अजूनकाही
शिव शिवकुमार यांचे ‘The Right Choice’ हे मॅनेजमेंटवरचे पुस्तक कॉर्पोरेट क्षेत्रातील वाचकवर्गात खूप लोकप्रिय झाले होते. त्यात प्रथमच रोजच्या कॉर्पोरेट आयुष्यात भेडसावणाऱ्या दहा दुविधांवरील औषध सुचवण्यात आले होते. या भारतीय लेखकाने आपल्या करिअरमधील अनुभवाचे मोती निगुतीने वेचले होते. त्यामुळे हे पुस्तक प्रचंड गाजले.
‘The Art of Management’ हे त्यांचे नवे पुस्तक नुकतेच बाजारात आले आहे. पहिल्या पुस्तकाने कॉर्पोरेट क्षेत्राच्या अंतरंगाला हात घातला होता, तेव्हा साहजिकच त्यांच्या दुसऱ्या पुस्तकातूनदेखील एक नवा विषय समोर येईल, अशी अपेक्षा होती. पण हे पुस्तक एकसंध अनुभव देण्यात कमी पडते. कारण या पुस्तकाची मांडणी प्रश्नोत्तरी स्वरूपाची आणि प्रश्न लेखकाने विचारले असले तरी उत्तरे २० वेगवेगळ्या लोकांनी दिलेली आहेत. हे लोक वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातले आहेत. त्यामुळे वाचकाला एका मोठ्या कॅनव्हासवर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे छोटे छोटे कवडसे तेवढे पाहायला मिळतात. एकाच कार्यक्षेत्राचा किंवा विषयाचा माग काही लागत नाही. म्हणून हे पुस्तक मॅनेजमेंटच्या दृष्टीकोनातून ‘हॉरिझेंटल’ आहे, ‘व्हर्टिकल’ नाही.
अशा पुस्तकांची आवश्यकता नाही, असे मला म्हणायचे नाही, पण हे मॅनेजमेंट या विषयाच्या अंतरंगात शिरणारे नसून प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे, एवढेच. वेगवेगळ्या उद्योगांचं विहंगावलोकन ज्यांना करायचे आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
या पुस्तकाला ‘सेलेब्रिटी व्हॅल्यू’ मात्र नक्कीच आहे. काही नावे पाहिली की, ते लक्षात येते. सचिन तेंडुलकरांची प्रस्तावना आणि हर्ष भोगले, जन. व्ही. पी. मलिक, शिरीन भान, देवेंद्र चावला, ओली पेक्का कलासुव्हो इत्यादींच्या मुलाखती.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
या पुस्तकाची रचना प्रामुख्याने तीन तथ्यांचा ऊहापोह करणारी आहे- १) स्व-प्रबंधन (Managing Yourself), २) टीम मॅनेजमेंट (Managing Your Team) आणि, ३) बिझनेस मॅनेजमेंट (Managing Your Business). या तीन भागांच्या परिचयात्मक अध्यायांमध्ये शिवकुमार यांनी स्वतःचे विचार आणि अनुभव मांडले आहेत, ते नक्कीच वाचनीय आहेत. त्यात कॉर्पोरेट जगतातली कित्येक उदाहरणे दिलेली आहेत. ज्या २० मुलाखती या पुस्तकात आहेत, त्या या तीन तथ्यांवर प्रकाश टाकतात.
“एखादं झाड बहरण्यासाठी त्याची मुळं घट्ट होण्याची आवश्यता असते, तसेच शिस्तप्रियता या गुणाचेही आहे. क्षेत्र कोणतेही असो, अंगी शिस्त असणे यशस्वी होण्यासाठी अपरिहार्य आहे. शिस्त अंगी बाणवणे हे यशस्वीतेचे गमक आहे. जेव्हा करोडो लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतात, तेव्हा त्याचे दडपण न घेता ते तुमच्या पाठीशी आहेत, असा सकारात्मक विचार केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात. निंदा करणे ही लोकांची प्रवृत्ती असते, अशा वेळी ‘हा कोण मला सांगणारा?’, असा विचार न करता, केवळ निंदेमागे आपल्याला जे हितकारक आहे, ते अशा प्रसंगांतून निवडता आले पाहिजे. तुमच्याकडे ताशी १४० किमी वेगाने दोन बॉल्स येत आहेत. त्यातला एक मनात घर करून राहिलेला गतकाळातला आहे, ज्यावर तुम्ही बोल्ड झाला होता. दुसरा आता वर्तमानात येतोय संधी घेऊन. तेव्हा बॅट्समनने गतकाळाचे ओझे झटकून वर्तमानातल्या बॉलला सीमापार तडकवले पाहिजे. ‘आज’ महत्त्वाचा. प्रोफेशनलला काळाप्रमाणे आपल्या शैलीत आवश्यक बदल करता आला पाहिजे. एखाद्या ‘ब्रॅण्ड’च्या मागे उभे राहताना, तो युवकांसाठी, देशासाठी अपायकारक काही ना, याचा विचार करून नेहमीच मोठ्या परिप्रेक्ष्यातून विचार केला पाहिजे. क्षेत्र कोणते का असेना, युवकांनी आपल्या वरिष्ठांचे दडपण घेऊ नये, आपल्या मनांतील कल्पना व्यवस्थित मांडावी व तिला आकार द्यावा.” हे सचिन तेंडुलकरांचे अनुभवामृत मोलाचे वाटते.
जनरल व्ही. पी. मलिक यांनी काही बाबींवर प्रकाश टाकला आहे. शिस्त आणि तंदुरुस्ती, दोन्ही यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत, असे नमूद करताना ‘नोकरीत बढती मिळणे, या घटितात ७५ टक्के वाटा मेहनतीचा व २५ टक्के नशिबाचा असतो’, असा कानमंत्रदेखील देतात. त्यांनी आर्मी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातला एक अतिशय महत्त्वाचा फरक अधोरेखित केलाय. तो म्हणजे- कॉर्पोरेट जगतात संस्था केवळ काम करणाऱ्या नोकरदाराचा विचार करते, त्याच्याशी संबंध जोडते; त्यापलीकडे जाऊन त्याच्या परिवाराचा विचार खासगी संस्थेत होत नाही. ‘लीडर’ हा नेहमी एक ‘फिल्ड सोल’ असावा, म्हणजे त्याला प्रत्यक्ष जमिनीवर काय होते आहे, याची पूर्ण कल्पना येते, इत्यादी.
हर्ष भोगले हे क्रिकेट समालोचनाच्या क्षेत्रातले मोठे नाव. त्यांनी एक अनपेक्षित विचार मांडला आहे- ‘ऐकणे हे बोलण्यापेक्षा उच्च दर्जाचे कौशल्य आहे’. त्यासोबत त्यांनी ‘आज’वर लक्ष्य केंद्रित करून ‘समर्पण’ भावाने काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘‘जेवढे आवश्यक आहे तेवढेच बोलावे. अगांतुकपणे जुजबी ओळख असताना अति-निकटता वाढवू नये. संकटांना घाबरू नये, त्यांच्या पोटात संधी असतात… आपण जे करतो आहोत, त्यात पूर्ण झोकून देऊन काम करावे, अगदी १०० टक्के. ते झाल्यावर दुसरी गोष्ट हाती घ्यावी. त्या वेळी पहिल्या गोष्टीसंबंधी विचार करून वेळ वाया घालवू नये”. याबरोबरच “ ‘तू’ म्हणणारी व्यक्ती मला ‘स्विचऑफ’ करते”, असे पण ते मोकळेपणाने सांगतात.
‘मल्टिपल अल्टर्नेट अॅसेट मॅनेजमेंट’च्या रेणुका रामनाथदेखील ‘संकटकाळी संधी गवसतात’, असेच मत व्यक्त करतात. ‘हार्ट आणि माईंड’ यांच्या निर्णयात एकमत नसेल तर बिझनेस करणाऱ्याने ‘हार्ट’चे ऐकावे, असेही त्या स्पष्ट करतात.
आरती केळशीकर यांना लेखनाची नाडी गवसली आहे. त्यांची मुलाखत त्यांच्यातल्या लेखिकेची स्पंदनं आपल्यापर्यंत पोचवते. त्या म्हणतात, ‘‘एखादं पुस्तक लिहायला सुरू करणं सोपं असतं, पण पूर्ण करणं फार अवघड असतं. लिखाण पूर्ण झाल्यावर मिळणारं समाधान मात्र मोजता येत नाही, त्यात अतीव परिपूर्णता असते. त्यानंतर लेखकाने आपले पुस्तक वाचकांपर्यंत पोचवण्यासाठीदेखील सगळे प्रयत्न करायचे असतात, तिथे कच खाऊन चालत नाही.’’
‘टीव्ही अँकरने स्वतःला ‘ब्रँड’पेक्षा मोठे समजायचे नसते’, असा मोलाचा संदेश शिरीन भान देतात, ‘त्याने ‘ब्रॅण्ड’ म्हणून सगळी टीम यशस्वी करण्यासाठी काम केले पाहिजे.’
एच. आर. प्रोफेशनल एन. एस. राजन “एखाद्याला कामासंबंधी सल्ला द्यायचा असल्यास खासगीत द्यावा आणि तारीफ करायची असल्यास सगळ्यांसमोर करावी”, अशी सहज सूचना करतात. पुढे म्हणतात, ‘‘जेव्हा कोणी मेहनत घेऊन स्वतःत सुधारणा करताना दिसतं, तेव्हा मला नवा लीडर तयार होत असल्याचा आभास होतो… तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल नेता म्हणून नाराजी व्यक्त करता तेव्हा तुम्ही नाराज आहात, हा संदेश गेला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला नाराज व्हायची गरज नसते, असे करता येते तेव्हा तुम्ही स्वतःवरचा ताबा घालवून बसत नाही.’’
‘लोकांना काढून टाकण्यात येते, तेव्हा एच. आर. नेमके कुठे असते?’ वगैरे कोड्यात टाकणारे प्रश्न विचारले गेले नाहीत; म्हणून हे पुस्तक जरा गुळमुळीत वाटते. ‘आजकाल एच. आर. बऱ्याच कंपन्यांत एक नामधारी फंक्शन होऊन राहिले आहे का?’ असे प्रश्न विचारून संवेदनशील विषयाला हात घातला गेला नाही. ‘सिग्निफाय इंडिया’ च्या एच. आर. हेड अनुषा सूर्यनारायण यांची मुलाखत वाचतानादेखील असाच अनुभव येतो.
‘‘कोविडच्या काळातही जगाच्या तुलनेत भारतीय लोक भारतीयांप्रतीच असंवेदनशील राहिले”, असा धक्कादायक अनुभव विकास खन्ना या ‘मिशेलिन-स्टार्ड’ शेफने नोंदवला आहे.
‘तुम्हाला जलद जायचे असेल तर एकटे जा, पण दूर जायचे असेल तर सोबत घेऊन चला’, या ‘उबंटू’ तत्त्वज्ञानाचं उदाहरण ‘युनिलिव्हर’च्या के. के. श्रीधर यांनी दिले आहे. “त्यासाठी एक ‘सांघिक लक्ष्य’ तयार करणे आवश्यक ठरते. त्याबद्दल लोकांना पटवून देणे आणि त्यांना त्यात सहभागी त्यात करून घेणे, ही यशाची गुरुकिल्ली आहे’’, असे ते म्हणतात. त्यांनी मोठ्या टीम्स मॅनेज करताना ‘ट्राफिक लाईट रिपोर्ट्स’ बनवले होते. ‘हिरवा’ म्हणजे टार्गेट करणारे, ‘पिवळा’ म्हणजे टार्गेटच्या जवळ असलेले, ‘लाल’ म्हणजे भरकटलेले. “टीम म्हणजे केवळ सोबत काम करणे नव्हे, तर एकमेकांवर विश्वास ठेवून काम करणे होय,” असे ते स्पष्ट करतात.
“पाच दिवस खूप काम करणाऱ्या टीमला बॉसने विकेंड मोकळा द्यावा”, अशी सूचना ‘डब्ल्यू.पी.पी.’चे सीव्हीएल श्रीनिवास करतात.
सर्जनशील काम करणाऱ्या ‘रेड एफएम’च्या निशा नारायणन म्हणतात, “मी सहसा जे क्रिएटिव्ह आवडले नाही, त्यासाठी ‘हो’ म्हणत नाही. त्यामुळे माझ्या टीमला नित्य नवे शोधावे लागते. त्यांच्यासोबत त्यांच्यातील एक होऊन काम केले की, छान परिणाम मिळतात.”
‘नासा’च्या जॅनिटरला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी विचारले, ‘तुमचे काम काय?’ तो म्हणाला, ‘माणसाला चंद्रावर पोचवणे’. या उदाहरणाने अचंबित झालेल्या ‘जे.डब्ल्यू.टी.’च्या बबिता बरुआ म्हणतात, “एवढी मोटिव्हेटेड टीम पाहिजे, असाध्य मिळवण्यासाठी.”
‘स्पेन्सर रिटेल’चे सीईओ देवेंद्र चावला म्हणतात, “कोविडमध्ये मला कळलं, ‘सर्व्हंट-लीडरशिप’ काय असते. मी माझ्या लोकांची काळजी घेतली तर ते कस्टमर्सची काळजी घेतील.”
‘युनिलिव्हर’चे हृषिकेश भट्टाचार्य म्हणतात, “भारतीय हुशार असूनही आपल्या बॉस समोर मनातले योग्य वाटते ते बोलत नाहीत, त्यांच्या डोक्यात हायरार्की (पदानुक्रम) कायम असते.”
‘डी.एच.एल.”चे आर. एस. सुब्रमण्यन म्हणतात, “तुमची कामगिरी उत्तम असेल, तर तुम्हाला पैसा मिळतो, पण तुमच्यात क्षमता असेल तरच तुम्हाला बढती मिळते.”
‘एअर इंडिया’च्या पहिल्या स्त्री पायलट हरप्रीत सिंग लीडर्स साठी फार मोलाचा सल्ला देतात- “चार ‘D’ आपण काम करताना पाळावेत. जे काम तुमच्याशिवाय इतर कोणी करू शकत नाही, तुम्हालाच करायचे आहे, ते तुम्ही करा- ‘Do’. जे तुम्ही दुसऱ्याला देणे शक्य आहे, ते लगेच द्या- ‘Delegate’. जे लगेच करणे आवश्यक नाही, ते- ‘Delay’ करा आणि जे या तिन्ही प्रकारांत मोडत नाही, तरी आहे, ते ‘Dump’, करा. आपण ही चार बकेट्स सोबत ठेवत नाही, म्हणून आपल्या कामाचा भार वाढत राहतो आणि अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.”
‘नोकिया’चे चेअरमन ओली पेक्का यांचा पण अनुभव यात आहे, पण तो अपेक्षाभंग करणारा आहे, त्यात काही विशेष गवसत नाही. आज जगभरात भारतीय बिझनेस लीडर्स एवढे परिणामकारक आहेत की, त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीसमोर मोठमोठी जागतिक नावे फिकी वाटतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘‘मोठी ट्रान्सफॉर्मेशन्स घडवून आणण्यासाठी सीईओंनी पुढाकार घेतला पाहिजे. ‘चीफ डिजिटल ऑफिसर’ एकटा काही करू शकत नाही’’, असा सडेतोड सल्ला ‘क्लॉकनर’ या जर्मन कंपनीचे माजी सीईओ गिसबर्ड रॉल देतात. नव्या कंपनीने ‘मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट’ आधी मार्केटमध्ये उतरवले पाहिजे, असेही ते सुचवतात.
“ ‘बोर्ड मेम्बर्स’नी वेगळा दृष्टीकोन पुढे आणला पाहिजे. त्यामुळे ते वेगवेगळ्या क्षेत्रातील असावेत, असा संकेत असतो, त्याने ऑपरेटिंग बॉस होऊ नये,” असे ‘आय.आय.एम. कोलकाता’च्या माजी संचालक अंजु सेठ सुचवतात.
‘‘यशस्वी सीईओ मीडियाला हलक्यात घेत नाहीत. त्यांच्यासमोर जाताना पूर्वी हजार मुलाखती झाल्या असल्या तरी, आज आपली पहिलीच मुलाखत, या भूमिकेतून पूर्वतयारी करतात’’, असे ‘मायक्रोसॉफ्ट’च्या ‘मास-कम्युनिकेशन’ एक्स्पर्ट पूनम कौल अधोरेखित करतात.
या पुस्तकात भेटणारी बरीच माणसं स्वतःच्या आहार-विहारावर नियंत्रण ठेवणारी आहेत, स्वतः शांत राहण्याचा प्रयत्न करणारी आहेत, नित्य काहीतरी व्यायाम करणारी, नित्य शिकणारी, शिस्त पाळणारी आहेत. वेळ आणि श्रम या दोन्हीचे महत्त्व पुन्हा पुन्हा स्वतःच्या अनुभवांमधून मांडणारी आहेत.
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment