चंद्रपुरात ८ व ९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान तिसरं राज्यस्तरीय साहित्य संमेलन’ पार पडलं. साहित्य व संस्कृती मंडळ आणि सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या भाषणाचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
मित्रहो,
चंद्रपूरमध्ये होणाऱ्या विदर्भ साहित्य संमेलनाला उद्घाटनाचा प्रमुख पाहुणा म्हणून मी येणार होतो. पण ते संमेलन लांबणीवर पडलं आणि तो हुकलेला योग आज या संमेलनाचा अध्यक्ष करून तुम्ही घडवून आणला आहे. या संमेलनाचे उद्घाटक भारत सासणे हे ‘नियती’वादी लेखक जी. ए. कुलकर्णी यांचे सहोदर समजले जातात. कदाचित त्या नियतीनेच माझा चंद्रपूरला येण्याचा हुकलेला योगायोग आज पुन्हा जुळवून आणला असेल. तुमचे आणि त्या नियतीचेही मी सुरुवातीलाच खूप खूप आभार मानतो. कारण याआधी चंद्रपुरात वाङ्मयीन कार्यक्रमासाठी मी एकदाही आलेलो नाही.
मला आधी वाटायचं चांदगड आणि चंद्रपूर ही दोन वेगळी गावं आहेत. पण ती एकाच गावाची दोन नावं आहेत, हे नंतर समजलं. आधी मला चांदगड हेच नाव माहीत होतं. आमच्या भागातला संपूर्ण मातंग समाज इथल्या देवीचा भक्त होता. आमच्या शेतात कामावर येणाऱ्या बाया दिवसभर चांदगडच्या आईची गाणी म्हणतच काम करायच्या. त्या गाण्यातून चांदगडचं म्हणजे चंद्रपूरचं सगळं वर्णन त्या करायच्या. इथले रस्ते, इथले पहाड, देवीचं मंदिर याचं वर्णन त्या गाण्यात ऐकून, मी या गावाची जी कल्पना केली होती, तसं काही हे गाव, मी प्रथम १५ वर्षांपूर्वी आलो, तेव्हा मला दिसलं नाही. लोकसाहित्यात सगळ्याच गोष्टींचं उदात्तीकरण केलेलं असतं. संतसाहित्यातलं पंढरपूरचं वर्णन ऐकून आपण पंढरपूरकडे पाहायला गेलो तर असंच होतं. वास्तवाला उदात्त करण्याचं काम साहित्य करत असतं. त्या साहित्याच्या वाचन-श्रवणातून माणसाचं जगणंही तसंच उदात्त होत असतं.
जसं मी लहानपणी लोक साहित्यातून चांदगड समजून घेतलं, तसंच ते पुढं कविता वाचू लागल्यावर वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेतूनही मला दिसलं. ‘योगभ्रष्ट’ या कवितेत इथलं सगळं वर्णन आलेलं आहे. गंमत म्हणजे त्या कवितेत आमच्या गावाच्या भक्तांचाही उल्लेख आहे, ज्या भक्तांची गाणी मी लहानपणी शेतात ऐकत होतो. त्या कवितेतल्या वर्णनानं आम्हाला चंद्रपूरचं वेगळं दर्शन घडवलं. आमच्या पिढीवर डहाके यांच्या या ‘योगभ्रष्ट’ कवितेचा खूप प्रभाव होता. सुरुवातीच्या काळात जितका लोकगीताचा, तितकाच पुढे या कवितेचा प्रभावही आमच्यावर होता. या दोन्हींचा तुलनात्मक अभ्यास हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मी दहावीच्या वर्गात शिकत होतो, तेव्हा १९८० साली आमच्या गावात वीज आली. आमचं गाव झगमगून उठलं. अशी तिकडची अनेक गावं झगमगीत करण्याचं काम परळी वैजनाथ इथल्या औष्णिक केंद्रातून निर्माण झालेल्या विजेनं होत होतं, हे मला नंतर समजलं. हळूहळू हेही समजलं की, हे औष्णिक केंद्र चंद्रपूरवरून येणाऱ्या कोळशावर चालतं. आणि आता हेही समजतंय की, आम्हाला उजळवणारा हा कोळसा तुम्हाला मात्र काजळवतोय... हा परिसर प्रदूषित आणि उद्ध्वस्त करतोय. ही धग प्रथम जाणवली ती वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेतून… आणि आता त्याचा स्फोटक आविष्कार झालाय तो किशोर कवठे यांच्या ‘दगान’ या नव्या संग्रहातून.
तुमच्या या भागाला ‘झाडीपट्टी’ म्हटलं जातं. ज्ञानदेव, तुकाराम इकडं कधी आले नाही, पण चक्रधरांनी या प्रांतातून पुष्कळ मुशाफिरी केलेली आहे. ते ‘लीळाचरित्रा’तून आपणाला वाचायला मिळतं. सालबर्डीच्या डोंगरातल्या तपश्चर्येनंतर रीद्धपुरात शक्ती स्वीकार करून ते या झाडीपट्टीच्या भागात आले. आदिवासींसोबत राहिले. आदिवासींनी वेळूच्या कांड्यात रांधलेला वेळूभात त्यांनी खाल्ला. त्यांची किलू-किलू भाषा ऐकली. समजून घेतली. इथल्या गोंड माडियांचे ते पाहुणे झाले. इथल्या एका स्त्रीशी त्यांनी विवाह केला आणि नंतर त्या विवाहाचा त्यागही केला. त्या सगळ्या पाऊलखुणा ‘लीळाचरित्रा’त उमटलेल्या आहेत. मी जन्माने महानुभाव. त्यामुळे लहानपणापासून त्या लीळा वाचत, अभ्यासत आलोय. त्यातून या परिसराचं एक दृश्यभान लहानपणीच माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं होतं.
मराठी नवकथेला पायवाट तयार करून देणारे आमच्या परभणीच्या बी. रघुनाथांचे समकालीन कथाकार वामनराव चोरघडे हेही मला वाटतं इथलेच. शालेय जीवनापासून त्यांच्या कथांनी मला वेड लावलं होतं. त्यांच्या समग्र कथेचा खंड आणि त्यांचं ‘जडणघडण’ हे आत्मचरित्र मी महाविद्यालयीन जीवनात वाचलं होतं, आणि त्यात पूर्ण विरघळून गेलो होतो. त्यांची मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेली भेट मला रोमांचित करणारी होती. माझ्या उमेदीच्या काळात त्यांनी माझ्या कविता वाचून लिहिलेलं पत्र मला हजार हत्तींचं बळ देणार ठरलं.
त्यांच्यानंतरचे तितकेच महत्त्वाचे कथाकार के. ज. पुरोहित उर्फ शांताराम हेही झाडीपट्टीतलेच. सुदैवानं १९८६ साली पन्हाळगडला झालेल्या नवलेखक शिबिरात मला त्यांच्यासोबत तीन दिवस राहता आलं. प्रत्यक्ष डहाके सरांनी आणि त्यांच्या कवितेने तर मला कायमच बळ दिलेलं आहे. तेही याच भूमीतले. ज्यांना माझं कायमच कौतुक वाटत आलं ते ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवारही चंद्रपूरचेच. त्यांनी नेहमीच माझ्या कवितेचं बोट धरून तिला पुढं नेलं.
अण्णाभाऊ साठे आणि शंकरराव खरात यांच्यानंतर तितक्याच सामर्थ्यानं उपेक्षितांचं जगणं कादंबरीत आणणारे आजचे यशस्वी कादंबरीकार, ‘बिराड’कार अशोक पवारही मूळचे आमच्याकडचे असले तरी आता ते चंद्रपूरकरच झालेले आहेत. त्यांनीही एक-दोनदा मला इकडे बोलवण्याचा प्रयत्न केला होता, पण योग आला नव्हता. तो या संमेलनाच्या निमित्ताने आला.
इथल्या हरिश्चंद्र बोरकरांनी संपादित केलेला ‘आदिवासी कविता’ हा प्रातिनिक संग्रह मी त्यांच्याकडून पोस्टानं मागवला होता. जिंतूरच्या महाविद्यालयातल्या कवितेच्या नादी लागलेल्या एका आदिवासी मुलालाही मी त्याची एक प्रत दिली होती. त्याचं जीवन त्याला साहित्यात कसं आणायचं ते सोदाहरण कळावं, म्हणून त्याला ती आदिवासी कविता वाचायला लावली होती. त्या संग्रहातून या परिसरातले विनायक तुमराम, प्रभू राजगडकर, उषाकिरण आत्राम, कुसुम आलाम, बाबाराव मडावी, सुनील कुमरे, पितांबर कुडावे, अशोक तुमराम इत्यादी कवी मलाही वाचता आले, अनुभवता आले. आदिवासींचं अनोखं, अस्पर्शीत, अनघड आणि अवघड जगणं समजून घेता आलं. त्यातून झालेला मराठी कवितेचा परिघाबाहेरचा विस्तार मोजता आला. वाचक म्हणून स्वतःला समृद्ध करता आलं.
ज्या शेतकरी आंदोलनानं माझी कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली, त्या चळवळीचे अगदी सुरुवातीपासूनचे एक लढवय्ये नेते वामनराव चटपही याच भागातले. पंधरा दिवसांपूर्वीच १७ सप्टेंबरच्या मुक्तिदिनाच्या निमित्ताने त्यांच्याकडे मी राजुऱ्याला येऊन गेलो. संघटनेच्या या कार्यकर्त्यानं माझ्या कवितेला नेहमीच बळ दिलेलं आहे. शेख इरफान आणि त्यांचे तरुण मित्र मला राजुऱ्यालाच भेटायला आलेले होते. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हेही लक्षात आलं की, झाडीपट्टीचे तीन तालुके राजुरा, कोरपाना आणि जिवती हेही आमच्यासोबत निजामाच्या जोखडाखाली अडीचशे वर्षं होते. त्या अर्थानेही झाडीपट्टीची आणि आमची पूर्वीपासून जवळीक होती, हेही लक्षात आलं.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आम्ही तिकडून इकडे येऊन तुम्हाला काही शहाणपण शिकवावं असं नाही. तुम्ही इतर महाराष्ट्रापेक्षा लाख पटीनं चांगले आहात. बाकीच्यांसारखे तुम्ही जातीय दंगली करत नाहीत. इतक्या जाती-जमातीचे आणि इतक्या प्रांताचे तुम्ही लोक आपला-परका पाहत नाहीत. आपापल्या भाषा प्रेमानं सांभाळता, पण कुठल्या भाषेसाठी भांडत बसत नाहीत. आपल्या देशात विविधता सगळीकडे आहे, पण इथं सगळ्यात जास्त विविधता असूनही एकता मात्र इथंच आहे, जी इतरत्र दिसत नाही. त्यामुळे तुमच्याकडून इतरांनी शिकण्यासारखं खूप खूप आहे.
निसर्गानं तुम्हाला भरभरून दिलं. तुम्ही ते जपलंही आहे. ते निसर्गाचं निरागसपण तुमच्यातही उतरलेलं आहे. मारुती चितमपल्ली यांना अनुभवसंपन्न करून निसर्गसाहित्याचे दालन मराठीत उघडायला झाडीपट्टीनेच प्रवृत्त केलेलं आहे. व्यंकटेश माडगूळकरांसारखा सिद्ध लेखक निसर्ग अनुभवायला इथेच येऊन गेला. आणि त्या अनुभवावर त्यानं काही पुस्तकंही लिहिली. पवनीचे माधवराव पाटील निसर्गपुत्र म्हणूनच आयुष्यभर वावरले. त्यांनी प्रतिभावंतांना निसर्गाचं व्याकरण शिकवलं. पण निसर्गाचे पुत्र आदिवासी मात्र अविकसितच राहिले. त्यांच्या विकासासाठी सन्मार्गानं जाणारे मोहन हिराबाई हिरालाल, बाबा आमटे, प्रकाश आणि विकास आमटे, अभय, राणी आणि अमृत बंग ही मंडळी, तसंच वाईट मार्गानं जाणारे नक्षलवादीही आले. लेखनासाठी विषय पुरवणारे असे कितीतरी विषय इथं सतत भोवती दिसतातच. आमटे मंडळींनी मराठी साहित्यालाही मोठं योगदान दिलेलं आहे. बाबा आमटे यांच्या कविता आणि पुढच्या पिढींची अनुभवकथनं मराठीला समृद्ध करणारी आहेत.
माझ्यासारख्या शेतकरी कवींना कायम आकर्षित करणारे भातसंशोधक दादाजी खोब्रागडे आणि आदिवासी विकासक देवाजी तोफा तुमच्या या झाडीपट्टीतलेच. त्यांचं जीवन मला कवितालेखनासाठी कायम आकर्षित करत आलेलं आहे. पुढंमागं ते माझ्या दीर्घ कवितेचाही विषय होऊ शकतात. इतका मी त्यांच्या कामानं भारावलेला आहे. माझ्या ‘भूमीनिष्ठांच्या मांदियाळी’तले पुढचे भूमिनिष्ठ हेही असू शकतात. इथल्या भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीला जी संस्कृती जोडली, ती तर मला आद्य ग्रामीण कविताच वाटते. इथले शेतकरी भात पिकाची लावणी, भांगलणी आणि काढणी करताना जे दंडगाण गातात, त्या ग्रामीण कविताच असतात. बांधावर उभे राहून म्हटल्यामुळे त्याला दंडगाण म्हणतात ही कल्पनाही मला मोठी काव्यात्मक वाटली. दंडगाण हा शब्दही किती लयबद्ध आहे!
इथली झाडीबोलीची साहित्य चळवळही मला फार महत्त्वाची वाटते. कारण तो इथल्या भूमीचा उद्गार आहे. या चळवळीतले हरिश्चंद्र बोरकर, सदानंद बोरकर, अनिरुद्ध बनकराळे, बापूराव टोंग, धनराज खानोरकर, लक्ष्मण खोब्रागडे, संतोष मेश्राम, अरुण झगळकर, सुनील पोटे हे लिहिते लेखक मी अधूनमधून वाचलेले आहेत. आधीच्या पिढीचे ज्योती लांजेवार, मदन धनकर, पद्मरेखा धनकर, हिरामण लांजे, लखनसिंह कटरे, तीर्थराज कापगते, ही नावं तर महाराष्ट्रभर परिचित आहेत. मेघराज मेश्राम यांच्या ‘माणूस असण्याच्या नोंदीं’नी तर मी अक्षरशः वेडा झालेलो आहे. शिवाय ना. गो. थुटे, शामराव मोहरकर, विद्याधर बनसोड, राजेश मडावी यांचंही थोडेफार लेखन माझ्या वाचनात आलेलं आहे.
माझ्या साहित्यावर संशोधन करून पीएच.डी. मिळवणारे माझे मित्र राजकुमार मुसने सरही मूळचे आमच्या मराठवाड्यातले असले आणि गडचिरोली जिल्ह्यात आष्टीला प्राध्यापक असले तरी, राहतात मात्र चंद्रपुरातच. शिवाय आजचे नव्या दमाचे समीक्षक, नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख, आणि आमचे मित्र प्रमोद मुनघाटे हे मूळचे याच परिसरातले. त्यांचे वडील गो. ना. मुनघाटे यांचेही लेखन एकेकाळी मी मोठ्या आवडीनं वाचलेलं आहे. माझ्या पिढीचे कवी लोकनाथ यशवंत तर माझे अत्यंत आवडते कवी आहेत आणि मित्रही आहेत. इसादास भडके, विद्याधर बनसोड या आंबेडकरवादी लेखक कवींनाही मी ऐकून-वाचून आहे. आंबेडकरवादी चळवळीनं झाडीबोलीलाही बळंच दिलेलं आहे.
झाडीपट्टीतल्या नाट्यचळवळीतून उदयाला आलेले प्रेमानंद गज्वी यांनी तर मराठी नाट्यसृष्टीला अनेक अभिजात नाटकं दिलेली आहेत. ‘घोटभर पाणी’ या चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेल्या एकांकिकेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अथक आणि आश्चर्यचकित करणारा आहे. ‘तनमाजोरी’, ‘देवनवरी’, ‘किरवंत’, ‘पांढरा बुधवार’, ‘गांधी-आंबेडकर’ अशी एकाचढ एक नाटकं त्यांनी मराठी नाट्यसृष्टीला दिलेली आहेत. या संमेलनाचे समन्वयक इरफान शेख हे मराठी कवितेतलं एक आश्वासक नाव आहे. इतक्या कमी वयात त्यांनी महाराष्ट्रभर आपली ओळख निर्माण केलेली आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मला या संमेलनाच्या निमित्तानं एका महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करावीशी वाटते, ती आहे आपल्या वाङ्मयीन पर्यावरणाविषयीची. मराठीतला वाङ्मयव्यवहार निर्मळ असावा, असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. पण सध्याचं वातावरण तसं नाही, ही खेदाची बाब आहे. पूर्वी काही मोजक्या साहित्य संस्था, मोजली मासिकं आणि प्रकाशन संस्थाही मोजक्याच होत्या. तसे लिहिणारेही मोजकेच होते. त्यांच्यात्यांच्यात स्पर्धा आणि असूया असेलच, पण ती बाहेर फारशी दिसत नसेल. त्यामुळे लेखकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आदर्शवादी होता. सगळं काही मोजकं होतं, पण त्यातल्या चांगुलपणाची चर्चा मात्र अमाप व्हायची.
स्वातंत्र्यानं सगळ्यांना कायदेशीर स्वातंत्र्य आणि हक्क दिले. सगळे समाज शिकू, लिहू लागले. वाचणारे वाढले, लिहिणारे वाढले, साहित्य संस्था वाढल्या, मासिकं वाढली, पुरस्कार वाढले आणि साहित्य संमेलनं, साहित्यिक उपक्रमही वाढले. स्पर्धा वाढली, भांडणं वाढली आणि अराजकाची स्थिती निर्माण झाली. खरं तर स्वातंत्र्य तुम्हाला जसे हक्क देतं, तसेच काही कर्तव्यं आणि जबाबदाऱ्याही देतं. पण आपण स्वातंत्र्य तेवढे घेतो आणि जबाबदाऱ्या नाकारतो. दलित साहित्याच्या पहिल्या पिढीचं प्रस्थापित मान्यवर लेखकांनी खूप कौतुक केलं. त्यांना सन्मानानं शेजारी बसवलं, आपलं म्हटलं. त्यांचा विद्रोह मान्य केला. पुढे प्रस्थापित लेखकांची पुढची पिढी आणि दलित लेखकांचीही पुढची पिढी यांच्यातले ऋणानुबंध आधीच्या पिढीसारखे निर्मळ राहिले नाहीत. ते आता एकमेकांच्या स्पर्धेत आले. आधीच्या पिढीचं युद्ध वाङ्मयीन होतं. पुढं ते हातघाईवर आलं. यातून ‘तुमचे तुम्ही, आमचे आम्ही’ अशा वाटण्या झाल्या.
धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व घटनेत घालणाऱ्या बाबासाहेबांचे अनुयायीही धर्मसापेक्ष झाले. माझा धर्म तेवढाच खरा म्हटलं की, निरपेक्षतेचं तत्त्व नष्ट होतं. तिथून सापेक्षतेला सुरुवात होते. रस्त्यावर येणाऱ्या सर्वच धर्माच्या स्पर्धेत बाबासाहेबांचाही धर्म रस्त्यावर आला आणि सर्वांनाच वाटायला लागलं- बराय आपला गावचा गोठा. इथं कुणी कुणाचा पराभव केला हा विषय महत्त्वाचा नाही. अशा वेळी माणुसकी पराभूत होते आणि माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट असते, असं मला वाटतं.
दलित लेखकांच्या पहिल्या पिढीत सर्व जाती-धर्माचे लेखक होते. त्या साहित्याची दलित लेखक म्हणून सन्मानानं चर्चाही होत होती. हळूहळू ते आपले नाहीत, अशी कुजबुज सुरू झाली. त्यातून सवर्ण बाजूला पडले, पण अवर्णापैकीही बौद्धेतर आपले नाहीत, अशीही चर्चा सुरू झाली. प्रातिनिधिक संपादनातून त्यांची नावं गळू लागली. दलित साहित्याची व्याख्या जसजशी काटेकोर होत गेली, तसतशी ज्यांना काटे टोचू लागले, त्यांनी वेगळी वाट धरली. मग जातीवर झालेल्या चिरफळ्या फारच बारीक होत आहेत म्हटल्यावर काही जाती वर्णावर एकवटल्या आणि त्यांनी आपले समूह मोठे करून दबाव गट निर्माण केले. राजकारणातले दबाव गट साहित्यात आले, त्याबरोबरच वाङ्मयाचे निकषही राजकीय रूपात बदलले गेले. इथूनच साहित्यात अराजक सुरू झालं. स्वातंत्र्यानंतर समाज एकमय होण्याऐवजी शतखंडित झाला.
अशा वेळी नव्याने लिहिणाऱ्यांना कुणाच्या तरी पालखीचे भोई झाल्याशिवाय दिंडीत प्रवेश मिळेनासा झाला. सगळ्याच दिंड्या साहित्य पंढरीच्या रस्त्याने निघालेल्या असल्या तरी फडकऱ्यांनी आपापले नियम काटेकोर केल्यामुळे एकाच रस्त्याने जाणाऱ्या या दिंड्यांचे क्रम ठरले, महंत ठरले, नियम ठरले. आणि विशाल साहित्यदिंडी तयार होण्याऐवजी शतखंडित दिंड्या तयार झाल्या. पालखीचे भोई मात्र आपापल्या दिंडीपुरतेच मर्यादित राहिले. अख्या ‘मराठी विश्वा’चा कवी होण्याऐवजी ते ‘मर्यादित विश्वा’चे कवी होऊ लागले. खऱ्या भक्तांमध्ये जेव्हा अराजक सुरू होतं, तेव्हा खोटे भक्त त्याचा फायदा उठवतात. आणि पुन्हा एकदा बडवेच शिरजोर होतात.
हे सगळं जे होतं ते कशासाठी? मान-मरातब, पदक-पुरस्कार, अध्यक्षपद याच्यासाठीच ना? खरं तर ज्यांच्याकडे खरीखुरी प्रतिभा असते, ते या कशातच पडत नाहीत. ते आपल्या भावविश्वात रममाण असतात. निसर्गानं तुम्हाला प्रतिभा दिली, तो तुमचा सगळ्यात मोठा सन्मान असतो. त्यापुढे स्वागत-सत्कार, मान-सन्मान, हार-तुरे, पद-पुरस्कार या सगळ्याच गोष्टी इतक्या तुच्छ असतात की, खऱ्या प्रतिभावंताचं तिकडं लक्षही नसतं. आपण भले आणि आपलं लेखन भलं, यातच त्यांना खरा आनंद वाटत असतो. इतक्या भाषांमध्ये, इतक्या लेखक-कवींनी, इतकं लिहून ठेवलेलं आहे की, माणसानं आपली कितीही आयुष्यं खर्चिली तरी त्यासाठी पुरणार नाहीत. त्यामुळे आपण आपलं वाचत बसावं. बोलावलंच कुणी तर आनंदानं जावं. नाहीच बोलावलं तर त्यापेक्षाही जास्त आनंदानं वाचत-लिहीत बसावं.
साहित्याने माणसं जोडण्याचं आणि समाज घडवण्याचं काम करावं, हे सगळ्यांनाच मान्य असतं. पण तसं होताना दिसत नाही. छोट्या छोट्या कारणासाठी कवी, लेखक एकमेकांवर धावून जातात. शब्दांचा दुरुपयोग करतात. त्यांच्याकडून समाजानं काय अपेक्षा कराव्यात? जगातल्या सगळ्याच गोष्टी आपणाला आवडतील असं नाही. जे पटत नाही, आवडत नाही ते टाळून जगता येतं. आपली स्पर्धा, आपली इर्ष्या कुणाबाबतही नसावी. साहित्यातून काही महत्त्वाकांक्षा अपेक्षित करणं इथूनच आपण चुकायला सुरुवात करतो. साहित्यातून प्रबोधन करताना कुणाला खलनायक ठरवण्याची गरज नसते. त्यातून आपण उलटा परिणाम साधत असतो. अशामुळे खळांची व्यंकटी संपत तर नाहीच, उलट ती वाढत जाते. वास्तव न लपवताही आपणाला सामोपचार साधता येतो. कबीर विद्रोही होते, पण त्यांचं कुणाशी वैयक्तिक वैर नव्हतं. फुले किती विद्रोही होते, पण त्यांचंही कुणाशी वैयक्तिक वैर नव्हतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
वर्तमान लेखक-कवींमध्ये खुलेपणा, दिलदारपणा राहिलेला नाही. वेगवेगळी निमित्ते आणि कारणं पुढे करून कोतेपणालाच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जाते. कधी साहित्याच्या दर्जाचं निमित्त केलं जातं, कधी विचारांची बांधिलकी पुढं केली जाते, कधी कुणी जाणून-बुजून निरपेक्ष राहणार असेल, तर त्याला कुणीकडे तरी ओढलं जातं किंवा ढकललं जातं. तत्त्वाच्या गप्पा मारत वचावचा भांडणाऱ्यांच्या भांडणापाठीमागे निव्वळ स्वार्थ उभा असल्याचं दिसतं. प्रसिद्धी, पुरस्कार, अभ्यासक्रम, लोकमान्यता असल्या शूद्र गोष्टींसाठी गट तयार करून खुन्नस धरले जातात, सूड उगवला जातो… बिभत्स राजकारणही केलं जातं. राजकारण्यांपेक्षा जास्त किळसवाणा प्रकार केला जातो. खरं तर खुल्या मनानं, दिलदारपणे एकमेकांकडे पाहता यावं. सगळ्यांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
भोवतीच्या वाङ्मयव्यवहारानं मी व्यथित आहे, म्हणून त्याचं थोडंफार आकलन मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्यात माझं आकलन काही चुकलं असेल, तर आपण दुरुस्त करावं. पण आपण सगळे एकत्रित राहूयात. सगळे सगळ्यांना कवेत घेऊयात. ‘पसायदान’ आपणाला कितीही भाबडं वाटलं तरी ते निदान सामोपचाराचा एक आदर्श आपल्यासमोर ठेवतं. त्याचं आपण आचरण करूयात.
या ‘सूर्यांश साहित्य संमेलना’च्या संयोजनात मला ‘पसायदाना’तलं चांगुलगुण दिसलं. सगळ्यांना कवेत घेण्याची क्षमता दिसली. आपण आपल्या संस्थेचं नावच ‘सूर्यांश’ असं ठेवलंय. सूर्याचा अंश म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे सत्य. आपला वारसा प्रकाशाचा, सत्याचा आहे. आपण तो सर्वांना वाटूयात, पसरवूयात, वाढवूयात. त्या विश्वात्मक देवाचा अंश होऊयात…
...............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment