अजूनकाही
“You cannot cultivate your intellect, enrich your mind, enlarge the sphere of your political rights and privileges and at the same time keep your hearts closed and cramped. It is an idle dream to expect men to remain enchained and unshackled in their superstition and social evils, while they are struggling hard to win rights and privileges from their rulers.”
- Mahadev Govind Ranade
“राजकीय हक्कांच्या बाबतीत जर तुमची अधोगती झालेली असेल, तर तुमची समाजरचना चांगली असणे शक्य नाही. त्याबरोबरच तुमची समाजरचना जर बुद्धी आणि न्यायनीती यांच्यावर अधिष्ठित झालेली नसेल, तर राजकीय हक्क आणि सवलती यांचा उपभोग घेणे तुम्हाला शक्य होणार नाही. तुमची सामाजिक व्यवस्था जर अपूर्ण असेल, तर तुमची आर्थिक रचना चांगली असणे शक्य नाही. तुमची धार्मिक ध्येये जर हीन आणि नीच असतील, तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांत तुम्हाला यश येणे शक्य नाही...”
- न्या. महादेव गोविंद रानडे
महाराष्ट्राला उदारमतवादाचा वारसा शिकवणारे, महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घालणारे आणि एकोणिसाव्या शतकातील बहुतांश सामाजिक सुधारणांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान असणारे न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२चा, तर निधन १६ जानेवारी १९०१चे. म्हणजे त्यांच्या जन्माला १८० वर्षे झाली, तर मृत्युला १२१. त्यांचे वरील अवतरण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले. आपल्या पुढच्या समस्या, आव्हाने आणि आपल्याला करावयाच्या प्रयत्नांची दिशा रानडे यांनी त्यातून स्पष्ट केली होती. स्वातंत्र्याच्या विचाराने भारलेल्या तत्कालीन महाराष्ट्रातल्या धुरिणांना त्याचे महत्त्व तेव्हा समजले असेल, वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर त्यांनी त्यासाठी प्रयत्नही केले असतील. त्यांच्या त्या प्रयत्नांमुळे आपण नक्कीच चार पावले पुढेही टाकली. पण ती पुरेशी ठरली नाहीत किंवा त्यात विसाव्या शतकात फारशी मजल मारली नाही, एकविसाव्या शतकाच्या दोन दशकात तर त्या पावलांचा प्रवास उलट्या दिशेनेच होतो आहे की, काय असे वाटू लागले आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
सध्याच्या केंद्र सरकारबद्दल जरा जास्तच नकारात्मक बोलले जाते आहे. अर्थात गेल्या आठ वर्षांतली त्याची ‘कामगिरी’ही तशीच राहिली आहे, हेही तितकेच खरे आहे. यंदाचे वर्ष आपल्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष. त्यामुळे या वर्षांत तरी केंद्र सरकारने उन्नत, उदात्त आणि प्रगतीशील दृष्टीकोन दाखवायला हवा होता, पण ‘घर घर तिरंगा’सारख्या प्रतीकात्मक इव्हेंटवरच या सरकारची प्रमुख मदार राहिलेली दिसते. तसेही हे सरकार ‘इव्हेंटबाज’च आहे. नाही म्हणायला नव्या संसदेचा घाट घातला जातो आहे. पण तो प्रकल्पही या सरकारच्या बहुतांश योजनांसारखाच वादग्रस्त ठरला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपल्या देशाचे पाऊल तरी पुढे पडायला हवे होते. पण दुर्दैवाने तसे काही घडून आलेले नाही.
पण याचा सगळा दोष या सरकारच्या केवळ आठ वर्षांच्या ‘उलट्या पावलांच्या प्रवासा’लाच देता येईल?
तर त्याचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल.
तो दोष आधीच्या सरकारांना देता येईल?
या देशातल्या बुद्धिजीवी, बुद्धिवादी वर्गाला देता येईल?
कुणाकुणाला देता येईल?
एक लोकशाही देश म्हणून गेल्या पंचाहत्तर वर्षांत आपण उर्ध्वगामीच वाटचाल केली आहे, हे नक्कीच. या काळात आपल्या लोकशाहीसमोर काही संकटे आली, आव्हाने निर्माण झाली. पण त्यातून ती तरली. पण भारतीय राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनी आणि सत्ताधारी पक्ष व नेत्यांनी या लोकशाहीचा मार्ग सातत्याने प्रशस्त करण्याचाच प्रयत्न केला, असे मात्र नक्कीच म्हणता येणार नाही. त्याचबरोबर या देशातल्या बुद्धिजीवी, बुद्धिवादी मध्यमवर्गानेही गेल्या तीसेक वर्षांत आपल्या भूमिकेपासून, मूल्यांपासून अभूतपूर्व म्हणावा असा ‘यू-टर्न’ मारला आहे. ‘राष्ट्राचा कणा’ समजला जाणारा हा वर्ग गेल्या आठेक वर्षांत तर इतक्या उन्मादी अवस्थेला पोचलाय की, विचारता सोय नाही.
..................................................................................................................................................................
पत्रकार जेव्हा घटनांनाच वास्तव व सत्य, अभ्यासक वरवरच्या निरीक्षणांना सिद्धान्त, सामाजिक कार्यकर्ते आक्रस्ताळेपणाला पुरोगामीपणा आणि लेखक वाह्यात कल्पनांना प्रतिभा मानू लागतात, तेव्हा समाजाचे ‘संतुलन’ बिघडतेच. संतुलन गमावलेली माणसे शारीरिक-मानसिक ‘अनारोग्या’ला आमंत्रण देणारी असतात. महाराष्ट्राचे, मराठी माणसांचे आणि पर्यायाने मराठी साहित्याचेही तसेच काहीसे झाले आहे की काय?
.................................................................................................................................................................
मनोरुग्णता या आजाराबद्दल असे म्हणतात की, ही आजच्या जगातली सर्वांत मोठी समस्या, पण तिच्याबद्दलच सर्वांत जास्त अज्ञान आहे. मानसशास्त्रज्ञ तर असेही सांगतात की, जगातल्या प्रत्येक चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती मनोरुग्ण आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक कुटुंबातली एक व्यक्ती. काळजी वाटावी, नव्हे धडकी भरावी अशीच ही आकडेवारी आहे. युरोप-अमेरिकेसारख्या संपन्न देशातले टोकाचे वर्णभेद, क्रूरता आणि राजकीय थिल्लरपणा पाहता, तिकडे मनोरुग्णतेचे प्रमाण जास्त असेल, असेही कुणी दाखवून देऊ शकेल. पण आपल्या देशात गेल्या काही वर्षांत प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया, पुस्तके, यु-ट्युब व्हिडिओ अशा माध्यमांतून दिसणारी नकारात्मकता पाहिली की, आपल्या देशातही मनोरुग्णतेकडे ढकलला जाणारा किंवा मनोरुग्णतेच्या गर्तेत चाललेला समाज, असेच आपले वर्णन करावेसे वाटते. मनोरुग्णता या आजारासाठी जगण्याची स्पर्धा, अंधश्रद्धा, आर्थिक-कौटुंबिक-सामाजिक परिस्थिती, अशा अनेक कारणे दिली जातात.
आपल्या देशातल्या बुद्धिजीवी-बुद्धिवादी मध्यमवर्गालाही मनोरुग्णता किंवा स्किझोफ्रेनिया यापैकी एखाद आजाराने ग्रासले की काय, असेच वाटते. ग्रामीण भागातले बरेचसे शेतमजूर आणि काही शेतकरी दिवसभराच्या काबाडकष्टांमुळे होणाऱ्या शारीरिक वेदनांचा ठणका कमी करून शांतपणे झोपता यावे, यासाठीचे औषध म्हणून दारू पितात… त्या चालीवर या मध्यमवर्गाने उन्माद, द्वेष, आक्रमकता आणि नकारात्मकता यांच्या नशेचे पेग मारले की काय, असे वाटते. कशासाठी मारले असावेत? काय विसरण्यासाठी? शारीरिक कष्टांना हीण मानणारा आणि बौद्धिक कष्टांना प्रतिष्ठित मानणारा हा वर्ग, कुठल्या वेदनांचा ठणका विसरण्यासाठी हे करतोय? नवनव्या आध्यात्मिक बुवाबाबांच्या भजनीही हाच वर्ग मोठ्या प्रमाणात लागलेला दिसतो. म्हणजे त्याच्या वेदनांचा ठणका बराच ‘जिव्हार’ दिसतोय.
एकेकाळी राजकारणाबद्दल नकारात्मक पद्धतीने बोलणारा हा वर्ग हल्ली प्रत्येक गोष्टीत, प्रश्नात, समस्येत, घटनेत ‘राजकारण’च शोधताना दिसतो. प्रत्येक घटनेचे राजकियीकरण केले की, आक्रमकता, आकांडतांडव, आवेश, नकारात्मकता, द्वेष, उन्माद यांना आपोआपच ‘ग्लोरिफाय’ केले जाते. आणि हे ग्लोरिफिकेशकन इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मीडिया यांच्यासाठी हमखास ‘टीआरपी वसूल फंडा’ झालेला असल्याने त्याला सुगीचे दिवस आले आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
एकेकाळी ‘टुकीने संसार’ आणि ‘नेकीने नोकरी’ करणारा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग, अशी एक व्याख्या केली जायची. नव्वदच्या दशकापासून मात्र ‘मी, माझे, मला’ याच्यापलीकडे ज्यांच्या जगण्याच्या महत्त्वाकांक्षा नसतात, तरीही ज्यांच्या आकांक्षा मात्र फार मोठ्या असतात, असा वर्ग म्हणजे ‘मध्यमवर्ग’, अशी नवी व्याख्या भारतीय मध्यमवर्गाने आत्मसात केली.
या वर्गाला सगळ्या प्रकारची स्वातंत्र्ये हवी असतात, पण त्याला मात्र शक्यतो कुणालाही उत्तरदायी राहायचे नसते. अगदी स्वत:लाही. बहुतांश वेळा हा वर्ग इतरांना ‘सेन्सॉर’ करत राहतो, पण चुकूनही कधी स्वत:च स्वत:ला ‘सेन्सॉर’ करताना दिसत नाही. त्याचा परिणाम असा होतो की, त्याच्या अशा बेबंदपणामुळे कधी सरकारी, तर खाजगी ‘सेन्सॉरशिप’चा सामना करण्याचा प्रसंग त्याच्यावरच गुदरतो. तेव्हा तो अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या नावाने कंठशोष करतो. पण मुळात स्वातंत्र्य आणि लोकशाही यातली कुठलीच संकल्पना त्याला धडपणे माहीत नसते. ‘व्यक्तिवाद’ या एकाच आधुनिक पण एकांगी मूल्याशी त्यांची ‘सोयरिक’ असते. माझा ‘व्यक्तिवाद’ हाच माझा बुद्धिवाद, तोच माझा विवेकवाद, तेच माझे श्रेष्ठ मूल्य, असा कैफ त्याला चढलाय तो याच ‘सोयरिकी’मुळे.
नव्वदच्या दशकात आलेल्या जागतिकीकरणानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनीही या देशातल्या गोरगरिबांचे बोट सोडून याच मध्यमवर्गाच्या हातात घालून चालायला सुरुवात केली. त्यामुळे या वर्गासारखीच भारतीय प्रसारमाध्यमांचीही ‘अवस्था’ झालीय. हेच चित्र तुम्हाला कलाक्षेत्रात, शिक्षणक्षेत्रात, समाजसेवेच्या क्षेत्रात, उद्योग-धंद्यांत… सर्वत्र दिसते.
पत्रकार जेव्हा घटनांनाच वास्तव व सत्य, अभ्यासक वरवरच्या निरीक्षणांना सिद्धान्त, सामाजिक कार्यकर्ते आक्रस्ताळेपणाला पुरोगामीपणा आणि लेखक वाह्यात कल्पनांना प्रतिभा मानू लागतात, तेव्हा समाजाचे ‘संतुलन’ बिघडतेच. संतुलन गमावलेली माणसे शारीरिक-मानसिक ‘अनारोग्या’ला आमंत्रण देणारी असतात. महाराष्ट्राचे, मराठी माणसांचे आणि पर्यायाने मराठी साहित्याचेही तसेच काहीसे झाले आहे की काय?
१९७४ साली आलेल्या ‘सामना’ या चित्रपटात ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ असा प्रश्न गावकरी हिंदूरावाच्या दहशतीमुळे उघडपणे विचारत नसले तरी दबक्या आवाजात विचारतात. आणि तरीही त्याला पाहता पाहता एका चळवळीचे स्वरूप येते, आणि मग त्याचे उत्तर हिंदूरावाला द्यायला लागते. जनतेच्या आवाजाचा प्रवास हा अस्फूटतेकडून प्रस्फूटतेकडे होतो, अर्थात प्रयत्न केला तर. चळवळ किंवा आंदोलन उभे करण्यासाठी फक्त धग गरजेची असते, असा दाखला ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ या विधानातून मिळतो. हे तत्त्व एका मराठी लेखकाने या ‘सामना’तल्या या प्रसिद्ध विधानातून अधोरेखित केलेलं आहे.
..................................................................................................................................................................
दिवाळीच्या दिवसांत तरी नकारात्मकतेची इतकी आळवणी करायची गरज नाही. करोनाकाळ पूर्णपणे सरल्यानंतरची ही पहिली दिवाळी. त्यामुळे बाजारपेठा दिवाळीसाठी करोनापूर्वकाळासारख्या सजल्या आहेत. लोकांच्या खरेदीलाही बऱ्यापैकी उधाण आलेले आहे. विद्युत रोषणाई, फटाके, मिठाई यांची रेलचेल दिसतेय सगळीकडे. या दिवाळीवर करोना महामारीचे अजिबात सावट दिसत नाहीये, ही खूपच समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
.................................................................................................................................................................
२००० सालानंतर मुंबईत ‘बलबीर पाशा को एड्स होगा क्या?’ असा प्रश्न विचारणाऱ्या जाहिरातींनी हलकल्लोळ माजवला होता. एड्स नावाच्या आजाराबाबत समाजजागृती करणाऱ्या या जाहिरातमोहिमेची इतकी चर्चा झाली, इतकी चर्चा झाली की, कित्येक पालकांची ती डोकेदुखीही होऊन बसली. त्यामुळे पौंगडावस्थेतल्या मुला-मुलींची आणि एकंदर महिलांचीही एक प्रकारे कोंडी झाली. ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे वाटायला लावणारा हा प्रकार होता. हलकल्लोळ माजला की, ईप्सित परिणाम साधला जातोच, या तिरपागड्या विचाराचे ही जाहिरातमोहीम एक उत्तम उदाहरण होते. पण आता तोच आपला स्वभावधर्म झाल्यासारखे वाटू लागले आहे.
आपण जगतो वर्तमानात, पण आपले मन इतिहासाचे पोवाडे गाण्यातच रममाण असते. इतिहासाचा समंध आपल्या मानगुटीवरून काही उतरायला तयार नाही. गेल्या काही वर्षांत तर आपल्या सोयीनुसार इतिहासाचं पुनर्लेखन करण्याची चढाओढच महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे. यामुळे महाराष्ट्रीय चलनवलनाची स्थिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारखी झालेली दिसते! या संमेलनात गुणवत्ता कमी आणि जत्रा जास्त असते. नुसत्या बघ्यांच्या गर्दीला ‘यशस्वीतेचे लेबल लावले जाते. रटाळ परिसंवादांना वैचारिक चर्चेचा मुलामा दिला जातो. संमेलनातले कवितासंमेलन आणि कथाकथन हे कार्यक्रम धडपणे करमणूकही करत नाहीत आणि धडपणे काव्याचा वा कथेचा अनुभवही देत नाहीत, त्यामुळे सुरुवातीला दोन्हींचे मांडव गर्दीने खचाखच भरलेले असतात, पण जसजसा कार्यक्रम पुढे जायला लागतो, तसतशा पाठीमागून खुर्च्या मोकळ्या होत जातात. ग्रंथप्रदर्शनात पुस्तके विकत घेणारे कमी आणि निव्वळ गर्दी करणारे हौसेनवसेगवशेच जास्त असतात. बाळमेळाव्यात जास्त गलका आणि दर्जा हलका, असा प्रकार असतो.
अर्थात, या मांडणीला आततायीपणाचे लेबल लावता येईल किंवा ‘इतकं हताश व्हायचं कारण नाही’, असा दाखलाही देता येईल. आणि ही गोष्ट तर खरीच आहे की, दिवाळीच्या दिवसांत तरी नकारात्मकतेची इतकी आळवणी करायची गरज नाही. करोनाकाळ पूर्णपणे सरल्यानंतरची ही पहिली दिवाळी. त्यामुळे बाजारपेठा दिवाळीसाठी करोनापूर्वकाळासारख्या सजल्या आहेत. लोकांच्या खरेदीलाही बऱ्यापैकी उधाण आलेले आहे. विद्युत रोषणाई, फटाके, मिठाई यांची रेलचेल दिसतेय सगळीकडे. या दिवाळीवर करोना महामारीचे अजिबात सावट दिसत नाहीये, ही खूपच समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. बाजारपेठेकडे पाहताना आर्थिक चलनवलन आता स्थिरस्थावर होत असल्याची खात्री वाटायला लागली आहे.
त्यात दिवाळी हा प्रकाशाचा, दिव्यांचा सण. त्यांच्या रोषणाईने करोना महामारीचा उरलासुरला काळोखही पळून जावा आणि नेहमीसारखे निर्मळ, निर्भेळ आणि सळसळ करणारे दिवस तुम्हाआम्हाआपल्यासगळ्यांनाच जगता यावेत…
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment