कुछ रंग प्यार के ऐसे भी… घिसेपिटे, टिपिकल!
सदर - सिनेपंचनामा
शर्मिला फडके
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 18 March 2017
  • सिनेपंचनामा शर्मिला फडके Sharmila Phadke मालिका TV Serial

बऱ्याच वर्षांपूर्वी (२००१) ‘कसौटी जिंदगी की….’ नावाच्या मालिकेचे बरेच भाग मी पाहिले होते. प्रेरणा, अनुराग आणि मिस्टर बजाज असा काहीतरी त्या मालिकेमधल्या प्रेमाचा त्रिकोण होता. त्यानंतर (२००७) मध्ये ‘दिल मिल गये’ नावाच्या मालिकेचे काही भाग पाहिले. ही वैद्यकीय क्षेत्राच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकहाणी होती. त्यानंतर (२०१२) ‘कबुल है’ नावाच्या मालिकेचे काही भाग पाहिले. मुस्लिम सोशल्स सिनेमांसारखा माहौल त्यात होता. त्यानंतर आता (२०१७) ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ नावाची मालिका (अजून तरी) पाहते आहे.

(आता मी या मालिका मुळात इतक्या तरी पाहिल्याच का? मला बाकी काही ‘चांगले’ उद्योग नाहीत का, असे विचार तुमच्या मनात नेहमीप्रमाणे येणारच. माझ्यासकट इतर लाखो-करोडो भारतीय टीव्ही मालिका अधूनमधून/ नेमाने/ नाईलाजाने का पाहतात? हा एक स्वतंत्र संशोधनाचा, सर्व्हेचा आणि अर्थातच लेखमालेचा विषय आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी).

तर मी अध्येमध्ये बरीच मोठी गॅप गेल्यावर बघितलेल्या या ठळक चार मालिका… बऱ्यापैकी प्रातिनिधिक अशा लोकप्रिय, हायेस्ट टीआरपी मिळवलेल्या ‘रोमँटिक’ मालिका. आज त्यांच्याबद्दल आठवून पाहताना काही विलक्षण गोष्टी लक्षात येतात. त्यापैकी सर्वांत गमतीशीर त्यातल्या नायक-नायिकेच्या ‘रोमँटिक’ दृश्यांचं सादरीकरण.

दृश्य १ - हवेच्या झोत, तिचे सुळसुळीत केस उडत आहेत, नजर त्याच्या नजरेत अडकलेली, मग ती जायला वळते, पाठमोरी होते आणि तो तिच्या कंगन सुशोभित मनगटाला अलगद पकडतो, ती थबकून मान मुरडून पाहते, तिचा लालजर्द झिरझिरित दुपट्टा त्याच्या चेहऱ्यावर...

दृश्य २ - दोघांची टक्कर, तिच्या हातातलं पीठ/ रंग/ फुलं/ पाणी/ चहा त्याच्या शर्टवर किंवा टक्कर इतकी जोरदार की ती पडते, तिच्या अंगावर तो, दोघे गडगडतात. दोघांच्या नजरा अडकतात... पाच मिनिट, पंधरा मिनिट... पॉज.

दृश्य ३ - तिचं हायहिल्स घातलेलं पाऊल वाकडं पडतं, ती पडायच्या बेतात, पण तो तिला अलगद हातांवर झेलतो... राज-नर्गिस स्टाइल.

दृश्य ४ - यावेळी ती खरंच पडते, तो तिला झटकन दोन्ही हातांवर उचलून घेऊन जातो, तिचा लाजरा चेहरा त्याच्या कुशीत. स्लोओओ मोशन..

दृश्य ५ - ती भिंतीला टेकून उभी, त्याचा हात तिच्या चेहऱ्याच्या बाजूला भिंतीवर टेकलेला, दोघांचा टाईट क्लोज अप.

दृश्य ६ - तो आणि ती दोघे घरात एकटे, शोभिवंत मेणबत्त्या पेटलेल्या, तलम पडदे उडताहेत, भिंतीवर मोगऱ्याच्या, झेंडूच्या माळा, लेटेस्ट बॉलिवुड गाण्याच्या ओळी वाजताहेत.

दृश्य ७ - पाऊस, ती स्वत:भोवती गिरक्या घेत पावसाच्या धारांमध्ये भिजतेय, तो अनिमिष नजरेनी तिच्याकडे पाहतो, मग तोही भिजण्यात सामिल होतो.

दृश्य ८ - ती ब्लाउज/ड्रेसची पाठीवरची झिप लावण्याचा निष्फळ प्रयत्न ड्रेसिंग टेबलासमोर बसून करते आहे. तो आत डोकावतो, मग हळूवारपणे तिच्या पाठीला स्पर्श न करता झिप लावून देतो.

या सगळ्या दृश्यांच्या पार्श्वभूमीवर गिटारचे स्वर, रोमँटिक हिंदी गाणं, सुळसुळीत केस उडणं, गुलाबांच्या पाकळ्या, आकाशात चंद्र, गच्चीतला गार वारा.. हे सगळं कॉमन. म्हणजे २००१ पासून आजपर्यंत मधल्या तब्बल १७ वर्षांच्या काळात या मालिकांमधल्या ‘रोमँटिक’ सीन्समधल्या रोमान्समध्ये काहीही दिग्दर्शकीय बदल नाही. प्यार के रंग तसेच घिसेपिटे, टिपिकल. अगदी कपड्यांची रंगसंगतीही तीच. लाल, मॉव्ह नाहीतर एकदम गर्द गुलाबी.

भारतीय टीव्हीच्या पडद्यावर सेक्स आणि सेक्शुआलिटी खुलेपणानं दाखवायला ‘सक्त मनाई’ असल्यानं, अशी छुप्या लैंगिकतेचा आविष्कार असणारी दृश्यं वारंवार, साचेबद्धपणाने मालिकांमध्ये अंतर्भूत करावी लागत असावीत. साधी गोष्ट आहे, अप्रत्यक्ष शृंगाराच्या अभिव्यक्तीकरता जास्त क्रिएटीव्हिटीची गरज असते, आणि कल्पना दारिद्र्य हा तर सगळ्या मालिकांचा कॉमन यूएसपी. तेव्हा या दृश्यांच्या सादरीकरणात गेली सतराच काय, पुढची पंचवीस वर्षंही बदल होण्याची सुतराम शक्यता नाही.

हिंदी मालिकांमधल्या तथाकथित रोमान्सची ही परिस्थिती तर आपल्या मराठी मालिका यापेक्षाही शंभर पावलं मागे, अजून सोज्वळतेच्या बुरख्यातच अडकलेल्या. लग्नाआधी दोघं पाणीपुरी खातात, बसस्टॉपवर एकमेकांची वाट पाहतात, समुद्राकाठी फिरतात. रोमान्सची इतीपूर्ती. लग्न झाल्यावर त्यानं तिच्या केसांत चोरून गजरे माळण्याचं, गच्चीत वाळत घातलेल्या कपड्यांच्या मागे लपंडाव खेळण्याचं, नाहीतर शेतात एकमेकांना भाकरीचे घास भरवण्याचं (लेटेस्ट राणा-अंजलीबाई) सुसंस्कारीत दृश्य हे मराठी मालिकांमधल्या रोमान्सचं प्रातिनिधिक स्वरूप. मराठी मालिकांमध्ये लग्न झालेल्या जोडप्यातही शारीरिकता दाखवण्यास सक्त मनाई असते. प्रियकर-प्रेयसीचे नवरा-बायको होतात, पण एकत्र झोपण्याची दृश्यं तर जाऊचद्या, त्यांच्यात शारीरिक आकर्षण नावाची चीज नावापुरतीही आहे की नाही काही कळतच नाही. सगळा डोळ्यात डोळे घालून बघण्याचा प्लेटॉनिक कारभार.

मालिकांमध्ये पीळदार शरीराचे नायक आणि कमनीय नायिका घ्यायच्या, त्यांचे कपडे, मेकअप जास्तीतजास्त भडक, कृत्रिम करायचे, त्यांना दागिन्यांनी मढवायचं, त्यांच्या अवतीभवती कृष्णकारस्थानं करणाऱ्यांची फौज उभी करायची, हिंसा, लबाडी यथास्थित दाखवायचं… हे असे सगळे दडपलेल्या लैंगिकतेचे विकृत आविष्कार. ते दाखवण्यात कल्पनाशक्ती खर्च केली जाते, पण प्रेम या भावनेला सर्वार्थानं कधीच फुलवलं जात नाही. हळुवार रोमान्सची नजाकत दाखवणारे स्पर्श, शारीरिक आकर्षण, शृंगार अशा पायऱ्या गाळूनच टाकतात पूर्णपणे.

कुटुंबासोबत मालिका बघितल्या जातात हे खरं, पण शारीरिकतेकडे इतका काणाडोळा करणं हे अनैसर्गिक नाही का? कल्पनाशक्ती पणाला लावून अभिजात शृंगारही दाखवता येऊ शकतो. हिंदी मालिकांमध्ये रोमँटिक दृश्यं साचेबद्धपणे दाखवत असले तरी निदान त्यांनी शारीरिकता, शृंगार दाखवण्याच्या बाबतीत बरीच मोठी मजल मारली आहे.‘बडे अच्छे लगते है’मधला साक्षी तन्वर आणि राम कपूरचा हनीमून बऱ्यापैकी गाजलाही होता. फार पूर्वी ‘अवंतिका’ या मालिकेमध्ये काही शारिरीक दृश्यं चित्रित केली होती. प्रेक्षकांनी स्वीकारली होती ती. 

अनेकदा असं वाटतं की, मालिका या बाबतीत पन्नास ते सत्तरपर्यंतच्या हिंदी सिनेमाच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. या काळात बहुसंख्य हिंदी सिनेमांमध्ये दिसणारा रोमान्स असाच टिपिकल, दांभिक होता. नायक-नायिका यांच्यात ‘आंखो आंखो में’ प्रेमाचा इजहार झाल्यावर त्यांनी हातात हात घ्यायचे, बागेत जाऊन झाडाला प्रदक्षिणा घालत रोमँटिक गाणी म्हणायची, पावसात भिजायचं आणि मग स्टोरीची डिमान्ड जशी असेल, त्यानुसार शेकोटीतल्या ठिणग्यांच्या क्लोज अप दाखवायचा, बागेतली गुलाबांची फुलं एकमेकांना भिडताना दाखवायची की, फांदीवरच्या राघू-मैना चोचीत चोच घालताना दाखवायचं याचा निर्णय घ्यायचा. ओलेती नायिका, तिच्या देहाची उत्तान, कमनीय वळणं, बलात्कार, हिंसा दाखवताना अजिबात हात राखून ठेवायचा नाही, मात्र नायक-नायिकांनी हळुवारपणे ओठांवर ओठ टेकणं हे महापाप. प्रेमाचे रंग आगळ्या कल्पनाशक्तीने बहारदार दृश्यांमधून खुलवणारे काही सन्माननीय दिग्दर्शक नक्कीच होते, पण ते मोजकेच.

हिंदी सिनेमाच्या रोमान्सची खरी तीव्रता निदान सुरेल गाण्यांच्या शब्दांमधून तरी व्यक्त व्हायची. हळव्या प्रेमापासून शारीरिक आकर्षणापर्यंतच्या सगळ्या छटा गाण्यांच्या माध्यमांमधून तीव्रतेनं लोकांच्या हृदयापर्यंत येऊन भिडायच्या. त्यांच्यातल्या दडपलेल्या शृंगारिक भावनांचा या गाण्यांद्वारे निदान निचरा होऊ शकत होता. मालिकांच्या पडद्यावर तर त्यांचीही उणीव.

गाण्यांकरता मालिकावाले बहुतांशी हिंदी सिनेमांमधल्या प्रेमगीतांवर अवलंबून राहतात. अगदी मोजके अपवाद आहेत. पण एखाद्याच गाण्यापुरते ते हे कष्ट घेतात. उदा. ‘कुछ रंग प्यार के…’मधलं गाणं. मराठीमध्ये ‘काहे दिया परदेस’.

खरं तर टीव्हीच्या छोट्या पडद्यावर गेली कित्येक दशकं दिसणाऱ्या अमेरिकन सिटकॉम्समधून खुला रोमान्स, शारीरिक आकर्षण, सेक्स या गोष्टींनी भारतीय घरांमधे सहजरित्या प्रवेश केलेला आहे. शहरी, अगदी ग्रामीण भागांमधलेही निदान दोन पिढ्यांपासूनचे तरुण प्रेक्षक नियमित या मालिका बघतात. पडद्यावरची शारीरिकता स्वीकारण्याइतकी परिपक्वता भारतीय प्रेक्षकांमध्ये तरीही नाही, असं का समजलं जावं? 

मालिकांमध्ये शारीरिक आकर्षणाचे, शृंगाराचे उल्लेख नाकारण्याच्या, प्रेमातल्या या महत्त्वाच्या भावनेबद्दल नकारात्मकता दाखवण्याच्या अनैसर्गिक मनोवृत्तीमध्ये भारतीय समाजाच्या दडपलेल्या लैंगिक भावनेचा आविष्कार दिसतो, असे खेदानं म्हणावंसं वाटतं. शारीरिकता, लैंगिकता, शृंगार नाकारून त्या बदल्यात हिंसाचार, कौटुंबिक राजकारण, कट-कारस्थानं, स्वार्थीपणा, सवंग विनोद, भपका अशा नकारात्मक भावनांचा उच्चार मालिकांद्वारे रोजच्या रोज आपल्या घरांमध्ये होऊ देणं, योग्य की अयोग्य याचा निवाडा आपणच करायला हवा. 

लेखिका कलासमीक्षक आहेत.
sharmilaphadke@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......