अजूनकाही
आज आश्विन पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा… म्हणजेच आपली कोजागरी पौर्णिमा हो! या पौर्णिमेचे महत्त्व वेदपुराणांपासून वात्सायनापर्यंत आणि बौद्ध धर्मापासून हिंदू धर्मापर्यंत सर्वत्र पाहायला मिळते. भारतातल्या प्रत्येक प्रांतात कोजागरी साजरी होते, अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने. महाराष्ट्रात आज केशर, बदाम, पिस्ते, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ, साखर आणि केशर आटवलेल्या दुधात घालून त्याचा लक्ष्मीला प्रसाद दाखवला जातो आणि मध्यरात्री त्या दुधात चंद्राची किरणे पडल्यानंतर ते स्त्री-पुरुष मिळून पितात. गुजरातमध्ये रास व गरबा खेळला जातो. बंगालमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. राजस्थानात महिला शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात आणि पुरुष चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना साखर घातलेलं दूध देतात. हरयाणामध्ये दुधाची खीर रात्री चांदण्यात ठेवतात आणि सकाळी खातात. याशिवाय कोजागरीविषयीची गाणी, कविताही प्रत्येक भारतीय भाषेत आहेतच. आपल्या मायमराठीमध्ये तर ज्ञानेश्वरमाऊलीपासून मंगेश पाडगांवकरांपर्यंत चंद्रपुनवेचं कितिकांनी गुणगान गायलंय. चंद्राची जादू म्हणा किंवा चांद्रमोहिनी म्हणा… कोजागरी पौर्णिमा तिचा सर्वोच्च बिंदू मानला जातो.
भारत, अमेरिका आणि इंग्लंड या तीन भिन्न देशांतल्या तीन भिन्न कवींना पडलेल्या चांद्रभुलीची ही एक झलक… आजच्या कोजागरीच्या निमित्ताने….
...............................................................................................................................................................
आचार्य अत्रे, वॉल्टर द ला मेअर हे दोन कवी आणि एमिली डिकिन्सन ही कवयित्री; या तिघांमध्ये कसलेही साम्य नाही. काळाचे नाही आणि व्यक्तिमत्त्वांचे तर नाहीच नाही. अत्रे भारतातले- महाराष्ट्रातले, १८९८ साली जन्मलेले. वॉल्टर द ला मेअर इंग्लंडमध्ये १८७३ साली जन्मलेला, आणि एमिली डिकिन्सन अमेरिकेमध्ये १८३०मध्ये जन्मलेली. पण, तरीही या तिघांनाही चांद्रमोहिनीने एकत्र आणले. या तिघांनीही चंद्राच्या जादूवर अतिशय सुंदर अशा कविता लिहिल्यात.
चंद्रप्रकाश म्हणजे एक विश्वमोहिनी! मेनका विश्वामित्राचा तपोभंग करायला कोजागरीच्या चंद्रप्रकाशात गेली असावी, असे मला माझ्या कुमारवयात वाटत असे. संपूर्ण पृथ्वीला भारून टाकणारा मधुर चंद्रप्रकाश सगळ्यांना प्रेमभावनेने भारून टाकतो, यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही. तो असे का करतो, याचे उत्तर अजून कुणाला मिळालेले नाही. सौंदर्य आणि प्रेमभावना यांचे काहीतरी नाते आहे, एवढेच आपल्याला माहीत असते.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आज कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने एका मित्राने आचार्य अत्रे यांचे प्रसिद्ध नाट्यगीत पाठवले. बकुल पंडित यांनी गायलेले हे गीत मला कुमारवयापासून अस्वस्थ करत होते. श्रीनिवास खळे यांनी लावलेली चाल ‘हॉन्टिंग’ आहे. त्यामुळे असे होत असावे, असे मला पहिल्या पहिल्यांदा वाटत होते. मग कळले की, बकुल पंडित यांच्या आवाजाच्या ‘फ्रेशनेस’चासुद्धा यात हात आहे. आणि मग जाणवले की, आचार्य अत्रे जरी मूलतः कवी नसले तरी त्यांनी कोजागरी पौर्णिमेच्या चंद्राच्या सौंदर्याचा पारा आपल्या गीतामध्ये अगदी शिताफीने पकडला आहे. अत्र्यांनी फक्त सहा ओळीत सगळी चांद्रमोहिनी शब्दांमध्ये पकडलीय-
उगवला चंद्र पुनवेचा!
मम हृदयी दरिया! उसळला प्रीतिचा!
दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या!
प्रणयरस हा चहुंकडे! वितळला स्वर्गिचा?
पहिल्या दोन ओळी महाविद्यालयीन वयात घेऊन जातात. पौर्णिमेचा चंद्र, मला आवडणाऱ्या मुलींच्या सौंदर्याची आठवण करून देत असे. हीरो होंडा काढून आवडणाऱ्या मुलींच्या घरांवरून मी रात्री-अपरात्री घिरट्या घालत असे. पौर्णिमेचा चंद्र आणि हृदयामध्ये उसळणारा प्रेमभावनेचा दर्या यांचे नाते, त्या काळात माझ्या लक्षात आले. कितीही घिरट्या घातल्या तरी एकही मुलगी मला दिसत नसे. सगळ्या पुण्याच्या मुली! एवढ्या रात्री दारात येऊन कोण मला दर्शन देणार? खूप फिरून मनसोक्त निराशा झाली की, मी पर्वतीवर जाऊन बसे. बाकी कुणीच नको, आपण आणि हे पौर्णिमेचे सौंदर्य एवढेच आपल्याला बास, असे वाटे.
पर्वतीवरून खाली पुण्याकडे बघितले की, सगळ्या दिशा चंद्रप्रकाशाने खुलून गेलेल्या दिसत आणि -
‘दाहि दिशा कशा खुलल्या’
या ओळी किती समर्पक आहेत, हे लक्षात येत असे.
पुढे चंद्र उगवला की, उमलून येणारी कमलपुष्पे असतात आणि त्यांना ‘चंद्रविकासी कमलिनी’ असे म्हणतात, हे कळले. त्यानंतर अत्र्यांच्या गीतातील
‘वनिवनी कुमुदिनी फुलल्या’
या ओळीचा संपूर्ण अर्थ कळला.
एवढे सगळे झाल्यावर नववधू मनातून अधीर होणारच, याबद्दल शंका राहत नसे. मी विचार करत असे की, आपल्याला आवडणाऱ्या मुलींची मनःस्थिती या वेळी कशी असेल? त्यांचीही मनःस्थिती उत्फुल्ल होत असणार, पण त्यातले कोणीही आपली स्कूटर किंवा सायकल काढून माझ्या घरावरून चकरा मारत नसे.
अत्र्यांच्या या गीतातली शेवटची ओळ तर स्वर्गातून उतरल्यासारखी वाटत असे… अजूनही वाटते.
प्रणयरस हा चहुंकडे! वितळला स्वर्गिचा?
अख्ख्या पुण्यावर पसरलेली ती चंदेरी जादू. त्यामुळे मनात पसरलेली प्रणयाची जादू, हृदयात साठलेले आवडणाऱ्या मुलींचे सौंदर्य, बकुल पंडित यांचा कोवळा आणि फ्रेश आवाज, आचार्य अत्रे यांचे शब्द आणि श्रीनिवास खळे यांनी लावलेली चाल; सगळेच जादूचे! माया आणि मोहाचे हे ‘परफेक्ट’ स्टेज! आणि, ‘वितळलेला प्रणयरस’ या प्रतिमेला काय म्हणावे! शब्दातीत!!
अजूनही हे गाणे ऐकले की, पावसासारख्या चांदण्याच्या धारा कोसळत आहेत, असे वाटत राहते. अत्र्यांच्या शब्दांना श्रीनिवास खळ्यांनी लावलेल्या चालीचे चलनच तसे आहे! सगळी रूपेरी जादू!
चंद्र आणि चंद्रप्रकाश असा एन्जॉय करत असताना पुढे एकदा अचानक वॉल्टर द ला मेअर या कवीची ओळख झाली. तीसुद्धा चंद्रप्रकाशाने भारलेल्या त्याच्या ‘सिल्व्हर’ या कवितेमुळे!
Silver
Slowly, silently, now the moon
Walks the night in her silver shoon;
This way, and that, she peers, and sees
Silver fruit upon silver trees;
One by one the casements catch
Her beams beneath the silvery thatch;
Couched in his kennel, like a log,
With paws of silver sleeps the dog;
From their shadowy cote the white breasts peep
Of doves in a silver-feathered sleep;
A harvest mouse goes scampering by,
With silver claws and a silver eye;
And moveless fish in the water gleam,
By silver reeds in a silver stream.
ही विलक्षण कविता कुणालाही ट्रान्समध्ये नेईल. मला जमला तसा तिचा हा अनुवाद -
चांदी
शांतपणे, हळूहळू, चालते चंद्रिका
रात्रीवरून घालून चांदीच्या चपला
बघते इकडे तिकडे, निरखते हे ते,
चांदीच्या झाडांवर चांदीची फळे
एकएक करून चमकत जातात खिडक्या
पडलेल्या चांदीच्या किरणांनी तिरक्या
आपल्या घरात, पडलाय जणू ओंडका,
चांदीच्या पावलांचा झोपलाय कुत्रा.
घरट्यातून डोकावतात चांदीची पिसे,
चांदीच्या पिसांमध्ये झोपलेले पारवे
सुगीच्या काळातला धावतो उंदीर
चांदीचे पंजे, डोळ्यात चांदीचे नीर
एक मासा स्तब्ध, चमकतो पाण्यातून
चांदीच्या वेळूतून, चांदीच्या प्रवाहातून
उंदीर, पारवे, झाडे, फळे इतकेच काय झोपलेला कुत्रा आणि त्याचा पंजासुद्धा चंद्रप्रकाशामुळे चांदीचा झालेला आहे! ‘परफेक्टली मॅजिकल’ शब्दांमध्ये पकडलेले चंद्रप्रकाशाचे ‘मॅजिक’!
खरं तर वॉल्टर द ला मेअर यांच्या या कवितेतील इंग्रजी भाषेचे चलन पकडणे अशक्य आहे. परंतु, ज्यांना इंग्रजी कविता वाचण्याची सवय नाही, त्यांच्यासाठी मराठी अनुवाद दिला की, त्यांच्या हाती इंग्रजी कवितेचे सौंदर्य अगदी सहजपणे लागते, म्हणून हा कामचलाऊ अनुवाद. हीच गोष्ट एमिली डिकिन्सन यांच्या ‘द मून’ या कवितेच्या अनुवादाची!
The Moon
The moon was but a chin of gold
A night or two ago,
And now she turns her perfect face
Upon the world below.
Her forehead is of amplest blond;
Her cheek like beryl stone;
Her eye unto the summer dew
The likest I have known.
Her lips of amber never part;
But what must be the smile
Upon her friend she could bestow
Were such her silver will!
And what a privilege to be
But the remotest star!
For certainly her way might pass
Beside your twinkling door.
Her bonnet is the firmament,
The universe her shoe,
The stars the trinkets at her belt,
Her dimities of blue.
अत्रे आणि वॉल्टर द ला मेअर यांना जसा चंद्राच्या सौंदर्याचा दंश झाला होता, तसाच एमिली डिकिन्सनलासुद्धा. तिच्या कवितेचा हा अनुवाद -
चंद्रिका
काल परवा होती चंद्रिका
रेखीव सोनेरी हास्यासारखी,
वळवते आहे जगाकडे खालच्या
आज परिपूर्ण चेहरा तिचा
कपाल उत्फुल्ल सौवर्णाचे,
गाल वैदूर्य रत्नासारखे
डोळे पाणीदार, वसंतातल्या
मी पाहिलेल्या दवासारखे
ओठ मोतिया सतत मिटलेले,
असेल किती सुंदर हास्य तिचे
उधळेल जेव्हा प्रियकरावर ती
आपल्या चंदेरी इच्छेने
असेल किती भाग्याचे
दूरचा तारा राहणे बनून
रस्ता तिचा जाईल नक्की
त्याच्या चमकत्या दारावरून
तारांगण आहे पदर तिचा
विश्व बिचारे चप्पल तिची
तारे रत्ने केवळ तिच्या
कंबरपट्ट्यातील आकाशी
एमिली डिकिन्सन ही वेगळीच कवयित्री होती. पहिल्या ओळीमध्ये चंद्राला ती सोनेरी हनुवटीची उपमा देते. आकाशात हळूहळू पूर्णत्वाला जाणारी चंद्रिका ही अनुपम अशी सौंदर्यवती आहे, असे चित्र तिने रेखाटलेले आहे. पहिल्यांदा तिची फक्त हनुवटी दिसते, मग गाल दिसतात, मग शेवटी पूर्ण चेहरा दिसतो. काही समीक्षक म्हणतात की, रेखीव हनुवटीच्या आकाराचे चंद्रकोरीचे हास्य पहिल्यांदा दिसते, मग गाल आणि मग पूर्ण चेहरा!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पौर्णिमेची चंद्रिका रात्रीच्या पहिल्या प्रहरात पिवळसर मोतिया रंगाचा दिसते, म्हणून चंद्रिकेचे ओठ मोतिया रंगाचे आहेत. ती जेव्हा प्रियकरावर आपले हास्य उधळेल, तो सौंदर्याचा परमोच्च उत्कर्ष असेल, अशी एमिली डिकिन्सनची भावना आहे.
सौंदर्याच्या या उत्कर्षापुढे सगळे जग क्षुद्र आहे. तारांगण तिच्या पदराच्या ‘सायडी रोल’मध्ये आहे. सगळे विश्व तिची चप्पल बनून राहिले आहे. सगळे आकाश तिचा कंबरपट्टा बनून राहिले आहे आणि सगळे तारे त्या आकाशी कंबरपट्ट्याला जडवलेली रत्ने बनून राहिले आहेत. रत्ने कितीही सुंदर असली तरी त्यांना परिधान करणाऱ्या स्त्रीच्या सौंदर्याशी कसलीही स्पर्धा ती करू शकत नाहीत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.
एमिली डिकिन्सनची पूर्णरूप चंद्रिका या विश्वाची सर्वोच्च राज्ञी आहे. ज्या कुणाला हे पटत नसेल, त्या व्यक्तीने कोजागरीच्या दिवशी शहरगावापासून दूर असलेल्या विस्तीर्ण माळावर जावे आणि स्वतःच अनुभव घ्यावा…
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
...............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment