अजूनकाही
आजकाल मी खूपच खुजं आयुष्य जगतो आहे. सर्वसाधारणपणे मी सामान्य माणसाप्रमाणेच जगू इच्छितो. परंतु सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगण्याचा विचार करणेसुद्धा ‘असामान्य’ झाले आहे. आज-काल असा विचार करणाऱ्यांना ‘गद्दार’ म्हटले जाते. नुसते गद्दारच नाही, तर आणखीही बरेच काही म्हटले जाते. ते तर येथे मी लिहूसुद्धा शकत नाही.
‘कट्टर’ शब्दाला मी नकारात्मक समजतो. मला तर असे वाटते की, जर कोणी एकदा ‘कट्टर’ बनला, तर तो ‘मनुष्य’ राहूच शकत नाही. पण आताशा मला वाटू लागले की, मला माझे विचार बदलावे लागतील. परंतु मी ‘कट्टर’सारख्या भरभक्कम, सर्वत्र प्रचारित आणि अति आवश्यक झालेल्या शब्दाला फक्त धर्मासोबत जोडण्याबाबत मी कट्टर विरोधी आहे. ‘कट्टर’ शब्दाला मर्यादित न करता त्याला व्यापक करण्याची गरज आहे, असे मला वाटते. उदा. कट्टर इमानदार, कट्टर सुंदर, कट्टर ज्ञानी, कट्टर दयावान, कट्टर भावनाप्रधान, कट्टर मेहनती, कट्टर नेता, कट्टर प्रेमी, वगैरे वगैरे. ‘तो कट्टर गोऱ्या रंगावर मरतो’, ‘तो कट्टर बेरोजगार आहे’ अशी वाक्ये बोलली आणि लिहिली गेली पाहिजेत.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
काल बाजारात एक जुना मित्र भेटला.
म्हणाला, ‘यार तू खूपच ढिल्ला आहेस.’
मी त्याला विचारले, ‘मग मी काय करू?’
तो म्हणाला, ‘तुला थोडं कट्टर व्हावे लागेल.’
मी त्याचे आभार मानले.
‘कोणत्या गोष्टीसाठी तू माझे आभार मानलेस?’ त्याने मला विचारले.
मी म्हणालो, ‘तू थोडं म्हणून मला बरीच सवलत दिली आहेस.’
तो हसला व म्हणाला, ‘हे बरे झाले की, तू जागरूक झालास.’
मी म्हणालो, ‘म्हणजे आता जागावेसुद्धा लागेल?’
तो हसला आणि हाताच्या बोटांना हलवत म्हणाला, “जागं झाल्याशिवाय कट्टर बनताच येत नाही.’
“हे तर अजबच आहे. लहानपणी आई जागे करत होती, तर तरुणपणी घड्याळ. वाटलं होतं, निदान आता तरी आरामात झोपता येईल. तर तुमच्यासारखे चिंतक जागायला सांगत आहेत. रेल्वेमध्ये प्रवास करताना प्रत्येक स्टेशनवर ‘भाऊ, आता कोणते स्टेशन आले आहे’, असे विचारणारे सहप्रवाशी आरामात झोपू देत नाहीत. तसेच हे आहे.” मी तक्रार केली.
‘मित्रा आपल्याला धर्मासाठीच तर जगावे लागणार आहे.’ त्याने आपली मान हलवत म्हटले.
‘जर मी दुसऱ्या कोणा धर्माचा असतो तर?’
‘तेव्हा काही गरज नव्हती.’
‘का?’
‘ते आधीपासूनच जागे आहेत.’
‘अच्छा, तू सगळीच बितंबातमी ठेवतो वाटते. खरे तर जागवण्याचे काम चौकीदाराचे असते.’
‘जागत तर चोरसुद्धा असतात.’ असे म्हणून त्याने आपला एक डोळा मिचकावला.
‘मग मला कसे जागावे लागेल?’ मी त्याला विचारले.
‘जसा मी जागा आहे तसा.’ तो म्हणाला.
आता कुठे मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले. मोठा चमकत असलेला जबडा, जाहिरातीच्या भाषेत सांगायचे तर व्हिटामिन ई, एलोवेराने युक्त असलेला उत्साहजनक चेहरा… आणि एक मी आहे की, जागरणामुळे पुरेशी झोप न झाल्याने, माझ्या डोळ्याखाली काळे डाग पडलेले आहेत आणि हा...
‘मीही बराच वेळपर्यंत जागा राहत असतो मित्रा’ मी म्हटले.
हे ऐकून तो हसला.
‘झोप तब्येतीसाठी खूप आवश्यक आहे.’ त्याने माझ्या ज्ञानात भर घातली.
‘मग जागण्याची गोष्ट का करत आहेस?’
‘अरे यार, जागण्याचा अर्थ तो नाही, जो तू समजत आहेस.’
‘मग मी कोणता अर्थ घेऊ?’
‘जागण्याचा अर्थ जागृत अवस्था, आपल्या संस्कृतीवरील प्रेम, राष्ट्रावरील आपली भक्ती.’
‘मला वाटते, मी हे सगळं करतच असतो.’
‘जागण्याचा अर्थ देशद्रोह्यावर लक्ष ठेवणेसुद्धा आहे. धोके वाढत आहेत.’ असे म्हणून तो इकडेतिकडे पाहायला लागला.
‘ते काम तर सरकार, सैन्य व पोलीस लोकांचे आहे.’
‘तू मूर्ख आहेस, आपल्या आजूबाजूची परिस्थिती जरा समजून घे.’
‘जलसेनेतील अकरा सैनिक हेरगिरी करत असताना पकडले गेले आहेत. जर सैन्यदलच त्यांना ओळखू शकत नसेल, तर आपल्यासारखा सर्वसाधारण मनुष्य कसे काय ओळखेल?’ मी त्याला म्हणालो.
‘कपड्यावरून ओळखा.’
‘कपड्यावरून कशी ओळख होईल? सैन्याचे सर्व जवान तर त्यांच्या पोशाखातच होते. मला काही दुसरा काम धंदा नाही का?’ मी त्याला झिडकारले.
‘तुला कामधंद्याची फिकर पडली. मग तिकडे देशाला आग लागली तरी चालेल. ह्यां ह्यां’ असे म्हणून त्याने माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहिले. माझ्या लक्षात आले की, हा त्याचे म्हणणे रेटल्याशिवाय थांबणार नाही.
‘तू तर माझ्या डोळ्यात अंजन घातले मित्रा. देशासाठी मी आता जागेन. पुढच्या वेळेस जेव्हा आपली भेट होईल, तेव्हा मी पूर्णपणे जागृत झालेला असेन. कदाचित तुझ्यापेक्षाही जास्त. कारण की, मी आपल्या देशाशी नुसते प्रेम नव्हे, तर कट्टर प्रेम करत आहे.’
‘ही झाली ना गोष्ट.’ त्याने मोठ्या उत्साहात येऊन मला शाबासकी दिली.
तेव्हाच त्याच्या मोबाईलवर पटकन एक मेसेज आला. त्याने तो मेसेज मला दाखवला. त्यात म्हटले होते की, ‘जो कट्टर असेल त्याने याला लाईक करावे’. त्याने मोबाईल माझ्याकडे दिला.
‘याला लाईक कर.’ तो म्हणाला.
‘मी अजून कट्टर झालेलो नाही.’ मी त्याला हे सांगत होतो. एवढ्यात त्यानेच त्याला पटकन लाईक करून टाकले. मी माझे मन मारून त्याच्या उत्साहाकडे पाहत राहिलो.
‘आता तर आपल्या रक्षणाची जबाबदारीही आपल्या स्वतःलाच घ्यावी लागेल.’ जाता जाता तो म्हणाला.
मी पाहतो आहे की, जागण्यावर जोर कोण देत आहेत? विधानसभा-लोकसभेत जो नेता झोपा काढतो तो. मला अंधारात ठेवून माझा विमा विकणारा हा माझा परममित्र. मी जागृत तर होईन, पण मला योग्य रस्ता कोण दाखवील? मला जागवून आरामात कोण झोपेल? जर मी खरोखरच जागा झालो तर, जागवणाऱ्यांच्या चेहऱ्यासारखाच माझाही चेहरा चमकदार होणार की नाही, मला माहीत नाही. जागृत झाल्यानंतर यांना काय दिसते? मला तर जागल्यानंतर संडास दिसतो आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागल्यानंतर उजेड तर असेल ना!
मी आता बाजारात फिरत आहे. इकडेतिकडे नजर फिरवत आहे. पहा कुणीतरी म्हणत आहे की, ‘या पाकिटात इतके टक्के एक्स्ट्रा माल आहे. कुणी म्हणत आहेत की, ‘ही नुसती बचत नाही तर महाबचत आहे.’ आजकाल सरळ मार्गाने कोणतेच काम होत नाही. आपल्या विक्रीनंतर हे प्रॉडक्टसुद्धा कट्टर बनले आहेत, परंतु मी तर मनुष्य आहे. मी विचार करतो. मला काय विकावे लागेल? काय खरेदी करावे लागेल? माझ्या कट्टर होण्याने कोणाचे भले होणार आहे? काय भले होणार आहे आणि जर होणारच असेल तर ते कसे होणार आहे? आम्ही मतदान करून ज्यांना निवडून दिले होते, तेच आज आम्हाला कट्टर होण्याचे सांगत आहेत. मी विचार करतो, कट्टर होऊन मला काय मिळेल? परंतु पिढी दर पिढी त्यांच्या पक्षाला आमचे ‘मत’ मात्र जरूर मिळेल. अर्थात कट्टर होणे याचा अर्थ पिढ्यानपिढ्याची ‘व्होट बँक’ होण्याची खात्री.
फिरता फिरता मी केळीवाल्याच्या गाडीजवळ आलो आहे.
‘कट्टर केळी काय भाव आहेत?’ भांबावलेल्या स्थितीत मी केळीवाल्याला विचारले.
‘५५ रुपये डझन’
‘बापरे’ दाम तर खरोखरच कट्टर आहेत, मी असा विचार करत करतच पुढे जायला लागलो.
‘५०मध्ये देईन.’ तो आपली कट्टरता काहीशी कमी करत बोलला. माझ्या हिशेबाने तर ती किंमतही जास्तच होती. मला हे माहीत आहे की, किमतीची कट्टरता पक्की करण्यामागे याचा काहीच हात नाही. तोसुद्धा माझ्यासारखाच आहे. ‘कवी म्हणू इच्छितो की…’प्रमाणे आम्ही तसेच दटून चालणारे लोक आहोत, ज्यांनी आम्हाला रेटून टाकले आहे.’
‘नाही, नाश्त्यामध्ये आज मी गर्व खाईन.’ मी त्याला म्हटले.
‘आज तर खाऊन टाकाल सर, पण उद्या?’ तो हसतच म्हणाला.
‘आज मी जो गर्व खाल्लेला आहे, तो मला पचणार नाही, याची मला जाणीव आहे. तो पचवण्यासाठी मानवतेचा त्याग करावा लागेल. इतिहास बदलावा लागेल. उद्या वांती होणारच आहे. नाश्त्याची स्थिती आणि तब्येत जर चांगली राहिली नाही तर...’
एवढ्यात तो म्हणाला, ‘पण परवा, सर?’
‘हो, पण परवा काय?’ मीही विचारात पडलो.
‘परवा तुझी केळ्याची गाडी उलटून लुटून टाकीन.’ मी त्याची गंमत केली. तो नाराज झाला. मला लाज वाटली नाही, तर राग आला. हा या गमतीला इतका गंभीरपणे का घेत आहे? गमतीलाच खरे का बरं समजत असेल.
‘मी तर तुझी गंमत करत आहे.’ मी त्याला स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर तो एक स्मित हास्य करतो. पण अजूनही त्याला ते खरे वाटत नाही.
काही दिवसांनी मी अचानकपणे माझ्या जागृत मित्राच्या घरी टपकलो. गेल्या गेल्या तेथे असलेल्या सोफ्यावर बसत मी माझ्याकडील कट्टा काढून त्याच्याकडे दिला. तो उडालाच. जसे लहानपणी कोणावर तरी प्लास्टिकचा साप फेकल्यानंतर होते, तसे त्याचे झाले.
‘हे काय आहे?’ त्याने आश्चर्यचकित होऊन विचारले.
‘कट्टा आहे.’
‘होय, ते तर मलाही दिसत आहे.’
‘तू म्हटला होतास ना, की कट्टर बन म्हणून.’
‘मग?’
‘मी तुला सांगितल्याप्रमाणे आता मी तुझ्यापेक्षाही जास्त कट्टर बनलो आहे. हा कट्टा मी तुझ्या मुलासाठी आणला आहे.’
‘पागल झालास काय? असा कसा काका आहेस तू, लेखणीऐवजी कट्टा देत आहेस?’ तो रागाने म्हणाला. मी त्याचा राग समजू शकत होतो.
‘हा कट्टा तुझ्या मुलाला जाऊन दे.’ तो म्हणाला.
‘मित्रा मी पूर्णपणे कट्टर झालो आहे. त्यामुळे मी त्याला अगोदरच एक कट्टा देऊन आलो आहे.’
तो लगेच जाग्यावरून झटक्याने उठला. माझा हात हातात पकडून मला उठवत म्हणाला, ‘तुला आता आरामाची गरज आहे. बऱ्याच दिवसापासून तू शांतपणे झोपला नाहीस असे दिसते. घरी जाऊन चांगली झोप घे.’
मी निघताना तो मागाहून हळूच थोपटून मला म्हणाला ‘आणि हा घेऊन जा.’ त्याने तो कट्टा माझ्या हाती दिला.
रोडवर येऊन मी हसलो. खूप हसलो.
पुन्हा त्या केळीवाल्याकडे गेलो. तो मला पाहून थोडासा घाबरला.
‘हे काय आहे सर?’ त्याने घाबरतच मला विचारले.
‘कट्टा’
तो सटपटला.
‘अरे, लहान मुलांचे खेळणे आहे ते.’ हे सांगितल्यावर तो आणखीच घाबरला. असं काय चुकीचं बोललो मी, मी थोडा वेळ विचार केला.
‘अरे, हे प्लास्टिकचे खेळणे आहे. नकली आहे पूर्णपणे.’ मी त्याला दिलासा देत म्हणालो.
‘पण तो पूर्णपणे खरोखरचाच वाटला सर.’
‘हीच तर खरी भानगड आहे. आजकाल लोक नकलीलाच असली समजू लागले आहेत.’
तो हसतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘केळी तर कट्टर आहेत ना?’
‘खूपच कट्टर आहेत. खाऊन तर बघा.’
‘आत्ताच एकाला हिसका दाखवून आलो आहे.’
‘जी’ तो माझ्याकडे न्याहाळून पाहत राहिला.
‘काही नाही, तुला नाही समजणार ते.’ मी हसत म्हटले.
‘का नाही समजणार सर? केळ्याबरोबर आम्हालाही कट्टर समजत आहात का तुम्ही?’
मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. या गोष्टीवर तर आज मी कट्टर केळी खाणारच. मी केळी खरेदी केली. केळी खाऊ लागलो.
केळी कट्टर असो की नसो, पण गोड मात्र नक्कीच आहेत.
‘कट्टर गोड आहेत सर.’ तो म्हणाला
आम्ही दोघेही हसतो.
मराठी अनुवाद - कॉ.भीमराव बनसोड
.................................................................................................................................................................
हे मूळ हिंदी व्यंग्यलेखन ‘देश-विदेश’ या हिंदी मासिकाच्या ऑगस्ट २०२२च्या अंकात प्रकाशित झाला आहे. मूळ लेखनासाठी पहा –
https://deshvidesh.net/entries/view/in-dinon-kattar
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment