गोपराजू रामचंद्र राव उर्फ गोरा यांची ईश्वरावर श्रद्धा नव्हती. त्यामुळे गांधी वर्तुळात गोरा काही प्रमाणात अस्वीकारार्ह होते…
दिवाळी २०२२ - लेख
किशोरलाल मश्रूवाला
  • गांधीजी, गोरा आणि ‘An atheist with Gandhi’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 19 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख गांधीजी Gandhiji गोरा Gora गोपराजू रामचंद्र राव Gopraju Ramchandra Rao अ‍ॅन अथेइस्ट विथ गांधी An atheist with Gandhi आस्तिक Theist नास्तिक Atheist ईश्वर God आत्मा Soul

‘An atheist with Gandhi’ (१९५१) हे श्री गोरा यांचे इंग्रजीतील पुस्तक. गोरा म्हणजे गोप राजू रामचंद्र राव (जन्म - १९०२ आणि मृत्यू - जुलै १९७५). त्यांच्या आद्याक्षरावरून गोरा हे नाव त्यांना पडलेले आहे. गोरा हे कर्मठ नास्तिक आणि देशभक्त गांधीवादी कार्यकर्ते. त्यांचे कार्यक्षेत्र आंध्र प्रदेश. गांधी आणि गोरा यांच्या आस्तिक आणि नास्तिक चर्चेच्या आठवणींचे हे पुस्तक. गोरांची शैली अतिशय चित्रमय आहे. दोघांमधील चर्चा वाढतात, तसेच संबंधसुद्धा खूप जवळचे होत जातात. चर्चेतून मुद्दा पुढे जातो, तसे एकमेकांना समजावून घेणेही वाढते.

गोरांच्या मुलीचा आंतरजातीय विवाह आश्रमातच करायचा, असे गांधी प्रेमळ हक्काने सांगतात. तेव्हा “तुमच्या मंगलाष्टकात ईश्वर आम्हाला कसा चालणार?” या गोरांच्या प्रश्नावर गांधी मंगलाष्टकातून ‘ईश्वर’ गाळून ‘सत्य’ शब्द घालतात. तुमच्या नास्तिकतावादावरील पुस्तकाला प्रस्तावना मी लिहिणार, असे गांधी गोरांना सांगतात. चर्चेचा महिना ठरतो, त्यापूर्वीच गांधींचा खून होतो. दोघांमधील सबंधाचे विलक्षण प्रसंग या पुस्तकात आहेत. आज ६७ वर्षांनंतरही हे पुस्तक महत्त्वाचे आहे. अतिशय विलक्षण आठवणी आणि विचाराला चालना देणारे पुस्तक आहे.

या पुस्तकाला त्या काळातील गांधीवादी विचारवंत किशोरलाल मश्रूवाला यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. तिचा हा मराठी अनुवाद केला आहे कथाकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे यांनी…

.................................................................................................................................................................

श्री गोपराजू रामचंद्र राव (यापुढे आपण त्यांना ‘ गोरा’ या त्यांच्या संक्षिप्त टोपणनावाने संबोधू. त्यांच्या नावांच्या पहिल्या शब्दांवरून त्यांना हे नाव पडलेले आहे आणि त्यांचे निकटवर्ती त्यांना याच नावाने ओळखतात) हे आंध्रमधील जबाबदार कार्यकर्ते. हरिजनांशी एकरूप होऊन त्यांच्या प्रश्नावर काम करणारी गोरांसारखी फार मोजकी सक्षम माणसे आहेत. ते सनातनी ब्राह्मण कुटुंबात वाढले. त्यांच्या एकत्र कुटुंबात वयोवृद्ध माता-पिता, भाऊ, बहिणी आणि त्यांची पत्नी व मुले आहेत. ते कधीच श्रीमंत नव्हते. ईश्वर, कर्म आणि इतर हिंदू तत्त्वांबद्दलच्या त्यांच्या सुधारकी मतांमुळे ते अधिक गरीब बनले. आपल्या तत्त्वांमुळे त्यांना कॉलेजमधील प्राध्यापकीला मुकावे लागले. आपल्या मुलीचे हरिजन तरुणाशी लग्न लावण्याचा असाधारण निर्णय त्यांनी घेतला. अनेक नातेवाईक, ब्राह्मण आणि सवर्ण हिंदू समाजातील मित्रांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. गोरा यांची सुधारकी मते आणि त्यांची समाजसुधारणेची तीव्र इच्छा त्यांच्या माता-पित्यांना, बहिणींना आणि सासरच्या मंडळींना आवडली नसल्याने त्यांच्यापैकी काही जणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. मात्र गोरा त्यांच्यावर प्रेम करत, त्यांच्या मर्यादा समजून घेत. ते त्यांची पत्नी आणि मुले कुठल्याही संतापाशिवाय अतिशय संयमाने हा बहिष्कार सहन करत. यामुळे संपूर्ण बदल झालेला नसला तरी काही जणांनी त्यांच्याशी परत संबंध जुळवले.

एक महत्त्वाचा मुद्दा सोडून गोरा यांचा गांधीजींचे तत्त्वज्ञान आणि रचनात्मक कार्य यावर विश्वास आहे. गांधीजींच्या ईश्वरी श्रद्धेस आणि ईश्वरावरील पूर्ण श्रद्धेवर त्यांची सहमती नाही. गोरा यांची ईश्वरावर श्रद्धा नाहीच, त्याचबरोबर या ईश्वरी श्रद्धेच्या विरोधी विचारांचा प्रसार करण्याची तीव्र इच्छा ते प्रदर्शित करतात. त्यामुळे गांधी वर्तुळात गोरा हे काही प्रमाणात अस्वीकारार्ह आहेत.

१९३०मध्ये गोरा यांनी गांधीजींना संपर्क करण्याचा पहिला प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न नास्तिकतावादाचे माध्यम वापरून केला होता. गांधीजींना ते रुचले नाही आणि त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला नाही. गोरा यांना मुलाखतीसाठी वेळ देण्यास गांधीजी दीर्घकाळपर्यंत तयार नव्हते. गोरा स्वत:ला नास्तिक म्हणत होते, मात्र ते तरुण, तळमळीचे असल्याने इतर सर्व तरुणांप्रमाणे नेतृत्वपूजक होते. त्यांना गांधीजींबद्दल अपार प्रेम होते. जर त्यांना ईश्वराबद्दल प्रेम असते, तर असं म्हणता आलं असतं की, देवानंतर त्यांचे गांधीजींवर प्रेम होते. मात्र त्यांनी देवालाच रद्द केल्याने हे वाक्य त्यांच्यासाठी वापरता येणार नाही. असं म्हणता येईल का, ‘काहीही नाही’च्या नंतर त्यांचे गांधीजींवर प्रेम होते? कदाचित नाही. त्यांनी देवाला रद्द केले असले तरीही त्यांनी देवाचे स्थान नष्ट केलेले नव्हते. त्या सिंहासनावर गोरा यांनी मानवी मुक्त मन:शक्तीची तत्त्वप्रणाली आणि सामाजिक नीतीमत्तेची तत्वे यांची स्थापना केली. नीतीशास्त्राची तत्त्वे आणि मुक्त मन:शक्तीची तत्त्वप्रणाली, यासाठी जगात ते कशाचाही, अगदी गांधीजींचाही त्याग करू शकतात. प्रथम स्वत:च्या मानलेल्या तत्त्वांनंतर,  त्या काळातील बहुतेक तरुण आणि निस्सीम नेतृत्वपूजकांसारखेच त्यांचे गांधीप्रेम होते.

गांधीजींच्या निकट संपर्कात जाण्यासाठी प्रोत्साहनाचा अभाव असतानाही गोरा यांनी प्रयत्न सोडला नाही. सरतेशेवटी चौदा वर्षांनंतर प्रतीक्षेचा काळ संपला आणि नोव्हेंबर १९४४मध्ये गोरा आपल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाले. गांधीजींचे निधन १९४८मध्ये झाले. हे पुस्तक म्हणजे चार वर्षांपेक्षा कमी अवधीमधील गांधीजींसोबतचा व्यक्तिगत संपर्क आणि पत्रव्यवहाराची कहाणी आहे. मात्र कालावधी कमी असला तरीही अभ्यास आणि गोष्ट म्हणून अतिशय रंजक आहे. दोघांमधील संबंध विलक्षण रूपांतरणाच्या टप्प्यावर असतानाच्या कालावधीचे हे वर्णन आहे. अपरिचित आणि काहीसे नकोसे वाटणारे गोरा, गांधीजींचे निकटवर्तीय होऊन त्यांच्या ‘कुटुंबाचे’ प्रिय सदस्य कसे बनले आणि गोरांच्या नजरेतील महान राष्ट्रीय नेते गांधीजींचे  रूपांतर व्यक्तिगत संबंधात होऊन ते उच्च नैतिक पातळीचे गुरू कसे बनले आणि आदर अधिकाधिक वृद्धिंगत कसा झाला, या संबंधी हे पुस्तक आहे. सर्व मिशनऱ्यांप्रमाणे गांधीजींना आपल्या विचाराचे बनवावे, ही गोरा यांची तळमळ होती. ही एका माणसाची उत्कंठा वाढवणारी अपूर्व गोष्ट आहे, जो पुत्रत्वाचे नाते असलेला एकनिष्ठ शिष्य आहे, आणि त्याला आपल्या आदरणीय पित्यासमान गुरूमध्ये बदल घडवून त्यास आपला शिष्य करायचे आहे! असे प्रसंग पूर्णपणे अज्ञात नाहीत, पण दुर्मीळ आहेत.

पुस्तकाचा मोठा भाग हा लेखक आणि गांधीजी यांच्यामधील आस्तिक आणि नास्तिक यातील चर्चेनेच व्यापला आहे. या प्रस्तावनेत मी माझ्या पद्धतीने या विषयावर चर्चा करावी, अशी गोरा यांनी इच्छा व्यक्त केली. मी पुढील भागात ती केलेली आहे. माझ्या मते ही मांडणी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायची असेल तर वाचकांनी मुख्य पुस्तक वाचून झाल्यावर ती वाचावी.

२.

गांधीजींना पहिल्याच बैठकीत आढळले की, गोरा स्वत:ला नास्तिक समजत असले तरीही ते अतिशय प्रामाणिक आणि गंभीर प्रवृतीचे गृहस्थ आहेत. त्यांना ‘देवाचा माणूस’ म्हणता आलं असतं. मात्र त्यांना ‘ईश्वर न मानणारा’ म्हटल्याची चीड येत असे. ईश्वर न मानणे आणि नास्तिकवाद यामध्ये फरक करण्याचा आग्रह ते धरत.

हे गोंधळाचे आणि आत्मविसंगत वाटते. या विसंगतीवर मात करण्याच्या प्रयत्नात गोरा म्हणतात, ‘‘ईश्वरविहीनता हे नकारात्मक आहे . ते फक्त ईश्वराच्या अस्तित्वाला नकार देते. नास्तिकवाद सकारात्मक आहे... याचा अर्थ आत्मविश्वास आणि मुक्त मन:शक्ती.’’ मला असं वाटतं की, गोरा यांनी या शब्दाला अर्थप्रदान केलेला असून त्याच्या रचनेवरून तो सहज समजू शकत नाही.

सहसा लोक जे ईश्वराबद्दल किंवा ईश्वरासंबंधीच्या विषयाबद्दल बोलतात, त्यास गूढ समजले जाते. याचे कारण त्यामध्ये रहस्यमय शब्द वापरले जातात. सर्वसाधारण विज्ञानामध्ये लोक बोलताना नेमके किंवा योग्य व्याख्येने तयार झालेले किंवा नेमका अर्थ असलेले शब्द वापरतात. ईश्वर  या शब्दासारखे नव्हे.

गोरा यांनी स्वत:ची ओळख करून देताना गांधीजींना त्यांना अभिप्रेत असलेला ईश्वर या शब्दाचा नेमका अर्थ विचारला होता. त्या वेळी गांधीजींनी लिहिले होते, ‘‘ईश्वर हा मानवी आकलनाच्या पलीकडला आहे.’’ उपनिषदातील प्रसिद्ध वचन ‘नेति नेति’ (हे नाही, हे नाही- सर्व ज्ञानाच्या पलिकडले) किंवा ‘यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह’(जेथून मनासोबत शब्द माघारी फिरतात)नुसार त्यांचे उत्तर होते. मग सर्वसाधारणपणे आपल्याला अशी अपेक्षा करता येईल की, ईश्वर मानवी (काही प्रमाणात मनोरचनेच्या) आकलनापलीकडील असेल तर त्यासंबंधी साहित्य अत्यल्प असेल. ऋषीमुनी सहजपणे सांगतील, ‘‘ज्याचे मी आकलन करून अभिव्यक्त करू शकत नाही, असे अस्तित्व मला जाणवते. त्याला मी ईश्वर हे नाव दिले आहे. त्याच्यापासून मी स्वत:ला अलग करू शकत नाही, असे मला वाटते. पण यापेक्षा अधिक मी सांगू शकत नाही.’’ मात्र लेखक आणि ऋषीमुनी सहसा असं करत नाहीत.

वरील स्थिती मान्य करूनही माणसाला समजेल अशा पद्धतींमध्ये ईश्वर सकारात्मक पद्धतीने समजवण्याचे प्रयत्न झाले. अशा प्रकारे ईश्वराला सत्, चित, आनंद, सत्य, शिव, सुंदर, प्रेम, स्वामी, पिता, माता, न्यायाधीश, फळाची अपेक्षा पूर्ण करणारा, अमर्त्य, सनातन, अनंत, दयाघन, इच्छा, शक्ती, कृती, प्रत्येक अस्तित्वाचा अंतिम ‘मी’ आणि अजून खूप नावांनी संबोधले जाऊ लागले. त्याशिवाय प्रत्येक गुरू एक किंवा दोन गुणांना अधिक प्राधान्य देऊन त्यांचे विश्लेषण करत. याचा परिणाम असा झाला की, हा अनाकलनीय ईश्वर आकलनीय संकल्पनांच्या कक्षांमध्ये बंदिस्त झाला आणि अमर्याद आणि अव्यक्त ईश्वर त्याच्या पाठिराख्यांच्या मनात मर्यादित, ठोस आणि पुरेसा समजेल, अशा अवस्थेत स्थानापन्न झाला. गुरूंच्या संख्येच्या प्रमाणात ईश्वराची अनेक रूपे आणि त्याचे मनुष्य आणि विश्वाशी नाते यांच्या सिद्धान्तांची निर्मिती झाली. यातूनच पुढे जीवन जगण्याचे योग्य मार्ग आणि जगाकडे बघण्याचे दृष्टीकोन यांच्या विविध पद्धती तयार झाल्या आणि विविध पंथांनी युक्त असे लेबल लावलेले धर्म निर्माण झाले.

धर्माकडून अपेक्षित असलेले, लोकांना एकत्र आणून बांधून ठेवण्याचे कार्य करण्यात हे लेबल लावलेले धर्म अयशस्वी झाले आहेत, या गोरांच्या मताशी मी सहमत आहे. ही लेबले नष्ट कशी होतील? कुठल्याही धर्माच्या संस्थापकाला आपला धर्म काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित ठेवायचा नव्हता. त्यांनी संपूर्ण जगाला उद्देशून संदेश दिला होता. मात्र त्यांच्यापैकी प्रत्येक जण वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या एक किंवा अधिक लेबलांचे चिन्ह बनले.

नास्तिकवाद ही याच्या विरोधातील प्रतिक्रिया आहे. हीसुद्धा विरोधी बाजूची, मात्र तीच प्रक्रिया आहे. यामध्येसुद्धा एक किंवा अधिक लेबलांचे संप्रदाय तयार होत आहेत आणि ते इतर कोणत्याही पूर्वीच्या पंथांसारखे तेवढेच चांगले किंवा वाईट असतील.

आपण धर्मांतरे करू शकतो, लेबले बदलू शकतो. काही जुनी लेबले जातात आणि नवीन तयार होतात. मात्र आपण प्रत्येक जण स्वीकारेल असा लेबल नसलेला धर्म शोधू शकत नाही. त्यासाठी आपली मने अजून खूप लहान आहेत. जर आपण शहाणे असू तर देव किंवा आत्मा समजवण्याच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न न करता, लेबल नसलेला धर्म शोधण्याच्या उद्देशाने एकत्र आलो, तर काही मर्यादेपर्यंत आपण यशस्वी होऊ शकतो.

आता नास्तिकवादाकडे परत येऊ. बुद्धिप्रामाण्यवादी आणि वैज्ञानिकांना (किंवा जे स्वत:ला समजतात ते) वरील शिकवणुकीमध्ये विसंगती आढळून येते आणि त्यातून पंथीय मतभेद निर्माण होतात. ‘काहीतरी अस्तित्वात आहे’ असे अधिकाराने ऋषीमुनी बोलतात, पण त्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही. तो प्रत्येक घटक आणि ऊर्जेचा प्रत्येक प्रकार अतिशय बारकाईने तपासतो, मात्र ईश्वराचे अस्तित्व त्याला सापडत नाही. तो ज्ञात असलेल्या सर्व वस्तूंमधील प्रत्येक घटक वेगळा करून तपासतो आणि सरतेशेवटी निष्कर्षाला येतो की, ‘ईश्वर कुठेच नाही’. मात्र दैनंदिन जीवनातील चालीरिती आणि शिष्टाचारातून ‘त्याला’ टाळू शकत नाही. म्हणूनच तो ऋषीमुनींचे वैयक्तिक मत ग्राह्य मानत नाही. सर्वांत चांगला नकार म्हणजे भ्रम, तर सर्वांत वाईट नकार म्हणजे गुप्त हेतूंच्या पूर्तीसाठी जाणीवपूर्वक खोटा शोध, असे तो म्हणतो. तो स्वत:ला नास्तिक म्हणून जाहीर करतो. धार्मिक आणि सामाजिक झगडे, चुकीच्या चालीरिती, प्रथा आणि विचारपद्धती, सामाजिक कर्तव्याबाबतची स्पष्ट बेपर्वाई, मानसिक शैथिल्य इत्यादी सर्व ईश्वर या शब्दाने निर्माण केले असल्याने ईश्वर अस्तित्वात नाही, हे लोकांना स्पष्ट करून सांगून हा मोठा भ्रम कायमचा नष्ट केल्यावर हे जुनाट गुंतागुंतीचे प्रश्न सुटतील, असे तो मानतो. त्यांचा संदेश आहे- ‘‘ईश्वराला विसरा. तुम्ही त्याच्या बुद्धिबळाच्या पटावरील प्यादी आहात, तो एका चौकोनातून दुसऱ्या चौकोनात तुम्हाला नेत असतो- ज्याने मानवी जीवनाचा प्रवाह आणि  विश्वाची योजना केली, ज्यामध्ये तुम्हीसुद्धा आहात, असे कोणीतरी गूढ बुद्धिमान अस्तित्व आहे, हे सर्व विसरून जा. असं करा आणि तुम्हाला जाणवेल की, तुम्ही एक मुक्त व्यक्ती आहात, तुमच्या नियतीचे तुम्ही स्वामी आहात, सर्व सामाजिक आणि धार्मिक चालिरिती, जीवनशैली आणि योग्य अयोग्यतेच्या कल्पना या तुमच्या आमच्या सारख्याच माणसांनी आपल्या योग्य किंवा अयोग्य कुवतीप्रमाणे बनवलेल्या आहेत.’’

माझ्या दृष्टीने आपले गोरा आणि ईश्वराच्या बाजूने बोलणारे एकाच पातळीवर आहेत. आस्तिकाच्या मानसिक मर्यादांमुळे तो नेती (abstract) म्हणून ईश्वराचे आकलन करू शकत नाही आणि परत परत ईश्वराच्या नावे इति म्हणजे मर्यादित ठोस कल्पनांवर येऊन तो स्थिर होतो. ईश्वर मानवी आकलनाच्या पलीकडला आहे, हे जाहीर करूनही गांधीजी ‘ईश्वर म्हणजे सत्य’ या आकलनीय, इति (मर्यादित) कल्पनेवर स्थिर होतात. नंतर अधिक चांगली आणि नेमकी अभिव्यक्ती म्हणून आपले विधान बदलून ‘सत्य हाच ईश्वर’ हे विधान करतात. या बदलामुळे अधार्मिक, नास्तिक आणि अज्ञेयवादी समाधान पावले असे वाटते. यामुळे गांधीजींना या सर्वांना त्यांच्या सर्वधर्माच्या परिषदेत समान स्थान देण्याची परवानगी मिळाली. जर नास्तिकांनी सत्य हेच सर्वश्रेष्ठ मानले, तर गांधीजींच्या सर्वधर्म समभावामध्ये त्यांना आस्तिकांसोबत समान स्थान आहे. मात्र ईश्वर म्हणजे सत्य किंवा सत्य म्हणजे ईश्वर या दोन्ही विधानांमध्ये सत्याची निवड करण्याचे कारण त्यात अधिक सर्वसमावेशकता आहे.

म्हणून जेव्हा देव म्हणजे प्रेम, आनंद आणि अजून काही म्हणता, तेव्हा माणसाकडे सत्य, प्रेम, पावित्र्य, आनंद इत्यादीबद्दल निश्चित आणि सर्वमान्य स्वीकारार्ह कल्पना असतात आणि जेव्हा तो या कल्पनांबद्दल विचार करतो, तेव्हा नेहमीच त्याच्या मनात काही ठाम आकृतीबंध तयार असतो. नाहीतर त्याने देवाला देव म्हटले किंवा ओम, अल्ला, जेहोवा, थेओस इ. यासारखे समानार्थी शब्द वापरले तरीही या संज्ञांमधून नेमके वर्णन करता येणार नाही, असे महान, शक्तीमान आणि गूढ ताकदीचे असे काहीसे उदबोधन होण्यापलीकडे काहीच निश्चित अर्थ मिळत नाही.

ईश्वराची अनाकलनीय संकल्पना किंवा त्याच्याबद्दलच्या सर्वसाधारण आकलनीय कल्पना यांनी गोरा यांचे समाधान न झाल्याने मूळ तत्त्वापर्यंत आपला दृष्टीकोन स्पष्ट करण्यासाठी त्यांनी नास्तिकता ही संकल्पना निवडली. त्यांच्या मते तो शब्द समजायला सोपा आणि आकलनीय आहे. सर्व गूढवादांपासून मुक्त आहे.

पण हेसुद्धा भ्रामक आहे. गांधीजींबरोबरच्या पहिल्या मुलाखतीत लेखकाला हे स्पष्ट करावे लागले की, हा शब्द जसा नकारात्मक वाटतो तसा नाही. न नैतिकतेचे सूचन करणाऱ्या ‘ईश्वरविहीनते’सारखा हा शब्द नाही, असेही ते म्हणतात. तो शब्द स्वत:च अस्पष्ट असल्याने गोरा त्याची व्याख्या सांगतात, ‘‘नास्तिकवाद म्हणजे आत्मविश्वास आणि मुक्त मन:शक्ती’’. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर ‘‘नास्तिकता म्हणजे माणसातील आत्मविश्वास आणि मुक्त मन:शक्ती आणि त्यांच्या परिभाषेत सांगायचे, तर त्याच्या विरोधातील आस्तिकता म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव आणि असहाय्यता.’’  

या मांडणीवर पहिला प्रश्न असा निर्माण होतो की, सर्व नास्तिक या नास्तिकवादाच्या व्याख्येशी सहमत आहेत का? मला वाटते की, ‘नास्तिकवाद’ शब्दातील या सकारात्मक अर्थाबद्दल एवढे मतभेद आढळतील, जेवढे ईश्वराबाबत आहेत.

याशिवाय आस्तिकवादी तोच मजकूर ईश्वराच्या संज्ञेमध्येही बसवणे शक्य आहे. तो असे म्हणू शकेल ‘‘ईश्वर म्हणजे माणसातील आत्मविश्वास आणि मुक्त मन:शक्ती.’’ किंवा थोडक्यात ‘‘ईश्वर आत्मशक्ती आहे.’’ किंवा विरुद्ध अर्थाने ‘‘आत्मविश्वास आणि मुक्त मन:शक्ती म्हणजे देव’’. भौतिकता, नास्तिक आणि देव न मानणाऱ्यांशी संबंधित अधिनता आणि गुलामी आहे. विश्वाची उत्पत्ती सत्(चेतने)पासून झाली की, असत्(काही नाही/ शून्य) पासून या उपनिषदातील वादाप्रमाणेच हे आहे.

मी गोरा यांच्यापुढे एक प्रश्न ठेवला होता - “मुक्त मन:शक्ती म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे? धार्मिक निषिद्धता आणि श्रद्धांच्या प्रतिबंधापासून मुक्त कृती, असा सोपा अर्थ तुम्ही सुचवता आहात का?’’

गोरांनी उत्तर दिले ‘‘धार्मिक निषिद्धता आणि श्रद्धांच्या प्रतिबंधापासून मुक्त कृती, यापेक्षा खूप व्यापक असा मुक्त मन:शक्तीचा अर्थ आहे. मानवी जीवनात भावनिक जडणघडणीमध्ये प्रेम आणि द्वेष जसे एकत्र असतात, तसेच स्वातंत्र्याची भावना म्हणजे मुक्त मन:शक्ती आणि अवलंबून असण्याची भावना म्हणजे गुलामी हे सुद्धा प्रत्येकामध्ये एकत्र असतात.’’

‘‘मुक्त मन:शक्तीमुळे माणसाला वाटते की, तो मुक्तपणे विचार, बोलणे आणि कृती करू शकतो, तर गुलामगिरीमुळे माणसाला वाटते की, त्याला विचार, बोलणे आणि कृतीसाठी तयार केले आहे. दैवीशक्तीच्या हातातील आपण खेळणे आहोत, या तत्त्वांतर्गत वैश्विक शक्ती किंवा दैवी इच्छेपुढे मानवी जीवन दुय्यम आहे, हा आस्तिक दृष्टीकोन असल्याने आस्तिकवाद हे मानवी गुलामगिरीचे प्रकटीकरण आहे. या उलट नास्तिकवाद म्हणजे मानवातील मुक्त मन:शक्तीचे प्रकटीकरण आहे.’’

पण वरती सांगितल्याप्रमाणे आस्तिक मंडळी गुलामगिरीचा संबंध नास्तिकवादाशी लावून स्वातंत्र्याचा संबंध आस्तिकवादाशी लावणे शक्य आहे आणि या विधानांच्या पुष्ट्यर्थ ते उपनिषदांचा आधार घेऊ शकतात. उदाहरणार्थ ‘छांदोग्य’ उपनिषदात म्हंटले आहे :

“य आत्मा अपहतपाय्मा विजरो विमृत्यु विशोको अविजिघत्सो अपिपास: सत्यकाम: सत्यसंकल्प: स अन्वेष्टव्य:, स विजिज्ञासितव्य:, स सर्वाश्च लोकान् आप्नोति, सर्वाश्च कामान्, यस् तम् आत्मानम् अनुविद्य विजानाति इति ह प्रजापतिर् उवाच.”

(“जो पाप, वार्धक्य, मृत्यु, दु:ख, अपयश, तहान आणि भूकविरहीत आहे आणि ज्याने इच्छा आणि मन:शक्तीच्या परिपूर्तीची क्षमता धारण केली आहे, अशा आत्म्याचा एखाद्याने शोध घ्यावा. आत्मा समजून घेण्याची तीव्र इच्छा त्याला असायला हवी. जो आत्म्यास समजून पूर्ण जाणतो, तो सर्व लोकांवर आणि इच्छांवर प्रभूत्व मिळवतो.’’)

एखाद्याला ईश्वराच्या श्रद्धेमधून शक्ती, मन:शक्ती आणि स्वातंत्र्याची प्रेरणा मिळवणे शक्य असेल, त्यासाठी नास्तिकवादावर श्रद्धा ठेवावी, अशी गोरा यांची मागणी आहे.

ईश्वर आहे आणि नाही अशी चर्चा करणारे सर्व जण दोन महत्त्वाच्या चुका करतात. पहिली म्हणजे मी कोण आहे, हे जाणून घेण्यापूर्वीच ईश्वराचे अस्तित्व आहे किंवा नाही यावर चर्चा सुरू करतात. हे  अशक्य आहे. एखाद्याने मी कोण हे पूर्णपणे समजून, जाणून, अनुभवून घेऊन स्वत:चे अस्तित्व सारांशाने समजून घेतल्याशिवाय ईश्वरासंबंधी सर्व अंदाज निष्फळ ठरतात. अणूची आवश्यक रचना समजून न घेता अणूबॉम्बची तांत्रिक रचना आणि कार्य समजून घेणे शक्य आहे, मात्र स्वत:ला समजून घेतल्याशिवाय ईश्वराला जाणून घेणे शक्य नाही.

मी गोरांपुढे मांडलेला पहिला प्रश्न  होता : ‘‘तुमचे स्वत:चे अंतिम वास्तव काय आहे?’’

गोरांनी उत्तर दिले - ‘‘एक म्हणजे मी माझ्या अस्तित्वाबद्दल ठाम आहे. माझ्या अस्तित्वाचा शेवट मृत्युने होणार आहे, कारण मृत्युनंतरच्या अस्तित्वाबद्दल मी ठाम नाही. झोपेमध्येही मी माझ्या अस्तित्वाबद्दल जागरूक नसतो, मात्र मृत्युच्या स्थितीपेक्षा हे थोडे वेगळे आहे. जागा झाल्यावर मी पुन्हा माझ्या अस्तित्वाबद्दल जागरूक होतो.’’

‘‘मला सातत्य आवडते. म्हणून मृत्युला टाळण्याचे माझे अविरत प्रयत्न हे माझे अंतिम वास्तव आहे. मृत्यु हा अपरिहार्य नाही. जीवनद्रव्यांचा संयोग शक्य झाल्यावर फक्त मृत्यु नव्हे, तर वृद्धत्व आणि रोगांवरही आपल्याला नियंत्रण मिळवता येईल.’’

थोडक्यात सांगायचे झाले, तर गोरांच्या मते निरंतर जगण्याची इच्छा आणि त्यासाठीचे प्रयत्न हे ‘स्व’चे (आत्मा हा शब्द टाळण्यासाठी) अंतिम सार आहे. उपनिषदांची शिकवण आणि गोरांचे म्हणणे, यात फरक असा आहे की, उपनिषदे ठामपणे म्हणतात – ‘स्व’ला मृत्यु आणि झीज नाही, आणि गोरांच्या मते ते वास्तवात साध्य न झालेले ‘स्व’चे ध्येय्य आहे. गोरा जेव्हा ध्येय्य साध्य न झाल्याचे मांडतात, तेव्हा ते शरीराच्या संदर्भात विचार करत असतात. अमर्त्य होण्याच्या इच्छेच्या मागे ती साध्य होईल, या गृहीतकावर विश्वास आहे आणि गृहीत म्हणून ते मांडत आहेत. गोरांच्या मते ते फक्त विश्वासापेक्षा खूप काही अधिक आहे. ही खात्रीलायक सिद्ध वस्तुस्थिती आहे की, जीवद्रव्य (बाह्यशक्तींनी नष्ट न केल्यास) ही खरोखरच अमर्त्य शाररीक यंत्रणा आहे. आपल्याला एवढेच करायचे आहे की, त्याचे उपयोजन विस्तारायचे आहे, म्हणजे पेशींच्या संपूर्ण समूहाला म्हणजे आपण मानवी शरीर म्हणतो त्याला अमरत्व प्राप्त होईल. वास्तविकता हे प्रत्येकाला शक्य होणार नसले तरीही जर एका जीवाच्या संदर्भात घडले, तर सर्वांच्या बाबतीत सत्य ठरण्याची शक्यता आहे.

गोरा यांच्या मते हे चिमुकले जीवद्रव्य मृत्युहीन ‘स्व’चे प्रतिनिधी आहे. ते तेथेच थांबतात. यातील कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नाईट्रोजन इत्यादींच्या या रासायनिक संयुगामध्ये इच्छा आणि जीव अस्तित्वात ठेवण्याची शक्ती, वाढ, वृद्धी, गुंतागुंतीच्या रचनांची निर्मिती इत्यादींची प्रेरणा कशी निर्माण होते, या प्रश्नावर गोरा काहीच विधान करत नाहीत. म्हणून माझे असे म्हणणे आहे की, ‘स्व’चे ज्ञान संदिग्ध असताना ईश्वराच्या स्वरूपाबद्दल नव्हे तर त्याच्या अस्तित्वाबद्दलही अनिश्चितता राहील. सांख्य, जैन आणि बौद्ध यासारख्या अनेक व्यवस्थांचे ‘स्व’बद्दलचे तत्त्वज्ञान आहे, मात्र एकतर ते ईश्वर स्वीकारत नाहीत किंवा त्याच्याबद्दल साशंक आहेत किंवा त्याच्याबद्दल अनास्था दर्शवतात. ‘स्व’ला समजून घेण्यात प्रगती होत जाते, त्याक्रमाने ईश्वरासंबंधी भूमिकेत बदल होतो. म्हणून ज्याला ईश्वरासंबंधी स्पष्टता हवी असेल त्याने प्रथम स्वत:च्या अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दल स्पष्टता करून घेणे आवश्यक आहे.

हे सोपे नाही. हे श्रद्धेने करणे गरजेचे नाही. मात्र जर प्रश्नकर्त्याला इतरांच्या शब्दावर विश्वास ठेवून चालायचे नसेल तर बिनचूक निष्कर्ष येत नाही, तोपर्यंत जीवनातील इतर सर्व गोष्टींचा त्याग करून त्याला दिवस-रात्र याच विषयाचे चिंतन करावे लागेल. जर त्याच्याकडे या कामासाठी चिकाटी किंवा वेळ नसेल, तर त्याने जसे विज्ञानाच्या क्षेत्रात करतो, तसेच येथे त्याला इतरांच्या निष्कर्षावर विश्वास ठेवावा लागेल. तो आजारपणासाठी डॉक्टरांवर अवलंबून असतो, हक्क आणि दायित्वांसाठी कायदेतज्ज्ञांवर, यंत्रे आणि मोठ्या आस्थापनांसाठी तंत्रज्ञांवर आणि विज्ञानाच्या विविध सिद्धान्तांसाठी प्राध्यापकांवर अवलंबून असतो.

भौतिकशास्त्रातील अधिकृत पाठ्यपुस्तकात नमूद केल्याप्रमाणे प्रकाशाचा वेग १,८६,००० मैल प्रती सेकंद असतो, हे आपण स्वीकारतो. हे सत्य तपासण्यासाठी आपल्यापैकी किती जणांनी प्रयत्न केले आहेत? १,८६,००० हा अंदाजे आकडा आहे, नेमका वेग काही मैल अजून जास्त आहे आणि नंतर नेमक्या वेगाच्या आकड्यावर शंका उपस्थित केल्या गेल्या. मात्र आपण सर्वसामान्य माणसे तपशिलाची जास्त चिंता करत नाही. आपण १,८६,०००ने समाधानी असतो आणि उद्या खरा आकडा १,८६,०००पेक्षा काही हजारांनी कमी किंवा अधिक झाला तरी आपल्याला दु:ख किंवा आनंद होत नाही. प्रती सेकंदाला ८६,००० आणि १,८६,००० यातील फरकाचे आपणास कल्पनेमध्येसुद्धा आकलन होत नाही.

तसेच पोटॅशियम सायनाईड हे मानवासाठी भयानक विष आहे, हे डॉक्टरांनी सांगितल्यावर त्यांचा अधिकार मान्य करतो. आपल्यापैकी किती जणांनी या सत्याची कसोटी करण्याचा प्रयत्न केला आहे? पण या करता आपण भौतिकशास्त्रज्ञ आणि डॉक्टरांवर अंधविश्वास ठेवला असे मानतो का? नाही. कारण आपल्याला माहीत आहे की, जर आपण याबाबत उत्सुक असू, तर आपण प्रत्यक्ष प्रयोग करून विधानाची सत्यता पडताळून पाहिली असती. त्याचप्रमाणे चिकाटीने कठोर अभ्यासाची तयारी असल्यास ईश्वर आणि ‘स्व’ची सत्यता पडताळून पाहणे ही प्राथमिकता आहे. जर आपल्याकडे त्यासाठी व्यासंग किंवा क्षमता नसेल तर दोष कोणाला द्यावा? ‘गीता’ म्हणते -

ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना।

अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे।।

अन्ये त्वेवमजान्त: श्रुत्वाऽन्येभ्य उपासते।

तेऽपि चातितरन्त्येय मृत्युं श्रुतिपरायणा:।। (१३-२४,२५)

(‘‘काही व्यक्ती एकाग्रतेने स्वमधून स्वला जाणून घेतात. काही सांख्य पद्धतीद्वारा तर काही कर्मयोग पद्धतीने. इतर, ज्यांना अशी कुठलीच पद्धती माहीत नसते, ते इतरांकडून ऐकतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या श्रद्धेने ते मृत्युलासुद्धा जिंकतात.’’)

जोपर्यंत ‘स्व’बद्दल स्पष्टता येत नाही, तोपर्यंत मृत्युनंतरच्या स्थितीबद्दलच्या प्रश्नाबद्दलासुद्धा शंका आणि अनुमानाची स्थिती राहील.

मात्र ‘आपण कोण आहोत?’ याचा आम्ही निर्णय घेण्यापूर्वीच देव, मृत्यु आणि कर्माबद्दल निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. हे अशक्य आहे. श्री रमण महर्षी ‘मी कोण?’ या प्रश्नावर इतर कुठल्याही तत्त्वज्ञानात्मक प्रश्नापेक्षा अधिक भर देतात, हे योग्य आहे. जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही, तोवर प्रत्येक स्पष्टीकरण हे सिद्धान्त आणि गृहीतकाच्या पातळीवर राहणार. पुनर्जन्म आणि न्यायाच्या दिवशी थडग्यातून बाहेर येणे, यावर सकारात्मक हल्ले करणारे आणि गोरांसारखी मंडळी त्यास सकारात्मक नकार देऊन भौतिक वस्तूंबद्दलची गृहीतके आणि शक्यतांच्या क्षेत्रात शिरतात. या दोघांकडेही सिद्ध करण्याची साधने नसतात आणि ते ‘स्व’ रूपाच्या योग्य निर्णयावर अवलंबून असतात. (मी गोरांपुढे एक प्रश्न ठेवला होता- ‘‘जेव्हा तुम्ही कर्माच्या श्रद्धेवर हल्ला करता, त्यात मी असे गृहीत धरतो की, तुमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. माझं बरोबर आहे ना?’’ ते म्हणाले, ‘‘हो. मी पुनर्जन्म मानत नाही. पुनर्जन्माच्या सिद्धान्ताची पूर्वअट आत्मा आहे. ते देवासारखेच खोटे गृहीतक आहे.’’)

‘स्व’च्या अपुऱ्या आकलनानंतरची दुसरी चूक म्हणजे ज्याची थेट अनुभूती आहे आणि त्याचे आकलन झाल्यावरही ज्ञानाच्या चौकटीच्या भाषेत व्यक्त करण्यास असमर्थ असताना, त्यास त्या आकलनाच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणे. हे फक्त ईश्वर आणि आत्म्याच्या संदर्भात सत्य नाही, तर अनेक अनुभवांच्या बाबतीतही सत्य आहे. तुम्हाला गोड म्हणजे काय ते माहीत आहे. तुम्ही गोड पदार्थांची यादी तयार करू शकता, मात्र तुम्ही गोडाची नक्की व्याख्या करू शकत नाही. तुम्हाला राग किंवा प्रेम माहीत आहे. राग आणि प्रेमाच्या विविध पातळ्या आणि मन:स्थिती तुम्ही चितारू शकता, मात्र नेमक्या भाषेत तुम्ही या तीव्र भावना मांडू शकत नाही. गोड पदार्थांची यादी देऊ शकता किंवा प्रेम आणि रागाचे चित्र रंगवू शकता, कारण ती सरतेशेवटी तुमच्या मनाला झालेली अनुभूती आहे. ‘स्व’ आणि त्यानंतर अटळपणे ईश्वर हे मनाच्या आकलनापलीकडचे आहेत, जे मनाचे मूळ आणि त्यामागील प्रेरणा आहेत, त्या समोरील किंवा त्यातून निर्माण होणारे नाहीत.

तत्त्वज्ञ, ऋषीमुनी आणि भक्तांनी ईश्वरावर चर्चा करणारी अनेक पुस्तके निर्माण केली, त्याचे विश्लेषण, विच्छेदन करून अनुभूतीच्या चौकटीत कोंबण्याचा प्रयत्न केला. त्याला नाव, आकार आणि गुणधर्मांनी सजवला, त्यासाठी स्थाने निर्माण केली, आकाशातील कुठल्यातरी ग्रहताऱ्यांशी, नैसर्गिक घटनांशी किंवा काही महान ऐतिहासिक किंवा दंतकथेतील व्यक्तींशी सबंध जोडला. ‘‘मी आहे, देव आहे, मी देवाच्या बाहेर नाही. कदाचित मी छोट्या गोष्टींबद्दल अंदाज करू शकतो मात्र माझ्याबद्दल किंवा देवाबद्दल, असल्यास त्याच्या इच्छा, योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या पद्धती याबद्दल काहीच अंदाज बांधू शकत नाही.’’ यासारख्या सोप्या आणि मोकळ्या विधानांशी कोणीच सहमत असल्याचे आढळत नाही.

या विषयाकडे आपण वेगळ्या पद्धतीने बघू. प्रत्येक आकलनीय गुणाचे एक वैशिष्ट्य असते. तो तेवढाच आकलनीय विरुद्ध दृष्टीकोन सुचवत असतो. ते नेहमी जोडीने असतात. उदा : सत्य आणि असत्य, ज्ञान आणि अज्ञान, सुखी आणि दु:खी, प्रेम आणि द्वेष, मोठा आणि लहान, सुंदर आणि कुरूप, चांगले आणि वाईट, मजबूत आणि कमकुवत, भरीव आणि पोकळ, सूर आणि असूर आणि असे अनेक.

मात्र अनाकलनीय संकल्पनेच्या विरुद्ध आकलनीय नसते. म्हणून जेव्हा तुम्ही ईश्वराला आकलनीय बनवलेत (जसे पवित्र, उदात्त, चांगले, न्याय्य इ.) तर त्याच्याविरुद्ध सैतान होते, पण जेव्हा तुम्हाला माहीत आहे की, ईश्वर अनाकलनीय असला तरीही खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहे, त्या वेळी त्याच्या विरुद्ध नसते. विरुद्ध संकल्पना तयार करण्याचा प्रयत्न करणे तेवढेच अनाकलनीय असते. खरे अस्तित्वात नसणे, असत्, ईश्वर नाही, अ-आस्तिक हे देवाइतकेच अनाकलनीय आहे. गोरा यांचे आकलनीय अ-आस्तिक, ईश्वर नसणे हे आकलनीय ईश्वराइतकेच चांगले किंवा वाईट आहे. तसेच मी वरती दाखवून दिले आहे की, ईश्वर नाही प्रमाणेच ईश्वराच्या नावाने तुम्ही मुक्त मन:शक्तीबद्दल बोलू शकता.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

या कारणास्तव अद्वैत वेदांतात सत्, चित आणि आनंद या कल्पना स्पष्ट केल्या आहेत. या जरी सकारात्मक आकृतीबंधात असल्या तरी आशयात दुहेरी नकारात्मकता आहे. असं म्हणतात की, ब्रह्मदेवाने सत्, चित आणि आनंद यांना एकाच कारणासाठी बोलावले. ब्रह्मदेवांना ते असत्, अचित आणि दु:ख नाहीत ना, हे तपासायचे होते. माणूस समजतो, तसे या संकल्पना हे समजावण्यासाठी नाहीत की, नैतिकता आणि आनंद यांनी भरून राहिलेल्या अस्तित्वाची स्थिती म्हणजे ब्रह्म नव्हे.

गोरा यांनी सेवेच्या क्षेत्रात संपादन केलेले यश आणि त्यांची इच्छाशक्ती याचे श्रेय ते त्यांचा नास्तिकवादी दृष्टीकोन आणि नास्तिकवादाचे आवाहन यास देतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, ईश्वर आणि धर्माच्या नावे आवाहन करण्यापेक्षा या पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक नैतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दुष्प्रवृतींच्या विरोधात विद्वानांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना अधिक चांगल्या पद्धतीने आवाहन करता येते.

गांधीजींनी ईश्वरावरील सखोल श्रद्धेतून जीवनभर कार्य केले आणि यशही प्राप्त झाले, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांनी जाहीर केले की, सत्याग्रहाचे पूर्ण आचरण हे ईश्वरावरील नि:संदेह श्रद्धेशिवाय अशक्य आहे. आधुनिक मनांमध्ये ईश्वर या शब्दामुळे काही अडचणी निर्माण होतात, असे त्यांना आढळल्यावर त्यांनी तो शब्द बदलला आणि सत्य शब्दाची स्थापना केली. सत्य किंवा ईश्वर असो, मात्र त्यांनी आपला भक्तीचा मार्ग कधी सोडला नाही. त्यांनी शपथपूर्वक सांगितलेही असते की, त्यांच्या यशाचे सर्व श्रेय ही ईश्वरावरील श्रद्धा आणि त्याला केलेल्या आवाहनाला आहे.

ईश्वर, विविध धर्म आणि त्यांच्या शिकवणीवर श्रद्धा ठेवणारी मंडळी अनेक वेळा युद्धे, हत्याकांडे, गुलामी, जुगार, दारूबाजी आणि विषयासक्ती याचबरोबर, अनेक सामाजिक आणि इतर दृष्कृत्यांना आधार आणि प्रोत्साहन देऊन कायम करणारी असतात. समाजात अनेक माणसे आहेत, जे ईश्वरावर आपली श्रद्धा जाहीर करतात आणि त्याची नियमित पूजा करून त्याच्या नावाचा जप करून नियमित उपासना करतात, त्यापैकी अनेकांची आयुष्ये अशुद्ध, स्वार्थी आणि हिंसक असून असे कोणतेही दुष्कृत्य नाही, जे त्यांनी केलेले नाही.

दुसऱ्या बाजूला असे नास्तिक आहेत (यात समावेश होण्यासाठी जैन आणि बौद्ध दावा करू शकतात) जे ईश्वर नाकारतात, मात्र न्याय्य आणि नैतिक जीवन जगावे आणि सेवा करावी, त्याग करावा यासाठी सतत प्रयत्नशील असतात. जेव्हा ते लोकांच्यात काम करत असतात, त्या वेळी ते आस्तिक आहेत की नास्तिक, याचा लोकांना विसर पडलेला असतो. त्यांचा प्रामाणिकपणा, नैतिक चारित्र्य, सेवेची ऊर्मी आणि त्याग हे गुण बघून त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन स्वीकारले जाते. जवाहरलाल आस्तिक नाहीत. त्यांच्या भाषणात ईश्वर आणि आत्मा यांचा उल्लेख कधीही नसतो. पण त्यांची लोकप्रियता वादातीत आहे. सरदार धार्मिक आहेत. अनेक वेळा ते आस्थापूर्वक ईश्वराबद्दल बोलतात आणि त्यांची लोकप्रियता ही तेवढीच आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

गोरा यांना असा विश्वास असेल की, त्यांची नास्तिकवादावरील श्रद्धा आणि आवाहन, यामुळेच ते जनतेमध्ये अधिक चांगले काम करू शकतात. मला वाटते हा भ्रामक विश्वास आहे. लोक त्यांच्या हृदयात बघतात, शब्दाकडे नव्हे. लोक विचार करतात की, त्यांची धार्मिक तत्त्वे काहीही असू देत, मात्र हा न्यायी, धर्मपरायण, देवतूल्य माणूस आहे. तो दीनदुबळ्यांचा मित्र आहे. जो कष्ट सहन करून संकटात गरिबांच्या सोबत राहतो. खऱ्या अर्थाने तो धार्मिक आणि देवाचा माणूस आहे. मात्र त्याने नास्तिकवाद हा पंथ स्वीकारला असून त्याच्या देवाचे नाव नास्तिक - देव नाही हे आहे.

राहू दे तसे त्यांना. त्यांच्या कार्याचे हे वैचारिक परिशिष्ट आहे. जे उत्तम असले तरी दुय्यम महत्त्वाचे आहे. सामाजिक आणि नैतिकतेच्या सर्वोच्च मूल्यांवर आधारित योग्य, चांगले आणि न्याय्य यावर त्यांचा असलेला विश्वास आणि त्यासाठी जीवन झोकून द्यायची तयारी, तसेच जीवनावरील त्यांची गाढ श्रद्धा, हे श्रेष्ठ आणि व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. एकदा त्यांनी योग्य मार्ग निवडल्यावर त्याच्या आचरणामध्ये व्यक्तिगत गैरसोय, अहंकार, पूर्वग्रह, सामाजिक चालीरीती किंवा निकटवर्तीयांच्या आवडीनिवडी हे अडथळे राहत नाहीत. त्यांच्यामधील ही अत्यावश्यक धार्मिकता त्यांच्या यशाचे गमक आहे, असे मला वाटते.

विचारातील आणि अनुभवातील बदलातून कदाचित त्यांच्या नास्तिकवादी वृत्तीत बदल घडेल किंवा काळाच्या ओघात अधिक ठाम होईल. हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. मात्र जोपर्यंत त्यांचे हृदय प्रेमाने भरलेले आहे, व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात आदर्श नैतिक चारित्र्य आणि धैर्य आहे आणि त्यांचे जीवन सेवा आणि त्यागाने भरलेले आहे, तोपर्यंत त्यांचे नाव ईश्वराच्या भक्तांच्या मांदियाळीत असेल. त्यांच्यासाठी ईश्वर आपले नाव न-ईश्वर मानेल.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......