‘मुघल साम्राज्य : बाबर’ : बाबरचं आयुष्य म्हणजे युद्ध, रक्तपात आणि भव्य आव्हानांचं एक चक्रीवादळ…
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नितीन साळुंखे
  • ‘मुघल साम्राज्य : बाबर’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 15 October 2022
  • ग्रंथनामा शिफारस एम्पायर ऑफ द मुघल Empire of the Moghul ॲलेक्स रुदरफर्ड Alex Rutherford रेडर्स फ्रॉम द नॉर्थ मुघल साम्राज्य : बाबर’

“सैनिकांनी शेतकऱ्यांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून काही घेताना शेतकऱ्यांच्या परवानगीनं, योग्य किंमत देऊनच घ्यावं. कोणाला त्रास देऊ नये. स्त्रिया आणि दुर्बल यांची अवहेलना करू नये. शत्रू बलाढ्य असेल तर वेगानं हल्ले करून, त्याचं नुकसान करून गायब व्हावं. आपल्या सैनिकांचा जीव महत्त्वाचा आहे. थोड्या सैन्यानं मोठा आवाज करत धूळ उडवत पूर्वेकडून किल्ल्याच्या दिशेनं यावं. मोठ्या सैन्याचं आक्रमण झालं आहे, असं समजून किल्ल्यातलं सैन्य किल्ल्यातून बाहेर पडून प्रतिकारासाठी पूर्वेकडे जाईल. मग मुख्य सैन्यानं पश्चिमेकडून किल्ल्यावर हल्ला करावा आणि तो ताब्यात घ्यावा. दरम्यान किल्ल्यातून सैन्य बाहेर पडलेले बघितल्यावर पूर्वेकडून धूळ उडवत आलेल्या सैन्याने हळूच दिशा बदलावी आणि सुखरूप किल्ल्यात पोहोचावं.”

हे सगळं ओळखीचं वाटतं ना? रयतेच्या सुखदुःखांशी नाळ जोडलेल्या शिवाजी महाराजांची ही भूमिका होती, हे आपल्याला माहीत असतं. पण त्यांच्याही दीडशे वर्षं आधी मध्य आशियातल्या फरघाना इथं जन्मलेल्या बाबर नावाच्या तरुण शासकाचं हे धोरण होतं.

चंगेज खान आणि तैमूरलंगाचा वारसा अभिमानानं सांगणारा, वयाच्या १२व्या वर्षी, १४९४मध्ये वडिलांचा डोळ्यांसमोर अपघाती मृत्यू झाल्यानंतर फरघानाचं छोटंसं राज्य काही बक्षिशीच्या अमिषापोटी अन्य कोणाला देण्याचा प्रयत्न करणाऱ्या वजीराला सर्वांसमक्ष ठार मारून स्वतःकडे राखणारा बाबर… या छोट्या मुलाच्या आयुष्यात किती उलथापालथी व्हाव्यात?

अंतर्गत बंडाळी मोडून काढून बाबर राजा होतो न होतो, तोच वडिलांचा भाऊ अहमद फरघानावर आक्रमण करतात. ते तैमूरलंगची राजधानी समरकंदमध्ये राज्य करत असतात. पण समरकंद ते फरघाना या ३०० मैलांच्या प्रवासादरम्यान वाटेत दबा धरून बसलेल्या उझबेकी टोळ्या अहमद यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारतात.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना आपल्या कृतीचा पश्चाताप झालेले अहमद ‘आपल्याला मूलबाळ नसल्यानं आपला पुतण्या बाबर हाच आपला वारस असेल’, असं त्यांच्या विश्वासू अंगरक्षक बैसंघारला सांगतात. विश्वास पटावा म्हणून ते आपल्या हातातली तैमूरलंगची अंगठी काढून देतात.

युद्धासाठी किल्ल्यातून उतरण्याच्या तयारीत असलेल्या बाबरला हा अंगरक्षक अहमद यांच्यावरच्या हल्ल्याची आणि त्यांच्या मृत्यूची बातमी देतो. त्यांची अखेरची इच्छा सांगतो आणि तैमूरलंगची अंगठीही देतो. आता हक्कानं त्याचं झालेल्या समरकंदच्या गादीवर बसण्यासाठी बाबर उत्साहानं निघतो. जवळ गेल्यावर त्याला समजतं की, काका अहमद यांच्या वजीरानं सत्ता बळकवली आहे. तो हल्ला चढवतो, पण तोपर्यंत त्या प्रदेशातला जीवघेणा बर्फाळ, उदास हिवाळा सुरू झालेला असतो. त्यामुळे त्याला परत फिरावं लागतं.

हिवाळा संपल्यावर पुन्हा एकदा सैन्य जमवून बाबर समरकंदला वेढा देतो. अखेर गनिमी काव्यानं समरकंद जिंकण्यात बाबरला यश मिळतं. पण तो समरकंदमधली व्यवस्था लावण्याच्या प्रयत्नात असताना तिकडे बाबरच्या नऊ वर्षांच्या सावत्रभावाच्या नावाखाली त्याचा चुलत भाऊ फरघानाची सत्ता ताब्यात घेतो आणि बाबरची आजी, आई, बहीण आणि वजीर यांना बंदिवासात टाकतो.

बाबरला त्वरेनं फरघानाकडे जाणं भाग पडतं. निम्म्या अंतरावर त्याला समजतं की, तो नसल्याचा फायदा घेऊन त्याच्या दुसऱ्या चुलत भावाने समरकंद बळकावलं आहे. आता फरघानाही नाही आणि समरकंदही नाही. शिवाय आई, आजी आणि बहीण बंदिवासात.

असहाय अवस्थेतला १४ वर्षांचा बाबर ते हिंदुस्थानचा पहिला मुघल बादशहा बाबर, हा प्रवास रंगवला आहे, ॲलेक्स रुदरफर्ड यांनी. औरंगजेबाच्या दरबारात इंग्लंडच्या राजाचा दूत म्हणून काम केलेल्या या लेखकाने ‘एम्पायर ऑफ द मुघल’ ही सहा मुघल बादशहांच्या जीवनाचं चित्रण करणारी पुस्तकमालिका लिहिली आहे. हा इतिहास त्यांनी इतिहासाच्या रुक्ष पद्धतीनं न लिहिता, कथनाच्या पद्धतीनं लिहिला आहे.

या पुस्तकमालिकेतलं पहिलं पुस्तक आहे – ‘रेडर्स फ्रॉम द नॉर्थ’. त्याचा मराठी अनुवाद ‘मुघल साम्राज्य : बाबर’ या नावानं मुक्ता महाजन यांनी केला आहे. ‘मुघल साम्राज्य : हुमायून’ (अनुवाद : स्वाती मदनवाड), ‘मुघल साम्राज्य : अकबर’ (अनुवाद : मुस्तजीब खान), ‘मुघल साम्राज्य : जहांगीर’ (अनुवाद : मीना शेटे–संभू), ‘मुघल साम्राज्य : शहाजहान’ (अनुवाद : सचिन रायलवार) आणि ‘मुघल साम्राज्य : औरंगजेब’ (अनुवाद : डॉ. दीपक बोरगावे) ही या मालिकेतली इतर पाच पुस्तकं.

‘मुघल साम्राज्य : बाबर’ची सुरुवात बाबरच्या १२व्या वर्षांपासून होते. या जीवनकाळातल्या महत्त्वाच्या घटनांची साखळी जोडण्यासाठी लेखकाला मदत झाली आहे, बाबरच्या रोजनिश्यांची. ‘मुघल साम्राज्य : बाबर’बद्दल रुदरफर्ड म्हणतात- “बाबरचं आयुष्य म्हणजे युद्ध, रक्तपात आणि भव्य आव्हानांचं एक चक्रीवादळ होतं. त्यांची संख्या इतकी प्रचंड होती की, मुस्लीम साहित्यातल्या पहिल्या आत्मचरित्रात, त्याच्या मन वेधून घेणाऱ्या मुक्त रोजनिशीत – ‘बाबरनामा’त, पण त्याने सगळं नोंदवलं नव्हतं. खरं म्हणजे त्याच्या रोजनिशीत मध्येमध्ये बराच खंड आहे. काही काही खंड हे तर फार मोठ्या कालखंडाचे आहेत. पण एवढे तपशील गाळलेले असूनसुद्धा त्याच्या आयुष्यातले मुख्य प्रसंग, जसे की त्याने समरकंदचा तीन वेळा घेतलेला कब्जा, त्याचा उझबेकींबरोबरचा संघर्ष, उत्तर पश्चिम भारतात त्याने केलेली मुघल साम्राज्याची स्थापना - तेव्हा तो हिंदुस्थान म्हणून प्रचलित होता - हे सगळे ‘बाबरनामा’ आणि इतर स्त्रोतांतून स्पष्ट होतं. काही प्रसंग छोटे करून, एकत्र करून किंवा वगळून आणि काही काही कालखंड एकत्र करून काही महत्त्वाचे प्रसंग मी ऐतिहासिक क्रमानं वर्णन केले आहेत.”

या पुस्तकात एकूण २७ प्रकरणांत बाबरचा संपूर्ण जीवनपट रेखाटला आहे. केवळ १४ वर्षांच्या बाबरने वापरलेली युद्धनीतीची प्रदीर्घ खेळी हा खरं तर युद्ध अभ्यासकांसाठी कुतूहलाचा आणि अन्य वाचकांसाठी रोमांचक अनुभव देणारा विषय ठरावा. सैन्यबळ अत्यंत तोकडे, म्हणजे केवळ २०० सैनिक बरोबर असल्याने फरघाना थेट हल्ला करून जिंकणं शक्य नव्हतं. त्यामुळे बाबर फरघानाला वळसा घालून पश्चिमेकडील पर्वतातल्या शाहरुखीचा किल्ला ताब्यात घेतो. तिथं मुख्य ठाणे करून फरघानाच्या किल्यावर आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर छोटे पण तीक्ष्ण हल्ले चढवतो. परिणामी दोनच महिन्यांत पश्चिम फरघानाचा बराचसा प्रदेश परत मिळवतो. स्वतःच्या सैन्याचा आकारही वाढवत नेतो. त्याचबरोबर चुलत भावावर दबाव आणून आजी, आई, बहीण आणि वजीराची सुटका करतो. त्यानंतर व्यूहनीती रचून, वेगवान हल्ला करून समरकंद पुन्हा ताब्यात घेतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मात्र थोड्या दिवसांनी उझबेकी टोळीचा प्रमुख शैबानी खान समरकंदला वेढा घालतो. राज्यातले अन्नधान्य संपल्याने लोकांची उपासमार होऊ लागते, तेव्हा बाबर शैबानी खानचा प्रस्ताव स्वीकारून समरकंद त्याच्या हवाली करण्याचा निर्णय घेतो. उपासमारीने क्षीण झालेलं सैन्य घेऊन बाहेर पडत असताना शैबानी खान बाबरला बहिणीला इथंच सोडून जायला सांगतो. त्या वेळी बाबरच्या सगळ्या सैन्याला शैबानी खानच्या सैन्यानं वेढलेलं असतं. सगळ्या सैन्याचे प्राण की बहीण? असा पेचप्रसंग उभा राहतो. बहिणीच्या आणि आईच्या विरोधाला न जुमानता बाबर बहिणीला सोडून पुढे जाण्याचा अतिशय कठीण असा निर्णय घेतो.

त्यानंतर काही काळाने काबुलचे शासक असलेले त्याचे चुलते निसंतान अवस्थेत मरण पावल्याने ते राज्य बाबरला वारसाहक्काने मिळतं. त्यानंतर इराणचा शहा शैबानी खानला ठार मारून त्याचं मुंडकं आणि बाबरची बहीण खानजादा यांना बाबरकडे पाठवतो. वर उझबेकी जमातीच्या ताब्यात असलेलं समरकंद पुन्हा जिंकून घेण्यासाठी शहा सैन्याची मदतही करतो, पण नंतर परतफेड म्हणून बाबर आणि त्याच्या प्रजेने शिया पंथाचा स्वीकार करावा, अशी मागणी करतो. बाबर ती नाकारतो. परिणामी बाबरचा पराभव करण्यासाठी शहा उझबेकी टोळ्यांना पाठबळ देतो. बाबर तिसऱ्यांदा आणि अखेरचा समरकंदच्या बाहेर पडून पुन्हा काबूलला परततो.

यानंतर तो तुर्की राजवटीकडून तोफा व बंदुका आणि ते तयार करण्याचं तंत्रज्ञान मिळवतो. आणि हिंदुस्थानच्या तयारीला लागतो. या पुढे घडला तो इतिहास आहे. बाबर अत्यंत सहजपणे तत्कालीन शासक सुलतान इब्राहिम लोधीचा पराभव करून हिंदुस्थानात मुघल साम्राज्याची स्थापना करतो.

हा सारा इतिहास लिहीत असताना लेखकाचं काही बाबींकडे मात्र थोडंसं दुर्लक्ष झालं आहे. बाबरला त्याच्या सैनिकांची आणि प्रजेची काळजी होती, हे पुस्तकातील अनेक प्रसंगांतून समोर येतं. समरकंदमध्ये मोठ्या भूकंपाने घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्यावर ती परत बांधून देण्याचा निर्णय किंवा त्या काळात सर्वांना अन्नधान्याचं मोफत वाटप करणं, अशी काही उदाहरणं यासाठी देता येतात. पण राज्यकारभार करत असताना लोकांचं जीवन सुसह्य व्हावं, यासाठी बाबरने धोरणात्मक निर्णय घेतले असतील, त्याबाबतची काहीच माहिती या पुस्तकात मिळत नाही.

मात्र बाबर युद्धाची तयारी कशी करतो, याकडे लेखकाचं बारीक लक्ष आहे. बाबर कोणत्याही प्रदेशाचा सत्ताधीश असो वा नसो, त्याचे हेर महत्त्वाच्या ठिकाणी असायचे. आणि त्या प्रत्येक ठिकाणाहून त्याला वेळेत माहिती मिळायची. शासक आणि प्रशासक म्हणूनही तो यशस्वी होत राहिला, त्यामागचं एक महत्त्वाचं कारण त्याची सक्षम हेरयंत्रणा हेसुद्धा असावं, हे लेखक कथनाच्या ओघात सांगत राहतो.

वयाच्या १२व्या वर्षी वडिलांचं अपघाती निधन झाल्या दिवसापासून बाबरच्या आयुष्यात सतत युद्ध, धावपळ, संघर्ष आणि तणावच राहिला. आई, आजी आणि थोरली बहीण हेसुद्धा बहुसंख्य वेळा जवळ नसतात. म्हणजे त्या काळी असलेली शिक्षणाची, संस्कारांची व्यवस्था बाबरला मिळालेली नाही. तरीही तो रोज रोजनिशी लिहितो. शासक म्हणून काही वेळा कठोर निर्णय घेणं भाग असतं, पण एरव्ही तो सुस्वभावी, सुसंस्कृत पद्धतीनेच वागतो. लोकांच्यात मिसळतो. त्यांची सुख-दुःखं, त्यांचे प्रश्न, त्यांचा रोजच्या जगण्याचा संघर्ष समजावून घेतो. त्याला निसर्गाची, बागबगिच्यांची आणि सृष्टिसौंदर्याची आवड होती. तो विद्वान व कलेचा भोक्ता होता. तुर्की व फार्सी भाषांत त्याने काही कविता केल्या आहेत. तुर्की भाषेत ‘दीवान’ हा काव्यसंग्रह रचला आणि ‘मसूनवी’ हे उपदेशात्मक खंडकाव्य मुबय्यिन या नावानं लिहिलं. ‘तुझक-इ-बाबरी’ हे त्याचे तुर्की भाषेतील आत्मचरित्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. बाबरने जवळपास ११६ ग़ज़ल, ८ मसनवी, १०४ रुबाई, ५२ मुआम्स, ८ कोते, १५ तुयुग तथा २९ सीरी मुसुन्नची तुर्की भाषेत रचना केली. याव्यतिरिक्त फारसी भाषेत ३ ग़ज़ल, १ किता तथा १८ रुबायांची रचना केली आहे.

राजसत्ता बदलल्या की सत्तेच्या समर्थनार्थ असणारी सर्व सामाजिक, भौतिक, साहित्यिक, राजकीय, प्रशायकीय व्यवस्था बदलते. सत्तेतल्या बदलानंतर मध्ययुगातल्या अनेक साहित्यिकांनी स्थलांतरं केली, नव्या राज्यकर्त्यांच्या रोषाला बळी पडण्यापेक्षा स्थलांतराचा मार्ग अवलंबला. बाबर मात्र अपवाद होता. त्याने आधीच्या राजसत्तेतील साहित्यवैभवावर आघात करण्याऐवजी ते जाणीवपूर्वक जपलं. उलट त्याच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्याच्या काळात आणि नंतरही मोगल दरबारातील साहित्यवैभव वाढत गेलं. त्यामुळे अनेक ख्यातनाम साहित्यिक मोगल घराण्यात आणि दरबारात उदयास आले. थोडक्यात, मुघल साम्राज्याचा संस्थापक असणाऱ्या बाबरच्या इतिहासाचा एक पैलू असाही आहे. 

बाबर युद्धातले बारकावे आणि गनिमी कावा त्याच्या अनुभवी एकनिष्ठ सेनापतीकडून शिकला असेल, असं गृहीत धरलं तरी एक सुसंस्कृत माणूस होण्यासाठीचे संस्कार आणि शिक्षण त्याला कोणी, केव्हा आणि कसं दिलं किंवा कुठून मिळालं, असा प्रश्न पडतो.

दुसरी बाब म्हणजे स्वतःच्या धर्मविचारांवर प्रेम करणारा बाबर तत्कालिन हिंदुस्थानातल्या हिंदू अथवा राजपुतांपैकी कोणालाही ‘माझा धर्म स्वीकार’ असं सांगत नाही. त्याला इथल्या लोकांच्या जीवनपद्धती आणि प्रार्थना पद्धती विचित्र वाटल्या होत्या, पण याबद्दल त्याच्या मनात तिरस्कार अथवा द्वेष नव्हता.

तो सुन्नी पंथी, धार्मिक मुसलमान असला, पण धर्मवेडा नव्हता. त्याने हुमायूनला कोणाच्याही धर्मात हस्तक्षेप न करण्याचा उपदेश दिला होता. इतर जातीजमातींशी सलोख्याने व उदारतेनं वागण्याचा त्याचा उपदेश होता. साहित्य-कला-संस्कृती यांची आवड आणि जोपासना करण्याच्या प्रवृत्तीतून आलेला सुसंस्कृतपणा व ज्ञान यांचा बाबरला मुघल साम्राज्याचा पाया मजबूत करण्यासाठी उपयोग झाला असावा. इब्राहिम लोधीचा पराभव केल्यानंतर हिंदुस्थानचा पहिला मुघल बादशहा म्हणून बाबरला तीन-चारच वर्षं मिळाली. त्यानंतर वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.

बाबर सुलतान इब्राहिम लोधीचा पानिपतच्या पहिल्या युद्धात २० एप्रिल १५२६ रोजी पराभव करतो, तेव्हापासून ते १७०८मध्ये सहावा मुघल बादशहा औरंगजेबचा मृत्यू होईपर्यंतचा काळ जेमतेम १८२ वर्षांचा. पण या कालखंडाने भारतीय इतिहासावर, जीवनपद्धतीवर, जनमानसावर खोल परिणाम केला आहे. इतका की, आज जवळपास ३५० वर्षांनंतरही त्याचे बरे-वाईट पडसाद इथल्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर गडदपणे आदळत आहेत.

आणखी एक म्हणजे बाबर काबुलवरून आणलेला फौजफाटा, तोफा आणि बंदूका यमुना नदी ओलांडून आणतो. युद्धक्षेत्र स्वतः निश्चित करतो. त्यासाठी आवश्यक ते खंदक खणणं,  अडथळे उभं करणं, तोफा, घोडेस्वार, तिरंदाज यांची जागा व्यूहनीतीनुसार निश्चित करणं, ही सगळी कामं शांतपणे करतो... जणू काही तो स्वतःच्याच राज्यात आहे. आणि इब्राहिम लोधीला दीर्घकाळपर्यंत या कशाचीच गंधवार्ताही लागत नाही. त्याच्याकडे हेरयंत्रणा नव्हती. लढाईच्या व्यूहरचनेचं ज्ञान नव्हतं. लढण्याची साधनं आणि पद्धत पारंपरिक होती. परिणामी बाबरला अतिशय सहज विजय मिळाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्यातल्या त्यात औरंगजेब कडवा धार्मिक होता, असं मानलं जातं. पण त्याने दक्षिणेत येताना आधी कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही संपवली. हे सारे मुस्लीम राज्यकर्ते होते. मराठा स्वराज्यावर चालून येताना शिवाजी महाराजांना शरण यायला भाग पाडलं ते औरंगजेबासाठी लढणाऱ्या मिर्झा राजा जयसिंग या राजपूत राजाने. असे अनेक राजपूत राजे औरंगजेबाच्या दरबारात होते. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लीम सेनाधिकारी होते, ज्यांनी मुस्लीम शासकांच्या विरोधातही त्यांची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आणि युद्ध जिंकून दिलं.

म्हणजे हे सारे राज्यकर्ते कोणत्याही धर्माचे असले, तरी त्या धर्मासाठी राज्य करत नव्हते. मुघल बादशहा मुस्लीम धर्मप्रसारासाठी राज्य करत नव्हते, आणि शिवाजी महाराजांनी गायी आणि ब्राह्मण यांच्या रक्षणासाठी स्वराज्याची उभारणी केली नव्हती. अफजलखानाचा वकील कुलकर्णी होता, आणि शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारल्यानंतर त्याने शिवाजी महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला होता. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी अनेक ब्राह्मणांना राजद्रोहासाठी मृत्युदंड दिलेला आहे.

तसंच आदिलशहा आणि कुतुबशहा यांना मराठी उत्कृष्ट बोलता येत असे, आणि त्यांची राज्य व्यवहाराची भाषा मराठी होती, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसतं किंवा आपण हा इतिहास विसरलोच आहोत.

भारतीय इतिहासातल्या एका महत्त्वपूर्ण कालखंडाची, मुघलकालीन इतिहासाची वास्तवाधारित मांडणी करणारी ही पुस्तकमालिका अभ्यासकांसाठी एक मौल्यवान ठेवा आहे.

‘मुघल साम्राज्य : बाबर’ - अलेक्स रुदरफोर्ड

मराठी अनुवाद : मुक्ता महाजन

सायन पब्लिकेशन, पुणे

पाने – ५८२

मूल्य – ७८० रुपये.

.................................................................................................................................................................

नितीन साळुंखे

salunkheneetin@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......