत्त्वसुद्धा पाळले जाते.
तेरावे तत्त्व दयाळू वृत्तीचे. भ्रष्ट नेत्यांवर मोदीजी ईडी वगैरे खात्यांमार्फत कारवाई करतात. हे नेते घाबरून भाजपमध्ये आले की, त्यांच्यावर दया दाखवून त्यांच्या फायली बंद करून ठेवतात. ही दयाळू वृत्ती नाही, तर दुसरे काय आहे? दयेचा असा घाऊक वापर पूर्वी कुणी केल्याचे माहीत असल्यास आम्हाला दाखवून द्यावे.
चौदावे तत्त्व करुणेचे. मोदीजींना स्वतःविषयी नेहमीच करुणा वाटत आली आहे. अमेरिकेत ‘फेसबुक’ने प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ठेवला होता. त्या वेळी आपल्या मातोश्री हीराबेन यांनी उपसलेले श्रम आठवून मोदीजींच्या डोळ्यात पाणी आले होते. पण, हाच न्याय त्यांनी राहुल गांधी यांच्या आईविषयी लावला नाही. सोनिया गांधी यांच्याबद्दल ‘काँग्रेस की किस विधवा को भ्रष्टाचार का पैसा मिला?’ हा प्रश्न त्यांनी विचारला. त्या वेळी राहुल गांधी यांना आपल्या मातेला वैध्यव्याचे जे दुःख उचलावे लागले, त्याबद्दल काय वाटत असेल, याबाबतचा विचार अर्थातच मोदीजींच्या मनात आलाच असणार. पण राजकारण वेगळे आणि करुणा वेगळी! शिवाय माणसाने एकदा स्वतःविषयी करुणा ठेवली की, ते पुरेसे होत नाही का?
मोदीजींनी शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली नाही. ना लॉकडाउनमध्ये पायी पायी घरी जाताना मृत झालेल्या गरिबांना वाहिली. ना नोटबंदीमध्ये बँकांसमोरच्या रांगेत उभे राहून मृत झालेल्या नागरिकांना वाहिली. येथेही राजकारण वेगळे आणि करुणा वेगळी, हे भान पंतप्रधानांना आहे, हे दिसून येते.
पंधरावे तत्त्व शांततेचे. आपल्याच काय पण जगातल्या कुठल्याच देशात त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली नाही. गेल्या नऊ वर्षात त्यांनी एकसुद्धा पत्रकार परिषद घेतलेली नाही. पत्रकारांसमोर त्यांनी एकदम शांतता बाळगेलेली आहे. पत्रकार परिषद घ्यायला हिंमत लागते, असे लोक म्हणतात. पण एकसुद्धा पत्रकार परिषद न घ्यायला त्याहूनही मोठी हिंमत लागते, हे कुणाला दिसत नाही.
सोळावे तत्त्व चांगुलपणाचे. आपली हांजी हांजी करणाऱ्या ‘गोदी मीडिया’शी आणि पत्रकारांशी मोदीजी नेहमीच चांगले वागले आहेत. वामपंथी पत्रकार आणि इतर ‘न्यूट्रल’ पत्रकार लोक जर ‘गोदी मीडिया’प्रमाणे मोदीजींचे कौतुक करायला लागले, तर मोदीजी त्यांच्याशीसुद्धा चांगलेच वागतील. आपल्या मोदीजींमध्ये आप-परभाव नावालासुद्धा नाही.
सतरावे तत्त्व श्रद्धेचे. देव आणि लोकशाहीवर मोदीजींची श्रद्धा आहे, परंतु काँग्रेसने लोकशाहीचा नाश केलेला असल्याने काही बाबतीत हुकूमशाही तत्त्वे त्यांना अंगिकारावी लागतात. पण आता विरोधक परत एकदा निवडून येऊन लोकशाहीचा सत्यानाश करणार असे चित्र दिसू लागले, तर मात्र लोकशाहीवरील आपली श्रद्धा त्यांना लोकशाहीच्याच भल्यासाठी पूर्णपणे आवरती घ्यावी लागेल.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
अठरावे तत्त्व सौम्यता आणि कोमलतेचे. मोदीजी भाषण देताना अनेक वेळा रडलेले आहेत. त्यातून त्यांचे कोमल हृदय वेळोवेळी भारतीयांना दिसून आलेले आहे. सैनिक शहीद झाल्यावर, आपल्या आईचे कष्ट आठवल्यावर मोदीजी रडलेले आहेत. राजकारण वेगळे आणि हृदयाची कोमलता वेगळी!
एकोणिसावे तत्त्व आत्म-नियंत्रणाचे. आत्मनियंत्रणाचे महत्त्व मोदीजी आपल्या विरोधकांना विविध मार्गांनी पटवून देत असतात. ईडी, सीबीआय वगैरे खात्यांचा मनसोक्त वापर मोदीजी या कारणासाठी करतात. अगदी आपल्या स्वतःवरचे नियंत्रण संपूर्णपणे सोडून देऊन करतात! विरोधकांना आत्मनियंत्रणात आणल्याशिवाय लोकशाहीचे हित साधले जाणार नाही, हे त्यांना पूर्णपणे माहीत आहे. भारत देशामध्ये आधी हुकूमशाही आणल्याशिवाय लोकशाही अजिबात रुजणार नाही, हे त्यांना माहिती आहे.
विसावे तत्त्व नि:स्वार्थ वृत्तीचे. मोदीजींच्या नि:स्वार्थ वृत्तीविषयी वाद असण्याचे कारणच नाही. त्यांनी आपल्या मंत्र्यांना कसलीच मोकळीक ठेवलेली नाही. सगळ्या फायली पंतप्रधान कार्यालयातूनच ‘क्लिअर’ करण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. सत्तेचे केंद्रीकरण करण्यात त्यांची नि:स्वार्थ वृत्ती दिसून येते. केंद्रीकरणामुळे सल्ला-मसलत बंद पडते, एककल्ली कारभार होतो आणि देशाचे नुकसान होते, हे सर्व धोके मोदीजी सत्ता आपल्या एकट्याच्या हातात राहावी म्हणून स्वीकारतात. कारण विकेंद्रीकरण केले तर इतर आपल्याच पक्षातील इतर नेते मोठे होतात आणि त्यांच्या मनात सत्तेच्या आसुरी इच्छा तयार होतात. त्यांना त्या आसुरी इच्छांपासून वाचवण्यासाठी मोदीजींनी सत्तेचे केंद्रीकरण केले आहे. लोक त्यांना कितीही स्वार्थी म्हणोत, पण नि:स्वार्थी वृत्तीने सत्तेचे केंद्रीकरण केल्यामुळे मोदीजी अगदी खुश आहेत, यात कुणालाही कसलीही शंका असायचे काहीही कारण नाही.
एकविसावे तत्त्व बलिदानाचे. मोदीजींना आपल्या स्वतःच्या मनाविरुद्ध फार वागावे लागते. लोकशाहीवादी असून हुकूमशाहीची तत्त्वे राबवावी लागतात. स्वतः नि:स्वार्थी असूनसुद्धा त्यांना स्वार्थाच्या चौकटीत राहून काम करावे लागते. देशासाठी असे वागणे, हे एक प्रकारचे बलिदानच आहे.
बाविसावे तत्त्व सहसंवेदनेचे. राहुल गांधी यांना निवडणूक हरल्यावर कसे होत असेल, याची नक्की जाणीव मोदीजींना आहे. त्यामुळे काहीही झाले तरी आपण राहुल गांधी यांच्या परिस्थितीमध्ये जायचे नाही, असे मोदीजींनी ठरवले आहे. केवळ यासाठी देशभरातील आमदार-खासदारांना ते ईडी वगैरे माध्यमांद्वारे घाबरवत असतात. त्यायोगे विरोधकांची सरकारे पाडतात. सहसंवेदनेच्या साहाय्याने आपला स्वार्थ अत्यंत नि:स्वार्थीपणे साधण्याची कला मोदीजींना प्राप्त झाली आहे.
तेविसावे तत्त्व प्रामाणिकपणाचे. ते स्वतःसाठी एकही पैसा घेत नाहीत. गरिबांच्या कल्याणासाठी श्रीमंताच्या हातात पैसा देण्याच्या मोदीजींच्या आर्थिक नीतीवर अनेक मोठे मोठे उद्योगपती खुश आहेत. त्यामुळे ते भाजपला प्रचंड पैसा देतात. या पैशामुळे मोदीजींची सत्तेवरची पकड मजबूत होत जाते. याला अप्रामाणिकपणा नक्कीच म्हणता येणार नाही. जी काही आर्थिक नीती आहे, ती मोदीजी अत्यंत प्रामाणिकपणे राबवत असतात, केवळ गरिबांच्या भल्यासाठी! त्यातून जर काही राजकीय फायदा होत असेल, तर तो निव्वळ योगायोग आहे, असेच म्हणावे लागेल.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
शेवटचे तत्त्व सत्यता आणि सत्याचरणाचे. मोदीजी अत्यंत सत्यवक्ते आहेत, तरीही दुष्ट लोक त्यांना ‘फेकू’ म्हणतात. मोदीजी जे बोलतात त्यात काही खोटे आहे, असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, राणा प्रताप यांच्या चेतक या घोड्याची आई गुजराती होती, असे मोदीजी म्हणाले होते. दुष्ट लोक यावर भयंकर हसले. पण थोडा विचार केला तर एक गंमत आपल्या लक्षात येईल. या हसणाऱ्या लोकांपैकी कुणालाही चेतकची आई पंजाबी होती किंवा बंगाली होती, हे सिद्ध करता आले आहे का? तीच गोष्ट मोदीजी वडनगर स्टेशनवर चहा विकत होते, या प्रकरणाची. मोदीजी खोटे बोलत आहेत, असे लोक म्हणाले, कारण मोदीजी लहान असताना वडनगर स्टेशन अस्तित्वातच नव्हते. पण त्या काळी वडनगर हा रेल्वेचा रिक्वेस्ट स्टॉप नव्हता, हे आता कुणाला सिद्ध करता येणार आहे का?
मोदीजी आणि सत्य यांचे अतूट नाते आहे. हा विषय असा एका पॅरेग्राफमध्ये संपणारा नाहीये. समुद्राची शाई आणि देवदार वृक्षांचे बोरू करून हिमालयाच्या धवल अंगांगांच्या कागदावर लिहिण्याचा हा विषय आहे.
वरील पॅरा लिहून झाल्यावर आम्ही तो कट-पेस्ट केला आणि नड्डाजींना मेसेज केला. थोड्या वेळाने त्यांचा रिप्लाय आला – ‘ग्रेट आयडिया!’ त्यांचा पुढचा मेसेज आला – ‘कॉस्ट कितना आएगा?’
त्यावर काही उत्तर देण्याची आमची हिंमत झाली नाही. नड्डाजींच्या चेहऱ्यावर भक्तीचे तेज किती विलसत असते, हे सगळ्या जगाला माहीत आहे. त्यांच्या भक्तीला काही मर्यादा असत्या, तर थोडे बरे झाले असते, असे कित्येकदा आम्हाला वाटून जाते, पण काय करणार, भक्ती म्हणजे भक्ती असते!
भक्ती म्हणजे काय असते, हे नीतीशजींना कळावे म्हणून आम्ही हा सगळा प्रकार त्यांना कळवला. त्यावर त्यांनी जवाहरलाल नेहरू यांचे एक वाक्य आम्हाला पाठवले -
‘There is nothing more horrifying than stupidity in action.’
असो. एक दिवस पटण्याला जाऊन नीतीशजींना हा संपूर्ण लेख वाचून दाखवला पाहिजे, असे आम्हाला वाटू लागले आहे. त्याशिवाय त्यांचा मोदीविरोध मावळायचा नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment